Friday, October 21, 2016

मोसूलच्या मुक्तीच्या लढ्याला प्रारंभ
वसंत गणेश काणे,    
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२  
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
इराक शासनाने मोसूल या इराकमधील दुसऱ्या क्रमांकाच्या शहरातून इसीसला हुसकून लावण्याची मोहीम हाती घेतल्यापासून सध्या आसपासच्या गावखेड्यात हातघाईची लढाई सुरू झालेली दिसते आहे. ख्नाश हे मोसूलपासून १४ मैल अंतरावरील गाव आहे. या गावातून नागरिकांचा जथ्था युद्धक्षेत्रापासून शक्य तेवढे दूर जाण्याच्य ाप्रयत्नात स्थलांतर करीत आहेत. थकलेले, भेदरलेले, तहानलेले, उपाशी व व्याधिग्रस्त स्तरी_ पुरुष व मुले मैलोगणती दरकोस दरमजल करीत वाटचाल करतांना दिसणे ही नित्याची बाब झाली आहे. अदला नावाच्या खेड्यातील निर्वसिताने भयावह हातघाईचे वर्णन करतांना म्हटले की,शासकीय फौजांनी आमच्या गावातून इसीसच्या फौजाना हुसकावून लावून एक/दोन दिवसहोतात न होतात तोच इसीसच्या फौजांनी पुन्हा  अदला गाववर कब्जा केला. सुटका झाली अशा आनंदात जनता होती. पण अपेक्षाभंग झाला. म्हणून पलायनाचा निर्णय घेऊन हे लोक मुलाबाळांसह वाळवंट तुडवीत निघाले होते.
इराकसाठी ही निर्णायक लढाई आहे. एकतर इसीस हुसकावले जातील, मोसूल मुक्त होईल, नाहीतर नानुष्कीची तडजोड करून इसीसची आगेकूच थांबवण्याचा केविलवाणा व बेभरवशाचा प्रयत्न करावा लागेल. सध्या सुरू असलेली कारवाई इराकी शासकीय फौजा व कुर्द लोकांच्या फौजा यांची संयुक्त कार्यवाही आहे. मोसूलच्या आसपासची व भोवतालची २५ गावे, खेडी, वस्त्या यात हा संघर्ष सध्या सुरू असून विजयाचे दावे दोन्ही पक्षांकडून होत आहेत. खरेतर इराकी शिया व कुर्द लोकांमधून विस्तव जात नव्हता. पण इसीस हा दोघांचाही काळ असल्यामुळे निदान त्याला हकलण्यापुरती या दोन परंपरागत वैऱ्यात दिलजमाई झालेली दिसते आहे.
   कुर्द लोकांच्या मनात स्वायत्त इराकी कुर्दस्थानचे स्वप्न आहे. त्यांच्या फौजांचे नामकरण ते ‘पेशमर्गा’ या नावाने करतात. पेशमर्गाचा अर्थ आहे ‘साक्षात मृत्यूशी झुंज घेणारे’. कुर्द लोकांचीही आपापसात भांडणे आहेत, निरनिराळे गट आहेत, गटांचे वेगवेगळे म्होरके आहेत. हे सर्व इसीसला हकलण्यासाठी एकत्र आले आहेत व या संयुक्त गटाने इराक शासनाशी तात्पुरते जुळवून घेतले आहे.  म्हणून ही पेशमर्गा व इराकी शासकीय फौजा इसीसशी लढतांना दिसत आहेत. नंतर तेही एकमेकांना पाहून घेणार आहेत. हा तपशील इराकमधील बजबजपुरी समजून घेण्यासाठी उपयोगी पडावा.
मोसूलच्या आसपासचा व भोवतालचा प्रदेश पेशमर्गा काबीज करतील व तो इराकी फौजांच्या हाती सोपवतील. पण मोसूल जिंकण्याची जबाबदारी मात्र इराकी फौजांचीच असेल.अशा या योनेत कुरबुरींना आताच सुरवात झाली आहे. इसीसचा प्रतिकार कडवा असून अक्षरश: फुटाफुटाने पेशमर्गाची आगेकूच सुरू आहे.
निर्वासितांना एकत्र करून त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था पेशमर्गा करीत असतांनाच धुळीचे लोळ उठवीत इराकी फौजांच्या ‘हुम्वी’ ट्रक्स धडाडत आल्या आणि काहीही दिसेनासे झाले. ‘हुम्वी’ म्हणजे ‘हाय मोबिलिटी मल्टिपर्पज व्हील्ड व्हिकल’. एवढे लांबलचक नाव घेण्याऐवजी ‘हुम्वी’ हा शाॅर्ट फाॅर्म उच्चारायला बरा. याला वाळवंटातील जीप म्हटले तरी चालेल. त्यामुळे वाळवंटी इराकमध्ये मुलकी लोकसुद्धा हुम्वी वापरतात. यामुळे कुर्दिश अधिकाऱ्याच्या पायाची आग मस्तकात पोचली. ‘हे इराकी म्हणजे एकजात मूर्ख’, तो कडाडला. ‘काहीही पूर्सूचना न देता आले धसमुसळत. एकदा वाटले इसीसचा आत्मघातकी बाॅंबरच आहे की काय?’ मैत्रीपूर्ण सहयोगाचा हा नमुना बरेच काही सांगून जातो.
  इराकी फौजा जवळच तळ ठोकतात. ठिकठिकणी झेंडे रोवतात. त्यावर शिया इमामांचे फोटो असतात. ‘यांना स्वत:चाच टेंभा मिरवायचा आहे आणि हा म्हणे मुक्तिसंग्राम!’, एक पेशमर्गी अधिकारी आपल्या भडासीला वाट करून देतो. निर्वासितांची चिंता वेगळीच असते. ‘जिंकणाऱ्या इसीसपेक्षा माघार घेणारी इसीस खूपच क्रूर आहे’, अबू लायला आपली आपबीती सांगत असतो. त्याच्यासोबत त्याच्या दोन बायका व चार मुली असतात.त्यांनी नकाब घातलेला असतो. दोन भेदरलेले डोळे सोडले तर कुणाचेही नखसुद्धा दृष्ीस पडत नसते. अबू लायलासोबत २०० माणसे, बायका, मुले असतात. हा दीड लक्ष लोकांच्या मोसूल सोडण्याच्या (एक्सोडस)   प्रक्रियेचा प्रारंभ आहे. मदतकार्यासाठी जगभरातून आलेल्या पथकाच्या अंगावरही शहारे येतात.
मोसूल शहराच्या मुक्तीसाठीची अटीतटीची लढाई सुरू होणार आहे. ही दीर्घकाळ चालणारी लढाई असणर आहे. टायग्रिस नदी मोसूल शहराच्या अगदी मधोमध वाहते आहे. अनबर प्रांतात पळून जाणे अशक्य आहे. अनबर हा इराकचा सर्वात मोठा प्रशासकीय इलाखा आहे. शत्रूला (इसीस) पळून जाणे शक्य नाही. त्यांना लढत लढत मरावेच लागेल कारण शरण आले तरी मारलेच जातील. निर्वासितांना इराकी कुर्दिस्थान प्रांताची राजधानी इर्बिल येथे आसरा द्यावा लागेल. टायग्रिस नदी पार करण्यास शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. त्या लोकांनी बोगदे खणले आहेत. सुरुंग पेरले आहेत. त्यामुळे टायग्रिस ओलांडायला खूप वेळ लागेल. तोपर्यंत तात्पुरत्या छावण्यात निर्वासितांची व्यवस्था करता येणार नाही. विचारविनिमयानंतर ही योजनाच पक्की होते.
एक आणखी भीती आहे. ठिकठिकाणी इसीसचे स्लीपर सेल्स आहेत. ते आज गप्प आहेत. ऐनवेळी ते जागृत होतील. सर्व दिसायला सारखेच दिसतात. त्यामुळे कोण स्लीपर सेलचा सदस्य आणि कोण मुलकी नागरिक? ओळखणे कठीण आहे. शिवाय हे लोक ओळखीच्यांच्या घरीतरी राहतात नाहीतर शेताततरी मुक्काम ठोकतात.कधीकधी मूळ घरमालकाला मुलाबाळासकट ठार मारतात आणि सरळ घरमालक म्हणून वावरू लागतात.
  पळून येणाऱ्या निर्वासितांपैकी फारच कमी लोक छावण्यात आश्रयाला येऊ शकतात. बहुतेक मारले जातात, बरेच उपासमारीने मरतात तर काही रोगांना बळी पडतात. पोचणाऱ्यांमध्ये इसीसचे हस्तकही असतात. काही संधी पाहून उत्पात घडवतात तर काही खरोखरच शरणागती पत्करतात. गुन्हा कबूल करतात. तुरुंगात जायलाही तयार असतात. कारण त्यांचा जीव वाचलेला असतो.
 हे लोक दसरीकडेपळून का जात नाहीत. ते अशक्य असते. इतके दिवसाच्या सहवासानंतर आता कोण कोण आहे, याची ओळख लपविणे कठीण झालेले असते. त्यामुळे लहान गटात ते चटकन ओळखू येतात. मोठ्या गटाने वेगळेपणाने पळून जाणे तर अशक्यच असते. ओळखले जाण्याची व पकडले जाण्याची  भीती जास्त असते.
म्हातारे कोतारे कशाचीही तमा न बाळगता वाळवंट तुडवीत आलेले असतात, बुरखाधारी महिला व मुली मोडक्या तोडक्या वाहनात कोंबून वाळवंट पार करतात. इसीसच्या मगरमिठीतून सुटका होणर असल्यामुळे त्यांना प्रवासातील हालअपेष्टा जाणवत नाहीत. सुटकेचा आणि स्वातंत्र्याचा आनंद व समाधान सांगून समजणे कठीण आहे.
 इकडे इराकी दलांनी मोसूल शहर परत ताब्यात घेण्यासाठी मोहीम सुरू केली असून, आयसिसला चिरडण्याची मोहीम शेवटच्या टप्प्यात आली आहे, अशी घोषणा इराकचे पंतप्रधान हैदर अल अबादी यांनी करताच, अमेरिकेने इराकच्या या घोषणेचे स्वागत केले आहे.
नागरिकांची ढाल करून इसीसचे दहशतवादी स्वत:ला वाचवण्याची शक्यता आहे, तेव्हा योग्यती काळजी घ्या, नागरिकांचे प्राण जाणार नाहीत हे पहा, असा सावधगिरीचा इशारा संयुक्त राष्ट्रांनी दिला आहे. तर आम्ही आता विजयी मोहिमा सुरू केल्या असून, लोकांना दहशतवाद व हिंसाचारातून मुक्त  करूनच श्वास घेऊ, असे पंतप्रधान हैदर अल अबादी यांनी सांगितले. मोसूल वर्षभरापूर्वी इसीसच्या ताब्यात गेले होते, सीरिया व इराक या दोन्ही देशातून  हल्ले चढवत त्यांनी ते काबीज केले होते. सीरियात इसीसचे कंबरडे मोडताच इराकची मोहीम आता नक्कीच फत्ते होणार यात शंका नाही.
नागरी संघर्षांमुळे सत्तेची पोकळी निर्माण झाली नसती, तर इसीस दहशतवादी कधीच यशस्वी झाले नसते. मोसूलमध्ये इसीसने खिलापत कायद्यानुसार कारभार सुरू केला आहे. इसीसविरोधी आघाडीत अमेरिकाही सामील झाली असून, कुर्दिश पेशमर्गा व इराकी सरकारी दले या सर्वांनी मिळून आपापसात भांडत व एकमेकांवर आळ घेत  का होईना, मोसूलभोवती पाश आवळत आणले आहेत. मोसूलमधील इसीसची तटबंदी मोडून काढणे  ही गोष्ट इराकचे पंतप्रधान हैदर अल अबादी यांनी वाटते तेवढी सोपी गोष्ट नसली तरी ती अटळ आहे? खुद्द मोसूलमध्ये तुंबळ धुमश्चक्री होईल. रक्ताचे पाट वाहतील.
मोसूलमधील १५ लाख लोकांचे भवितव्य आजतरी अधांतरी आहे. मुले व वृद्धांना इसीसकडून जास्त धोका आहे. हजारो स्त्री-पुरुष व मुले यांचा मानवी ढालीसारखा वापर करण्यास इसीसने सुरवात केली आहे. सर्वात जास्त विटंबना स्त्रित्त्वाची होते आहे. खरेतर या सर्व संघर्षात त्यांची तसे पाहिले तर कोणतीच भूमिका नाही. त्या बिचाऱ्या जो जिंकेल त्याचे दास्य पत्करणार. कोणत्याही युद्धाप्रमाणे यावेळीही त्यांचाच अपरिमित छळ होणार. हे सर्व कशासाठी होते आहे, तर ईश्वरासाठी. ईश्वरासाठी? हो ईश्वरासाठी. त्याच्या नावाने. ईश्वराकडे जाण्याचा एकच मार्ग आहे या हट्टापोटी. या संघर्षात सहभागी असणाऱ्या सर्वांचे या मार्गाबाबत एकमत आहे, तरीसुद्धा हे घडते आहे. ईश्वरप्राप्तीचा मार्ग या सर्वांचा एकच असला तरी सुन्नीची लेन वेगळी आहे. शियांचाही मार्ग तोच असला तरी ते दुसऱ्या लेनने जाऊ इच्छितात, एवढाच काय तो फरक आहे. पण मग  ईश्वरप्राप्तीचे एकापेक्षा जास्त मार्ग असू शकतात, ज्याने त्याने आपल्याला पटेल, रुचेल, आवडेल त्या मार्गाने जावे, असे कोणी म्हणत असेल तर?

No comments:

Post a Comment