Wednesday, October 5, 2016



सिरियातील सुंदोपसुंदी
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड 
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९९४२२८०४४३०    
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 
  बशर हफीज अल् असाद हा १९७० पासून सिरियाचा अध्यक्ष आहे. तोच सिरियात सबकुछ आहे. सरसेनापती, बाथ या सत्ताधारी पक्षाचा सेक्रेटरी व राष्ट्राचे अध्यक्षपद ही पदे त्याच्या ठायी एकवटली आहेत. सिरियात अभूतपूर्व गृहकलह व इसीसचे आक्रमण सुरू असले तरी सध्यातरी त्याच्या पदाला धोका नाही. 
सिरियाचे भौगोलिक स्थान महात्म्य- सिरिया (सिरियन अरब रिपब्लिक) या देशाच्या पश्चिमेला लेबॅनाॅन व भूमध्य समुद्र, उत्तरेला तुर्कस्थान, पूर्वेला इराक, दक्षिणेला जाॅर्डन व नैरुत्येला (साऊथवेस्ट) इस्रायल आहे. रणनीतीशास्त्रात अशा बहुस्पर्शी सीमा असलेल्या देशाचे स्थान वेगळेच असते. तेच सध्या सिरियाचे दुर्दैव ठरते आहे. सध्या सिरियाला गृहयुद्ध, इसीस यांनी ग्रासलेले आहेच पण त्याचबरोबर इराण, सौदी अरेबिया, तुर्कस्थान हे शेजारी आणि अमेरिका व रशिया या महासत्ता आपापले राष्ट्रीय हित साधण्यासाठी हस्तक्षेप करीत आहेत. ४० लक्ष सिरियन लोक देशोधडीला लागले असून यात असाद स्वत: मात्र नाही.  ही बाब आश्चर्य वाटण्यासारखी असली तरी खरी आहे.
 इसीसची पीच्छेहाट -  आत्ताआत्तापर्यंत तरी सिरियाच्या २५ टक्के भागावरच असादची प्रत्यक्ष सत्ता होती. अमेरिका व रशिया यांच्या भरभक्कम पाठिंब्यामुळे आता इसीसची पीच्छेहाट सुरू झाली आहे. असादच्या ताब्यातील हा २५ टक्के  भूभाग किनाऱ्यालगत असून त्यात लोकवस्ती मात्र दाट आहे. रशियाचा त्याला पाठिंबा आहे कारण त्याने रशियाला बंदरे वापरण्याची सूट देऊ केली आहे. परतफेड म्हणून रशियाकडून भरपूर युद्धसामग्री सिरियाला सतत मिळत असते.
प्रत्येकाचे वेगवेगळे  हेतु -  रशिया आला की पाठोपाठ अमेरिका येणारच व तिने असाद विरोधी गटाला हाताशी धरावे, हेही क्रमप्राप्तच ठरते. हे गटही असाद विरोधात मोर्चे उघडून आहेत.  अमेरिकेतडून मिळणाऱ्या मदतीवरच हे गट शिरजोर झाले आहेत. त्यामुळे असादला इसीस बरोबर लढतालढता यांच्याशीही लढावे लागते आहे.
रशिया, अमेरिका पाठोपाठ इराणही हेतु बाळगून आहे. शियाबहुल इराणची चिंता वेगळीच आहे. त्याचा परंपरागत वैरी  सौदी अरेबिया हा सुन्नीबहुल देश असून तो सिरियातील सुन्नी बंडखोरांना रसद पुरवतो आहे. इसीस ही सुन्नींच्या प्रभावाखालील संघटना असल्यामुळे तिलाही सौदी अरेबियाची मदत सुरू आहे.  हे बंडखोर जिंकलेले इराणला चालणार नाही. त्यामुळे इराणने असादला बक्कळ पैसा कर्जाऊ दिला आहे. याचा उपयोग असादला शस्त्रसामग्री खरेदी करण्यासाठी होईल. इराणवरचे आर्थिक निर्बंध अमेरिकेने उठवल्यामुळे व तेल विहिरीतून पुन्हा तेल काढता आल्यामुळे सध्या इराणच्या हातात बराच पैसा खुळखुळतो आहे. अशाप्रकारे इराण व रशियाची गट्टी जमली आहे. ही दुक्कल इसीसच्या विरुद्ध लढत असल्यामुळे अमेरिकेला इच्छेविरुद्ध असादला मदत करावी लागते आहे.
रशिया व इराण अशाप्रकारे असादच्या बाजूने उभे राहिल्यामुळे असादचे स्थान पक्के झाले असून अमेरिकेलाही असादची बाजू घ्यावी लागते आहे, कारण उद्या जर असाद गेला  तर त्याची जागा रिकामी राहणार नाही, हे नक्की. ती कोण भरून काढील ते सांगता येत नाही. त्या अनोळखी व्यक्तीपेक्षा हा नालायकच सत्तेवर राहिलेला बरा, असा विचार करणे अमेरिकेला भाग पडले. राजकारणात माहितीतला राक्षस अनोळखी राक्षसापेक्षा सोयीचा असतो, असे मानतात.
 इकडे इसीसने सिरियाच्या ५०टक्के भूभागावर ताबा मिळवला होता. इसीस ही जगातील सर्वातजास्त धनवंत व शस्त्रसज्ज अतिरेकी संघटना आहे. खंडणी व कर यांच्या आधारे दररोजची तिची मिळकत दहा लक्ष डाॅलर असावी. अठरा देशातील निदान तीन शक्तिशाली सुन्नी गटांनी तिचे नेतृत्त्व स्वीकारले आहे. पन्नास देशातील २० हजार सुन्नी जिहादी लढवैये तिच्या छत्राखाली एकत्र आले आहेत. इसीसमध्ये आजवर फारसे मतभेदाचे प्रकार झालेले नाहीत. कारण उत्तराधिकाऱ्याची निवड करण्याचा प्रसंग ओढवला तर नेतेमंडळी योग्य व कर्तृत्ववान व्यक्तीचीच निवड करीत आले आहेत. ती व्यक्ती निवडी अगोदरच जवळजवळ सर्वमान्यच असते. इसीसच्या नेत्यासारखा क्रूरकर्मा शोधूनही सापडणार नाही. क्रूरतेत असादही कुणालाही हार जाणारी व्यक्ती नाही. पण तो कितीही झाले तरी पडतो एक प्रादेशिक नेता. इसीसला तर  आता एक संभाव्य  जागतिक सत्ता म्हणून मानले जाते. उणीव आहे ती एका भूप्रदेशाची. त्यासाठी इसीसने सिरिया व इराक हे देश ताब्यात मिळविण्याची योजना स्वीकारली असून आत्ताआत्तापर्यंत सिरियाच्या निम्या भागावर कब्जा मिळवला होता.
 भीषण नरसंहार, अभूतपूर्व पलायन व अपमृत्यूचे तांडव - आत्तापर्यंत सिरिया एकापाठोपाठ एक आघात सहन करीत आला आहे. २ लक्ष सिरियन नागरिकांचा अात्तापर्यंत बळी गेला आहे. चार लक्ष लोक परागंदा झाले आहेत. ८ लक्ष लोक घरादाराला मुकले आहेत पण सिरियातच जीव मुठीत धरून जीवन जगत आहेत. सिरियाची जवळजवळ निम्मी लोकसंख्या सिरिया सोडण्याच्या विचारात आहे. उद्या लढाई थांबली तरी परतल्यावर उजाड जमिनीशिवाय काहीही उरलेले नसेल. एवढ्या भीषण प्रकारे सर्व भूभाग उध्वस्त झालेला असेल. सिरियाची अर्थव्यवस्था निम्यावर येऊन ठेपली आहे. सिरियन पाऊंडाची किंमत ८० टक्क्याने घसरून फक्त २० टक्केच राहिली आहे. माणसांना तर किंमतच उरलेली नाही. ती किडामुंगीसारखी केव्हाही चिरडली जात आहेत. असादची राजवट राहिली काय किंवा आणखी कुणाची आली काय संपूर्ण देश बेचिराख होतो आहे. 
अलेप्पो शहराची राखरांगोळी - अलेप्पो या महत्त्वाच्या शहरामधून लोकांचे पलायन सुरू असून हे लोक सर्बियामार्गे हंगेरीला जाऊन युरोपात आश्रय मिळविण्यासाठी धडपडत आहेत. इराणकडून मिळालेला पैसा व रशियाकडून मिळालेली शस्त्रे घेऊन असाद एकीकडे इसीसशी तर दुसरीकडे त्याच्याविरुद्ध दंड थोपटून उभ्या ठाकलेल्या बंडखोरांशी दोन हात करतो आहे. पाश्चिमात्य देश व अमेरिका इसीसला सिरियातून हकलण्यासाठी निकराचे प्रयत्न करीत असले तरी त्यांना असाद मात्र नको आहे. म्हणून सिरियन बंडखोरांना अमेरिकेने हाताशी धरून इसीसविरुद्ध लढण्यास सज्ज केले आहे. अमेरिकेने यासाठी लक्षावधी डाॅलर ओतले. पण आजची स्थिती अशी आहे की,  बंडखोरांजवळ आता हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच प्रशिक्षित मनुष्यबळ उरले आहे.
कुर्दांना हवे स्वातंत्र्य - सिरियामध्ये कुर्द वंशीयांची संख्या बरीच आहे. त्यांना सिरियापासून वेगळे व्हायचे आहे. त्यामुळे असादच्या फौजांना त्यांच्याशीही लढावे लागते आहे. कुर्द लोकांना पाश्चिमात्य देश व अमेरिका यांना हाताशी घेऊन लक्षावधी डाॅलरची मदत दिली असून इसीसविरुद्ध लढण्यास प्रवृत्त केले आहे. त्यामुळे इसीसला असाद व कुर्द अशा दोघांशीही एकाच वेळी लढावे लागत आहे. असादही इसीस व कुर्द लोकांविरुद्ध लढतो आहे. काही कुर्द असादच्या बाजूला गेले असून तेही इसीसशी लढत आहेत. पाश्चिमात्य देश व अमेरिका या कुर्द लोकांना मदत करायला तयार नाहीत कारण ते असादच्या बाजूने लढत आहेत. लढाईतले हे त्रिकोण, चौकोन, पंचकोन सामान्य माणसाची मती चक्रावून टाकणारे ठरले आहेत. या सुंदोपसुंदीत कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही, अशी गोंधळाची स्थिती आहे.
तुर्कस्थानची तिरकी अयशस्वी चाल -  हा गोंधळ कमी होता म्हणून की काय या धुमश्चक्रीत तुर्कस्थानही सहभागी झाला आहे. नाटो सदस्य देशांपैकी तुर्कस्थान हा एकच देश असा आहे की, ज्याच्या सीमा सिरिया व इराकला लागून आहेत. कुर्द लोक तुर्कस्थानातही आहेत. त्यांना तुर्कस्थानमधून वेगळे व्हायचे आहे. त्यामुळे सिरियातील कुर्द लोकांना पाश्चिमात्य देश मदत करीत आहेत, ही गोष्ट तुर्कस्थानला साफ नामंजूर आहे. त्यामुळे तर्कस्थान इसीसविरुद्धच्या लढाईत सामील असला तरी तुर्की विमाने मात्र इसीसऐवजी कुर्द लोकांवरच बाॅम्बफेक करीत असतात. आतापर्यंत कुर्द लोकांवर तीनशे तर इसीसवर फक्त तीन हल्ले तुर्कस्थानने केले आहेत. या लढाईचे निमित्त साधून विभक्तवादी कुर्द लोकांवरच हल्ला करून तुर्कस्थान आपले उट्टे काढीत आहे. तुर्कस्थानचे राष्ट्रपती तय्यीप एर्डोगन या लढाईचा उपयोग देशातील आपले स्थान मजबूत कसे होईल यासाठी करीत आहेत. कारण लवकरच तुर्कस्थानमध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत. पण याचा तुर्की मतदारांवर फारसा परिणाम झाला नाही. इसीसऐवजी कुर्द लोकांवर हल्ला केल्यामुळे पाश्चिमात्य व अमेरिका यांचा रोष मात्र तुर्कस्थानला पत्करावा लागला हे खरे पण विभाजनवादी कुर्द लोकांवर हल्ले केल्यामुळे स्थानिक एकनिष्ठ तुर्की जनमत आपल्याकडे वळेल असा तय्यीप एर्डोगन  यांचा जो  होरा होता, तो साफ चुकीचा ठरला. अशाप्रकारे तेल व तूप दोन्ही गेले आणि धुपाटणे हाती आले, असा प्रकार तुर्कस्थानबाबत झाला आहे.
एकत्र आघाडी पण हेतु वेगवेगळे - सिरियातील युद्धात प्रत्येक देशाचे उद्दिष्ट कसे वेगळे आहे व जोतो आपल्याच पोळीवर कसे तूप ओढून घेतो आहे, हे यावरून दिसून येईल. तुर्कस्थानला कुर्द लोकांशी लढायचे आहे. इराणला सौदीच्या पाठिंब्याने लढणाऱ्या सिरियन बंडखोराना हकलून लावायचे आहे. अमेरिका इसीस विरुद्ध लढते आहे. तर रशियाच्या पुतीनला असे वाटते आहे की यावेळी पाश्चिमात्य देश व अमेरिका यांना मदत केली तर सिरियात आपला जम बसवता येईल. तुर्कस्थान कुर्द  लोकांना ठोकून काढतो आहे.  ही उद्दिष्टे परस्परांना च्छेद देत आहेत. फायदा होतो आहे तो फक्त एकाचा. बशर अल् असादचा. तो इसीसशी लढतो आहे खरा पण इसीसमुळेच आपण सत्तेवर आहोत, हे तो जाणून आहे.
 अमेरिकेवर ठपका - या सर्वांना एकत्र आणण्यात अमेरिका नुकतीच यशस्वी झाली. रशिया व अमेरिकेचे एकमत झाले. अगोदर इसीसला सिरियातून हकलून लावायचे. मग सिरियातील बंडखोर व असाद यांच्यात तडजोड घडवून आणायची, असे ठरले. या दृष्टीने या दोन महाशक्ती परस्पर सहयोग व सामंजस्याने, माहितीची देवाणघेवाण करीत बाॅम्बहल्ले करीत असत. पण सर्व प्रकारची काळजी घेऊनही अमेरिकन विमानांनी एक हल्ला सिरियाच्या फौजांवरच केला व त्यात ६२ सैनिक ठार झाले. सिरियाने अमेरिकेविरुद्ध तक्रार केली व हल्ले भलत्याच ठिकाणी झाले असावेत, अशी शक्यता व्यक्त  करीत रशियाने  असादची पाठराखण केली व त्याच बरोबर अमेरिकेवर दोषारोपण करून जोरदार चिमटा काढला. अमेरिकेला हे शक्य वाटत नाही. आपण अगोदर पुरेशी पाहणी करूनच हल्ला केला होता, असे तिचे म्हणणे होते. पण तरीही सावधगिरीचा उपाय म्हणून अमेरिकेने बाॅम्बहल्ले सध्यापुरते स्थगित केले व युद्धविराम घडून आला. हे हल्ले अमेरिकेने इसीसच्या फौजांवर न करता सिरियातील सरकारला विरोध करणाऱ्या बंडखोरांना मदत करण्यासाठी आमच्या सैन्यावर केले असा सिरियाला संशय आहे. लवकरच सत्य बाहेर येईल व इसीस विरुद्धची लढाई पुन्हा सुरू होईल. असे युद्धवार्ताहरांना वाटते आहे. तसेच घडले देखील.
 युद्ध संकेत पायदळी -  पण अमेरिकेवर ठपका ठेवून सिरियाने युद्धविराम मोडीत काढीत रशियाच्या मदतीने अलेप्पो शहरावर सर्वंकष स्वरूपाचे हवाई हल्ले सुरू केले आणि अमेरिकन विमानांच्या चुकीमुळे झालेली हानी काहीच नाही, असे म्हणण्याची वेळ आली. यात दवाखाने, राहती घरे जमीनदोस्त झाली, ९० नागरिक मेले व ३०० च्या वर जायबंदी झाले. पाणीपुरवठायंत्रणा नष्ट झाली. अलेप्पो शहरात पाण्याच्या इनमिन दोन टाक्या. त्यातली एक टाकी या हल्यात उध्वस्त झाली तर दुसरी इसीसने मागे हटण्यापूर्वीच उडवली व जलसंकट निर्माण झाले. युद्ध लढण्याचेही काही नियम निदानपक्षी संकेत असतात. सामान्य नागरिक व जीवनावश्यक सोयीसुविधांना धक्का पोचेल, असे हल्ले नसावेत, हा त्यातलाच एक नियम/ संकेत आहे. आता अमेरिकेला आयतीच संधी मिळाली. हा हल्ला म्हणजे रानटीपणाचा प्रकार झाला, असे म्हणत अमेरिकेने सिरिया व रशियावर ठपका ठेवीत आपल्यावरील आरोपाची सव्याज परतफेड केली. हा गुन्हा ठरतो, अशी तंबी युनोलाही द्यावी लागते आहे पण सध्यातरी याला अरण्यरूदनापेक्षा जास्त किंमत नाही. आज ना उद्या इसीसला सिरियातून हटावेच लागेल, हे नक्की पण मग बेचिराख भूभाग, प्रेतांवर ताव मारणारी श्वापदे हेच असादचे प्रजानन म्हणून उरतील, असे दृश्य तर दिसणार नाहीना?.

No comments:

Post a Comment