Monday, April 18, 2016

अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या  निवडणुकीचे रंग, ढंग व अंतरंग
वसंत गणेश काणे,    
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२  
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
   यंदा अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक ८ नोव्हेंबर २०१६ रोजी होईल.या दिवशी मंगळवार आहे. या अगोदर ६ नोव्हेंबर २०१२ ला बराक ओबामा निवडून आले होते. या दिवशीही मंगळवारच होता. त्या अगोदर ४ नोव्हेंबर २००८ ला बराक ओबामा पहिल्यांदा निवडून आले होते. त्या तारखेलाही मंगळवारच होता.
   १७९२ मध्ये अमेरिकेत एक कायदा पारित करण्यात आला.ज्या वर्षात निवडणूक होणार त्या वर्षाच्या डिसेंबर महिन्यातील पहिल्या बुधवार पासून ३४ दिवसांच्या आत प्रत्येक राज्यात अध्यक्षपदासाठीचे मतदान आटोपलेच पाहिजे, असे ठरविण्यात आले. म्हणजे हा नोव्हेंबर महिना असणार. नोव्हेंबर महिनाच का? याची कारणे दोन आहेत. एक कारण असे की, पिकांची कापणी उरकलेली असते. दुसरे कारण असे की, कडाक्याची थंडी पडायला सुरवात व्हायची असते.
   अठराव्या शतकात दळणवळणाची साधने विकसित झालेली नव्हती. आता आगगाड्या, मोटारी, विमाने आली. पण तेव्हा परस्पर संपर्काची जलद गतीची साधने नव्हती. तसेच आता टेलिफोन, मोबाईल आले त्यामुळे दुसऱ्याच क्षणी एक दुसऱ्याशी संपर्क साधू शकतो . पण मग आता एक महिन्याहून मोठा कालावधी  कशाला हवा?
निवडणुकीची तारीख निश्चित करण्यामागचे सूत्र
   १८४५ साली दुसरा एक कायदा पारित करण्यात आला. त्यानुसार नोव्हेंबर महिन्याच्या ‘पहिल्या सोमवारनंतरच्या  मंगळवारी’ संपूर्ण देशात अध्यक्षपदासाठी मतदान व्हावे असे ठरले. यामुळे नोव्हेंबर महिन्यातील ‘पहिल्या सोमवार नंतरचा  मंगळवार’ व  डिसेंबर महिन्यातील पहिला बुधवार यात ३४ दिवसांपेक्षा जास्त अंतर राहणार नाही, हे नक्की झाले. (‘पहिल्या सोमवार नंतरचा मंगळवार’ असा शब्दप्रयोग का म्हणून ? कारण असे की, एखाद्या वर्षी पहिला मंगळवार नोव्हेंबरच्या  १ तारखेलाही येऊ शकेल. अशावेळी सोमवार आॅक्टोबर महिन्यात नाही का येणार?) पण मंगळवारच का? मंगळवारात असे काय आहे? तर सर्वांना रविवारी चर्चमध्ये जायचे असते. त्यामुळे रविवार नको. पण मग सोमवार का नाही? तर मतदान केंद्र दूर असेल तर प्रवासासाठी सोमवार हाताशी असलेला बरा, म्हणून मंगळवार ठरला. यानुसार निवडणुकीची तारीख केव्हाही २ ते ८ यांच्या दरम्यानचीच असेल(या दोन्ही तारखा पकडून) हेही नक्की झाले.
     अमेरिका आहे कशी?
 अमेरिकेची लोकसंख्या जवळजवळ ३२ कोट असून क्षेत्रफळ ठोकळमानाने १ कोटी चौरस मीटर व सरासरी वैयक्तिक वार्षिक उत्पन्न ५५,००० डाॅलर आहे व देशात ५० राज्ये आहेत. यापैकी ४८ राज्ये सलग आहेत तर रशियाकडून विकत घेतलेले अलास्का आणि जपानजवळचे हवाई ही राज्ये भौगोलिक दृष्ट्या सलग नाहीत. याशिवाय १६ प्रांत असून त्यापैकी  ११ प्रांतात मानवाची वसतीच नाही.
  बडी राज्ये
    कॅलिफोर्नियात १२ टक्के लोकसंख्या व हाऊस आॅफरिप्रेझेंटेटव्हज (जणू लोकसभा) मध्ये ५३ प्रतिनिधी आहेत. टेक्सासमध्ये ८.५ टक्के लोकसंख्या व हाऊस आॅफरिप्रेझेंटेटिव्हज मध्ये ३६ प्रतिनिधी आहेत. फ्लोरिडात ६ टक्के लोकसंख्या व हाऊस आॅफरिप्रेझेंटेटिव्हज मध्ये २७ प्रतिनिधी आहेत. न्यू याॅर्कमध्ये ६ टक्के लोकसंख्या व हाऊस आॅफरिप्रेझेंटेटिव्हज मध्ये २७ प्रतिनिधी आहेत. इलिनाॅइस व पेन्सिलव्हॅनियात प्रत्येकी ४ टक्के लोकसंख्या व हाऊस आॅफरिप्रेझेंटेटिव्हज मध्ये प्रत्येकी १८ प्रतिनिधी आहेत.
   इतर ८ राज्यात २१ टक्के  लोकसंख्या व हाऊस आॅफरिप्रेझेंटेटिव्हज (जणू लोकसभा) मध्ये एकूण ९० प्रतिनिधी आहेत.
उरलेल्या ३६ राज्यात उरलेली लोकसंख्या राहते व त्यांचे हाऊस आॅफरिप्रेझेंटेटिव्हज मध्ये उरलेले प्रतिनिधी आहेत.
   प्रतिनिधींची एकूण संख्या ४३५ आहे. थोडक्यात असे की, मोठ्या राज्यात जो बाजी मारेल तोच पक्षांतर्गत निवडणुकीत तसेच अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारणार हे उघड आहे. अटीतटीची लढाई झाल्यास गोष्ट वेगळी. हे सर्व आकडे ठोकळमानाचे असून विषय समजून घेण्यासाठी पुरेसे व पुरते आहेत.
गोरे व काळे कुठे व किती? धर्मनिहाय किती?
   अमेरिकेत आफ्रिकन अमेरिकन लोकांची राज्यनिहाय टक्केवारी मिसिसीपी(३७), ल्युसियाना (३२), जाॅर्जिया(३१), मेरीलॅंड (३०), साऊथ कॅरोलीना(२८), अल्बामा(२६), नाॅर्थ कॅरोलीना(२१), डेलावेअर(२१)व्हर्जिनिया(२०) असून इतर राज्यात ती २० टक्यापेक्षा कमी आहे. हे लोक मतदानाच्या बाबतीत गोऱ्यांपेक्षा अधिक जागरूक असतात.
   देशपातळीचा विचार केला तर अमेरिकेत ७२ टक्के गोरे, १३ टक्के काळे,  ९ टक्के संमिश्र व ५ टक्के एशियन व बाकी इतर आहेत. ख्रिश्चन ७६ टक्के, ख्रिश्चन नसलेले  ४ टक्के,  कोणताही धर्म न मानणारे १५ टक्के,  तर धर्म विषयक माहिती देण्यास नकार देणारे  ५ टक्के लोक आहेत. प्रत्येकात विशेषत: ख्रिश्चनात १०/ १२ पोटभेद आहेत. ०.५ टक्के मुस्लिम, ०.५ टक्के बुद्ध (चिनी व जपानी) आणि हिंदूंसह इतर १.२ टक्के आहेत.
      अमेरिकेत सर्वात जास्त ख्रिश्चन, दुसऱ्या क्रमांकावर ज्युडाइझमला मानणारे (२ टक्के), तिसऱ्या क्रमांकावर मुस्लिम(०.९ टक्के) व चौथ्या क्रमांकावर हिंदू व बौद्ध (प्रत्येकी ०.७ टक्के ) आहेत. हिंदूंची संख्या गेल्या दहा वर्षात ८५ टक्क्यांनी वाढली असून ७७ टक्के हिंदू पदवीधर आहेत. ३६ टक्के हिंदूंची गणना श्रीमंत व्यक्तींमध्ये ( वार्षिक उत्पन्न एक लक्ष डाॅलर) होते. इतर धर्मीयात हे प्रमाण १९ टक्के इतके आहे. हे सर्व मुद्दे निवडणुकीत वेळोवेळी आपला प्रभाव पाडतांना नेहमी दिसतात. यावेळीही दिसतील.
     पक्षांतर्गत अध्यक्षपदासाठीची चुरस (डेमोक्रॅट)
   डेमोक्रेटिक पक्षाचे एकूण ४७६३  डेलिगेट्‌स आहेत. अध्यक्षपदाची उमेदवारी मिळण्यासाठी यापैकी २३८२ डेलिगेट्‌स मिळणे गरजेचे आहे. हिलरी क्लिंटन यांना आतापर्यत १७५६ डेलिगेट्सचा पाठिंबा मिळालेला आहे. त्यापैकी १२८७ हे वचनबद्ध प्रतिनिधी ( प्लेज्ड डेलिगेट्स) आहेत. हे प्रतिनिधी उमेदवार निश्चित करण्यासाठी डेमोक्रॅट पक्षाचे राष्ट्रीय संमेलन जेव्हा होईल तेव्हा क्लिंटन यांनाच मत देतील. याउलट ४६९ हे खास प्रतिनिधी (सुपर डेलिगेट्स) असून त्यांची नियुक्ती डेमोक्रॅट पक्षाने केलेली आहे. हे बांधिल नसतात. हे आज जरी हिलरी क्लिंटन सोबत असले तरी डेमोक्रॅट पक्षाच्या राष्ट्रीय संमेलनात हिलरी क्लिंटन किंवा  बर्नी सॅंडर्स यापैकी किंवा आणखी कुणालाही मत देऊ शकतील.
  याउलट बर्नी सॅंडर्स यांना आतापर्यत १०६८ डेलिगेट्सचा पाठिंबा मिळालेला आहे. त्यापैकी १०६८ हे वचनबद्ध प्रतिनिधी ( प्लेज्ड डेलिगेट्स) आहेत. हे प्रतिनिधी उमेदवार निश्चित करण्यासाठी डेमोक्रॅट पक्षाचे राष्ट्रीय संमेलन जेव्हा होईल तेव्हा सॅंडर्स यांनाच मत देतील. याउलट ३१  हे खास प्रतिनिधी (सुपर डेलिगेट्स) असून त्यांची नियुक्ती डेमोक्रॅट पक्षाने केलेली आहे. हे बांधिल नसतात. हे आज जरी बर्नी सॅंडर्स सोबत असले तरी डेमोक्रॅट पक्षाच्या राष्ट्रीय संमेलनात  बर्नी सॅंडर्स  किंवा हिलरी क्लिंटन यापैकी किंवा आणखी कुणालाही मत देऊ शकतील.
  डेमोक्रॅटिक पक्षाच्या यापुढे होऊ घातलेल्या प्रायमरीजमध्ये १९४१ प्रतिनिधी निवडायचे असून ते कोणाला पसंती देतात, ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल. बर्नी सॅंडर्स यांनी हिलरींशी आतापर्यंत जी टक्कर दिली आहे त्यात या दोघातील फरक कमी कमी  करत करत आता हा फरक फक्त ६९८ इतकाच ठेवला आहे. उरलेल्या १९४१ प्रतिनिधींपैकी जास्तीत जास्त प्रतिनिधी मिळवण्यासाठी या दोघातील चुरस आता वाढणार हे नक्की पण हिलरी क्लिंटन यांची आजची ६९८ ची बढत लहान नक्कीच नाही.
 आपल्याकडे जशी उत्तरप्रदेश, बिहार, महाराष्ट्र यासारखी बडी राज्ये आहेत, तशीच अमेरिकेत कॅलिफाॅर्निया, टेक्सास, न्यूयाॅर्क, फ्लोरिडा, पेन्सिलव्हॅनिया अशी बडी राज्ये आहेत. यापुढे यासारख्या कोणत्या राज्यात कोण किती बढत घेतो, यावर या दोन उमेदवारांचे उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असेल. क्लिंटन व सॅंडर्स यांच्यातला मतातला फरक कमी झाला असला तरी अजूनतरी क्लिटन यांचेच पारडे सतत जड राहिले असून,  पारडी वरखाली, म्हणजे कधी क्लिंटन तर कधी संडर्स, अशी हेलकावे खातांना दिसलेली नाहीत. म्हणूनच कदाचित सध्यातरी हिलरी क्लिंटन किंचितही विचलित न होता पुढच्या योजनांवर लक्ष केंद्रित करतांना दिसत आहेत.
     पक्षांतर्गत अध्यक्षपदासाठीची चुरस (रिपब्लिकन)
   रिपब्लिकन पक्षाचे एकूण २४७२ डेलिगेट्‌स आहेत आणि उमेदवारी मिळण्यासाठी यापैकी १२३७ डेलिगेट्‌स मिळणे गरजेचे आहे. डोनाल्ड ट्रंप यांना आतापर्यंत ७५५ प्रतिनिधींचा पाठिंबा मिळालेला आहे. आणखी ४८२ प्रतिनिधींचा पाठिंबा मिळाला तर उमेदवारी मिळण्यासाठी आवश्यक असलेला १२३७ हा जादुई  ते गाठू शकतील व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार ठरू शकतील. बेताल वक्तव्ये व अल्पसमज यासाठी प्रसिद्ध असलेल्या ट्रंप यांनी महिलांबद्दल अशीच बेताल व अपरिपक्वता दाखवणारी विधाने केल्यामुळे जनमतात नाराजी वाढली आहे. विशेषत: महिलावर्ग तर त्यांच्याविरुद्ध खवळून उठला आहे. यावर उतारा म्हणून त्यांच्या पत्नीने पतिपरायणतेचा परिचय देत बरीच सारवासारव केली व पतीचे गोडवेही गायले आहेत. त्यांचा कितपत परिणाम होतो ते यथावकाश दिसेलच.
     रिपब्लिकन पक्षाचे दुसरे इच्छुक उमेदवार टेड क्रुझ यांना आतापर्यंत ५१७ प्रतिनिधी मिळाले असूनआणखी  ७२० प्रतिनिधी मिळाल्यास ते रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळण्यासाठीचा १२३७ हा जादुई आकडा पार करू शकतील.
    जाॅन कसिच हे तिसरे उमेदवारही अजून रिंगणात आहेत पण त्यांना आतापर्यंत फक्त १४४ च प्रतिनिधी मिळाले असून १०९३ प्रतिनिधी मिळणे बाकी आहे. पण आता एवढ्या प्रतिनिधींची निवड करायला तेवढ्या जागी निवडणूक व्हायचेच उरलेले बाकी राहिलेले नाही.  निवडणूक आता फक्त १०५६ जागीच होणारआहे. या सर्व जागा जाॅन कसिच यांनाच मिळतील असे जरी गृहीत धरले ( जे अशक्य आहे) तरी (१०९३-१०५६=) ३७ जागा त्यांना कमी पडतील. अशा परिस्थितीत एक प्रकार होऊ शकतो व असे प्रकार अमेरिकेत होतातही, तो प्रकार हा की, जाॅन कसिच यांनी माघार घेणे व आपले १४४ प्रतिनिधी टेड क्रुझ यांच्या पारड्यात टाकणे. असे झाले तरच टेड क्रुझ डोनाल्ड ट्रंप यांना निर्णायक  लढत देण्याच्या शक्यतेत येऊ शकतील. यासाठी रिपब्लिकन पक्षाचे धुरीण व समंजस हितचिंतक एडीचोटीचे/ निकराचे प्रयत्न करतील. ही सर्व कागदावरची व ठोकळमानाची उदाहरणे आहेत. कागदावर दिसणारी बेरीज प्रत्यक्षात उतरतेच असे नाही हा काही आपलाच अनुभव नाही.
     दोन्ही पक्षांचे अध्यक्षपदाचे उमेदवार ठरण्याचाच विचार केला तर घोडामैदान जवळ आले आहे. पण खरा सामना क्लिंटन आणि सॅंडर्स यांच्यातला विजेता/विजेती व ट्रंप आणि क्रुझ यांच्यातला विजेता यांच्यात होणार आहे. तोपर्यंत आपण आपल्या उत्कंठेला आवर घालावा, हेच  चांगले.

No comments:

Post a Comment