Monday, September 12, 2022

तैवानचे लोकविलक्षण साहस तरूण भारत, नागपूर. मंगळवार, दिनांक१३/०९/२०२२ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल. तैवानचे लोकविलक्षण साहस वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? चिनी फौजांनी तैवानच्या प्रदेशात अतिक्रमण केले तर तैवान प्रत्याक्रमण करून तोडीसतोड उत्तर देईल, असा इशारा तैवानने चीनला दिला आहे. तैवान हे लोकशाहीप्रधान स्वतंत्र राष्ट्र आहे, अशी तैवानची ठाम भूमिका आहे. तर तैवान हा चीनचाच एक भाग आहे, अशी भूमिका स्वीकारून चीनने तैवानच्या भूमिकेला सपशेल अमान्य केले अाहे. अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेच्या (हाऊस ॲाफ रिप्रेझेंटेटिव्हज) अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी तैवानला भेट दिल्यानंतर चवताळलेल्या चीनच्या कारवाया तैवानच्या सामुद्रधुनीत खूपच वाढल्या आहेत. या सामुद्रधुनीला चीन आपला ‘अंतर्गत सागर’ (इन्नर सी) बनवू इच्छित आहे. यामुळे हा एरवी शांत असलेला जलाशय संभाव्य अस्थिरतेमुळे ढवळून निघाला आहे. चीनचे ड्रोन चीनच्या किनाऱ्यालगतच्या छोट्या छोट्या बेटांजवळ घिरट्या घालीत असतात. परत फिरण्याची ताकीद दिल्यानंतरही जर त्यांना परत बोलावले नाही, तर सुरवातीला ताकीद देणारा गोळीबार (वॅार्निंग शॅाट्स) करू, तरीही ते परत फिरले नाहीत तर जबाबी कारवाई करू, असे तैवानच्या सेनाधिकाऱ्यांनी चीनला बजावले आहे. जर कुणी या मुक्त व खुल्या सामुद्रधुनीत अतिक्रमण करील तर आम्ही स्वसंरक्षणासाठी नक्कीच प्रत्याक्रमण करू, असे म्हणत तैवानच्या अध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी चीनच्या या चिथावणीखोर कृत्याची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी आवश्यक ते सर्व उपाय योजण्याचे आदेश तैवानच्या सेनाधिकाऱ्यांना दिले आहेत. सध्या ब्रिटन, कॅनडा आणि अमेरिका यांच्या जहाजांचे तैवानच्या सामुद्रधुनीतून येणेजाणे सुरू झाले आहे. सायबर हल्ले करणाऱ्यात पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनने तैवानची दळणवळण व्यवस्था, संपर्क व्यवस्था आणि औद्योगिक व्यवहार उध्वस्त करण्यावर लक्ष केंद्रित केलेले दिसते. लहानशा तैवानमध्ये या तिन्ही व्यवस्थांची नियंत्रण केंद्रे मर्यादित जागेत गर्दी करून आहेत. त्यामुळे हवाई हल्ल्यासाठीही ती सोयीची लक्ष्ये ठरतील अशी आहेत. कुणाची तयारी कशी? जगातील सर्वात मोठे सैन्यदल असलेल्या चीनने तैवानच्या सामुद्रधुनीत नुकतीच आजवरची सर्वात मोठी सैनिकी कवायत पार पाडून शक्तिप्रदर्शन केले आहे, यात शंका नाही. या शक्तिप्रदर्शनात बॅाम्बफेकी विमाने, लष्करी नौकांसह सशस्त्र पाणबुड्या आणि ड्रोन्स यांचा सहभाग होता. तैवानने कवायतीच्या या कारवाईला बेकायदेशीर आणि बेमुर्वतखोर कृत्य (इल्लिगल ॲंड रेकलेस) या शब्दात धिक्कारले आहे. अमेरिकन संसदेच्या प्रतिनिधीसभेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या पाठोपाठ ही सैनिकी कवायत करून चीनने अमेरिका, तैवान आणि जगातील अन्य सर्व देशांना जाणीव करून देणारे प्रत्यक्ष कृतीने दिलेले उत्तर मानले जाते. एका अंदाजानुसार चीनजवळ 200 च्यावर अण्वस्त्रे आहेत. चीनचे एकूण सैन्यदल 20 लाख आहे तर तैवाचे सेनादल जवळ जवळ 2 लाख आहे. चीनचे क्षेत्रफळ 9.6 मिलियन चौकिमी तर तैवानचे अवघे 36 हजार चौकिमी आहे. चीनची लोकसंख्या 144 कोटी तर तैवानची फक्त 2.36 आहे. थोडक्यात असे की, तैवान आणि चीन मधला हा संघर्ष जगातला आजवरचा बहुदा सर्वात विषम संघर्ष आहे. मात्र अमेरिकेने तैवानला पुरविलेली शस्त्रास्त्रे, विमाने आदी आधुनिकतम असून त्यातली काहीतर जगात प्रथमच वापरात येतील, अशी आहेत. कमतरता भरून काढण्यास ही कितपत उपयोगी सिद्ध होतात, हे प्रत्यक्ष युद्धादरम्यानच स्पष्ट होईल. अमेरिकेने तैवानला नुकतीच 1.1 बिलियन डॅालर किमतीची लष्करी आयुधे पुरवली आहेत. यात जल, थल आणि नभ अशा कोणत्याही मार्गाने होणाऱ्या हल्याला यशस्वी रीतीने तोंड देता येईल अशी सैनिकी सामग्री आहे. अशाप्रकारे चीन आणि तैवान यातील संघर्ष हळूहळू चीन अमेरिका यातील अप्रत्यक्ष संघर्षात रुपांतरित होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तैवानच्या अध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी स्पष्ट केले आहे की आम्ही कोणतेही चिथावणीखोर कृत्य करणार नाही. पण खोडी काढणाऱ्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. भारताच्या भूमिकेत बदल ? विशेष म्हणजे भारतानेही पहिल्यांदाच चीनला स्पष्ट शब्दात सुनावले आहे. श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तानांनी तैवान सामुद्रधुनीक्षेत्राचे चीनने सैनिकीकरण केले आहे, अशी टिप्पणी केली आहे. भारताच्या शासकीय शाखेपैकी एखाद्या शाखेने असे विधान नोंदवण्याची ही पहिलीच वेळ आहे. चीनच्या श्रीलंकेतील वकिलांनी लिहिलेल्या एका लेखाच्या संदर्भात वार्ताहराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना भारताचे श्रीलंकेतील उच्चायुक्त आपली प्रतिक्रिया देत होते. तैवानबाबतची आत्ताची परिस्थिती आणि चिनी संशोधन कार्य करणाऱ्या युआन वॅंग जहाजाची हंबनटोटा बंदराला दिलेली भेट यांची तुलना उच्चायुक्तांनी यावेळी केली. भारताचे परराष्ट्र खात्याने या अगोदर तैवानबाबत असे विधान केले नव्हते. तैवान संबंधात सध्या ज्या घटना घडत आहेत, त्याबाबत भारताला चिंता वाटते आहे, एवढेच मत परराष्ट्र खात्याने केले होते. कुणीही वातावरणात काही विपरित घडेल कृत्य करू नये, एवढीच अपेक्षा भारताने व्यक्त केली होती. पण चीनच्या हेरगिरी करणाऱ्या जहाजाचे श्रीलंकेत पोचणे आणि भारताने आक्षेप घेताच भारतच श्रीलंकेच्या सार्वभौमत्वाचा भंग करतो आहे, असे चीनने सूचित करताच भारताने हे तोडीसतोड उत्तर दिले आहे. केव्हातरी असे काही तरी होणारच होते. त्यामुळे जे झाले ते ठीकच झाले, असे म्हटले पाहिजे. या निमित्ताने भारताने तैवानबाबत एक निर्भिड भूमिका घेतलेली दिसते. तैवान एक लोकशाहीप्रधान देश आहे, ते एक जागतिक आर्थिकक्षेत्राचे इंजिन हीआहे, याशिवाय सोमीकंडक्टरक्षेत्रावर तैवानचे अतुलनीय प्रभुत्व आहे. त्यामुळे स्वतंत्र तायवान ही संपूर्ण जगाचीही गरज आहे, अमेरिकन प्रतिनिधीसभेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या भेटीनंतर जोरात सुरू झालेल्या चिनी सैन्याच्या तैवानच्या सामुद्रधुनीतील सैनिकी कवायतींकडे साफ दुर्लक्ष करीत अमेरिकेच्या अन्य प्रतिनिधींच्या तैवानला भेटी चालूच आहेत, ह्या बाबींची राजकीय निरीक्षकांनी विशेष नोंद घेतली आहे. चीनची शृंगापत्ती(डायलेमा) चीनचे लक्ष सध्या नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या चिनी साम्यवादी पक्षाच्या विसाव्या अधिवेशनावर केंद्रित आहे. अमेरिकेसोबत चीनवर दबाव निर्माण करण्याचे दृष्टीने यासारखी अनुकूल परिस्थिती भारतासाठी लवकर येणार नाही. यावेळी तैवानबाबत गप्प राहणे भारताच्या हिताचे नाही. भारत आणि तैवान यांच्यातील मैत्री आणि सहकार्य खूप महत्त्वाचे आहे. सेमीकंडक्टरची भारतात निर्माण करण्याबाबतच्या वाटाघाटी भारताने ताबडतोब पूर्णत्वाला न्यायला हव्यात. अमेरिकेच्या दोन युद्धनौका तैवानच्या सामुद्रधुनीत नुकत्याच दाखल झाल्या आहेत. नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीनंतर आणि चीनने याक्षेत्रात आपल्या नौकांच्या हालचाली सुरू केल्यानंतर प्रथमच अमेरिकन युद्धनौका तैवानच्या सामुद्रधुनीत शिरल्या आहेत. ही त्यांची नित्याची फेरी आहे, असे अमेरिकेने घोषित केले आहे. ॲंटिटाम आणि चान्सेलर्सव्हिले या नावाच्या अमेरिकेच्या दोन क्रूझर प्रकाच्या युद्धनौकांवर गायडेड मिसाईल्स बसवण्यात आली आहेत, या बाबीची नोंद चीनने नक्कीच घेतली असणार आहे. उत्तरादाखल सामुद्रधुनीवर आमचा अधिकार आहे, असे जरी चीनने जाहीर केले असले तरी अमेरिकन युद्धनौकांचा या क्षेत्रात संचार सुरूच राहील, असेही अमेरिकेने स्पष्ट केले आहे. यावर चीनने आणखी कोणतीही टिप्पणी केलेली नाही, याची नोंद घेणे आवश्यक आहे. अमेरिकन नौकांचा या क्षेत्रात शिरण्याचा उद्देश मुक्त संचार स्वातंत्र्याची जाणीव करून देणे हा आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे. आमची जहाजे समुद्राच्या त्याच भागातून गेली आहेत, ज्या भागावर कोणत्याही राष्ट्राचे स्वामित्व नाही. आम्ही स्वतंत्र आणि खुल्या भारत-प्रशांत (इंडो-पॅसिफिक) क्षेत्राचे पाठीराखे आहोत, हेच या नौकांच्या संचाराने आम्हाला जगाला दाखवायचे आहे. अमेरिकन विमाने आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार स्वतंत्र आणि खुल्या असलेल्या क्षेत्रातून उड्डाण भरतील, नौकानयन किंवा पथसंचलनही करतील. तैवानच्या सेनाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, अमेरिकन युद्धनौकांचा सामुद्रधुनीतून उत्तर दक्षिण असा केलेला प्रवास ही एक सामान्य घटना आहे. चीनने या घटनेचे विनाकारण भांडवल करू नये. अमेरिका आणि तैवान यांच्या या एकाचवेळी केलेल्या वेगवेगळ्या प्रगटीकरणांमुळे चीनच्या धमक्यांना आपण भीक घालीत नाही, कोणत्याही परिणामांसाठी आपण तयार आहोत, हे अमेरिका आणि तैवानने चीनला आणि जगाला दाखवून दिले आहे. आता आणखी पुढचे पाऊल उचलावे तर युद्धाचीच तयारी ठेवायला हवी आणि गप्प बसावे तर जगभर चीनबद्दल एक वेगळाच संदेश जाईल, अशा शृंगापत्तीत (डायलेमा) चीन सापडला आहे. त्यातून नोव्हेंबरमध्ये शी जिनपिंग यांना तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षदावर आरूढ होण्यासाठी पायंडा बाजूला सारून आमसभेकडून (सर्वोच्च समितीकडून) शिक्कामोर्तब करून घ्यायचे आहे. आजवरच्या सर्व राष्ट्राध्यक्षांदा दोनदाच राष्ट्राध्यक्षपद मिळाले आहे. याला चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या आमसभेकडून अपवाद मान्य करून घेऊन तिसऱ्यांदा राष्ट्रध्यक्षपदी विराजमान होण्याचा शी जिनपिंग यांचा प्रयत्न आहे. यावेळी तैवानप्रकरणी नामुष्की पत्करत कम्युनिस्ट पक्षाच्या आमसभेसमोर शी जिनपिंग ताठ मानेने कसे जाऊ शकतील?. याशिवाय पक्षातील विरोधक डोके वर काढण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. त्यामुळे तैवानचे प्रकरण भविष्यात कोणते वळण घेते याकडे सर्व जग उत्सुकतेने पहात आहे.

No comments:

Post a Comment