तरूण भारत, नागपूर गुरुवार, दिनांक १७/०४/२०२५
हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee? या ब्लॅागवरही उपलब्ध असतो.
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?
मुस्तफा कमाल एतातुर्क यांनी 1923 ते 1938 या आपल्या अध्यक्षीय कालखंडात नव्या आणि आधुनिक तुर्कस्तानचा पाया रचला होता. त्यांना आधुनिक तुर्कस्तानचा जन्मदाता मानले जाते. पण ही स्थिती फारकाळ टिकली नाही. 28 ऑगस्ट 2014 पासून तर रिसेप तय्यिब एर्दोगान हे तुर्कस्तानच्या अध्यक्षपदी आहेत. हा एक सनातनी, माथेफिरू आणि धटिंगण आज तुर्कस्तानवर राज्य करतो आहे. प्रगत विचारांची जनता धर्मांध आणि जुलमी राजवटीत भरडून निघत आहे. ही राजवट लोकशाही मार्गाने या अवस्थेप्रत पोचली आहे, हे या देशाचे खास दुर्दैव म्हटले पाहिजे.
बराचसा भाग पश्चिम आशियात तर लहानसा भाग पूर्व युरोपमध्ये असलेल्या तुर्कस्तानमध्ये यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अध्यक्ष एर्दोगान (वय वर्ष 71) यांच्या जस्टिस अँड डेव्हलपमेंट पक्षाला (एकेपी) तेथील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या रिपब्लिकन पीपल्स पक्षाने (सीएचपी) अनपेक्षित आणि जबरदस्त धक्का दिला आहे. मार्माराचा समुद्र आणि काळा समुद्र यांना जोडणाऱ्या बॅासपोरसच्या सामुद्रधुनीच्या दोन्ही तीरांवर वसलेल्या इस्तंबूल शहराचे महापौर इकरेम इमामोग्लू हे धर्मनिरपेक्ष भूमिका घेणाऱ्या रिपब्लिकन पीपल्स पक्षाने नेते आहेत. इमामोग्लू तुर्कस्तानात तरुण वर्गात अतिशय लोकप्रिय आहेत. म्हणून त्यांच्या पक्षाने तुर्कस्तानच्या आगामी म्हणजे 2028 च्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी इमामोग्लू यांना उमेदवारी दिली आहे. ही निवडणूक लढवण्यास विद्यामान अध्यक्ष एर्दोगान हे मात्र कायद्याने पात्र नाहीत कारण कारण घटनेनुसार कुणाच्याही वाट्याला अध्यक्षपदाचे फक्त दोनच कार्यकाळ येऊ शकतात. पण घटनाच बदलली तर? किंवा एर्दोगान यांनी मुदत संपण्यापूर्वीच राजीनामा दिल्यामुळे मुदतपूर्व निवडणूका झाल्या तर? अशावेळी एर्दोगान यांचे दोन कालखंड ‘पूर्ण’ होणार नाहीत. मग मात्र एर्दोगान पुन्हा उभे राहू शकतील. या पळवाटीचा लाभ घ्यावा, अशी खटपट एर्दोगान यांनी सुरू केली आहे. खरेतर जवळपास गेली 22 वर्षे एर्दोगान तुर्कस्तानमध्ये सत्ता उपभोगत आहेत. त्यांच्या कार्यकाळात तुर्कस्तानमध्ये चलनवाढ 38 टक्क्यांवर गेली आहे. अशावेळी त्यांनी सत्ता दुसऱ्या सक्षम नेत्याच्या हाती सोपवण्यातच शहाणपणा आहे. पण सत्तेचा मोह दूर सारणे भल्याभल्यांना जमलेले नाही. त्यातून एर्दोगान हे तर जन्मजात (कॅानजेनायटल) सत्तापिपासू आहेत.
2016 मध्ये तुर्कस्तानमध्ये एक अयशस्वी बंड झाले होते. त्यानंतर तुर्कस्तानच्या घटनेत आमूलाग्र बदल करण्यात आले. पंतप्रधानपदाऐवजी अध्यक्षीय राजवट सुरू करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुकीचे अधिकार अध्यक्षांना देण्यात आले. या घटना दुरुस्तीच्या बाजूने 51.41 % तर दुरुस्तीविरुद्ध 48.59% मते पडून घटना दुरुस्तीचा ठराव मंजूर झाला.
घटनादुरुस्तीनंतर एर्दोगान अध्यक्ष म्हणून सत्तेवर आहेत. तुर्कस्तान हा खरे तर युरोपीय लोकशाही विचारसरणीचा प्रभाव असलेला इस्लामी देश आहे, नव्हे होता. पण एर्दोगान यांच्या दीर्घकालीन कार्यखंडात तुर्कस्तानमध्ये लोकशाहीचा संकोच होत गेला. त्यानंतर आक्रमक आणि ऊग्र राष्ट्रवाद प्रभावी होत जाणे स्वाभावीक होते. याशिवाय तुर्कस्तानमध्ये इस्लामवादाचीही पकड पक्की झाली. त्यानंतर तुर्कस्तानमध्ये निवडणुकयंत्रणेवरही सरकारचा प्रभाव वाढत गेला. आज तुर्कस्तानमध्ये चलनवाढ, बेरोजगारी आणि भूकंप यांनी जनता त्रस्त झाली आहे. पण एर्दोगान इकडे साफ दुर्लक्ष करीत आहेत. नाटोचा सदस्य असून सुद्धा युक्रेन युद्धात तुर्कस्तानने युक्रेनची नाही तर रशियाची बाजू घेतली आहे. यासाठी कारण असे दिले की, तुर्कस्तानमधील कुर्द बंडखोरांना एकेकाळी युक्रेनने आश्रय दिला होता. आज आर्थिक चणचण असून सुद्धा तुर्कस्तान लष्करी सज्जतेवर गरजेपेक्षा जास्त खर्च करतो आहे. यासाठी कोणतेही योग्य कारण तुर्कस्तानला देता आलेले नाही /देता येणारही नाही. जगात आज एका वेगळ्याच प्रकारचे नेते उदयाला आलेले दिसतात. ते लोकशाही पद्धतीनुसार मिळणाऱ्या सर्व अधिकारांचा पुरेपूर फायदा घेतात आणि नेतेपद मिळवितात. पण नेतेपद मिळताच त्यांच्यातील लोकशाही मनोवृत्ती पार लोप पावते. रशियाचे पुतिन, ब्राझीलचे बोल्सेनारो, तुर्कस्तानचे एर्दोगान यांच्या पंक्तीला आता अमेरिकेचे ट्रंप हेही येऊन बसले आहेत की काय अशी शंका निरीक्षक व्यक्त करीत आहेत. या नेत्यांना लोकशाही पद्धतीने मिळालेला विजय मान्य असतो पण याच पद्धतीने होणारा पराभव स्वीकारण्यास मात्र हे नेते तयार नसतात. एर्दोगान यांचे सद्ध्याचे वर्तन बघितल्यास हा मुद्दा सहज समजू शकेल. एर्दोगान यांना इकरेम इमामोग्लू यांचा हेवा वाटावा, त्यांचे नेतृत्व जनमानसात मान्य होऊ नये, असे वाटले तर ते मनुष्यस्वभावाच्या मर्यादा पाहता गैर ठरवता येणार नाही. पण प्रतिस्पर्ध्याला परास्त करण्यासाठी त्यांनी स्वीकारलेला मार्ग सर्वस्वी त्याज्य आहे. सीएचपीचे किंवा आरपीपीचे (रिपब्लिकन पीपल्स पार्टी) एमरम इमामोग्लू (वय वर्ष 54) या नावाचे एक नेते तुर्कस्तानमध्ये पर्यायी नेते म्हणून समोर येण्यास प्रारंभ झाला. त्यांनी भरपूर परिश्रम आणि वैध प्रचार करून तुर्कस्तानातील सर्वांत मोठ्या आणि प्रसिद्ध इस्तंबूल शहरचे महापौरपद प्राप्त केले. त्यांच्या नेतृत्वाचे दुसरे वैशिष्ट्य हे आहे की, त्यांच्या नेतृत्वात सीएचपीने तुर्कस्तानमधील 36 प्रांतातील स्थानिक निवडणुकीतही अभूतपूर्व यश संपादन केले आहे. या निमित्ताने इमामोग्लू यांच्या सीएचपीने एर्दोगान यांच्या जस्टिस अँड डेव्हलपमेंट पक्षाचा (एकेपी) सर्व महत्वाच्या मतदारसंघात निर्णायक पराभव केला आहे. राजधानी अंकारा आणि सर्वात मोठेशहर असलेल्या इस्तंबूलसह एझ्मीर, अंताल्या, बुर्सा या शहरातही सत्तारूढ जस्टिस अँड डेव्हलपमेंट पक्षाचा सपशेल पराभव झाला आहे. 2028 मधील निवडणुकीसाठी पक्षाने एर्दोगान यांनी उत्तराधिकारी जाहीर केलेला नाही. अध्यक्षपदासाठी पक्षांतर्गत निवडणूक जाहीर झाली आणि लगेचच 19 मार्च रोजी महापालिकेत भ्रष्टाचार आणि दहशतवादास समर्थन दिल्याच्या आरोपांखाली इमामोग्लू यांना अटक करण्यात आली. लाचखोरी, खंडणी आणि गुन्हेगारांची संघटना उभारणे असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले. लगेच त्यांचे महापौरपद रद्द करण्यात आले आणि त्यांना तुरुंगात धाडण्यात आले. त्याच दिवशी पक्षांतर्गत निवडणुकीत इमामोग्लू यांनी दणदणीत विजय मिळवला. ते अध्यक्षीय निवडणूक लढवू शकतात. पण तत्पूर्वी त्यांच्यावरील गुन्हे सिद्ध झाले, तर मात्र त्यांची उमेदवारी बाद ठरेल. अध्यक्षपदाचा उमेदवार उच्च शिक्षित असला पाहिजे असा तुर्कस्तानमध्ये नियम आहे. म्हणून इमामोग्लू यांची पदवीच रद्द करण्याचा निर्णय घेण्यास विद्यापीठाला बाध्य करण्यात आले आहे. त्यांना वाटेतून बाहेर काढण्यासाठीच हा बनाव रचल्याची जाणीव तुर्की जनतेला आहे. त्यामुळे इस्तंबूलमध्ये विविध विद्यापीठांतील विद्यार्थी निदर्शने करत आहेत. जनतेच्या पाठिंब्याच्या भरवशावर या अभूतपूर्व निदर्शनांचे लोण तुर्कस्तानभर पसरले आहे. काही विदेशी पत्रकारांना देश सोडून जाण्यास सांगण्यात आले आहे. शेकडो निदर्शकांना अटक करण्यात आली आहे. पण तरीही जनतेच्या रेट्यासमोर आपला निभाव लागेल का अशी शंका एर्दोगान यांना येऊ लागली आहे. म्हणून दडपशाहीचे निरनिराळे प्रकार ते अमलात आणीत आहेत. या पार्श्वभूमीवर भविष्यात तुर्कस्तानमधील सत्तासंघर्ष अतिशय तीव्र स्वरूप धारण करणार यात शंका नाही.
सामुद्रधुनीने विभाजित तुर्कस्तान
बराचसा आशिया खंडात आणि थोडासा युरोप खंडात पसरलेला तुर्कस्तान
सामुद्रदुनीने इस्तंबूलचेही विभाजन
No comments:
Post a Comment