Tuesday, April 19, 2016

   अमेरिकेतील अध्यक्षपदाची निवडणूक -पूर्वरंग
वसंत गणेश काणे,
 बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२  
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
 E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
  अमेरिकेत अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेची अनेक वैशिष्ट्ये आहेत. पहिले वैशिष्ट्य असे की, अध्यक्षाची निवड दर चार वर्षांनी होते. दुसरे असे की, निवडणूक मंगळवारीच होते. हा मंगळवारही वैशिष्ट्यपूर्ण आहे. तो नोव्हेंबर महिन्यातील ‘पहिल्या सोमवारनंतरचा मंगळवार’ असावा लागतो. प्रत्येक राष्ट्राला या ना त्या नावाने राष्ट्रप्रमुख असतोच. त्याच्या हाती सत्ताही असतेच. पण अमेरिकेचा राष्ट्राध्यक्षाच्या हाती सर्वात जास्त सत्ता एकवटलेलीआहे. म्हणजे तिसरे असे की,  तो जगातील सर्वात बलशाली सेनेचा सरसेनापतीही असतो.
  अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदासाठीच्या अटी
   अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदासाठीच्या अटी अशा आहेत.
   ती व्यक्ती ‘अमेरिकेची नॅचरल बाॅर्न सिटिझन’असली पाहिजे. म्हणजे नक्की काय?
टेड क्रुझ यांचा पत्ता कट करण्यासाठीचा उपद्व्याप डोनाल्ड ट्रंप यांच्या समर्थकांनीच केला, असे बोलले जाते. हा प्रश्न रिपब्लिकन पक्षातील अध्यक्षपदाचे दावेदार टेड क्रुझ यांच्या पात्रतेसंबंधीच्या आक्षेपावरील निवाड्याच्या निमित्ताने न्यू जर्सी न्यायालयाने नुकताच निकाली काढला आहे. टेड क्रुझ हे जरी अमेरिकान नागरीक असलेल्या दांपत्त्याचे अपत्य असले तरी त्यांचा जन्म कॅनडात झाला आहे. कारण त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांचे आईवडील कॅनडात राहत होते. अमेरिका, कॅनडा किंवा कॅनाल झोन (पनामा कालव्याच्या दोन्ही बाजूला पनामा रिपब्लिक हे स्वतंत्र राष्ट्र असले तरी १९०३ ते १९७९ पर्यंत या कालव्यावर अमेरिकेची सत्ता होती. हा भाग कॅनाल झोन म्हणून ओळखला जातो) म्हणून जो भाग ओळखला जातो त्या भागात जन्मलेले अमेरिकन नागरीक असलेल्या दांपत्याचे अपत्य अध्यक्षपदाची निवडणूक लढण्यास पात्र आहे असा हा निर्वाळा आहे. रिपब्लिकन पक्षात अध्यक्षपदाचे दावेदार असलेले डोनाल्ड ट्रंप यांना मात देऊ शकतील अशी शक्यता फक्त टेड क्रुझ यांच्या बाबतीतच आहे. तिसरे दावेदार  जाॅन कसिच हे असून ते पक्षांतर्गत शर्यतीत खूपच माघारले आहेत. ते बहुदा टेड क्रुझ यांच्यासाठी माघार घेतील, असे दिसते. ट्रंप यांना अध्यक्षपदासाठीची उमेदवारी मिळू नये, म्हणून देव पाण्यात ठेवून बसलेल्यांसाठी ही फार मोठी दिलासा देणारी बातमी आहे, हे जसे खरे आहे तशीच ही ट्रंप यांच्या पाठीराख्यांसाठीची सणसणीत चपराक मानली जाते. कारण टेड क्रुझ अपात्र ठरले असते तर ट्रंप यांना रिपब्लिकन पक्षात दावेदारच राहिला नसता. टेड अपात्र ठरले तर काय करायचे? हा प्रश्न निर्माण होण्याचे कारण असे की, अमेरिकेत ‘पक्षश्रेष्ठी’ अध्यक्षपदाचा उमेदवार ठरवत नाहीत तर पक्षसदस्य व पक्ष समर्थक म्हणून नोंदणी करणारे नागरिक यांच्या मतदानातून पक्षाचा उमेदवार ठरतो. या शर्यतीत बेतालपणा, बेच्छुटपणा व  असमंजसपणा यासाठीच प्रसिद्ध असलेले व प्रतिस्पर्ध्यावर कमरेखाली वार करण्यासही मागेपुढे न पाहणारे धच्चोट डोनाल्ड ट्रंप यांनी दोन्ही पक्ष, अमेरिकन नागरिक आणि समंजस जगातील जनतेच्या तोंडचे पाणी पळविले आहे.
  निवडणूक सामान्य व्यक्तीच्या आटोक्यातली नाही.
अमेरिकेच्या अध्यक्षाचे वय निदान ३५ वर्षे पूर्ण असले पाहिजे. तसेच त्याचे अमेरिकेत १४ वर्षे वास्तव्य असले पाहिजे. या अटी वरवर दिसायला अगदी साध्या वाटत असल्या तरी आजवर एकही सामान्य व्यक्ती अमेरिकेची अध्यक्ष होऊ शकलेली नाही. पंचतारांकित सेनापती, सिनेट मेम्बर, कोणत्या ना कोणत्या प्रांताचा गव्हर्नर हेच आजवर उमेदवारीसाठी प्रयत्न करतांना आढळून आले आहेत. शेवटी प्रसार माध्यमांचे लक्षही तो आपल्याकडे वेधून घेऊ शकला पाहिजे.
एक अफलातून तरतूद.
एक खास तरतूदही आहे. समजा तुम्ही मतदार आहात आणि मतपत्रिकेवरील अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची एकही जोडी तुम्हाला पसंत नसेल तर अमेरिकन राज्यघटना तुम्हाला आपल्या पसंतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची जोडी आपल्या स्वत:च्या हस्ताक्षरात त्या मतपत्रिकेवर नोंदविण्याचा अधिकार देते. अर्थात अशी जोडी अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून निवडून येण्याची शक्यता मुळीच नसते हा भाग अलाहिदा.
कोणतीही जोडगोळी निवडा.
मतदान अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या जोडीला करावे लागते. एका पक्षाचा अध्यक्षीय उमेदवार व दुसऱ्या पक्षाचा उपाध्यक्षीय उमेदवार अशी निवड करता येत नाही. यथावकाश डेमोक्रॅट व रिपब्लिकन पक्ष अध्यक्षपदाचा उमेदवार निवडतील. आपल्यासोबत उपाध्यक्षपदाचा उमेदवार कोण असावा हे ठरविण्याचा पूर्ण अधिकार मात्र या उमेदवाराला असतो. अर्थात प्रत्यक्ष व्यवहारात हे असेच होते असे नाही. अध्यक्ष उत्तरेकडचा असेल तर उपाध्यक्ष दक्षिणेकडचा असलेला बरा. मते मिळविण्याचे दृष्टीने हे सोयीचे असते. एक पुरूष असेल तर दुसरी महिला असावी यासारखे व्यावहारिक फंडे अध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या गळी उतरवण्यात पक्षश्रेष्ठी बहुदा यशस्वी होतात. २०१२ मध्ये डेमोक्रॅट पक्षाची जोडी होती बराक ओबामा व ज्यो बिडन व रिपब्लिकन पक्षाची जोडी होती मीट राॅमनी व पाॅल रायन.
अमेरिकेत पक्ष किती?
  अमेरिकेत डेमोक्रॅट व रिपब्लिकन असे दोनच प्रमुख पक्ष असले तरी इतरही चिल्लर पक्ष आहेत. गेल्या निवडणुकीत डेमोक्रॅट पक्षाला ५१.१९ टक्के तर रिपब्लिकन पक्षाला ४७.३२ टक्के मते मिळाल्याची नोंद आहे. ह्या दोन्ही पक्षांनी मिळविलेली एकूण मते ९८.५१ होतात. उरलेली १.४९ टक्के मते लिबर्टेरियन पार्टी (०.९९ टक्के), ग्रीन पार्टी(०.३६ टक्के), काॅनस्टिट्यूशन पार्टी (०.१० टक्के), जस्टिस पार्टी (०.०३ टक्के), सोशॅलिझम व लिबरेशन पार्टी (०.०६ टक्के) याप्रमाणात विखुरली गेली होती. यापैकी काही पक्षांच्या उमेदवारांना त्यांच्या त्यांच्या राज्यात एकही मत मिळाले नव्हते. पण असे पक्ष दरवेळी रिंगणात असतात. याशिवाय उमेदवार स्वत: आपल्या पसंतीच्या जोडीचे नाव मतपत्रिकेवर नोंदवू शकतो. हा उदार मानसिकतेचा कळस की गमतीचा विषय हे ज्याने त्याने ठरवावे.
प्रचारातील कवित्त्व - आम्ही अमूक एक बाब साध्य केली असे ओबामांनी म्हणताच, ‘ अहो, हे आम्हीच पूर्ण करीत आणले होते. तुम्ही फक्त नारळ फोडला आहे’, असे म्हणून रिपब्लिकन पक्षाने उत्तर द्यावे; ‘ अहो, या अध्यक्षाने जेवढ्या नोकऱ्या दिल्याना, त्यापेक्षा जास्त खड्डे माझ्या कुत्र्यांनी खणले आहेत.(कुत्री सतत जमीन उकरात असतात), असे म्हणत, दुसऱ्यांदा अध्यक्षपदासाठी प्रयत्न करणाऱ्या ओबामांची पहिली कारकीर्द, बेकारी दूर करण्याचे बाबतीत कशी विफल ठरली, हे पटविण्याचा प्रयत्न रिपब्लिकन करीत. राॅम्नी हे आपली जुनी वक्तव्ये विसरून विधाने करू लागले की ओबामा म्हणत रिपब्लिकनांना राॅम्नेशिया( ॲम्नेशियाचे - विस्मृतीचे - राॅम्नींसाठी ओबामांनी केलेले खास रुपांतर) झाला आहे. हे ऐकले की असे म्हणावेसे वाटते की, घरोघरीच नव्हे तर देशोदेशी सुद्धा मातीच्याच चुली.

No comments:

Post a Comment