20250110कुवेत दौऱ्याचे वेगळेपण
तरूणभारत, नागपूर, मंगळवार दिनांक 14. 01. 2025
हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॉगवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.
20250110कुवेत दौऱ्याचे वेगळेपण
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?
यावेळचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कुवैत दौरा वेगळा होता. 43 वर्षानंतर कुवैत दौऱ्यावर जाणारे पंतप्रधान मोदी पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत. त्यांच्याआधी फक्त इंदिरा गांधी यांनी 1981 साली कुवैतचा दौरा केला होता. आखाती देशांमधील कुवैत हा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या कुवैत दौऱ्यात ‘विसम मुबारक अल-कबीर’ किंवा ‘ऑर्डर ऑफ मुबारक दे ग्रेट’ या कुवैतच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले. कुवैतचे एमीर शेख मीशाल अल-अहमद अल-जाबीर अल-साबह यांनी पंतप्रधान मोदींना या पुरस्कराने सन्मानित केले.
विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांना कुवैत सरकार या पुरस्काराने सन्मानित करते. मैत्रीसंबंध मजबूत करणे आणि सदिच्छा, सदभावना व्यक्त करणे हा पुरस्कार देण्यामागे हेतू असतो. मुबारक अल-सबा यांच्या स्मरणार्थ 1974 सालापासून कुवैत सरकारकडून हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. मुबारक अल-सबा हे मुबारक अल कबीर आणि मुबारक द ग्रेट म्हणून ओळखले जातात. 1896 ते 1915 पर्यंत त्यांनी कुवैतवर राज्य केले होते.
कुवेत हा मध्य-पूर्वेतील एक देश आहे. कुवेतच्या दक्षिणेला सौदी अरेबिया, पश्चिम व उत्तरेला इराक तर पूर्वेला पर्शियन आखात आहे. पर्शियन आखाताच्या उत्तर टोकाला हा देश आहे. आखात म्हणजे तीन बाजूंना जमिनीने वेढलेला आणि केवळ एकाच बाजूने पाणी असलेला जलयुक्त भाग होय. मोठा विस्तार असलेल्या आखातास उपसागरही म्हणतात. कुवेत इराणलाही लागून आहे. कुवेत हे मोठे शहर कुवेत देशाची राजधानी आहे. अमेरिका, जर्मनी आणि सौदी अरेबियात परदेशात जन्मलेल्यांची संख्या भरपूर आहे. तसाच प्रकार कुवेतबद्दलही आहे.
कुवेत हा जगातील अतिश्रीमंत व अतिप्रगत देश मानला जातो. कुवेतची लोकसंख्या 50 लाखांच्या आत असून त्यात 2.5 लाख हिंदू आहेत.
सन 1961 पर्यंत कुवेतमध्ये भारतीय रुपया हा अधिकृतपणे चलन म्हणून मान्यताप्राप्त होता. कुवेतची भूमी तेलसंपन्न होण्यापूर्वी अनेक शतके कुवेतशी भारताचे व्यापारी संबंध होते. कुवेतमध्ये नैसर्गिक तेल सापडले आणि कुवेत व भारत यातील संबंधांना नवीन झळाळी प्राप्त झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तारूढ होताच परराष्ट्र धोरणाबाबत नव्याने विचार केलेला आढळतो. धोरण तेच पण अमलात आणण्याची पद्धत वेगळी! ही बाब अनेक पटीने लाभप्रद ठरते. पश्चिम आशियातील देश याचे उत्तम उदाहरण आहे.
मोदी यांनी आखाती देशांच्या संबंधांवर विशेष भर दिला आहे. यात केवळ आर्थिक मुद्दे नाहीत. त्यांनी सांस्कृतिक, धार्मिक पातळीवरही संबंध प्रस्थापित केले आहेत. भारताचे जगभर स्नेहाचे संबंध प्रस्थापित करण्यावर त्यांचा भर असतो. मोदी चौदा वेळा आखाती देशात जाऊन आले आहेत, ते काय उगीचच? कुवेतमध्ये आज लाखो भारतीय काम करतात. यात हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती असे सगळेच आहेत. कुवेतमधील तीस टक्के कर्मचारी भारतीय आहेत. यावरून कुवेतच्या अर्थकारणातील भारताचे स्थान किती मोलाचे आहे, हे लक्षात येते. कुवेत किंवा अन्य आखाती देश खनिज तेलावरील अवलंबित्व कमी करण्याच्या खटाटोपात आहेत. कारण आज ना उद्या पेट्रोलचे महत्त्व कमी होणार, हे नक्की आहे, हे ते जाणून आहेत. औषधी उद्योग, आणि माहिती तंत्रज्ञान याबाबत हे देश भारतावर अवलंबून आहेत. आरोग्य व शिक्षण याबाबतही भारत या देशांच्या उपयोगी पडू शकतो. या सर्व क्षेत्रात चीन भारताचा प्रतिस्पर्धी आहे खरा पण चीनपेक्षा भारत या देशांना अधिक विश्वसनीय वाटतो, ही वस्तुस्थिती आहे. कुवेतमधील भारतीय नागरिक पैसा कमवून तो भारतात पाठवतात. कुवेत आपल्याला इंधनतेल पुरवतो तर तिथले अनेक उद्योग भारतीयांच्या भरवशावर सुरू आहेत. आखाती देश म्हणजे इस्रायलविरोधी देशांची आघाडी होती, असे एकेकाळी मानले जायचे आणि ते खरेही होते. पण यात बदल होणे ही काळाची गरज होती. मोदींनी हे जाणून भारताचे धोरण आखले आहे. तुर्कस्थानचे स्वत:चे जरी इस्रायलबरोबर संबंध आहेत, तरी दुसऱ्याकुणी इस्रायलशी संबंध ठेवलेले त्याला खपत नाही. याला राजकारणात दुटप्पीपणा न म्हणता धोरणीपणा म्हटले जाते. इजिप्त (लोकसंख्या 10 कोटी) आणि जॅार्डन (लोकसंख्या1कोटी) यांनी अगोदरच इस्रायलशी राजकीय संबंध प्रस्थापित केले असल्यामुळे आता तीन अरब देशांचे इस्रायलशी राजनैतिक संबंध प्रस्थापित झालेले दिसताहेत. सर्वच मुस्लिम देशांनी इस्रायलशी कोणत्याही प्रकारे संबंध न ठेवून त्याची कोंडी व कोंडमारा करण्याचे एकेकाळी ठरविले होते. पण इजिप्त, जॅार्डन, अमिरात व तुर्कस्थान या देशांनी इस्रायलशी संबंध प्रस्थापित केल्यामुळे कोंडी काहीशी सैल झाली आहे.
आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये इतर मुस्लिम राष्ट्रांशी भारताची असलेली मैत्री पाकिस्तानचा खुपते. पूर्वी आखाती देशांची संघटना फारसा विचार न करता भारतविरोधी ठराव पाकिस्तानच्या आग्रहाखातर पारीत करीत असत. भारताने इकडे फारसे लक्ष न देता आपली आर्थिक आणि सामरिक शक्ती वाढविली. याच काळात पाकिस्तानची आर्थिक स्थिती पार ढासळली. केवळ आशियातलाच नाही तर संपूर्ण जगातला हा खूप मोठा बदल मानला जातो. एकेकाळी भारतात जरासेही कुठे खुट्ट झाले तरी आखाती देश निषेधाचे ठराव करीत. आता ते याला भारताचा अंतर्गत प्रश्न आहे,’ असे म्हणून समजुतदारपणा दाखवू लागले आहेत. याच कुवेतमध्ये एकेकाळी देशातील सर्व हिंदू कर्मचाऱ्यांना मायदेशी परत पाठविण्याचा प्रस्ताव आला होता, पण आज परिस्थिती बदलली आहे.
मोदींना कुवेतने अत्यंत आदराची वागणूक तर दिलीच; पण देशातला सर्वोच्च सन्मानही प्रदान केला. हा मोदींचा गौरव तर आहेच पण हा केवळ मोदींचा गौरव नाही, तर तो भारताचा गौरव आहे. आज सगळेच आखाती देश पैसे मिळवण्यासाठी तेलाशिवाय अन्य साधनांचा स्वीकार करण्याचे बाबतीत गांभीर्याने विचार करू लागले आहेत. या कामी त्यांना भारताचा जेवढा भरवसा वाटतो, तेवढा चीनचा वाटत नाही. याचे प्रत्यंतरही आले आहे. यावेळी आखाती देशांचे भारतासोबत व्यापारी करार झाले आहेतच, शिवाय असे की, लष्करी सहकार्याचे करारही झाले आहेत, हे विशेष म्हटले पाहिजे. कुवेत, कतार, बहारीन, सौदी अरेबिया, ओमान, संयुक्त अरब अमिराती आणि इराक यांच्याशी भारताचे उत्तम संबंध पूर्वीपासूनच आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी डिसेंबर 2024 मध्ये कुवैतला भेट दिली. या भेटीच्या दरम्यान त्यांनी कुवेतचे नेते आणि कुवेतमध्ये राहणारे भारतीय कामगार आणि अन्य नागरिकांच्या भेटी घेतल्या व संवाद साधला.
भेटीवर निघण्यापूर्वी मोदींनी भारत आणि कुवेत यातील पूर्वापार संबंधांचा आवर्जून उल्लेख केला होता. आमचे संबंध केवळ व्यापारापुरते मर्यादित नाहीत तर जागतिक शांतता, सुरक्षा, स्थैर्य आणि प्रगती हेही आमचे जिव्हाळ्याचे मुद्दे आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या भेटीदरम्यानच्या काळात 26 व्या अरेबियन गल्फ क्लबच्या फुटबॅाल सामन्यांच्या उद्घाटन कार्यक्रमाला मोदी उपस्थित होते. विषय जागतिक शांततेचा असो की खेळांच्या सामन्यांचा, मोदींची तत्परता डोळ्यात भरावी, अशी असते.
No comments:
Post a Comment