Sunday, August 18, 2019

भरपूर पगाराची नोकरी आणि तीही परदेशात!

भरपूर पगाराची नोकरी आणि तीही परदेशात! 
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 
    कुवेत हा एक संपन्न व अतिप्राचीन वारसा असलेला पर्शियन आखाती देश आहे. कुवेत हे राजधानीचे शहर आधुनिक शिल्पांनी नटलेल्या गगनचुंबी इमारती, प्राचीन वारशाची साक्ष पटविणारी वस्तुसंग्रहालये आणि इस्लामी कलाकुसरींनी सुशोभित केलेल्या मनोऱ्यांची रेलचेल असलेले सुंदर म्हणून सर्वपरिचित आहे. इथले 70 % लोक इतर देशातून हद्दपार होऊन आलेले आहेत. खनिजतेलाच्या सहज उपलब्ध होऊ शकतील गडगंज साठ्यांचा शोध लागला आणि या देशाचे भाग्य फळफळले तसेच संपन्नतेसोबत आधुनिकताही आली आहे. अशा देशात नोकरी मिळावी म्हणून अनेक इच्छुक धडपडत असतात. अशा लोकांना आपल्या जाळ्यात पकडून पैसे कमावण्याचा धंदा सध्या जोरात सुरू आहे.
    भोळे, भाबडे पण लोभी गरजू इच्छुक, भल्यामोठ्या पगाराची नोकरी देतो असे आश्वासन देणारे भामटे, जागरूक जनप्रतिनिधी आणि तत्पर परराष्ट्रव्यवहार खाते यांच्याशी संबंधित ही कथा आहे. लोकप्रतिनिधी कसा जागृत असावा, परराष्ट्रव्यवहार खाते भारतीय नागरिकांना मदत करण्याचे बाबतीत किती तत्पर असावे आणि योग्यतेच्या तुलनेत भरमसाठ पगाराची नोकरी देऊ करणारे कसे लुच्चे असतात, या तिन्हींचा परिचय करून देणारी नाट्यमय पण दु:खद घटना नुकतीच समोर आलेली आहे.
   भरपूर पगाराची नोकरी 
   वरूण हा बी काॅम पदवीधर तरूण एका ई - काॅमर्स फर्ममध्ये डिलिव्हरी एजंट म्हणून काम करीत होता. त्याची मिळकत बेताचीच होती. आपल्या योग्यतेच्या तुलनेत करावे लागणारे काम आणि मिळणारा तुटपुंजा पगार यामुळे तो असमाधानी होता. अशा परिस्थितीत भरपूर पगार देऊ करणाऱ्या नोकरीची जाहिरात त्याच्या वाचनात आली. पेट्रोडाॅलरमुळे कुवेत हा एक अतिसंपन्न देश असून तिथे भरपूर पगाराची नोकरी उपलब्ध होती. आपले व आपल्या कुटुंबीयांचे भावी जीवन आता सुखासमाधानात जाणार या आशेने त्याने या नोकरीसाठी प्रयत्न करण्याचे ठरविले.
 फसलेले 31
   कुवेतमध्ये पाऊल ठेवताच त्याच्या स्वप्नांचा चुराडा झाला. पण असा अनुभव येणारा तो एकटाच नव्हता. कर्नाटकातील मंगलुरु शहरातील मोजून 31 तरूण कुवेतमध्ये अडकून पडले होते. त्यांच्यापैकी 20 जण भारतात परत आले असून बाकीचे सुटकेच्या प्रतीक्षेत कुवेतमध्येच अडकून पडले आहेत. कुवेतमध्ये गेले तेव्हा त्यांच्या खिशात फारसे पैसे नव्हते. तसे असण्याची आवश्यकताही नव्हती. बेकायदा प्रवेश केल्याबद्दल भरावा लागणारा दंड आणि परतीच्या विमानाचे भाडे एका सेवभावी संस्थेने मदत म्हणून दिल्यामुळे ते मायदेशी परत येऊ शकले आहेत. आपण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच कुवेतमध्ये आलो आहोत, अशी प्रत्येकाची समजूत होती.
  कुवेतमध्ये सर्वांनाच गलेलठ्ठ पगार 
    खाद्यपदार्थ घरोघर पोचविण्यासाठी एवढा पगार कसा काय देऊ केला जातो आहे हा विचार वरूणच्या मनाला का शिवला नाही? याची कारणे दोन होती. एक म्हणजे त्याचे पदनाम. तो बाईक फूड डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह या पदावर नियुक्त होणार होता. ‘एक्झिक्युटिव्ह’ या पदाला प्रतिष्ठा असणारच. आणि कुवेतमध्ये सर्वांनाच गलेलठ्ठ पगार देतात, तिथे भारतासारखे कमी पगार नसतात, हे तो ऐकून होता आणि तसे त्याला आश्वासनही मिळाले होते. स्थानिक वृत्तपत्रातील जाहिरात वाचून त्याने अर्ज केला. मुलाखत तर कमालीची चांगली झाली होती. 40 हजार रुपये पगार, राहण्याचीच नव्हे तर जेवणाखाण्याची फुकट सोय असणार होती. म्हणजे दैनंदिन जुजबी खर्चापोटी 25 % टक्के पगार खर्च होईल असे गृहीत धरले तरी दरमहा 75 % पगार शिल्लकच राहणार होता की. पण नशिबाने दगा दिला. सात महिने हालअपेष्टेशिवाय काहीही वाट्याला आले नाही. उपासमारीला तोंड द्यावे लागत होते.
  एवढी चांगली नोकरी मिळते आहे म्हटल्यावर वरूणने एजंटाला 70 हजार रुपये कमीशन पोटी देणे हा काही महागातला सौदा नव्हता. घरातले सोने, किडुकमिडुक विकून मित्रांकडून परत बोलीवर उधार पैसे गोळा करून वरूणने कमीशनसाठीची रक्कम उभी केली होती.
  एजंटाचा भामटेपणा लक्षात आला नाही
   अबूबकर सिद्दिकीची कथा थोडी वेगळी आहे. तो फक्त 10 वी पास होता. ड्रायव्हर आणि मोटर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये तो इन्स्ट्र्क्टर म्हणून काम करीत होता.तो कुटुंबवत्सल होता. पदरात दोन वर्ष वयाची  मुलगीही होती. घरातला एकटाच कमावता असल्यामुळे मित्रांकडून कर्जाऊ घेतलेले पैसे आता कसे फेडायचे, या विवंचनेत आज तो जगतो आहे. त्याच्या डोक्यात आता आपण असे कसे फसलो गेलो, याबाबतचे विचार थैमान घालत असतात. मुळात मुलाखत हाच एक फार्स होता, हे त्याला आता जाणवते आहे. मुलाखत घेणारी कंपनी, तिचा एजंट हे सर्वच भामटे होते, हे वेळीच आपल्या  लक्षात का आले नाही? हा विचार त्याच्या मनात आता राहून राहून येत असतो. पण आता पश्चाताप करून काय उपयोग?
 मुलाखतीत सगळेच पास
   मुलाखतीला या दोघांसोबत थोडेथोडके नव्हे तर 120 जण होते. प्रत्येकाने 65 ते  70 हजार एजंटाला कमीशन म्हणून दिले होते. मुलाखतीत सर्वच उत्तीर्ण झाले. ही आश्चर्याची बाब होती. पण कुवेतमध्ये नोकऱ्या खूप असून योग्य उमेदवारांचा तुटवडा आहे, हे कळताच त्यांचे समाधान झाले. खरेतर याचवेळी मी सावध व्हायला हवे होते, असे सिद्दिकी आज म्हणतो आहे. निवड झालेल्यात काहीतर शारीरिक दृष्ट्याही सक्षम नव्हते. पण खूप नोकऱ्या आणि कमी उमेदवार असले की अशी थोडीफार तडजोड मालक मंडळी करतातच, हा युक्तिवाद त्यांना लगेचच पटला. 
   व्हिडिओमुळे खळबळ 
   पण सिद्दिकी तसा हुशारच म्हटला पाहिजे. कुवेतमध्ये नोकरीनिमित्त आलेल्यांची दुर्दशा दाखवणारा एक व्हिडिओ त्याने तयार केला. त्यासाठी स्वत: जवळचे होते नव्हते तेवढे सर्व पैसे त्याने खर्च केले. तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि मंगलोर शहरात एकच खळबळ उडाली. मंगलोर (दक्षिण) मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले डी वेदव्यास कामत हे एक जागृत लोकप्रतिनिधी मानले जातात. त्यांनी परराष्ट्रव्यवहार खात्याशी संपर्क साधला. श्रीमती सुषमा स्वराज यांनी परराष्ट्रव्यवहार खात्याची धुरा स्वीकारताच त्याच्या कारभारात आमुलाग्र बदल घडवून आणला आणि  तेव्हापासून हे खाते परदेशातील भारतीयांकडे अधिक आस्थेने पाहू लागले आहे. आताचे परराष्ट्रव्यवहार मंत्री  डाॅ. सुब्रह्मण्यम जयशंकर यांनीही ही प्रथा अशीच जोपासत आहेत. या व्हिडिओमुळे सर्वत्र एकच खळबळ उडेल, असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. भारताच्या परराष्ट्र व्यवहार खात्यासोबत अनेक लोक आमच्या मदतीसाठी धावून आले आणि त्यांनी आम्हाला नरकयातनातून बाहेर काढले.
   जागरूक लोकप्रतिनिधी आणि सरकार 
   ही माहिती कळताच लोकप्रतिनिधी डी वेदव्यास कामत आणि परराष्ट्रव्यवहार खाते यांनी तातडीने हालचाली केल्या. कुवेतमधील भारतीय वकिलातीमधील अधिकाऱ्यांनी या लोकांची तातडीने भेट घेतली आणि दोन महिन्यांचे आत यांना मायदेशी परत आणले. अशाप्रकरणी सामान्यत: सहा महिने तो दोन वर्षे इतकी प्रतीक्षा करावी लागते, असे सांगतात.
  आमच्याजवळ डाटापॅक घ्यायला पैसे नव्हते. त्यामुळे व्हिडिओ आॅनलाईन लवकर करता आला नाही. पण सुदैवाने आम्हाला फ्री वाय-फाय झोन सापडला.
   अभिषेक बंडजे हा सिव्हिल इंजिनिअर होता. तो तर मंगलुरुतील नोकरी सोडून आला होता. कुवेतमध्ये काही दिवस राहून बक्कळ पैसे मिळवू आणि मग भारतात परत येऊन स्वतंत्र धंदा करण्याचे त्याचे स्वप्न होते. जवळ काही पैसे घेऊन अभिषेक कुवेतला गेला होता. नोकरीसाठी त्याने तीन महिने वाट पाहिली. जसजसे दिवस जात होते, तसतसा खिसा रिकामा होत चालला होता. इतर सर्व कागदपत्रे दिले तरी चालते, नव्हे ते द्यायचेच असतात पण आपला पासपोर्ट आपल्याजवळच ठेवायचा असतो, हे त्याला माहीत होते.
   लेबर कॅंपमध्ये रवानगी 
   काहींची रवानगी लेबर कॅंपमध्ये करण्यात आली. तिथे खायला देत पण नियमानुसार पैसे द्यायला हवेत, ते मिळत नव्हते. कशीबशी सोय करून या सर्वांनी सिम कार्डे विकत घेतली. भारतात घरच्यांशी संपर्क साधला. प्रसाद शेट्टी हा त्यांचा एजंट होता. त्याला ते सारखा फोन करीत असत. माणिक्य असोसिएट्स या कंपनीचा तो एजंट होता. कंपनीकडे त्यांनी उधार पैसे मागितले. बऱ्याच विनवण्या केल्यानंतर कंपनीने माणशी 4000 रुपये दिले.पण ते पुरणार होते थोडेच.
  बाईक डिलिव्हरी बाॅय म्हणून फक्त आठ लोकांना काम मिळाले. कुणीतरी त्यांच्या लक्षात आणून दिले की माणिक्य असोसिएट्स या कंपनीला कुवेत सरकारने काळ्या यादीत टाकले होते. सर्व अनर्थाचे कारण हे होते.कुवेतमध्ये काळ्यायादीत टाकलेल्या कंपनीमुळे यांना काम करता येत नव्हते. हा गुन्हा होता. त्याचा त्रास या सगळ्यांना होत होता. पण हे इथे आल्यावर कळले. 
 कुवेतच्या रोजगार मंत्रालयाकडे यांनी कामासाठी अर्ज केला. पण झाले भलतेच. काम मिळणे तर दूरच राहिले, त्यांना खायला देणेही बंद करण्यात आले. आता भीक मागून दिवस काढण्यावाचून मार्ग उरला नाही.
    सेवाभावींची मदत 
   व्हिडिओ पाहताच खुद्द कुवेतमधील लोक मदतीसाठी धावून आले. भारतीय वकिलातीने कुवेत शासनाकडे रदबदली केली. कुवेतमध्ये भारतीय प्रवासी परिषद नावाची सेवाभावी काम करणारी संस्था आहे. त्यांनी पैशाची मदत केली तसेच भारतात परतण्यासाठीच्या खर्चाचा काही भार उचलला. परदेशी जाण्याची महत्त्वाकांक्षा बाळगण्यात काहीही गैर नाही. पण ज्याच्या माध्यमातून हा प्रयत्न करायचा त्याबाबतची सर्व आणि सखोल माहिती घेण्याची काळजी मात्र घेतली पाहिजे.

No comments:

Post a Comment