Monday, October 7, 2024

                                     काय काय घडणार?

तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक ०८/१०/२०२४ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.     


                                            काय काय घडणार?

 वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 


श्रीलंकेत नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार, विद्यमान अध्यक्ष राणिल विक्रमसिंघे,  समाजी जन बलवेगया पक्षाचे उमेदवार आणि विरोधी पक्षनेते साजित प्रेमदासा आणि डावीकडे झुकलेल्या सिंहली वर्चस्ववादी एनपीपीचे चीनसमर्थक मार्क्सवादी  उमेदवार अनुरा कुमारा दिसानायके यांच्यात लढत झाली, कुणाही एका उमेदवाराला मतदानाच्या पहिल्या फेरीत 50% चा जादुई आकडा गाठता आलेला नव्हता. पहिल्या फेरीत अनुरा कुमारा दिसानायके  (उर्फ एकेडी)  वय वर्ष 55 यांना 42.36% किंवा सुमारे 56 लाख, साजित प्रेमदासा यांना 32.72% किंवा सुमारे 43 लाख, तर राणिल विक्रमसिंघे यांना 17.25% किंवा सुमारे 23 लाख मते मिळाली व ते तिसरे ठरल्यामुळे बाद झाले. पुढे दिसानायके आणि साजित प्रेमदासा यातच पुढचा पसंतीक्रम वाटला गेला आणि दिसानायके विजयी झाले. अख्खा युरोप आज उजवीकडे वळू पहात असताना श्रीलंकेने स्वीकारलेला डावा पंथ एक अभ्यासाचा विषय ठरावा.

    दिनांक 21 सप्टेंबर 2024 ला श्री लंकेतील 1.7 कोटी मतदारांनी आपला अध्यक्ष 5 वर्षांसाठी निवडला आहे. विद्यमान अध्यक्ष राणिल विक्रमसिंघे यांनी स्वतंत्र उमेदवार म्हणून ही निवडणूक लढविली.  या पूर्वी ते प्रत्यक्ष निवडणुकीत दोनदा पराभूत झाले होते. श्री लंकेत 14 जुलै 2022 ला अभूतपूर्व उठाव झाला होता आणि अध्यक्ष राजापक्ष यांनी राजीनामा दिला. यामुळे नवीन अध्यक्षाची अप्रत्यक्ष पद्धतीने निवड करावी लागली. घटनेच्या 40 व्या कलमानुसार ही निवड पार्लमेंटने केली. म्हणजे  राणिल विक्रमसिंघे यांची पार्लमेंटने अध्यक्ष म्हणून निवड केली. त्या अगोदर 2 महिनेच राजापक्ष यांनी राणिल विक्रमसिंघे यांचीच पंतप्रधानपदी नेमणूक केली होती. अशाप्रकारे पार्लमेंटने निवडलेला अध्यक्ष उरलेल्या कालखंडापुरताच अध्यक्षपदी राहू शकतो.

  अन्य उमेदवार होते समाजी जन बलवेगया पक्षाचे उमेदवार आणि  विरोधी पक्षनेते मध्यममार्गी साजित प्रेमदासा, डावीकडे झुकलेल्या एनपीपीचे अनुरा कुमारा दिसानायके (उर्फ एकेडी) कुठल्याही घराण्याचे प्रतिनिधित्व करीत नाहीत. त्यांनी विद्यार्थी व कामगारक्षेत्रात साम्यवादी भूमिका घऊन कार्य केले आहे. त्यांचा पक्ष यापूर्वी श्रीलंकेत भारतविरोधी भावना भडकावण्यासाठी ओळखला जायचा  त्यांचे साथीदारही बहुतांशी असेच आहेत.  ते कोलंबोवासी (शहरी) नाहीत. त्यामुळे जनतेला ते आपल्यातले वाटतात.  त्यांनी भ्रष्टाचारमुक्त कारभार आणि सुप्रशासनाची हमी जनतेला दिली.  एका नवीन राजकीय संस्कृतीचा देशात विकास करण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी मी ही निवडणूक लढवीत आहे, असे त्यांनी घोषित केले होते. तिसरे उमेदवार माजी अध्यक्ष प्रेमदासा यांचे चिरंजीव नमल राजापक्ष होते. त्यांच्या कुटुंबावरच आर्थिक दुरवस्थेला कारणीभूत असल्याचा आरोप आहे.  

  श्रीलंकेतील अध्यक्ष निवडण्याच्या पद्धतीला ‘इन्स्टंट-रनऑफ व्होटिंग मेथड’, म्हणतात. यानुसार प्रत्येक मतदार तीन पसंतीक्रम देऊ शकतो. पहिल्या फेरीत जर कुणालाही बहुमत (50% +1 मते) मिळाली नाहीत तर ज्यांचा पहिल्या पसंतीचा उमेदवार बाद झाला आहे, अशांच्या मतपत्रिकेवरचा  दुसरा पसंतीक्रम विचारात घेतला जातो व ती मते त्या त्या उमेदवारांकडे वर्गित केली जातात. 1982 नंतर पार पडलेल्या आजवरच्या सर्व म्हणजे आठही निवडणुकीत उमेदवार पहिल्या फेरीतच 50% पेक्षा जास्त मते मिळवून विजयी होत आले आहेत. त्यामुळे दुसरा पसंतीक्रम विचारात घेण्याची आवश्यकताच पडली नाही. असो. पण 2024 मध्ये कुणाही एका उमेदवाराला 50% चा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे पुढचा पसंतीक्रम विचारात घ्यावा लागला. 

या निवडणुकीत  मार्क्सवादी दिसानायके यांचा विजय झाला याचा अर्थ असा होतो की, सद्ध्याची प्रशासकीय व्यवस्था बदलून लोकांना मूलभूत स्वरुपाच्या सुधारणा हव्या आहेत. मार्क्स, लेनिन आणि फीडल कॅस्ट्रो आदींच्या तसबिरी दिसानायके यांच्या काार्यालयात लावलेल्या आढळतात. त्यांचा सार्वजनिक जीवनातील प्रवास विद्यार्थी नेता म्हणून सुरू झालेला आहे. पण त्यांच्या प्रयत्नातून व्यवस्थाबदल खरेच घडून येईल किंवा कसे याबाबत राजकीय निरीक्षक साशंक आहेत. जर भ्रष्टाचारमुक्त कारभार आणि सुप्रशासनाची हमी ही उद्दिष्टे दिसानायके यांना साध्य करता आली नाहीत. तर जनता त्यांच्याविरुद्ध चिडून उठल्याशिवाय राहणार नाही. आंतरराष्ट्रीय नाणे निधीने (आयएमएफ) कर्जफेडीबाबत घातलेल्या अटी आपण सौम्य करून घेण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी जनतेला  दिले होते. ते साध्य होणे कठीण आहे. हिंसाचाराचा आता आपण नेहमीसाठी त्याग केला आहे, अशी घोषणा रक्तरंजित क्रांती आणि हिंसाचार यावरच विश्वास असलेल्या दिसानायके व त्यांच्या पक्षाने जनता विमुक्ती पेरामुना’ने (जेव्हीपी) केली आहे. त्याची भुरळ जनतेला पडली  म्हणून की काय तरुणांनी जबरदस्त वळण घेत या टोकाच्या डाव्या विचारसरणीच्या नेत्याची आणि पक्षाची निवड केलेली दिसते आहे. गेल्या निवडणुकीत त्यांना केवळ 3.2 टक्के मते मिळाली. होती आणि तेव्हा सभागृहात केवळ तीन जागी विजय मिळालेला पक्ष आज सत्तास्थानी येतो आहे. निवडणुकीपूर्वी औषधे, अन्नपदार्थ  आणि इंधन यांच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. त्यामुळेही तरूणवर्ग भडकला होता.

 या निवडणुकीत कुणीही जिंकले असते तरी  पुढचा काळ श्री लंकेसाठी बिकट काळ आहे, हे मात्र नक्की आहे. जनतेच्या असंतोषाचा स्फोट होणार नाही, जगातील देणेकऱ्यांचा विश्वास कायम राहील आणि देशातील राजकीय अस्थिरता एका मर्यादेच्या पुढे जाणार नाही, हे त्रांगडे सांभाळत पुढच्या 5 वर्षात काहीतरी ठोस कामगिरी निवडणूक जिंकणाऱ्याला करून दाखवावी लागणार आहे.

मुख्य असे की, मतदान शांततेत पार पडले आहे. नाहीतर आजवर लबाडी, हिंसाचार, कटकारस्थाने याशिवाय श्री लंकेतील एकही निवडणूक पार पडलेली नाही. सामान्य मतदारही अतिशय गांभीर्याने या निवडणुकीकडे पाहत आहेत, असा निष्कर्ष यावरून राजकीय निरीक्षकांनी काढला आहे. दंगा करणारेच निवडून येतांना दिसत होते, म्हणून त्यांना हिंसाचाराची गरजच भासली नाही, असे तर नसेल ना? तरीही खबरदारीचा उपाय म्हणून मतदान आटोपताच देशभर 24 तासांचा कर्फ्यू लावण्यात आला होता. 

  विजयानंतर दिसानायके यांनी राष्ट्रीय एकतेसाठी आवाहन केले आहे. सिंहली, तमीळ, ख्रिश्चन  आणि मुस्लीम या सर्वांनी पूर्ववैमन्स बाजूला सारावे आणि संघटित होऊन एक मजबूत पाया  तयार करावा, असे अनुरा यांनी जनतेला कळकळीचे आवाहन केले आहे. ते भारताकडे दुर्लक्ष करू शकणार नाहीत,  याची जाणीव अनुरा यांना झाली आहे.  बहुदा म्हणूनच त्यांनी भारतविरोधी विधाने कमी केली असावीत. गेल्या वर्षी दिसानायके भारतभेटीवर आले होते. भारत आणि श्री लंका यात सौहार्द आणि स्नेहाचे वातावरण निर्माण झाले पाहिजे, असे ते म्हणाले होते. पण त्यासाठी परस्परातील  विश्वास कसा वाढेल यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी त्यांच्यावरच आहे.  श्री लंका हिंदी महासागराच्या मधोमध वसलेले बेट आहे. त्याचा उपयोग भारतविरोधी कारवायासाठी होऊ नये हे तेव्हा त्यांना मान्य होते. आता ते प्रत्यक्षात अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर कायकाय घडते, यावर भारत अर्थातच लक्ष ठेवून असेल. 


No comments:

Post a Comment