Monday, September 26, 2022

‘हे युग युद्धाचे नाही’, मोदींची मुत्सद्देगिरी तरूण भारत, नागपूर. मंगळवार, दिनांक२७/०९/२०२२ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल. ‘हे युग युद्धाचे नाही’, मोदींची मुत्सद्देगिरी वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? उझ्बेकिस्तानमधील समरकंद शहरात शांघाय सहकार्य संघटनेची शिखर परिषद नुकतीच संपन्न झाली आहे. पर्शियन भाषेत समर म्हणजे दगड किंवा खडक आणि कंद म्हणजे किल्ला किंवा गाव. असे आहे हे समरकंद किंवा दगडी किल्ला किंवा खडकांचे गाव. उझ्बेकिस्तानची राजधानी ताश्कंद म्हणजेही दगडांचे गावच. ताश म्हणजे दगड आणि कंद म्हणजे गाव. समरकंद आग्नेय उझ्बेकिस्तानमधले तसेच मध्यआशियातीलही सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे. ख्रिस्तपूर्व 7 व्या किंवा 8 व्या शतकातील हे गाव चीन आणि युरोपला जोडणाऱ्या रेशीम मार्गामुळे (सिल्क रूट) भरभराटीला आले, असे सांगतात. अलेक्झांडरने ख्रिस्तपूर्व 320 मध्ये हे शहर जिंकले तेव्हा ग्रीक लोक याला नुसते मरकंद म्हणत. आज या शहराची लोकसंख्या 5.5 लक्ष इतकी आहे. उझ्बेकिस्तानमधील समरकंद येथे शांघाय कोॲापरेशन ॲार्गनाझेशन (एससीओ) किंवा शांघाय सहकार्य संघटन म्हणजे युरेशियातील (युरोप आणि आशियातील) राजकीय, आर्थिक आणि संरक्षणविषक उद्दिष्ट्ये समोर ठेऊन 15 जून 2001 ला चीन, कझख्सस्थान, किर्गिस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांनी स्थापन केलेली आघाडी आहे. उझबेकिस्थान वगळता उरलेल्या पाच राष्ट्रांचा गट शांघाय फाईव्ह या नावाने 26 जून1996 पासूनच कार्यरत होता. आज या संघटनेचे भारत आणि पाकिस्तान हे 9 जून 2017 ला सदस्य झाल्यानंतर 8 सदस्य आहेत. इराणने 17 सप्टेंबर 2021 ला सदस्येसाठी एमओयुवर स्वाक्षरी केली असून 2023 मध्ये भारतात शांघाय सहकार्य संघटनेची शिखर परिषद होईल तेव्हा, इराणला सदस्यता बहाल करण्यात येणार आहे. असे आहे शांघाय सहकार्य संघटन भौगोलिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर शांघाय कोॲापरेशन ॲार्गनाझेशन (एससीओ) किंवा शांघाय सहकार्य / सहयोग संघटन ही जगातील सर्वात मोठी प्रादेशिक संघटना आहे. युरेशियाचा 60% भूभाग या संघटनेने व्यापला आहे तर जगातील 40% लोक या संघटनेने व्यापलेल्या क्षेत्रात राहतात. जगाचा 30% ग्रॅास डोमेस्टिक प्रॅाडक्ट (जीडीपी)/सकल देशांतर्गत उत्पन्न या क्षेत्रातून येते. एका विशिष्ट कालावधीत देशातल्या वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाची किंमत म्हणजेच जीडीपी होय. निरीक्षक - या आघाडीत निरीक्षक म्हणून अफगाणिस्तान, बेलारुस, इराण आणि मंगोलिया हे देश आहेत. डायलॅाग पार्टनर्स - डायलॅाग पार्टनर्स (संवादात सहभागी होणारे) या नात्याने आर्मेनिया, अझेरबाईजान, इजिप्त, कंबोडिया, नेपाळ, कतार, सौदी अरेबिया, श्रीलंका आणि तुर्कस्तान यांचा समावेश आहे. गेस्ट अटेंडंट्स - याशिवाय गेस्ट अटेंडंट्स (पाहुणे म्हणून निमंत्रित) म्हणून एसियन (असोसिएशन ॲाफ साऊथइस्ट एसियन नेशन्स), सीआयएस (कॅामनवेल्थ ॲाफ इंडिपेंडंट स्टेट्स) तुर्कमेनिस्तान, युएन (युनायटेड नेशन्स) हेही निमंत्रित असतात. मुख्यालय - संघटनेचे. बेजिंग येथे मुख्यालय असलेली आणि चिनी व रशियन या अधिकृत व्यवहार भाषा असलेली ही युरेशियातील (युरोप व आशिया खंडातील) संघटना राजकीय, आर्थिक आणि संरक्षण या विषयांशी संबंधित आहे. कोरोना महामारीच्या काळात या संघटनेची शिखर परिषद आभासी पद्धतीने 2020 मध्ये रशियाने तर 2021 मध्ये ताजिकिस्तानने आयोजित केली होती. यावर्षी म्हणजे 2022 मध्ये उझबेकिस्तानमध्ये समरकंद येथे 15 व 16 सप्टेंबरला शांघाय सहयोग संघटनेची शिखर परिषद आयोजित होती. समरकंद शिखर संमेलन उझ्बेकिस्तानमध्ये 15 आणि 16 सप्टेंबर 2022 ला युक्रेन-रशिया युद्धाच्या कृष्णछायेखाली संपन्न झालेल्या शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी समरकंद येथे आलेल्या राष्ट्रप्रमुखांचे स्वागत उझ्बेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांनी केले. यात किर्गिस्तान सदयर जापारोव्ह कझख्सस्थानचे अध्यक्ष कासीम-जोमार्ट टोकयेव, ताजिकिस्तानचे अध्यक्ष एमोमाली रहमॅान, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, भारतचे पंतप्रधान - नरेंद्र मोदी, पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ आणि इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा प्रामुख्याने समावेश होतो. सहभागी सदस्यांपैकी सर्वांनी सहकार्यावर भर दिला तर एकेकाळी सोव्हिएट रशियाचे घटक असलेल्या काही राष्ट्रांच्या मनात उद्या आपलीही स्थिती युक्रेनसारखी तर होणार नाहीना ही भीती असावी, असे त्यांचे वर्तन होते. कोती दृष्टी सुरवात फोटो सेशनने झाली. यजमानांच्या एका बाजूल रशिया आणि दुसऱ्या बाजूला चीनचे अध्यक्ष नंतर अशाच प्रकारे अन्य संस्थापक राष्ट्रांचे प्रमुख आणि सर्वात शेवटी सदस्यता घेणारे म्हणून एका टोकाला भारत तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचे राष्ट्रप्रमुख अशी योजना होती. पण ऱ्हस्व दृष्टीच्या व्यक्तींना भारताला टोकाला का उभे रहावे लागले, असा आक्षेप घ्यावासा वाटला. तर दुसऱ्या दिवट्याला मोदींनी आपले डोळे मिटून घेतलेले दिसले. चीनच्या अध्यक्षांकडे लाल झालेल्या डोळ्यांनी का पाहिले नाही, म्हणून त्यांनीटीकाही केली. आजवर मोदींवर घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांच्या जातकुळीचेच हे आक्षेप असल्यामुळे त्यांचा गांभीर्याने विचार करण्याचे कारण नाही. नंतर गोलमेज रचनेनुसार राष्ट्रध्यक्ष स्थानापन्न झाले. तेव्हा मोदी मोक्याच्या जागी आसनस्थ होते, तसेच नंतर सर्व उपस्थितांच्या फोटो सेशनमध्ये सरमिसळ पद्धतीने मोदी आणि शी जिनपिंग शेजारी शेजारी उभे होते, हे जळकुकड्यांना दिसू नयेत, याचेही आश्चर्य वाटायला नको. भारताची तटस्थता शांघाय सहकार्य संघटन हे संघटन अमेरिका आणि नाटो यांचे विरोधी असणाऱ्यांचे संघटन आहे, असे मानले जाते. या संघटनेत पूर्वीच्या सोव्हिएट रशियाचे घटक असलेले देश आहेत. या विरोधी गटाचे सामर्थ्य वाढावे, असा या संघटनेचा प्रयत्न असतो. अमेरिकेची धमकी आणि कोंडीला न जुमानता बेलारूसने युक्रेनयुद्धात मोलाचे सहकार्य केले आहे. ही मदत लक्षात ठेवून बेलारूसला सदस्य करून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. भारत हा एकमात्र सदस्य असा आहे की जो क्वाडचाही सदस्य आहे. तटस्थ आणि निर्भिड भूमिका घेऊन भारत या दोन्ही संघटनांमध्ये वावरत असतो. मतभेद आणि संघर्षाचे सावट चीन आणि रशिया यात युक्रेनयुद्धाबाबत मतभेद असल्याचे या शिखर परिषदेच्या निमित्ताने समोर आले आहे. शी जिनपिंग यांनी तर पुतीन यांनाच बरेच प्रश्न विचारून बेजार केले, असे समोर आले आहे. याचे उत्तर आपण आपल्या भाषणात देऊ, असे पुतिन यांनी सांगितल्याचे वृत्त आहे. चीन आता मध्य आशियात आपले वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. मध्य आशियातील अनेक देश एकेकाळी सोव्हिएट रशियाचे घटक होते. त्यामुळे रशियाला या भागात चीनची ढवळाढवळ सहन होण्यासारखी नाही, ही ‘अंदरकी बात’ आहे. शिवाय उझ्बेकिस्तान आणि किर्गिस्तान यातही यातही वाद आहेत. दहशतवाद्यांचा शिरकाव नको म्हणून उझ्बेकिस्तानने सीमेवर भिंत बांधली आहे. तसेच किर्गिस्तान आणि ताजिकिस्तान यातही जमीन, पाणी आणि गुरेचराईचे कुरण(गायरान) यावरून वाद आहेत. भारत आणि चीन, भारत आणि पाकिस्तान यातही वाद आहेत. आर्मेनिया आणि अझेरबाईजानमधील संघर्ष तर विकोपाला गेला आहे, हे एकेकाळच्या सोव्हिएट युनीयनमधील सोव्हिएट (प्रांत) होते. ते आजच्या शांघाय सहकार्य संघटनेचे डायलॅाग पार्टनर आहेत. या दोन देशांमधील सीमावाद हे संघर्षाचे कारण आहे. अमेरिकेने पाकिस्तानला मदत द्यायला सुरवात केली आहे, यात शस्त्रसामग्रीचा तसेच विमानांसाठीच्या सुट्या भागांचाही समावेश आहे. भारताने याबाबत आपला तीव्र विरोध नोंदवला आहे. तर इकडे रशियानेही पाकिस्तानला गॅस देण्याचे आश्वासन दिले आहे. पण पाकिस्तानची हालत इतकी खस्ता झाली आहे की, या मदतीच्या कुबड्या घेऊनही तो देश फारसा चालू शकणार नाही. पण तरीही रशिया आणि अमेरिकेची भूमिका भारताला मान्य होण्यासारखी नाही, हे उघड आहे. फावल्या वेळातील वाटाघाटी उझबेकिस्तानचे पंतप्रधान अब्दुल्ला आरिफॉव्ह आणि समरकंदचे राज्यपाल यांनी पंतप्रधान मोदींचे समरकंदमध्ये स्वागत केले. शिखर परिषदेत दोन सत्रे झाली. पहिल्या सत्रात केवळ शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनचे केवळ 8 सदस्यच सहभागी झाले होते. तर दुपारच्या सत्रामध्ये इतर देशांनाही निमंत्रण होते. या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातच झालेल्या द्विपक्षीय बैठकीत रशिया-युक्रेन युद्धासह इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा झाली. रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते, दोन्ही देशांच्या मदतीनेच हे विद्यार्थी भारतात परत येऊ शकले. या सहकार्याबाबत भारताने रशियाचे आभार मानले. मात्र, या पूर्वीही अनेकदा फोनवर बोलल्याप्रमाणे आजचे युग युद्धाचे नाही तर लोकशाही, संवाद (डायलॅाग) राजकीय चातुर्याचे (डिप्लोमसी) आहे, असेही मोदी आग्रहाने म्हणाले. मोदींनी संवाद आणि राजकीय चातुर्यासोबत यावेळी लोकशाहीचाही उल्लेख केला, याची नोंद घ्यावयास हवी. अन्न, इंधन आणि खतांचे दुर्भिक्ष या आताच्या गंभीर आणि जटिल समस्या आहेत, यावर मोदींनी भर दिला. युक्रेनप्रकरणी भारताने रशियाचा निषेध केला नाही, शिवाय रशियाकडून वाढत्याप्रमाणात खनिज तेलही खरेदी केले, यावरून पाश्चात्य राष्ट्रांचा, भारत रशियाकडे झुकला आहे, असा जो गैरसमज झाला होतो तो, मोदींच्या या वक्तव्याने दूर व्हावयास पाहिजे. अनेक दशकांपासून भारत आणि रशिया यांच्यात चांगले संबंध राहिले आहेत. शिखर संम्मेलनातही रशियाने भारताबद्दल जी भूमिका व्यक्त केली, त्याबाबत भारत आभारी आहे, हे नमूद करण्यासही मोदी विसरले नाहीत. हे दोन्ही देश अडचणीचे प्रसंगी एकमेकांच्या पाठीशी उभे राहत आले आहेत, याची नोंद घेत मोदींनी भारत आणि रशियाची मैत्री अभंग दुव्याने जोडलेली आहे, याचा उल्लेख केला आणि मुत्सद्देगिरी आणि ‘मोदी टच’ यांचा परिचय दिला.

No comments:

Post a Comment