Friday, April 8, 2016

शिक्षणक्षेत्रात एका नवीन युगाचा प्रारंभ
वसंत गणेश काणे,  
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
 (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
     सध्या आपल्या देशात जे शिक्षण दिले जात आहे, त्याबाबत शासन, पालक, शिक्षक व समाज हे सर्वच घटक असमाधानी आहेत. तसा विचार केला तर हे असमाधान आजच आहे, असे नाही. फार ताणायचे नाही, असे ठरवले तरी शंभर वर्षांपूर्वी सुद्धा हीच परिस्थिती होती, असेही सांगता येईल. याचा अर्थ असा होतो की, इतकी वर्षे प्रयत्न करूनही आपल्या देशातील शिक्षण प्रक्रियेत आपण फारसा बदल करू शकलो नाही. त्यातही बदलत्या परिस्थितीत शिक्षणाबाबतच्या अपेक्षा वाढतच गेल्या पण शिक्षण प्रक्रियेत मात्र पुरेसे बदल होऊ शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.
अशा परिस्थितीत केंद्रस्तरावर शिक्षणाबात गुणवत्ता वाढीसाठी जो विचार होतो आहे, तो नवीन युगाचा प्रारंभ ठरू शकेल काय, हा प्रश्न अप्रस्तुत ठरू नये. हा प्रश्न समजून घेण्यासाठी सध्या समोर ठेवलेले उद्दिष्ट नेमके काय आहे, हे पाहणे आवश्यक ठरेल. केंद्रस्तराबरोबरच शाळेच्या स्तरावरही प्रयोग केले जात असून प्रत्याभरणाचा (फीड बॅक) विचार करता याबाबतची स्थिती समाधानकारक आहे. एका टोकाला केंद्र शासन आणि दुसऱ्या टोकाला गावपातळीवरची शाळा हा संबंध जसा पुष्कळसा नवीन आहे, तसाच तो बराचसा आश्वासकही आहे.
थोडा मागोवा
    शिक्षणाची उद्दिष्टे राज्यघटनेशी सुसंगत असावीत हा विचार काही नवीन म्हणता यायचा नाही पण त्या उद्दिष्टांची स्थूल स्वरुपाची यादी तयार होणे, हा पहिला व महत्त्वाचा टप्पा ठरतो. सर्व प्रकारचे स्वातंत्र्य (स्वैराचार नव्हे), सहिष्णुता( लांगुलचालन नव्हे), लवचिकता ( शरणता तसेच ताठरपणाही नव्हे), सर्जनशीलता ( घोकंपट्टी किंवा पोपटपंची नव्हे), लोकशाही प्रक्रियेवर विश्वास ( अतिरेक तसेच दहशत नव्हे), सर्व प्रकारच्या युगानुकूल बदलासाठी परिश्रम करण्याची मानसिकता ( कर्मकांड, जाचक रुढी/परंपरांना चिकटून राहणे नव्हे) ही उद्दिष्टे राज्यघटनेत नमूद केलेल्या उद्दिष्टांशी मिळतीजुळती आहेत.
 शिक्षणाचे माध्यम
   बालकांचा मोफत व सक्‍तीच्‍या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 हा या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी टाकलेले सर्वात महत्त्वाचे पाऊल ठरावे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर साठ वर्षानंतर आपल्याला हे सुचावे ही फार मोठी उणीव असली तरी ‘देर आये, लेकीन दुरुस्त आये’, या न्यायाने आपल्याला समाधानच वाटले पाहिजे. या कायद्यातील सर्व कलमे नमूद करणे शक्य नाही, तसेच ते आवश्यकही नाही. पण या कायद्यातील २९ व्या कलमातील दिशादर्शक सूचनेने माध्यमाचा प्रश्न निदान कागदोपत्री तरी काहीसा निकालात निघाला हेही नसे थोडके. शिक्षणाचे माध्यम शक्यतो (शक्यतोच बरं का) मातृभाषा असावे, असे ही सूचना सांगते. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर शिक्षणाचे माध्यम मातृभाषा(मराठी) असावे, असा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. पण दुसरी अडचण पालकांच्या मानसिकतेची आहे. इंग्रजी माध्यम घेतले नाही तर आपला पाल्य या स्पर्धेच्या युगात मागे पडेल असा समज पालकांचा झालेला आहे. खरे तर मातृभाषेतून शिकणे विद्यार्थ्यांसाठी व मातृभाषेतून शिकवणे हे बहुसंख्य शिक्षकांसाठीही सोपे, सहज व सरल असते. याचा परिणाम असा होतो की, मुलांना न धड शिकवलेला विषय समजतो, न इंग्रजी माध्यमातून उत्तर कसे लिहावे/द्यावे, ते समजते. त्यातून आपला शिक्षकही अध्यापनाचा विषय व अध्यापन शैली या दोन्ही बाबतीत उणा व खुजा आहे. ही अडचण शिक्षकांसाठी शिक्षण व प्रशिक्षणविषयक सघन कार्यक्रम आयोजित करून दूर करावी लागेल.
पाठ्यपुस्तकांची मक्तेदारी संपणार.
शिक्षणाचे सुकाणू सध्या पाठ्यपुस्तकाच्या लोढण्यात अडकल्यामुळे सर्व पाठ्यपुस्तके ‘होली बायबल’च्या पदवीला पोचली आहेत. जे काही आहे ते पाठ्यपुस्तकात, पाठ्यपुस्तकाबाहेर असे काहीही नाही/नसते, हा समज एवढा दृढमूल झाला आहे की, एम बी बी एस च्या परीक्षेत ‘अल्कोहोलिक ॲनाहोलिक्स’ वर विचारलेला प्रश्न पाठ्यपुस्तकात व अभ्यासक्रमात समाविष्ट नव्हता म्हणून भावी डाॅक्टर आंदोलन करतात आणि या अन्यायाचे परिमार्जन करण्यासाठी आपले विद्यापीठ सर्व विद्यार्थ्यांना त्यासाठीच्या गुणांची खिरापत सरसकट वाटते, हा जागतिक विक्रम ठरावा. संबंधित परीक्षकाला काळ्या यादीत टाकून सर्व परीक्षकांसाठीच अद्दल घडवणारी शिक्षा (एक्झंप्लरी पनिशमेंट) देते. तरीही ‘या पापाचे पुरते क्षालन झाले काय’, हा प्रश्न प्रसार माध्यमांमध्ये रवंथाचा विषय झाला होता. ही पाठ्यपुस्तकशरणता मुळात सुरू झाली ती प्राथमिक स्तरावर. पुढे ती पायरी पायरीने चढत व दृढ होतहोत विद्यापीठ स्तरावर ठिय्या देऊन बसली.  गणिताच्या पाठ्यपुस्तकात एका गणिताचे उत्तर चुकीचे दिले होते. कर्मधर्मसंयोग असा की हेच गणित शालांत परीक्षेत विचारले गेले. काहींनी पुस्तकातल्याप्रमाणे चुकीचे उत्तर दिले तर काहींनी पुस्तकातल्या उत्तराप्रमाणे चुकीचे उत्तर न देता बुद्धीचा वापर करून योग्य तेच उत्तर दिले. वाद नको म्हणून आपण दोघांनाही पूर्ण गुण दिले. हे चुकीचे उत्तर त्या पुस्तकात कायम राहिले. पुढे पाठ्यपुस्तकच बदलल्यामुळे हा मुद्दा बाद झाला. ही मानसिकता बदलायची असेल तर प्रारंभ प्राथमिक स्तरापासूनच करावी लागेल. असा प्रारंभ होऊ घातला आहे. आता प्रत्येक अध्ययनघटकाचा शोध क्रमिक पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाऊन घ्यायचा आहे. ही बाब केंद्र शासनाच्या या विषयीच्या मसुद्यात नमूद करून एका योग्य दिशेने पहिले पाऊल आपण टाकतो आहोत, ही एक समाधानाची बाब आहे.
  एखादी बाब धोरणात आणली, कायद्यात टाकली व आग्रहाने प्रतिपादन केली तरी तेवढ्याने भागत नाही. ती समाजाने स्वीकारणे आवश्यक असते. यासाठी सर्व संबंधितांच्या प्रबोधनाची मोहीम हाती घ्यावी लागेल. मुख्य म्हणजे शिक्षक प्रशिक्षणाचे सघन व सततचे प्रयत्न करावे लागतील.
रचनावादी शिक्षणाची नवीन दिशा
रचनावाद म्हणजे पूर्वानुभवावर आधारित शिक्षणाची नैसर्गिक पद्धत. हे शिक्षण अनुभवजन्य असते. ते अनेकदा शिक्षकाशिवायही मिळू शकते. कृतीयुक्त अनुभवातून छोटी आव्हाने विचारांना चालना देतील. असे अनुभव आयोजित करणे रचनावादात अपेक्षित आहे. रचनावाद समजावून सांगणे हा या लेखाचा उद्देश नाही. असा एखादा छोटेखानी लेख या विषयाची फारतर जेमतेम तोंडओळख करून देऊ शकेल. रचनावादाचा आधार घेऊन प्रत्येक विषय कसा शिकवता येईल, याचे वस्तुपाठ तयार होत आले आहेत. आता काम बाकी उरले आहे, ते ते अनुसरण्याचे. हे काम आपण ज्याप्रकारे व ज्या प्रमाणात तडीस नेऊ, त्या प्रमाणात आपण घोकंपट्टी, पोपटपंची व पाठ्यपुस्तकनिष्ठतेच्या व शरणतेच्या  कचाट्यातून बाहेर पडण्यात यशस्वी होऊ शकू.

No comments:

Post a Comment