Friday, March 7, 2014

Russia and Ukraine TB

प्रासंगिक

तारीख: 06 Mar 2014 23:41:32

रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष

सोव्हिएट रशियाची शकले पडून आता बरीच वर्षे होत आली आहेत. त्यांपैकी रशिया आणि युक्रेन यांच्यातील वाद विकोपाला पोहोचला असून, रशियाने आपले सैनिक युक्रेनमध्ये घुसवण्याला प्रारंभ केल्याला बरेच दिवस उलटले आहेत. या संघर्षाबाबतची माहिती मिळावी यासाठी बरेच मागे जावे लागणार आहे. राजकीय, भौगोलिक आणि ऐतिहासिक तपशिलांचा मागोवा घ्यावा लागणार आहे. युक्रेनच्या क्रिमीया भागातील एकूण लोकसंख्येपैकी ५८ टक्के लोक रशियन वंशाचे आहेत, २४ टक्के युक्रेनियन आहेत, तर १२.१० टक्के तातार आहेत. त्यामुळे वांशिकदृष्ट्या आणि सांस्कृतिक जवळिकीमुळे युक्रेनमधील क्रिमीया प्रदेशातील रशियन जनतेला रशियाविषयी आपलेपणाची आणि आपुलकीची भावना पूर्वीपासूनच आहे.
ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक पार्श्‍वभूमी
कायदेशीरदृष्ट्या पाहिल्यास क्रिमीया हा युक्रेनचा भाग आहे. या व्यवस्थेला रशियाने मान्यताही दिलेली आहे. युक्रेनचा एक भाग असे स्वरूप असले, तरी क्रिमीया हे एक स्वायत्त गणराज्य (ऑटोनॉमस रिपब्लिक) आहे. त्याचे स्वतःचे पार्लमेंट आहे. एवढेच नव्हे, तर त्याचा स्वतःचा अध्यक्षही होता. त्यानंतर अध्यक्षाऐवजी अध्यक्षीय प्रतिनिधी आणि पार्लमेंट अशी घटनात्मक व्यवस्था क्रिमीयामध्ये अस्तित्वात आहे. त्याच्या जोडीला प्रधानमंत्री असतो.
भौगोलिकदृष्ट्या क्रिमीया हे एक द्वीपकल्प (पेनिनसुला) स्वरूपाचे आहे. या प्रदेशाच्या तिन्ही बाजूंना काळा समुद्र (ब्लॅक सी) असून, उत्तर बाजू एका चिंचोळ्या पट्टीने मुख्य आणि मोठ्या आकाराच्या युक्रेनला जोडलेले आहे. या भौगोलिक कारणामुळेही क्रिमीया युक्रेनपासून वेगळा पडलेला दिसतो. त्याचप्रमाणे क्रिमीया रशियाशी भूभागाने जोडलेला नसला, तरी क्रिमीयाचे एक टोक आणि रशिया यामध्ये असलेला समुद्र यात अतिशय कमी अंतर आहे. क्रिमीयाचा युक्रेनला जोडणारा चिंचोळा भूभाग आणि क्रिमीया आणि रशिया यामध्ये असलेला अतिशय अरुंद समुद्र ही भौगोलिक परिस्थिती क्रिमीयामध्ये ५८ टक्के रशियन वंशाचे लोक असण्यास कारणीभूत झाली आहे/असावी.
ऐतिहासिक दृष्टीने विचार केला, तर निदान दोन शतके (दोन दशके नव्हे!) क्रिमीयावर रशियाचाच प्रभाव होता. नंतर रशियाने हा प्रदेश युक्रेनला बहाल केला, त्यामागे भौगोलिक सलगतेचे कारण असावे. अरुंद समुद्रामुळे रशियाशी असलेली विलगता क्रिमीया आणि रशिया या दोघांत भावनिक विलगता निर्माण करू शकली नाही. त्यामुळे क्रिमीयाची नाळ युक्रेनशी कधीच जुळली नाही. क्रिमीया युक्रेनला बहाल करण्याचा रशियाचा निर्णय दोन्ही प्रदेशांतील रशियन वंशाच्या लोकांना चुकीचा वाटतो. तो त्यांना मनापासून कधीच पटला नव्हता आणि नाही. म्हणूनच क्रिमीयामध्ये रशियाशी जवळीक असलेली व्यक्ती- विक्टर यानुकोव्हीच- भरपूर मताधिक्याने अध्यक्षपदी निवडून आली, याचे कुणालाही आश्‍चर्य वाटले नाही. अर्थातच, विक्टर यानुकोव्हीच हा रशियन हितसंबंधांना अधिक प्राधान्य देऊ लागला. तो रशियनधार्जिणा आहे, या युक्रेनच्या आरोपाला बळकट आधार आहे. त्याने युरोपच्या तुलनेत रशियाशी जवळीक ठेवण्याचे धोरण सुरू केले. युक्रेनला हे मान्य नव्हते.
संघर्षाचा प्रारंभ
हा असंतोष बराच काळ धुमसत राहिला. एक तात्कालिक कारण घडले आणि त्याचा परिणाम भडका उडण्यात झाला. असे दिसत असले, तरी त्यामागे असलेली कारणपरंपरा ही अशी जुनीच आहे. असे असले तरी तात्कालिक कारणही कमी महत्त्वाचे नाही. युक्रेन, युरोपियन युनियनशी असलेल्या आर्थिक व व्यापारी हितसंबंधांना अधिक महत्त्व देतो, तर विक्टर यानुकोव्हीच या क्रिमीयाच्या अध्यक्षाचा कल रशियाशी हितसंबंध जोपासण्यावर असतो. त्याने युरोपियन युनियनशी झालेल्या कराराकडे पाठ फिरवून रशियाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.
क्रीमीया हे स्वायत्त गणराज्य (ऑटोनॉमस रिपब्लिक) असले, तरी कायदेशीरदृष्ट्या तो युक्रेनचाच एक भाग आहे. त्यामुळे युक्रेनच्या युरोपियन युनियनला रशियाच्या तुलनेत झुकते माप देण्याच्या धोरणाच्या विरुद्ध भूमिका घेऊन विक्टर यानुकोव्हीचने रशियाशी जवळीक साधलेली पाहून युक्रेनच्या अंगाचा तिळपापड झाला. युक्रेनचा अध्यक्ष आरसेनी यात्सेनुक याने यानुकोव्हीचला बडतर्फ करून त्याच्या जागी युक्रेनधार्जिण्या ओलेक्सर टर्चीनोवची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. विक्टर यानुकोव्हीच याने रशियात आश्रय घेतला आहे, असे मानले जाते आहे.
ब्रिटन, फ्रांस, जर्मनी यांनी रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाचा निषेध केला असून, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी तर, आक्रमणाची किंमत चुकवावी लागेल, अशी सरळसरळ धमकीच रशियाला दिली आहे. ओबामा आणि पुतीन यांच्यात फोनवर नव्वद मिनिटे बातचीत झाली. पण, रशिया माघार घेईल, अशी चिन्हे दिसत नाहीत.
शीतयुद्ध पुन्हा सुरू झाले?
या घटनेमुळे गेली काही दशके मागे पडलेले शीतयुद्ध पुन्हा सुरू होणार असल्याची/झाले असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शीतयुद्धाच्या काळात साम्यवादी राष्ट्रांचा गट आणि अमेरिका, ब्रिटन आणि फ्रांस यांचा गट यात प्रत्यक्ष युद्ध होत नसले, तरी एकमेकांवर मात करण्याचा प्रयत्न सतत चालू असे. या संघर्षाचे वेळी तसेच काहीसे झाले आहे. युरोपियन राष्ट्रांनी युक्रेनला अल्पदराने कर्ज देऊ केले, तेव्हा रशियाने बिनव्याजी कर्ज देण्याची तयारी दाखविली. गाजर आणि काठीया तंत्राचा वापर करून बिनव्याजी कर्जासोबत (गाजर) नैसर्गिक वायूची किंमत वाढवण्याची धमकीही (काठी) दिली. कारण युक्रेन नैसर्गिक वायूसाठी रशियावर पूर्णपणे अवलंबून आहे. क्रिमीयामध्ये घुसण्यासाठी रशियन नागरिकांवर होत असलेल्या हल्ल्यापासून त्यांच्या संरक्षणासाठी हे सैनिक क्रिमीयामध्ये घुसले असल्याचा कांगावा रशियाने केला आहे. काळ्या समुद्रातील रशियाच्या समुद्री बेड्याचा (ब्लॅक सी फ्लीट) तळ क्रिमीयाच्या किनार्‍यावर आहे. त्याचा धाक दाखविणे सुरू केले आहे; तर अमेरिकेने रशियाला जी-८ या बड्या राष्ट्रांच्या संघटनेतून काढून टाकण्याची धमकी दिली. पण, रशियाने या धमकीला वाटण्याच्या अक्षता लावल्या आणि धमकीला जुमानणार नाही, असे स्पष्ट केले. सध्या युक्रेनचा कार्यवाहक अध्यक्ष आलेक्संद्रा तुचीनोव याने रशियाच्या क्रिमीयात सैनिक घुसवण्याच्या कृतीला आम्ही आक्रमण समजू, असे म्हणून टूरटूर चालवली आहे. रशियाने आपले सैनिक मागे न घेता आम्ही अल्टिमेटम दिलेले नाही (अंतिमोत्तर मागितलेले नाही), असे जाहीर करून साळसूदपणाचा आव आणला आहे. अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट जॉन केरी यांनी रशियाला सुनावले आहे की, युरोपशी मैत्री आणि रशियाशीही दोस्तीचे संबंध यापैकी एकाची निवड करण्याची वेळ आमच्यावर आणू नका. हे प्रकरण म्हणजे रॉकी याच्या चित्रपटासारखे समजू नका. या चित्रपटात अमेरिकन आणि रशियन बॉक्सर यांची हाणामारी दाखवली आहे. अशा प्रकारे परस्परांवर गुरगुरणे असेच चालू राहील, असे दिसते. जॉन केरी युक्रेनची राजधानी कीव येथे दाखल झाले असून, त्यांनी युक्रेनची हिंमत वाढविण्याबरोबरच भरघोस आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. आपला उद्देश सफल झाला, असे समजून म्हणा किंवा प्रकरण तुटेपर्यंत ताणू नये म्हणून म्हणा किंवा रशियन बाजारपेठेत एकदम घसरगुंडी झाली म्हणून म्हणा, रशियाने समस्यांची सोडवणूक करण्याचा युद्ध हा शेवटचा मार्ग आहे, असे जाहीर करून, उद्देश पूर्ण झाला असल्यामुळे आपण सैनिकांना बराकीत परत जाण्याचा आदेश देत आहोत, असे म्हटले आहे.
वास्तवाचे भान हवे
या निमित्ताने एक बाब अधोरेखित झाली आहे, ती अशी की, ग्लोबल व्हिलेजचे (संपूर्ण पृथ्वी हे एक खेडे) गोडवे कितीही गायले जात असले, तरी राष्ट्रीय आर्थिक हितसंबंध आणि वांशिक जवळीक यांना बाजूला सारून बंधुत्वाच्या भावनेने मानव समाज एकसंध व्हायला अजून बरीच वाटचाल करावी लागणार आहे, असा या प्रकरणाचा बोध आहे.
वसंत गणेश काणे 
९४२२८०४४३०

No comments:

Post a Comment