Wednesday, October 5, 2016

 अमेरिकन मतदारांमधील अभूतपूर्व  संभ्रमावस्था
वसंत गणेश काणे ,वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड ९४२२८०४४३०    
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee?   
२७२१, प्राईम रोज लेन नाॅर्थ, याॅर्क, पेन्सिलव्हॅनिया 
  अ मेरिकेत व अमेरिकेबाहेरही उमेदवारांच्या योग्यायोग्यतेचीच चर्चा जास्त होताना दिसते. तसेच ईमेल्स, क्लिंटन फाऊंडेशन, डोनाल्ड ट्रंपचा अरोरावीपणा, उद्धटपणा, अज्ञान, नोकऱ्या, सुरक्षा हेच विषय चर्चिले जातांना दिसतात. हिलरी क्लिंटन यांना न्यूमोनिया झाला आणि त्यांच्या प्रकृतीविषयक स्वास्थ्याबाबतच्या जुन्या तर्कांनाही नव्याने उजाळा मिळतो आहे. यावर उतारा म्हणून डोनाल्ड ट्रंप यांची प्रकृती कोणती धड आहे, अशाही वार्ता कानावर पडत आहेत. यात तथ्य किती हा मुद्दा बाजूला ठेवला तरी मतदारांना हे दोन्ही उमेदवार मनातून पसंत नाहीत, ही बाब अधोरेखित झाल्यावाचून राहत नाही. हे सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत, यात शंकाच नाही. पण इतरही प्रश्न महत्त्वाचे असून ते निवडणुकीच्या निकालावर या बाजूने किंवा त्या बाजूने परिणाम करू शकतात. पण ते सध्यातरी काहीसे मागे पडले आहेत. पण पुढे समोर येऊ शकतील, नव्हे आणले जातील व त्यांचा निवडणुकीच्या निकालावर परिणामही होऊ शकेल. म्हणून ते विचारात घ्यायला हवे आहेत. अमेरिका - मेक्सिको सीमाप्रश्न, जगातील कोणत्याही परागंदा व्यक्तीला आश्रय द्यायचा ही आदर्श भूमिका व आजचे क्युबन लोकांच्या रोज येऊन धडकणाऱ्या लोंढ्यांमुळे व्यवस्थेवर पडणाऱ्या ताणाचे वास्तव,   वंशवृद्धी करा(मल्टिप्लाय) ही  धर्माज्ञा व लोकसंख्या नियंत्रणाबाबतची व अपत्याला जन्माला घालणे किंवा न घालणे ह्या अधिकाराबाबतचा वैज्ञानिक व वस्तुनिष्ठ दृष्टिकोन यातील तफावत हे प्रश्नही तेवढेच महत्त्वाचे आहेत.
अजस्त्र सीमा - मेक्सिको व अमेरिका यांच्यामधली २००० मैल लांबीची सीमा( नक्की आकडा - १९८९ मैल) कुठे शहरी भागातून, कुठे अनुलंघनीय टेकड्यांमधून, कुठे उजाड वाळवंटातून तर कुठे  कोलोराडो व रिओग्रॅंड सारख्या खळाळत्या विस्तीर्ण नद्यांची  पात्रे ओलांडत अमेरिकेतील चार राज्यांना स्पर्श करीत जाते. एकूण तीनशे तीस चेक पोस्ट असली तरी कायदेशीर रीत्या दरवर्षी प्रवेश घेणाऱ्या हजारो मेक्सिकन नागरिकांशिवाय, बेकायदेशीरपणे  सीमा ओलांडून निदान दुपटीने प्रवेश करणाऱ्यांमुळे अमेरिका बेजार झाली आहे. कारण कायदा व सुरक्षा, शिक्षण, निवास याबाबतच्या समस्या निर्माण होत आहेत. पायाभूत सेवासुविधांवर ताण पडत आहे. यथावकाश हे सगळेच नागरिकत्व प्राप्त करतात. कारण एकदा प्रवेश केल्यावर बेकायदेशीरपणे प्रवेश करणाऱ्याला ओळखणे कठीण होऊन बसते. डेमोक्रॅट पक्ष या प्रवेशाकडे कानाडोळा करतो. त्यामुळे ही मंडळी त्या पक्षाची मतपेढी (व्होट बॅंक) झाली आहे. स्थानिक नागरिक नाराज असून ते रिपब्लिकन पक्षाकडे वळले आहेत. ही एक विचित्र समस्या आहे.
डोनाल्ड ट्रंप यांचे तळ्यात मळ्यात -  डोनाल्ड ट्रंप दोन हजार मैलांची ओलांडता येणार नाही अशी भिंत, तीही मेक्सिकोच्या खर्चाने बांधायची म्हणतात, तर एक छदामही देणार नाही, अशी मेक्सिकोची टेटर भूमिका आहे. या प्रश्नाची संवेदनशीलता इतकी आहे की युक्तीप्रयुक्तीने डोनाल्ड ट्रंप यांनी मेक्सिकोचे अध्यक्ष एनरिक निटो यांची ओपचारिक भेट घेऊन हस्तांदोलनाचा कार्यक्रम घडवून आणताच मेक्सिकन लोकांनी त्याला फक्त बदडण्याचेच काय ते बाकी ठेवले. डोनाल्ड ट्रंप हा काही अध्यक्ष नाही,फक्त उमेदवार आहे. त्याला का भेटलास, असा मेक्सिकन जनतेचा सवाल आहे. डोनाल्ड ट्रंप मात्र मी भिंतीचा विषय ठणकावून मांडला असे म्हणून टेक्सास या मेक्सिकोशी सीमा लागून असलेल्या राज्यात टाळ्या मिळवीत आहेत.  माझ्या उमेदवारीकडे जग गंभीरपणे बघते, हे दाखवण्याची संधीही त्यांनी साधली. एवढी मोठी भिंत कोण, कधी, कशी, कोणाच्या पैशाने बांधणार ही चिंता विद्वानांपुरती मर्यादित आहे. टेक्सासमधीलच नव्हे तर अमेरिकन जनतेतील एक गट मात्र  डोनाल्ड ट्रंप वर जाम खूष आहे, हे मोठे जनमत सुखावले आहे. पण यात धोका असा आहे की, अमेरिकेत येनकेनप्रकारेण स्थायिक झालेले मेक्सिकन मतदार मात्र यामुळे डेमोक्रॅट पक्षाकडे वळण्याचा धोका आहे. त्यांना चुचकारण्याचा कार्यक्रम डोनाल्ड ट्रंप यांनी हाती घेतला आहे. तुम्हाला डेमोक्रॅट पक्ष फक्त आश्वासने देऊन तुमच्या तोंडाला पाने पुसत असतो. मी तुम्हाला खरीखुरी मदत करीन. अमेरिकेत स्थायिक झालेले मेक्सिकन चांगले आहेत. मला मेक्सिकन फूड तर जाम आवडते, वगैरे. अहो, टेक्सास हे माझे दुसरे घर आहे. माझे अनेक प्रकल्प टेक्सासमध्ये आहेत, ही भलावण दोनचार टक्के मते जरी वळवू शकली तरी पुरे. नाहीतरी हे लोक रिपब्लिकन पक्षाचे मतदार नाहीतच. 
क्युबन लोकांचा अमेरिकेत प्रवेश - ‘दी वेट फूट, ड्राय फूट पाॅलिसी, या नावाने ओळखला जाणारा हा एक धोरणात्मक भाग असून १९९५ पासून अमलात आला आहे. क्यूबा व अमेरिका यात १९६६ पासून क्यूबन अॅडजस्टमेंट अॅक्ट अस्तित्वात आहे. १९९५ मध्ये या ॲक्टमध्ये अशी सुधारणा करण्यात आली की, जी व्यक्ती क्यूबामधून अमेरिकेत पळून येईल तिला एक वर्षानंतर अमेरिकेत निवासाचा अधिकार मिळेल.  क्यूबा सरकारशी त्यावेळच्या क्लिंटन( तेव्हा हिलरी क्लिंटन यांचे पती बिल क्लिंटन अमेरिकेचे अध्यक्ष होते) शासनाचा असा करार झाला आहे. अमेरिकन सागरी सीमेत मात्र जे लोक अडवले जातील त्यांना अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही. तेव्हापासून हा ‘वेट फूट, ड्राय फूट’ शब्दप्रयोग अस्तित्वात आला आहे. 
‘वेट फूट, ड्राय फूट’चे गौडबंगाल - क्युबाचा जो नागरिक अमेरिका व क्युबा यांना अलग करणाऱ्या पाण्यात असतांना पकडलाअसेल ( वेट फूट) त्याला तात्काळ क्युबा किंवा अन्य देशात परत पाठविण्यात येईल पण जो किनारा गाठेल ( ड्राय फूट) त्याला कायदेशीर स्थायी निवासाचा ( लीगल परमनंट रेसिडेंटचा) अधिकार ( स्टेटस) व यथावकाश नागरिकत्व प्राप्त होईल. याचा परिणाम असा झाला  आहे की क्युबातून तिथल्या दारिद्य्राला कंटाळून किंवा तिथल्या जुलमी राजवटीपासून सुटका करून घेऊन अनेक क्युबन नागरिक लहान मोठ्या बोटीतून अमेरिकेच्या गस्ती बोटींची नजर चुकवून अमेरिकेच्या किनाऱ्याजवळ येतात व पाण्यात उड्या मारून पोहतपोहत अमेरिकेचा किनारा गाठतात. एकदा का त्यांचे पाय जमिनीला लागले ( ड्राय फूट) की त्यांना अमेरिकेत निवासाचा व यथावकाश नागरिकत्वाचा अधिकार प्राप्त होतो. कारण अमेरिकन सागरी मर्यादेत प्रवेश करणाया व्यक्तींना अमेरिका थोपवील व अमेरिकेत येऊ देणार नाही, अशीच करारातील तरतूद आहे. असा लोकविलक्षण करार करण्यामागचे कारण काय असावे? अमेरिकेची दारे जगातील सर्व निर्वासितांसाठी/ परागंदा झालेल्यांसाठी खुली असतील, असा या देशाचा धोरणात्मक निर्णय आहे. पण कॅस्ट्रोच्या जुलमी राजवटीला कंटाळून अख्खा क्यूबाच आश्रयाला येतो की काय अशी स्थिती निर्माण व्हायची वेळ आली म्हणून या उदारमतवादाला मुरड घालण्यासाठी हा वेटफूट, ड्राय फूटचा नियम समाविष्ट झाला असावा. क्यूबालाही  एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होऊ द्यायचे नव्हते व अमेरिकेलाही अरब व उंटाच्या गोष्टीची आठवण होत असावी. या गोष्टातल्या अरबाने ऊंटाला तंबूत आश्रय दिला आणि नंतर जागा न उरल्यामुळे त्याला स्वत:लाच तंबूबाहेर पडायची वेळ आली  होती.
सनातनी मतदार - अमेरिकेत ख्रिश्चन धर्मीयांची संख्या फार मोठी असून इतर सर्व धर्मीय व कोणताच धर्म न मानणाऱ्यांची टक्केवारी दहा टक्यापेक्षा फारशी जास्त नाही. ख्रिश्चनांमध्येही पंथ उपपंथ असून त्यात सनातनी व/वा पुराणमतवाद्यांची संख्या बरीच मोठी आहे. इव्हॅनजेलिकल्स नावाचा पुरामतवाद्यांचा गट हा एक सलग व संघटित सनतनी धर्मवाद्यांचा गट असून त्या गटाची अमेरिकन राजकारणात एक जबरदस्त मतपेढी आहे. तशी ही मंडळी धर्मभीरू व सौम्य प्रकृतीची मानली जातात. आपण भारतात अमेरिकन म्हणजे पुढारलेले, प्रागतिक, सुधारणावादी असे समजतो. अमेरिकेत असा एक मोठा समूह आहेही. पण एखाद्या गर्दीच्या जागी तुम्ही उभे असाल आणि गाण्यात किंवा बोलण्यात येशूचे किंवा एखाद्या ख्रिश्चन संताचे नाव चुकूनही उच्चारले गेले तर दोन्ही हात वर करून ‘आमेन’ म्हणून पुटपुटणारे अनेक आढळतात. आपल्या इथे हरिदासाची कथा सुरू असतांना देवाचे नाव आले की, वाती वळण्याचे थांबवून दोन्ही हात जोडून भक्तीभावाने नमस्कार करणाऱ्या आजीबाईंची आठवण या निमित्ताने झाल्यावाचून राहत नाही.
   अशा या मतपेढीवर डोनाल्ड ट्रंप यांचा वरचष्मा सध्या निर्माण झालेला पाहून अमेरिकन पत्रपंडित काहीसे चक्रावून गेलेले दिसतात. सहाजीकच आहे. तीनतीन लग्ने करणारा, वर्णवर्चस्ववादी, उद्धट, बोलभांड, जुगाराच्या ( कायदेशीर असले म्हणून काय झाले)अड्ड्यांच्या(कॅसिनो)देशभरातील अनेक मालिकांचा स्वामी; व्यवसायाने कंत्राटदार; टोलेजंग इमारती, आलिशान निवासस्थाने, प्रसिद्ध गोल्फ कोर्स व ट्रम्प टॉवर्स (आपल्या पुण्याजवळही ट्रंप टाॅवर आहे, असे ऐकतो) व हॉटेल्सची जगभर साखळी उभारणारा; स्वस्तुतीखोर ट्रंप कुणीकडे आणि हा पापभीरू, धार्मिक, सौम्य व शांत धार्मिक गट कुणीकडे?  
डोनाल्ड ट्रंपची चतुरा ई - डोनाल्ड ट्रंप तसे चलाख व चतुर आहेत. त्यांना या गटाच्या मानसिकतेची चाहूल लागली होती. रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनात आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी साह्यभूत ठरलेल्या या गटाचे आभार त्यांनी जेव्हा मानले तेव्हाच अनेक पत्रपंडितांच्या भिवया उंचावल्या होत्या. आतातर मतदारांचा हा मोठा गट डोनाल्ड ट्रंप यांच्या पाठीशी उभा राहणार अशी अनेकांची खात्रीच झाली आहे. यांचा पाठिंबा मिळावा या योग्यतेचा मी आहे किंवा नाही, याची माझी मलाच शंका आहे, असे म्हणून डोनाल्ड ट्रंप यांनी आपल्या विनयशील वृत्तीचे ( अनेकांच्या मते चतुर राजकारणी चालीचे) दर्शन घडविले होते. 
अमेरिकेत मतदारांच्या मनाच्या कौलाचा आढावा घेणाऱे एकापेक्षा जास्त अभ्यास गट आहेत. ते प्रश्नावली समोर ठेवतात (आॅन लाईनही) आणि मतदार मनमोकळेपणाने व उघडरीत्या मतप्रदर्शन करतात. मतदार नोंदणीतच अनेक मी डेमोक्रॅट पक्षाचा किंवा रिपब्लिकन पक्षाचा अशी नोंदणी करू शकतात आणि अनेक तशी नोंदणी करतातही. निवडणूक जसजशी जवळ येईल तसतशी बहुतेकांच्या मोटारींवर ‘आय ॲम ए डेमोक्रॅट’ किंवा ‘आय ॲम ए रिपब्लिकन’ अशी स्टिकर्स दिसू लागतील. अमेरिकनांच्या या वृत्तीमुळे मतचाचण्यांची विश्वसनीयता  पुष्कळच वाढलेली आढळते. या अशा चाचण्यांच्याआधारे इव्हॅनजेलिकल मतदारांचा कौल डोनाल्ड ट्रंप यांच्याकडे कसकसा वळत गेला, ते कळते. सुरवतीला या गटातील १५ टक्केच मतदार डोनाल्ड ट्रंप यांना अनुकूल होते. आता हे प्रमाण ९५ टक्यांपर्यंत पोचले आहे. असे का घडले? यामागे अमेरिकन मतदारांची वास्तववादी भूमिका आहे. ‘दोन वाईटांपैकी त्यातला त्यात कमी वाईट निवडायचा’ या शब्दात या भूमिकेचे वर्णन करता येईल. 
एक नाजुक मुद्दा- समलिंगींबाबतची  तसेच गर्भपाताबाबतची डेमोक्रॅट पक्षाची भूमिका ही मतपेढी रिपब्लिकन पक्षाकडे झुकण्यास कारणीभूत झालेली दिसते आहे. सामान्यत: नैतिकतेचा पुरस्कार करणारा हा इव्हॅनजेलिकल मतदार वर्ग अगदी विरुद्ध वृत्ती/प्रवृत्तीच्या डोनाल्ड ट्रंप यांच्याकडे या दोन मुद्द्यांमुळे वळला आहे.
  हिलरी क्लिंटन एकदाका अध्यक्षपदी निवडून आल्या तर त्या सर्वोच्च न्यायालयात उदारमतवादी न्यायाधीशांची नेमणूक करणार हे नक्की. (अमेरिकेत सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक अध्यक्ष करतो व सिनेटला त्याची त्यांची पुष्टी (कनफर्म) करण्याचे अधिकार आहेत.) सध्या समलिंगींच्या विवाहाला मान्यता व गर्भपाताला अनुमती या दोन मुद्द्यावरून अमेरिकन सांस्कृतिक जगतात ‘युद्ध’ सुरू आहे. गेली तीस वर्षे अमेरिकन सनातन्यांनी हा किल्ला लढवत आणला आहे. ही हरणारी लढाई आहे, हे त्यांना आता जाणवू लागले आहे.पण यांचा कडवेपणा कायम आहे. आम्हाला एकवेळ व्हर्मिन सुप्रीम ( सरकारच नको असे मानणारा एक अमेरिकन नेता) अध्यक्ष झाला तरी चालेल पण आम्ही हिलरी क्लिंटनला अध्यक्ष होऊ देणार नाही, एवढी टोकाची भूमिका हे लोक घेत आहेत. डोनाल्ड ट्रंप यांना मत न देणे याचा अर्थ यांच्या मते असा होतो की, गर्भपाताला अनुमती दिल्यामुळे जन्माला येऊ पाहणाऱ्या हजारो बालकांना जन्माआधीच मृत्यूच्या खायीत लोटणे होय व हे धर्माच्या शिकवणीच्या (गो ॲंड मल्टिप्लाय) विरुद्ध आहे. 
त्यामुळे गर्भपाताला अनुमती असलेल्यांबाबत या निवडणुकीत कोणती भूमिका घ्यावी याविषयी निरनिराळी मतेही व्यक्त होत आहेत. १) काही म्हणतात, ‘आपण मतदानाला गेलोच नाहीतर काय होईल?’ पण याचा फायदा हिलरी क्लिंटन यांनाच होईल. 
२) तर काहींचे म्हणणे आहे, ‘मतदानाला गेलो पण अध्यक्षीय उमेदवारांना मतदान न केले तर काय होईल?’ हिलरी क्लिंटन निवडून येतील खऱ्या पण अध्यक्षीय निवडीतच कमी मते पडलेली दिसतील. हाऊस अाॅफ रिप्रेझेंटेटिव्हसाठी सुद्धा याचवेळी मतदान होणार आहे. त्या मतदानात मतदारांचा भरपूर उत्साह पण अध्यक्षाच्या निवडणुकीबाबत मात्र उदासीनता, यावरून काय दिसेल? कमी पडलेली मते हे दाखवतील की, आमचा विचार न करून चालणार नाही. २०१६ साली अमेरिका आपला ५८ वा अध्यक्ष चतुर्वार्षिक निवडणुकीने निवडणार आहे पण मतदार एवढ्या मोठ्या प्रमाणात  किंकर्तव्यमूढ झाल्याची ही बहुदा पहिलीच वेळ असावी. 


No comments:

Post a Comment