चीनच्या चतुरतेला भारताचे उत्तर
(पूर्वार्ध)
तरूण भारत, नागपूर. मंगळवार, दिनांक ३१/१२/२०२४ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.
चीनच्या चतुरतेला भारताचे उत्तर
(पूर्वार्ध)
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ,
नागपूर 440 022 मोबाईल 9422804430
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
चीनच्या चतुरतेला भारताचे उत्तर
(पूर्वार्ध)
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ,
नागपूर 440 022 मोबाईल 9422804430
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
आशियातील जनतेचा पाश्चात्यांवर विश्वास नाही याबाबत आश्चर्य वाटायला नको. जवळजवळ पूर्ण आशियाला पाश्चात्यांनी गुलामासारखे वागवून आशियातील जनतेचे शोषण केले आहे, ही बाब विसरण्यासारखी नक्कीच नाही. याचा स्वाभाविक परिणाम असा झाला की, आता स्वतंत्र झाल्यानंतर पाश्चात्य देशांशी फटकून वागण्याची मानसिकता आशियन जनतेत निर्माण झाली, हेही समजण्यासारखेच आहे. आशियन देशांचाच एक गट तयार करावा आणि त्यांनीच आपापसात संबंध ठेवावेत, अशी मानसिकता निर्माण होण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. ‘आशियन सगळे एक, इतर सगळे परके’, हा भावही यामुळेच निर्माण झाला. या भावनेने भारावून गेलेल्या आशियनांच्या मानसिकतेला आणखी खतपाणी घालण्याचा चतुर डाव चलाख चीनने आखला. चीनची भूमिका अशी होती की, आशियात आपल्याला आव्हान देण्याचे सामर्थ्य कुणातही नाही. त्यात भारतही आला. चीनचे आशियातील बहुतेक देशांशी सीमावाद आहेत. हे वाद आम्ही आपापसात सोडवू ‘इतरांनी’ त्यात पडू नये, अशी भूमिका चीनने घेतली. एकटा भारत सोडला तर इतर देशांचे सामर्थ्य आपल्या तुलनेत टिकणारे नाही, हे चीन जाणून आहे. चीनच्या तुलनेत भारताचे सामर्थ्यही फारशी चिंता करावी, असे नाही आणि नजीकच्या भविष्यात भारतही चीनची बरोबरी करू शकणार नाही, अशीच चीनची समजूत होती आणि आहे. भारताबद्दल बोलायचे तर एकेकाळी पंचशीलच्या गारुडाने भारतही भारावून गेला होता. त्यातून भारताला बाहेर यायला 1962 साल उजाडावे लागले.
एप्रिल 1954 मध्ये, भारत आणि चीनने पंचशील करारावर स्वाक्षरी केली होती. यालाच शांततापूर्ण सहअस्तित्वाची पाच तत्त्वे म्हणूनही ओळखले जाते. परस्परांच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा सन्मान करणे, परस्परांवर आक्रमण न करणे, एकमेकांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणे, समानतेवर आधारित व्यवहार करणे, परस्पर लाभ होईल असा व्यवहार करणे, आणि शांततापूर्ण सहअस्तित्वाचा पुरस्कार करणे अशा आशयाची या पंचशील कराराची पाच तत्त्वे आहेत. मुळात बौद्ध धर्मानुसार सदाचाराची पाच तत्त्वे सांगितली आहेत. प्रत्येक धार्मिक व्यक्तीने त्यांचे पालन करावे, अशी बौद्ध धर्माची शिकवण आहे. (1) अस्तेय म्हणजे चोरी न करणे; (2) अहिंसा म्हणजे हिंसा न करणे, (3) ब्रह्मचर्य म्हणजे व्यभिचार न करणे, (4) सत्य म्हणजे खोटे न बोलणे आणि (5) मादक द्रव्यांचे सेवन न करणे अशा आशयाची ही पाच तत्त्वे आहेत. भारत आणि चीन यांनी करार करतांना पंचशील हेच प्राचीन शीर्षक वापरून करार केला होता. हा करार करून भारताला बेसावध ठेवून चीनने सीमेवर कुरापती करायला सुरवात केली आणि 1962 मध्ये तर सरळसरळ आक्रमणच केले. भारत आपल्या तुलनेत कसा कमकुवत आहे, याची भारताबरोबरच जगालाही जाणीव करून देण्यासाठी केलेला हा चीनचा प्रयत्न होता. चीन फक्त भारताशीच असा वागतो, असे नाही. इतर बहुतेक देशांशीही चीनची वागणूक अशीच आहे.
चीनने उकरून काढलेले सीमावाद
1) भारत-चीन सीमावाद- अक्साईचीनमधला चीनने 38,000 चौ.किमी. भूभाग बळकावला आहे तर अरुणाचलमधील 90,000 चौ. किमी. भागावर दावा सांगितला आहे. या शिवाय उत्तराखंडची 545 किलोमीटर लांबीची सीमा चीनला (तिबेट) लागून आहे. या भागात निरनिराळ्या ठिकाणी मिळून एकूण 2450 चौ.किमी. भूभाग चीनला हवा आहे.
नेपाळ-चीन सीमावाद - आज नेपाळ चीनच्या ताटाखालचे मांजर असल्यासारखे दिसत असले तरी चीनने नेपाळची घुसखोरी करून हडपलेली एकूण 64 हेक्टर जागा ढोलाखा, हुमला, सिंधूपालचौक, संखुवासभा, गोरखा आणि रासुवा जिल्ह्यात विखुरलेली आहे. नेपाळ-चीन सीमा 1415 किमी. लांब आहे. या सीमेवर ठिकठिणी पिलर्स लावलेले होते. यापैकी 98 पिलर्स उखडून फेकण्यात आले आहेत तर इतर काही नेपाळच्या सीमेत आत सरकवण्यात आले आहेत. नेपाळी कॅांग्रेसने याबाबत नेपाळच्या संसदेत ठराव मांडून चीनने नेपाळची हडपलेली भूमी परत मिळविण्यास ओली सरकारला सांगितले. पण व्यर्थ.
मे 2020 मध्ये चीनच्या ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्कने, माऊंट एव्हरेस्ट चीनच्या हद्दीत आहे, नेपाळच्या नव्हे, असे घोषित केले. नेपाळमध्ये संतापाची लाट उसळताच मात्र हे ट्विट डिलिट करण्यात आले. चीन आणि नेपाळमध्ये 1788 ते 1792 मध्ये युद्ध झाले होते. त्याचा हवाला देत 64 हेक्टर जागेवर चीन आपला अधिकार सांगतो आहे.
चीन - भूतान सीमावाद
जुलै 2017 मध्ये भूतानी अधिकाऱ्यांनी चिनी अधिकाऱ्यांना बजावले की, दोन देशादरम्यान झालेल्या सहमतीला अनुसरून वागावे. डोकलाम प्रकरणानंतरही चीन भूतानच्या सीमेच्या आत निरनिराळ्या ठिकाणी घुसखोरी करीत असतो. भूतानी गुराख्यांना भूतानी प्रदेशातूनच चिनी गस्ती तुकड्यांनी अनेकदा हुसकून लावले आहे. चीनने भूतानच्या साकतेंग अभयारण्यावर दावा करून भारतालाही शह देण्याचा प्रयत्न केला आहे.
दक्षिण चीन उपसागर आणि प्रशांत महासागरात चीनने जवळपास सर्व देशांशी सीमावाद उकरून वातावरण तापवले आहे. चीनचे तैवान, ब्रुनाई, इंडोनेशिया, मलायाशिया, फिलिपिन्स, व्हिएटनाम आणि जपानबरोबर सागरविषयक प्रश्नी वाद आणि संघर्ष आहेत. चीन समुद्रातील साधनसंपतीबाबत जुने पुराणे ऐतिहासिक दाखले दाखवत अधिकार गाजवण्याच्या प्रयत्नात असतो. दक्षिण चिनी समुद्र व त्यातील लहानमोठी बेटे, समुद्रात जेमतेम बुडालेली बेटे, किनारे यावर चीन आपला अधिकार गाजवत असतो.
व्हिएटनाम - 1974 मध्ये चीनने पॅरॅसेल बेटे व्हिएटनामकडून हिसकाऊन घेतली. वूड आयलंड्सवर चीनने सैनिकी ठाणी उभारली विमानतळ बांधले आणि कृत्रिम बेटे उभारली आहेत. या बेटांवर तसेच तैवान आणि व्हिएटनामधील प्रदेशांवरही चीन आपला अधिकार सांगत असतो.
जपान - पूर्व चिनी समुद्रात सेनकाकू नावाची निर्जन बेटे आहेत. चीनने याच बेटांना दिओयू बेटे अशी नावे दिली आहेत.1890 पासून या बेटांवर जपानचे नियंत्रण आहे.1970 मध्ये या बेटांवर खनीज तेलांचे मोठे साठे आहेत, हे कळताच चीनने या बेटांवर अधिकार सांगितला. अमेरिका आणि जपानने हा अधिकार नाकारताच चीनने प्रचंड प्रचार मोहीम राबवून त्यांना विवादित स्वरुप दिले.
तैवान - चीन तैवानवर आपला अधिकार सांगतो आहे. मॅक्लेसफील्ड बॅंक, पॅरॅसेल बेटे, स्कारबरो शोल, स्पार्टली बेटे यावरही चीन आपला अधिकार सांगतो आहे. या बेटांवर चीन, तैवान, व्हिएटनाम आणि म्यानमार हे देश आपलाही अधिकार आहे, असे सांगत आहेत.
फिलिपिन्स - दक्षिण चिनी उपसागरावर फिलिपिन्स आणि चीन दोघेही आपला अधिकार सांगतात. फिलिपिन्सने हा प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे नेला होता. या न्यायालयाने फिलिपिन्सच्या बाजूने निकाल दिला. पण हा निकाल चीनने मानला नाही.
स्कार्बरो शोल हे बेट समुद्रात जेमतेम बाहेर आलेले बेट आहे. या बेटाबाबत 1997 साली वाद सुरू झाला होता. तो शिगेला पोचला एप्रिल 2012 मध्ये. शेवटी चीनने इथेही आपले बस्तान बसवलेच. शेवटी फिलिपन्सने पीसीए (परमनंट कोर्ट ॲाफ आरबिट्रेशन) कडे दाद मागून निर्णय आपल्या बाजूने मिळवला पण चीनने याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. चीनची ही चतुराई हाणून पाडण्यासाठी भारतानेही उपाय योजले आहेत. ते आपण पुढच्या भागात पाहू.