Tuesday, March 25, 2014

Mystery of the Missing Plane 25.03.2014

                                 वेध एका शोध मोहिमेचा  
वसंत गणेश काणे
हल्ली मुक्काम पुणे
९४२२८०४४३०
८ मार्च २०१४ ला  क्वालालंपूर येथून बेजिंगला जाण्यासाठी २३९ प्रवासी घेऊन निघालेले मलेशियाचे बोईंग जेटलायनर विमान निघाल्यानंतर एक तासाच्या आत बेपत्ता झाल्याच्या वार्तेने अख्खे जग हादरले होते. स्वर्ग,पृथ्वी आणि पाताळात त्याचा शोध घेणे सुरु झाले होते. स्वर्गाचा उल्लेख  करण्याचे कारण असे की, या विमानाचा पत्ता न लगण्याची एक शक्यता अशीही वर्तवण्यात आली होती की, या मागे परग्रहावरील जीवसृष्टीचा हात असावा. पृथ्वीवरील मानवांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी हे विमान गिळंकृत (स्वालो ) केले असावे.
आज विज्ञान खूप पुढे गेले आहे. ‘गुगलवर’ पृथ्वीचा कोपरा न कोपरा निरखता येतो. अगदी तुमचे स्वत:चे घर आणि त्यासमोर उभी असलेली तुमची किंवा दुसऱ्या कुणाची ‘कार’ सुद्धा ओळखता येते. असे असून सुद्धा बेपत्ता झालेल्या एम एच ३७० या बोईंग ७७७ प्रकारच्या महाकाय विमानाचा मागमूसही अनेक  दिवस होऊन गेले तरी लागू नये, याचे आश्चर्य वाटत होते . पण त्याच बरोबर विमानाचा पत्ता लावण्यासाठी जे जंगजंग पछाडले जात होते, ते पाहूनही माणसे  आश्चर्यचकित होत होती. शोध मोहीम कशी असावी, शोध कसा घ्यावा, कोणकोणत्या शक्यता गृहीत धराव्यात, याचे एक नमुनेदार उदाहरण म्हणून या मोहिमेकडे इतिहास पाहील , यात शंका नाही.
तांत्रिक बिघाड
विमानात काहीतरी तांत्रिक बिघाड झाला असावा आणि त्यामुळे विमानातील दाब एकदम कमी होऊन विमानातील सर्व व्यक्ती तात्काळ बेशुद्ध झाल्या असाव्यात आणि विमान मात्र उडतच राहिले असावे आणि भरकटले असावे, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. विमानाच्या सामान घरातील लिथियम बॅटरींनी पेट घेतला असावा, अशी दुसरी शक्यता वर्तवण्यात आली होती. मानवी चुका किंवा वाईट हेतू वगळून शोध मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला होता . या  बाबी अपघात या सदरात मोडतात.
घातपाती कृत्य ?
कॉकपिटमध्ये घुसलेल्या कुणीतरी किंवा विमान कर्मचारी यांच्या पैकीच कुणीतरी हे घातपाती कृत्य केले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला, पण असे असते तर बहुदा आततायी गट जबाबदारी स्वीकारतो आणि आपला हेतू जाहीर करतो. बरेच दिवस लोटल्यानंतरही असे घडले नव्हते. कर्मचारी किंवा उतारू यापैकी कुणीही जगाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला दिसला नाही. ११ सप्टेम्बरला अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला होता, तेव्हा असे घडले होते. प्रवाशांनी बाहेरच्या जगाशी संपर्क साधला होता. विमान पस्तीस हजार फूट उंचीवरून जात होते, एवढ्या उंचीवर मोबाईल काम करीत नाहीत, असे तर काही नव्हते ना?
हे विमान बळजबरीने ताबा घेऊन पळवून नेले असावे, ही शक्यताही नजरेआड करण्यात आली नव्हती. पण मग इतके दिवस होऊनही ही बाब उघडकीला का आली नाही? विमान अज्ञातस्थळी नेऊन लपवून ठेवणे अशक्य नसले तरी खूपच कठीण आहे. दुसऱ्या महायुधाच्या काळात फ्रान्समध्ये भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांनी जंगलात गुप्तता राखीत रेल्वेचे रूळ टाकले आणि योग्यवेळ साधून मूळ मार्गाशी सांधा जोडणारा भाग पूर्ण करून अख्खी रेल्वे गाडीच वळवून पळवली होती. असाच काहीसा प्रकार या विमानाच्या बाबतीत झाला नव्हता ना, अशी शंका येणे स्वाभाविकच होते.
विमानात बॉम्बस्फोट करवला असावा, असे मानले तर विमानाचे अवशेष आणि तेलाचे तवंग समुद्रात दिसले असते. किंवा हे अवशेष भूतलावर विखुरले आढळले असते. तेलाचे शिंतोडे जागोजागी दिसले असते. विमान पस्तीस हजार फूट उंचीवरून उडत होते त्यामुळे विखुरलेले भाग किंवा उडालेले शिंतोडे फार मोठ्या व विस्तृत भूभागावर आढळले असते. अतिशय बारीक शोध घेऊनही असे दिसले नाही.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अनेक जंगलात विमाने उतरवण्यासाठी धावपट्ट्या (रनवे ) बांधण्यात आल्या होत्या. त्या अजूनही तशाच पडून  आहेत. त्यांची डागडुजी करून त्या जागी हे विमान उतरवून दडवून ठेवले असावे, अशीही शक्यता तपासली गेली. पण अशा ठिकाणी २३९ उतारूंच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणे ही सोपी गोष्ट नव्हती.
पायलटचे  दुष्कृत्य?
मलेशियातील विरोधी पक्षनेत्यावर अनैसर्गिक लैंगिक कृत्य (सोडोमी) केल्याचा आरोप ठेवून त्याला तुरुंगात डांबले होते, असा आरोप केला जात होता. विमानाचा पायलट जहरी अहमद शहा हा या  विरोधी पक्षनेत्याचा कट्टर समर्थक होता. त्याने सूड घेण्याच्या इराद्याने हे कृत्य केले असावे, असाही संशय व्यक्त केला गेला. पण मग या पायलटने आपला हेतू स्पष्ट करणारा खुलासा जाहीर करावयास नको होता का? तसेच दोन पायलट मध्ये संगनमत झाले होते, असे गृहीत धरायचे का?  
विमान नेहमीच्या मार्गावरून जात असतांना त्याचा मार्ग अचानक बदलला गेला होता, हे नक्की. या विमानात ‘लोकेशन टेक्नॉलॉजी’ (उपग्रहाच्या साह्याने विमानाचा ठावठिकाणा कळवणारी संगणकप्रणित यंत्रणा) वापरली जात होती. हिलाच ए सी ए आर एस म्हणजेच एअरक्राफ्ट कम्युनिकेशन्स ॲड्रेसिंग ॲड रिपोर्टिंग सिस्टीम असे म्हणतात. तसेच फ्लाईट नॅव्हिगेशन सिस्टीम म्हणजे हवाई मार्गातील एकेक खुणेची नोंद घेत पुढे जाणे शक्य करणारी यंत्रणा सुद्धा कार्यरत होती. यांचे काम कुणातरी ‘जाणकाराने’ एकदम ठप्प केले असेल का? याच सुमारास अमेरिकेतून एक निनावी ‘फोन कॉल’ आल्याची नोंद आहे. या मागचे रहस्य आजही गुलदस्त्यातच आहे. ते उघड झाले नाही किंवा त्याचा मूळ स्रोत सुद्धा कळलेला नाही. हा कॉल ‘साधा’ असता तर तो करणारा आतापर्यंत समोर यायला हवा होता. आपल्या सध्या फोन कॉल ची ही परिणिती झालेली पाहून तो भिऊन तो दडून बसला आहे/असावा, असे मानले तर त्याचा शोध आतापर्यंत नक्कीच लागायला/घ्यायला हवा होता.
विमानातून विमान अभियांत्रिकीत (एव्हिएशन इंजिनिअरिंग) निष्णात असलेला एक चिनी नागरिक प्रवास करीत होता. हा मोहम्मद खैरुल अर्मी सलामत नावाचा कर्मचारी विमान दुरुस्तीसाठी चीनला जायला निघाला होता. त्याचे विमानविषयक तंत्रज्ञान दुर्लक्षून चालणार नाही, असेही एक मत आहे.कारण एक अत्यंत अप्रामाणिक व्यक्ती म्हणून त्याची ख्याती आहे. त्याचेच  तर हे कृत्य नसेल ना ?
विमान अमेरिकेने पळवले असावे –इति रशिया
रशियाच्या गुप्तहेर खात्याने एक ‘पुडी सोडली’ होती. अमेरिकेने या विमानाचा ‘ताबा घेतला’ आणि विमानाला ‘वळवून’ आपल्या हिंदी महासागरातील ‘डीयागो ग्राशिया’ य बेटावर गुप्त स्थळी नेऊन ठेवले आहे, पण अमेरिकेने असे का करावे, ही बाब ‘अनाकलनीय’ असल्याचे रशियाने म्हटले होते. सध्या रशिया आणि अमेरिका यांचे ‘क्रिमीया  प्रकरणामुळे’ निर्माण झालेले ‘मधुर संबंध’ पाहता रशियाच्या या ‘रहस्योद्घाटनाची’ गंभीर दखल घेण्यास कुणीही तयार झाले नाही, याचे आश्चर्य वाटायला नको. शिवाय अमेरिकेने असे कोणतेही विमान या बेटावरील आपल्या तळावर आलेले नाही, असा खुलासा केला होता.
तालिबानी डाव?
हे तालिबानी कृत्य तर नाहीना अशी शंका मलेशियाने व्यक्त केली आहे.विमान पाच हजार फूट किंवा त्यापेक्षा कमी उंचीवरून उडत ठेवले तर ते रडारच्या कक्षेत येत नाही. हे विमान नागपूर विमान तळाच्या हद्दीतून अफगाणिस्तानच्या दिशेने गेले असावे, असेही म्हणतात. सध्या हे विमान अतिरेक्यांनी अफगाणीस्थानमधील अतिरेकी प्रभावक्षेत्रात त्यांच्या ताब्यात असावे. असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.                                        
अकरा सप्टेंबरला विमानाचा बॉम्ब सारखा उपयोग करून अतिरेक्यांनी अमेरिकेतील आवळेजावळे उंच मनोरे (वर्ल्ड ट्रेड सेंटरचे ट्वीन टॉवर्स) उध्वस्त केले होते. तसाच काहीसा प्रकार भारतात करण्याचा अतिरेक्यांचा डाव असावा, असेही एक वृत्त होते. पण आपल्या गुप्तहेर यंत्रणेने ही शक्यता फेटाळून लावली होती. पण सामान्य नागरिकांच्या मनातून ही शक्यता सहजासहजी  दूर होणे  शक्य नव्हते, याबद्दल त्यांना दोष देता येईल का?
सिंगापूरहून भारत आणि पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जाणाऱ्या विमानाच्या अगदी जवळून हे विमान गेले असेल तर, जणू एकाला एक लागूनच अशाप्रकारे ही विमाने गेली असतील. जर ‘या’ विमानाने आपली संपर्क यंत्रणा बंद ठेवली असेल तर रडार यंत्रणेवर एकच विमान जात असल्याचा ब्लीप (प्रकाश स्फुल्लिंग) दिसून आला असेल. अशाप्रकारे हे विमान राजरोसपणे गेले असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. अशी शक्यता एका विमानतज्ज्ञाने व्यक्त केली होती.
हिंदी महासागराच्या ऑस्ट्रेलियाला स्पर्श करणाऱ्या भागात २४ मीटर लांबीचे काही अवशेष दिसत आहेत, असे वृत्त झळकले  ते अवशेष या विमानाचे आहेत किंवा कसे याचा शोध घेणे सुरु आहे. पण असे म्हणतात की, आता विमानाचे अवशेष तरंगत असण्याची शक्यता खूपच कमी आहे.
मलेशियाने हे विमान हिंदी महासागरात बुडाल्याची घोषणा केली आहे. विमान प्रवाशांचे नातेवाईक शोकाकुल झाले असले तरी त्यांना विमान नक्की बुडाल्याचा ठोस पुरावा हवा आहे.ह्या विमानाचे अदृश्य होणे ही जशी एक धक्कान्तिका होती. तशीच ती एक शोकांतिकाही आहे. हे विमान बुडाल्याचा नक्की शोध लागेल तेव्हा लागो. हा शोध केव्हा लागेल कुणास ठावूक? कदाचित तो कधीच लागणारही नाही. पण या निमित्ताने जगातील बावीस राष्ट्रे आकाश पाताळ एक करीत जी शोध मोहीम आजही राबवत आहेत, तिला तोड नाही. केवळ विमान प्रवाशांनाच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा ही दिलासा देणारी बाब ठरेल आणि वर्षानुवर्षे स्मरणात राहील, यात शंका नाही.
    

             

No comments:

Post a Comment