Monday, July 11, 2022

अणूतून साकारले ब्रह्मांड! वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 Email - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? तरूण भारत, नागपूर. मंगळवार, दिनांक : १२/०७/२०२२ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल. अणूतून साकारले ब्रह्मांड! वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? खनिज तेलांचे साठे काही मोजक्या देशातच आढळून येत असल्यामुळे ते देश सर्व जगाला वेठीस धरतांना आपण आजवर पाहत आलो आहोत. हे देश आपल्या लहरीनुसार तेलाचे उत्पादन अचानक पुरेशा प्रमाणात करण्याचे थांबवतात. त्यामुळे बाजारात खनिज तेलाचा तुटवडा निर्माण होतो आणि भाव कडाडतात. गरजू देशांना वाढलेल्या भावाने खनिज तेल खरेदी करावेच लागते आणि याचा परिणाम त्यांचे आर्थिक अंदाजपत्रक कोलमडण्यात होतो. तेल उत्पादक देशांपैकी बरेच देश एका केंद्रीय संघटनेचे सदस्य आहेत. ही संघटना तेलाचा जो भाव ठरवते, त्यापेक्षा कमी दराने कुणीही तेल विकू नये, असा या संघटनेचा नियम आहे, त्यामुळे ही संघटना ठरवील त्या दरानेच सदस्य देशांना तेल विकावे लागते. कधी कधी तेलाची मागणी ऋतुमानानुसार कमी होते, अशावेळी भाव पडू नयेत आणि बाजारात तेल पडून राहू नये, म्हणूनही खनिज तेल कमी प्रमाणात उपसून हे देश भाव पडू देत नाहीत. युक्रेनयुद्धानंतर तर खनिज तेलाचा प्रश्न अधिकच चिघळला आहे. निसर्गातील विरळ (रेअर) मूलद्रव्ये निसर्गात काही एलिमेंट्स (मूलद्रव्ये) अतिशय विरळ (रेअर) प्रमाणात सापडतात. त्यांना विरळ (रेअर) म्हणजे अतिशय कमी प्रमाणात आढळणारी मूलद्रव्ये असे नाव आहे. सध्या तंत्रक्षेत्रात आणि विज्ञान क्षेत्रात जी क्रांती घडून आली आहे, या क्रांतीत विरळ मूलद्रव्यांचा वापर करूनच उत्तम गुणवत्ता असलेली यंत्रे, संयत्रे, अवजारे, उपकरणे, वाहने, वस्तू तयार करता येत असल्यामुळे यांची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की, विरळ मूलद्रव्ये पुरवणारे देश खूपच कमी आहेत. खनिज तेलाचे बाबतीत जशी काही देशांची मक्तेदारी आहे, ती एकवेळ कमी म्हणावी लागेल इतक्या कमी संख्येत विरळ मूलद्रव्ये उत्पादन करणारे देश आहेत. त्यातही चीनचा क्रमांक पहिला आहे. एकवेळ तर अशी होती की, जगाला आवश्यक असलेल्या विरळ मूलद्रव्यांचा 90% टक्के पुरवठा एकटा चीनच करीत असे. या बाबीची जाणीव होताच अमेरिका, कॅनडा, ॲास्ट्रेलियासारखे काही देश खडबडून जागे झाले आणि त्यांनी हा प्रश्न युद्धपातळीवर हाताळायला सुरवात केली. आणि चीनची मक्तेदारी 90% टक्यावरून 60% पर्यंत खाली आणली. पण तरीही अडवणूक करण्यात तरबेज असलेला चीन आजही विरळ मूलद्रव्यांची 60% गरज भागवतो आहे, ही बाबही गंभीरच म्हणावी, अशी आहे. खरेतर भारताचे भूगर्भातील विरळ मूलद्रव्यांचे साठे अमेरिका आणि ॲास्ट्रेलियापेक्षा जास्त आहेत. भूगर्भातील विरळ मूलद्रव्यांचे साठे हिशोबात घेऊन जगातील देशांची क्रमवारी लावली तर चीन, रशिया आणि व्हिएटनाम नंतर भारताचा क्रमांक लागतो. पण जगातला विरळ मूलद्रव्यांचा चौथ्या क्रमांकाचा साठा भारतात असूनही आपण यांच्या पुरवठ्यासाठी इतरांवर स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली असली तरी जवळजवळ 100% अवलंबून आहोत, ही बाब अस्वस्थ करणारी आहे. आपल्या खनिज मंत्रालयाने सात आठ वर्षांपूर्वी या उणिवेची विशेष गंभीर दखल घेतली असून याबाबत केवळ सरकारी प्रयत्नांवरच अवलंबून न राहता खाजगी भांडवलदारांनीही या क्षेत्रात भांडवली गुंतवणूक करावी यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत, ही समाधानाची बाब आहे. भारतात जगाची गरज भागवण्याची क्षमता चीन आडमुठा आहे, तर रशिया युक्रेनच्या युद्धात गुंतला आहे. अशावेळी भारताने स्वत:ची आणि जगाचीही गरज भागवण्यास पुढे येण्याची गरज आहे, हे लक्षात घेऊन मोदी सरकारने याबाबत मह्त्वाची पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. योग्यती पावले टाकून भारत स्वत:ची विरळ मूलद्रव्यांची गरज तर भागवू शकेलच याशिवाय जगाची गरजही पूर्ण करू शकेल इतक्या मोठ्या प्रमाणात भारताच्या भूगर्भात विरळ मूलद्रव्यांचे साठे उपलब्ध आहेत. भारतात विरळ मूलद्रव्यांच्या खनिजांना ॲटॅामिक मिनेरल्स या गटात समाविष्ट केलेले आढळते. हा खनिजांचा एक विशेष गट असून यातील मूलद्रव्यांचे गुणधर्म इतर सामान्य खनिजातील मूलद्रव्यांच्या गुणधर्मांपेक्षा अगदी वेगळे आणि महत्त्वाचे असतात. युरेनियम आणि थोरियम यांच्या खनिजांसोबतसुद्धा ही विरळ मूलद्रव्ये आढळून येत असल्यामुळे यांना ॲटॅामिक मिनेरल्स असे नाव आपण दिले आहे. विरळ मूलद्रव्यांचे दुसरे वेगळेपण असे आहे की, त्यांचे निसर्गातील प्रमाण तसे पाहिले तर कमी नाही. या अर्थाने ते रेअर नाहीत तर त्यांचे खनिजातील प्रमाण (कॅान्सेंट्रेशन) विरळ किंवा कमी आहे. याचा अर्थ असा की खाणीतून समजा एक टन खनिज बाहेर काढले तर त्यात 0.001 ग्रॅम म्हणजे एकसहस्रांशही विरळ मूलद्रव्य असत नाही. पण अशा खनिजाची मात्र भारतात कमतरता नाही. समुद्र किनाऱ्यावर रेती भरपूर असते. त्यात विरळ असली तरी विरळ मूलद्रव्ये पुरेशी असतात. हा प्रकार डोंगर पोखरून उंदीर मिळावा असा असला तरी याला पर्याय नाही. म्हणूनही रेतीच्या वापरावर 2016 पासून बंधने घालण्यात आली आहेत. कारण रेतीत थोरियम सारखे ॲटॅामिक खनिजही आहे. ते जपून ठेवण्यासाठी भरपूर असलेल्या रेतीच्या वापरावर मर्यादा घालणे आवश्यक आहे. तसेच ज्या मॅानॅाझॅाईट खडकात विरळ मूलद्रव्ये सापडतात, ते खडकही भरपूर प्रमाणात भारतात आढळतात. या दोन्हीची आपल्या देशात कमतरता नाही. पण त्यात विरळ मूलद्रव्यांचे प्रमाण मात्र कमी असते. युरेनियम आणि थोरियमच्या सोबतीने ही बहुपयोगी असलेली विरळ मूलद्रव्ये सापडत असल्यामुळे आजवर भारतात या बाबतीतल्या खाणी फक्त सरकारी मालकीच्या होत्या. भारत सरकारचा 1950 मध्ये स्थापन झालेला मुंबई येथील इंडियन रेअर अर्थ्स लिमिटेड आणि केरळ सरकारच्या मालकीचा 2001 मध्ये स्थापन झालेला केरळ मिनेरल्स ॲंड मेटल्स लिमिटेड अशा या दोन कंपन्या आहेत. पण यांची उत्पादनक्षमता आणि तांत्रिकक्षमता आणि त्यातील भांडवली गुंतवणूक वाढत्या गरजा लक्षात घेता मर्यादित आहे. त्यामुळे आपल्याला आयात करण्यावाचून दुसरा मार्गच उरत नव्हता. यावर उपाय म्हणून खाजगी क्षेत्रातून कंपन्या काढून उत्पादनवाढीसाठी आता जोरकस प्रयत्न सुरू झाले आहेत. जटिल आणि जोखमीची प्रक्रिया खनिज खणून काढणे, नंतर त्यातून ही मूलद्रव्ये वेगळी करणे, ही एक जटिल आणि वेळखाऊ प्रक्रिया तर आहेच पण याशिवाय या उद्योगात सुरवातीला खूप पैसा ओतावा लागतो, खूप उर्जा वापरावी लागते, या मूलद्रव्यांसोबत हलाहलासारखे भयंकर विषारी उप-पदार्थही ( बाय-प्रॅाडक्ट्स) बाहेर पडतात. हे सर्व पत्करून मूलद्रव्य मिळाले तरी लगेच ते मूळ स्वरुपात न राहता त्याचा ॲाक्साईड तयार होतो. त्याचा वापर करायचा झाला तर ॲाक्साईडचे पुन्हा मूलद्रव्यात रुपांतर करून मगच ते उत्पादन प्रक्रियेत वापरता येते. हा सर्व द्राविडी प्राणायम आहे खरा पण मग मात्र निर्माण होणारी वस्तू, उपकरण, यंत्र बावनकशी सोन्यासारखे अस्सलतेचा परिचय करून देणारे असते. आजमितीला एकूण 17 रेअर अर्थ एलिमेंट्स किंवा विरळ मूलद्रव्ये आढळली आहेत. अत्यल्प प्रमाणात आढळणाऱ्या या 17 मूलद्रव्यांची (रेअर अर्थ एलिमेंट्स) नावे रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्यांना वाचावी आणि लक्षात ठेवावी लागतात. वर्ष 1950 मध्ये आम्हा इंटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना यांची नावे लक्षात ठेवणे कठीण वाटायचे. निसर्गात एवढ्या विरळ प्रमाणात आढळणाऱ्या या मूलद्रव्यांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यामागचे कारण लक्षात घेण्याचे तेव्हाचे आमचे वय नव्हते आणि या मूलद्रव्यांचे उपयोगही तेव्हा पुरेसे कळले नव्हते. आपल्यासारख्या सामान्यांनी आता सुद्धा एखाद्या त्रोटक तक्त्यावर नजर टाकूण आपली जिज्ञासा पूर्ण करावी, हेच बरे. कारण यांची नावे वाचतांना डोळ्यांना आणि उच्चारतांना जिभेला भरपूर व्यायाम होईल आणि तरीही शेवटी पदरात काही पडणार नाही, ते वेगळेच. तशी युरेनियम, थोरियम, रेडियम या सारखी नावे आपल्या कानांवर पडून पडून आपलीशी झाली आहेत, वाटू लागली आहेत. यातच सामान्य शहाण्याने समाधान मानावे, हे चांगले. मूर्ति लहान असूनही कीर्ती मात्र महान, पण… रसायन शास्त्राच्या अभ्यासक्रमात मूलद्रव्यांचे वर्गीकरण सांगितले आहे. त्याला पिरिॲाडिक टेबल असे नाव आहे. या सारणीत रेअर एलिमेंट्सचे लाईट (वजनाने हलके) रेअर अर्थ्स आणि हेवी (वजनाने जड) अर्थ्स असे दोन प्रकार केले आहेत. खूपच कमी प्रमाणात आढळणाऱ्या या भूघटकांचे गुणधर्म किती अचाट आणि अफाट आहेत, हे पाहून आश्चर्यचकित व्हायला होईल. आधुनिक वैज्ञानिक आणि तांत्रिक क्रांतीमध्ये या 17 खारींचा वाटा मात्र सिंहांच्या कळपाच्या वाट्या एवढा विशाल आहे. आधुनिक शस्त्रास्त्रे, विजेवर चालणारी वाहने, रिन्युएबल एनर्जीशी संबंधित संयंत्रे, उच्च दर्जाची इलेक्ट्रॅनिक उपकरणे, अतिजड वस्तू उचलू शकणारे चुंबक, पवन चक्या, रंगीत टीव्ही, लेझर उपकरणे, तांत्रिक व यांत्रिक वैद्यकीय उपकरणे शिवाय एलईडी बल्ब्ज, तयार करण्यासाठी या 17 रेअर अर्थ मूलद्रव्यांपैकी कशाकशाचा आणि कसाकसा उपयोग होतो, या विषयीचा तपशील या विषयांना वाहिलेल्या ग्रंथांमध्ये आपल्याला सविस्तर, अधिक तपशीलवार आणि बिनचुक स्वरुपात दिलेला आढळेल. सर्वच्या सर्व विरळ मूलद्रव्यांचा पुरता वापर अजून मानवाने केलेला नाही. तो ज्या दिवशी होऊ लागेल त्या दिवशी अणूतून अक्षरशहा ब्रह्मांड साकारेल. तेव्हा कल्पित वैज्ञानिक कथांमधील चमत्कार, चमत्कार राहणार नाहीत. हॅरि पॅाटरची छडी आणि विद्युत वेगाने उडणारा झाडू प्रत्यक्षात अवतरलेलाही पाहता येऊ शकेल. पण… पण एकच आहे. दरम्यानच्या काळात मानवांनी आपापसात भांडून आणि संहारक अस्त्रे बेधडक वापरून मानववंशच नष्ट होईल असे काहीबाही करू नये, अशी माफक अपेक्षा निसर्गाने मानवाकडून बाळगली आहे.

No comments:

Post a Comment