Monday, January 15, 2024

 अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक 2024

तरूण भारत, नागपूर मंगळवार, दिनांक 16.01. 2024 हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee? या ब्लॅागवरही उपलब्ध असतो.

वसंत गणेश काणे, बी एस्सी, एम ए (मानसशास्त्र), एम.एड.  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022   9422804430    

Email- - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 


   अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक 2024


  जरी मंगळवार दिनांक 5 नोव्हेंबर 2024 ला अमेरिका आपला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड करणार आहे, तरी अमेरिकेत निवडणुकीचे नगारे वाजायला रीतसर सुरवात  झाली आहे. गेली अनेक वर्षे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड नोव्हेंबर महिन्यातच झालेली आहे. 2028 मध्येही अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड नोव्हेंबर महिन्यातच होणार आहे. असे का आहे? तर नोव्हेंबर महिना हवामान, पीकपाणी आदींचा विचार करता संपूर्ण देशासाठी त्यातल्यात्यात सोयीचा महिना असतो म्हणून. तसेच ही निवडणूक गेली अनेक वर्षे मंगळवारीच झालेली आहे आणि भविष्यातही मंगळवारीच होणार आहे. असे का? तर रविवारी लोकांना चर्चमध्ये जायचे असते.(अमेरिका ख्रिश्चन राष्ट्र आहे) त्यामुळे रविवारी निवडणूक नको. पण मग सोमवार का नको? तर पूर्वी दळणवळणाच्या सोयी आजच्या सारख्या नव्हत्या. त्यामुळे रविवार नंतर लगेच सोमवारी दूरदूरच्या मतदान केंद्रांवर जाणे मतदारांना सोयीचे नव्हते म्हणून सोमवार नको, मंगळवार हवा. हा मंगळवार कोणता? तर नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या सोमवार नंतरचा पहिला मंगळवार, दुसरा किंवा तिसरा मंगळवार नाही. हा पहिला सोमवार १ तारखेलाही येऊ शकेल, मग निवडणुकीची तारीख कोणती? तर 2 नोव्हेंबर. पहिला सोमवार  2 नोव्हेंबरला आला तर निवडणुकीची तारीख असेल 3 नोव्हेंबर. पहिला सोमवार उशिरात उशीरा 7 तारखेलाच येऊ शकेल. अशावेळी निवडणुकीची तारीख असेल 8 नोव्हेंबर. म्हणून गेली अनेक वर्षे अमेरिकेतील अध्यक्षांची निवड 2 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर यापैकीच कोणत्या तरी एका तारखेला नोव्हेंबरमध्येच होत आलेली आहे आणि भविष्यातही तसेच होईल. म्हणून मंगळवार दिनांक 5 नोव्हेंबर 2024 लाच अमेरिका आपला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड करणार आहे, हे नक्की. अमेरिकेत अध्यक्षाच्या निवडणुकीचे वर्षही निश्चित असते. दर चार वर्षांनी ही निवडणूक झालीच पाहिजे. या पूर्वीची निवडणूक 2020 मध्ये झाली होती. म्हणून येती निवडणूक 2024 मध्येच होणार. त्या पुढची निवडणूक 2028 मध्येच होईल. कितीही मागे गेलात तरी  चार वर्षांचे अंतर कायम असलेले दिसेल. भविष्यातही असेच असेल. अर्थात काही अघटितच घडले किंवा घटनेत तसा बदल झाला तर सांगता यायचे नाही. पण आजवर तरी असे घडलेले नाही. (अपवाद मृत्यू वगैरे असू शकतील)

अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड

  अमेरिकेत अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड अप्रत्यक्ष पद्धतीने (इनडायरेक्ट मेथड - म्हणजे आपल्या राष्ट्रपतीची निवड ज्या पद्धतीने होते, त्या सारख्या पद्धतीने) होते. या पद्धतीत अमेरिकन मतदार आपले प्रतिनिधी निवडतात. या सर्वांचा मिळून एक देशव्यापी मतदार संघ (इलेक्टोरल कॅालेज) तयार होतो. हे प्रतिनिधी (इलेक्टर्स) अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या जोडगोळीची  (टिकेट) निवड करतात. 2020 च्या निवडणुकीत ज्यो बायडेन आणि कमला हॅरिस यांची जोडगोळी (टिकेट) डोनाल्ड ट्रंप आणि माईक पेन्स यांच्या जोडगोळीला (टिकेट) हरवून निवडून आली होती. इलेक्टोरल कॅालेजमध्ये 538 इलेक्टर्स असतात. यापैकी ज्या जोडगोळीला  किमान 270 मते मिळतील ती जोडगोळी निवडून येते. एवढी मते कुणाही जोडगोळीला पडली नसतील तर मात्र हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह (जणू आपली लोकसभा) अध्यक्षाची निवड साध्या बहुमताने(50% +1) करते आणि सिनेट (जणू आपली राज्यसभा) उपाध्यक्षाची निवड करते.

अमेरिकन कॅांग्रेस ची रचना 

  अमेरिकन कॅांग्रेसची (संसदेची) दोन सभागृहे आहेत. 

1)  हाऊस ॲाफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज (जशी आपली लोकसभा)/ हाऊस व 

2) सिनेट (जशी आपली राज्यसभा) 

१. हाऊस - अमेरिकेत लहान-मोठी एकूण 50 राज्ये (स्टेट) असून त्यांच्या वाट्याला लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधी (रिप्रेझेंटेटिव्हज) असतात. जसे, लोकसंख्येनुसार सर्वात मोठे राज्य कॅलिफोर्निया असून त्याच्या वाट्याला 53 प्रतिनिधी आले आहेत. याच न्यायाने टेक्सासला 36, न्यूयॅार्क व फ्लोरिडाला 27, इलिनॅाइस व पेन्सिलव्हॅनियाला 18 अशा प्रकारे लोकसंख्येच्या प्रमाणात सर्व म्हणजे 50 राज्यांना प्रतिनिधी मिळाले आहेत. राज्य कितीही लहान असले तरी निदान एक तरी प्रतिनिधी मिळणारच. जसे अलास्कासारख्या डझनावारी लहान राज्यांच्या वाट्याला एक रिप्रेझेंटेटिव्ह आला आहे. अशाप्रकारे 50 राज्यांचे एकूण 435 रिप्रेझेंटेटिव्ह होतात. यांची निवडणूक दर दोन वर्षांनी होत असते. अध्यक्षाची चार वर्षाची कारकीर्द निम्मी होताच ही निवडणूक सम वर्षी नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या सोमवार नंतरच्या पहिल्या मंगळवारी होत असते.

२. सिनेट - प्रत्येक राज्याला दोन सिनेटर मिळाले आहेत. मग ते राज्य कॅलिफोर्नियासारखे भले मोठे असो किंवा अलास्कासारखे छोटे असो. अशा प्रकारे सिनेटवर 50 राज्यांचे एकूण 100 सिनेटर असतात. आपल्या राज्यसभेप्रमाणे दर दोन वर्षांनी सिनेटचे ⅓ सदस्य निवृत होऊन त्यांच्या जागी नव्याने सिनेटर्स निवडणून येत असतात.  

इलेक्टोरल कॉलेज - अध्यक्षीय मतदारांच्या मतदासंघाला इलेक्टोरल कॉलेज व मतदारांना इलेक्टर्स असे म्हणतात. हा मतदारसंघ अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या जोडगोळीची/ टिकेटची निवड करण्यासाठी व तेवढ्यापुरताच दर चार वर्षांनी निर्माण होत असतो. प्रत्येक राज्यातील इलेक्टर्सची संख्या त्या राज्याच्या रिप्रेझेंटेटिव्ह व सिनेटर यांच्या संख्येइतकी असते. या न्यायाने कॅलिफोर्नियाला 53+2= 55 इलेक्टर्स तर अलास्कासारख्या लहान राज्यांना 1+2=3 इलेक्टर्स मिळतात.  अशाप्रकारे एकूण इलेक्टर्स = 435 (रिप्रेझेंटेटिव्हज)+100 (सिनेटर्स) = 535 होतील. याशिवाय राजधानी वॉशिंग्टनला असलेले अधिकचे 3 इलेक्टर्स मिळून 538 इलेक्टर्स होतात. निवडून येण्यासाठी 270 मते (50 % पेक्षा निदान एक मत जास्त) मिळणे आवश्यक असते. ती ज्याला मिळतील ती जोडगोळी विजयी घोषित होते. 

    ज्याला पॅाप्युलर व्होट्स जास्त त्याची पूर्ण स्लेट विजयी 

पॅाप्युलर व्होट्स म्हणजे सर्व राज्यातील सर्व मतदारांची मते.  प्रत्येक राज्यात दोन्ही पक्ष आपापल्या इलेक्टर्सची यादी/पाटी/पॅनल (स्लेट) तयार करून जाहीर करतात. ही पूर्ण यादी (स्लेट) निवडून येते किंवा पडते. जसे 2016 मध्ये कॅलिफोर्नियात डेमोक्रॅट पक्ष व रिपब्लिकन पक्ष यांनी आपापल्या 55 व्यक्तींची स्लेट तयार केली होती. डेमोक्रॅट पक्षाला 61% तर रिपब्लिकन पक्षाला 33 % पॅाप्युलर व्होट्स मिळाली. त्यामुळे डेमोक्रॅट पक्षाच्या स्लेटवरच्या सर्वच्या सर्व 55 व्यक्ती इलेक्टर्स म्हणून निवडून आल्या.   2016 मध्ये डोनाल्ड ट्रंप यांना एकूण 304 इलेक्टोरल व्होट्स होती तर हिलरी क्लिंटन यांना 227 इतकीच होती. हिलरी क्लिंटन यांना मिळालेली पॅाप्युलर व्होट्स 6,58,53,514 तर डोनाल्ड ट्रंप यांना मिळालेली पॅाप्युलर व्होट्स फक्त 6,29,84,828 इतकीच होती. म्हणजे हिलरींना ट्रंप यांच्यापेक्षा सुमारे 28 लाख पॅाप्युलर व्होट्स जास्त मिळाली होती. पण निकाल इलेक्टोरल व्होट्स कुणाला जास्त यावर अवलंबून असतो. 2020 मध्ये मात्र ज्यो बायडेन यांना 306 इलेक्टोरल व्होट्स होती तर डोनाल्ड ट्रंप यांना 232 होती. ज्यो बायडेन  यांना मिळालेली पॅाप्युलर व्होट्स 8,12,84,666 इतकी होती तर डोनाल्ड ट्रंप यांना मिळालेली पॅाप्युलर व्होट्स  7,42,24,319  इतकीच होती. ज्यो बायडेन यांना मिळालेली इलेक्टोरल व्होट्स आणि पॅाप्युलर व्होट्स डोनाल्ड ट्रंप यांच्यापेक्षा जास्त होती.

 


No comments:

Post a Comment