अजिंक्य योद्धा - या सम हाच!
(एक संकलन)
वसंत गणेश काणे बी.एससी;एम ए(मानसशास्त्र),एम एड.
एल बी7, लक्ष्मीनगर, नागपूर 440 022
9422804430
युद्धशास्त्राच्या इतिहासाचा अभ्यास ज्याच्या कार्यकर्तृत्वाचे धडे गिरविल्याशिवाय पूर्ण होत नाही असे सर्व जग आजही मानते, उण्यापुर्या वीस वर्षांच्या कारकीर्दीत जो लहानमोठ्या एकेचाळीस लढाया लढला आणि एकदाही पराभूत झाला नाही, स्वामीनिष्ठेशिवाय ज्याला इतर सर्व कस्पटासमान वाटत होते, मराठा साम्राज्याच्या विस्ताराला ज्याच्या कारकिर्दीत प्रारंभ झाला, असा अजिंक्य योद्धा जगाच्या इतिहासात दुसरा सापडणार नाही. 28 एप्रिल 1740 मध्ये त्याने जगाचा निरोप घेतला. 18 ऑगस्ट 1700 ला त्याचा जन्म झाला होता, असे मानले जाते. म्हणजे जेमतेम 40 वर्षांचे आयुष्य त्याच्या वाट्याला आले होते. पण या अल्पायुष्यात त्याने आपल्या कर्तृत्वाचा जो ठसा जगाच्या इतिहासात उमटवून ठेवला आहे. त्याची बरोबरी आजवर संपूर्ण जगातील एकाही योद्ध्याला साधता आली नाही आणि भविष्यातही ती साधता येईल, असे वाटत नाही. असा हा पहिला बाजीराव!
पेशवाई 1674 ते 1858
बाजीरावाचे वडील बाळाजी विश्वनाथ हे पहिले पेशवे आहेत, असा अनेकांचा समज आहे पण इतिहास तसे सांगत नाही. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणार्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पेशवे हे पद प्रथम निर्माण केले व त्यानुसार मोरोपंत त्र्यंबक पिंगळे हे पहिले पेशवे होत. तसे पाहिले तर सोनोपंत डबीर यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी 1640 मध्येच पेशवे म्हणून नेमले होते. पेशव्यांचे अधिकार आणि कर्तव्ये प्रधानमंत्र्यासारखी असत. छत्रपतींनी पेशवे हे नामाभिदान बदलून त्याच्या ऐवजी ’पंतप्रधान’ हे नवीन नाव दिले पण पेशवे हे नावच पुढे प्रचारात आणि वापरात राहिले. त्यांची कारकीर्द 1674 ते 1680 पर्यंत होती. पुढे रामचंद्रपंत आमात्य, बहिरोजी पिंगळे व परशुराम कुळकर्णी यानंतर बाळाजी विश्वनाथ पेशवे म्हणून नियुक्त झाले. यानंतर मात्र पेशवाईची वस्त्रे वंशपरंपरेने दिली गेली. दुसरा बाजीराव हा शेवटचा पेशवा मानला जातो पण तसे नाही, असेही मानणारे आहेत. दुसर्या बाजीरावाची कारकीर्द तसे पाहिले तर 1818 मध्ये संपली. यानंतर बाजीरावाचा भाऊ अमृतराव याची चिमुकली कारकीर्द इतिहासाने पाहिली. 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धाचे अध्वर्यु नानासाहेब यांची ’कारकीर्द’ एकप्रकारे 1 जुलै 1857 ला सुरू झाली आणि 1858 मध्येच संपली, असे म्हणता येईल.
बाजीरावाचे कुटुंबीय
पुण्याचा शनिवारवाडा बाजीरावाच्या कारकिर्दीत बांधला गेला. पेशव्यांचा कारभार शनिवारवाड्यातूनच चालायचा.
बाजीरव व चिमाजी, ही दोन मुले आणि भिऊताई आणि अनुताई या मुली ही बाळाजी विश्वनाथ आणि राधाबाई यांची अपत्ये होत. भिऊताई बारामतीकर कोट्यधीश सावकार आबाजी नाईक जोशी यांस ’दिली’ होती. तर अनुताईला इचलकरंजीकर जहागीरदार नारायणराव घोरपडे यांना ’दिली’ होती.
सेनानी घडविणारा बाजीराव
1721 मध्ये बाजीरावाला छत्रपती शाहू महाराजांनी पेशवाईची वस्त्रे बहाल केली. त्यावेळी बाजीराव पंचविशीत होता. त्यामुळे नारो राम मंत्री, अनंत राम सुमंत आणि श्रीपतराव पंतप्रतिनिधी यांना त्याचा हेवा वाटत असे. त्यांचे सहकार्य त्याला मिळत नसे. यावर उतारा म्हणून बाजीरावाने १७२३ मध्ये मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे आणि उदाजी, तुकोजी व जिवाजी हे पवार बंधू यांच्यासारखे नवीन सेनानी घडवून उभे केले व माळवा मोहीम आखली. या कुटुंबांकडे परंपरागत देशमुखी अधिकार नव्हते. बाजीरावाची निवड कशी अचुक होती, हे पुढील घडामोडींवरून स्पष्ट होते. ग्वाल्हेर, इंदोर, धार व देवास राजवटींचे हे सेनानी मूळ पुरुष ठरले आहेत.
बाजीरावाचे ’सूरतपाक’ देखणेपण
तो ’सुरतपाक देखणा’ होता. प्रभु रामचंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे तो आजानुबाहू होता (हात गुडघ्याखाली पोचत असत) निकोप प्रकृतीच्या बाजीरावाचा ’अंगलोट’ कसलेला, मांसल व पिळदार होता. बोलणे ऐटदार होते आणि अंगी शिपाईगिरीची ढब होती.
बाजीरावाकडे देखणेपण असे होते की, त्याच्याकडे ’कुमार्गी स्त्रिया बुभुक्षित नजरेने’ पहात असत, असे म्हटले जायचे. वृद्ध स्त्रिया त्याला पुत्र मानीत तर उपवर मुली ’जय देवा बापा, आम्हाला असाच पती मिळू दे’, असे म्हणत असत.
’बाजीरावाची तसबीर काढून आण ’, अशी आज्ञा निजामउल्मुल्कने एका नामांकित ’चितार्यास’ केली. पण त्याला बाजीरावाचे देखणेपण चितारता आले नाही शेवटी तो त्राग्याने म्हणाला, ’धिक्कार असो माझ्या या कसबाला’.
बाजीरावाच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष
बाजीरावाला मिजास माहीत नव्हती. घोड्याचे ’खोगीर सामान’ तो आपल्या हाताने कशीत असे. घोड्याला स्वत: ’खरारा’ करीत असे. तीर, भाला, बंदुक, तरवार या चारही हत्यारांचा वापर तो सारख्याच निपुणतेने करीत असे. त्यावेळचे लोक त्याला ’देवयोद्धा’ म्हणत. बाजीराव लेखनकलेतही चतुर होता. त्याची स्वदस्तूरची पत्रे उपलब्ध आहेत. या पत्रांच्या साह्याने सुद्धा बाजीरावाने अनेकांची मने जिंकली, अनेकांना ’वश’ करून घेतले.
मधुर भाषण हा त्याचा आणखी एक गुण होता. तसेच तो सभाधीटही होता. तो बोलू लागला की ’वीररस’ साक्षात प्रगट होत असे. त्याचे वीरश्रीयुक्त भाषण ऐकल्यावर शिपाई म्हणत, ’बाजीरावसाहेब हा आमचा जीवात्मा आणि आम्ही त्याचे अवयव आहोत’. ते त्याच्यावर ’दिलआराम व दिलखुश’असत. सर रिचर्ड टेंपल यांनी बाजीरावाचे भाषणकौशल्य आणि संघटनचातुर्य या गुणांची मुक्तकंठाने स्तुती केली आहे.
बाजीरावाचे ’डोके आणि हात यांची, तू आधिक की मी अधिक अशी स्पर्धा चाले’. बाजीरावाला छत्रपती शाहू महाराजांनी पेशवाईची वस्त्रे दिल्यानंतर बाजीरावाने जे भाषण केले त्याचा आशय पुढीलप्रमाणे आहे.‘आपापसातला वैरभाव ’खोटा’. स्वकीय मुसलमानास जाऊन मिळाले, आपापसातल्या कुरबुरी आणि फाटाफुटीमुळे हिंदु राजे पिंजर्यातले पोपट बनून राहिले आहेत. ’मुसलमान देतील ते खावे आणि ते मागतील ते त्यास द्यावे’, अशी हिंदूंची अवस्था झाली आहे. उत्तरेस मोगल आणि कोकणात ’फिरंगी’ असे तूर्त दोन प्रबल शत्रू आहेत. पण चिंता नाही. कायावाचामने सर्वांनी मदत द्यावी म्हणजे त्यास जेरीस आणण्यास काही उशीर नाही.’’ उत्तरेतील मोगल साम्राज्य मोडकळीला आले आहे, हे बाजीरावाने हेरले होते. ‘बुंध्यावर घाव घाला, फांद्या आपोआप गळून पडतील’, असे तो म्हणायचा.
पेशवाईची वस्त्रे स्वीकारल्यानंतर बाजीरावाचा ’प्रतापसूर्य’ सतत ’आकाशगामी’ होत चालला. ’प्रजाकमले’ प्रफुल्लित दिसू लागली. आणि विध्वंसक अक्षरश: सैरावैरा पळत सुटले.
बाजीरावाने गाजवलेले संग्राम
बाजीरावाच्या आयुष्यातील ठळक घटनांचीच यादी करतो म्हटले तरी अनेक पाने खर्ची घालावी लागतील.
सासवडकर पेशवे पुणेकर झाले
निजाम -उल-मुल्क असफ जहां हा खरेतर मोगलांचा दक्षिणेतील सरदार होता.पण त्याने स्वत:चेच राज्य दक्षिणेत स्थापन करण्याप्रयत्न केला व मराठ्यांच्या करवसुली अधिकारालाच आव्हान दिले. बाजीरावने निजामाची भेट चिखलठाण मुक्कामी घेऊन वादसामोपचाराने सुटावा, असा प्रयत्न करून पाहिला. पण निजामाने न जुमानता मराठ्यांचे कर वसुलीचे अधिकार अमान्य केले.मोगल साम्राज्यात निजामाला वजिराचा दर्जा होता.बादशहा महंमद शहाला त्याच्या दक्षिणेतील प्रभावाची धास्ती वाटू लागली व त्याने निजामाची अवधला बदली केली. निजामाने बदली हुकुम धुडकावून लावला व दक्षिणेकडे कूच केले. त्याचे पारिपत्य करण्यासाठी बादशहाने फौजा पाठविल्या. पण निजामाने साखर-खेर्ड्याच्या लढाईत त्यांचा पराभव केला.आता बादशहाला निजामाला दक्षिणेचा सुभेदार नेमणे भाग पडले. बाजीरावाने या लढाईत निजामाची मदत केली होती. या लढाईतील पराक्रमाबद्दल बाजीरावाचा गौरव करण्यात आला. निजामाने मराठे व मोगल या दोघांनाही खूष करीत दक्षिणेत आपलेच बस्तान बसवण्याचा प्रयत्न चालविला. मराठ्यांना तो आपले प्रतिस्पर्धी समजू लागला.
निजामाने कर वसुलीसाठी कर्नाटकात फौजा पाठविल्या. मराठ्यांनी फतेसिंग भोसले याच्या नेतृत्वाकाली विरोध केला पण मराठ्यांचा एकदा नव्हे तर लागोपाठ दोनदा पराभव झाला. लढायांचे नेतृत्व बाजीरावाकडे नव्हते. कोल्हापूरचा संभाजी (दुसरा) हा छत्रपती शाहू महाराजांचा प्रतिस्पर्धी होता. खरा छत्रपती कोण? संभाजी(दुसरा) की छत्रपती शाहू असामुद्दा उपस्थित करून निजामाने दोघांनाही चौथाई व सरदेशमुखी देण्यास नकार दिला.
शाहू महाराजांच्या दरबारात परशुराम पंतप्रतिनिधी हा निजामाचा प्रवक्ता होता. तो बाजीरावाला पाण्यात पहात असे. संभाजीच्या (दुसरा)दरबारात चंद्रसेन यादव हा निजामाचा प्रतिनिधी होता. याचे पूर्वी बाजीरावाच्या वडलांशी दहा वर्षांपूर्वी युद्ध झाले होते. थोडक्यात असे की, शाहू व संभाजी या दोघांच्याही दरबारात बाजीरावाची वैरी असलेली माणसेच निजामाचे प्रतिनिधित्व करीत होते. शाहू व संभाजी या दोघात तडजोड घडवून आणण्याचा आव निजामाने आणला. बाजीरावाने ही मध्यस्ती धुडकावून लावण्याचा सल्ला शाहू महाराजांना देऊन निजामावर चाल केली. जालना, बहानपूर, खानदेश या भागात निजामाच्या फौजांना चारीमुंडे चीत केले.
बाजीराव पुण्यापासून दूर आहे, हे पाहून निजामाने संभाजी (दुसरा) याला पुण्याचा छत्रपती नेमले व त्याच्या संरक्षणासाठी फाजल बेग या सरदाराला मागे ठेवून स्वत: बाजीरावाचा समाचार घेण्यासाठी पालखेडच्या दिशेने कूच केले. पालखेडच्या लढाईत निजामाची सपशेल हार झाली व त्याला तह करणे भाग पडले. या तहानुसार निजामाला शाहू महाराजांना छत्रपती म्हणून मान्यता द्यावी लागली. हा तह मुंगी शेवगावचा तह म्हणून ओळखला जातो.
या नंतर बाजीरावाने आपले केंद्र सासवडहून पुण्याला आणले. पुढे या कसब्याला एका मोठ्या शहराचा रूप पुढे प्राप्त झाले. त्याची मुहूर्तमेढ अशाप्रकारे रोविली गेली. मुठा नदीच्या काठावर शनिवार वाडा १७३० मध्ये बांधून तयार झाला व सासवडकर पेशवे पुण्याचे झाले.
पालखेड येथे 1728 साली बाजीरावाने निजामाचा पराभव केला. सैनिकी शिक्षण देणार्या अमेरिकेतील संस्थेमध्ये याचे एक कायमस्वरूपी मॉडेलच तयार करून ठेवले आहे. बाजीरावाने शत्रूला कात्रीत कसे पकडले हा भाग ’स्ट्रॅटेजिक वॉरफेअर’ च्या अभ्यासातले एक महत्त्वाचे प्रकरण मानले जाते. फील्डमार्शल माँटगोमेरी या चढाईला ‘मास्टरपीस ऑफ स्ट्रॅटेजिक मोबिलिटी’ म्हणून गौरवतांना आपल्या ’अ कन्साइजड हिस्ट्री ऑफ वॉरफेअर’ या ग्रंथात म्हणतो, ’दबा धरून शत्रूला आपल्याला अनुकूल असलेल्या स्थळी आणायचे, तोपर्यंत काय वाटेल ते झाले तरी आपला तोल ढळू द्यायचा नाही आणि ’इप्सित स्थळी’ शत्रू आला की त्याला मात द्यायची. तोपर्यंत कसलेल्या शिकार्याप्रमाणे तो वाट पाहत असे. याच्याच जोडीला बाजीरावाचे घोडदळ हेही त्याचे एक फार मोठे बलस्थान होते. तो दर दिवशी चाळीस मैलाचा टप्पा गाठायचा. यामुळे शत्रूला त्याचा सुगावा कधीच लागत नसे.
निजामाला खडे चारल्यानंतर बाजीरावाने प्रचंड मोठी फौज आपला धाकटा भाऊ चिमाजी अप्पा याच्या नेतृत्वाखाली आणि शिंदे, होळकर, पवार यांच्या साथीने माळव्याला पाठविली. अमझेरा येथे झालेल्या लढाईत गिरधर बहाद्दूर व दयाबहाद्दूर हे मोगलांचे सरदार ठार झाले. चिमाजीने उजैन पर्यंतचा पल्ला गाठला पण शिबंदी संपल्यामुळे त्याला परत फिरावे लागले. या निमित्ताने बाजीरावाने राजस्थानलाही स्पर्श केला होता.
बुंदेलखंड मोहीम
बुंदेखंडाचा राजा छत्रसाल याने मोगलांविरुद्ध ‘बंड’ करून स्वत:चे असे राज्य स्थापन केले होते. १७२८ मध्ये मोगलांनी महम्मद खान बंगेश याच्या नेतृत्वाखाली छत्रसालाचा पराभव करून त्याला कुटुंबकबिल्यासह बंदिवान केले. छत्रसालाने बाजीरावाला मदतीसीठी वारंवार विनंती केली. पण त्यावेळी बाजीराव माळव्याच्या मोहिमेत गुंतला होता. १७२९ मध्ये मार्च महिन्यात बाजीराव बुंदेखंडावर चाल करून गेला. छत्रसालाने आपली सुटका करून घेतली व तोही बाजीरावाला येऊन मिळाला. दोघांनी मिळून जैतपूरवर चालून गेले व त्यांनी बुंदेलखंडातून बंगेशला हाकून लावले. छत्रसाल पुन्हा राजसिंहासनावर आरूढ झाला.बाजीरावाला छत्रसालाने मोठी जहागीर तर बहाल केलीच व सोबत आपली कन्या मस्तानीही त्याला अर्पण केली. १७३१ पूर्वी मरणापूर्वी आपल्या राज्याचा फार मोठा हिस्सा छत्रसालाने मराठ्यांच्या दौलतीत सामील करून दिला.
ह्या मोहिमेची विशेषता ही की, मस्तानीच्या आगमनाने पेशवाई पार ढवळून निघाली.
गुजराथ मोहीम
मध्यभारतात मराठ्यांची सत्ता स्थरपद होताच बाजीरावाने आपले लक्ष संपंन्न गुजराथकडे वळविले. बाजीरावच्या योजनेनुसार १७३० मध्ये चिमाजी मोठ्या फौजेसह सरबुलंद खानावर चाल करून गेला व सरदेशमुखीचे अधिकार मिळवून मोहीम फते करूनच परतला. सरबुलंदखानाऐवजी अभय सिंगाला त्याने गुजराथचा कारभार सोपवला. ही बाब छत्रपतींचे सरसेनापती त्र्यंबकराव दाभाडे यास रुचली नाही. दाभाड्यांच्या पूर्वजांनी गुजराथेत वेळोवेळी चाल करून कर वसुलीचे अधिकार मिळवले होते. बाजीरावाने आपल्या अमलाखालील दौलतीत दखल द्यावी, हे त्यास रुचले नाही. दाभाडे, गायकवाड व कदमबांडे यांनी बाजीरावाविरुद्ध वैर मांडले.
या अगोदर म्हणजे १७२८ मध्ये मराठ्यांना खूष करण्यासाठी मोगल बादशहाने जयसिंग दुसरा याला गिरधर बहाद्दूर याच्या जागी नेमले. गिरधर बहाद्दूराचा बाजीरावाने पराभव केला होता.पण जयसिंगाने मराठ्यांशी जुळवून घेण्याची शिफारस बादशहाकडे केली. बादशहाला हे मंजूर न झाल्याने जयसिंगाला पदावरून दूर करून महंमदखान बंगेश याच्याकडे सुत्रे सोपविली. बंगेश पाताळयंत्री होता. त्याने निजाम, दाभाडे, संभाजी (दुसरा) व कदमबांडे यांचेशी हातमिळवणी केली. पण बाजीरावाने या सर्वांना धूळ चारली. दाभाडे तर या दाभोईच्या लढाईत १ एप्रिल १७३१ ला मारलाच गेला. बाजीरावाने संभाजी बरोबर तह करून छत्रपती शाहू व संभाजी यांच्यात प्रदेशाची वाटणी करून देण्यासाठी वारणाचा तह केला. या लढाईनंतर निजामाने रोहे-रामेश्वर येथे भेट घेतली व मराठ्यांच्या मोहिमेतदखल देणार नाही, असे आश्वासन दिले.
त्र्यंबकराव दाभाडे यांच्या मृत्यूनंतर बाजीरावाने वैर विसरून दाभाडे कुटुंबाशी जुळवून घेतले आणि दाभाड्यांचा मुलगा यशवंतराव यास छत्रपती शाहूंच्या दरबारात सेनापती म्हणून नेमणूक करून दिली. गुजराथमधून चौथाई वसूल करण्याचे दाभाड्यांचे पूर्वापार अधिकारही अबाधित ठेवलेपण त्याच बरोबर वसुलीतील अर्धी रकम छत्रपतींच्या खजिन्यात जमा करण्याची अट घालण्यास मात्र बाजीराव विसरला नाही.
जंजिऱ्याचा सिद्दी - महाराष्ट्राच्या पश्चिम किनारा पट्टीवरचा लहानसा भूभागच सिद्दीच्या अमलाखाली असला तरी त्याला सामरिक दृष्ट्या खूप महत्व होते. मुळात जंजिऱ्याचा किल्लाच त्याच्या ताब्यात होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला हातपाय पसरू दिले नव्हते. पण नंतर त्याने मध्य व उत्तर कोकणावर चांगलाचजमबसविला होता.याकूत खान यासिद्दीचा मृत्यू १७३३ मध्ये झाला आणि त्याच्या वंशजात वारसा हक्काचे कलह सुरू झाले.त्याच्या एका मुलाने - अब्दुल रेहमानने - बाजीरावाला मदत मागितली. म्हणून कान्होजी आंग्र्याचा मुलगा सेखोजी आंग्रे याला बाजीरावाने त्याच्या मदतीस धाडले. मराठ्यांनी कोकणाच्या बहुतेक भागावर कबजा मिळवला व जंजिऱ्याला वेढा घातला. पण पेशव्यांचे प्रतिस्पर्धी पंत प्रतिनिधी यांनी १७३३ मध्ये रायगड किल्ला घेतला व रायगड किल्ल्यावर ताबा मिळवला आणि मराठ्यांची शक्ती विभागली गेली. तेवढ्यात सेखोजी आंग्रे मरण पावला व मराठे आणखीनच कमजोर झाले.म्हणून बाजीरावाने सिद्दीशी तह केला व जंजिऱ्याचा ताबा सिद्द्यांकडेच रहावा याला संमती दिली. पण बाजीरावाकडे मदत मागणाऱ्या अब्दुल रेहमान याच्या हातीच सत्ता असावी, अशी अट घातली. तसेचअंजनवेल, गोवलकोट व उंदेरी हा भूभाग सुद्धा सिद्दीच्याच ताब्यात रहावा, असेही ठरले. मराठ्यांनी आपल्याकडे रायगड, रेवास, थाल व चोलहे जिंकून मिळवलेले प्रदेश कायम रहावेत, असा करार झाला.
पण पेशव्यांची पाठ फिरताच सिद्दीने आपला गमावलेला भूभाग परत मिळविण्याचा खटाटोप आरंभला. उत्तरादाखल चिमाजी अप्पाने रेवासवर अचानक हल्ला करून १५०० सैनिकांना ठार केले यात सिद्दी सत या म्होरक्यालाही आपले प्राण गमवावे लागले. सिद्दीने आपल्या मूळ प्रदेशात माघार घेतली व तह करून जंजिरा,गोवलकोट आणि अंजलवेल येथेच ते परत गेले.
दिल्लाला कूच
माळवाहून बंगशला मोगल बादशहाने परत बोलावले. कारण दाभाडे मारले गेल्यामुळे त्यांच्या सोबतच्या कराराला अर्थच उरला नव्हता. बादशहाने माळव्याची जबाबदारी जयसिंगाकडे (दुसरा) पुन्हा सोपविली. पण १७३३ मध्ये होळकरांनी मंदसोरच्या लढाईत पराभूत केले. मोगलांनी मराठ्यांशी तह केला. जयसिंगाने बादशहाची खात्री पटवून बाजीरावालाच प्रमुख नेमण्याची सूचना केली. बादशहाने जयसिंगाची सूचना मान्य करून बाजीरावाचीच नेमणूक केली. कमजोर झालेल्या बादशाहीला मात देण्यासाठी बाजीरावाने हा प्रस्ताव मान्य करावा, असे जयसिंगाने बाजीरावास गुप्त खलबते करून पटवून दिले.
१२ नोव्हेंबर १७३६ ला बाजीरावने शनिवार वाड्याच्या दिल्ली दरवाजातून दिल्लीकडे कूच केले.याची वार्ता बादशहाला लागताच त्याने सादत अली खानला आग्र्याहून बाजीरावला रोखण्यासाठी पाठविले. मल्हारराव होळकर व पिलाजी जाधव यांनी यमुना नदी ओलांडून गंगा व यमुना नदीच्या दुआबातील भागात लुटालूट करायला प्रारंभ केला.सादत खानाने आपल्या दीड लाख फौजेच्या बळावर या दोघांचा पराभव केला व मराठे आता पुन्हा पुढे येणार नाहीत, अशा कल्पनेने सादत खान परत मथुरेकडे फिरला. पण बाजीराव तसाच पुढे गेला व तालकटोऱ्यात त्याने तळ ठोकला. मीर हसन खान कोका वर बादशहाने बाजीरावला रोखण्याची कामगिरी सोपविली.२८ मार्च १७३७ रोजी बाजीरावाने त्याचा पराभव केला व दिल्लीहून परत फिरला. मथुरेत दीड लाख फौज आहे, हे त्याला माहीत होते.
बादशहाने निजामाशी संधान साधले व निजाम दक्षिणेतून पुढे आला व त्याने परत फिरलेल्या बाजीरावाला सिरोंज येथे गाठले. पण आपण दिल्लीला जात असून बादशहाशी बिघडलेले संबंध सुधारण्याचा प्रयत्न करायचा आहे, सुलह करायची आहे. पण दिल्लीला जाताच सोबत मोठी मोगल फौज बरोबर घेऊन बाजीरावावर चालून आला. बाजीरावानेही ८० हजर फौज घेऊन लढायला सज्ज झाला. १० हजार फौज चिमाजी जवळ दक्षिणेचे रक्षण करण्यासाठी ठेवली. दोन्ही फौजांची गाठ भोपाळला पडली. २४ डिसेंबर १९३७ ला मोगलांचा पराभव झाला. ७ जानेवारीला तह होऊन माळवा मराठ्यांकडे आला.५० लाख रुपये हमीदाखल मिळाले. कुराणावर हात ठेवून निजामाने तह पाळण्याची शपथ घेतली.
पोर्तुगीजांचे पारिपत्य
पोर्तुगीजांनी पश्चिम किनाऱ्यावरचा बराच मोठा भूप्रदेश व्यापला होता. ते हिंदूंचा छळही करीत असत. १७३७ मध्ये बाजीरावाने चिमाजीला पोर्तुगीजांचा बंदोबस्त करण्यास पाठविले. चिमाजीने वसईच्या लढाईत घोडबंदर किल्ला व वसईचा बहुतेक भाग जिंकला. १६ मे १७३९मध्ये वेढा घालून सालसेतवरही ताबा मिळवला. पण तेवढ्यात नादीरशहाने मोगलांवर आक्रमण केले. त्यामुळे पेशव्यांच्या फौजा मागे फिरल्या.
व्यक्तिगत जीवन - बाजीरावची पहिली पत्नी काशीबाई ही चासकर जोशी घराण्यातली कन्या होती. बाजीरावास तीन मुले झाली यांच्यापैकी नानासाहेबास 1740 मध्ये पेशवा म्हणून नियुक्त करण्यात आले. दुसरा रघुनाथ, तिसरा जनार्दन हा अल्पायुषी ठरला. १७४० साली नानासाहेब यांना पेशवाईची वस्त्रे देण्यात आली. तो बाळाजी बाजीराव म्हणून ओळखला जायचा. चिमाजीचे लग्न विश्वनाथ पेठे यांची कन्या रखुमाबाईशी झाले होते. पण तिला फार कमी आयुष्य लाभले.
छत्रसालाची मुलगी मस्तानी ही बाजीरावाची दुसरी बायको. त्यांचे एकमेकांवर निरतिशय प्रेम होते.मस्तानीसाठी बाजीरावाने खास मस्तानी महाल बांधला होता. राजा दिनकर केळकर म्युझियममध्ये त्याची प्रतिकृती पहायला मिळते. यात मूळ महालातल्याही काही वस्तू आहेत. त्यावेळच्या सनातनी ब्राह्मणांना हा विवाह मान्य नव्हता. कारण मस्तानीची आई मुसलमान होती. यामुळे भट कुटुंबात प्रचंड वादंग माजले. चिमाजी व बाजीरावची आई राधाबाई या दोघांनी तर मस्तानीली कधीच स्वीकारले नाही. तिला जिवे मारण्याचेही प्रयत्न झाले, अशा वदंता होत्या.
मस्तानीला बाजीरावाने सहधर्मचारिणीचा दर्जा देऊ केला होता. त्या काळातले हेही धारिष्ट्यच होते.यामुळे अनेक वादळे निर्माण झाली. स्वकीय व धार्मिक मंडळी यांनी बाजीरावाला अतिशय त्रास दिला. बाजीराव काळजाचा हळवा होता, हा ’राऊ’ घरच्या भेदामुळे खचला. मस्तानीला नजरकैद केल्याची बातमी त्याचे हृदय विदीर्ण करून गेली. मांसभक्षण, मदिराप्राशन आणि यवनीला शनिवारवाड्यावर आणून ठेवल्यामुळे ब्राह्मण मंडळींनी त्याकाळी बाजीरावाला खूप दूषणे दिली.
१७३४ मध्ये मस्तानीपोटी कृष्णरावचा जन्म झाला. त्याला ब्राह्मण मानले जावे, अशी बाजीरावाची इच्छा होती. पण ब्राह्मणांनी त्यास नकार दिला. हा मुलगा समशेर बहद्दर म्हणूनच वाढला. काशीबाईने मात्र त्याची काळजी घेतली व आपल्या मुलाप्रमाणेच वाढविले. त्याला बांदा व काल्पीचा भाग तोडून दिला. तिसऱ्या पानिपत युद्धात तो वयाच्या २७ व्या वर्षी १७६१ मध्ये मराठ्यांच्या बाजूने लढतालढता मारला गेला. त्याचा पुत्र अलि बहाद्दर याने बांदा संस्थान स्थापन केले.
चोख गुप्तचर व्यवस्था, व्यापक दृष्टिकोन, अपूर्व मुत्सद्देगिरी आणि दरारा
याच्या जोडीला त्याची गुप्तचर व्यवस्थाही चोख होती. ती त्याला क्षणाक्षणाची माहिती देत असे. त्याचबरोबर नद्या, चढउतार, पर्वत, घाट याचीही माहिती देत असे.
बाजीरावाचा दृष्टिकोन व्यापक होता. म्हणूनच तो छत्रसालाच्या मदतीला धावून गेला. बाजीरावाच्या मुत्सद्दीपणालाही तोड नव्हती. अलाहाबादच्या सुभेदारावर त्याने आपल्या मातोश्री राधाबाई यांना काशीयात्रेस नेण्याची जबाबदारी सोपविली होती. खुद्द पेशव्यांची आई त्यांच्याशिवाय मोगलग्रस्त प्रदेशात जाऊन काशीयात्रा करून येते, या एकाच घटनेने प्रजेचे मनोबल त्याकाळी किती वाढले असेल, याची आज कल्पना करता येणार नाही. ही ’काशी यात्रा’ सुद्धा इतिहासात एक ’स्ट्रॅटेजिक मूव्ह’ म्हणून प्रसिदधी पावली आहे.
बाजीरावाची दहशत फार मोठी होती.1739 मध्ये नादिरशहाने दिल्लीवर आक्रमण केले तेव्हा बाजीरावाने दिल्लीकडे कूच केले. ही वार्ता कानी पडली आणि नादिरशहाने दिल्ली सोडली आणि तो परत गेला.
इतिहासकारांचा आवडता बाजीराव
डेनिस किंकेडचे ’हिस्ट्री ऑफ मराठा पीपल’ ह्या ग्रंथात तो बाजीरावाचा गौरव करताना म्हणतो, ’ब्रेव्हेस्ट ऑफ द ब्रेव्ह, फेअरेस्ट ऑफ द फेअर , बाजीराव डाईड लाईक द मोस्ट फॅसिनेटिंग फिगर इन द रोमान्स ऑफ लव्ह’
जागतिक दर्जाचे इतिहासकार बाजीरावाची तुलना नेपोलियनशी करतात. पण त्याला सुद्धा रशियाच्या लढाईत माघार घ्यावी लागली होती. बाजीरावाचे तसे नाही.
ग्रँट डफ म्हणतो, ’ ही हॅड बोथ द हेड टू प्लॅन अँड द हँड टू एक्झिक्यूट’
बाजीरावाचा जन्म 18 ऑगस्ट 1700 ला श्रीवर्धन येथे झाला आणि 28 एप्रिल 1740 रोजी मध्यप्रदेशातील पूर्वीच्या खरगोण जिल्ह्यामधल्या आणि आताच्या बडवाह जिल्ह्यातील रावरखेडी गावी त्याचा विषमज्वराने अंत झाला. येथे तो बारमाही वाहणारी नर्मदा नदी ओलांडून उत्तरेत कूच करण्यासाठी आला होता. कारण इथे त्याकाळी नर्मदा थोडी उथळ असे, हे बाजीरावला माहित होते.
मिर्झा महंमद आपल्या ’तारीखे मुहम्मदी’ मध्ये म्हणतो, ’ साहिबी फुतुहाते उज्जाम’
याचा मराठी ’तर्जुमा’ असा , ’ प्रचंड विजय मिळविणारा बाजीराव मृत्यूला बिलगला’
अशा या जगातल्या अजेय, अपराजित, महापराक्रमी, दूरदर्शी, शिपायांसोबत भाजलेले चणे किंवा शेतातल्या कणसांचा हुरडा खाऊन विद्युतवेगी हालचाली करणार्या, सतत अश्वारूढ असलेल्या योद्ध्याची समाधी आज बुडिताखाली गेली आहे. बाजीरावप्रेमी लोकांनी त्याची समाधी मूळ जागेहून हलवून थोड्या आणखी उंच ठिकाणी बांधण्याची योजना हाती घेतली आहे. निदान बाजीरावाला आपल्या हृदयसिंहासनावर मानाचं स्थान देणं हे तर नक्कीच आपल्या हाती आहे. निदान त्यात कसूर नसावी.