श्रीलंका आणि बारतविरोधी कारवाया
तरूण भारत, नागपूर. मंगळवार, दिनांक २४/१२/२०२४ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.
श्रीलंका आणि भारतविरोधी कारवाया
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?
श्रीलंकेच्या संसदेत 225 सदस्य असतात. यापैकी 196 सदस्य जिल्हा मतदारसंघातून निवडले जातात. प्रत्येक मतदार संघातून एकापेक्षा जास्त सदस्य (समजा 5) निवडायचे असतात. अशा मतदारसंघांना बहुसदस्यीय मतदार संघ (मल्टिसीट कॅान्स्टिट्युएन्सी) असे नाव आहे. प्रत्येक पक्षाला (समजा तीन पक्ष आहेत) एकूण मतदानापैकी (समजा100) प्रत्येक पक्षाला जेवढी मते मिळतील त्या मतांच्या प्रमाणात त्या पक्षाला जागांचे वाटप केले जाते. समजा अ पक्षाला 50% ब पक्षाला 30% आणि क पक्षाला 20% मते मिळाली आणि एकूण जागा 10 आहेत तर जागा अनुक्रमे 5,3,2 अशाप्रकारे अ ब व क पक्षांना मिळतील. अशीच वाटणी सर्व मतदारसंघांचे बाबतीत होईल. आता उरल्या 29 जागा. यांची वाटणी करण्यासाठी संपूर्ण देशभरात मिळून कोणत्या पक्षाला किती टक्के मते मिळाली हे पाहून त्या टक्केवारीच्या प्रमाणात 29 जागांचे वाटप करण्यात येईल.
या पद्धतीनुसार हिशोब होऊन निरनिराळ्या पक्षांना मिळालेल्या जागा अशा आहेत.
अ) जनता विमुक्ती पेरामुनाप्रणीत नॅशनल पीपल्स पॉवर आघाडीला एकूण 62% म्हणजेच 68 लाख मते मिळाली. जिल्हा मतदारसंघातून 141 जागा आणि राष्ट्रीय मतदारसंघातून 18 अशा 159 जागा मिळाल्या. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 156 जागा जास्त मिळाल्या.
ब) विरोधी पक्ष असलेल्या समागी जन बलावेगया या पक्षाला एकूण 18% मते मिळाली. जिल्हा मतदारसंघातून 35 जागा आणि राष्ट्रीय मतदारसंघातून 5 अशा 40 जागा मिळाल्या. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 14 जागा कमी मिळाल्या.
क) इलन्काइ तमिळ अरासू कात्ची या सर्वांत मोठ्या तमिळ पक्षाला एकूण 2.3% मते मिळाली. जिल्हा मतदारसंघातून 7 जागा आणि राष्ट्रीय मतदारसंघातून 1 अशा 8 जागा मिळाल्या. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 8 जागा जास्त मिळाल्या.
ड) मावळते अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांच्या न्यू डेमोक्रॅटिक फ्रंटला एकूण 4.5 % मते मिळाली. जिल्हा मतदारसंघातून 3 जागा आणि राष्ट्रीय मतदारसंघातून 2 अशा 5 जागा मिळाल्या. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 5 जागा जास्त मिळाल्या.
इ) आणि माजी अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्या श्रीलंका पाडुजन पेरामुना पक्षाला एकूण 3.1 % मते मिळाली. जिल्हा मतदारसंघातून 2 जागा आणि राष्ट्रीय मतदारसंघातून 1 अशा 3 जागा मिळाल्या. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 97 जागा कमी मिळाल्या. उरलेल्या जागा डझनावारी पक्ष आणि अपक्षात वाटल्या गेल्या आहेत.
या निवडणुकीच्या अगोदर श्रीलंकेत अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली होती. त्या निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार, विद्यमान अध्यक्ष राणिल विक्रमसिंघे, समाजी जन बलवेगया पक्षाचे उमेदवार आणि विरोधी पक्षनेते साजित प्रेमदासा आणि डावीकडे झुकलेल्या सिंहली वर्चस्ववादी एनपीपीचे चीनसमर्थक मार्क्सवादी उमेदवार अनुरा कुमारा दिसानायके यांच्यात लढत झाली, कुणाही एका उमेदवाराला मतदानाच्या पहिल्या फेरीत 50% चा जादुई आकडा गाठता आलेला नव्हता. पहिल्या फेरीत अनुरा कुमारा दिसानायके (उर्फ एकेडी) वय वर्ष 55 यांना 42.36% म्हणजेच सुमारे 56 लाख, साजित प्रेमदासा यांना 32.72% म्हणजेच सुमारे 43 लाख, तर राणिल विक्रमसिंघे यांना 17.25% म्हणजेच सुमारे 23 लाख मते मिळाली व ते तिसरे ठरल्यामुळे बाद झाले. पुढे दिसानायके आणि साजित प्रेमदासा यातच पुढचा पसंतीक्रम वाटला गेला आणि दिसानायके विजयी झाले. अख्खा युरोप आज उजवीकडे वळू पहात असताना श्रीलंकेने स्वीकारलेला हा उरफाटा वाम मार्ग आश्चर्य वाटावा असा आहे.
नुकत्याच अध्यक्षपदी निवडून आलेल्या अनुराकुमार दिसानायके यांनी अध्यक्षीय निवडणुकीपाठोपाठ आता पार्लमेंटच्या निवडणुकीतही नेत्रदीपक यश मिळवून दाखविले आहे. अशाप्रकारे देशाच्या राजकारणावर त्यांनी आपली पकड चांगलीच पक्की केली आहे. दिसानायके हे मूळचे मार्क्सवादी विचारांचे कट्टर पुरस्कर्ते राहिलेले आहेत. एकेकाळी त्यांचा जनता विमुक्ती पेरामुना (जेव्हीपी) हा पक्ष सुद्धा सिंहली वर्चस्ववादी राजकारण करीत असे. पण श्रीलंकेत भडकलेला भयंकर वांशिक हिंसाचार काहीही साध्य करू शकला नाही याची त्यांना जाणीव झाली. अनेक सिंहली नेत्यांनाही असाच साक्षात्कार झाला. दिसानायके त्यांच्या पक्षाने तर शांततेच्या मार्गाने व लोकशाही पद्धतीने कार्य करण्याची घोषणा करून ती अमलात आणली.
दिसानायके यांनी स्थापन केलेल्या आघाडीला 2024 च्या निवडणुकीत 159 जागा मिळाल्या. याचा अर्थ असा होतो की तमिळ भाषक मतदारांनीही या आघाडीला समर्थन दिले आहे. डाव्या विचारसरणीच्या एनपीपीने श्रीलंकेतील उत्तरेकडे असलेल्या जाफना जिल्ह्यात विजय मिळवून इतिहास घडवला आहे. कारण जाफना भागात तमिळांची संख्या जास्त आहे. दिसानायके यांचा पक्ष देशाच्या दक्षिणेकडील भागातील एक प्रमुख सिंहली पक्ष आहे. दक्षिणेकडील सिंहली पक्षाने उत्तरेतील तमिळ बहुल भागात असे यश प्रथमच प्राप्त केले आहे. या पक्षाला एकेकाळी आक्रमक सिंहली-बौद्ध राष्ट्रवादी मानले जायचे. पण श्रीलंकेतील भाषावाद कमी होतो आहे. आता सिंहली आणि तमिळ यातील दुरावा कमी होत गेला आणि सर्वसमावशकतेच्या धोरणाचा अवलंब झाला तर ती फार मोठी सकारात्मक बाब ठरेल. श्रीलंकेच्या नवीन पार्लमेंटमध्ये निर्माण झालेले पक्षांचे बल बघितले की, श्रीलंका डावीकडे वळू पाहते आहे, हे स्पष्ट होते. याला भारताचा आक्षेप असण्याचे कारण नाही. फक्त नवीन राजवट चीनच्या इशाऱ्यावर नाचणारी असू नये, अशी मात्र भारताची अपेक्षा आहे.
कोविड-१९ आणि राजपक्षे सरकारची चुकीची आर्थिक धोरणे यांमुळे इंधन, अन्न आणि औषधे या जीवनावश्यक घटकांची तीव्र चणचण शेरीलंकेत जाणवू लागली. श्रीलंकेवर आर्थिक अरिष्ट ओढवले आणि ऐषारामी, बेमुर्वतखोर राजपक्षेंविरोधात संतापाचा कडेलोट झाला. जनता थेट अध्यक्षीय प्रासादावरच चालून गेली. त्यामुळे वांशिक किंवा इतर कोणत्याही कारणापेक्षा दिसानायके यांना पाठोपाठच्या निवडणुकांमध्ये लंकेतील सर्व गटांचा भरभरून मिळालेला पाठिंबा हा दारिद्र्य व भ्रष्टाचार निर्मूलन यासाठी आहे. यामुळेच जेव्हीपीसारख्या सिंहली-बुद्धिस्ट पक्षाला जाफना या तमिळबहुल जिल्ह्यामध्ये विजय मिळवता आला आहे. तसे पाहायला गेल्यास जेव्हीपीची चीनमधील कम्युनिस्ट पक्षाशी वैचारिक बांधिलकी आहे. पण भारताला कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्षून चालणार नाही, याचे भान दिसानायके यांना आहे. सिंहला, तमिळ, मुस्लीम यांना एकत्रित घेऊन वाटचाल करू, असे आश्वासन त्यांनी दिलेले आहे. एकूण असे की, दिसानायके यांनी आर्थिक आणि वांशिक अशा दोन्ही आघाड्यांवर स्थैर्य आणि सामंजस्य निर्माण केले, तरच श्रीलंकेला भवितव्य आहे.
वर्षभरापूर्वी दिसानायके यांनी भारताला भेट दिली होती. त्यावेळी श्रीलंकेत निवडणुका व्हायच्याच होत्या. या दोन देशात मैत्रीचे संबंध असावेत यावर त्यांनी तेव्हा भर दिला होता. त्यांचा हा मुद्दा शंभर टक्के बरोबर होता आणि आहे. पण त्यासाठी श्रीलंकेलाच आपले चीनच्या तालावरचे नाचणे थांबवावे लागेल. श्रीलंका भारताचा शेजारी देश आहे. त्याचा उपयोग भारतविरोधी कारवायासाठी होऊ नये हे तेव्हा त्यांना मान्य होते. आता सत्तेवर आल्यावरही आपली प्रत्यक्षात हीच भूमिका असेल, असे आश्वासन त्यांनी नुकतेच पुन्हा एकदा दिले आहे.
No comments:
Post a Comment