माकडाहाती कोलीत नको
तरूण भारत, नागपूर गुरुवार, दिनांक २१/०८/२०२५ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee? या ब्लॅागवरही उपलब्ध असतो.
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
माकडाहाती कोलित नको
काही कामे करण्यासाठी मानवी बुद्धीचा वापर होत असतो किंवा करावा लागतो. अकुशल कामे करण्यासाठी बुद्धीचा फारसा वापर करावा लागत नाही. एक सोपे उदाहरण घेऊन विचार करू. एखाद्या अकुशल कामगाराला दगड उचल म्हटले की तो दगड उचलील. दगड ठेव म्हटले की, अकुशल कामगार तो दगड ठेवून देईल. या निमित्ताने बुद्धीचा फारसा उपयोग होत नाही. पण कोणता दगड उचलायचा आणि तो कुठे आणि कसा ठेवायचा यासाठी बुद्धिमत्तेचा वापर करावा लागतो. अशी कुशलतेची कामे करण्याची क्षमता जर यंत्रात निर्माण झाली तर त्या शहाणपणाला कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंजेलिजन्स) असे म्हणतात. एखादी गोष्ट शिकणे, एखादा प्रश्न सोडविणे, एखादा निर्णय घेणे यासाठी मानवी बुद्धिमत्ता लागते. अनेक आकलनात्मक क्रिया (कॅाग्नेटिव्ह फंक्शन्स) जसे, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या सारख्या क्रिया संगणक पार पाडतो, हे आपल्याला माहीत आहे. यासाठी संगणकात अनेक प्रकारचे तंत्रज्ञान (टेक्नॅालॅाजी), तंत्रे /पद्धती (टेक्निक) वापरली जातात. अशी योजना केली की ते यंत्र मानवी बुद्धीप्रमाणे आकलनादी कामे पार पाडू शकते. या क्षमता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स होय. मानवी मेंदू हा एक एकसंध (मॅानोलिथिक ) अवयव आहे. तो अनेक बौद्धिक कामे पार पाडतो. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आता एक उदयोन्मुख तंत्रज्ञान राहिलेले नाही. यात कार्य करू शकेल असा एक विस्तृत संच असतो. काही सेकंदात मोठ्या प्रमाणात सामग्री तयार करण्यापासून ते प्रश्नांची उत्तरे देणे, डेटाचे विश्लेषण करणे, कार्ये स्वयंचलित करणे अशा अनेक गोष्टी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने साध्य करता येतात. मेंदूची ही क्षमता यंत्रात यावी यासाठी यासाठी काय करावे लागेल? अनेक तंत्रज्ञाने व तंत्रे एकमेकांबरोबर एकोप्याने काम करतील अशी योजना करावी लागेल. असे जर करता आले तर त्या यंत्रात मानवी बौद्धिक आचरण घडवून आणण्याची क्षमता येते.
संगणक अनेक बौद्धिक कामे पार पाडतो. पण त्यासाठी संगणकात एक विशिष्ट कार्यक्रम (प्रोग्राम) आखून दिलेला असतो. कृत्रिम बुद्धिमतेद्वारेही अशी कामे पार पाडता येतात. संगणक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यातील मुख्य फरक हा आहे की, कृत्रिम बुद्धिमत्तेत प्रोग्रामिंगची आवश्यकता आवश्यकता पडत नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे पार पाडली जाणारी बौद्धिक कामे अशी आहेत.
- 1) शिकणे - दिलेल्या माहितीतून (डेटा) शिकणे, आकार ओळखणे, त्यात सुधारणा करणे (यासाठी संगणकाप्रमाणे वेगळी आज्ञावली वापरावी लागत नाही),
- 2) तर्क करणे / विचार करणे - यात माहितीचे विश्लेषण करणे, निष्कर्ष काढणे, त्यात वेळोवेळी सुधारणा करणे अभिप्रेत असते.
- 3) समस्या सोडविणे - निरनिराळ्या मार्गांमधून सर्वोत्तम मार्ग शोधणे.
- 4) निर्णय घेणे- एखाद्या परिस्थितीत मानवापेक्षा अधिक वेगाने आणि अचूक निर्णय घेणे.
- 5) मानवाची भाषा समजून घेणे ( नॅचरल लॅंग्वेज प्रोसेसिंग - एनएलपी) : मानवाची भाषा समजून घेणे, अर्थ लावणे, नवीन भाषा निर्माण करणे.
- 6) संगणक दृष्टी (कॅाम्प्युटर व्हिजन): प्रतिमा ‘पाहून’ चेहरे ओळखणे किंवा आवाज ऐकून व्यक्ती ओळखणे
- कृत्रिम बुद्धिमत्तेचे तीन प्रकार असे आहेत.
- 1) संकुचित कृत्रिम बुद्धिमत्ता (नॅरो / वीक एआय) : ही विशिष्ट क्षेत्रातील ठरविक कामेच पार पाडते उदा. सिरी किंवा अलेक्सा प्रमाणे आभासी मदत (व्हर्च्युअल असिस्टंन्स), उपाय सुचविणे, लबाड्या / खोटेपणा / कपट ओळखणे (फ्रॅाड ओळखणे)
- 2) साधारण कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स) : मानवाप्रमाणे आकलन, तर्क, विचार करण्याची क्षमता आदी. यात सद्ध्या खूप वेगाने प्रगती होऊ लागली आहे.
- 3) अतिकुशाग्र कृत्रिम बुद्धिमत्ता (सुपर इंटेलिजंट आर्टिफिशियल इंटेलिजन्स): आजच्या मानवापेक्षा स्वत:ची जास्त स्वतंत्र जाणीव असलेली (सेल्फ-अवेअरनेस), स्वत:त स्वत:हून सुधारणा करण्याची क्षमता असलेली बुद्धिमत्ता (केपेबल ऑफ सेल्फ इंप्रुव्हमेंट) आजच्या अनेक वैज्ञानिक कथांमध्ये अशा संकल्पना वापरलेल्या असतात.
- कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे
- समस्यांची स्वयंचलित सोडवणूक, उत्पादनात वाढ, निर्णय अचूक घेण्यात साह्य, ग्राहकांचे अनुभव अधिक समृद्ध करण्यास मदत कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे होऊ शकेल.
- कृत्रिम बुद्धिमत्तेचे तोटे - कुशल मनुष्यबळाची आवश्यकता कमी होईल व बेकारी वाढेल, सायबर सिक्युरिटीविषयक समस्या वाढतील, पारदर्शितेमुळे नीतिविषयक समस्याही उद्भवू शकतील.
- कृत्रिम बुद्धिमत्ता हे आजवर मानवाला गवसलेल्या हत्यारांमधले एक सर्वात प्रभावी हत्यार ठरणार आहे. त्याचा योग्य तोच उपयोग करण्याची जबाबदारी मानवावर येऊन पडली आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर याचा परिणाम होत चालला आहे. याच्या दुरुपयोगाचे एक जागतिक पातळीवरचे उदाहरण व्हिडिओच्या स्वरुपात नुकतेच समोर आले आहे. यात एक पात्र आहे अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप तर दुसरे पात्र आहे, अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा. अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या मनात बराक ओबामा यांचे विषयी पराकोटीची अनादराची भावना असून ते या भावनेचे बेछुट प्रदर्शन प्रत्यक्ष जीवनात करीत आले आहेत. याउलट बराक ओबामा आपल्या शांत, संयमी, जबाबदार वागणुकीसाठी प्रसिद्ध आहेत. व्हिडिओमध्ये अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हसतांना दिसत असून त्यांच्या समोर बराक ओबामा बसलेले दाखविले आहेत. एवढ्यात कुठून तरी दोन अधिकारी येतांना दिसतात. ते कोट घालून असून कोटाच्या पाठीवरच्या भागावर ‘एफबीआय’ अशी अक्षरे आहेत. हे अधिकारी बराक ओबामा यांची मानगूट पकडून त्यांना घेऊन जातात. लगेच एक तुरुंग दिसतो. यातील एका खोलीत बराक ओबामा दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावर असहाय्यतेचे भाव आहेत. हा व्हिडिओ व्यंगचित्राच्या जातकुळीचा नाही. तो अगदी प्रत्यक्ष घटनेचे चित्रण आहे, असे वाटते. विशेष असे की, हा व्हिडिओ खुद्द डोनाल्ड ट्रंप यांनीच ‘ट्रूथ स्पेशल’ या नावाच्या प्रसारमाध्यमावर प्रसारित केला होता. सोबत एक शीर्षक होते, ‘कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही’. हे सर्व तपशील पाहता बराक ओबामा यांना खरोखरच अटक झाली की काय असा समज होऊ शकत होता. कारण ‘मी ओबामा यांना तुरुंगात टाकीन’, अशा वल्गना डोनाल्ड ट्रंप यांनी प्रत्यक्ष जीवनात अनेकदा केल्या आहेत. हे उदाहरण हा मुद्दा स्पष्ट करते की, उद्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून समाजकंटक कोणतेही दृष्य प्रसारित करू शकतील. हुबेहूबपणामुळे जनसामान्यांचा त्याच्यावर विश्वास बसेल. यातून अनर्थ उद्भवेल. हा व्हिडिओ खरा नाही, तो ऐआयच्या सहाय्याने बेतलेला आहे. हा खुलासा लगेचच समोर आला आणि सर्व शंका फिटल्या, हा भाग वेगळा.
- थोडक्यात काय तर एआय हे दुधारी व धोकादायक हत्यार आहे. अशक्यप्राय बाबी एआयने शक्यकोटीत आणल्या आहेत. हे मानवाचे साधन आहे, असे म्हणा किंवा याला मानवाचा साथीदार म्हणा किंवा आणखी काही म्हणा पण याचे भस्मासुरात परिवर्तन होऊ नये, असेच कोणीही म्हणेल. याबाबतची भीती विविध पातळींवर व्यक्तही होते आहे. त्यावर उपाय शोधण्याचा आटापिटाही सुरू आहे. पण एआयचा आवाका गगनालाही पुरून उरेल असा आहे. एआयला गवसणी घालण्याचा एकच हमखास मार्ग आहे. कोणता आहे तो मार्ग? तो मार्ग आहे विवेकाचा, संयमाचा आणि सुसंस्कृतपणाचा. विवेकाचा पोत जुळतो सकारात्मकतेशी. नकारात्मकता मानवाला घेऊन जाते असत्याकडे, अश्लीलतेकडे, क्रौर्याकडे. नकारात्मकता फक्त विषण्णतेकडे आणि आत्मघाताकडेच नेणार. एआय हे दुधारी व धोकादायक हत्यार आहे. पण एआयचा आवाका गगनालाही पुरून उरेल असा आहे. महापुरुष असतात, दीपस्तंभासारखे. ते सतत मार्गदर्शन करीत असतात. पण आज ज्यांनी मार्ग दाखवायचा तेच पथभ्रष्ट होऊन ‘अदंड्योसी’, ‘अदंड्योसी’ म्हणू लागले आहेत आणि धर्माला ग्लानी आली आहे. प्राचीन गुरुकुल पद्धतीत, गुरू हे मार्गदर्शक, पालक आणि नैतिक आदर्श असायचे. आज आपण ’आयबॉट्सनाच आपला गुरू मानू लागलो आहोत. ‘आयबॅाट्स’ हे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॅाट्स’, या नावानेही संबोधले जातात. हे काय प्रकरण आहे? ह्या आहेत संगणकीय प्रणाली किंवा कॅाम्प्युटर प्रोग्राम. पण कॅाम्प्युटर प्रोग्राम म्हणजे तरी काय? ही आहे सूचनांची जंत्री. कॅाम्प्युटरने काय करावे, हे यात नमूद केलेले असते. क्रोम, फायर फॅाक्स, मायक्रोसॅाफ्ट वर्ड, विंडोज हे कॅाम्प्युटर प्रोग्राम्स आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील अशा प्रोग्राम्सना वेगळी नावे आहेत. त्यांना ‘आयबॅाट्स’ किंवा ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॅाट्स’ असे म्हणतात. चॅट जीपीटी, गुगल जेमिनी, मेटाएलए-एमए या सर्व प्रणाल्या एकाच जातकुळीच्या आहेत. त्यापैकी कुणीही सजीवांची बरोबरी करू शकत नाहीत. आपल्याला बाटलीतल्या (दिव्यातल्या) राक्षसाची गोष्ट माहीत आहे. यांना म्हणायचेच असेल तर राक्षस म्हणता येईल. साहित्य, संगीत, शास्त्र अशांशी संबंधित आयबॅाट्स असतात. त्या त्या बाटलीतल्या राक्षसाप्रमाणे आपण यांच्याकडून त्या त्या विषयाशी संबंधित कामे करून घेऊ शकतो, चांगली किंवा वाईट. मात्र त्यासाठी कोड किंवा संकेत टाकावा लागतो. बस्स. मानवाची भूमिका एवढीच असते. पण आज हे राक्षस गुरूची जागा घेऊ पाहत आहेत की काय, वाटू लागले आहे. पण गुरु वेगळा असतो. तो असतो मार्गदर्शक. गुरु असतो पालक. गुरु असतो नैतिकतेचा आदर्श! पण राक्षसाला चांगल्या वाईटाची जाण नसते. तो असतो सांगकाम्याा! हा फरक लक्षात ठेवला आणि त्याच्याकडून चांगलीच कामे करून घेतली तर मानवतेच्या कल्याणाचा मार्ग शोधता येईल आणि ते सर्वस्वी आपल्या हाती आहे. पण हे हत्यार माकडाच्या हाती जायला नको. आज घडीला कृत्रिम बुद्धिमत्ताक्षेत्रात अमेरिका पहिल्या क्रमांकावर नंतर (क्रमाने नाही), चीन, ब्रिटन, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स, जपान, इस्रायल…. हे देश येतात. हे आघाडीचे शिलेदार भविष्यात कितपत जबाबदारीने आणि शहाणपणाने वागतात, यावरच सर्वकाही अवलंबून आहे.
No comments:
Post a Comment