Monday, February 19, 2024

  

पाकिस्तानच्या निवडणुकीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर (?)

तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक २०/०२/२०२४ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.     

पाकिस्तानच्या निवडणुकीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर (?)

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२ (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०

E mail - kanewasant@gmail.com

Blog - kasa mee?

पाकिस्तानच्या निवडणुकीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर(?)    

 पाकिस्तानच्या देश आणि प्रांतपातळीच्या निवडणुका एकाचवेळी 8 पेब्रुवारी 2024 ला पार पडल्या आहेत. प्रारंभापासूनच या निवडणुका नीट पार पडतील किंवा कसे याबद्दल देशात आणि देशाबाहेरही संशय व्यक्त केला जात होता. निवडणूक प्रचारातही विरोधकांना अडचणीत टाकणारे प्रकार, जसे सभेला परवानगी न देणे, सभा उधळून लावणे, उमेदवारांवर हल्ले करणे असे प्रकार होत होते. यावेळी तर कहरच झाला. मतदान केंद्रांवर हल्ला करणे, विरोधकांना मतदान करतील अशी शंका ज्यांच्याबद्दल असेल अशांना मतदान केंद्रवर येऊच न देणे यासारखे अगणित उपद्रव यावेळी केले गेले.

मतमोजणीचे वेळी आपल्याला नको असलेला उमेदवार जिंकतो आहे, असे दिसताच, मतपत्रिकाच पळविणे, मतदान केंद्रच पटवून नष्ट करणे असेही प्रकार  केले गेले. हे सर्व प्रकार लष्कराच्या चिथावणीवरून, त्याच्या संमतीने होत होते, नव्हे त्यांच्या सांगण्यावरून होत होते.

 पाकिस्तानातील निवडणुका स्वतंत्र आणि मुक्त वातावरणात होत नाहीत, असा जगभर बोभाटा झाला. ब्रिटन आणि अमेरिका या पाकिस्तानच्या पाठीराख्यांनीही चौकशीची मागणी केली. निवडणूक प्रक्रिया पारदर्शी आणि योग्य प्रकारे पार पडेल, अशी व्यवस्था करण्यास त्यांनी पाकिस्तानला सांगितले. पण सर्व गैरप्रकार लष्कराच्या चिथावणीने होत असल्यामुळे तसे झाले नाही.

 पाकिस्तानातील एकुलती एक खरी निवडणूक

 पाकिस्तानात बहुदा पहिल्यांदाच 1970 साली खऱ्या अर्थाने मुक्त आणि स्वतंत्र वातावरणात निवडणूक झाली होती. 1947 हे पाकिस्तानचे जन्मवर्ष! म्हणजे पाकिस्तानला खऱ्या लोकशाहीचे दर्शन जन्मानंतर  किती उशिराने झाले ते लक्षात येते. पण तेही शेवटचेच होते. 1970 साली पूर्व पाकिस्तानमध्ये म्हणजे आजच्या बांगला देशात शेख मुजीबूर रेहमान यांच्या आवामी लीगने 162 पैकी 160  जागा व 39% मते मिळविली होती. पश्चिम पाकिस्तानात म्हणजे आजच्या शिल्लक पाकिस्तानात 138 जागा होत्या. याशिवाय महिलांसाठी असलेल्या 13 जागांपैकी 7 पूर्व पाकिस्तानमध्ये तर 6 पश्चिम पाकिस्तानात होत्या. या धरून पूर्व पाकिस्तानमध्ये 162+7=169 इतक्या जागा पूर्व पाकिस्तानात, तर 138+6=144 जागा पश्चिम पाकिस्तानात होत्या. अशाप्रकारे पूर्व पाकिस्तानच्या 169+ आणि पश्चिम पाकिस्तानच्या 144 मिळू एकत्र पाकिस्तानच्या राष्ट्रीय असेंब्लीत  एकूण 313 जागा होत्या. बहुमतासाठी 157 जागा मिळणे आवश्यक होते. शेख मुजीबूर रेहमान या ‘बंगाली बाबूला’ पाकिस्तानच्या राष्ट्रीय असेंब्म्लीत बहुमत मिळावे हे जन्मजात लष्करी बाणा असलेल्या पंजाबी लढवैय्यांना, लय्करशहांना आणि झुलपिकारअली भुट्टोसारख्या पाताळयंत्री राजकारण्याला सहन होण्यासारखे नव्हते. या सर्वांचा नुसता जळफळाट झाला. 1970 साली पूर्व पाकिस्तानची लोकसंख्या 6.5 कोटी तर पश्चिम पाकिस्तानची लोकसंख्या 5.8 कोटी होती. त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पूर्व पाकिस्तानला 169 तर पश्चिम पाकिस्तानला 144 जागा असल्यामुळे पूर्व पाकिस्तानच्या शेख मुजीबूर रेहमान यांच्याकडे 169 जागा असल्यामुळे पाकिस्तानचे नेतृत्व येणार हे स्पष्ट झाले.

 बंगाली बाबू पंतप्रधान?

 पण हे सेनाधिकारी आणि पश्चिम पाकिस्तानातील राजकारण्यांच्या पचनी पडत नव्हते. विशेषत: झुल्पिकारअली भुट्टो यांचा त्या काळात पश्चिम पाकिस्तानमध्ये खूप दबदबा होता. त्यांच्या आश्वासनांना भुलून जनमत त्यांच्या बाजूचे झाले आहे, असा त्यांचा समज होता. पण त्यांच्या पीपल्स पाकिस्तान पार्टीला (पीपीपी) 19%मते आणि 86 जागा मिळाल्या होत्या.

 नंतर पाकिस्तानच्या नॅशनल असेम्ब्लीचे अधिवेशनच झाले नाही, कारण अध्यक्ष याह्या खान यांना निकाल सहन होत नव्हता. भुट्टो हे तर शेख मुजीबूर रेहमान यांच्या नेतृत्वात काम करायला तयारच नव्हते. अर्थातच या लोकशाहीविरोधी भूमिकेमुळे पूर्व पाकिस्तानमध्ये असंतोषाचा भडका उडाला. तो दडपण्यासाठी पश्चिम पाकिस्तानातील राजकीय दृष्टीकोन असलेल्या सैन्यदलाने पूर्व पाकिस्तानात ‘ऑपरेशन सर्चलाईट’ अमलात आणले. याची प्रतिक्रिया म्हणून  पुढे बांगलादेशाचे स्वातंत्र्य युद्ध सुरू झाले आणि त्याची परिणीती बांगलादेशाच्या निर्मितीत झाली. पश्चिम पाकिस्तानात याह्याखान यांनी राजीनामा दिला आणि भुट्टो पश्चिम पाकिस्तानचे (आता नुसत्या पाकिस्तानचे) अध्यक्ष झाले. 1973 मध्ये पाकिस्तानने या नवीन परिस्थितीला साजेशी नवीन घटना स्वीकारली.

 आज काय होणार?

 1971 ते 1973 पाकिस्तानमध्ये गृहयुद्घासारखी स्थिती निर्माण झाली होती. शेवटी बांगलादेश युद्धात पाकिस्तान दुभंगले आणि आजच्या शिल्लक पाकिस्तानाची निर्मिती झाली. आज पाकिस्तानमध्ये पुन्हा 1971 सारखी परिस्थिती तर निर्माण होणार नाहीना अशी शंका राजकीय निरीक्षक व्यक्त करीत आहेत.  कारण एवढी दडपशाही, गुंडगिरी करूनही नावडत्या इम्रानखान यांच्या पक्षातील स्वतंत्रपणे निवडणूक लढविणाऱ्यांना सर्वांपेक्षा जास्त म्हणजे   101 जागा मिळाल्या आहेत. इतर सर्व पक्ष त्यांच्या मागे आहेत.    

इव्हीएम वापरले असते तर?

  सध्या डॅा अरिफ अल्वी पाकिस्तानचे अध्यक्ष आहेत. अल्वी हा शिया मुस्लीमांमधला एक पंथ आहे. शियांचे प्रमुख आयोतोल्ला रुहोल्ला खोमीनी यांनी 1970 मध्ये एक फतवा जारी करून अल्वीजनांना शियापंथात सामील करून घेतले आहे. पाकिस्तानातील बहुसंख्य मुस्लीम सुन्नी आहेत, याची नोंद घेतलेली बरी. डॅा अरिफ अल्वी बहुतेक काळ मौनातच असतात. पण यावेळी त्यांनी तोफ डागली आहे. त्यांनी आपला निवडणूक आयोगावर विश्वास नाही असे जाहीर केले आहे. जाहीर झालेल्या निकालांवर त्यांनी निराशा (फ्रस्ट्रेशन) व्यक्त केली आहे. जर इव्हीएम (इलेक्ट्रिक व्होटिंग मशीन) वापरले असते तर यावेळसारख्या गडबडी करता आल्या नसत्या, असे ते म्हणाले आहेत. अगोदरच्या इम्रान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इनसाफ पक्षाने इव्हीए (इलेक्ट्रिक व्होटिंग मशीन) चा वापर करावायासाठी केलेल्या प्रयत्नांची त्यांना आठवण झाली.  ते म्हणतात, ‘इव्हीएमच्या वापरासाठी गेली अनेक वर्षे पाकिस्तानमध्ये आग्रह धरला जात होता. त्यातही मतपत्रिका असतेच की. शंका असणाऱ्यांना या मतपत्रिकांचे गणन आजच्या सारखे करता आले असते.  कारण इव्हीएममध्ये इलेक्ट्रॅानिक कॅलक्युलेटर किंवा काऊंटर असतो. तो अशी नोंद ठेवत असतो. इव्हीएमचा वापर करण्याबाबत आजवर 50 पेक्षा जास्तवेळा बैठका झाल्या होत्या. पण अडथळे आणून त्या यशस्वी होऊ नयेत, असे प्रयत्न करण्यात आले. जर इव्हीएमचा वापर केला असता तर माझ्या प्राणप्रिय पाकिस्तानची आजच्या सारखी स्थिती झाली नसती’. यानिमित्ताने भारतात इव्हीएमचा विरोध करणाऱ्यांच्या मनातील हेतू नक्की काय असावा, याबाबत प्रश्न निर्माण झाल्यावाचून राहत नाही.

  इम्रान खान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

  इम्रान खान यांनी तुरुंगातून सोशल मीडियाचा वापर केला आणि स्वत:च्या आवाजात आपले विचार जनतेला ऐकवले ते असे. त्यांनी तुरुंगातून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून नवाज शरीफ यांच्या इतकीच भाषणे दिली, असे म्हणतात. यासाठी प्रथम ते तुरुंगात भाषणाचे टिपण तयार करीत. ते टिपण भेटायला येणाऱ्या वकिलाबरोबर बाहेर पाठवीत. कार्यकर्ते या टिपणांवरून लिखित भाषणे तयार करीत.  त्यांच्या जुन्या रेकॅार्टेड भाषणातून त्यांचा आवाज नवीन लिखित भाषणातील शब्दांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने दिला जायचा आणि  ही भाषणे जनतेला ऐकवली जायची! त्यांनी एकच धमाल उडवून दिली तीही या कानाचे त्या कानाला कळू न देता!!

No comments:

Post a Comment