Monday, June 3, 2024

     

विळख्यातल्या इस्रायलचे प्रत्युत्तर (लेखांक 2 रा)

तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक ०४/०६/२०२४ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.  

   विळख्यातल्या इस्रायलचे प्रत्युत्तर (लेखांक 2 रा)

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 

मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

   हमास ही मुस्लीम ब्रदरहूड या सुन्नीपंथीय संघटनेपासून प्रेरणा घेऊन स्थापन झालेली संघटना आहे. 2006 मधील  पॅलेस्टिनी संसदीय निवडणुकीत हमासने लोकशाही मार्गाने  विजय संपादन केला. गाझा पट्टी आणि इस्रायल यांच्या सीमा एकमेकींना स्पर्श करतात. त्यामुळे हमासने सीमा ओलांडली की, हमास आणि इस्रायलमध्ये चकमकी सुरू होत. बऱ्याच वेळा सीमा न ओलांडताही हमासने गाझामधून इस्रायलवर रॉकेट हल्ले केले आहेत. उत्तरादाखल इस्रायली सैन्यानेही हवाई हल्ले करत गाझावर बॉम्बफेक केली. 1993 मध्ये इस्रायल आणि पीएलओ (पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन) यात शांतता निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. ती ‘ओस्लो प्रोसेस’ या नावाने ओळखली जाते. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या ठरावांना अनुसरून इस्रायल आणि पीएलओ यात हा करार झाला आहे. पीएलओने  केलेल्या या ‘ओस्लो शांतता करारा’ ला हमासने फक्त विरोधच  केला नाही तर शस्त्रे वापरून कुरापती काढण्यास सुरवात केली. त्यासाठी हमासने वेगळ्याच पद्धतीचा अवलंब केला आहे. तो असा की, हल्ले करण्यासाठी हमासने ‘इज्ज अल-दीन अल-कासम ब्रिगेड’ या नावाची एक वेगळीच सशस्त्र संघटना उभारली आहे. या संघटनेचे सशस्त्र सदस्य आणि सोबतीला आत्मघाती बॉम्बर्स इस्रायलमध्ये पाठवले जातात. यामुळे इस्रायल, अमेरिका, युरोपियन युनियन, कॅनडा, इजिप्त आणि जपान या देशांनी हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. गाझा हे हमासचे मुख्यकेंद्र आहे. पॅलेस्टाईनमधील वेस्ट बॅंक प्रांतातही हमासचे समर्थक आहेत. कतार आणि  पूर्वेतील इतर देशांमध्येही हमासचे समर्थक पसरलेले आहेत. 

किती काळ लढणार?

1 एप्रिल 2024 ला इस्रायलने सिरियामधील  दमास्कस येथील इराणच्या कार्यालयावर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात इराणचे 16 ज्येष्ठ सैनिकी अधिकारी मारले गेले.  13 एप्रिल 2024 ला इराणने क्षेपणास्त्रे (मिसाईल) आणि ड्रोन्स वापरून बदला घेतला. उत्तरादाखल 19 एप्रिल 2024 ला इस्रायलने क्षेपणास्त्रे वापरून इराण, सिरिया आणि लेबॅनॅान मधील मौक्याच्या ठिकाणांवर जबरदस्त  हल्ले केले. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायल आणि इराण या दोन देशांत परस्परांवरील हल्ल्यांत वाढ झाली आहे. या युद्धात दोन प्रतिस्पर्धी देश एकमेकापासून खूप दूर आहेत. हे इस्रायलला योयीचे आहे.  कारण युद्धतंत्रज्ञानात इस्रायल इराणच्या खूप पुढे आहे. इस्रायलजवळ लांबचा पल्ला गाठू शकतील अशी शस्त्रे आहेत. काही कमी पडली तर मदतीसाठी अमेरिकेसारखा साथीदार आहे.  अमेरिका पूर्वीपासूनच  इराणच्या विरोधात आहे. इस्रायलने जॉर्डन, सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात, इजिप्त या सुन्नीबहुल देशांशी मैत्री केली आहे. त्यामुळे हे देश शियाबहुल इराणपासून दूर गेले आहेत. इराणचा अण्वस्त्रनिर्मिती कार्यक्रम पूर्ण होत आला असून आपण अण्वस्त्रे तयार केली आहेत, अशी घोषणा इराण केव्हाही करू शकण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे जॉर्डन, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात आणि इजिप्त हे सुन्नीबहुल देश चिंताग्रस्त झाले आहेत. अशावेळी इस्रायल आपल्या मदतीला धावून येईल, असा त्यांना विश्वास वाटतो.  नुकताच इराणने इस्रायलवर हल्ला केला होता. त्यात  अनेक ड्रोन, क्षेपणास्त्रे व अग्निबाण इराणने वापरले होते. पण जॉर्डन आणि  सौदी अरेबिया, या देशांनी त्यांना मार्गातच अडवून नष्ट केले.. या कामी जॉर्डन आणि  सौदी अरेबिया यांना अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सची मदत झाली होती. इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली खरी पण ती फारशी हानीकारक  का ठरली नाहीत, हे कोडे अशाप्रकारे उलगडते. इस्रायलशी लढण्यासाठी इराण गंभीर नाही असेही संकेत मिळत आहेत.  आपण इस्रायलशी लढतो आहोत असा समज इराणला आपल्या जनतेचा करून द्यायचा आहे, अशी शंका लष्करी तज्ञांनी व्यक्त केली आहे. इराणने नुकताच जो हल्ला केला, तो या हल्ल्याची पुरेशी पूर्वसूचना देऊन का केला, असा प्रश्न या तज्ञांनी उपस्थित  केला आहे.  त्यामुळे इस्रायलला इराणने डागलेली अस्त्रे इस्रायलपर्यंत पोहचण्याआधीच अडवून पाडता आली. 350 अस्त्रांपैकी फक्त नऊच अस्त्रे जर इस्रायलपर्यंत पोचत असतील तर त्याचा वेगळा अर्थ लावता येणार नाही, हे स्पष्ट आहे.  त्यामुळे इस्रायलचे फारसे नुकसान झाले नाही. पण तरीही हल्ले यशस्वी झाले असून यानंतर आपण आणखी हल्ले करणार नाही, असे इराणने जाहीर केले. लढाईत सामान्यतहा असे कुणी म्हणत नसते. इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांनी या हल्ल्याचा आपण योग्यवेळी बदला घेऊ अशी घोषणा केली आणि इस्रायली जनतेला दिलासा दिला. पण प्रत्यक्षात मात्र हल्ला केला नाही. खरे तर इराण सध्या युद्ध करण्याच्या स्थितीत नाही. अमेरिकेने लादलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे इराणची आर्थिक स्थिती पार बिघडली आहे. त्यातच इराणच्या सरकारविरुद्ध देशात असंतोष वाढत आहे. थोडक्यात काय तर इस्रायलला जशासतसे प्रत्युत्तर देण्याची लष्करी क्षमता इराणमध्ये सद्ध्यातरी नाही. हे जसे खरे आहे तसेच अमेरिकेच्या मदतीशिवासय इस्रायल आणि रशिया व चीन यांच्या मदतीशिवाय इराण यापैकी कोणीही केवळ स्वबळावर फार काळ एकमेकांशी लढू शकणार नाहीत, हेही तेवढेच खरे आहे.

 युद्ध थांबावे कसे?

   इराणविरोधात  इस्रायलला अमेरिका व युरोपीयन देशांचा, तसेच जॉर्डन, सौदी अरेबिया  यांचा पाठिंबा असला तरी इस्रायलने इराणी हल्ल्याला प्रत्युत्तर देऊन स्थिती अधिक भडकवू नये असे या सर्व देशांना वाटते. इस्रायलने इराणवर हल्ला केल्यास अमेरिका त्यात सामील होणार नाही, असे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी जाहीरपणे सांगितले आहे. म्हणजे, ‘एवढे आणि एवढेच’. ‘झाले तेवढे खूप झाले’. ‘दस फार अँड नो फर्दर’, अशी अमेरिकेची भूमिका दिसते. हमासने दगलबाजी करून केलेला हल्ला हा घोर अपराध आहे पण अर्धी गाझापट्टी बेचिराख झाल्यानंतर आता कुठेतरी थांबायला हवे असे इस्रायलच्या मित्रांना वाटते. तर सर्व ओलिसांची सुटका केल्याशिवाय आता थांबणे नाही, ही जणू इस्रायलची भीष्मप्रतिज्ञा आहे. तर गाझापट्टीला पू्र्वीप्रमाणे स्वातंत्र्य आणि सुरक्षेची हमी मिळाल्याशिवाय ओलीसांना सोडणार नाही अशी ठाम भूमिका हमासने घेतली आहे. इस्रायलने जंगजंग पछाडूनही त्याला ओलीसांचा ठावठिकाणा अजूनही लागलेला नाही.  अशाप्रकारच्या युद्धात एकवेळ अशी येते की, दोन्ही बाजू थकतात. पाठीराख्यांनी मदतीचा हात आखडता घेतला की तर असे काहीसे घडतच असते. 

   इस्रायली जनतेमध्येही आता युद्धस्थिती आणखी चिघळवू नये, असे मानणारा गट तयार होतो आहे. पण मग ओलीसांचे काय? ओलीसांना सोडण्यासाठी इराण हमासला भाग पाडू शकेल. पण इराणची एक अट आहे. इस्रायलने आमच्या अणू संशोधन केंद्रावर हल्ले करणार नाही, अशी हमी द्यावी ही ती अट आहे. ही अट कबूल करायला इस्रायल तयार नाही. कारण इराणची अण्वस्त्रे कोणासाठी आहेत, हे इस्रायलला पक्के ठावूक आहे.  इराणने आपले सद्ध्याचे  अणुशक्ती केंद्र बंद करून तेथील सामग्री इतरत्र सुरक्षित आणि अज्ञातस्थळी हलविली आहे.  त्यामुळे इराणही काहीसा शेर झाला आहे. इस्रायलच्या फौजा राफापर्यंत पोचल्या आहेत. आता युद्ध कोणते निमित्त पुढे करून थांबवता येईल बरे? आजतरी तडजोडीसाठी धडपडणाऱ्यांच्या मेंदूला मुंग्या याव्यात अशी स्थिती निर्माण झालेली दिसते आहे. 


No comments:

Post a Comment