Monday, January 22, 2024

चिमुकल्या तैवानचा अजस्त्र चीनला जबरदस्त धक्का!

तरूण भारत, नागपूर मंगळवार, दिनांक 23.01. 2024 हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर तसेच. ‘kasa mee? या ब्लॅागवरही उपलब्ध असतो.

चिमुकल्या तैवानचा अजस्त्र चीनला जबरदस्त धक्का!

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, 

नागपूर 440 022 

मोबाईल 9422804430 

E mail-kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

  13 जानेवारी 2024 ला सार्वत्रिक निवडणुकीत चीनपासून 180 किमी अंतरावर असलेल्या तैवान या चिमुकल्या बेटराष्ट्रात खूपकाही घडले. अध्यक्षपदाचे उमेदवार लाई चिंग-ते म्हणाले, ‘होय, मी,  लाई चिंग-ते, साम्यवादी चीनच्या तैवानविषयक दमनकारी धोरणांचा कट्टर विरोधक आहे’. प्रचंड शक्तिशाली साम्यवादी चीनने  तुफानी प्रचार करीत म्हटले,  ‘फुटिरतावादी लाई चिंग-ते ला मते देऊ नका’. तैवानचे निडर मतदार म्हणाले, ‘कुणाला मत द्यायचे, ते आमचे आम्ही ठरवू, इतरांनी लुडबूड करू नये’. निकाल लागल्यानंतर आश्चर्यचकित झालेले राजकीय विश्लेषक म्हणाले, ‘शक्तिशाली चीनची धमकी धुडकावत चिमुकल्या तैवानने इतिहास रचला आहे’.  हा सर्व काय प्रकार आहे, ते समजण्यासाठी थोडे मागे जाऊया.

 चीन या प्रचंड मोठ्या देशाजवळच्या आग्नेय किनाऱ्याला लागून पश्चिम पॅसिफिक समुद्रात तैवान हे 2 कोटी 30 लाख लोकसंख्या व 36,000 चौकिमी क्षेत्रफळ असलेले बेट आहे.  

1949 पर्यंत चीनवर चिआंग काई शेख यांच्या कोमिनटॅंग पक्षाची सत्ता होती. 1949 साली माओ त्से तुंग या साम्यवादी नेत्याने चिाआंग काई शेख यांचा गृहयुद्धात पराभव केला आणि चीनच्या  मुख्य भूभागावर पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना (पीआरसी) या साम्यवादी पक्षाची सत्ता स्थापना केली, त्यामुळे चिआंग काई-शेख यांनी जवळच्याच  तैवानमध्ये माघार घेऊन तिथून आपल्या कोमिनटॅंग पक्षाचा कारभार करण्यास सुरवात केली आणि प्रगतीचे शिखर गाठले. तैवानने स्वतःचे सरकार, अर्थव्यवस्था आणि सैन्यासह एक स्वतंत्र राजकीय अस्तित्व म्हणून कार्य केले आहे, पण त्याला  सार्वभौम राज्य म्हणून सर्वत्र मान्यता काही मिळाली नाही. आज साम्यवादी शक्तिशाली चीन लोकशाही पद्धतीने कारभार करीत असलेल्या तैवानला आपल्या वर्चस्वाखाली आणण्याच्या खटाटोपात आहे. पण तैवानचा त्याला सक्त विरोध आहे. साम्यवादी चीनच्या लष्करी कारवाईच्या धमक्यांना न घाबरता बहुपक्षीय लोकशाही स्वीकारलेल्या तैवानमधील निवडणुकीत वर कथन केलेला प्रकार घडला आहे. 

 तैवानमधील 2020 ची निवडणूक 

   चार वर्षांपूर्वी 11 जानेवारी 2020 ला  तैवानमध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत 1 कोटी 93 लाख मतदारांपैकी 75% मतदारांनी मतदान केले आणि प्रागतिक, उदारमतवादी, तैवानी राष्ट्रवादी आणि साम्यवादविरोधी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या  (डीपीपी) साई इंग-वेन यांनी  57% मते मिळवून चिआंग काई शेख यांच्या कोमिनटॅंग पक्षाचा किंवा नॅशनॅलिस्ट पार्टी ऑफ चायनाचा (एनपीसी) किंवा चायनीज नॅशनॅलिस्ट पार्टी (सीएनपी) या उजव्या विचारसरणीच्या पक्षाच्या चॅंग सॅन-चेंग यांचा (39%  मते) पराभव केला. 

   देशाची सुरक्षा मजबूत करू आणि चीनशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करू अशी भूमिका स्वीकारून  कोमिनटांग पक्ष निवडणुकीत उतरला होता. पण ही भूमिका जनतेला पटलेली दिसत नाही. डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या  (डीपीपी) साई इंग-वेन  या तैवानच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. त्या 2016 मध्येही अध्यक्षपदी निवडून आल्या होत्या. पण अध्यक्षपदी फक्त दोनदाच राहता येत असल्यामुळे त्या 2024 साली निवडणूक लढवू शकल्या नाहीत. 

2024 ची त्रिकोणी लढत 

साई इंग-वेन यांच्या ऐवजी लाई चिंग-ते यांनी 2024 ची अध्यक्षपदाची निवडणूक लढविली. 70% मतदान झाले. या निवडणुकीत  डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीने (डीपीपी) सलग तिसऱ्यांदा तैवानवर आपली सत्ता प्रस्थापित केली आहे.  हा विजय चीनला मुळीच आवडलेला नाही. त्यामुळे येत्या काळात साम्यवादी चीन आणि लोकशाहीवादी तैवान यातील संघर्ष तीव्र स्वरूप धारण करील, असे दिसते. कारण डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी तैवानला स्वतंत्र राष्ट्र मानते तर चीनच्या किनाऱ्याजवळ फक्त 180 किमी अंतररावर असलेल्या तैवानला चीन आपलाच भाग मानतो. याला वन चायना पॅालिसी म्हणून संबोधले जाते. गरज पडल्यास बळाचा वापर करून आपण चीन आणि तैवानचे एकीकरण घडवून आणू अशी ठाम भूमिका चीनची असते. लाई विजयी झाल्यामुळे एकीकरणाची प्रक्रिया थांबेल, या भ्रमात कोणीही राहू नये, असे चीनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. तर लाई म्हणाले आहेत की, ‘तैवानच्या आखातात शांतता आणि स्थैर्य राहील, यासाठी आपण प्रयत्नशील राहू, पण चीनच्या आक्रमणाचा सर्वशक्तीनिशी सामनाही करू’. या निवडणुकीवर लोकशाहीवादी तैवानची बाजू घेत अमेरिका आणि वन चायना पॅालिसीचा आग्रह धरीत  चीन हे दोन्ही देश बारिक लक्ष ठेवून होते. या क्षेत्रात आपलाच प्रभाव राहील यासाठी या दोन्ही महाशक्ती ठाम भूमिका घेऊन उभ्या आहेत.

  13 जानेवारी 2024 ला  तैवानमध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या  (डीपीपी) लाई चिंग-ते यांनी  40% मते मिळवून कोमिनटॅंग पक्षाच्या होऊ यू-इह यांचा (33.5 %  मते) आणि  तैवान पीपल्स पार्टीच्या (टीपीपी) या  चीनशी तडजोड करावी ही भूमिका असलेल्या, डावीकडे झुकलेल्या व उदारमतवादी पक्षाच्या को विन-जे यांचा (26.5% मते) पराभव केला आहे. विजयी उमेदवाराला तैवानच्या नजीकच्या इतिहासात म्हणजे 2000 पासून प्रथमच 50% पेक्षा कमी मते मिळाली आहेत. पण ज्याला सर्वात जास्त मते, मग ती 50%पेक्षा कमी असली तरी, तो विजयी असा नियम असल्यामुळे डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे  (डीपीपी) लाई चिंग-ते विजयी घोषित झाले. 

   तैवानच्या संसदेत113 जागा आहेत. त्यापैकी 52 जागा कोमिनटॅंग पक्षाला, 51 जागा डीपीपीला आणि 10 जागा टीपीपीला मिळाल्या आहेत. डीपीपीला बहुमत (57 जागा) मिळाले नाही, यावरून असे दिसून येते की, संपूर्ण स्वातंत्र्याचा आग्रह तैवानने धरू नये, असे तरूण मतदारांचे मत होते आहे. त्यांना प्रगतीसाठी तैवानच्या आखातात स्थैर्य आणि शांतता हवी आहे. त्यांना चीनच्या दडपशाहीला विरोध करायचा आहे पण त्याचबरोबर आखातात जैसे थे स्थिती असावी, एकदम एकेरीवर येऊ नये, असे वाटते आहे.

  चीनला आता चार वर्षे तरी टोकाची भूमिका घेता येणार नाही. चीनच्या आजच्या तरूण पिढीच्या मनात एकीकृत चीनच्या काहीच आठवणी नाहीत. त्यांना आजचा चीन पार बदललेला दिसतो आहे. काहींनी तर तैवानची आणि चीनची अशी दुहेरी नागरिकताही स्वीकारली आहे. 1949 पासून चीननेही तैवानवर पाऊल ठेवलेले नाही. त्यामुळे मुख्य चीनही त्यांना तसा ‘माहीतच’ नाही. पण चीन मात्र तैवानला विसरलेला नाही. त्याला आज ना उद्या तैवान ‘आपलासा’ करायचाच आहे. हे तैवानमघील नव्या पिढीला फारसे जाणवत नसले तरी तैवानमधील जुनी पिढी चीन काय करू इच्छितो हे पक्केपणी ‘जाणून’ आहे. 

   तैवान हा इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील एक ‘फ्लॅश पॅाईंट’ मानला जातो. तैवानमधील लोकशाही टिकावी म्हणून आम्ही या प्रश्नी लक्ष घालीत आहोत, अशी अमेरिकेची भूमिका आहे. हे सत्य आहे. पण हे पूर्ण सत्य नाही. कारण तैवानशिवाय या भागातील इतर अनेक लहानमोठ्या देशांनाही अमेरिकेने चिनी आक्रमणापासून संरक्षण करण्याचे आश्वासन दिले आहे. या निमित्ताने दोन जागतिक महासत्ता एकमेकींसमोर येऊन ठाकल्या आहेत. पण चिनी सैनिकांना मोठ्या लढाईचा अनुभव नाही. काही सैनिक तर न लढताच निवृत्त होणार आहेत. म्हणून चीन फारसे ताणून धरत नाही. पण तरीही चीन एकट्या तैवानसाठी नक्कीच भारी आहे. पण या क्षेत्रात खुद्द अमेरिकेसारख्या बलाढ्य शक्तीचे हितसंबंध गुंतले आहेत. त्यामुळे तैवानला एवढ्यात तरी धोका दिसत नाही. 











No comments:

Post a Comment