Saturday, February 17, 2024

 

पाक जनतेने सेनेचा पराभव केला, पण?


तरूण भारत, मुंबई.  रविवार, दिनांक१८/०२/२०२४ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.     

पाक जनतेने सेनेचा पराभव केला, पण?

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड 

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२ (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३० 

E mail - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

पाक जनतेने सेनेचा पराभव केला, पण?

     माजी पंतप्रधान इम्रान खान तुरुंगात, तर दुसरे हद्दपार माजी पंतप्रधान  नवाज शरीफ लष्कराच्या कृपेमुळे निर्दोष ठरून सक्रीय राजकारणात, हा प्रकार पाकिस्तानातच घडू शकतो. जन्माला आल्यापासून पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणात लष्कराचा धुडगूस सुरू आहे. आतातर लष्कराने उघडपणे नवाझ शरीफ यांना पाठिंबा दिला होता. राजकीय कटपुतळ्यातील या बाहुल्यांची दोरी लष्करप्रमुख मुनीर यांचे हाती असल्यामुळे राजकीय खेळखंडोबा पाकिस्तानातच घडू शकतो, हे जगजाहीर आहे.  पाकिस्तानात लष्कराने केलेल्या निवडीला निवडणूक स्वरुपात मांडले जाते, असे म्हणतात. पण यावेळी 2024 मध्ये जनतेच्या मनात काही वेगळेच सुरू होते की काय असे वाटते आहे. तसे नसते तर नेता तुरुंगात आणि त्याच्या समर्थकांची विजयाच्या दिशेने घोडदौड, असे दिसले असते का? मतदारांच्या विशेषतहा तरुण मतदारांच्या मनात काय सुरू आहे, याचा अंदाज लष्कराला आला नाही, हेच खरे. पण निवडणुकांचे  निकाल लागूनही कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे तेथे सरकार स्थापन होण्यात अडचणी येत होत्या.  बराचकाळ 75 जागा मिळवणारा नवाझ शरीफ यांचा ‘पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ गट)’ हा पक्ष आणि 54 जागा मिळविणारा बिलावल भुत्तो  यांचा ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’ यांच्यात वाटाघाटीचे गुऱ्हाळ  सुरू आहे. पण सदस्यांची एकूण बेरीज 129 होत होती. म्हणून सद्ध्या छोट्या पक्षांची चलती सुरू झाली होती. यावेळी माजी पंतप्रधान आणि क्रिकेटपटू इम्रान खान यांनी पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारांनी शतक ठोकून (101जागा) प्रत्येक अधिकृत राजकीय पक्षाला मागे टाकले आहे.    निवडणूक आयोगाने इम्रान खान यांच्या पक्षाची मान्यता रद्द केल्यामुळे  त्यांचे समर्थक अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत होते. तुरुंगात असूनही इम्रान खान यांच्या बाजूच्या नेत्यांना/ समर्थकांना मतमोजणीत पाठिंबा मिळताना दिसत होता. नवाझ शरीफ यांना पराभवाचा सामना तर करावा लागणार नाहीना असे लोक हलक्या आवाजात बोलू लागले होते. इम्रान खान यांच्या पक्षाचे समर्थन असलेले अपक्ष उमेदवार 265 पैकी 154 जागांवर आघाडी घेतात की काय हे लक्षात येताच पाकिस्तान निवडणूक आयोगाने निकाल जाहीर करायला विलंब लावायला सुरवात केली आहे, असे मत व्यक्त होऊ लागले होते.

  काही उल्लेखनीय निकाल 

 खुद्द नवाझ शरीफ यांचा मनसेहरा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार शहजादा गस्तासाप यांनी 11,000 पेक्षा जास्त मतांनी दणदणीत पराभव केला आहे. हा मनसेहरा मतदारसंघ नवाज याचा गढ मानला जातो. मात्र मनसेहरा व्यतिरिक्त नवाज शरीफ यांनी लाहोर येथून देखील उमेदवारी दाखल केली होती आणि तिथे ते विजयी झाले आहेत. यावेळी बहुतेक बड्या नेत्यांनी दोन ठिकाणून निवडणूक का लढविली आहे, यावर भाष्य करण्याची आवश्यकता नसावी.

   दहशतवादी हाफिज सईदच्या मुलाला- तल्हा सईद याला-पाकिस्तानी जनतेने निवडणुकीत पराभूत केले आहे. तो मरकजी मुस्लीम लीग या पक्षाचा उमेदवार होता. हीच गत बहुतेक सर्व दहशतवादी उमेदवारांची किंवा त्यांच्या कट्टरसमर्थकांची झाली आहे. हे वृत्तही नोंद घ्यावी असेच आहे.

जाहीर झालेले निकाल

      *अपक्ष व इम्रान समर्थक ( मान्यता रद्द पाकिस्तान तेहरिक-ए-इनसाफ) 101 जागा

  • पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज) 75

  • पाकिस्तान पीपल्स पार्टी - 54

  • मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट (एमक्यूएम)/17

  • जामियात उलेमा-ए- इस्लाम (जेयुआय) 4

  • पीएमएल-(कायदे आझम ग्रुप/कैद) 3

  • इस्तेकाम-ए-पाकिस्तान पार्टी (आयपीपी) 2

  • बलुचिस्तान नॅशनल पार्टी(बीएनपी) 2

  • अन्य - 8

  • एकूण - 266 म्हणून बहुमतासाठी 134 ही मतसंख्या ठरते.

याशिवाय विशेष हे की, पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये निवडून आलेले सदस्य, महिला आणि अल्पसंख्यांक मिळून 336 जागा आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्षाला/ आघाडीला निदान 169 सदस्यांचा पाठिंबा लागेल.  

पाकिस्तानमधील विधानसभागृहे

    इस्लाम हा अधिकृत धर्म असलेल्या पाकिस्तानमध्ये 12.8 कोटी मतदारांनी गुरुवार दिनांक 8 फेब्रुवारीला मतदान केले. 1947 मध्ये फाळणी झाली तेव्हा पाकिस्तानमध्ये हिंदूंची संख्या 24% पेक्षा जास्त होती. आज ती 1% ही नाही. पाकिस्तानमध्ये  संसद आणि प्रांतांमधील विधानसभेच्या निवडणुका या एकाचवेळी घेतल्या जातात. पाकिस्तानच्या नॅशनल असेम्ब्लीमध्ये (संसद) 336 सदस्य असतात. यापैकी 266 सदस्य भारताप्रमाणे एकल सदस्य मतदार संघातून निवडण्यात येतात. म्हणजे बहुमतासाठी 134 जागी विजय संपादन केलेला असावा लागतो. सिंधमधून 61, पंजाबमधून सर्वात जास्त म्हणजे 141, इस्लामाबाद या राजधानीच्या शहरातून 3, खैबर पख्तुनख्वामधून 45 आणि बलुचिस्तानमधून 16 सदस्यांची निवड करायची असते. 60 महिला सदस्य राजकीय पक्षांना मिळालेल्या जागांच्या प्रमाणात त्या त्या पक्षांकडून  भरल्या जातात. अशाचप्रकारे 10 जागा मुस्लिमेतरांमधून राजकीय पक्षांना मिळालेल्या जागांच्या प्रमाणात निवडल्या जातात.

  नॅशनल असेम्ब्ली व प्रांतांच्या विधानसभा यांच्या निवडणुका एकाचवेळी होतात. प्रांतशहा आमदारांची संख्या व बहुमत असे आहे. अन्य किंवा इतरात महिला व अल्पसंख्यांक येतात.

1)पंजाब : सर्वसामान्य जागा 297 + अन्य 74 = एकूण 371 - पंजाब प्रांतात पीएमएल (एन)ला 167 जागा मिळाल्या म्हणजे बहुमतासाठी(186) 19 जागा कमी पडतात. इम्रानखान यांच्या पक्षाला (अपक्ष) 116 जागा मिळाल्या पीपीपीला फक्त 7 जागा आहेत. पंजाब पाकिस्तानचे शक्तिकेंद्र मानले जाते. पण सद्ध्या त्रिशंकू स्थिती आहे.

2) सिंध: सर्वसामान्य जागा -130 + अन्य  38  = एकूण 168. सिंध प्रांतात पाकिस्तान पीपल्स पार्टीला 98 जागा मिळाल्या आहेत. अशाप्रकारे पीपीपी ला बहुमत मिळाले आहे. इम्रानसमर्थकांना 30 जागा तर एमक्यूएम-पी ला 21 जागा मिळाल्या आहेत.

3) खैबर पख्तुनख्वा:  सर्वसामान्य जागा 115 + अन्य 30 = एकूण 145. या प्रांतात इम्रान खान समर्थकांना 84 जागा मिळाल्या. उरलेल्या इतर पक्षात विखुरल्या गेल्या आहेत.

4) बलुचिस्तान :सर्वसामान्य जागा 51 + अन्य 14 =एकूण 65. बहुमतासाठी 33 जागा हव्यात. पीपीपी-11, जेयुआय -11, पीएमएल(एम) 10 उरलेल्या जागा अन्यांना मिळाल्या आहेत. म्हणून (त्रिशंकू) स्थिती आहे.

  सिनेट 

  सिनेटच्या निवडणुका यावेळी झाल्या नाहीत. सिनेटमध्ये 104 जागा असतात. प्रत्येक प्रांताची विधान सभा  14 सदस्य 6 वर्षांसाठी निवडून पाठवते. फेडरली अॅडमिनिस्टर्ड एरिया (एफएटीए) मधून 8 सदस्य निवडून पाठविले जातात. एक महिला आणि एक टेक्नोक्रॅट फेडरल कॅपिटलमधून निवडून पाठविले जातात. 4 महिला आणि 4 टेक्नोक्रॅट यांची निवड प्रत्येक प्रांताची विधानसभा करते. प्रत्येक प्रांतासाठी एक जागा अल्पसंख्यांकासाठी असते. याबद्दलची प्रत्यक्ष कारवाई नंतर होईल.

मतमोजणी पद्धती

 मतमोजणीसाठी ईव्हीएम मशीन्सचा वापर केला जावा असा इम्रान खान यांचा आग्रह होता. पण यावेळी 8 फेब्रुवारी 2024 ला  झालेल्या निवडणुकीत मतपत्रिकाच वापरण्यात आल्या. मतदान संपल्याच्या एका तासानंतरच मतमोजणीला सुरुवात केली जाते, तशीच ती यावेळीही सुरू झाली. पण लष्कराला नको असलेले उमेदवार विजयी होत आहेत, हे लक्षात येताच मतगणना अनेक ठिकाणी रेंगाळली, अडली, अडविली गेली, हल्लाग्रस्तही झाली. 

  अध्यक्षांची टिप्पणी 

  पाकिस्तानचे अध्यक्ष अरिफ अल्वी फारसे बोलत नसतात. पण या गोंधळाच्या आणि निकाल उशिरा लागण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना इम्रान खान यांच्या शासनाच्या  (इव्हीएम) इलेक्ट्रिक व्होटिंग मशीन्स अमलात आणण्याच्या प्रयत्नांची आठवण झाल्यावाचून राहिली नाही. ‘इव्हीएम चा वापर केला असता तर आज झालेले गोंधळ झाले नसते आणि निकाल लागण्यास इतका उशीरही लागला नसता,’ असे ते म्हणाले. त्यांनी ट्वीटरवर नमूद केले की, ‘जर इव्हीएमचा वापर केला असता तर माझ्या प्रिय पाकिस्तानमध्ये असा गोंधळ झाला नसता. याप्रश्नी 50 पेक्षा जास्त बैठकी झाल्या पण शेवटी हा विचार काही मार्गी लागला नाही’. या निवडणुकीत तरूण नुसते बोलत नव्हते तर ते गर्जना करीत होते, याची ही त्यांनी नोंद घेतली आहे.

   पाकिस्तानामधील प्रमुख पक्ष 

   पाकिस्तानमध्ये अनेक राजकीय पक्ष असले तरी १४ पक्ष मुख्य आहेत. यातही तीन बऱ्यापैकी मोठे म्हणावेत असे आहेत.

1) पाकिस्तान तेहरिक-ए-इनसाफ (न्यायाचा आग्रह धरणारा पक्ष) (पीटीआय)  या पाकिस्तानमधील राजकीय पक्षाची स्थापना 1996 मध्ये मुळात पाकिस्तानी क्रिकेटपटू असलेल्या राजकारणी इम्रान खान (वय-71) यांनी केली आहे. त्यांनी 2018 ते 2022 पर्यंत देशाचे पंतप्रधान म्हणून काम केले. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली. पीटीआय या पक्षाची विचारधारा पाकिस्तानला  एक आधुनिक इस्लामी गणराज्य बनवण्याची आहे.  पीटीआय हा पाकिस्तानमधील सर्वात वेगाने वाढलेला पक्ष मानला जातो. पाकिस्तानमधील तरूण मतदार इम्रान खान यांचेकडे घराणेशाहीला पर्याय म्हणून पाहतात.

  माजी पंतप्रधान इम्रान खान जे सद्ध्या विरोधी पक्ष नेता आहेत, त्यांना निवडणूक लढविण्यास प्रतिबंध करण्यात आला. आधी इम्रान खान यांना पदच्युत केले, नंतर त्यांना निरनिराळ्या खटल्यांत अडकवले, नंतर तुरुंगात टाकले आणि शेवटी त्यांच्या पक्षावर बंदी आणली.  2018 ची निवडणूक जिंकून ते पंतप्रधानपदी स्थानापन्न झाले होते. पुढे एप्रिल 2022 मध्ये अविश्वास ठराव पारित झाल्यामुळे ते पायउतार झाले आहेत. तेव्हापासून ते विरोधी पक्ष नेता म्हणून अटक होईपर्यंत काम करीत होते.

 चार गुन्ह्यांच्या निमित्ताने जेलमध्ये असूनही इम्रान खान पाकिस्तानमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. त्यांच्या पक्षाचे बॅट हे निवडणूक चिन्ह गोठवण्यात आले आहे. पाकिस्तान तेहरिक-ए-इनसाफ या त्यांच्या पक्षाची मान्यता निवडणूक आयोगाने रद्द केली आहे.  तरीही कार्यकर्त्यांचा एकमुखी पाठिंबा व तुरुंगवासात टाकल्यामुळे जनतेत उसळलेली संतापाची लाट  यांच्या भरवशावर इम्रान खान यांचा पक्ष(?) 2024 ची निवडणूक जिंकेल, निदान ते किंगमेकरच्या भूमिकेत तरी  येतील, यात शंका नव्हती, पण लष्कराने त्यांना असे करू  दिले नाही. 

   इम्रान खान यांनी भारताबद्दल बोलतांना म्हटले आहे की, अदलाबदलीच्या (क्विड - प्रो- को) तत्त्वाला अनुसरून भारत व पाकिस्तान यातील संबंध सुधरू शकतात. पाकिस्तानच्या चांगल्या व्यवहाराच्या बदल्यात तसाच व्यवहार भारताकडूनही मिळेल, यावर त्यांनी भरवसा ठेवला आहे. मोदींचे पाकिस्तानमध्ये स्वागत करावे, अशी त्यांची इच्छा होती. पण तसा योग आला नाही.  2019 मध्ये इम्रानखान यांनी मोदींना ‘शांततेत राहण्याचा प्रयोग करून पाहूया’, असे आवाहन केले होते. ‘पुलवामा हल्ल्याबद्दल पुरावा द्या, लगेच कारवाई करीन’, असे आश्वासनही त्यांनी आपल्याकडून दिले होते. युद्धविरामाचा पुरस्कार करीत ते म्हणाले होते, ‘सर्व प्रश्न चर्चेच्या मार्गाने सोडवू या.’ पण उक्ति आणि कृति यात महदंतर होते. घुसखोरी, छुपे हल्ले काही थांबले नाहीत. कितीही चांगले वाटले तरी नुसते शब्दांचे बुडबुडे काय कामाचे? 

इम्रान खान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

  मान्यता रद्द केलेल्या पक्षाचे नेते इम्रानखान यांनी तुरुंगातून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून नवाज शरीफ यांच्या इतकीच भाषणे दिली. यासाठी प्रथम ते तुरुंगातच भाषणाचे टिपण तयार करीत. ते टिपण भेटायला येणाऱ्या वकिलाबरोबर बाहेर पाठवीत. कार्यकर्ते या टिपणांवरून भाषणे तयार करीत.  त्यांच्या जुन्या रेकॅार्टेड भाषणातून त्यांचा आवाज नवीन भाषणातील लिखित भाषणातील शब्दांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने दिला जायचा आणि  ही भाषणे जनतेला ऐकवली जायची!! हे सर्वकाही या कानाचे त्या कानाला कळले नाही. 

2) पाकिस्तान मुस्लीम लीग (एन) (पीएमएल) नवाज शरीफ-( वय 74)

 पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज)  हा पाकिस्तानमधील  एक उजव्या विचारसरणीचा, उदारतावादी तसाच रूढीवादीही राजकीय पक्ष आहे. सद्ध्या सीनेटमध्ये हा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. या पक्षाची स्थापना 1993 मधली. मूळचा रूढीवादी असलेला हा पक्ष आज मात्र सामाजिक आणि सांस्कृतिक बाबतीत उदारमतवादी झाला आहे. तरीही तो मुस्लिमांमधील  कट्टरतावादी घटकांना अधूनमधून कुरवाळीत असतोच, असा त्याच्यावर आरोप आहे. तसे पाहिले तर पाकिस्तानमधील सर्वच पक्ष कट्टरता, भारतद्वेश, काश्मीरवर स्वामित्व आदी बाबतीत आघाडीवरच असतात.

  शरीफ हे पाकिस्तानातील पंजाब प्रांतामधले एक मोठे श्रीमंत व्यापारी कुटुंब आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ अनेक वर्षांच्या तुरुंगवासानंतर नुकतेच परतले आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप होते. पण आता न्यायालयांनी त्यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप अमान्य करून त्यांना मुक्त केले आहे.  अगोदर झालेली शिक्षा आणि आता मिळालेली मुक्तता ह्या दोन्ही बाबी अनुक्रमे लष्कराच्या अवकृपा आणि कृपेमुळे घडल्या होत्या, असे सर्वत्र मानले आणि बोलले जाते आहे. परत आल्यानंतर नवाज शरीफ यांनी भारतासोबत शांततायुक्त सहजीवनाचे आश्वासन दिले आहे. मात्र त्यासाठी अशक्य अशी अट टाकली आहे.  कोणती आहे ही अट? 370 हे कलम पुन्हा प्रस्थापित करा, ही ती अट आहे. भारत ही स्वीकारणार नाही, हे काय शरीफ यांना कळत नाही होय? मग तरीही अशी अट घालण्यामागचे कारण काय? तर आम्ही आमच्याकडून शांतताप्रस्ताव दिला होता हे सांगायला पाकिस्तानला संधी मिळते, हे या प्रस्तावामागचे कारण आहे. नवाज शरीफ अज्ञातवासातून लष्कराच्या बदललेल्या मर्जीनुसार पाकिस्तानात परत आल्यानंतर म्हणाले आहेत, ‘भारताने भरपूर प्रगती केली आहे, तसेच जगभर नावही कमावले आहे’. अशी साखरपेरणी ते का करीत असावेत?  ‘शेजारचा देश चंद्रावर गेला आणि पाकिस्तान मात्र अस्तित्वाचीच लढाई लढतो आहे’, हे त्यांचे उद्गार प्रामाणिक आहेत, यात शंका नाही. पण पाकिस्तानची ही अशी केविलवाणी स्थिती का आणि कशी झाली याबाबत मात्र शरीफच नव्हे तर पाकिस्तानातील कोणताही पक्ष किंवा नेता आत्मचिंतन करायला तयार नाही. शरीफ यांना भारताशी सख्य हवे आहे, असे मानणारे अनेक आहेत. पण लष्कराकडून तसे संकेत जोपर्यंत मिळत नाहीत, तोपर्यंत पाकिस्तानमधला कोणताही राजकीय नेता पुढे पाऊल टाकू शकत नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.  मग मुनीर या विद्यमान लष्करशहांकडून काही सूचना मिळाल्यामुळे तर ही साखरपेरणी नाहीना? ‘आपापसात लढण्यापेक्षा आपण गरिबीविरुद्ध लढू’, हे मोदींचे आवाहन एकवेळ पाकिस्तानी जनतेला पटेल, शरीफ यांच्या सारख्या राजकीय नेत्यांनाही कदाचित पटेल पण मुल्ला मौलवी आणि लष्करशहा जोपर्यंत या विचाराशी सहमत होत नाहीत, तोपर्यंत  काहीही होणे नाही, हे नक्की आहे. या दोन घटकांचे मतपरिवर्तन होणे सद्ध्यातरी शक्य नाही.  कुत्र्याचे शेपूट  सरळ होणार आहे थोडेच? मोदींनी पाकिस्तानला अवचित भेट दिल्यानंतर तर आता चेंडू पाकिस्तानच्या पारड्यात गेला आहे. पण शरीफ निवडून आल्यास भारत आणि पाकिस्तानमध्ये परिस्थिती काहीशी निवळेल आणि मर्यादित प्रमाणात व्यापरसंबंधही प्रस्थापित होतील, असे मानणारा एक गट जागतिक राजकीय पटावर आहे. नवाज शरीफ लाहोर आणि मनसेहरा येथून, भाऊ शाहबाज लाहोर आणि कसूरमधून, मुलगी मरियम याही लाहोर क्षेत्रामधूनच निवडणूक लढवीत आहेत. खुद्द राजकीय पक्षाचा कारभार जर लोकशाही तत्त्वांना अनुसरून चालत नसेल तर पक्षात आणि पुढे राजकारणात घराणेशाही कशी फोफावते, याचे उदाहरण पाकिस्तान मुस्लीम लीग (एन) (पीएमएल) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी- पीपीपी या पक्षांच्या उमेदवारांच्या यादीवरून लक्षात येईल.

 3) पाकिस्तान पीपल्स पार्टी- पीपीपी - 1967 मध्ये स्थापन झालेला हा डावीकडे झुकलेला पक्ष आहे. झुल्पिकारअली भुट्टो यांच्या पुढाकाराने या पक्षाची स्थापना झाली होती. लोकशाही, सामाजिक न्याय, लष्करी सामर्थ्य यावर या पक्षाचा भर आहे. 1970 , 1977 , 1988 , 1993 आणि 2008 मध्ये हा पक्ष पाकिस्तानात सत्तेवर होता तर 1990 , 1997 , 2002 आणि  2013 मध्ये सर्वात मोठा विरोधी पक्ष होता. 2018 मध्ये मात्र हा पक्ष ना सत्तेवर होता ना सर्वात मोठा विरोधी पक्ष होता. 

   बिलावल भुट्टो-झरदारी (वय 35) हे सद्ध्या पाकिस्तान पीपल्स पार्टी- पीपीपी चे अध्यक्ष आहेत. पाकिस्तानच्या पहिल्या मोठ्या महिला नेत्या बेनझीर भुट्टोंचे हे चिरंजीव आहेत. बेनझीर दोनदा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी होत्या. 2007 मध्ये त्यांची हत्या करण्यात आली. बिलावल यांचे वडील असिफअली झरदारी हे 2008 ते 2013 या काळात पाकिस्तानचे 11वे अध्यक्ष (पंतप्रधान नव्हे) होते. 2022 मध्ये आघाडी सरकारमध्ये ते परराष्ट्र मंत्री झाले. नवाझ शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ हे यावेळी पंतप्रधानपदी होते कारण इम्रानखान यांना  2022 मध्ये अविश्वास प्रस्तावामुळे पायउतार व्हावे लागले होते. नवाझ शरीफ जर 2024 च्या निवडणुकीत निवडून आले तर त्यांच्या हाताखाली आपण पद स्वीकारणार नाही, असे बिलावल भुट्टो यांनी जाहीर केले आहे.  भारताने टुरोझिम कॅाफर्न्सचे यजमानपद स्वीकारून तिचे आयोजन काश्मीरमध्ये केले तेव्हा बिलावल यांनी भारतावर टीका केली होती. जी-20 च्या यजमानपदाचा भारताने दुरुपयोग केला, असाही त्यांचा आरोप होता. 370 कलम हटवले तेव्हाही त्यांनी भारतावर टीका केली होती. ‘पाकिस्तानला भारताशी संबंध प्रस्थापित करायचे आहेत पण भारताची वागणूक एखाद्या अडदांड हिंदुत्वनिष्ठ दहशतवादी राष्ट्राप्रमाणे असल्यामुळे हे शक्य होत नाही’, असा त्यांचा कांगावा आहे. म्हणून भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी बिलावल यांचा समाचार घेताना पाकिस्तान हा देशच ओसामा-बिन- लादेनचे यजमान राष्ट्र तसेच दहशतवादी गुन्हेगार राष्ट्र कसे आहे हे स्पष्ट करून परतफेड केली. बिलावल हे अपरिपक्व राजकारणी आहेत, हे दाखविणारी अनेक उदाहरणे आहेत. ते विजयी झाल्यास भारत आणि पाकिस्तान यातील संबंध विकोपाला जातील, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. बिलावल भुट्टो हे दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुट्टो आणि पाकिस्तानचे माजी अध्यक्ष आसिफअली झरदारी यांचे पुत्र आहेत. ते सिंध आणि पंजाबातून निवडणूक लढवत आहेत. आसिफअली झरदारी स्वत:ही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हे पाकिस्तानमध्ये ‘मिस्टर 10%’ या नावाने ओळखले जातात. कोणतेही काम करवून घ्यायचे असेल तर त्याच्यासाठी ते 10% कमीशन मागीत अशा शब्दात त्यांची चेष्टा केली जाते. भुट्टो कुटुंबियामधील आणखी एकदोघेही आपले नशीब आजमावून पाहत आहेत.

 गेल्या निवडणुकीत 2018 मध्ये पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) या इमरान खान यांच्या पक्षाला 32% मते व 116 जागा मिळाल्या होत्या आणि मतांची संख्या व टक्केवारी यात पीटीआयने आघाडीही मिळविली होती. 2018 पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ) (पीएमएल) या नवाझ शरीफ यांच्या पक्षाला 24% मते व 64 जागा मिळाल्या. पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) या बिवावल भुट्टो झरदारी यांच्या पक्षाला 13% मते व 43 जागा मिळाल्या. जमाइत -ए- इस्लाम या फाझी-उर- रहमान यांच्या पक्षाला 11 जागा मिळाल्या. उरलेल्या जागा 10 लहान लहान पक्षात वाटल्या गेल्या होत्या. इमरान यांनी खान इतर पक्षांशी आघाडी करीत सरकार स्थापन केले. पण त्यांचे लष्करी नेत्यांशी पटेना म्हणून त्यांच्याविरुद्ध नॅशनल असेम्ब्लीत अविश्वास प्रस्ताव पारित होईल अशी तजवीज लष्कराने केली आणि त्यांच्या जागी शाहबाज शरीफ यांची नवे पंतप्रधान म्हणून निवड लष्कराने करवून घेतली.

  यावेळी 2024 मध्ये निवडणुकीपूर्वी, निवडणूक सुरू असतांना  अनेक ठिकाणी स्फोट, हिंसा, गडबड, गोंधळ झाल्याची वृत्ते कानावर येत होती. निवडणूक गुरुवारी 8 तारखेला असल्यामुळे निवडणूक नियमानुसार राजकीय पक्षांचा प्रचार मंगळवार 6 तारखेपासूनच बंद झाला होता. तरीही हिंसक प्रकार काही थांबलेले नव्हते. मतदान सुरू होताच अनेक मतदान केंद्रे उध्वस्त केली गेली, मतपेट्या पळविल्या गेल्या, मतपत्रिका हिसकून घेण्यात आल्या. हे लष्कराच्या मूक (?) संमतीने यावेळी झाले आहे.

  उशिराने होत असलेली 2024 ची निवडणूक

  8 फेब्रुवारी 2024 ला निवडणूक घेतली गेली. वास्तवीक पाहता या निवडणुका अगोदरच व्हायला हव्या होत्या. पण तेव्हा पाकिस्तानची आर्थिक स्थिती फारच वाईट होती, तसेच लष्कराला नको असलेले आणि अविश्वास प्रस्ताव पारित झाल्यामुळे पदच्युत झालेले इमरान खान हे जनतेत चांगलेच लोकप्रिय होत चालले होते. इमरान खान ऐवजी पाकिस्तानच्या संसदेने पंतप्रधान म्हणून निवडलेले शाहबाज खान निवडणुकीत त्यांच्या समोर टिकू शकले नसते. इम्रान खान हे पुन्हा पंतप्रधान झाले असते तर ते लष्कराला आवडले नसते. म्हणून दुसरे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना पाकिस्तानात परत आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.  भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्यानंतर कारावासात न जाता शरीफ यांनी लंडनला जायचा पर्याय निवडला(?) होता. आता गरज भासल्यामुळे त्यांना सर्व न्यायालयीन प्रकरणांतून मुक्त करण्याची प्रक्रिया पूर्ण करवून घेतली गेली आणि त्यांना मायदेशी परत आणण्यात आले आहे.  

इम्रान खान यांचे तोशाखाना प्रकरण 

  समाज माध्यमांचा वापर करून इम्रान खान यांनी आपली लोकप्रियता वाढवून घेतली होती आणि तशी ती आजही  आहे. पाकिस्तानचा तारणहार अशी आपली प्रतिमा निर्माण करण्यात ते बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाले आहेत. पुढे ते  लष्कराला ते जुमानेसे झाले. हे लष्कराला मानवणे शक्यच नव्हते. त्यातून त्यांनी लष्करातच दोन गट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अखेर लष्कराने त्यांना ‘तोशाखाना’ प्रकरणात दोषी सिद्ध करून त्यांची तुरुंगात रवानगी केली. विदेशी राज्यकर्त्याकडून प्राप्त झालेल्या वस्तू तोशाखान्यात (डिपॅाझिटरी) ठेवायच्या असतात. इम् रान खान यांनी या वस्तू कमी दराने खरेदी करून जास्त दराने विकल्या होत्या. तोशाखाना प्रकरणी पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय  ऐतिहासिक मानला जातो. यानुसार पाकिस्तानचे इम्रान खान यांना पाच वर्षांसाठी सार्वजनिक पदावर राहण्यास अपात्र ठरवले गेले. इम्रानखान यांच्या सोबत त्यांच्या ‘पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ’ पक्षाचे अनेक नेते आज तुरुंगात आहेत. काहींनी संभाव्य कारवाईच्या भीतीने देश सोडून परदेशात आश्रय घेतला आहे. तर आणखी काहींनी राजकारणालाच रामराम ठोकला आहे.  इम्रान खान यांना निवडणूक लढविता येणार नाही, हे स्पष्ट झाले्यामुळे नवाझ शरीफ यांचा पंतप्रधान होण्याचा  मार्ग तसा मोकळा झाला होता. 

   पण आता नवाज शरीफ यांचे वय वर्ष 74 आहे. ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी-एन’ (पीएमएल-एन) पक्षाला बहुमत मिळवून देण्यात त्यांचे नेतृत्व यशस्वी होईल का?, अशी शंका सुरवातीपासूनच घेतली जात होती पण मदतीला उपाध्यक्षपदी असलेली  कन्या मरियम आहे, ही शरीफ यांची महत्त्वाची बाजू आहे, हेही विरोधक जाणून होते. मरियम नवाज यांच्या मुलाच्या म्हणजे जुनैद सफदर यांच्या लग्नातले फोटो पाहून लोक म्हणाले होते की, नवऱ्या मुलीपेक्षा सासूच जास्त सुंदर दिसत होती. अशाप्रकारे मरियम यांच्या कर्तृत्वाला सौंदर्याचीही साथ मिळाली आहे, तसेच मरियम यांची जनमानसातील प्रतिमा तशी बरीच उजळ आहे. या अनुकूलतेमुळे शरीफ यांची बाजू बळकट मानली जायची. 

  आपण तुरुंगात असतांना स्नानागृहात कॅमेरे लावण्यात आले होते. असा मरीयम यांनी इम्रान शासनावर आरोप केला होता. माजी पंतप्रधानांच्या मुलीला जर हे भोगावे लागले असेल तर इतरांची काय कथा? असा आरोप करून त्यांनी राजकीयक्षेत्रात एकच खळबळ उडवून दिली होती.

  नवाझ शरीफ यांनी देशात परत आल्यानंतर पाकिस्तानमधील एका सत्कार सभेत सांगितले की, राजकारणापायी आपण, आपल्या आई आणि पत्नीला मुकलो आहोत. ‘तुमचे प्रेम पाहून मी दुःख विसरलो आहे. पण काही घाव असे असतात की, ते कधीच भरून येत नाहीत’.  आजवर नवाज शरीफ पंतप्रधानपदी तीनदा निवडून आले आहेत खरे, पण लगोपाठ नाही. तसेच पंतप्रधानपदाचा पूर्ण कालावधीही त्यांनी कधीच पूर्ण केला नाही, दरवेळी नशिबी हकालपट्टीच होती. आता ही चौथी वेळ! पक्ष म्हणून विचार केला तर नवाज शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ) (पीएमएल) हाच सर्वात मोठा पक्ष ठरतो. कारण इम्रान खान यांचा पक्ष आज अस्तित्वात नाही. त्या पक्षाचे एकेकाळचे सदस्य आणि समर्थक बहुसंख्येने निवडून आले असले तरीही. यावेळी शरीफ आघाडीचे सरकार स्थापन करण्यात यशस्वी झाले तर कुरघोडीच्या राजकारणाला पाकिस्तानात आणि पाकिस्तानाबाहेर पूर्णविराम मिळेल का? दुसरी एखादी आघाडी तयार झाली तरी हा प्रश्न कायम राहतोच. या प्रश्नाचे उत्तर आजवरच्या कोणत्याही पंतप्रधानाकडे नव्हते. आजही ते असणार नाही. कारण कळसूत्री बाहुल्यांच्या हाती कधी  काही असते का? ते असते सूत्रधाराच्या हाती! आज सूत्रधार आहेत लष्करप्रमुख मुनीर! त्यांच्या मनातले जाणण्यासाठी गरज आहे एखाद्या जाणकार आणि खऱ्याखुऱ्या मनकवड्याची!! तोपर्यंत वाट पाहण्यातच शहाणपणा आहे. 

  दोघा बंधूंची एकच चूक!

   या निमित्ताने एक तपशील लक्षात घ्यावयास हवा आहे. सुन्नीबहुल पाकिस्तामध्ये शिया व सुन्नी यातील वैर धुमसतच असते. नवाझ शरीफ स्वत: सुन्नी असूनही त्यांनी शिया असलेल्या परवेझ मुशर्रफ यांना लष्करप्रमुख नेमले होते. मुशर्रफ यांनी शरीफ यांनी काय गत केली ते सर्वांना माहीत आहे. हे माहीत असूनही शाहबाज शरीफ यांनी मुनीर या दुसऱ्या शियाला लष्करप्रमुख नेमून एकच चूक दुसऱ्यांदा केली. मुनीर खरे तर बाज्वा यांच्या अगोदर सेवानिवृत्त होणार होते. पण त्यांना सहा वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. शिया असल्यामुळे सुन्नीप्रधान पाकिस्तान लष्करावर मुशरर्फ यांची किंवा मुनीर यांची फारशी पकड असणार नाही हा दोन्ही शरीफ बंधूंचा समज पार चुकीचा ठरला.

   पाकिस्तान पीपल्स पक्षाचे (पीपीपी) अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी पंतप्रधान पदाच्या स्पर्धेतून अचानक  माघार घेतली. त्यांना आपल्याला बहुमत नाही याचा साक्षात्कार झाला एवढेच नव्हे तर सरकार स्थापनेसाठी शरीफ घराण्याशी आसलेले परंपरागत वैर विसरून 'पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ'च्या (पीएमएल-एन) उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. असे साक्षात्कार यापूर्वीही अनेकांना अनेकदा पाकिस्तानात झाले आहेत. हे किंवा असे साक्षात्कार का होत असतात, हे समजण्यासाठी ज्योतिषाकडे जाण्याची गरज नाही/नसावी.  

  पाकिस्तानच्या निवडणूक निकालामध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यानंतर  'पीपीपी' आणि 'पीएमएल-एन' या दोन्ही पक्षांकडून पंतप्रधानपदावर दावा करण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. त्यामुळे नवाझ शरीफ पुन्हा एकदा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात होते. पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बिलावल म्हणाले, 'सरकार स्थापनेसाठी आवश्यक बहुमत मिळवण्यात आमच्या पक्षाला अपयश आले आहे. त्यामुळे मी पंतप्रधानपदासाठी दावा करणार नाही.' त्यांनी मान्यता रद्द झालेल्या पाकिस्तान तेहरिक-ए- इन्साफ यांच्या समर्थकांबरोबर आघाडी करून सरकार स्थापन करण्यासही नकार दिला. पण पीएमएल (एन) आणि पीपीपी दोन्ही पक्षांमध्येही अजून वेगवेगळ्या मुद्द्यांवर मतभेद आहेत. त्यामध्ये अर्थ, परराष्ट्र, अंतर्गत सुरक्षा या खात्यांचा समावेश प्रामुख्याने आहे.  तसेच सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या पंजाबचा मुख्यमंत्री कोणी व्हावे, शरीफ यांची कन्या मरियम नवाझ  की आणखी कोणी, याबाबतही त्यांच्यामध्ये एकमत झालेले नाही.

  सुरुवातीला सरकार स्थापनेविषयी 'पीपीपी'मध्ये वेगवेगळी मते व्यक्त करण्यात येत होती. एक गट विरोधी पक्ष म्हणून बसू असे म्हणत होता तर दुसरा काहीही करून सत्तेत सहभागी व्हायचेच असे म्हणत होता. पण दोन्ही गटांचे मन ‘वळविण्यात’ एक ‘अदृश्य यंत्रणा’च यशस्वी झाली. पण तरीही या दोन पक्षांच्या सदस्यांची एकूण बेरीज 75+54= 129 इतकीच होते. पण बाकीच्या सदस्यांची मतेही ‘वळवण्यात’ फारशी अडचण येणार नाही, हे स्पष्ट आहे.  

  नवाज आऊट, शाहबाज इन!

   पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी त्रिशंकू कौल दिल्यानंतर पंतप्रधानपदासाठीही अनपेक्षित नाव पुढे आले. पंतप्रधानपदासाठी सुरुवातीपासूनच पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएम-एन) पक्षाचे सर्वेसर्वा नवाज शरीफ यांचे नाव आघाडीवर असतानाच, पक्षाने या पदासाठी नवाज यांचे धाकटे बंधू शाहबाज शरीफ यांच्या नावाची घोषणा केली.

 आता 'पीएमएल-एन'च्या नेतृत्वाखालील प्रमुख राजकीय पक्षांच्या आघाडीने बहुमताचा आकडा पार केला आहे. सुरुवातीला तीन वेळा पंतप्रधानपद भूषवलेले नवाज शरीफ आणि पाकिस्तान पीपल्स पक्षाचे (पीपीपी) अध्यक्ष बिलावल भुत्तो झरदारी हे प्रत्येकी अडीच वर्षे पंतप्रधानपद विभागून घेणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते. मात्र, बिलावल यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतली त्यानंतर शाहबाज यांच्यासह असीफ अली झरदारी (पाकिस्तान पीपल्स पार्टी), खालिद मकबूल सिद्दिकी (मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट पाकिस्तान) यांची शुजात हुसैन (पाकिस्तान मुस्लिम लीग (कायदे आझम ग्रुप/कैद) यांच्या निवासस्थानी बैठक झाली. यात सत्तास्थापनेवर एकमत झाले. पण, 'शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेऊन आमच्या पक्षाला मिळालेल्या जनादेशावर रात्रीच्या अंधारात डल्ला मारला', असा आरोप माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही सैन्यदलांना आणि आयएसआय या गुप्तचर एजन्सीला राजकीय विषयात ढवळाढवळ करू नका, तसेच माध्यमस्वातंत्र्यावर मर्यादा घालू नका, असे म्हणत फटकारले आहे. एखाद्या पक्षाची, गटाची किंवा व्यक्तीची कड घेऊ नका, अशी समज न्यायालयाने या दोन्ही घटकांना दिली आहे. यावेळी सैन्यदले आणि गुप्तचर यंत्रणा यांचा राजकीयक्षेत्रात हस्तक्षेप कमालीचा वाढला असल्यामुळेच न्यायालयाने अशी कठोर भूमिका घेतली असावी. त्यामुळे काहीकाळतरी लष्कर आणि आयएसआय नरमाईचे धोरण स्वीकारेल, असे वाटते. 

  पाकिस्तानात आघाडीचे सरकार स्थापन होईल, असे दिसते. अशा स्थितीत घटक पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्यावर आणि आपल्याच पोळीवर तूप पडावे यासाठी कायम धडपडत असतात. अशा शासनाचे स्वरूप अस्थिर असते.  त्यामुळे स्थायी स्वरुपाची बोलणी व करारमदार करणे कठीण असते. त्यातून इम्रान खान यांनी आपले समर्थक विरोधात बसून लढा देत राहतील, अशी घोषणा करताच धरपकड, छापे, अपहरण यासारखी दमनकारी हत्यारे वापरून इम्रान समर्थकांना जेरीस आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. इम्रान गटाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार ओमर अयूब यांना संसदेत जाऊ तरी दिले जाईल का, अशी शंका व्यक्त होऊ लागली आहे.  याचा अर्थ प्रारंभापासूनच संघर्षाला सुरवात होते आहे. पुढे काय होईल, हे कुणी सांगू शकेल?  ‘..…नृपनीति्रनेकरूपा:’, असे भर्तृहरीचे नीतिशतक सांगून गेले आहे, ते काही खोटे नाही. 






No comments:

Post a Comment