Monday, February 26, 2024

 


इंडोनेशियातील मुलखावेगळी निवडणूक 

तरूणभारत, नागपूर

मंगळवार दिनांक 27. 02. 2024

हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॉगवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.   

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 

इंडोनेशियातील मुलखावेगळी निवडणूक 

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 

    इंडोनेशियाचे भारताशी प्राचीन काळापासूनचे संबंध आहेत. याबाबत रामायणातही एक उल्लेख सापडतो तो असा.

रत्नवन्तं यवद्वीपं सप्तराज्योपशोभितम्।

सुवर्णरूप्यकं चैव सुवर्णाकरमण्डितम्।।4.40.30।।

‘सुग्रीवाने आपली वानरसेना सोने, चांदी, रत्ने यांच्या खाणी असलेल्या यवद्वीपाला (जावा) पाठविली होती’, असा उल्लेख रामायणात आहे. 

  नेदरलंड (हॅालंड) या देशाच्या गुलामगिरीतून इंडोनेशियाची मुक्तता डिसेंबर 1949 मध्ये झाली. ब्रिटिशांचेही साह्य डचांना होते. पण सशस्त्र संग्राम आणि आंतरराष्ट्रीय दबावापुढे मान तुकवीत डचांनी स्वतंत्र इंडोनेशियाला मान्यता दिली. 

  स्वातंत्र्यानंतरची वाटचाल 

  सुकार्नो यांची स्वातंत्र्यलढ्यात प्रमुख भूमिका होती. ते एक कुशल मुत्सद्दी, फर्डे वक्ते, जहाल क्रांतिकारक आणि प्रखर राष्ट्रवादी होते. ते इंडोनेशियाचे पहिले अध्यक्ष होते.  1945 ते 1967 हा कालखंड त्यांच्या नेतृत्वातील उल्लेखनीय कालखंड मानला जातो. सुकार्नो यांनी 1957 या वर्षी इंडोनेशयात गायडेड डेमॅाक्रसीची घोषणा केली होती. गायडेड डेमॅाक्रसी म्हणजे नियंत्रित लोकशाही होय. यात निवडणुका निष्पक्ष होतात पण लोकांना धोरणे, उद्दिष्टे ठरविण्याचे स्वातंत्र्य नसते. एक हुकूमशहा ती ठरवीत असतो. सुकार्नो यांच्यानंतर इंडोनेशियात सुहार्तो या सेनाधिकारी आणि राजकारणी हुकुमशहाची राजवट तीन दशके (1967 ते 1998)  होती. यांच्या राजवटीत इंडोनेशियाला राजकीय स्थैर्य मिळाले आणि त्यामुळे शाश्वत स्वरुपाच्या आर्थिक प्रगतीचा लाभ झाला. आर्थिक महासत्ता  होण्याच्या दिशेने इंडोनेशियाचा प्रवास सुरू झाला पण जनतेवर अत्याचारही झाले. पुढे देशात भ्रष्टाचार माजला आणि सर्व हुकुमशहांप्रमाणे त्यांचे पतन झाले. यापुढील राजवटीत फारसे उल्लेखनीय असे काही नाही.

    2024 मधील निवडणुकीत प्रबोवो सुबियांतो  यांचा अध्यक्षपदी विजय निश्चित मानला जातो. पण इंडोनेशियात सुहार्तो यांच्या कालखंडात लोकशाहीवाद्यांच्या झालेल्या अपहरण आणि यातना (टॅार्चर) यांच्यासाठी प्रबोवो सुबियांतो यांनाही एक सहभागी म्हणून जबाबदार मानले जाते. 14 फेब्रुवारी 2024 ला झालेल्या निवडणुकीचे सगळे निकाल यायला बराच वेळ असल्यामुळे आपण सद्ध्यापुरते 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीचेच निकाल पाहूया. एकूण सदस्य 575 आणि पक्ष 18 आहेत.

1)इंडोनेशियन डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ स्ट्रगल 128 जागा. हा एक धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादी पक्ष आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो/जोकोवी यांचाही हाच पक्ष आहे.

2)  गेरिंद्र पार्टी म्हणजे ग्रेट इंडोनेशिया मूव्हमेंट (78 जागा) हा इंडोनेशियातला   एक राष्ट्रवादी, दक्षिणपंथी लोकानुनय करणारा पक्ष आहे. हा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे.  

3)गोळकर पार्टी: 85 जागा. हा गट 1999 मध्ये राजकीय पक्षात परिवर्तित झाला. हा दुसऱ्या क्रमांकाचा धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादी पक्ष मानला जातो.

4)राष्ट्रीय प्रबोधन पक्ष 58 जागा एक राष्ट्रवादी पक्ष

5) नसदेम पार्टी 59

6)समृद्ध न्याय पक्ष 50

7)डेमोक्रॅटिक पक्ष 54

8)राष्ट्रीय जनादेश पक्ष 44

9)युनायटेड डेव्हलपमेंट पक्ष 19

  प्रशांत आणि हिंदी महासागर यांच्या दरम्यान वसलेला इंडोनेशिया नैरुत्य आशियात असून  17000 बेटांच्या या देशाचे क्षेत्रफळ ठोकळानाने 2 कोटी चौरस किमी आहे. या देशाची लोकसंख्या 27 कोटी आहे. जावा, सुमात्रा, सुलावेसी ही बेटे तसेच बोर्निओ आणि न्यूगिनी या बेटाचा काही भाग, याशिवाय लहान मोठी हजारो बेटे यांचा मिळून  इंडोनेशिया हा देश तयार झाला आहे. राजधानी जाकार्ता हे सर्वात मोठे शहर जावा बेटात आहे.  जुन्या पिढीतील लोकांना बांडुंग कॅानफरन्स आठवत असेल. 18 ते 24एप्रिल, 1955 ला  इंडोनेशिया, बर्मा (आजचे म्यानमार), सीलोन (आताचे श्रीलंका), भारत व पाकिस्तान यांनी पश्चिम जावा प्रांताची राजधानी  बांडुंग येथे आशिया आणि आफ्रिका  खंडातील 29 देशांचे संमेलन आयोजित केले होते. ते ‘बांडुंग कॅानफरन्स’ म्हणून ओळखले जाते.  नवीन आणि जुन्या पिढीतील लोकांच्या मनात बाली प्रांतातील दुआ येथील जी20 च्या 15 व 16 नोव्हेंबर 2022 ला झालेल्या बैठकीबाबतच्या आठवणी ताज्या असतील. बाली हे पर्यटकांचे आवडते स्थानही आहे, हे सांगायला नको. इंडोनेशिया हा जगातला तिसरा मोठा लोकशाही देश आहे. या देशात एकात्मक अध्यक्षीय घटनात्मक प्रजासत्ताक पद्धती आहे. 

इंडोनेशियाचे वेगळेपण 

1) इंडोनेशियात 1300 वांशिक गट आहेत. 95%  मूळ इंडोनेशियन निवासी आहेत. जावानीज 42% तर सुदानीज 15% आहेत आणि उरलेले अन्य आहेत.

2) धर्मानुसार मुस्लीम 87%. ख्रिश्चन 10.5%. हिंदू 1.75, बौद्ध 0.7%. उरलेले अन्य आहेत.

3) भाषांचा विचार करता इंडोनेशियन ही अधिकृत भाषा आहे. 737 भाषा इंडोनेशियात आजही बोलल्या जातात. यात जावानीज आणि सुदानीज प्रमुख आहेत. चिनी शब्दप्रधान  भाषाही बोलली जाते.

   इंडोनेशियात 2019 मध्ये पहिल्यांदाच विधानसभा आणि राष्ट्रपती पदाच्या निवडणुका एकाच दिवशी झाल्या. जोको विडोडो यांच्यासोबत, मारुफ अमीन हे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून उभे होते. त्यांनी प्रबोवो सुबियांटो यांचा पराभव केला होता, मध्यस्ताशिवाय प्रत्यक्ष मतदाराने मतदान करणे, सर्वसामान्यांनाही मतदानाचा हक्क असणे, मुक्त वातावरणात मतदान, गोपनीयता, प्रामाणिकपणा आणि निष्पक्षता या सहा तत्त्वांचे पालन इंडोनेशियन निवडणुकीत  करावे अशी अपेक्षा केली जाते. पण प्रत्यक्षातली स्थिती मात्र अगदी उलट आहे. 

पैशाचे राजकारण(उआंग)

  इंडोनेशियामध्ये मत खरेदी ही सामान्य बाब आहे. एका सर्वेक्षणात 60% मतदारांनी सांगितले की, ते त्यांचे मत विकत घेऊ देतील. या प्रकाराला ते उमेदवाराने दिलेली भेट म्हणतात. मतदार आपल्याला पसंत असलेल्या उमेदवाराच्या नावासमोर दिलेल्या खिळ्याने छिद्र (पंचिंग) करतात. मतदानासाठीचे किमान वय 17 वर्ष आहे. दैनंदिन गरजांची पूर्ती,  अर्थकारण आणि मानवीअधिकार हे मुख्य मुद्दे मतदारांसमोर होते. 2024 च्या या निवडणुकीत जवळजवळ 20 कोटी मतदारांनी मतदान केले. इंडोनेशियाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो/जोकोवी दोनदा इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. इंडोनेशियाच्या घटनेनुसार त्यांना तिसऱ्यांदा 2024 मध्ये निवडणूक लढविता आली नाही.  राष्ट्राध्यक्ष पदासाठी तीन उमेदवारांच्या जोड्या पुढे आल्या होत्याा. त्यात वादग्रस्त माजी जनरल व संरक्षणमंत्री प्रबोवो सुबियांतो   यांचे नाव आघाडीवर होते. सुबियांतो यांचे जोडीदार असलेले उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार जिब्रान राकाबुमिंग हेही वादग्रस्तच आहेत. दुसरी जोडी  जाकार्ताचे माजी राज्यपाल व अमेरिकेत शिक्षण घेऊन आलेले, अनिस बास्वेडन आणि मुहैमिन इस्कंदर अनीस यांची आहे. तिसरी जोडी मध्य जावाचे माजी राज्यपाल गंजर प्रणोवो  आणि महफूद एमडी यांची  आहे. 

  मतदारांनी नवीन राष्ट्राध्यक्ष निवडण्याबरोबरच खासदारांसाठीही मतदान केले. ही निवडणूक जगातील सर्वांत मोठी एकदिवसीय निवडणूक ठरली. इंडोनेशियात कार्यकारी मंडळ आणि विधिमंडळ या दोन्ही शाखा कायदा बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. कोणताही कायदा किंवा निर्णय पारित करण्यासाठी दोन्ही शाखांची मंजुरी आवश्यक असते. त्यामुळे येथे राष्ट्राध्यक्ष निवडण्याबरोबरच खासदार निवडणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे

  राष्ट्राध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी प्रबोवो सुबियांतो  आणि जिब्रान राकाबुमिंग ही जोडी नक्की निवडून येईल असे अनधिकृत वृत्त आहे.  मतमोजणी पूर्ण व्हायला निदान तीन/चार आठवडे लागतील, इतकी ती मतमोजणी किचकट आणि क्लिष्ट आहे. तेव्हा आपणही तोपर्यंत थांबावे, हे ओघानेच आले, नाही का? 






No comments:

Post a Comment