Monday, January 8, 2024

 पाकिस्तानातील निवडणूक - 2024

तरूण भारत, नागपूर मंगळवार, दिनांक 09.01. 2024 हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee? या ब्लॅागवरही उपलब्ध असतो.

वसंत गणेश काणे, बी एस्सी, एम ए (मानसशास्त्र), एम.एड.  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022   9422804430    

Email- - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

पाकिस्तानातील निवडणूक - 2024

   पाकिस्तानच्या नॅशनल असेम्ब्लीमध्ये 336 सदस्य असतात. यापैकी 266 सदस्य भारताप्रमाणे एकल सदस्य मतदार संघातून निवडण्यात येतात. 60 महिला सदस्य राजकीय पक्षांना मिळालेल्या जागांच्या प्रमाणात निवडल्या जातात. 10 जागा मुस्लिमेतरांमधून राजकीय पक्षांना मिळालेल्या जागांच्या प्रमाणात निवडल्या जातात. यापूर्वी मतमोजणीसाठी ईव्हीएम मशीन्सचा वापर केला जात असे. पण यावेळी 8 फेब्रुवारी 2024 ला  होणाऱ्या निवडणुकीत मतपत्रिका वापरण्यात येणार आहेत. पाकिस्तानमध्ये अनेक राजकीय पक्ष असले तरी १४ पक्ष मुख्य आहेत. यातही तीन बऱ्यापैकी मोठे म्हणावेत असे आहेत.

पाकिस्तानामधील प्रमुख पक्ष 

1) पाकिस्तान तेरिक-ए-इनसाफ (न्यायाचा आग्रह धरणारा पक्ष) (पीटीआय)  या पाकिस्तानमधील राजकीय पक्षाची स्थापना 1996 मध्ये मुळात पाकिस्तानी क्रिकेटपटू असलेले राजकारणी इम्रान खान यांनी केली आहे. त्यांनी 2018 ते 2022 पर्यंत देशाचे पंतप्रधान म्हणून काम केले. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून त्यांना अटकही करण्यात आली. पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ़ या पक्षाची विचारधारा पाकिस्तानला  एक आधुनिक इस्लामी गणराज्य बनवण्याची आहे.  पीटीआय पाकिस्तान मधील सर्वात वेगाने वाढलेला पक्ष मानला जातो. 

2) पाकिस्तान मुस्लीम लीग (एन) (पीएमएल)

 पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज)  हा पाकिस्तानमधील  एक उजव्या विचारसरणीचा, उदारतावादी तसाच रूढीवादीही राजकीय पक्ष आहे. सद्ध्या सीनेटमध्ये हा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. या। पक्षाची स्थापना 1993 मधली. मूळचा रूढीवादी असलेला हा पक्ष आज मात्र सामाजिक आणि सांस्कृतिक बाबतीत उदारमतवादी झाला आहे. तरीही तो मुस्लिमांमधील  कट्टरतावादी घटकांना अधूनमधून कुरवाळीत असतो. असा त्यांच्यावर आरोप आहे. तसे पाहिले तर पाकिस्तानमधील सर्वच पक्ष कट्टरता, भारतद्वेश, काश्मीरवर स्वामित्व आदी बाबतीत आघाडीवरच असतात.

3) पाकिस्तान पीपल्स पार्टी- पीपीपी - 1967 मध्ये स्थापन झालेला हा डावीकडे झुकलेला पक्ष आहे. झुल्पिकारअली भुट्टो यांच्या पुढाकाराने या पक्षाची स्थापना झाली होती. लोकशाही, सामाजिक न्याय, लष्करी सामर्थ्य यावर या पक्षाचा भर आहे. 1970 , 1977 , 1988 , 1993 आणि 2008 मध्ये हा पक्ष पाकिस्तानात सत्तेवर होता तर 1990 , 1997 , 2002 आणि  2013 मध्ये सर्वात मोठा विरोधी पक्ष होता. 2018 मध्ये मात्र हा पक्ष न सत्तेवर होता न सर्वात मोठा विरोधी पक्ष होता. 

   गेल्या निवडणुकीत 2018 मध्ये पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) या इमरान खान यांच्या पक्षाला 272 पैकी 32% मते व 116 जागा मिळाल्या होत्या आणि मतांची संख्या व टक्केवारी यात पीटीआयने आघाडी मिळविली होती. यावेळी पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ) (पीएमएल) या नवाझ शरीफ यांच्या पक्षाला 24% मते व 64 जागा मिळाल्या. पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) या बिवावल भुट्टो झरदारी यांच्या पक्षाला 13% मते व 43 जागा मिळाल्या. जमाइत -ए- इस्लाम या फाझी-उर- रहमान यांच्या पक्षाला 11 जागा मिळाल्या. उरलेल्या जागा 10 लहान लहान पक्षात वाटल्या गेल्या होत्या. इमरान यांनी खान इतर पक्षांशी आघाडी करीत सरकार स्थापन केले. पण त्यांचे लष्करी नेत्यांशी पटेना म्हणून 10 एप्रिल 20 या दिवशी त्यांच्याविरुद्ध नॅशनल असेम्ब्लीत अविश्वास प्रस्ताव पारित होईल अशी तजवीज लष्कराने केली आणि शहबाज शरीफ यांची नवे पंतप्रधान म्हणून निवड लष्कराने करवून घेतली.

  उशिराने निवडणूक

  आता 8 पेब्रुवारी 2024 ला निवडणूक घेतली जाणार आहे. वास्तवीक पाहता या निवडणुका अगोदरच व्हायला हव्या होत्या. पण तेव्हा पाकिस्तानची आर्थिक स्थिती फारच वाईट होती, तसेच लष्कराला नको असलेले आणि अविश्वास प्रस्ताव पारित झाल्यामुळे पदच्युत झालेले इमरान खान हे जनतेत चांगलेच लोकप्रिय होत चालले होते. इमरान खान ऐवजी पाकिस्तानच्या संसदेने पंतप्रधान म्हणून निवडलेले शहाबाज खान निवडणुकीत त्यांच्या समोर टिकू शकले नसते. इमरान खान हे पुन्हा पंतप्रधान झाले असते तर ते लष्कराला आवडले नसते. म्हणून दुसरे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना पाकिस्तानात परत आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.  भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्यानंतर कारावासात न जाता शरीफ लंडनला गेले होते. त्यांना सर्व न्यायालयीन प्रकरणांतून मुक्त करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मायदेशी परत आणण्यात आले आहे.  

तोशाखाना प्रकरण 

  समाज माध्यमांचा वापर करून इमरान खान यांनी आपली लोकप्रियता वाढवून घेतली होती आणि आहे. पाकिस्तानचा तारणहार अशी आपली प्रतिमा निर्माण करण्यात ते बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाले आहेत.  पुढे लष्कराला ते जुमानेसे झाले. हे लष्कराला मानवणे शक्यच नव्हते. त्यातून त्यांनी लष्करातच दोन गट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अखेर लष्कराने त्यांना ‘तोशाखाना’ प्रकरणात दोषी सिद्ध करून तुरुंगात रवानगी केली. विदेशी राज्यकर्त्याकडून प्राप्त झालेल्या वस्तू तोशाखान्यात (डिपॅाझिटरी) ठेवायच्या असतात. इमरान खान यांनी या वस्तू कमी दराने खरेदी करून जास्त दराने विकल्या होत्या. तोशाखाना प्रकरणी पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय  ऐतिहासिक मानला जातो. यानुसार पाकिस्तानचे इम्रान खान यांना पाच वर्षांसाठी सार्वजनिक पदावर राहण्यास अपात्र ठरवले गेले. इमरानखान यांच्या सोबत त्यांच्या ‘पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ’ पक्षाचे अनेक नेते आज तुरुंगात आहेत. काहींनी संभाव्य कारवाईच्या भीतीने देश सोडून परदेशात आश्रय घेतला आहे. तर आणखी काहींनी राजकारणालाच रामराम ठोकला आहे.  इमरान खान यांना निवडणूक लढविता येईल किंवा कसे ते लवकरच कळेल. आता नवाझ शरीफ यांचा पंतप्रधान होण्याचा  मार्ग मोकळा झाला आहे, असे दिसते आहे खरे. पण…

नवाज शरीफ जिंकतील?

   पण आता वय वर्ष 74 ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी-एन’ (पीएमएल-एन) पक्षाला बहुमत मिळवून देण्यात यशस्वी होईल का?  मदतीला उपाध्यक्षपदी असलेली  कन्या मरियम आहे. मरियम नवाज यांच्या मुलाच्या म्हणजे जुनैद सफदर यांच्या लग्नाले फोटो पाहून लोक म्हणाले होते की, नवऱ्या मुलीपेक्षा सासूच जास्त सुंदर दिसत होती. अशाप्रकारे मरियमच्या कर्तृत्वाला सौंदर्याची साथ मिळाली आहे. मरियम यांची जनमानसातील प्रतिमा तशी बरीच उजळ आहे. 

  आपण तुरुंगात असतांना स्नानागृहात कॅमेरे लावण्यात आले होते. असा मरीयम यांनी इमरान शासनावर आरोप केला होता. माजी पंतप्रधानांच्या मुलीला जर हे भोगावे लागले असेल तर इतरांची काय कथा? असा आरोप करून त्यांनी राजकीयक्षेत्रात एकच खळबळ उडवून दिली होती.

  नवाझ शरीफ यांनी देशात परत आल्यानंतर पाकिस्तानमधील एका सत्कार सभेत सांगितले की, ‘राजकारणापायी आपण आपल्या आई आणि पत्नीला मुकलो आहोत. तुमचे प्रेम पाहून मी दुःख विसरलो आहे. पण काही घाव असे असतात की, ते कधीच भरून येत नाहीत’.  आजवर नवाज शरीफ पंतप्रधानपदी तीनदा निवडून आले आहेत खरे, पण लगोपाठ नाही. तसेच पूर्ण कालावधीही त्यांनी कधीच पूर्ण केला नाही, दरवेळी नशिबी हकालपट्टीच होती. आता ही चौथी वेळ! निवडून आल्यास कुरघोडीच्या राजकारणाला पाकिस्तानात आणि पाकिस्तानाबाहेर पूर्णविराम मिळेल का? याचे उत्तर काळच देईल. 


No comments:

Post a Comment