Monday, February 12, 2024

 


अमेरिकेत उमेदवार कसे ठरतात?तरूण भारत, नागपूर मंगळवार, दिनांक 13.02 . 2024 हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee? या ब्लॅागवरही उपलब्ध असतो.

वसंत गणेश काणे, बी एस्सी, एम ए (मानसशास्त्र), एम.एड.  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022   9422804430    

Email- - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

अमेरिकेत उमेदवार कसे ठरतात?

  अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत पक्षस्तरावर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून डोनाल्ड ट्रंप यांचा दावा बळकट झाला आहे. पण नजीकच्या प्रतिस्पर्धी भारतीय वंशाच्या निक्की  हॅले यांनी अजून तरी हार मानलेली नाही. डोनाल्ड ट्रंप यांना अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवा, असे दावे अमेरिकन न्यायालयात निकालाची वाट पाहत आहेत, याचीही नोंद घ्यावयास हवी आहे.     डेमोक्रॅट पक्षाचे अध्यक्षीय उमेदवार प्रथेप्रमाणे, विद्यमान अध्यक्ष ज्यो बायडेनच असतील, असे दिसते. 

  उमेदवारीसाठी पक्षांतर्गत निवडणुका 

   अमेरिकेतील निवडणुकीत पक्षाचा अध्यक्षपदाचा उमेदवार निवडीची  प्रक्रिया 8 ते 9 महिने चालते. तसेच ती परिसर, जिल्हा आणि शेवटी राज्यस्तरावर होत असते. ही निवडणूक जगातील सर्वात महागडी निवडणूक आहे. सुरवातीला उमेदवार कोण हे ठरविण्यासाठी पक्षांतर्गत निवडणूक होते. अमेरिकेत पक्षाचा उमेदवार कोण असावा हे पक्षश्रेष्ठी ठरवत नाहीत तर पक्षाचे सदस्य आणि समर्थक  ठरवतात. यासाठी अमेरिकेत सध्या जानेवारी/फेब्रुवारी महिन्यात पक्षांतर्गत निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे स्वरूप आपल्या येथील निवडणुकीपेक्षा वेगळे आहे. तिचे स्वरूप ढोबळमानाने असे सांगता येईल. प्रथम पक्ष स्तरावर परिसरपातळी पासून देश पातळीपर्यंत प्रतिनिधींची (डेलिगेट्सची)  निवड पक्षाचे सदस्य तसेच पक्षाचे चाहते असलेले मतदार करतात. पण यासाठी चाहत्यांना नोंदणी (रजिस्ट्रेशन) करावी लागते.  जो मतदार रिपब्लिकन पक्षाचा चाहता म्हणून नोंदणी करील, त्याला डेमोक्रॅट पक्षाचा चाहता म्हणून नोंदणी करता येत नाही. परिसर, काउंटी (जिल्हा) व प्रांत पातळीवर अशा प्रकारे सदस्य आणि नोंदणीकृत झालेल्या व्यक्ती, प्रतिनिधींची  (डेलिगेट्सची) निवड करतात.  हे प्रतिनिधी उमेदवारी मागणाऱ्या उमेदवारांना पसंती क्रमवारी देतात. थोडक्यात असे की, पक्षाने आपल्याला उमेदवारी द्यावी यासाठी पक्षांतर्गत या निवडणुकी होत असतात. आपल्या येथे पक्षाचे संसदीय मंडळ किंवा पक्षश्रेष्ठी इच्छुकांपैकी एकाची निवड करतात. अमेरिकेत असे नसते.

  मग देश पातळीवर पक्षाचे अधिवेशन होते. त्या ठिकाणी डेलिगेट्स निवडणुकीने अध्यक्षपदाचा पक्षाचा उमेदवार ठरवतात. पक्षाचा अध्यक्षपदाचा उमेदवार ठरवण्याची  ही पद्धत अशी काहीशी आहे. रिपब्लिकन पक्षात आज एकापेक्षा जास्त इच्छुक उमेदवार आहेत. सामान्यत: यांच्यात आपापसात लढत होऊन शेवटी देशपातळीवरच्या अध्यक्षपदासाठी दोन (बहुदा दोनच) इच्छुक उरतील. यातून पक्ष अध्यक्षपदाचा आपला उमेदवार निश्चित करील. परिसर पातळीपासून क्रमाने पुढे जात देश पातळीवरचे प्रतिनिधी निवडण्यासाठी  प्रत्येक पक्षात पक्षांर्गत निवडणुकी आता सुरू होत आहेत. आपल्याच पक्षातील आपल्या प्रतिस्पर्ध्याचा 'पत्ता कट करण्यासाठी' हालचाली व डावपेच सुरू झाले आहेत.   डेमोक्रॅट पक्षातही अशीच काहीशी पद्धत असते. 

उमेदवार निवडण्याच्या दोन पद्धती आहेत. प्रायमरी आणि कॅाकस.                        

प्रायमरी निवड पद्धती

 उपप्रकार1) ओपन प्रायमरी : यात पक्षाचे सदस्य नसले, तरीही  मतदारांना भाग घेता येतो.

उपप्रकार 2) क्‍लोज्ड प्रायमरी : यात फक्त त्या पक्षाचे सदस्यच मतदानामध्ये भाग घेऊ शकतात.

                                     कॉकस पद्धती 

  कॅाकस पद्धतीत पक्ष समर्थक आणि सदस्यांच्या सभेत ज्या उमेदवारास जास्त पाठिंबा असेल त्याची निवड हेते. 


‘प्रायमरी’ आणि ‘कॉकसेस’च्या प्रक्रिया सुरू होण्याआधी सहा महिने सर्व इच्छुक उमेदवारांमध्ये वाद-विवाद (डिबेट्‌स) सुरू होतात. यामार्फत प्रत्येक उमेदवार देशाचा कारभार चालविण्याबाबतच्या आपल्या कल्पना आणि धोरणे मांडतो. उमेदवार आपल्या स्वत:च्या कल्पना इतरांपेक्षा जास्त चांगल्या का आहेत आणि जास्त फायदेशीरही कशा आहेत याचेही स्पष्टीकरण देतात. या ‘डिबेट्‌स‘चे संपूर्ण देशात प्रक्षेपण होते. त्याद्वारे सर्वसामान्य नागरिकांनाही उमेदवार आणि त्यांच्या धोरणांविषयी कल्पना येते.

  ‘प्रायमरी’ आणि ‘कॉकसेस’ प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक उमेदवाराला मिळालेल्या ‘डेलिगेट्‌स’ची बेरीज करतात. ज्या उमेदवाराला किमान 50%+1 ‘डेलिगेट्‌स’ मिळतात त्या उमेदवारास अंतिम अधिवेशनामध्ये अध्यक्षीयपदाच्या निवडणुकीसाठीचा उमेदवार म्हणून घोषित केले जाते. प्रत्येक राज्यात किती ‘डेलिगेट्‌स‘ असावेत, याची संख्या पक्षाच्या त्या त्या राज्यातील नियमांनुसार ठरविली जाते. ‘डेलिगेट्‌स’चे दोन प्रकार आहेत. एकाला ‘सुपर डेलिगेट्‌स’ असे म्हणतात व दुसऱ्याला ‘प्लेज्ड डेलिगेट्‌स’ असे म्हणतात. 

    डेमोक्रॅटिक पक्षाच्या घटनेनुसार पक्षाचे नेते आणि निवडून आलेले पदाधिकारी यांना सुपर डेलिगेट्स म्हणतात. एकूण डेलिगेट्समध्ये यांची टक्केवारी 15% पेक्षा थोडीशी जास्त असते. हे कोणत्याही अध्यक्षीय उमेदवाराला पाठिंबा देऊ शकतात.

1) प्लेज्ड डेलिगेट्‌स : 

‘प्रायमरी’ आणि ‘कॉकसेस’ निवडपद्धतीतून जमा होणाऱ्या डेलिगेट्‌सना ‘प्लेज्ड डेलिगेट्‌स’ म्हणतात. ज्या उमेदवाराला हे डेलिगेट्‌स मिळतात, त्यांच्यावर  अंतिम अधिवेशनामध्येही त्याच उमेदवारास मत देणे बंधनकारक असते.  

2) सुपर डेलिगेट्‌स : 

‘सुपर डेलिगेट्‌स’ हे पक्षाचे पूर्वनियोजित प्रतिनिधी असतात. पक्षाच्या अंतिम अधिवेशनामध्ये या सुपर डेलिगेट्‌सला त्यांच्या पसंतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा अधिकार असतो. कुठल्या उमेदवाराला मत द्यायचे, याचे बंधन त्यांच्यावर नसते. म्हणून त्यांना ‘अनप्लेज्ड डेलिगेट्‌स‘ म्हणतात. 

  रिपब्लिकन पक्षाचे एकूण 2,472 डेलिगेट्‌स आहेत. त्यापैकी 50% +1 = 1,237 डेलिगेट्‌सचा पाठिंबा मिळणे रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळण्यासाठी आवश्यक आहे. तर डेमोक्रेटिक पक्षाचे एकूण 4,763 डेलिगेट्‌स असतात. अध्यक्षपदाची उमेदवारी मिळण्यासाठी यापैकी  किमान 2,382 डेलिगेट्‌सचा पाठिंबा आवश्यक आहे.

  टिकेट

 पक्ष फक्त अध्यक्षपदाचाच उमेदवार निश्चित करीत नाही तर उपाध्यक्षपदाचा उमेदवारही निश्चित करतो. निवडणुकीत मतदार या जोडीला मतदान करतात. एका जोडीतला अध्यक्षपदाचा उमेदवार आणि दुसऱ्या जोडीतला उपाध्यक्षपदाचा उमेदवार असे मतदान करण्याची मुभा मतदारांना नसते. निवड जोडीचीच करावी लागते. या जोडीला टिकेट असे नाव आहे.

    अध्यक्षपदाच्या मतपत्रिकेत प्रत्येक पक्षाची जोडगोळीची (टिकेट) (अध्यक्षपदाचा उमेदवार आणि उपाध्यक्षपदाचा उमेदवार) नावे असतात. अमेरिकेत रिपब्लिकन व डेमोक्रॅट असे दोनच मुख्य पक्ष असले तरी दोनचार चिल्लर पक्षही आहेत. तेही अशीच जोडी निवडतात. यातील एकही जोडी पसंत नसेल तर मतदार आपल्या पसंतीची जोडी मतपत्रिकेत आपल्या हस्ताक्षरात नोंदवू शकतो. 

  आपल्याला पक्षाची उमेदवारी मिळावी, अशी इच्छा उमेदवार ‘प्रायमरी’ आणि ‘कॉकसेस’च्या प्रक्रिया सुरू होण्याच्या जवळपास वर्षभर आधीच जाहीर करतात. नंतर ‘प्रायमरी’ व ‘कॉकसेस’मार्फत पक्षांतर्गत स्पर्धा सुरू होते. जबाबदारी सांभाळण्यास इच्छुकांपैकी कोणता उमेदवार सर्वाधिक पात्र आहे, हे ठरविण्यासाठी ही स्पर्धा आयोजित असते. या प्रक्रियेमार्फत अमेरिकेचा अध्यक्ष या नात्याने आपली भूमिका काय असेल देशासाठीची धोरणे कोणती असतील, हे सांगण्याची संधी इच्छुक उमेदवारांना मिळत असते. इच्छुक उमेदवारांची धोरणे, दृष्टिकोन, विश्‍वासार्हता, योग्यता व  अनुभव यांचा तुलनात्मक  विचार करून, पक्षाचे सदस्य आणि समर्थक कोणत्या उमेदवाराला आपले मत द्यायचे ते ठरवतात. ही प्रक्रिया राज्याराज्यात वेगवेगळी असते. या वेगळेपणातला एकसारखा मुद्दा हा आहे की, पक्षाची उमेदवारी कोणाला मिळावी हे पक्ष कार्यकर्ते आणि त्या पक्षाचे समर्थक ठरवितात. यात पक्षाचे पदाधिकारीही मतदार म्हणून सहभागी होतात. या प्रक्रियेत प्रतिस्पर्धी उमेदवाराने माघार घ्यावी म्हणून त्याची समजूत काढण्यासाठी निरनिराळे ‘उपाय’  उमेदवारस्तरावर केले जातात आणि माघार घेणाऱ्या उमेदवाराची मते आपल्या पारड्यात पाडून   घेतली जातात आणि अशाप्रकारे प्रत्येक पक्षाचे अध्यक्षीय उमेदवार ठरतात.




No comments:

Post a Comment