Monday, January 24, 2022

मध्य आशिया किंवा ‘5 स्तान’ वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? भारताच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भारताने कजाखस्तान, किरगिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान या नैसर्गिक संपत्तीचे वरदान लाभलेल्या भूवेष्टित देशांच्या राष्ट्रप्रुखांना प्रमुख पाहुणे म्हणून पाचारण केले होते. पण कोरोनाकहरामुळे हे पाहुणे पाहुणचारासाठी सदेह किंवा आभासी पद्धतीनेही सहभागी होऊ शकणार नाहीत, याचे वाईट वाटते. हे 5 विकसनशील देश ‘5 स्तान’ म्हणूनही ओळखले जातात. ‘स्तान’ हा शब्द पर्शियन भाषेतून आला असून त्याचा अर्थ स्थान असा आहे. सोव्हिएट युनीयनचे विघटन झाल्यानंतर हे पाच देश स्वतंत्र झाले आहेत. यानंतरच मध्य आशिया हा शब्दप्रयोग या 5 भूवेष्टित देशांना संबोधण्यासाठी वापरात आल्याचे दिसते. मध्य आशियामुळे युरोप आणि आशिया एकमेकांना जोडले गेले आहेत. मालाची वाहतुक करण्यासाठी बांधलेला सिल्क रूटही मध्य आशियातून जातो. पण या मार्गाने मालाच्या सोबतीने विचार, संस्कृती आणि मानवांचेही दळणवळण सुरू झाल्याचे इतिहास सांगतो. हाच परिणाम पृथ्वीवर जेव्हा जेव्हा आक्रमणे झाली, सत्तांतरे घडून आली, मानवांचे स्थलांतर स्वाभाविकपणे किंवा आश्रयार्थी म्हणून झाले, तेव्हा तेव्हाही झालेला दिसून येतो. युरेनियम, सोने, चांदी, तांबे, टंगस्टन, ॲल्युमिनीयम यासारखे अमूल्य आणि बहूपयोगी धातू, खनिज तेल आणि नैसर्गिक वायू ही इंधने यांची मुबलकता या पाच देशात आहे. पण हे सर्व देश भूवेष्टित असल्यामुळे बाह्यजगाशी संबंध प्रस्थापित करतांना यांना वेढून असलेल्या देशांनी निर्माण केलेल्या अडचणींचा सामना करावा लागतो. वांशिक वाद, दहशतवाद, फुटिरतावाद, धार्मिक उन्माद आणि कट्टरता, कायदा हाती घेण्याची वृत्ती, अत्याचार, गुन्हेगारी आणि तस्करी यांनी अख्खा मध्य आशिया ग्रासला आहे. कजाख, किर्ग, ताजिक, तुर्कमेनी, उझबेग आणि अन्यही वंशाच्या लोकांची सरमिसळ मध्य आशियात जवळजवळ सर्वत्र आढळते. त्यामुळे वाद, विसंवाद, वितंडवाद यातून कुरघोडीचे प्रकारही काही कमी होत नाहीत. मानवीहक्क निर्देशांकांचा विचार करता हे देश चांगलेच माघारलेले आहेत. भ्रष्टाचार, मानवीहक्कहनन, छळ, लहरीनुसार तुरुंगात डांबणे, अतिमर्यादित धार्मिक आणि वैयक्तिक स्वातंत्र्य या देशांच्या नागरिकांच्या वाट्याला आले आहे. मध्य आशियाच्या सीमा चीनलाही लागून आहेत. चीनचा अनुभव घेऊन झाल्यानंतर या देशातील नेतृत्व आता भारताकडे खऱ्याखुऱ्या सहकार्याच्या आशेने आणि अपेक्षेने पाहत आहे. या पार्श्वभूमीवर भारताने या देशांच्या राष्ट्रप्रमुखांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवून राजकीय परिपक्वतेचा परिचय दिला होता. या राष्ट्रप्रमुखांना खास निमंत्रण देण्यामागे भारताचा जसा विशेष हेतू होता, तसेच या मुस्लीमबहुल राष्ट्रप्रमुखांनाही भारताशी स्नेहाचे व सहकार्याचे संबंध ठेवण्याची इच्छा आहे, हेही विशेषच म्हटले पाहिजे. 1 कजाखस्तान - याचे क्षेत्रफळ सुमारे 27 लक्ष 25 हजार चौकिमी पण लोकसंख्या मात्र 1 कोटी 90 लक्ष एवढीच आहे. कजाखस्तानच्या उत्तरेला आणि पश्चिमेला रशिया, पूर्वेला चीन, दक्षिणेला किरगिस्तान, उझबेकिस्तान, आणि तुर्कमेनिस्तान आहेत. अस्ताना हे राजधानीचे शहर आहे. कजाखस्तान हा जगातला सर्वात मोठा भूवेष्टित देश आहे. हा राजकीय आणि आर्थिक दृष्टीने प्रभावशाली देश आहे. खनिज तेल, खनिजे आणि नैसर्गिक वायूचे वरदान या देशाला लाभले असल्यामुळे येथे संपन्नताही आहे. हा स्वत:ला धर्मातीत (सेक्युलर) आणि लोकशाहीवादी म्हणवणारा देश विविध सांस्कृतिक वारशांनी नटलेला आहे. अनेक जागतिक आणि प्रादेशिक संघटनांची सदस्यता या देशाला लाभली आहे. कास्यम- जोमार्ट टोकायेव हे कझाक राजकारणी आणि परराष्ट्रव्यवहार निपुण नेते या देशाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. या देशाने 13 व्या शतकात चंगीजखानच्या साम्राज्याचा वरवंटा अनुभवला आहे. 15 व्या शतकात आजचा कजाखस्तानखऱ्या अर्थाने आकाराला आला. पण 1991 मध्ये सोव्हिएट युनीयनच्या विघटनानंतर कजाखस्तान हा स्वतंत्र देश जन्माला आला. 2 किरगिस्तान - किरगिस्तान हा सुमारे 2 लक्ष चौकिमी क्षेत्रफळ आणि 60 लक्ष लोकसंख्या असलेला पर्वतमय भूवेष्टित देश आहे. याच्या उत्तरेला कझाखस्थान, पश्चिमेला उझबेकिस्तान, दक्षिणेला ताजिकीस्तान आणि पूर्वेला चीन आहे. बिश्केक हे सर्वात मोठे शहर या देशाच्या राजधानीचे शहरही आहे. या देशात एकापेक्षा जास्त वंशाचे लोक राहतात. हे बहुतेक सगळे सुन्नी मुस्लीम असून सुद्धा त्यात त्यांच्यात एकी नाही. इराणी, मोगल आणि रशियन संस्कृतीचा परिणाम या देशातील जनतेवर झालेला आहे. एक प्रखर राष्ट्रवादी आणि जनप्रिय नेते, सद्यार नुरगोझोएविच जापारोव हे किर्गिज राजकारणी 28 जानेवारी 2021 पासून किरगिस्तानचे अध्यक्ष आहेत. या देशातूनही सिल्क रूट गेलेला आहे. अति संघर्षमय अशा इतिहासकाळात या देशाला अस्कर एकानेव यांचे नेतृत्व लाभले होते. त्यांनी या देशात काहीशी लोकशाहीप्रधान राजवट आणली. त्यात बदल होत होत आज या देशात अध्यक्षीय लोकशाही राजवट कशीबशी नांदते आहे. वांशिक आणि आर्थिक संघर्ष, वेगवेगळ्या राजवटी यामुळे आणि साम्यवादी राजवटी पासून तो लोकशाही राजवटीमुळे या देशाचा प्रवास लक्षवेधी ठरला आहे. किरगिस्तान अनेक जागतिक आणि प्रादेशिक संघटनांचा सदस्य आहे. सोने, कोळसा आणि युरेनियम या भौतिक संपन्नतेचा पुरेसा लाभ या देशाला घेता आलेला नाही. अध्यक्ष जापारोव हेही भारताशी मैत्री करून चीनवरील अवलंबित्व कमी करण्याच्या विचाराचे आहेत. 3 ताजिकिस्तान - या भूवेष्टित देशाचे क्षेत्रफळ 1 लक्ष 42 हजार चौकिमी आहे. लोकसंख्या जवळजवळ 90 लक्ष आहे. दुशांबे ही राजधानी आहे. ताजिकिस्तानच्या दक्षिणेला अफगाणिस्तान, पश्चिमेला उझबेकिस्तान, उत्तरेला किरगिस्तान, आणि पूर्वेला चीन आहे. ताजिक वंशाचे लोक अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तानमध्येही आहेत. एमोमाली रहमोन ताजिक हे नेते आजच्या ताजिकिस्तानचे 1994 पासूनचे अध्यक्ष आहेत. एमोमाली रहमॅान यांची या देशात एकाधिकारशाही 1994 पासून सुरू आहे. ताजिक लोक अनेक भाषा बोलतात. 90 टक्के भूभाग पर्वतीय आहे. 98% जनता इस्लामधर्मीय आहे. कापूस आणि ॲल्युमिनीयम ही उत्पन्नाची प्रमुख साधने आहेत. ताजिकिस्तानही अनेक जागतिक संघटनांचा सदस्य आहे. 4 तुर्कमेनिस्तान - तुर्कमेनिस्तान हा 4 लक्ष 88 हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आणि 60 लक्ष अशी विरळ लोकसंख्या असलेला मध्य आशियातील भूवेष्टित देश आहे. वायव्येला कझाखस्तान, उत्तर, पूर्व आणि ईशान्येला उझबेकिस्तान, आग्नेयेला अफगाणिस्तान, दक्षिण आणि नैरुत्येला इराण आणि पश्चिमेला कॅस्पियन समुद्र हा भूवेष्टित समुद्र (?) आहे. अश्घाबाद हे राजधानीचे शहर सर्वात मोठे शहरही आहे. गुर्बनगुली बेर्डिमुहामेडोव उर्फ अर्काडेग हे तुर्की राजकारणी तुर्कमेनिस्तानचे अध्यक्ष आहेत. विशेष असे की, या देशातून अनेक देशात जाता येते. सिल्क रूट या देशातूनही जातो. नैसर्गिक वायूचा (नॅचरल गॅस) विचार करता, हा जगातला चौथ्या क्रमांकाचा देश आहे. या देशात वीज, पाणी आणि नैसर्गिक वायूसाठी पैसे द्यावे लागत नाहीत. तसेच आश्चर्याची बाब हीही आहे की या देशात मृत्युदंड घटनेने वर्जित आहे. 5 उझबेकिस्तान - उझबेकिस्तान हा 4 लक्ष 49 हजार चौकिमी क्षेत्रफळ आणि 3.42 कोटी लोकसंख्या असलेला दुहेरी भूवेष्टित देश आहे. म्हणजे असे की, याला वेढून असलेले 4 देश स्वत:ही भूवेष्टितच आहेत. उत्तरेला कझाखस्तान, ईशान्येला किरगिस्तान, आग्नेयेला ताजिकिस्तान, दक्षिणेला अफगाणिस्तान, नैरुत्येला तुर्कमेनिस्तान हे स्वत:ही भूवेष्टित देश आहेत. सर्वात मोठे शहर ताश्कंद हेच राजधानीचे शहर आहे. इस्लाम कारिमोव्ह सतत 25 वर्षे उझ्बेकिस्तानचे अध्यक्ष होते. 2 सप्टेंबर 2016 ला हे अल्लाला प्यारे झाले. नंतर शेवकेट मिर्झियोयेव अध्यक्ष म्हणून निवडून आले. ही निवडणूक मुक्त वातावरणात झाली नाही, असा आक्षेप घेतला जातो. उझबेग भाषा बोलणारे हे लोक सुन्नी मुस्लीम आहेत. उझबेकिस्तान पूर्व इराणमधून आलेल्या भटक्यांनी वसवला असे मानतात. तो पर्शियन साम्राज्याचाही भाग होता. पुढे मुस्लिमांनी पर्शिया जिंकल्यानंतर सगळे भटके हळूहळू इस्लामधर्मी झाले. समरकंद, खिवा आणि बुखारा यांच्या विकासाला सिल्क रूटमुळे चांगलाच हातभार लागला होता. ओमर खय्याम सारखी अलौकिक प्रतिभेची व्यक्तिमत्त्वे याच भागातली आहेत. मोगल राजवंशाच्या कालखंडात निरनिराळे भाग विशेषत: समरकंद प्रसिद्धी पावले. बाबराचा दबदबा पूर्व भागात निर्माण झाला होता. याच बाबराने पुढे भारतावर आक्रमण करून मोगल साम्राज्याची स्थापना केली होती. सोव्हिएट रशियाचे विधटन 1991 मध्ये झाले आणि आजचा काहीसा प्रगत उझ्बेकिस्तान अस्तित्वात आला. आजचा उझबेकिस्तान अध्यक्षीय प्रणालीचे धर्मातीत (सेक्युलर) राष्ट्र आहे. बारा विलायती (प्रदेश), ताश्कंद हे शहर आणि कराकालपाकस्तान हे स्वायत्त प्रजासत्ताक यांचा मिळून आजच्या उझबेकिस्तानचा डोलारा उभा आहे. मर्यादित नागरी हक्क असलेले हे राष्ट्र होते. तरीही नंतरच्या राज्यकर्त्यांनी अनेक सुधारणा घडवून आणून उझबेकिस्तानला मध्य आशियात महत्त्वाचे स्थान मिळवून दिले आहे, असे मानतात. किरगिस्तान, ताजिकिस्तान आणि अफगाणिस्तान यात आज विशेष सख्याचे संबंध आहेत. उद्या अफगाणिस्तानमध्ये काही बदल घडणार असतील किंवा कुणी घडवणार असेल तर त्यावेळी या देशांना वगळून चालणार नाही. उझ्बेगचे अर्थकारण जागतिक अर्थकारणाशी सुसंगत भूमिका घेत आहे. कापसाची निर्यात, मुबलक नैसर्गिक वायूचा साठा, विजेचे विपुल उत्पादन, भरघोस आर्थिक विकास आणि कमीतकमी कर्ज ही या देशाची विशेषता आहे. म्हणून आज उझबेकिस्तानला जगात एक प्रतिष्ठित राष्ट्र म्हणून मान्यता मिळालेली आहे. मध्य आशियातील ‘5 स्तान’ आणि भारत यात एकमेकांना देण्यासारखे पुष्कळ आहे. भारत यांची अन्नधान्याची गरज भागवू शकेल तर तर त्याची भरपाई म्हणून हे देश भारताला युरेनियम, सोने, चांदी, तांबे, टंगस्टन, ॲल्युमिनीयम यासारखे अमूल्य आणि बहूपयोगी धातू, खनिज तेल आणि नैसर्गिक वायू पुरवू शकतील. परस्परावलंबित्व स्थायी मैत्रीचा पाया म्हणून महत्त्वाचे मानले गेले आहे. त्यामुळे हे देश आणि भारत एका व्यासपीठावर आल्यास यांच्यातील परस्परपूरकतेमुळे आंतरराष्ट्रीय सहकार्याचा आदर्श उभा करण्याचा अपूर्व योग घडून येईल.

No comments:

Post a Comment