Tuesday, June 18, 2024

 अमेरिकेचे परराष्ट्र धोरण

तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक १८/०६/२०२४ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.     

 

  अमेरिकेचे परराष्ट्र धोरण

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 

    परराष्ट्र धोरणात आंतरराष्ट्रीय हिताऐवजी आपल्या राजकीय हितांनाच अधिक महत्त्व देण्याचा हा काळ आहे. असे नसते तर अमेरिकादी राष्ट्रांनी भारताला संयुक्त राष्ट्रांच्या स्थायी समितीत स्थान देण्यासाठी आपली इच्छाशक्ती यशस्वीरीत्या केव्हाच वापरली असती. खुद्द बायडेन यांनी भारतीय पंतप्रधानांच्या सर्वच भेटी  अविस्मरणीय असतात, अशी साखरपेरणी नेहमीच केलेली आहे. त्यात तथ्य नसते असे मुळीच नाही. पण विषय त्याच्या पलीकडे सरकला पाहिजे तर तसे होतांना मात्र दिसत नाही.

  अमेरिकेचा अफगाणिस्तानातील मानहानिकारक पराभव लोक विसरलेले नाहीत, लांबलेले रशिया-युक्रेन युद्ध केव्हा संपेल ते ज्योतिषालाही सांगता यायचे नाही,  पाकिस्तान, चीन आणि रशिया यांचा एक नवीन गट उदयाला येतो आहे.  सौदी अरेबिया, चीन आणि इराण यात मैत्रीचे नवीन  युग निर्माण होते आहे. भारताचा बोलघेवडा  अलिप्ततावाद लयाला गेला असून, आता, हेच काय पण कोणतेही युग युद्धाचे नसते, असे ठणकावून सांगण्याची हिंमत भारत दाखवतो आहे. जागतिक आर्थिक संकटे आवरणे किंवा हाताळणे सगळ्यांच्याच क्षमतांच्या पलीकडे जात चालले आहे. संयुक्त राष्ट्र संघटना अगतिकपणे हा सर्व प्रकार उघड्या डोळ्यांनी मुकाटपणे पाहत उभी आहे. या अस्थिरतेच्या  उंबरठ्यावर जग उभे असतांना  आणि  जागतिक राजकारण यापुढे कशा प्रकारची कलाटणी घेणार याबाबत सर्वच घटक  संभ्रमित झाले असतांनाच्या आजच्या काळात अमेरिकेत अनेक सर्वेक्षण संस्थांनी आपापल्यापरीने जागतिक राजकारणविषयक प्रश्नांबाबत सर्वेक्षणे केली आहेत. त्यात डेमोक्रॅट पक्षाच्या सदस्यांचा तसेच रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांच्या मतांचा आणि जनमताचा मागेवा घेतला आहे. या निमित्ताने निरनिराळ्या प्रश्नांकडे पाहण्याचा यांचा दृष्टीकोण काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व यंत्रणाला मिळालेला प्रतिसाद सारांशरूपाने कसा आहे, ते आपण सार स्वरुपात पाहूया.

 

     या सर्वेक्षणाद्वारे विविध जागतिक महत्त्वाच्या प्रश्नांकडे पाहण्याचा  डेमोक्रॅट पक्षाचा, रिपब्लिकन पक्षाचा आणि अमेरिकन मतदारांचा दृष्टीकोन  आणि प्राधान्यक्रम कसा आहे, ते कळते. अमेरिकेतील डेमोक्रॅट पक्ष, रिपब्लिकन पक्ष आणि अमेरिकन मतदार यांच्या निरनिराळ्या आंतरराष्ट्रीय मुद्यांबाबतच्या भूमिकांचा हा तौलनिक अभ्यास आपणा भारतीयांसाठीही लक्षवेधी आणि बोधप्रद ठरावा.

काही प्रमुख मुद्यांबाबत अमेरिका कसा विचार करते?

1.दहशतवाद्यांचा बंदोबस्त’ हा मुद्दा 61 % डेमोक्रॅट सदस्यांना तर 84 % रिपब्लिकन सदस्यांना आणि  72% जनतेला महत्त्वाचा वाटतो.

2.प्रथम अमेरिकनांना नोकऱ्या हा मुद्दा 65 % डेमोक्रॅट सदस्यांना तर 81 % रिपब्लिकन सदस्यांना आणि  71% जनतेला महत्त्वाचा वाटतो. 

3.सामूहिक विनाशाच्या शस्त्रांच्या प्रसारावर प्रतिबंध घालणे  हा मुद्दा 68 % डेमोक्रॅट सदस्यांना तर 64 % रिपब्लिकन सदस्यांना आणि  66 % जनतेला महत्त्वाचा वाटतो. 

4. इतर देशांशी संबंध सुधारणे  हा मुद्दा 70 % डेमोक्रॅट सदस्यांना तर 44 % रिपब्लिकन सदस्यांना आणि  58 % जनतेला महत्त्वाचा वाटतो.

5. साथीच्या रोगांच्या प्रसाराला आवर घालणे  हा मुद्दा 56  % डेमोक्रॅट सदस्यांना तर 44 % रिपब्लिकन सदस्यांना आणि  51 % जनतेला महत्त्वाचा वाटतो.

6. अमेरिकेची शस्त्रास्त्रसिद्धता इतर कोणत्याही देशापेक्षा वरचढ असली पाहिजे हा मुद्दा 34  % डेमोक्रॅट सदस्यांना तर 70  % रिपब्लिकन सदस्यांना आणि  49  % जनतेला महत्त्वाचा वाटतो.

7. जागतिक हवामान बदलाचा मुद्दा 64  % डेमोक्रॅट सदस्यांना तर 22  % रिपब्लिकन सदस्यांना आणि  46  % जनतेला महत्त्वाचा वाटतो.

8. अमेरिकेच्या व्यापारी आणि आर्थिक हितसंबंधांची जगभर जपणूक हा मुद्दा 40  % डेमोक्रॅट सदस्यांना तर 51    % रिपब्लिकन सदस्यांना आणि  45  % जनतेला महत्त्वाचा वाटतो.

9.अमेरिकेत होणारे बेकायदा स्थलांतर हा मुद्दा 20 %  डेमोक्रॅट सदस्यांना तर 68  % रिपब्लिकन सदस्यांना आणि  42  % जनतेला महत्त्वाचा वाटतो.

10. इतर देशांशी सुरू असलेला अमेरिकेचा तोट्यातला व्यापार हा मुद्दा 33 %  डेमोक्रॅट सदस्यांना तर 54  % रिपब्लिकन सदस्यांना आणि  42  % जनतेला महत्त्वाचा वाटतो.

11. रशियाचा प्रभाव कमी करणे हा मुद्दा 52 %  डेमोक्रॅट सदस्यांना तर 32  % रिपब्लिकन सदस्यांना आणि  42  % जनतेला महत्त्वाचा वाटतो.

12.वंशविच्छेदाचा धोका असलेल्यांचे संरक्षण करणे हा मुद्दा 47 %  डेमोक्रॅट सदस्यांना तर 34  % रिपब्लिकन सदस्यांना आणि  41  % जनतेला महत्त्वाचा वाटतो.

13.जागतिक सुव्यवस्था राखण्यासाठी  इतर देशांनी आपला आर्थिक सहभाग आणखी वाढवावा, हा मुद्दा 26 %  डेमोक्रॅट सदस्यांना तर 56  % रिपब्लिकन सदस्यांना आणि  40  % जनतेला महत्त्वाचा वाटतो.

14. उत्तर कोरियाची शक्ती आणि प्रभाव कमी करावा हा मुद्दा 35 %  डेमोक्रॅट सदस्यांना तर 43   % रिपब्लिकन सदस्यांना आणि  40  % जनतेला महत्त्वाचा वाटतो.

15. इराणची शक्ती आणि प्रभाव कमी करावा हा मुद्दा 26 %  डेमोक्रॅट सदस्यांना तर 52  % रिपब्लिकन सदस्यांना आणि  39  % जनतेला महत्त्वाचा वाटतो.

16. संयुक्त राष्ट्र (युनो) आणखी बलशाली व्हावे, हा मुद्दा 47 %  डेमोक्रॅट सदस्यांना तर 28   % रिपब्लिकन सदस्यांना आणि  39  % जनतेला महत्त्वाचा वाटतो.

17.इतर देशातील दहशतवादी संघटनांचा शोध घेऊन त्या नष्ट करणे,  हा मुद्दा 28  %  डेमोक्रॅट सदस्यांना तर 40   % रिपब्लिकन सदस्यांना आणि  34  % जनतेला महत्त्वाचा वाटतो.

18. चीनची शक्ती आणि प्रभाव कमी करावा हा मुद्दा 26 %  डेमोक्रॅट सदस्यांना तर 39  % रिपब्लिकन सदस्यांना आणि  32  % जनतेला महत्त्वाचा वाटतो.

19. इतर देशातील मानवी हक्क संरक्षणाचा पुरस्कार करून त्यांची  बाजूने भूमिका घेणे आणि त्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करणे हा मुद्दा 39 %  डेमोक्रॅट सदस्यांना तर 20 % रिपब्लिकन सदस्यांना आणि  31 % जनतेला महत्त्वाचा वाटतो.


या मुद्यांच्या संबंधातली आकडेवारी सजग, चिकित्सक आणि जिज्ञासू जनांना अमेरिकनांची भूमिका कशी पुष्कळशी स्वकेंद्रित, आपल्यापुरताच विचार करणारी आहे, ती जगाच्या कल्याणाला फारसे महत्त्व देणारी नाही, हे स्पष्टपणे जाणवून देईल. याउलट  ‘वसुधैव कुटुंबकम’, किंवा संपूर्ण विश्वाला एक कुटुंब माना ही भूमिका शतकानुशतकांच्या अनुभवातून भारतातच अभिव्यक्त झाली आहे, हे प्रकर्षाने जाणवते.


No comments:

Post a Comment