Monday, December 16, 2024

 सीरियातील मुलखावेगळा संघर्ष


तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक १७/१२/२०२४ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.     


सीरियातील मुलखावेगळा संघर्ष


वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?  

  बशर अल-असद हे सीरिया देशाचे राष्ट्राध्यक्ष, सैन्य दलाचे प्रमुख आणि सत्तारूढ बाथ पार्टीचे जनरल सेक्रेटरी होते. त्यांचे अगोदर बशर यांचे वडील हाफिज अल-असद हेही सलग 30 वर्षे सीरियाचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांच्यानंतर बशर सीरियाचे सर्वेसर्वा झाले. अशाप्रकारे सीरियावर गेली अनेक वर्षे असद कुटुंबाची सत्ता होती. बंडखोरांनी ही सत्ता दिनांक 8 डिसेंबर 2024 ला उलथून टाकली. यासाठी गेली 13 वर्षे ते संघर्ष करीत होते. आत्ताआत्तातर या संघर्षाला गृहयुद्धाचे स्वरुप आले होते. असद यांनी सहकुटुंबसहपरिवार रशियात पलायन केले आहे. रशियाने मानवतेच्या दृष्टीकोनातून त्यांना आश्रय दिला आहे. आश्रय घेण्यासाठी असद यांनी रशियाची निवड करावी ही नोंद घ्यावी अशी बाब आहे. इस्लामी बंडखोरांनी रशिया आणि इराण या दोन राष्ट्रांनाही या निमित्ताने दणका दिला आहे, असे राजकीय निरीक्षक  मानतात. याचे कारण हे आहे की, ही दोन राष्ट्रे सीरियातील असद राजवटीला पाठिंबा देत होती. रशियाने 2022 मध्ये युक्रेनवर चढाई केली होती. त्यामुळे रशिया यावेळी असदला फारशी मदत करू शकला नाही. इराण हिजबुल्ला मार्फत असदला मदत करीत असे. पण इस्रायलने हिजबुल्लालाच सद्ध्या सुरू असलेल्या युद्धात पुरते नमोहरम केले आहे. त्यामुळे बंडखोरांना नामी संधी मिळाली आणि ते विजयी झाले असे दिसते. दुसरे असे की, सीरियातील जनतेतही असदविरोधात अगोदरच असलेला असंतोषही वाढीस लागला होता. त्यांची सहानुभूती आता बंडखोरांकडे वळली. अशाप्रकारे बंडखोरांचा उठाव शेवटी गृहयुद्धात परिवर्तित झाला. असद यांची कारकीर्द ही जगातली सर्वात मोठी जुलमी राजवट मानली जाते. ती सर्वात जास्त काळ चालली. त्या मानाने तिचा बोभाटा मात्र फारसा झाला नाही. ती आता संपली. नवीन राजवट कशी येते ते पहायचे.

  सीरिया प्रकरणी रशिया, इराण, तुर्कस्तान, अमेरिका आणि इस्रायल ही राष्ट्रे आपापपले हेतू समोर ठेवून भाग घेत होती. रशियाने असदची सतत पाठराखण केलेली आहे. पण युक्रेनमध्ये रशिया स्वत: जायबंदी झाला नसता तर त्याने सीरियाला आणखी मदत नक्कीच केली असती. इतर आव्हानांचा सामना करण्यात गुंतलेल्या इराणने तर प्रत्यक्ष युद्ध कुणाशीच केले नाही. त्याचे मुख्य वैर इस्रायलशी होते आणि आहे. यासाठी इराणने लेबनॅानमधील हिजबुल्ला गटाला हाताशी धरले होते. पण हिजबुल्ला गट इस्रायलसमोर टिकाव धरू शकला नाही. त्यामुळे इराणला हिजबुल्लाकरवी सीरियात काही करता आले नाही. तुर्कस्तान आणि हयात तहरीर अल-शाम (एचटीएस) यांच्यात फारसे सख्य कधीच नव्हते. तुर्कस्तानला कुर्दिशांना ठोकून काढायचे होते. त्याचे हल्ले तेवढ्यापुरतेच मर्यादित असत. अमेरिका सीरियात तळ ठोकून होती ती यासाठी की तिला मुख्यत: आयसिसला पायबंद घालायचा होता. इस्रायलचे हल्ले लेबनॅानमधील हिजबुल्ला गटाच्या विरोधात होते. या हल्ल्यातच हिजबुल्लाला प्रचंड हानी सहन करावी लागली त्यामुळे हिजबुल्लामध्ये असदला मदत करण्याइतके त्राणच उरले नव्हते. अशा या अजब संघर्षाचे जगातले हे पहिलेच उदाहरण असावे.

  या गृहयुद्धाची सुरवात तशी 2011मध्येच झाली असे म्हटले पाहिजे. यात लाखापेक्षा जास्त लोकांचे जीवन उध्वस्त झाले. सीरियातच निदान सहा भागात जणू स्वतंत्र राजवटी सुरू झाल्या होत्या. काहींचे नियंत्रण देशातील प्रभावी गट करीत असत तर काहींचे नियंत्रण देशाबाहेरील सूत्रधारांच्या हाती होते. हे गृहयुद्ध इतके लांबले की शेवटी त्याचा जगाला जणू विसरच पडला होता. 2011 चा उठाव लोकशाहीवादी घटकांचा होता. तो देशव्यापी होता पण असदशी एकनिष्ठ असलेल्या सैन्याने तो चिरडून टाकला. 2012 साली संघर्षाची परिणीती गृहयुद्धात झाली. सरकारी फौजा, फ्री सीरियन आर्मी (एफएसए), जिहादी गट असे तीन गट निरनिराळ्या भागांवर नियंत्रण करू लागले. 2013 मध्ये सीरियायातील कुर्दिश डेमोक्रॅटिक पार्टीने कुर्दबहुल उत्तर भागावर नियंत्रण मिळविले आणि रोजावा या नावाचा स्वायत्त प्रशासकीय प्रदेश स्थापन झाला. 2014 मध्ये इराक लेवंट (आयएसआयएल) यांनी पूर्व सीरियावर नियंत्रण मिळविले आणि खिलापत स्थापन केले. (इस्लामिक स्टेट्स ऑफ इराक अँड लेव्हंट, किंवा इस्लामिक स्टेट्स ऑफ इराक अँड सीरिया ही एक आंतरराष्ट्रीय अतिरेकी संघटना व स्वयंघोषित खिलाफत आहे. इस्लाम धर्मातील सुन्नी पंथाच्या वहाबी/सलाफी विचारांच्या कट्टर अतिरेक्यांद्वारे चालवली जात असलेली ही संघटना प्रामुख्याने पश्चिम आशियातील इराक व सीरिया ह्या देशांमध्ये कार्यरत आहे.) 2015 मध्ये सीरियन असंतोषाचे आंतरराष्ट्रीयिकरण झाले असे म्हणता येईल. रशियाने असद सरकारची बाजू घेत ठिकठिकाणी  बंडखोरांविरुद्ध मदत म्हणून बॅाम्बहल्ले केले. यामुळे असद शासनाचे बळ वाढले आणि त्याचा हुरूपही वाढला. त्यांनी अलेप्पो शहर जिंकून घेतले. अलेपो हे सीरियातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व अलेप्प्पो प्रांताची राजधानी आहे. आशिया व युरोपला जोडणाऱ्या रेशीम मार्गावरील अलेप्पो हे शेवटचे शहर आहे/होते. 2017 मध्ये अमेरिकेने कुर्दिशांच्या सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेसना (पार्टीला) पाठिंबा दिला. त्यांनी रक्का हे शहर जिंकून घेतले. रक्का हे अलेप्पोच्या पूर्वेला सुमारे 160 किलोमीटर अंतरावर युफ्रेटिस नदीच्या उत्तर तीरावरील सीरियामधील एक शहर आहे. 2016 मध्ये असदच्या फौजांनी पूर्वेकडील घौटा आणि दारा हे प्रदेश जिंकून पश्चिम सीरिया आपल्या नियंत्रणाखाली आणला. पूर्वी असद यांच्या सैन्याने 21 ऑगस्ट 2013 च्या पहाटे घौटा  येथे रासायनिक हल्ला केला होता, म्हणून हे शहर जगाला प्रथम माहीत झाले होते. जॉर्डनच्या सीमेच्या उत्तरेस दारा या शहरी हौरान प्रदेशाची राजधानी आहे. 2020 मध्ये तुर्कस्तानने हस्तक्षेप करायला सुरवात केली. तुर्कस्तानचे वैर कुर्दिशांशी होते. तुर्कस्तानचे हल्ले सीरियाच्या कुर्दिशबहुल उत्तर भागापुरतेच मर्यादित होते. तुर्कस्तानमधील कुर्दिश लोकांचा सीरियातील कुर्दिश लोकांशी संपर्क होऊ नये, हा तुर्कस्तानचा हेतू होता. कारण हे दोन्ही प्रदेश एकत्र येऊन स्वतंत्र कुर्दिस्तान निर्माण करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून होते. 2020 ते 2023 या काळात संघर्षाला काहीसा विराम मिळाला. डिसेंबर 2024 मध्ये बंडखोरांनी एकदम उचल खाल्ली. त्यांना हयात तहरीर अल-शाम (एचटीएस) यांचे सक्रीय साह्य मिळाले. हयात तहरीर अल-शाम किंवा तहरीर अल-शाम ही एक सुन्नी इस्लामवादी राजकीय आणि सशस्त्र संघटना आहे. त्यांच्या साह्याने बंडखोरांनी अलेप्पो तर जिंकलेच, शिवाय होम्स आणि दमास्कसही जिंकून असद यांना पलायन करण्यास भाग पाडले. होम्स, हे पश्चिम सीरियामधील एक महत्त्वाचे शहर आहे ओरोंटेस नदीवर स्थित होम्स हे सीरियातील अन्य शहरांना जोडणारे  आणि भूमध्य सागरी किनाऱ्यावरील मध्यवर्ती शहरही आहे. दमास्कस ही सीरिया देशाची राजधानी आहे. दमास्कस हे मानवाने अखंडपणे वसाहत केलेले  जगातील सर्वांत जुने शहर आहे, असे मानतात.

सीरियात जे घडले ते समजून घ्यायचे असेल तर हा सर्व इतिहास समोर ठेऊनच विचार करावा लागतो. म्हणून हा तपशील महत्त्वाचा ठरतो. तो आज जगभर अभ्यासला जातो आहे. कारण सीरियाची कहाणी ही एक मुलखावेगळी कहाणी मानली जाते.


No comments:

Post a Comment