Saturday, June 29, 2024

 असांजची मुक्ती, एक आंतरराष्ट्रीय समजुतदारपणा(?)


तरूण भारत, मुंबई.   रविवार, दिनांक 30/06/2024 हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.     


वसंत गणेश काणे, बी एस्सी, एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 

20240629असांजची मुक्ती, एक आंतरराष्ट्रीय समजुतदारपणा(?)

   हजारो गुप्त कागदपत्रे उजेडात आणणारा, एक तऱ्हेवाईक पत्रकार की हॅकर, स्वयंघोषित सत्यशोधक, उचापत्या, बेफिकिर, बेमुर्वतखोर, बेदरकार, स्वत:चा उल्लेख ‘डिजिटल रॉबिनहूड’ अशा शब्दात करणारा उद्दाम धटिंगण, वेडगळ आत्मविश्वास बाळगणारा, सर्वशक्तिमानांनाच प्रथम लक्ष्य करणारा, हेरगिरीचा आरोप असलेला, सरकार म्हणजे जनतेपासून माहिती दडवून ठेवणारी अवाढव्य यंत्रणा असा प्रामाणिक समज असलेला, पारदर्शकता हवी असेल तर बिंगे फोडलीच पाहिजेत असा दृढविश्वास असलेला, ढोंगी बड्या धेंडांचे व देशांचे वस्त्रहरण करणारा, ‘वर्गीकृत दस्तऐवज’ ही संकल्पनाच अमान्य असलेला, 1326 दिवस इक्वेडोरच्या वकिलातीत 200 चौरस फूट जागेत आपले कार्यालय व निवासस्थान थाटणारा, रात्रंदिवस वेढा घालून बसलेल्या ब्रिटिश पोलिसदलावर ब्रिटनला लक्षावधी पाऊंड खर्च करायला लावणारा, दोन चित्रपट व एक डॅाक्युमेंटरी यांच्या निर्मितीला कारणीभूत झालेला, चित्र व पत्रसृष्टीतील दिग्गजांचा स्नेह संपादन करणारा, जनतेने कधीही नजरेाड होऊ न दिलेला ऑस्ट्रेलियन नागरिक म्हणजेच ज्युलियन असांज! तो एक गाजलेला सायबर योद्धाही नक्की आहे. शोधपत्रकारिकेत त्याचा हात धरणारा क्वचितच कुणी असेल. पण मग हा नक्की आहे तरी कोण?  जागल्या (व्हिसल ब्लोअर)?, चोर?, बलात्कारी?, बदमाश?, लफंगा?  की आणखी कुणी? ‘त्याचे आठवावे प्रताप, अभ्यासावे डाव  आणि मगच ठरवावे, ज्याचे त्याने’, हेच बरे नाही का?

 विकिलिक्सची स्थापना

असांजने 2006 मध्ये विकिलिक्सची स्थापना केली. ही एक वेबसाइट आहे. म्हणजेच एक संकेतस्थळ आहे. पारदर्शकता राखण्यासाठी गोपनीय सरकारी आणि कॉर्पोरेट दस्तऐवज प्रकाशित करणारी माध्यम संस्था असे हिच्या कामाचे स्वरूप आहे.  या माध्यमाद्वारे असांजने आजवर लक्षावधी गुप्त कागदपत्रे उजेडात आणली आहेत. यासाठी तो आपले संगणीय कौशल्य उपयोगात आणीत असे. हा एक हॅकिंगचा प्रकार होता. अमेरिकेच्या दूतावासांनी पाठविलेले गुप्त संदेश व पत्रे, इराक आणि अफगाणिस्तानातील लष्करी कारवाईच्या संबंधातील गुप्त दस्तऐवज असांजने उघड केले परिणामतहा जगभर अमेरिकेची छी थू झाली. त्याच्या  ब्रॅडली किंवा चेल्सी मॅनिंग नावाच्या साथीदाराला  पकडून अमेरिकेने त्याला 3 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. पुढे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी निवृत्त होतांना ज्या अनेक कैद्यांना माफ केले त्यात हा ट्रान्सजेंडर साथीदारही होता. दुसरा साथीदार एडवर्ड स्नोडेन शिताफीने निसटला आणि रशियात गेला  रशियाने त्याला आश्रय दिल्यामुळे  तो थोडक्यात वाचला.

असांज हनी ट्रॅपमध्ये अडकला?

असा हा असांज संधी साधून स्वीडनमध्ये आला. दोन सौंदर्यवतींनी त्याला देशातील निरनिराळ्या कार्यक्रमात जनतेसमोर उभे करून त्याचा परिचयही करून दिला. पाश्चात्यांमध्ये स्त्री पुरूष संबंध किती सैल व स्वैर आसतात, हे सांगायला नको. आपण सुरक्षित संभोगाला संमती दिली असतांना कंडोम न वापरून (किंवा तो फाटल्यामुळे म्हणा) असुरक्षित संभोग करून आपली फसवणूक झाल्याचा एकीचा असांजवर आरोप आहे. तर दुसरीचे म्हणणे असे आहे की, त्यावेळी आपण झोपेत होतो आणि याचा गैरफायदा असांजने घेतला आणि असुरक्षित संभोग केला. बेशुद्ध अवस्थेत, झोपेत किंवा नशेत असतांना फसवून संभोग करणे हा स्वीडनमध्ये गुन्हा मानला जातो. सुरवातीला बलात्काराचा आरोप होता, पण तो टिकला नाही म्हणा किंवा आणखी काही म्हणा पण फसवून असुरक्षित संभोग केला व एस टी डी चाचणी करण्यास (लैंगिक रोग आहे किंवा कसे हे तपासण्यास) नकार दिला, हे आरोप मात्र असांजवर टिकले. हाही स्वीडनमध्ये गुन्हा मानला जातो पण बलात्काराच्या तुलनेत हा सौम्य स्वरूपाचा गुन्हा मानला जातो, तरीही त्यासाठी सहा वर्षांच्या कैदेची शिक्षा आहे. पुढे यापैकी एकीने यू टर्न घेत असे काही घडलेच नाही, असे म्हटले. असांजला फसवणुकीचा मुद्दा सोडल्यास बाकी घटनाक्रम मान्य आहे. जे झाले ते उभयपक्षी संमतीनेच झाले आहे, असे त्याचे म्हणणे आहे. पण हा सगळाच ‘हनी ट्रॅप’ चा (खोट्या आरोपाखाली अडकवण्यासाठी सुंदरीचा वापर करणे) प्रकार आहे, असे त्याचे म्हणणे आहे. पण तरीही आपण स्वीडनच्या पोलिसांना शरण जाण्यास व खटल्याला सामोरे जाण्यास तयार आहोत असा खुलासा अज्ञातवासातून असांजने केला होता.  पण अमेरिकेच्या स्वाधीन करणार नाही, अशी जाहीर हमी स्वीडनने द्यावी, अशी त्याची मागणी होती. अशी हमी देण्यास स्वीडन तयार नव्हते.

असांजचे   ब्रिटनमध्ये गुपचुप आगमन 

असांजने शिताफीने स्वीडनमधून बाहेर पडून ब्रिटनमध्ये गुपचुप प्रवेश केला आणि तो लपून बसला. याचा सुगावा लागताच  ब्रिटनही त्याच्या मागे लागले. शेवटी तो एकदाचा ब्रिटनच्या हाती लागला. त्याला प्रथम ताब्यात (डीटेन) घेण्यात आले. आपल्याला हद्दपार करू नये, यासाठी असांज ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढला पण केस हरला. त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला. पण मोठ्या शिताफीने ब्रिटिश पोलिसांना गुंगारा देऊन असांजने ब्रिटनमधल्या इक्वेडोरच्या वकिलातीत आश्रय मिळवला. ब्रिटनने वकिलातीला वेढा घालून असांजला आमच्या स्वाधीन करा, म्हणून इक्वेडोरला प्रथम सांगून व नंतर धमकावून सुद्धा पाहिले. आम्ही वकिलातीत घुसून असांजला अटक करू शकतो, अशी दर्पोक्तीही करून पाहिली. पण इक्वेडोर टसचे मस व्हायला तयार झाले नाही. दक्षिण अमेरिकेत तुमचे व्यापारी संबंध आहेत, हे विसरू नका, असे सुनवण्यासही त्यांनी कमी केले नाही. स्वीडिश अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी करू द्या, अशी मागणी केली होती पण दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यामध्ये बाचाबाची होऊन हा प्रयत्न फिसकटला. असांज तीन साडेतीन वर्षे एकप्रकारे इक्वेडोरच्या वकिलातीत पण तसा ब्रिटनमध्ये नजरकैदतच होता. आज विनयभंगाचा दावा दाखल करण्याची मुदत निघून गेली आहे. आणखी पाच वर्षे गेली तर बलात्काराचा दावाही करता यायचा नाही. पण या नजरकैदेचा असांजच्या प्रकृतीवर  परिणाम होतो आहे. त्याची रया पार गेली आहे. पण पीळ मात्र कायम आहे. असांजने फ्रान्सकडेही आश्रयासाठी विनंती केली होती. पण तुझ्यावर वॅारंट आहे, त्यामुळे तुला आश्रय देण्यास आपण असमर्थ आहोत, असे म्हणून फ्रान्सने अंग झटकले होते.

 संयुक्त राष्ट्रसंघ धावले असांजच्या मदतीला  

   असांजने जरी इक्वेडोरच्या वकिलातीत आश्रय मिळवला होता तरी ही वकिलातच ब्रिटनमध्ये असल्यामुळे तो अप्रत्यक्षपणे ब्रिटनच्या नजरकैदेतच होता म्हणाना!  त्याला मुक्त करावे, असा अभिप्राय संयुक्त राष्ट्रसंघाच्या पाच कायदेपंडित सदस्यांच्या मानवाधिकार समिताने (वर्किंग ग्रुप ऑफ आर्बिट्ररी डिटेनशन)  तीन विरुद्ध एक अशा मताधिक्याने दिला. तसेच त्याला ब्रिटन व स्वीडन कडून नुकसानभरपाईही मिळावी, असेही सुचविले. एका सदस्येने मत दिले नाही कारण ती स्वत: असांजप्रमाणे ऑस्ट्रेलियन होती. या समितीत मालदिवचे लोकशाहीवादी माजी अध्यक्ष महंमद नाशीद, तसेच म्यानमारच्या झुंझार व लोकशाहीवादी नेत्या ऑंग सान स्यू की यांचा समावेश होता. हा निकाल बाहेर येताच असांज गॅलरीत आला आणि त्याने चर्चिलप्रमाणे दोन बोटांनी ‘व्ही' अक्षरासारखी खूण केली आणि प्रेक्षकांनी एकच जल्लोश केला. (‘व्ही’ फॅार ‘व्हिक्टरी’, या खुणेचा जनक ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल असल्याचे मानतात). आंतरराष्ट्रीय कायदे व नीतीनियम धुडकावून अशाप्रकारे एखाद्या व्यक्तीला छळले जात आहे काय, याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघाची पाच कायदेपंडित सदस्यांची मानवाधिकार समिती घेत असते व आपला अभिप्राय देत असते. या समितीचा अहवाल अर्थातच संबंधित देशावर (जसे ब्रिटन) बंधनकारक नसतो. स्वीडनने हा निकाल अमान्य केला व ब्रिटनने त्याची ‘हास्यास्पद’, अशा शब्दात संभावना केली. या समितीने आपल्याला दोषी ठरवले तर आपण शरणागती पत्करू, असे असांजने मात्र अगोदरच जाहीर केले होते. ‘आतातरी मला जाऊ द्या’, असे आवाहन असांजने ब्रिटन व स्वीडनला केले होते. 

             जनतेच्या दरबारात असांज
 आपण   इक्वेडोरच्या वकिलातीतून बाहेर पडताच ब्रिटिश पोलिस आपल्यावर झडप घालणार हे असांज जाणून होता. हा स्वत:ची अटक टाळतो आहे, त्याच्यावरील वॅारंट पाहता त्याला स्वीडनच्या स्वाधीन  करणे, ही आमची कायदेशीर जबाबदारी आहे, अशी ब्रिटनची भूमिका होती. तीही चूक म्हणता येत नव्हती. असांजने तर अमेरिकेसाख्या बलाढ्य राष्ट्राला डिवचले होते. अमेरिकेची अब्रू पार वेशीवर टांगली होती. त्यामुळे ती काय वाटेल ते झाले तरी अमेरिका त्याला मोकळे सोडणार नव्हती. कारण असांजवर बलात्काराचा / निदान विनयभंगाचा / नाही काही तर फसवणुकीचा आरोप तर नक्कीच होता. पण हा नुसता आरोप असून काय उपयोग? असांजची बाजू अजून ऐकलीच गेलेली नव्हती. पण असांजवर आंतरराष्ट्रीय वॅारंट होते. त्यामुळे त्याला पकडणे हे आपले कर्तव्य नाही का अशी वरकरणी सोज्वळ आणि कायदेशीर भूमिका ब्रिटनची होती. हिलाही  चूक तरी कसे म्हणता येईल, असा पेच होता. पण हेही खरे नाही का की, एखाद्याला संपवायचे असेल तर त्याचे चारित्र्यहनन करायचे, त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, प्रसंगी त्याला  दहशतवादीही ठरवायचे आणि मग अटक करायची ही नीती आंतरराष्ट्रीय जगतात मान्यता पावलेली नाही का? अमेरिकादी बड्या राष्ट्रांनी तर म्हणे चंगच बांधला होता की, या उपद्रवी असांजला अशी जबरदस्त अद्दल घडवायची की, निदान निम्मे शोधपत्रकार तरी पार गारठले पाहिजेत. कोण बरोबर आणि कोण चूक, हे प्रत्यक्ष परमेश्वर तरी सांगू शकेल काय? पण या सर्व घटनानंतर जनमताचा विचार करता असांज हीरो ठरला, हीरो!!  

  पण हे असे किती दिवस चालणार होते?  प्रस्थापित सत्तेविरुद्ध लढणे सोपे नसते, लढून टिकणे हा भाग तर सोडूनच द्यायला हवा. असांजची वृत्ती, प्रवृत्ती लढाऊ असली तरी प्रकृतीचे तसे नसते हो! ती कितीकाळ  साथ देईल हाही प्रश्नच असतो. व्यक्ती परिस्थितीचा फार काळ सामना करू शकत नाही, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. पण प्रत्यक्ष लढा न देता महापुरातल्या लव्हाळ्याप्रमाने टिकून राहणे शक्य असते. परिस्थितीलाही एक शाप आहे. ती कधीना कधी बदलतेच. असांजचे असेच काहीसे झाले असे म्हणता येईल का? त्याला इक्वेडोरच्या दूतावासात मिळालेल्या  संरक्षणाला आंतरराष्ट्रीय हमी होती. पुढे स्वीडननेही आरोप मागे घेतले कारण बहुतेक आरोप खूप जुने झाले होते, हे असावे. ब्रिटनमधली न्यायप्रक्रिया लांबवण्यात वकिलांना यश मिळत होते. तेही प्रसिद्धीच्या वलयात येत चालले होतेच की!  न्यायप्रक्रियेत गेलेल्या वेळामुळे असांजची अमेरिकेत पाठवणी लांबत गेली. पुढे कायदेपंडितांच्या लक्षात आले की, खुद्द अमेरिकेच्या घटनेतील पहिली दुरुस्ती असांजला संरक्षण देऊ शकेल,अशी आहे. ही घटना दुरुस्ती अभिव्यक्तिस्वातंत्र्याची हमी देते. तसेच माहितीचा स्राोत उघड न करण्याचे घटनादत्त संरक्षणही यात अभिप्रेत आहे. उद्या असांजला अमेरिकेत आणले आणि त्याच्यावर खटला चालवला तर त्याला आंतरराष्ट्रीय प्रसिध्दी मिळणार, हे अमेरिकेच्या लक्षात आले. या निमित्ताने अमेरिकेची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगली जाणार, ते वेगळेच. एवढे करूनही निकाल असांजच्या विरोधातच लागेल, याची हमी नाही, हेही अमेरिकेला जाणवले असले पाहिजे. असे काही झाले की शहाणपण सुचते. यावेळीही तसेच काहीतरी झाले असावे असे दिसते. असांजने हेरगिरीच्या आरोप मान्य करावा, आणि ब्रिटनमध्ये असांजने भोगलेल्या  तुरुंगवासालाच  अमेरिकेने ‘अधिकृत शिक्षा’ मानावे, असे ठरले. छान आहे की नाही ही तडजोड!!  अमेरिकादी अनेक राष्ट्रे गेली पाच वर्षे असांजच्या मागे हात धुवून लागली होती. अमेरिकेवर दुहेरी मापदंड योजण्याचा आरोप केला जातो. सभ्य, सुसंस्कृत, व्यक्तिस्वातंत्र्यवादी हा अमेरिकेचा एक चेहरा आहे. हा बुरखा फाडून  दुसरा भीषण चेहरा   दाखवण्यात  जुलियन असांज  यशस्वी झाला तर? तडजोडीच्या मुळाशी ही शक्यता तर नसेल ना? ते काहीही असो, अमेरिकेकडून हमी मिळवून आज असाज आपल्या मायदेशात -ऑस्ट्रेलियात- येऊन विसावतो आहे आणि दुसऱ्या असांजचे अवतरण होईपर्यंत(च) या प्रकरणात भविष्यात ‘सारं कसं शांत शांत’, होणार आहे.   यालाच म्हणतात आंतरराष्ट्रीय समजुतदारपणा !! खरं की नाही? 




No comments:

Post a Comment