Monday, September 2, 2024

 

मोदी आणि झेलेन्स्की यांची  ऐतिहासिक भेट 

 तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक ०३/०९/२०२४  हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.     

    मोदी आणि झेलेन्स्की यांची  ऐतिहासिक भेट 

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?  

  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 23 ऑगस्ट 2024 ला यूक्रेनचे राष्ट्रपति व्लादिमीर झेलेंस्की यांच्याशी त्यांच्या मारिन्स्की पॅलेस या निवासस्थानी मनमोकळी चर्चा केल्याचे वृत्त आहे. ही भेट म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून संतुलन साधण्याची कृती आहे, असे मानणारा एक गट आहे. रशियाला जाऊन आल्यांतर युक्रेनला गेलात तर संतुलन साधले जाईल, अशी ही भूमिका आहे. युक्रेन व रशिया यात युद्ध सुरू असतांना मोदी रशियाला गेले होते. मोदींच्या रशिया दौऱ्यावर पाश्चात्य देशांनी नाराजी व्यक्त करत भारतावर एकतर्फी भूमिका घेतल्याचा आरोप केला होता, ही भेट हा त्यावरचा उतारा आहे, असे मानणारे अनेक आहेत. 

 भारत आणि युक्रेन दरम्यान द्विपक्षीय संवादही आवश्यक झाला होता.  युद्ध सुरू असतांनाही भारत आणि युक्रेनमधील व्यापारी संबंधांमध्ये  विशिष्ट वस्तूंवरील बंधने स्वीकारून केलेल्या व्यापारात वाढ झाली आहे. याशिवाय भारत युक्रेनला युद्धानंतर कशी मदत करू शकतो यावरही चर्चा करण्याची इच्छा उभयपक्षी नक्कीच निर्माण झाली असावी. जसे की भारत युक्रेनला औषधे, रुग्णसुविधा, अन्य पायाभूत सुविधा व सुधारणा याबाबत  कशी मदत करू शकतो, हा मुद्दाही महत्त्वाचाच होता.  आता युक्रेन सोबतचे व्यापारी व्यवहारही जोरात  सुरू राहतील. मोदींनी झेलेन्स्की यांच्या पाठीवर ठेवलेला हात हेच तर सूचित करीत नसेल ना?.

    अमेरिकेच्या दबावाखाली मोदी युक्रेनला गेले, असे काहींना वाटते तर रशियालाही मोदींनी युक्रेनला जावे व झेलेन्स्कीच्या मनाचा अंदाज घ्यावा, असे वाटत असावे असा काहींचा कयास आहे. कारण आता युक्रेनच्या फौजा ‘रशियात घुसून मारताहेत’. गोंधळलेल्या आणि चडफडणाऱ्या पुतिन यांना मोदींची युक्रेन भेट उपयोगाची आहे, असे तर वाटले नसेल ना? असे अनेक अंदाज आहेत.

   मोदी रेल्वेने 7 तासांच्या प्रवासासाठी पोलंडमधून युक्रेनच्या राजधानीकडे/ कीवकडे भल्या पहाटेच निघाले होते. यावेळीही विमानहल्ल्यांच्या सूचना देणारे भोंगे वाजतच होते. पण त्याचवेळी कीवमध्ये मोदींना ‘घ्यायला’ आलेल्यांची लगबगही सुरू होती. हा दिवस युक्रेनचा ‘नॅशनल फ्लॅग डे’ होता. दुसऱ्या दिवशी युक्रेनचा स्वातंत्र्य दिन होता. हा मुहूर्त साधून युक्रेनच्या मोठ्या शहरांवरही याच काळात रशिया क्षेपणास्त्रांचा मारा करीत होता.

  भारतीयांबाबतचा एक कुतुहलाचा भाव युक्रेनमध्ये आहे. भारताच्या पंतप्रधानांची युक्रेनला ही पहिलीच भेट होती. यामुळेही युक्रेनमध्ये समिश्र स्वरुपाचे वातावरण होते, असे म्हटले जाते. सद्ध्या सुरू असलेल्या युद्धासंबंधात भारताची नक्की भूमिका कोणती आहे, हे युक्रेनला जाणून घेण्याची इच्छा तर नक्कीच आहे. रशिया आणि भारत यांची मास्कोमध्ये गळाभेट होत असतांनाच्या प्रसंगी  कीवमधील मुलांच्या हॉस्पिटलवर क्षेपणास्त्रांचा हल्ला सुरू होता. हे पाहून झेलेन्स्की यांच्या मनाचा प्रचंड क्षोभ झाला असला पाहिजे.  

    आज एकीकडे अमेरिका आणि नेटो तर दुसरीकडे रशिया, चीन, उत्तर कोरिया आणि इराण अशी स्थिती आहे.  युरोपातील अनेक राष्ट्रांचा युक्रेनला पाठींबा आहे, हे नक्की. पण त्याची कारणे मात्र वेगवेगळी आहेत. हंगेरीचे व्हिक्टर ओरबान यांचा पाठींबा नाइलाजापोटी आहे. युक्रेनला पाठींबा न द्यावा, तर रशिया खूश होईल पण  युरोपातली इतर राष्ट्रे नाराज होणार. जर्मनीचा युक्रेनला मनापासून पाठींबा आहे. पण जर्मनीचे रशियाशी जे व्यापारी संबंध आहेत, त्यांचे काय? तेलवाहिन्यांचे जाळेच आहे की. तेही जपायला हवे ना? बाल्टिक राष्ट्रे युक्रेनला मनापासून पाठींबा देत आहेत. पण या मागचे कारण काय, तर रशिया आणि बाल्टिक राष्ट्रे यांच्या मधोमध असलेले युक्रेन आज रशियाचे आघात सहन करते आहे. 

 युक्रेनला भारताची तटस्थता समजत नाही. पण भारत तटस्थ आहे कारण त्याच्या पाठीमागे तशीच मोठी कारणे असली पाहिजेत, असे मानणारे युक्रेनमध्ये आहेत. दुसरी शक्यताही ते गृहीत धरतात, ती ही की, युक्रेनचा सद्ध्या सुरू असलेला लढा भारताला अमान्य आहे. पण रशिया-युक्रेन संघर्षात भारताने कधीही त्रयस्थ भूमिका घेतली नाही. उलट आमचा  तिसरा ‘शांततेचा पक्ष’ आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांना आश्वस्त केल्याचे वृत्त आहे. युद्धाऐवजी राजकीय चर्चाच अधिक फलदायी ठरेल, मुत्सद्दीपणा आणि संवाद हाच संघर्ष सोडवण्याचा एकमेव मार्ग आहे. असे भारताचे मत असल्याचे मोदींनी चर्चेत  स्पष्ट केले आहे.

 सामान्यतः युद्धजन्य परिस्थितीत काहीना काही सबब काढून राजकीय नेते आजवर भेटी देण्याचे टाळत आले आहेत. याउलट कृषी, अन्न उद्योग, औषध, संस्कृती आणि मानवतावादी सहाय्य या क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी या देशांनी करार केला. सोबतच भारताने  युक्रेनला ऑक्सिजन तयार करण्याची क्षमता असलेले, तसेच प्रत्येकी सुमारे 200 वैद्यकीय प्रकरणे हाताळू शकतील असे ‘भीष्म क्यूब्स’, म्हणजे जणू ‘अत्याधुनिक मोबाइल रुग्णालयेच’ भेट म्हणून दिली.  युक्रेनमधील विचारवंत भारत आणि युक्रेन यात पुरेसा संवादच झाला नाही/नसावा असे मानतात. “केवळ युक्रेनच नव्हे तर पूर्व युरोप आणि दक्षिण आशियातील राष्ट्रेही एकमेकांसाठी अगदी नवखी आहेत. आम्ही भारताला आजही केवळ आध्यात्म आणि योग याचे धनी मानतो. आयटीक्षेत्रातील भारताची भरारी आम्हाला नुकतीच कुठे जाणवू लागली आहे. पण 2014 नंतर  रशिया आणि युक्रेन या भूराजकीय क्षेत्रात जे घडले त्याची भारताला जाणीव आहे का? क्रिमिया सारख्या आमच्या एका प्रांताचा लचकाच रशियाने तोडला आहे. अहो, आम्ही आपल्या स्वातंत्र्यासाठी लढतो आहोत. तुम्ही नाही का आपल्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिश वसाहतवादांशी लढलात, अगदी तसेच”, ही आहे युक्रेनची भूमिका. दोन्ही नेत्यांनी ‘प्रादेशिक अखंडता आणि राज्यांच्या सार्वभौमत्वाचे रक्षण’, याबाबतच्या आंतरराष्ट्रीय कायद्याच्या तत्त्वांचे पालन करण्यावर भर दिला.  म्हणजे शांतता स्थापनाचा विषय एकाच्या मध्यस्तीकडून  ‘समान भूमिका असलेल्या मध्यस्तांच्या फळीची मध्यस्ती’, कडे जाताना दिसतो आहे.

   रशिया वेगळा, सोव्हिएट युनीयन वेगळे. एकेकाळी युक्रेनही सोव्हिएट युनीयनचा हिस्सा होते. अशा प्रांतांचे संघटन म्हणजे सोव्हिएट युनीयन. ते आता राहिलेले नाही. सोव्हिएट युनीयन आणि भारत यात तांत्रिक आणि संरक्षणविषयक सहकार्य फार जुन्या काळापासून अस्तित्वात आहे. प्रत्यक्षात सर्व व्यवहार सोव्हिएट युनीयनच्या नावे पण युक्रेनमधूनच व्हायचा. आज मात्र युक्रेनचा दक्षिण आशियातील देशांशी संबंध राहिलेला नाही कारण सर्व व्यवहारांवर रशियाने लबाडीने आपला अधिकार प्रस्थापित केला आहे, ही युक्रेनची खदखद आहे. युक्रेनियन विचारविश्वातील ही वैचारिक खदखद समजून घेण्याइतपत भारतीय मनोविश्व निश्चितच संमृद्ध आहे. दुसरे असे की, युद्ध थांबवा, न थांबाल तर हाती विध्वंसाशिवाय काहीही लागणार नाही, हे ठासून सांगणारा आणि युक्रेन आणि रशिया हे दोघेही ज्याला सारखाच विश्वसनीय मानतात, असा मोदी वगळता दुसरा कुणी आहे का?



No comments:

Post a Comment