तरूणभारत गुरुवार २४ .०४.२०२५
मोदी यांची यशस्वी श्रीलंका भेट
हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?
श्रीलंकेत डावीकडे झुकलेले कुमारा दिसानायके अध्यक्षपदी निवडून आले. अख्खा युरोप उजवीकडे वळू पहात असताना सद्ध्या श्रीलंकेने स्वीकारलेला हा उरफाटा वाममार्ग आश्चर्य वाटावा असा होता आणि आहे. यानंतर त्यांनी सहजपणे पार्लमेंटच्या निवडणुकीतही असेच नेत्रदीपक यश मिळवून दाखविले. अशाप्रकारे देशाच्या राजकारणावर कुमारा यांनी आपली पकड चांगलीच पक्की केली. दिसानायके हे मूळात मार्क्सवादी विचारांचे कट्टर पुरस्कर्ते राहिलेले आहेत. एकेकाळी त्यांचा जनता विमुक्ती पेरामुना (जेव्हीपी) हा पक्ष सुद्धा सिंहली वर्चस्ववादी राजकारणही करीत असे. पण श्रीलंकेत भडकलेला भयंकर वांशिक हिंसाचार काहीही साध्य करू शकला नाही याची त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जाणीव झाली. म्हणून दिसानायके त्यांच्या पक्षाने शांततेच्या मार्गाने व लोकशाही पद्धतीने कार्य करण्याची घोषणा करून ती अमलात आणली. हे वैचारिक परिवर्तन नोंद घ्यावी असे आहे.
दिसानायके यांनी स्थापन केलेल्या आघाडीला 2024 च्या निवडणुकीत 159 जागा मिळाल्या. याचा अर्थ असा होतो की तमिळ भाषक मतदारांनीही या आघाडीला समर्थन दिले आहे. आश्चर्य वाटावे असे हे शुभचिन्ह आहे. डाव्या विचारसरणीच्या एनपीपीने श्रीलंकेतील उत्तरेकडे असलेल्या तमिळबहुल जाफना जिल्ह्यात परंपरागत विरोधी तमिळ मते मिळवून हा विजय साध्य केला आहे. दिसानायके यांचा पक्ष देशाच्या दक्षिणेकडील भागातील एक प्रमुख सिंहली पक्ष आहे. दक्षिणेकडील सिंहली पक्षाने उत्तरेतील तमिळ बहुल भागात असे यश प्रथमच प्राप्त केले आहे. या पक्षाला एकेकाळी आक्रमक सिंहली-बौद्ध राष्ट्रवादी मानले जायचे. पण आता श्रीलंकेतील भाषावाद हळूहळू कमी होतो आहे. सिंहली आणि तमिळ यातील दुरावा कमी होऊन सर्वसमावशकतेच्या धोरणाचा अवलंब झाला तर ती फार मोठी सकारात्मक बाब ठरेल. श्रीलंका डावीकडे वळू पाहते आहे. याला भारताचा आक्षेप असण्याचे कारण नाही. फक्त नवीन राजवट चीनच्या इशाऱ्यावर नाचणारी असू नये, अशी मात्र भारताची रास्त अपेक्षा आहे. या वैचारिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मोदींची नुकतीच पार पडलेली भेट खूपच फलदायी ठरली आहे.
कोविडकाळातील चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे इंधन, अन्न आणि औषधे या जीवनावश्यक घटकांची तीव्र चणचण श्रीलंकेला जाणवू लागली. त्यामुळे वांशिक किंवा इतर कोणत्याही भावनेच्या आहारी न जाता दिसानायके यांना सर्व गटांचा भरभरून मिळालेला पाठिंबा हा दारिद्र्य व भ्रष्टाचार निर्मूलन यासाठी आहे, हे स्पष्ट आहे. कुमारा यांच्या पक्षाची चीनमधील कम्युनिस्ट पक्षाशी वैचारिक बांधिलकी आहे. पण भारताला कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्षून चालणार नाही, याचे भान दिसानायके यांनी ठेवलेले दिसते आहे. सिंहला, तमिळ, मुस्लीम या तिघांना सोबत घेऊन वाटचाल करू, असे आश्वासन कुमारा यांनी दिलेले आहे. अशाप्रकारे कुमारा दिसानायके यांनी आर्थिक आणि वांशिक अशा दोन्ही आघाड्यांवर स्थैर्य आणि सामंजस्य निर्माण करून भाकरी फिरवलेली निदान आजतरी दिसते आहे. वर्षभरापूर्वी दिसानायके यांनी भारताला भेट दिली होती. या दोन देशात मैत्रीचे संबंध असावेत यावर त्यांनी तेव्हा भर दिला होता. पण त्यासाठी श्रीलंकेलाच आपले चीनच्या तालावरचे नाचणे थांबवावे लागणार होते. श्रीलंका भारताचा शेजारी देश आहे. त्याचा उपयोग भारतविरोधी कारवायासाठी होऊ नये हे तेव्हा त्यांना मान्य होते. सत्तेवर आल्यावरही आपली प्रत्यक्षात हीच भूमिका असेल, असे आश्वासन त्यांनी तेव्हाही दिले होते. या भेटीत याचा प्रत्यय आला तो असा.
भारत आणि श्रीलंका यातील संबंध दृढ करण्यावर भर देत पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान संरक्षण सहकार्य करार करण्यात आला. श्रीलंकेशी झालेल्या या कराराकडे आज तरी चीनला शह म्हणूनच पहायला हवे. या महत्त्वाकांक्षी संरक्षण सहकार्य कराराशिवाय भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान महत्त्वाच्या अनेक द्विपक्षीय सहकार्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. पंतप्रधान मोदी यांच्या सन्मानार्थ कोलंबोच्या ऐतिहासिक स्वातंत्र्यचौकात रौप्यपदकप्रदान व स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांची सुरक्षा एकमेकांशी निगडित आणि परस्परांवर अवलंबून आहे असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले. त्यांनी मजबूत द्विपक्षीय सहकार्यासाठीचा व्यापक आराखडाच मांडला. भारत आणि श्रीलंका या दोन शेजारी देशांदरम्यान प्रथमच अशा प्रकारचा संरक्षण सहकार्य करार केला जात आहे. दोन्ही देशांदरम्यानचे सामरिक संबंध मजबूत करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. भारत श्रीलंकेच्या त्रिणकोमालीचा ऊर्जा हब म्हणून विकास करण्यासाठी सहकार्य करणार आहे. भारत, संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि श्रीलंका यांच्यात हा करार झाला आहे. चीनने श्रीलंकेच्या हंबनटोटा येथे तेलशुद्धीकरण प्रकल्पासाठी 3.2 अब्ज डॉलरचा करार केला आहे. या निमित्ताने तीन वर्षांपूर्वीच्या आर्थिक संकटातून सावरत असलेल्या श्रीलंकेला अनेक प्रकल्पांद्वारे आपल्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनला भारताने शह दिला आहे, आपल्या भूमीचा भारताविरोधात वापर करू देणार नाही, अशी ग्वाही श्रीलंकेचे अध्यक्ष कुमारा दिसानायके यांनी पंतप्रधान मोदी यांना यावेळी पुन्हा दिली. तसेच मोदी व दिसनायके यांनी सौर ऊर्जा प्रकल्पाचे दूरदृश्य प्रणालीने उद्घाटनही केले. दोन्ही देशांमधील मच्छिमारांच्या प्रश्नावर मानवतावादी भूमिकेतून तोडगा काढला जावा, अशी अपेक्षा मोदींनी चर्चेत व्यक्त केली. श्रीलंकेने प्रांतीय परिषदेच्या निवडणुका घेऊन तमिळींच्या आकांक्षा पूर्ण कराव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. श्रीलंकेला दिलेल्या कर्जाबाबतच्या फेररचना कराराला अंतिम रूप देऊन, व्याजदर कमी करण्यात आले. भारत श्रीलंकावासींच्या पाठीशी ठाम उभा आहे, अशी ग्वाही या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी दिली. श्रीलंकेच्या पूर्व भागातील प्रांतांच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी 2.4 अब्ज श्रीलंकन रुपयांचे मदत पॅकेज पंतप्रधानांनी यावेळी जाहीर केले.
ज्या राष्ट्रप्रमुखांशी श्रीलंकेचे सौहार्दपूर्ण संबंध आहेत त्यांचा सन्मान ‘श्रीलंका मित्र विभूषण’ या पुरस्काराने केला जातो. या पुरस्कारांतर्गत एक प्रशस्तिपत्रक आणि श्रीलंकेच्या खास 9 रत्नांनी सजवलेल्या एका रौप्य पदकाचा समावेश आहे. हे पदक नवरत्न कमळाच्या पाकळ्यांनी वेढलेल्या एका गोलाभोवती असते. मोदींना प्रदान केलेले हे रौप्यपदक भारत आणि श्रीलंकेतील चिरस्थायी मैत्रीचे प्रतिनिधित्व करते. मोदींनी एक्सवरील अधिकृत अकाउंटवर याबाबत म्हटले आहे की, त्यांनी हा पुरस्कार देशातील 140 कोटी जनतेला आणि भारत-श्रीलंकेतील खोलवर रूजलेल्या मैत्रीला समर्पित केला आहे. राष्ट्रपतींच्या विवेकबुद्धीनुसार हा पुरस्कार दिला जातो. आतापर्यंत फक्त चार जणांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मालदीवचे माजी अध्यक्ष मौमून अब्दुल गयूम हे फेब्रुवारी 2008 मध्ये या पुरस्काराचे सर्वात पहिले मानकरी ठरले आहेत. पॅलेस्टिनी अध्यक्ष महमूद अब्बास आणि पॅलेस्टाईनचे माजी अध्यक्ष यासर अराफत (मरणोत्तर) यांना हा पुरस्कार प्रदान केला गेला होता.
आपल्या श्रीलंका भेटीच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1996 च्या विश्वचषक विजेत्या श्रीलंकेच्या क्रिकेट संघाच्या सदस्यांशी संवाद साधला. मोदींनी आजवर आपल्या कोणत्याही परराष्ट्र भेटीदरम्यान फक्त राजकीय नेत्यांशीच संवाद साधला असे झाले नाही. मोदींचा हाही दौरा त्याला अपवाद नव्हता.
दिसानायके यांच्या बाजूने बहुसंख्येने उभे राहिलेले श्रीलंकेतील विविध भाषिक गट
मुख्यत: उत्तर आणि पूर्व किनाऱ्यावर - लंकन तमिळ आणि लंकन मूर यांची वसती आहे. तर मध्यभागी-सिंहली आणि भारतीय तमिळ आहेत. पश्चिम किनाऱ्यावर एका छोट्या प्रदेशात लंकन ख्रिश्चन केंद्रीत आहेत. (छोटे तपशील दाखविलेले नाहीत.) पश्चिमेला 1)त्रिंकोमालीत भारतद्वारा (उर्जा हब) लंकन मूर भाषकबहुल भागात, तर 2) हंबनटोटात चीनद्वारा (तेल शुद्धिकरण प्रकल्प) श्रीलंकेच्या दक्षिण टोकाला सिंहलीबहुल भागात
काही मोठी शहरे/भाग
1)त्रिंकोमाली 2) हंबनटोटा 3) कोलंबो 4) जाफना
(आकृती प्रत्यक्षाशी तंतोतंत जुळेलच असे नाही.)
No comments:
Post a Comment