Thursday, November 10, 2016



अमेरिकेत अध्यक्षाची निवड अशी होते.
वसंत गणेश काणे,    
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२  
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
अमेरिकेत अध्यक्षाची निवड कशी  होते, हे समजायला तसे थोडेस कठीणच आहे. अमेरिकेत मतदारांचे एक राष्ट्रीय रजिस्टर असून नागरिकांनी मतदार नोंदणीसाठी स्वत: अर्ज करणे अपेक्षित आहे. त्यामुळे अर्ज करतील तेच नागरिक मतदार होतील. पण नागरिकांनी अर्ज करून नोंदणी करावी, यासाठी तिथेही मोहिमा आखल्या जातात, हा भाग वेगळा.
पाॅप्युलर व्होट्स- आठ नोव्हेंबर २०१६ ला सर्व अमेरिकन नागरिकांनी मतदान करणे अपेक्षित आहे. आजवर साठ टक्यांच्या जवळपास लोक मतदान करीत आले आहेत. २०१६ मध्येही थोड्याफार फरकाने असेच काहीसे होईल. देशभरातून होणाऱ्या एकूण मतदानाचा विचार केला, तर हिलरी क्लिंटन यांना देशपातळीवर ५० टक्यापेक्षा जास्त मते मिळतील असे मानले जात आहे. याला पाॅप्युलर व्होट्स असे म्हणतात. पण पाॅप्युलर व्होट्स जास्त आहेत, म्हणून एवढ्यावरूनच  त्या निवडून येतील असे नाही.
आपल्या संसदेची जशी लोकसभा व राज्यसभा अशी दोन सभागृहे आहेत, तशाच अमेरिकन काॅंग्रेसची (संसदेची) हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज (प्रतिनिधी सभा) व सिनेट अशी दोन सभागृहे आहेत.
१. हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज (प्रतिनिधी सभा)- अमेरिकेत लहान-मोठी एकूण ५० राज्ये (प्रांत) असून त्यांच्या वाट्याला लोकसंख्येच्या प्रमाणात रिप्रेझेंटेटिव्ह ( प्रतिनिधी) असतात. जसे कॅलिफोर्निया सर्वात मोठ्या राज्याला ५३ प्रतिनिधी मिळाले आहेत. पण राज्य कितीही लहान असले तरी त्याचा एक तरी प्रतिनिधी असतोच.  अशी १९ राज्ये आहेत. यांची एकूण संख्या ४३५ अाहे.
२. सिनेट - सिनेटमध्ये लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्त्व नाही. प्रत्येक राज्याला दोन सिनेट सदस्य असतात. कॅलिफोर्नियासारख्या भल्या मोठ्या राज्याला व अगदी छोट्या एकोणीस राज्यांनाही प्रत्येकी दोनच सदस्य सिनेटवर असतात. अशा प्रकारे सिनेटवर एकूण १०० सदस्य असतात.
३. इलेक्टोरल काॅलेज - हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज (प्रतिनिधी सभा) चे ४३५ व सिनेटचे १०० सदस्य मिळून ५३५ ही संख्या येते. काही राज्यांची विशेष परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना एकूण तीन जास्तीचे सदस्य दिले आहेत. असे ५३८ ही इलेक्टोरल काॅलेजची एकूण सदस्य संख्या आहे. यापैकी ज्या उमेदवाराचे २७० इलेक्टर्स निवडून येतील. तो सहाजीकच अध्यक्ष म्हणून निवडून येतो.
४. इलेक्टोरल काॅलेजचे प्रतिनिधी -. हिलरी क्लिंटन व डोनाल्ड ट्रंप यांनी प्रत्येक राज्यातून आपले इलेक्टर्स कोण असतील, त्यांची नावे राज्य निहाय दिलेली असतील. कॅलिफोर्निया सारख्या मोठ्या राज्यात ही नावे ५३+२=५५ असतील (हाऊसमधील सदस्य-५३ व सिनेट मधील सदस्स २= ५५) तर एकोणीस छोट्या राज्यात ही प्र त्येकी ३ असतील  (हाऊसमधील सदस्य प्रत्येकी १ व सिनेट मधील सदस्स २= ३). यांची एकूण बेरीज ५३८ होते, हे आपण पाहिलेच आहे. इलेक्टर्सची नावे त्या त्या उमेदवाराच्या नावासोबत काही राज्यात छापतात, तर काही राज्यात छापतही नाहीत.
५. इलेक्टर्स कसे निवडून येतात?- आपण कॅलिफोर्नियाचेच उदाहरण घेऊ. ८ नोव्हेंबरला या राज्यातील मतदार मतदान करीत आहेत. हिलरी क्लिंटन/ डोनाल्ड ट्रंप  यांना ५०.१ ते ९९.९ टक्के यांच्या दरम्यान कितीही मते (पाॅप्युलर व्होट्स) मिळाली तरी हिलरी क्लिंटन/डोनाल्ड ट्रंप यांचे सर्वच्यासर्व म्हणजे ५५ इलेक्र्टर्स निवडून आले असे मानतात. या नियमाला विनर टेक्स आॅल, असे म्हणतात. जो परिणाम ९९.९ टक्के मते मिळाल्याने होईल तोच परिणाम ५०.१ टक्के मते मिळाल्यास होतो, हे समजून घेणे आवश्यक आहे. सर्व ५० राज्यात याच नियमानुसार इलेक्टर्स निवडून येणार आहेत. मतांच्या टक्केवारीच्या प्रमाणात  इलेक्टर्सची वाटणी होत नाही.
कलाटणी देऊ शकणारी राज्ये (स्विंग स्टेट्स) - अमेरिकेत दोन्ही पक्षांचे परंपरागत बालेकिल्ले म्हणावेत अशी राज्ये आहेत. पण काही राज्ये अशी आहेत की, ज्या राज्यांत दोन्ही पक्षांचे बलाबल जवळपास समसमान असते. निवडणुकीच्या प्रचार मोहीमेद्वारे जो पक्ष ही राज्ये आपल्याकडे वळविण्यात यशस्वी होतो, म्हणजे या राज्यात ५०.१ टक्के मते मिळवतो तो निवडणूक जिंकतो. म्हणून या राज्यांना  कलाटणी देऊ शकणारी राज्ये (स्विंग स्टेट्स ) असे म्हणतात.
 आजच्या जनमत चाचणीनुसार डेमोक्रॅट पक्षाच्या हुकमी इलेक्टोरल मतांची संख्या २१७ इतकी तर रिपब्लिकन पक्षाच्या हुकमी इलेक्टोरल मतांची संख्या १९१ आहे. म्हणजे दोन्ही पक्षांची एकूण हुकमी इलेक्टोरल मते २१७+ १९१ = ३०८ इतकी होतात. याचा अर्थ असा की, १३०   इलेक्टर्स सध्यातरी कुंपणावर आहेत. ते कुणाकडे जातील ते आज सांगता येत नाही. या १३० पैकी डेमोक्रॅट पक्षाला निवडणूक जिंकण्यासाठी ५३ इतकी तर रिपब्लिकन पक्षाला ७९ इतकी इलेक्टोरल मते हवी आहेत. ही १३० इलेक्टोरल मते कलाटणी देऊ शकणाऱ्या राज्यातील (स्विंग स्टेट्स) मते आहेत. अशी जवळपास दहा राज्ये असून त्यात प्रामुख्याने फ्लोरिडा(२९ मते), पेन्सिलव्हॅनिया (२० मते), ओहायो (१८ मते), नाॅर्थ करोलिना (१५ मते), व्हर्जिनिया(१३ मते), व्हिस्काॅन्सिन (१० मते) आणि ४ छोटी राज्ये (उरलेली मते) आहेत. या राज्यात सर्वसामान्य मतदारांची ५० टक्यापेक्षा जास्त मते आपल्यायला मिळावीत, यासाठीच शेवटच्या टप्यातील प्रचार युद्ध सुरू होते.. कारण ज्या पक्षाला पन्नास टक्याच्यावर सर्वसामान्य मते मिळतील, त्या राज्याच्या वाट्याचे सर्व इलेक्टर्स निवडून आले असे ठरणार होते. असे २७० इलेक्टर्स ज्या उमेदवाराचे निवडून येतील, तो अमेरिकेचा अध्यक्ष होईल मग त्याला
पाॅप्युलर व्होट्स कितीही असोत.
 


No comments:

Post a Comment