Monday, July 18, 2022

ब्रिटनमध्ये विटी नवी, पण राज्य जुनेच ! तरूण भारत, नागपूर. मंगळवार, दिनांक१९/०७/२०२२ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल. ब्रिटनमध्ये विटी नवी, पण राज्य जुनेच ! वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल - 9422804430 Email - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॅानसन यांनी कॅान्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा 7 जुलैला दिला. या अगोदरचा आठवडा ब्रिटिश राजकीय इतिहासातील अति तप्त आणि संतापयुक्त आठवडा म्हणून नोंदविला जाईल. या काळात जॅानसन यांच्या शासनातील 50 सहकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे देऊ केले, यात तीन मंत्रीही होते. ‘राजीनामा द्या’, हीच या सर्वांची मागणी होती. आता पक्ष नवीन पंतप्रधानाची निवड करीपर्यंत जॅान्सनच काळजीवाहू (इंटेरिम) पंतप्रधान म्हणून काम पाहतील, अशी घटनेत तरतूद आहे. या प्रथेप्रमाणे जॅान्सन यांनी या काळापुरते काळजीवाहू मंत्रिमंडळ नियुक्त केले खरे पण त्यातील सदस्यांनीही राजीनामा देऊ केला आहे. आता मात्र पक्षाचा निर्णय, सर्वतोपरी राहील, असे जॅान्सन यांनी 10 डाऊनिंग स्ट्रीट (पंतप्रधानांचे कार्यालय) समोर गोळा झालेल्या पत्रकारांना सांगितले. सामान्य जनतेला आता देशाचा कारभार कसा चालणार याची काळजी वाटायला लागली आहे. नवीन नेत्याच्या निवडीची प्रक्रिया सुरू करण्यासाठीचे वेळापत्रक आखण्याचे बाबतीत मी आणि पक्ष नेतृत्वात (सर ग्रॅहॅम ब्रॅंडी) यात सहमती झाली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पूर्वी निवडून आलेले खासदारच नवीन पंतप्रधान निवडणार आहेत. या अर्थाने विटी नवीन पण राज्य मात्र जुनेच असे म्हटले जात आहे. जॅान्सन यांची भूमिका सर्वांशाने अमान्य “माझी गच्छंती हा समूह सहजप्रवृत्तीचा (हर्ड इन्स्टिंक्ट) परिणाम आहे. मी सहकाऱ्यांना परोपरीने सांगण्याचा प्रयत्न केला की, आपण प्रचंड बहुमताने निवडून आलो आहोत, त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. देशाच्या अर्थकारणातला अतिशय बिकट काळ सध्या सुरू आहे. देशात आणि देशाबाहेरही अनेक अर्थविषयक प्रश्न आ वासून समोर उभे आहेत”, जॅान्सन पत्रकारांना पोटतिडिकेने सांगत होते. “देशाच्या या समस्यांविरुद्धची माझी लढाई अतिशय निकराने सुरू होती, याचे कारण असे होते की, एवढे जबरदस्त बहुमत मिळाल्यानंतर आम्ही मतदारांना दिलेली वचने पूर्ण करणे हे आमचे कर्तव्य होते. पण आता माझ्या जाण्यामुळे अनेक कल्पना आणि प्रकल्प पूर्ण करता यायचे नाहीत याचे वाईट वाटते. समूहाच्या सहजप्रवृत्तीने डाव साधला आहे. समूह एकदा एका दिशेने निघाला की त्याला आवर घालणे अशक्य असते”, असे म्हणत जॅान्सन यांनी आपले वक्तव्य आटोपते घेतले. वस्तुस्थिती ही आहे की, जॅान्सन यांची कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकता याबाबतच सर्व देशालाच संशय होता. लॅाकडाऊनच्या काळात त्यांच्या कार्यालयात झालेल्या पार्टीत कोणत्याही नियमाचे उल्लंघन झालेले नव्हते, या भूमिकेवर जॅान्सन ठाम होते. विशेष असे की, याबाबत त्यांना दंड झाल्यानंतरही त्यांचे हे मत कायम होते. मंत्रिमंडळातील बहुतेक सर्व साथीदारांनी राजीनामा पाठवून जॅान्सन यांच्यावर दबाव आणला आणि त्यांना पद सोडण्यास भाग पाडल्यानंतर जॅान्सन यांनी समूह सहजप्रवृत्तीचा उल्लेख केला होता. ही संधी साधून लेबर पार्टीचे नेते कीर स्टार्मर यांना अविश्वास प्रस्ताव आणण्याची धमकी दिली. जॅान्सन हे पंतप्रधान होण्याच्या लायकीचे नव्हतेच असा ठपका त्यांनी जॅान्सनवर ठेवला आहे. या उद्रेकाला तात्कालिक कारण घडले ते ख्रिस्तोफर पिंचर यांच्या नियुक्तीचे. हे महाशय दारू पिऊन क्लबमध्ये धिंगाणा घालीत होते, हा एक मुद्दा आणि करोनाकालातील लॅाकडाऊनचे नियम तोडून हा प्रकार सुरू होता हा दुसरा मुद्दा. पिंचर यांची नियुक्ती करण्यापूर्वी हे पत्रसृष्टीत गाजलेले प्रकरण आपल्याला माहीत नव्हते, अशी भूमिका जॅान्सन यांनी घेतली. पण ते खोटे बोलत आहेत, हे नंतर पुराव्यानिशी सिद्ध झाले. पुरावे समोर येताच मात्र जॉन्सन यांना माफी मागणे भागच होते. पण उडालेला भडका काही केल्या शमेना. उलट 50 लोकप्रतिनिधींचे राजीनामेच उत्तरादाखल समोर आले आणि जॅान्सन यांना राजीनामा देण्यावाचून पर्यायच उरला नाही. पंतप्रधान बोरिस जॅान्सन यांनी 2020 च्या जूनमध्ये वाढदिवसानिमित्त पार्टी आयोजित करतांना लॅाकडाऊनमधले कोरोनाविषयक नियम मोडल्याबद्दल या वर्षी म्हणजे 2022 मध्ये दंड करण्यात आला आहे. येणाऱ्या प्रत्येक नेत्याने आपापले पेय घेऊन यावे, अशा स्वरुपाची ती पार्टी होती. खुद्द जॅान्सनही आपली बाटली घेऊन गेले होते. एकूण अशा 83 लोकांना दंड ठोठावण्यात आला होता. व्हाईट हॅाल आणि डाऊनिंग स्ट्रीट म्हणजे पंतप्रधानांचे कार्यालय आणि अधिकृत निवासस्थान येथे झालेला हा नियमभंग खूपच आक्षेपार्ह मानला गेला. पण जे काही झाले त्यात नियमभंग नव्हता असे सांगून जॅान्सन यांनाी संसदेची दिशाभूल केली असा आरोप त्यांच्यावर असून या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी आता करण्यात येत आहे. हे प्रकरण पार्टीगेट म्हणून प्रसिद्धी माध्यमांमध्ये संबोधले जाते. अमेरिकेत सत्तारूढ रिपब्लिकन पक्षाने डेमोक्रॅट पक्षाचे वॅारगेट नावाच्या इमारतीतील कार्यालयात यंत्रणा बसवून हेरगिरी केल्याचे प्रकरण रीचर्ड निक्सन यांच्या कारकिर्दीत घडले होते. तेव्हापासून असे काही काळेबेरे असेल तर त्याच्यामागे गेट हा शब्द जोडून त्या प्रकणाचा उल्लेख पत्रसृष्टीत केला जातो. अश्लाघ्य व नियमभंग करणारे वर्तन करीत घडलेली पार्टी म्हणूनच हे प्रकरण पार्टीगेट या नावे संबोधले गेले आहे. ब्रिटनची बिकट स्थिती, तात्पुरता पंतप्रधान तरी नेमा 2022 मध्ये जगभर महागाईचा भडका उडाला आहे, त्याला अर्थातच ब्रिटनही अपवाद नाही. सध्या महागाईच्या वाढीचा दर 9.1 % आहे. खनिज तेल आणि अन्नधान्यांच्या किमती एकमेकींशी स्पर्धा करीत वाढत आहेत. पण याबाबत शासनाचा नाइलाज होता, कारण भाववाढ ही जागतिक प्रक्रिया होती. त्यामुळे ब्रिटिश शासनाचे हातही याबाबत बांधलेले होते. तरीही शासनाने थोडीफार उपाययोजना केली, नाही असे नाही. काही पण नंतर लगेच केलेल्या करवाढीमुळे दिलेला दिलासा न दिल्यातच जमा झाला आणि जनता भडकली. युरोपीयन युनीयनमधून बाहेर पडण्याच्या प्रश्नाबाबत म्हणजे ब्रेग्झिटबाबत जॅान्सन यांनी रान उठवून निवडणुका जिंकल्या होत्या. ब्रिटन युरोपीयन युनीयनमधून बाहेरही पडले. पण नंतर शासन या विषयाशी संबंधित उचलायची कोणतीही ठोस पावले उचलू शकले नाही. लेबर पार्टीने तर जॅान्सन यांच्यावर धरसोडीचे धोरण स्वीकारल्याचा आरोप केला. विश्वसनीयता, सातत्य आणि दृष्टी यांचा अभाव असलेले शासन असा आरोप विरोधकांनी केला आणि याला जॅान्सन प्रभावी उत्तर देऊ शकले नाहीत. जॅान्सन यांनी दिलेला राजीनामा आत्तापर्यंत तरी अधिकृत रीत्या मान्य झालेला नाही. त्यामुळे तत्त्वत: त्यांचे अधिकार, जसे होते, तसेच कायम आहेत. पण ते आता धोरणविषयक निर्णय घेऊ शकणार नाहीत. पण जागतिक पातळीवर मात्र तेच ब्रिटनचे प्रतिनिधित्व करतील, सार्वजनिक कार्यक्रमात सहभागीही होऊ शकतील. हे असे किती दिवस चालेल? जोपर्यंत त्यांचा उत्तराधिकारी निवडला जात नाही तोपर्यंत. या न्यायाने थेरेसा मे या राजीनामा दिल्यानंतर एक महिनाभर सत्तेवर होत्या. पण जॅान्सन यांची विशेष अडचण अशी आहे की, त्यांच्या नवीन आणि तात्पुरत्या मंत्रिमंडळातील बऱ्याच मंत्रांनीही राजीनामा दिलेला असल्याने त्यांना राज्यकारभार करणेच कठीण जाणार आहे. त्यामुळे त्यांच्याऐवजी उपपंतप्रधान डोमिनिक राब यांना तात्पुरते पंतप्रधान नेमावे आणि त्यांनी कामचलावू मंत्रिमंडळ स्थापन करून कारभार पहावा, अशी मागणी पुढे येत आहे. ‘इन्फोसिस’चे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई असलेले, भारतीय वंशाचे, ४२ वर्षाचे, माजी अर्थमंत्री असलेले ऋषी सुनक पंतप्रधापदाच्या शर्यतीत सध्या भरभक्कम आघाडी घेऊन आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त परराष्ट्रमंत्री लिझ ट्रुस, संरक्षण मंत्री बेन वॉलेस, केनिया आणि मॅारिशसमधून (भारतातून नव्हे) ज्यांचे मातापिता 1960 साली स्थलांतरित झाले अशा भारतीय वंशाच्या अटर्नी जनरल सुएला ब्रेव्हरमन, आरोग्य मंत्री साजिद जाविद, बोरिस जॉन्सन यांच्या कट्टर समर्थक असलेल्या प्रिती पटेल , व्यापार मंत्री पेनी मॉरडॉन्ट, संरक्षण मंत्री, उपपंतप्रधान डोमिनिक राब यांचीही नावे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. असा ठरतो ब्रिटिश पंतप्रधान! पंतप्रधानपदी कोण असावा, यासाठीची पक्षपातळीवरची प्रक्रिया वेळखाऊ आहे. त्या प्रक्रियेचे स्वरूप बारिक तपशील वगळल्यास ठोकळमानाने असे असते. पंतप्रधानपदासाठी उभे राहू इच्छणाऱ्या खासदाराच्या अर्जावर 5% खासदारांच्या स्वाक्षऱ्या असाव्या लागतात. समजा असे 6 अर्ज आले आहेत. मतदानाच्या पहिल्या फेरीत सर्व खासदार मतदान करतात. ज्यांना 10% पेक्षा कमी मते मिळतील ते बाद केले जातात. समजा दोन उमेदवार बाद झाले. म्हणजे आता रिंगणात 4 उमेदवार उरले आहेत. आता मतदानाची दुसरी फेरी आयोजित होते. आता सर्वात कमी मते मिळालेला एकच उमेदवारच बाद होईल. म्हणजे आता रिंगणात 3 उमेदवार उरतील. आता मतदानाची तिसरी फेरी आयोजित होईल. यातही सर्वात कमी मते मिळालेला उमेदवार बाद होईल. आता रिंगणात 2 उमेदवार उरतील. अशाप्रकारे खासदारांच्या मतांचा कानोसा घेऊन पहिले दोन उमेदवार निश्चित केले जातात. दोन फेऱ्यांच्या दरम्यानच्या काळात टीव्हीवर चर्चा, वादविवाद, प्रश्नोत्तरे असे कार्यक्रम आयोजित केले जातात. याप्रकारे उमेदवारांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू समोर येत असतात. त्यांचा विचार करून मतदार खासदार आपले मत निश्चित करीत असतात निदान तसे गृहीत तरी धरलेले असते. दोन उमेदवारांच्या निवडीनंतर मात्र खासदारांना निवडीचा अधिकार संपतो. आता पक्षकार्यकर्ते या दोन उमेदवारातून एकाची निवड करतात आणि तोच त्या पक्षाचा पंतप्रधानपदाचा एकमेव दावेदार असतो. ही अभिनव प्रक्रिया यावेळी जुलैत सुरू झाली असून 5 सप्टेंबरला पूर्ण होईल. ब्रिटनची लोकशाही आधुनिक जगातील जशी सर्वात जुनी प्रक्रिया आहे, तशीच ती प्रगल्भही आहे असे मानले जाते. ज्या 25/30 देशात आज लोकशाही आढळते तिथल्या प्रक्रिया देशागणिक वेगळ्या आढळून येत असल्या तरी त्यांचे उगमस्थान या ब्रिटिश प्रारूपात आढळते, असे म्हणतात आणि मानतात. ज्या दिवशी या भूतलावरील सर्व देशात अशा निरनिराळ्या रूपात नटलेली लोकशाही उदयाला येईल त्या दिवशी स्वर्ग पृथ्वीपासून कितीसा दूर असेल?

No comments:

Post a Comment