Sunday, October 23, 2016

बॅलट ॲक्सेस, कमीटेड व्होटर्स, अनडिसायडेड व्होटर्स व अमेरिकेतील निवडणूक
वसंत गणेश काणे
‘अमेरिकेत बॅलट ॲक्सेस रूल्स’ नावाचे नियम असून ते राज्यागणिक वेगळे आहेत. यानांच नाॅमिनेशन रूल्स या नावाने अमेरिकबाहेर ओळखले जाते. एखाद्या उमेदवाराचे किंवा पक्षाचे नाव मतपत्रिकवर असावे किंवा नसावे, याबाबतचे हे नियम आहेत. हे नियम राज्यागणिक वेगळे असले तरी वय, नागरिकता, राजकीय पक्षाने स्वीकृत केलेले असणे किंवा नसणे आणि व्यवसाय यासारखे निकष राज्यनिहाय वेगवेगळे आहेत.
मतपत्रिकेवर कोणाचे नाव असावे. - अमेरिकन राज्यघटनेच्या भाग क्रमांक १ मधील कलम क्रमांक ४ नुसार हे अधिकार त्यात्या राज्यांना दिले आहेत. उमेदवारांची गर्दी होऊन समान विचारी मतदारांच्या मतांची विभागणी होऊ नये हा उद्देश समोर ठेवून ते तयार केले ले असतात. सर्वातजास्त मते मिळविणारा उमेदवार विजयी घोषित करण्याची एक बाळबोध पद्धती आहे. मग त्याला एकूण मतदानाच्या पन्नास टक्के पेक्षा अधिक मते असोत किंवा नसोत. एका मतदारसंघात अ आणि ब या पक्षांचे समजा ५५ व ४५ टक्के मतदार आहेत, असे गृहीत धरू. (अमेरिकेत मतदार नोंदणी होत असतांनाच मतदार आपण कोणत्या पक्षाचे मतदार आहोत, ते नोंदवू शकतो.) पण ‘अ’ पक्षाचे दोन उमेदवार निवडणुकीला उभे राहिले तर एकाला ३० टक्के व दुसऱ्याला २५ टक्के अशी काहीशी मते मिळतील. पण ‘ब’ पक्षाचा एकच उमेदवार उभा राहिला तर त्याला सगळी ४५ टक्के मते मिळून तो निवडून येईल. खरे पाहिले तर ‘अ’ पक्षाची मते ५५ टक्के होती. ज्याने भोज्याला अगोदर हात लावला (फर्स्ट पास्ट पोस्ट)   तो जिंकला, असा नियम उमेदवारांची गर्दी कमी करील, असा नियम केल्यास पक्षांमध्ये मतविभागणी होऊ न देण्याची वृत्ती वाढीस लागेल, अशी अपेक्षा बाळगून हा नियम केला आहे. प्रत्यक्षात असे घडते किंवा नाही याबद्दल मतभेद आहेत. उमेदवारांची संख्या नियमित करण्याचे अधिकार प्रशासनाला मिळाले तर सत्तारूढ पक्ष आपल्या सोयीचे नियम करील, असा आक्षेप आहे. उमेदवारांची भाऊगर्दी होऊ नये म्हणून सूचक, अनुमोदकांची संख्या एकापेक्षा जास्त असावी, असा नियम आपल्याकडेही आहे. सामान्य मतदार संघात दहा कर राष्ट्रपतीपदासाठी पन्नास सूचक व अनुमोदक असावेत, असा काहीसा हा नियम आहे. या नियमावरही आक्षेप आहेत. हा नियम मोठ्या पक्षांना अडचणीचा ठरत नाही पण उदयोन्मुख पक्षांना जाचक ठरतो.
राज्यात किमान १५ टक्के नोंदणीकृत मतदार असतील तरच त्या पक्षाच्या उमेदवाराचे नाव त्या राज्यातील मतपत्रिकेवर राहील, असा नियम असल्यामुळे गेल्या अनेक निवडणुकीत इतर पक्षांच्या (ज्यांचे १५ टक्यापेक्षा कमी नोंदणीकृत मतदार आहेत) उमेदवारांची नावे मतपत्रिकेवरच नसत. यावेळी सर्व म्हणजे ५०ही राज्यात प्रथमच गॅरी जाॅनसन या तिसऱ्या राजकीय पक्षाच्या - लिबर्टेरियन पक्षाच्या- उमेदवाराचे  नाव मतपत्रिकेवर असेल. तर जील स्टीन या चौथ्या राजकीय पक्षाच्या - ग्रीन पार्टीच्या - महिला उमेदवाराचे नाव फक्त ४० राज्यातच मतपत्रिकेवर असेल. ज्या दहा राज्यात जील स्टीन यांचे नाव मतपत्रिकेवरच नाही, त्यांना या दहा राज्यातील मतदारांनी मत कसे द्यावे?  यावर उपाय असा आहे की, मतपत्रिकेवर  नाव नसलेल्या पण आपल्याला मत द्यायची इच्छा असलेल्या उमेदवाराचे ना व मतदार स्वत: मतपत्रिकेवर लिहू शकतो व त्याला आपले मत असल्याचे नोंदवू शकतो. ही सोय दहा राज्यातील मतदारांना उपलब्ध आहे. ते स्वत:च्या हस्ताक्षरात जील स्टीन या ग्रीन पार्टीच्या उमेदवाराचे नाव मतपत्रिकेवर लिहितील व तिला मतदान करतील/ करू शकतील.
 सध्या वादविवादाच्या/ चर्चेच्या ज्या फेऱ्या चालू आहेत, त्यात  फक्त डोनाल्ड ट्रंप व हिलरी क्लिंटन हे अनुक्रमे रिपब्लिकन पक्ष व डेमोक्रॅट पक्षाचे उमेदवारच असतात. गॅरी जाॅनसनला या लिबर्टेरियन पक्षाच्या उमेदवारालाही बोलवावे, अशी सूचना वाॅशिंगटन पोस्ट या जबाबदार वृत्तपत्राने केली होती, पण तिला प्रतिसाद मिळालेला दिसत नाही. ही चर्चा अमेरिकेतील ख्यातनाम विद्यापीठे घडवून आणित असतात. यावेळी निरनिराळ्या क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तींना पाचारण केलेले असते. या व्यक्ती व ॲंकर  उमेदवारांना प्रश्न विचारत असतात. या चर्चेचे देशभर प्रक्षपण केले जाते.यामुळे सध्या हिलरी क्लिंटन यांचे माहोल तयार झालेले दिसते आहे. ते नक्कीच महत्त्वाचे आहे. पण सुबुद्ध व जागरूक मतदारांपुरताच हा परिणाम सीमित असतो. सामान्य मतदार यामुळे प्रभावित होतोच असे नाही. कारण अनेक मतदार आपली मतदार म्हणून नोंदणी करतांनाच आपण कोणत्या पक्षाचे मतदार आहोत, हे नोंदवू शकतात. बहुतेक मतदार अशी नोंदणी करतातही. पण तशी सक्ती मात्र नसते. पक्षाची बांधिलकी नोंदवणाऱ्या मतदारांवर या चर्चेचा फारसा परिणाम होत नसतो. अनिश्चित मतदारांवर (अनडिसायटेड व्होटर्सवर - कुंपणावरच्या मतदारांवर- मात्र या चर्चेचा परिणाम होणे शक्य व संभाव्य असते. अनेकदा हेच मतदार निवडणुकीचा निकाल कुणाच्या बाजूने लागावा हे ठरवतांना आढळले आहेत, हेही लक्षात घेतले पाहिजे. आजमितीला ५० पैकी ८/१० राज्यातच डेमोक्रॅट पक्ष सत्तेवर आहे. सीनेट व हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हज मध्येही रिपब्लिकन पक्ष डेमोक्रॅट पक्षापेक्षा खूप पुढे आहे. या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रंप  जसे निवडून येण्याची आशा बाळगून आह तसेच डोनाल्ड ट्रंप यांची उमेदवार म्हणून योग्यता आपल्या पेक्षा खूपच कमी असल्याने रिपब्लिकन मतदारही आपली निवड करतील, असे हिलरी क्लिंटन यांना व त्यांच्या पाठिराख्यांना वाटते आहे. मतदार आपला कौल ८ नोव्हेंबरलाच देणार आहेत.

No comments:

Post a Comment