वर्धिष्णू भारतीय अर्थव्यवस्था
तरूण भारत, नागपूर गुरुवार, दिनांक १४/०८/२०२५ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee? या ब्लॅागवरही उपलब्ध असतो.
वर्धिष्णू भारतीय अर्थव्यवस्था
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
अमेरिकेची अर्थव्यवस्था 25.43 ट्रिलियन डॅालर सकल देशांतर्गत उत्पादनासह (जीडीपी) जगात पहिल्या क्रमांकावर आहे. चीन 14.72 ट्रिलियन डॅालरसह दुसऱ्या क्रमांकावर, जर्मनी 4.92 ट्रिलियन डॅालरसह तिसऱ्या क्रमांकावर, जपान 4.39 ट्रिलियन डॅालरसह चौथ्या क्रमांकावर, तर भारत 3.41 ट्रिलियन डॅालरसह पाचव्या क्रमांकावर आहे. स्वातंत्र्यानंतर तब्बल 67 वर्षांनी सुद्धा म्हणजे 2014 मध्ये, भारताची अर्थव्यवस्था 2 ट्रिलियन डॉलर्स इतकीच होती. 2024 अखेरपर्यंत ती 3.41 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढली आहे. केवळ 10 वर्षात भारताने हा भीमपराक्रम केला आहे. अनेक मान्यतापात्र कसोट्यांनुसार भारत ही जिवंत, भरभक्कम पायावर उभी असलेली आणि सतत वाढण्याची क्षमता असलेली अर्थव्यवस्था ठरली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, आशियाई विकास बैंक आणि या सारख्या जागतिक ख्यातीच्या अनेक गुणवत्ता मूल्यांकन संस्थांचेही हेच मत आहे. शिवाय मुख्य हे की, ही कामगिरी भारताने लोकसंख्येचा प्रचंड मोठा डोलारा सांभाळून केली आहे. अशाप्रकारे जगातील पहिल्या पाचात स्थान मिळवणारी भारताची अर्थव्यवस्था 'मृत' असल्याचे विधान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी का करावे? ट्रंप यांच्या तार्किकतेची आता जगाला ओळख पटली आहे. त्यामुळे सामान्यांनाही याबद्दल आश्चर्य वाटणार नाही. पण देशांतर्गत मोदी विरोधक ट्रंपशी तात्काळ सहमती व्यक्त करतात, याची मात्र नोंद घ्यायला हवी. विरोध दर्शवणे हे विरोधकांचे कामच आहे. पण तो विरोध या पातळीपर्यंत घसरावा, हे कशाचे लक्षण आहे, बरे? गेली अकरा वर्षे विरोधकांच्या वाट्याला प्रत्येकदा हताशा निराशाच आली आहे, याचा हा स्वाभाविक परिणाम मानायचा का?
पण ट्रंप यांनी असा शब्द का उच्चारावा? ते तर भारताशी सहकार्य करण्याचे बाबतीत उत्सुक होते. त्यांचा पापड का मोडला? भारताने रशियाकडून खनिज तेल घ्यावे हे त्यांना मान्य नाही. ‘अमेरिका फर्स्ट’, हे जर त्यांचे घोषवाक्य असेल तर ‘भारत फर्स्ट’, याला त्यांचा विरोध असण्याचे काय कारण? युरोपीयन युनीयन आणि काही अन्यांनी रशियाकडून खनिज तेल घेण्याचे नाकारून रशियाची युक्रेन प्रकरणी आर्थिक कोंडी करण्याचे ठरविले. स्वस्त दरात खनिज तेल मिळते म्हणून भारताने रशियाकडून तेल घेतले हे अमेरिकेला आणि युरोपीयन युनीयनला आवडले नव्हते. पण युरोपीयन युनीयनला खनिज तेल इतर कुठे रास्त दराने मिळेना. म्हणून त्यांनी भारताकडून रास्त दरात तेल घेतले. कोणते होते हे तेल? ते भारताने रशियाकडून खरेदी केलेले व स्वच्छ केलेले तेल होते. आहे की नाही गंमत? युरोपीयन देशांना जे चालले, ते ट्रंप यांना चालले नाही. त्यांचा पापड मोडला आणि ते स्वभावाला अनुसरून एक शेलकी शिवी हासडते झाले. बायडेन सरकारने तर म्हटले होते की, भारताने रशियाकडून खनिज तेल घेऊन ते शुद्ध करून बाजारात स्वस्त दरात आणावे, असे केले नाही तर तेलाच्या किमती भडकतील.
ट्रम्प यांच्या भूमिका सतत बदलत असतात. जगाला आता त्याची सवय झाली आहे. अमेरिकन राष्ट्राची सूत्रे आज एका धसमुसळ्या, लहरी, शीघ्रकोपी व्यक्तीच्या हाती आलेली आहेत. पण अमेरिका हे जगातले सर्वात शक्तिशाली, संपन्न आणि ज्ञानसंपन्न राष्ट्र आहे. त्यामुळे त्या राष्ट्राकडे दुर्लक्षही करता येणार नाही. भारतात अब्जावधी डॉलरची परकीय गुंतवणूक (एफडीआय) आलेली आहे. अनेक आघाडीच्या जागतिक कंपन्यांची केंद्रे आज भारतात आहेत. देशाची निर्यात सतत वाढत असून परकीय गंगाजळीतही सतत वाढ होते आहे. भारतासोबत व्यापार करणे सोपे झाले असून पसंतीक्रम 142 वरून 63 वर आला आहे. हा बदल एखाद्या लहानशा राष्ट्राच्या बाबतीत होता तर त्याला विशेष म्हणता आले नसते. पण एक खंडप्राय देश लोकसंख्येचा प्रचंड डोलारा सांभाळत ही किमया करून दाखवतो, तेव्हा ते यश नेत्रदीपक ठरते. हे सजीवतेचे लक्षण आहे. मृतावस्थेचे नाही.
भारताचा विकास दरही सहा टक्क्यांपेक्षा जास्त आहे. भारतातील करसुधारणा, पायाभूत सुविधांचा विकास या क्षेत्रातील नित्य वाढती गुंतवणूक सर्वज्ञात आहे. शक्यतो ‘मेड इन इंडिया’, नाहीतर निदान 'मेक इन इंडिया' आणि शेवटी 'आत्मनिर्भर भारत' यासारख्या योजना हे प्रगतीपथावरचे महत्त्वाचे टप्पे ठरले आहेत. या पार्श्वभूमीवर 25% (आता 50 आणि उद्या?) टेरिफ आणि रशियाशी संबंध ठेवता म्हणून दंड या भूमिका विसंगत आणि व्यर्थ ठरतील, यात शंका नाही. आजही अमेरिका आणि युरोपीयन युनीयन रशियाकडून कच्चा माल आयात करीत आहेत, त्याचे काय? खनिज तेलाचे बाबतीत ते आयात करण्याशिवाय भारताला पर्याय नाही. पॅलॅडियम, युरेनियम आणि खते याबाबत अमेरिका आणि युरोपीयन युनीयन यांची अशी स्थिती नाही. तरीही हे देश रशियाकडून ही दुर्मीळ धातूखनिजे आयात करतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ ॲागस्टला (टेरिफ लागू केला त्या दिवशी) सांगितले की, आपल्या शेतकऱ्यांचे कल्याण ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. भारत आपल्या शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमार बंधू-भगिनींच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही.
वाटाघाटीच्या टेबलावर भारताने ही ठाम भूमिका प्रारंभापासून स्वीकारली होती. उभयपक्षी जाहीर खडाखडीपेक्षा टेबलावरील चर्चेत दिलेली उत्तरेच अधिक योग्य ठरतील, ही भारताची भूमिका होती. वाटाघाटी सुरू नसत्या तरची गोष्ट वेगळी होती. पण शहाणपणाशी वैर बाळगणाऱ्या अडमुठ्यांना रोखठोक जाहीर उत्तरेच हवी असतात त्याला कोण काय करणार?
युक्रेन युद्धाचे संदर्भातच केवळ नाही तर कोणत्याही अशाप्रकारच्या संघर्षाचे बाबतीत भारताचे परराष्ट्र धोरण काय असेल ते मोदींनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. भारताने आपला पक्ष घ्यावा असे झेलेन्स्की आणि नाटो यांना वाटत होते. त्यांनी तसे प्रयत्नही केले होते. भारताने भूमिका स्पष्ट करीत सांगितले की, युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत नेहमीच शक्य ते सर्व करण्यास तयार आहे. "भारत तटस्थ नाही. कोणत्याही संघर्षप्रसंगी सुरुवातीपासूनच आम्ही बाजू घेत असतो. आम्ही शांततेची बाजू निवडत असतो." प्रत्येक देशाच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेवर त्यांनी भर दिला. भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्या काळात पाकिस्तानने पाश्चात्यांच्या गटात सामील होऊन शस्त्रास्त्रे व आर्थिक मदत मिळविली. भारतानेही आपल्याकडे यावे, तसे केल्यास पाकिस्तानला दिले त्याच्या तिप्पट तुम्हाला देऊ, असे आश्वासन आणि आमीश भारतासमोर होते, पण भारत बधला नाही. रशिया हा भारताचा पूर्वीपासूनचा विश्वासू सहकारी आहे. रशियाकडून होणाऱ्या तेलखरेदीमध्ये भारताची अब्जावधी परकीय चलनाची बचत झाली आहे. भारताने रशियाकडून शस्त्रे खरेदी करावीत हे ट्रंप यांना पूर्वीपासून खटकत होते. 'ब्रिक्स' बाबत एकत्र येऊन डॉलरला पर्यायी चलन निर्माण केले जाईल, असे ट्रंप यांना वाटते. ब्रिक्स" हे भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या शिखर संघटनेचे संक्षिप्त नाव आहे. आता या विस्तारित ब्रिक्समध्ये अर्जेंटिना, इजिप्त, इथिओपिया, इराण, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबिया असे सहा देश नव्याने समाविष्ट झाले आहेत. ब्रिक्सवर ट्रंप यांचा पूर्वीपासूनच राग असून, तेथील भारताचे असणे त्यांना आवडत नाही. ट्रंप यांनी नुकतेच 'ब्रिक्स' देशांवरही आयातशुल्काचे शस्त्र उगारले आहे. भारताने ब्रिटनशी मुक्त व्यापार करार केला असून अन्य युरोपीय देशांशीही असाच करार करण्याचे हेतूने भारताच्या वाटाघाटी सुरू आहेत. खुद्द अमेरिकेशीही तशाच कराराबाबत चर्चा सुरू आहे. पण अमेरिकेने अनेक जाचक अटी घातल्यामुळे चर्चा पुढे सरकत नाही. आपण रशिया युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत पण भारत रशियाकडून तेलखरेदी करून रशियाची आर्थिक कोंडी होऊ देत नाही, असे म्हणत ट्रंप भारतावर नाराज आहेत. परंतु हे युद्धच मुळी अमेरिकेने दिलेल्या शस्त्रांनिशी लढले जात आहे, त्याचे काय? याच रशियाने अमेरिकन निवडणुकीच्या वेळी ट्रंप यांची बाजू घेतली होती, असा आरोप आहे, त्याचेही काय? भारताची अर्थव्यवस्था रशियाच्या अर्थव्यवस्थेसोबत रसातळाला जाणार असे भविष्य ट्रंप यांनी वर्तविले आहे. कर्जात आकंठ बुडालेल्या पाकिस्तानबाबत मात्र असे काहीही ट्रंप यांना वाटत नाही, याला काय म्हणावे?
अविकसित किंवा भारतासारखी विकसनशील राष्ट्रे जास्त आयात कर (टेरिफ) आकारीत होते आणि अमेरिका तुलनेने खूपच कमी आयात कर ठेवीत होते, याबाबतचा निर्णय एका सर्वमान्य योजनेनुसार झाला होता. त्यामागची भूमिका लक्षात घ्यावयास हवी. असे केल्यामुळे अविकसित आणि विकसनशील राष्ट्रांची आर्थिक पातळी उंचावण्यास साह्य होत होते. यात बदल व्हावा कारण आता अमेरिकेसमोरच काही प्रश्न निर्माण होत आहेत, असे वाटून अमेरिका वेगळी भूमिका स्वीकारत असेल, तर तो तिचा अधिकार आहे. पण त्यासाठी आज जी आगपाखड अमेरिका करीत आहे, ते चूक आहे.
चीन आणि भारत जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठेत मोडतात. खनिज तेलासारखे अपवाद वगळले तर आयात ही चीनची अन्य बाबतीतली गरज फारशी उरलेली नाही. मग उरतो तो भारतच. या बाजारपेठेला कुणीही अव्हेरू शकत नाही. ही जाणीव अमेरिकेसारख्यांना होण्यासाठी भारताला काही काळ वाट पहावी लागेल. एवढ्यात ट्रम्प यांनी आपले निर्णय अनेकदा बदलले आहेत. मोदी सरकाराएवढे अनुकूल सरकार अमेरिकेच्या वाट्याला यापूर्वी कधीही आले नव्हते. जर या सरकारशीही ट्रंप जुळवून घेऊ शकत नसतील तर दोष ट्रंपकडे जातो. अमेरिकन शेतमाल आणि दुग्धपदार्थ यांना भारताची बाजारपेठ खुली करावी किंवा रशियाकडून तेल घेणे बंद करावे या अपमानकारक अटी भारत नाकारतो, याचा अर्थ भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे, अमेरिकेला विशेषतहा ट्रंप यांना ज्या दिवशी कळेल तो दिवस त्यांच्यासाठी सुदिन ठरेल.