Monday, August 26, 2024

      ‘हिंदू भिंत ढासळली?’

तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक २७/०८/२०२४ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.     

      ‘हिंदू भिंत ढासळली?’

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 


  आंदोलनकर्त्या  विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे धोरण लष्कराच्या एका गटाने स्वीकारल्यामुळे बांगलादेशमध्ये नुकतेच हसीना शासनव्यवस्थेचे पतन झाले आहे. आजवर भारत आणि बांगलादेश यातील  सख्य दक्षिण आशियातील भूराजकीय घडामोडीत महत्वाची भूमिका पार पाडीत होते. या दोन भौगोलिक क्षेत्रातील आजचे कृत्रिम भेद हळूहळू लयाला जातील आणि  साम्य सबळ होत जाईल, असा समज दृढ होत चालला होता. पण भारताखालोखाल स्थिर आणि परिपक्व लोकशाही म्हणून ज्या देशाचा उल्लेख केला जायचा त्या बांगलादेशच्या पंतप्रधानांनाच विद्यार्थ्यांच्या देशांतर्गत उठावामुळे भारतात पळ काढावा लागला, ही एक प्रचंड मोठी घडामोड मानली जाते.


     भारत आणि बांगलादेश यांच्या संबंधात एखाद्या मुद्यावरून वितंडवाद घडून यावा, यासाठी जगातील काही शक्ती तसेच स्थानिक विरोधी गट  अधिर झाले होते. पण त्यांना आजवर लष्करातील कोणत्याही गटाची साथ मिळत नव्हती किंवा ‘त्या’ लष्करी  गटाला ते शक्य होत नसावे, असे दिसते. बांगलादेशाबाहेरील  शक्तीत पहिल्या क्रमांकावर पाकिस्तान होते, हे सांगण्याची आवश्यकता नसावी. बांगलादेशात जे घडले आणि ज्यामुळे तुटावे एवढे तणाव निर्माण झाले त्याला बांगलादेशाच्या पंतप्रधान   हसीना बऱ्याच अंशी नक्कीच जबाबदार आहेत. बांगलादेशात जे घडले त्यावरून त्या देशातील नेत्याची  वैयक्तिक आस्था आणि दोन देशातील राजकीय जवळीक एकाच  सार्वजनिक पटलावर कार्य करू शकणार नाहीत/ शकत नाहीत, हे पुन्हा एकदा अनुभवाला आले आहे. पण बांगलादेशात जे घडले त्याचे वस्तुनिष्ठ विश्लेषण म्हणून या  संपूर्ण घटनाक्रमाकडे पाहणे वेगळे आणि आपले दुष्ट आडाखे बरोबर ठरले असे म्हणत  बोंबा ठोकणे वेगळे! या निमित्ताने पाकमध्ये सुरू असलेला हर्षातिरेक हा बोंबा ठोकण्याच्या प्रकारात मोडतो म्हणून त्याची दखल घेणे आवश्यक ठरते.

‘बांगलादेशातील बंगाली मुसलमान आणि पंजाबमधील पंजाबी मुसलमान यातील हिंदू भिंत कोसळली’, असे शीर्षक देऊन त्यांनी एक  लबाड कथानक (फॅाल्स नॅरेटिव्ह) या उठावाच्या निमित्ताने  सुरू केले आहे. जी कोसळली ती हिंदू भिंत होती का, हा मुद्दा तपासून पाहण्याची आवश्यकता आहे. 

   लोक हे जाणून आहेत की, बांगलादेशातील विद्यार्थीजगतात हसीना सरकारच्या कोटा पद्धतीबाबत तीव्र असंतोष गेली काही वर्षे खदखदत होता.  हा मुद्दा प्रगतीच्या संधींच्या न्यायोचित वाटपाशी संबंधित आहे. त्याला ‘हिंदू’ हे विशेषण लागत नाही, लावता येणार नाही. बांगलादेशातील  कोटा पद्धत निदान आजतरी संदर्भहीन झाली होती. या प्रकरणी ‘हिंदू भिंत’ असा मुद्दा येतोच कुठे? काहीही झाले की हिंदूंविरुद्ध आरडाओरड सुरू करायची, हे एकमेव  कुभांड असंतोष निर्मितीसाठी पुरेसे असते. हा नापाक मुद्दा बऱ्यापैकी साथ देतो, हे पाकी जाणून आहेत. हा एक कलमी कार्यक्रम सुरू करायचा की झाले. भारत आणि 17 कोटी बांगलादेशी यातील सुसंवाद हाणून पाडण्यासाठी, हे एकमेव धोरण पाक अवलंबित आहे. काही देशांची ही रणनीती (स्ट्रॅटजी) होती तर काहींचे उद्देश अधिक पाताळयंत्री स्वरुपाचे होते. हिंदू आणि मुस्लीम कधीही एका व्यावहारिक भूमीवर येऊच शकणार नाहीत, हे त्यांना दाखवायचे आहे/होते.

   जगात पॅन-इस्लामिक चळवळ पूर्वीपासून  सक्रीय असून तिने राष्ट्रांच्या मर्यादा केव्हाच ओलांडल्या आहेत. ‘सर्व मुस्लीम देशांचे एक मुस्लीम राज्य’ (खिलापत) हे तिचे उद्दिष्ट आहे. इस्लामधर्मीयांचे हे एकमेव आंतरराष्ट्रीय संघटन असणार आहे. पण या संकल्पनेला इस्लामी राष्ट्रांकडून मनापासून प्रतिसाद मिळतांना दिसत नाही. अधूनमधून तोंडदेखला पाठिंबा मिळत असतो एवढेच. पाकिस्तान, मलेशिया, तुर्कस्तान असे कुकर्मी देश वगळले तर इतर अनेक मुस्लीम देशांना  भारताशी स्नेहाचे संबंध हवे आहेत. ते देश आपली  ही भूमिका लपवून ठेवीत नाहीत. गेली काही वर्षे पॅन-इस्लामिक चळवळ बांगलादेशावर विशेष लक्ष केंद्रित करून होती. पण तिला बांगलादेशात हवातो आणि हवा तेवढा प्रतिसाद मिळत नव्हता. पण आता विद्यार्थ्यांच्या हसीनाविरोधी आंदोलनामुळे बरेच परकीय आणि काही स्थानिक अशा दोन्ही विरोधी घटकांच्या हाती कोलीत सापडले आहे. फारशी शक्ती न वापरता बांगलादेशात हिंदूंचे शिरकाण करायचे, त्या निमित्ताने भारताला रक्तबंबाळ करीत राहण्याचा सोपा आणि सुलभ मार्ग निश्चित करण्याच्या या कुटिल प्रयत्नांची दखल भारताने आणि बांगलादेशातील नेमस्त गटाने वेळीच घेतली, हे बरे झाले. पण यातून हिंदूंना सुरक्षेची हमी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. नव्या राजवटीचे सल्लागार नोबेल पारितोषिक विजेते महंमद युनूस हे नेमस्त वृत्तीचे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्री असून ते स्वत:  शेख हसीना, शेख खालिदा झिया आणि लष्कर या तिन्ही परस्परविरोधी गटांपासून पासून सारखेच अंतर ठेवून आहेत. जनता त्यांना ‘तारणहारही’ मानते. पण नुसते मोठे पद असून काय उपयोग? सोबत सत्ताही असावी लागते.

    हसीना सरकार आणि भारत यातील सौहार्द्यामुळे पाकिस्तानला बांगलादेशात पाऊल ठेवता येत नव्हते, स्थानिक सहकार्यही म्हणावे तसे मिळत नव्हते. आता मात्र आपल्याला मुक्तद्वार मिळाल्याच्या उद्दामपणात पाकिस्तान वावरते आहे.

 पंजाबी पाकिस्तानान्यांनी 53 वर्षांपूर्वी बंगाली मुस्लीम महिलांवर अनन्वित अत्याचार केले. स्वतंत्र होताच बांगलादेशाने या अत्याचारातून जन्माला आलेल्या पोरक्यांच्या पोषणासाठी कोटा पद्धतीचे आरक्षण स्विकारले होते. म्हणजे आजच्या आंदोलनासाठी खरेतर पाकिस्तानलाच जबाबदार धरावयास हवे आहे. ते राहिले बाजूला आणि आपल्या पाशवी कृत्यांमुळे जन्माला आलेल्या पोरक्यांना आजचे पाकिस्तानी बंधू म्हणून साद घालते आहे. वास्तवाला विकृतीत परिवर्तित करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न आहे.

  पाकिस्तानी वृत्तपत्र नेशनमध्ये लिहितांना स्तंभ लेखिका ओमे आयमेन यांनी ‘हिंदू भिंत ढासळली’ या शीर्षकाला अनुसरून एक लेख 16 ऑगस्ट 2024 ला लिहिला आहे. त्यात त्या लिहितात, ‘गेल्या दशकात बांगलादेशी नेतृत्वावर हिंदुत्वाचे गारूड स्वार झाले होते. आज बांगलादेशी नेतृत्व मुक्त झाले आहे.  मुस्लीमांमधील बंधुभाव पुन्हा अभेद्य आहे (प्रत्यक्षात अन्याय करणारे पंजाबी पाकिस्तानी दैत्य होते तर जन्माला आलेले पोरके हे बलात्काराचे अपरिहार्य फलित होते! 

  आजच्या  आंदोलनाचा प्रारंभ  जुलै 2024 मध्ये सुरु झाला होता, हे लक्षात येते.  आंदोलनातला पहिला मुद्दा  ‘आरक्षण वाटा’ (कोटा) हा होता. न्यायालये हा गुंता सोडविण्यात यशस्वी होत चालली होती. पण    विद्यार्थ्यांची उद्विग्नता सतत वाढतच जाईल, असे ‘टूल किट’ विकसित करण्यात आले होते! आजची तरुण पिढी या षडयंत्रात फसत गेली. तरुणाई ना राजनीतीकडे गांभीर्याने पाहते, ना तिचा मुत्सद्देगिरीशी फारसा संबंध असतो. बांगलादेशातील  आजच्या  तरुणाईने स्वातंत्र्यसंग्राम अनुभवलेला नाही, स्वातंत्र्यप्राप्तीसाठी किती किंमत मोजावी लागली याचीही तिला माहिती नाही. त्यामुळे आता काय होत चाललय हे बांगलादेशाच्या आजच्या पिढीला समजणार नाही, आणखी काही वर्षानंतर कदाचित अनेकांचे डोळे उघडतीलही, पण त्यावेळी आक्रोश करीत कपाळावर हात मारुन घेण्याखेरीज काहीही करता येणार नाही. 



No comments:

Post a Comment