Monday, June 5, 2023

              

    दुसरे महायुद्ध संपल्यानंतर सहभागी राष्ट्रांचे नवीन गट तयार झाले. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका, रशिया यांसारखे देश एका गटात होते तर जपान,जर्मनी, इटली दुसऱ्या गटात.

पहिले शीतयुद्ध

    युद्ध संपल्यानंर सोव्हिएट रशिया आणि त्याची अन्य मित्रराष्ट्रे यांचा लोकशाहीप्रधान देशांना धोका संभवतो, असे म्हणून, अनुभवून आणि मानून रशियाला वेगळे काढले गेले. परिणामी सोव्हिएट गट आणि अमेरिकन गट या दोन गटात सलोख्याचे वातावरण राहिले नाही. नंतर प्रत्यक्ष वैर किंवा लढाई न करता, एकमेकांना डिवचणे, त्यांची कोंडी करणे, तेथील जनतेला चिथावणी देणे सुरु झाले. यानंतर जगात बराच काळ कुरबुरीसह शांतता नांदली. तिसरे महायुद्ध काही सुरू झाले नाही.

    दुसरे शीतयुद्ध

  आता रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर भारताने आपल्या तटस्थ भूमिकेनुसार, ‘हे युग युद्धाचे नाही’ असे म्हणून शस्त्रसंधी करण्याचे आवाहन केले. तसे पाहिले तर, कोणतेच युग युद्धाचे नसते. पण या सर्वसाधारण सिद्धांताला जगासमोर न मांडता, भारताने आपले विचार रशिया आणि युक्रेनपुरतेच मर्यादित ठेवले. 

साम्यवादी राष्ट्रे 

  रशिया आणि चीन हे साम्यवादी देश म्हणूनच गणले आणि ओळखले जातात. ते आपापसातील बंधुत्वाच्या नात्याचा सतत उल्लेख करीत असत. पण पुढे चीन आणि रशिया यात मोठा भाऊ कोणता हा प्रश्न निर्माण झाला. रशिया आणि चीन दोन्ही विस्तारवादी देश आहेत. राजकीय दृष्टीने, खनीज संपत्ती प्राप्त करण्याच्या दृष्टीने आणि आर्थिक लाभाच्या दृष्टीने विचार करीत या दोन्ही देशांनी त्यांना लागून असलेल्या लहान देशांना आपल्या देशात समाविष्ट करण्यास सुरुवात केली. चीनने तर रशियाशीही सीमावाद उकरून काढला. दुसऱ्या महायुद्धात रशिया रक्तबंबाळ झाला होता. तर चीनमध्ये मात्र कम्युनिस्टांनी  जुनी राजवट उलथून पाडली आणि आपले बस्तान बसवण्यास सुरवात केली. यानंतर मात्र चीनने राजकीयदृष्ट्या वेगळीच भूमिका स्वीकारली. तंत्रज्ञानाची चोरी करून, काहींना आर्थिक लाभांची आमिषे दाखवून चीनने स्वत:ला आर्थिक, तांत्रिक व लष्करी दृष्ट्या बलसंपन्न केले. सहाजिकच या  लहान भावाला आपला मोठेपणा जाणवू लागला आणि रशिया व चीन या दोघातच मोठा भाऊ कोण हा प्रश्न कधी उघडपणे तर कधी छुप्या रीतीने उपस्थित करण्याचे काम चीनने सुरु केले. सुरुवातीला युक्रेन युद्धाबाबत सबुरीने वागण्याचा सल्ला चीनने रशियाला दिला. अशाप्रकारे भारत आणि चीन यांची युक्रेन संबंधातील भूमिका पुष्कळशी सारखी झाली. जागतिक पातळीवर अमेरिका आणि मित्रपक्ष यांनी रशिया आणि चीनशी प्रत्यक्ष युद्ध न करता त्यांची कधी कोंडी तर कधी व्यापार करण्याचे धोरण स्वीकारले. 

    रशिया व  चीनची मैत्री

  याचा परिणाम असा झाला की दोन भावांमधला मोठा कोण हा मुद्दा मागे ठेवून रशिया आणि यांनी एकमेकांना साथ देण्याचे ठरविले. चीनने युक्रेनबाबत रशियाला पाठिंबा दिला. आता ‘युक्रेनबद्दल सबुरीने वागा, हे युद्धाचे युग नाही.’ असा सल्ला देणारा भारत हा एकच प्रमुख देश उरला आहे.

    दक्षिण चिनी समुद्र

 चीनने दक्षिण चिनी समुद्रावर आपला हक्क सांगितला आणि त्याला लागून असलेल्या देशांवर कुरघोडी करायला सुरुवात केली. याचवेळी चीनने भारताचीही कुरापत काढलेली आपण पाहतो आहोत. म्हणजे आता भारत आणि दक्षिण चिनी समुद्राला लागून असलेले देश यांचा समान  शत्रू म्हणून चीन उभा झाला आहे. चीनला आवरण्याची क्षमता जपान, दक्षिण कोरिया, फिलिपिन्स, व्हिएटनाम या देशांत नाही, हे स्पष्ट आहे. चीनला आवर घालण्याच्या दृष्टीने अमेरिकेने पुढाकार घेऊन जपान, ॲास्ट्रेलिया आणि भारत यांचा एक गट स्थापन केला. पण भारत आपली तटस्थता सोडणार नाही, याची जाणीव असल्यामुळे, अमेरिकेने जपान, ॲास्ट्रेलिया आणि भारत यांना एका भूमिकेवर आणून युद्धेतर बाबतीत परस्परांशी सहयोग करण्याचे धोरण स्वीकारले आणि भारत, जपान, ॲास्ट्रेलिया आणि अमेरिका यांनी या राष्ट्रांचा एक गट तयार केला. हा गट ‘क्वाड’ या नावाने ओळखला जाऊ लागला. चीन हे भोळे राष्ट्र नाही. त्यामुळे क्वाडचे आजचे उद्दिष्ट केवळ परस्पर सहयोग आणि सहकार्यएवढेच आहे हे त्याला पटणे शक्यच नव्हते. म्हणून अशा गटाची निर्मिती युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्यास कारणीभूत होईल आणि चीन हे खपवून घेणार नाही असे चीनने जाहीर केले. 

मध्यपूर्व

  इकडे मध्यपूर्वेत ‘आय2यू2’ या नावाचा असाच गट अमेरिकेच्या पुरस्काराने निर्माण झाला. यातील पहिला आय म्हणजे इंडिया आणि  दुसरा आय म्हणजे इस्रायल, पहिला यू म्हणजे यूएई तर दुसरा यू म्हणजे युएसए अशी ‘आय2यू2’ ची फोड आहे. या गटाने चीनला मध्यपूर्वेत येण्यास प्रतिबंध करावा ही भूमिका तर घेतलीच पण विस्तारवादी रशियाला सुद्धा या गटाच्या निर्मितीमुळे शह दिल्यासारखे झाले. आज परिणामत: रशिया, चीन आणि साम्यवादी यांचा एक गट आणि क्वाड आणि ‘आय2यू2’ यांचा दुसरा गट निर्माण झाला आणि प्रत्यक्ष युद्ध न करता चीन व रशियावर मात करण्यास सुरुवात झाली. हे म्हणजे दुसरे शीतयुद्ध.’

  अमेरिकन गट

  आज जगामध्ये लोकशाहीप्रधान शासनव्यवस्था असलेले अनेक देश आहेत. यापैकी काही अतिशय गरीब देश आहेत, तर अमेरिका फ्रान्स जर्मनी, ब्रिटन या देशात लोकशाहीबरोबर इतर देशांच्या तुलनेत सुबत्ता आणि श्रीमंती नांदत असल्याचे आढळून येते. या श्रीमंत देशांनी उरलेल्या गरीब देशांना आपल्याकडे वळविण्याचे प्रयत्न सूरु केले आहेत. सहाय्य आणि सहकार्य हे दोनच प्रमुख हेतू समोर ठेवून श्रीमंत राष्ट्रे वागली, तर लोकशाहीप्रधान राष्ट्रांचा एक बलशाली गट तयार होऊ शकतो.       

  रशिया आणि चीन ही बलाढ्य राष्ट्रे आहेत. पण या देशात लोकशाहीचा मागमूसही आढळत नाही. इतर राष्ट्रांना आपल्या देशात समाविष्ट करून घेणे, निदान त्यांना आपल्या कह्यात ठेवणे यावर या दोन्ही देशांचा भर असल्याचे आढळून येते. त्यामुळे या दोन गटात प्रत्यक्ष युद्ध होण्याची शक्यता आज ना उद्या निर्माण होईल यात शंका नाही. काही वर्षांपूर्वी असे मानले जात होते की, यापुढे सशस्त्र संघर्ष होणार नाहीत आणि आर्थिक पातळीवर स्पर्धा आणि डावपेच यांचाच आधार हे दोन गट घेतील. दुसरे शीतयुद्ध असेच सुरू राहील. पण युक्रेनवर आक्रमण करून रशियाने ही अपेक्षा खोटी ठरवली आहे. तसेच चीनने तैवानला गिळंकृत करण्याच्या दिशेने प्रत्यक्ष युद्ध वगळून अन्य सर्व डावपेच लढवायला सुरुवात केली आहे. याचे दोन परिणाम संभवतात. एक म्हणजे, रशिया युक्रेनला गिळंकृत करील आणि दुसरा म्हणजे चीन तैवानचा घास घेईल. पण अमेरिकन गट हे होऊ देणार नाही कारण असे झाल्यास रशिया आणि चीन यांच्या धाकात जगातली इतर राष्ट्रे वावरू लागतील. म्हणून असे प्रयत्न सुरु होताच जगातील दुसऱ्या शीतयुद्धाचे प्रत्यक्ष युद्धात परिवर्तन झाल्यावाचून राहणार नाही. या पार्श्वभूमीवर भारताने स्वीकारलेली मानवहिताचा अजेंडा रेटण्याची भूमिका उठून दिसते आहे. आज जगात मोदींचा उल्लेख ‘बॅास’ म्हणून केला जातो, तो काय उगीच? 




No comments:

Post a Comment