Monday, January 27, 2025

 बंगलादेशींची बनावट कागदपत्रे

तरूणभारत, नागपूर

मंगळवार  दिनांक 28. 01. 2025

हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॉगवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.   

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 

   बांगलादेशींची बनावट कागदपत्रे

  अनेक बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांद्वारे आधारकार्ड व पारपत्र (पासपोर्ट) बनवल्याचे आढळून आले आहे. आधारकार्ड किंवा पासपोर्ट मिळविणे ही एक गुंतगुंतीची प्रक्रिया आहे. सर्व कागदपत्रे योग्य स्वरुपात असली तरीही अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. इथेतर सुरवातीपासूनच खोटेपणा करीत जावे लागते. गेल्या तीन वर्षांत मुंबई पोलिसांनी सुमारे 1000 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. ही तोतयागिरी बेमालूमपणे कशी चालू शकली, हे एक कोडेच आहे. स्थानिक पातळीवर मदत देणारे तत्पर असल्याशिवाय हे साध्य होऊ शकत नाही. हे स्वस्त मनुष्यबळ आहे, म्हणूनही अनेक स्थानिक त्यांना आश्रय देत असतात.

    नववर्ष नुकतेच सुरू झाले आहे. पहिल्याच 15 दिवसांमध्ये मुंबईतून 80 हून अधिक बांगलादेशी घुसखोरांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांना मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केलेच पाहिजे. पण घुसखोरांना मदत करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना पकडणेही आवश्यक झाले आहे.  तीन वर्षांमध्ये मुंबईतून सुमारे 1000 हून अधिक बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली आहे. हे घुसखोर आता चांगलेच सरावले असल्याचे लक्षात आले आहे. काही दिवसांपूर्वी दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अॅप्लिकंट ट्रॅकिंग सीस्टीमच्या आधारे  अटक केलेल्या काही घुसखोरांनी बेकायदेशीररित्या भारतीय नागरिकत्व मिळवून लोकसभा निवडणुकीत मतदान केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.  हे बांगलादेशी घुसखोर भारतीय पारपत्रावर परदेशात नोकरीसाठीही जाऊन आले होते, ही तर कमालच म्हणायला हवी. कायद्याचे पालन करणाऱ्या सामान्य माणसाला सरकारी दाखले किंवा शिधावाटप पत्रिका मिळविण्यासाठी शासकीय कार्यालयात अनेकदा खेटे घालावे लागतात. संबंधितांचे हात ओले केल्याशिवाय कागदपत्रे समोर सरकतच नाहीत. मात्र, बांगलादेशातून घुसखोरी करून आलेल्यांची कमाल बघा, त्यांना सहज कागदपत्रे मिळतात. 

मुंबईसारख्या प्रचंड मोठ्या शहरात अनेक बंगलादेशी घुसखोर असणार, हे नक्की आहे. याला लागून असलेल्या भागातही त्यांची संख्या खूप मोठी असणार हेही स्पष्ट आहे. राज्यातील सर्वच पोलीस यंत्रणांनी घुसखोरांविरोधात विशेष मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय पोलीस ठाण्यांच्या पातळीवरही दहशतवाद विरोधी कक्षाला (एटीसी) बांगलादेशी नागरिकांविरोधात कारवाई करण्याची मोहीम हाती घ्यावी लागणार आहे. जरी हजारावर घुसखोरांना अटक करण्यात आली असली तरी न्यायिक प्रक्रिया मंद गतीने चालू असते. त्यामुळे फारच थोड्या घुसखोरांना बांगलादेशात परत पाठवता आले आहे.

भारताच्या भूसीमांची (लॅंड बॅार्डर्स)) एकूण लांबी ठोकळमानाने 15,107 किलोमीटर असून  समुद्रकिनारा 7,517 किलोमीटर आहे. त्यापैकी भूसीमेचे विभाजन बांगलादेश 4,097, चीन 3,488, पाकिस्तान 3,323, नेपाळ 1,751, म्यानमार 1,643, भूतान 699 आणि अफगाणिस्तान 106 किलोमीटर  असे आहे. 

भारत आणि बांगलादेश यातील 4097 किलोमीटर आंतरराष्ट्रीय सीमा जगातली 5 व्या क्रमांकाची लांब सीमा आहे. यापैकी आसामला लागून असलेली सीमा 262, त्रिपुराला 856, मिझोरामला 318, मेघालयला 443 आणि पश्चिम बंगालला 2217  किलोमीटर अशी आहे.


एकूण 4,097 किलोमीटर सीमेपैकी 3,145 किमी सीमेवर कुंपण घालण्याचे काम पूर्ण झाले आहे. उरलेल्या सीमेवर प्रत्यक्ष (फिजिकल) आणि अप्रत्यक्ष (नॅान-फिजिकल) अडथळे उभारण्याचे काम सुरू आहे. भारत आणि बांगलादेश यातील सीमा अनेक ठिकाणी प्रवेशसुलभ (पोरस) असून त्यामुळे सीमेपलीकडून बेकायदेशीर कारवाया आणि घुसखोरी रोखण्यात बऱ्याच अडचणी येत असतात, या बाबीची नोंद उभयपक्षी घेण्यात आली आहे.


गेल्या 5 वर्षात जवळजवळ 2,500 बांगलादेशींनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे भारतात प्रवेश मिळवल्याची नोंद आहे. नोंद न झालेले अनेक असू शकतात. अशांचा भारतात शोध घेणे एक जिकिरीचे काम होऊन बसले आहे. घुसखोरांची चेहरेपट्टी भारतीयांशी मिळतीजुळती असते. ते सफाईने बंगाली भाषा बोलू शकतात. त्यांनी वाममार्गाने आधार कार्डही बनवून घेतलेले असते. असे निदान 2 कोटी बांगलादेशी आजमितीला भारतात रहात असतील, असा एक अंदाज आहे. यापैकी अनेक भारतविरोधी कारवाया करतांना आढळले आहेत. कुंपण घालणे आणि प्रकाश झोतव्यवस्थेचे काम मार्च 2024 पर्यंत पूर्ण  व्हावयास पाहिजे होते. पण तसे होऊ शकले नाही.


पण केवळ कुंपण घालून घुसखोरी थांबणार नाही. कुंपणाचेही काही नवीन प्रकार आता उपलब्ध झाले आहेत. यात तंत्रज्ञानावर आधारित देखरेख व्यवस्था योजलेली असते. सीमावर्ती भागात रस्त्यांचे जाळे तयार करण्याचे कामही प्रगतीपथावर आहे. त्यामुळे सीमेजवळ वेगाने हालचाली करणे शक्य होते. अर्थात याचा उपयोग तस्करही करू शकतात पण त्याला उपाय नसतो.

  कुंपण घालतांनाही अडचणी येतात. एक प्रमुख अडचण असते लहान लहान ओढे आणि ओहोळांची. तसेच मध्येच एखादा खोलगट टप्पा येतो. कधीकधी सीमारेषेपासून 150 यार्डाच्या आत मनुष्यवस्ती असते. ती लोकं आपली जागा सोडायला तयार नसतात. भूमिअधिग्रहणाची प्रकरणे लवकर मार्गी लागत नाहीत. अशा सर्व अडचणी आणि अडथळे पार करीत 4,223   पैकी 3,751 किलोमीटर लांबीचे सीमेनजीकचे रस्ते बांधून तयार झाले आहेत. उरलेले मार्च 2025 पर्यंत पूर्ण होतील. प्रकाशझोत व्यवस्था पश्चिम बंगाल, मेघालय, आसाम, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यातून सीमेलगत केली जात असून 4,225 किलोमीटर पैकी 3,077 पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. 

   बांगलादेशी नागरिकांचे बनावट कागदपत्रे तयार करण्यामागे दोन उद्देश असतात. आपण भारतीय आहोत, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न असतो. दुसरे असे की भारतीय नागरिक असल्याचा पुरावा त्यांना परदेशात नोकरी मिळविण्यासाठीही उपयोगी पडतो. 

 पुढे यांच्यापैकीच काही लोक ‘घुसखोरांना  नागरिक बनवण्याचे काम’ स्वतंत्रपणे करू लागतात. काहींचा तर हा व्यवसायच होऊन बसलेला आहे. बांगलादेशातून घुसखोरी करून भारतात येण्याचा हा व्यवसाय बहुतेक मोठ्या भारतातीय शहरांमध्ये सुरू आहे. याला आज व्यवसायाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरात कुणी बेकार रहात नाही. प्रत्येकाला काहीना काही काम मिळतेच. हा सर्व व्यवहार 25 ते 30 हजारात पूर्ण करता येतो. 

   यापैकी एक रॅकेट मुंबई पोलिसांनी नुकतेच उजेडात आणले आहे. याच्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीच्याआधारे हे रॅकेट देशभरात कुठेकुठे कार्य करते आहे,  याचा शोध भारतीय पोलिसदलाच्या निरनिराळ्या प्रांतातील चमू (टीम्स) घेत आहेत.

बांगलादेशी नागरिकांना घुसखोरीसाठी मदत करणाऱ्या टोळीचा दिल्ली पोलिसांनीही पर्दाफाश केला असून चार जणांना अटक केली आहे. या टोळीत दोन बांगलादेशी आणि (आपले दुर्दैव असे की) दोन भारतीय नागरिकांचाही समावेश आहे 

भारत आणि बांगलादेश या  दोन देशात जनावरांची येजा सुरू असते. यातला एक मार्ग गाढवांचा मार्ग म्हणून ओळखला जातो. एक टोळी बांगलादेशातील लोकांना गाढवाच्या मार्गाने भारतात येण्यास सांगत असे. यानंतर, दुसरा गट   या लोकांना रात्रभर लपवून  ठेवीत असे. नंतर तिसरा गट त्यांना आसामला घेऊन जायचा. पुढे त्यांना रेल्वेने किंवा इतर मार्गाने दिल्लीला पाठवत. दिल्लीच्या गर्दीत हे घुसखोर सहज मिसळून जात. खऱ्या शरणार्थींना भारताने आजवर उदार मनाने आश्रय दिला आहे. पण हे बांगलादेशी घुसखोर आहेत. त्यांच्यातल्या एकेकाला शोधून हद्दपार करण्याचे किचकट काम भारताला भविष्यात पार पाडायचे आहे.

No comments:

Post a Comment