Friday, November 11, 2016

अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक - एक वस्तुनिष्ठ विश्लेषण लेखांक १
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड 
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०    
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 
यंदा अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक ८ नोव्हेंबर २०१६ रोजी झाली या दिवशी मंगळवार होता. या अगोदर ६ नोव्हेंबर २०१२ ला बराक ओबामा निवडून आले होते. या दिवशीही मंगळवारच होता. त्या अगोदर ४ नोव्हेंबर २००८ ला बराक ओबामा पहिल्यांदा निवडून आले होते. त्या तारखेलाही मंगळवारच होता आणि २०२० साली अमेरिकेत पुन्हा निवडणूक होईल व त्या दिवशीही मंगळवारच असेल. २०२० सालचा नोव्हेंबर महिन्यातला पाहिला सोमवार २ तारखेला येणार आहे. म्हणजे मंगळवार ३ तारखेला असणार आहे. म्हणून ३ नोव्हेंबर २०२० ला अमेरिकेत निवडणूक होईल, हे नक्की आहे.अमेरिकेने हा मंगळवार आजवर कधीही चुकवला नाही. भविष्यातही चुकवणार नाही. हा नोव्हेंबर महिन्यातील नुसता पहिला मंगळवार नाही तर नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या सोमवार नंतरचा मंगळवार आहे. अशी या मंगळवारची महती आहे. यामुळे अमेरिकेच्या राजकीय जीवनात एक निश्चितता व निश्चिंतता निर्माण झाली आहे. अध्यक्ष मध्येच मेला ( जसे फ्रॅंकलीन रुझवेल्ट १९४५) किंवा मारला गेला ( जसे जाॅन एफ केनेडी १९६३) तर उपाध्यक्ष (जसे हॅरी ट्रूमन वा लिंडन जाॅनसन) उरलेल्या कालखंडात राष्ट्राध्यक्षपदाची धुरा सांभाळतील अशी तरतूद आहे. यामुळे निवडणुकीची टांगती तलवार वगैरे प्रकार नाही.
मंगळवार ठरला कसा?- १७९२ मध्ये अमेरिकेत एक कायदा पारित करण्यात आला. ज्या वर्षात निवडणूक होणार त्या वर्षाच्या डिसेंबर महिन्यातील पहिल्या बुधवार पासून ३४ दिवसांच्या आत प्रत्येक राज्यात अध्यक्षपदासाठीचे मतदान आटोपलेच पाहिजे, असे ठरविण्यात आले. म्हणजे अर्थातच हा नोव्हेंबर महिना असणार. नोव्हेंबर महिनाच का?  याची कारणे दोन आहेत. एक कारण असे की, यावेळी पिकांची कापणी उरकलेली असते. दुसरे कारण असे की, कडाक्याची थंडी पडायला सुरवात व्हायची असते. 
 अठराव्या शतकात दळणवळणाची साधने विकसित झालेली नव्हती. आता आगगाड्या, मोटारी, विमाने आली. पण तेव्हा परस्परसंपर्काची जलद गतीची साधने नव्हती. तसेच आता टेलिफोन, मोबाईल आले आहेत त्यामुळे दुसऱ्याच क्षणी एक दुसऱ्याशी संपर्क साधू शकतो. त्यामुळे महिन्याभराचे अंतरठीक होते. पण मग आता एक महिन्याहून मोठा कालावधी  कशाला हवा? 
निवडणुकीची तारीख निश्चित करण्यामागचे सूत्र - १८४५ साली दुसरा एक कायदा पारित करण्यात आला. त्यानुसार नोव्हेंबर महिन्याच्या ‘पहिल्या सोमवारनंतरच्या  मंगळवारी’ संपूर्ण देशात अध्यक्षपदासाठी मतदान व्हावे असे ठरले. यामुळे नोव्हेंबर महिन्यातील ‘पहिल्या सोमवार नंतरचा  मंगळवार’ व  डिसेंबर महिन्यातील पहिला बुधवार यात ३४ दिवसांपेक्षा जास्त अंतर राहणार नाही, हे नक्की झाले. (‘पहिल्या सोमवार नंतरचा मंगळवार’ असा शब्दप्रयोग का म्हणून ? कारण असे की, एखाद्या वर्षी पहिला मंगळवार नोव्हेंबरच्या  १ तारखेलाही येऊ शकेल. अशावेळी सोमवार आॅक्टोबर महिन्यात नाही का येणार?) पण मंगळवारच का? मंगळवारात असे काय आहे? तर सर्वांना रविवारी चर्चमध्ये जायचे असते. त्यामुळे रविवार नको. पण मग सोमवार का नाही? तर मतदान केंद्र दूर असेल तर प्रवासासाठी सोमवार हाताशी असलेला बरा, म्हणून मंगळवार ठरला. यानुसार निवडणुकीची तारीख केव्हाही २ ते ८ यांच्या दरम्यानचीच असेल(या दोन्ही तारखा पकडून) हेही नक्की झाले.
 अमेरिका आहे कशी? - अमेरिकेची लोकसंख्या जवळजवळ ३२ कोट असून क्षेत्रफळ ठोकळमानाने १ कोटी चौरस मीटर व लोकांचे सरासरी वैयक्तिक वार्षिक उत्पन्न ५५,००० डाॅलर आहे. देशात एकूण ५० राज्ये आहेत. यापैकी ४८ राज्ये सलग आहेत तर रशियाकडून विकत घेतलेले अलास्का आणि जपानजवळचे हवाई ही राज्ये भौगोलिक दृष्ट्या सलग नाहीत. याशिवाय १६ प्रांत असून त्यापैकी  ११ प्रांतात मानवाची वसतीच नाही.
बडी राज्ये -  कॅलिफोर्नियात १२ टक्के लोकसंख्या व हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटव्हज (जणू आपली लोकसभा) मध्ये ५३ प्रतिनिधी आहेत. टेक्सासमध्ये ८.५ टक्के लोकसंख्या व हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हज मध्ये ३६ प्रतिनिधी आहेत. फ्लोरिडात ६ टक्के लोकसंख्या व हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हज मध्ये २७ प्रतिनिधी आहेत. न्यू याॅर्कमध्ये ६ टक्के लोकसंख्या व हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हज मध्ये २७ प्रतिनिधी आहेत. इलिनाॅइस व पेन्सिलव्हॅनियात प्रत्येकी ४ टक्के लोकसंख्या व हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हज मध्ये प्रत्येकी १८ प्रतिनिधी आहेत. 
 इतर ८ राज्यात २१ टक्के  लोकसंख्या व हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हज (जणू लोकसभा) मध्ये एकूण ९० प्रतिनिधी आहेत.
उरलेल्या ३६ राज्यात उरलेली लोकसंख्या राहते व त्यांचे हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हज मध्ये उरलेले प्रतिनिधी आहेत.
 हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हजमध्ये प्रतिनिधींची एकूण संख्या ४३५ आहे. थोडक्यात असे की, मोठ्या राज्यात जो बाजी मारेल तोच पक्षांतर्गत निवडणुकीत तसेच अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारणार हे उघड आहे. अटीतटीची लढाई झाल्यास गोष्ट वेगळी. हे सर्व आकडे ठोकळमानाचे असून विषय समजून घेण्यासाठी पुरेसे व पुरते आहेत.
अमेरिकेत सगळेच उपरे - बहुभाषिक, बहुवांषिक, बहुधार्मिक, बहुवर्णिक (गोरे, काळे, सावळे, लाल, पीत) लोकांची ही अमेरिका आहे. लालवर्णी(केसांचा रंग लाल असलेले वंशविच्छेद होऊन नामशेष झाले आहेत. किंवा संकरित स्वरुपातच अस्तित्त्वात आहेत. त्यामुळे आज सगळे उपरेच आहेत. जगाच्या कानाकोपऱ्यातून (मुख्यत: युरोपमधून) नशीब आजमावण्यासाठी आलेले किंवा आफ्रिकेतून गुलाम म्हणून एकेकाळी विकत घेतलेले किंवा जिंकून आणलेले. अब्राहम लिंकनने गुलामगिरी कायद्याने नष्ट केली व सर्व सुट्या व वेगळ्या वसाहतींना (राज्यांना) एका संघराज्यात बांधले खरे पण अजूनही काळ्यांच्या मनातील गुलामगिरीची सल पुरत्पणी गेलेली नाही की अनेक गोऱ्यांच्या मनातला स्वामित्त्वाचा तोरा पुरतेपणाने ओसरलेला नाही.  राज्ये एका छत्राखाली आली खरी पण आपली विशेषता व वेगळेपण कायम राखीत.  म्हणून युनायटेड स्टेट्स आॅफ अमेरिका हे संघराज्य (फेडरेशन) आहे. अमेरिकेला ‘मेल्टिंग पाॅट आॅफ आॅल कल्चर्स’ असे म्हटले  जाते खरे पण बिरबलाची ही खिचडी पुरतेपणी अजूनही शिजलेली नाही. पण लवकरच शिजेल, अशी आशा बाळगू या. काळे-गोरे, सनातनी-आधुनिक, उत्तरेकडचे-दक्षिणेकडचे यातला विसंवाद, मनोमालिन्य, मनभेद, संघर्ष अधून मधून डोके वर काढीत असतात. निवडणुकीसारख्या प्रसंगी तर ते अनेकदा उफाळून येत असतात.
कोण कुठे व किती? धर्मनिहाय किती?, वर्णनिहाय किती?- अमेरिकेत आफ्रिकन अमेरिकन लोकांची राज्यनिहाय टक्केवारी मिसिसीपी (३७), ल्युसियाना (३२), जाॅर्जिया (३१), मेरीलॅंड (३०), साऊथ कॅरोलीना(२८), अल्बामा(२६), नाॅर्थ कॅरोलीना (२१), डेलावेअर(२१) व्हर्जिनिया(२०) असून इतर राज्यात ती २० टक्यापेक्षा कमी आहे. हे लोक मतदानाच्या बाबतीत गोऱ्यांपेक्षा अधिक जागरूक असतात. अटीतटीचा संघर्ष या राज्यात निवडणूक काळात दिसून येतो. काळे गोरे यांचे वेगवेगळे  धृवीकरण होते. व्होट बॅंक्स निर्माण होतात. यातील बहुतेक राज्यात यावेळी डोनाल्ड ट्रंप हा श्वेतवर्चस्ववादी मानला जाणारा जास्त मते घेता झाला आहे. म्हणजे ज्या राज्यात काळे त्यातल्यात्यात जास्त आहेत, अशा बहुसंख्य राज्यात ट्रंप यांना बहुमताचा पाठिंबा मिळाला आहे. अशा परिस्थितीत तिथल्या काळ्यांच्या मनातली अस्वस्थता समजून घेतली पाहिजे. ट्रंप निवडून येताच ठिकठिकाणी जे उद्रेक उफाळले आहेत, त्यामागे ही अस्वस्थता आहे.  
 देशात काळे, गोरे, सावळे किती?- देशपातळीचा विचार केला तर अमेरिकेत ७२ टक्के गोरे, १३ टक्के काळे,  ९ टक्के संमिश्र व ५ टक्के एशियन व बाकी इतर आहेत. बरेच गोरे कट्टर सनतनी व अंधश्रद्ध आहेत. धर्मनिहाय पाहिले तर ख्रिश्चन ७६ टक्के, ख्रिश्चन नसलेले ४ टक्के,  कोणताही धर्म न मानणारे १५ टक्के, तर धर्मविषयक माहिती देण्यास नकार देणारे ५ टक्के लोक आहेत. प्रत्येकात विशेषत: ख्रिश्चनात १०/ १२ पोटभेद आहेत. यातही सनातन्यांची संख्या फार मोठी आहे.०.५ टक्के मुस्लिम, ०.५ टक्के बुद्ध (चिनी व जपानी) आणि हिंदूंसह इतर १.२ टक्के आहेत.
   कोणत्या धर्माचे किती?- संख्यानिहाय विचार केला तर  अमेरिकेत सर्वात जास्त ख्रिश्चन, दुसऱ्या क्रमांकावर ज्युडाइझमला मानणारे (२ टक्के), तिसऱ्या क्रमांकावर मुस्लिम(०.९ टक्के) व चौथ्या क्रमांकावर हिंदू व बौद्ध (प्रत्येकी ०.७ टक्के ) आहेत. बहुतेक हिंदू प्रगत विचाराचे असून हिंदूंची संख्या गेल्या दहा वर्षात ८५ टक्क्यांनी वाढली आहे. ७७ टक्के हिंदू पदवीधर आहेत. ३६ टक्के हिंदूंची गणना श्रीमंत व्यक्तींमध्ये ( वार्षिक उत्पन्न एक लक्ष डाॅलर) होते. इतर धर्मीयात हे प्रमाण १९ टक्के इतके आहे. हे सर्व मुद्दे निवडणुकीत वेळोवेळी आपला प्रभाव पाडतांना नेहमी दिसतात. यावेळीही हे दिसले आहेत. याचे कारण असे आहे की, दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांची बांधिलकी मानणाऱ्यांच्या संख्येत खूप फरक नसतो. त्यामुळे अल्संख्यांकांचे मतदान निवडणुकीचे पारडे फिरवू शकते. म्हणून त्यांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न होत असतात. याचे ठळक उदाहरण मोदींची स्तुती, हिंदूंची स्तुती, दिवाळीची रोषनाई, आरतीत सहभाग या रूपात पाहता येईल.  
अध्यक्षपदासाठीची पक्षांतर्गत चुरस (डेमोक्रॅट)
 डेमोक्रेटिक पक्षाचे एकूण ४७६३  डेलिगेट्‌स होते. अध्यक्षपदाची उमेदवारी मिळण्यासाठी यापैकी निम्मे म्हणज २३८२ डेलिगेट्‌स उमेदवाराच्या बाजूला वळणे मिळणे गरजेचे होते. हिलरी क्लिंटन यांना १७५६ डेलिगेट्सचा पाठिंबा मिळालेला होता. बर्नी सॅंडर्स यांनी हिलरींशी चांगली टक्कर दिली होती. त्यांना आपल्याकडे वळविण्यात हिलरी क्लिंटन यशस्वी झाल्या. पण समाजवादाकडे झुकलेल्या बर्नी सॅंडर्स यांचा चाहता तरूण व बुद्धिजीवी वर्ग  या तडजोडीमुळे अक्षरश: खवळला. त्याने निदर्शने केली, बर्नी सॅंडर्सचा निषेध केला. हे डेलिगेट्स/समर्थक रिपब्लिकन पक्षाकडे वळणे शक्यच नव्हते. बहुतेक वळले गॅरी जाॅनसन या लिबर्टेरियन उमेदवाराकडे किंवा ग्रीन पार्टीच्या उमेदवाराकडे. अटीतटीच्या लढतीत यांच्या मतांचा परिणाम डोनाल्ड ट्रंप  यांना झाला असणार. बर्नी संडर्स यांचा प्रभाव असलेल्या भागात हिलरी क्लिंटन यांना फायदा न झल्याचे वृत्त आहे. पाच/सहा ज्या अति चुरशीच्या लढती झाल्या आहेत, त्यात हे जाणवले. थोडक्यात काय की नेत्याने टोपी फिरवली की अनुयायी ‘मुकी बिचारी कुणीही हका’, असे अनुयायी व मतदार  आता राहिलेले नाहीत.  सर्व दिग्गज मात्र पाठीशी उभे राहिले पण त्यांचे अनुयायी उदासीन राहिले, 
   अध्यक्षपदासाठीची पक्षांतर्गत चुरस (रिपब्लिकन)
 रिपब्लिकन पक्षाचे एकूण २४७२ डेलिगेट्‌स होते. उमेदवारी मिळण्यासाठी यापैकी १२३७ डेलिगेट्‌स मिळणे गरजेचे होते. बेताल वक्तव्ये व अल्पसमज यासाठी प्रसिद्ध असलेल्या  डोनाल्ड ट्रंप  यांनी महिलांबद्दल अशीच बेताल व अपरिपक्वता दाखवणारी विधाने केल्यामुळे जनमतात नाराजी वाढली. विशेषत: महिलावर्ग तर त्यांच्याविरुद्ध खवळून उठला. यावर उतारा म्हणून त्यांच्या पत्नीने पतिपरायणतेचा परिचय देत बरीच सारवासारव केली व पतीचे गोडवेही गायले आहेत. पण त्याचा परिणाम झाला नाही. डोनाल्ड ट्रंप यांच्या विरुद्ध महिलांची निवेदने व आरोप येतच होते. रिपब्लिकन पक्षाचे दुसरे इच्छुक उमेदवार टेड क्रुझ व तिसरे उमेदवार जाॅन कसिच  यांना डोनाल्ड ट्रंप यांना अडसट्यात पकडून माघार घ्यावयास लावली एकाचा केनडींच्या हत्याऱ्याशी ( ओस्वाल्डशी) तर दुसऱ्याचा ज्यूद्वेष्ट्याशी बादरायण संबंध जोडून त्यांना डोनाल्ड ट्रंप  यांनी हतबल केले.  माजी राष्ट्राध्यक्ष जाॅर्ज बुश सकट बहुतेक पक्षांतर्गत दिग्गज विरोधात गेले, उदासीन राहिले, पाठ फिरवते झाले. उमेदवारी मागे घ्या, असा धोशा पक्षांतर्गत सुरू झाला. पण सामान्य मतदार व कार्यकर्त्यांनी डोनाल्ड ट्रंप यांना साथ दिली. त्यांनी नेत्यांचे ऐकले नाही. शेवटी डोनाल्ड ट्रंप यांना त्यांच्या वादग्रस्त विधाने, बेधडक मते, अफलातून धोरणे मिळत असलेला जनाधार पाहून बहुतेक सगळे दिग्गज  तर तंबूत परतलेच पण याच आधारावर डोनाल्ड ट्रंप यांनी ॲरिझोना(११मते) , नेवाडा (६मते), न्यू हॅम्पशायर (४ मते) पेन्सिलव्हॅनिया(२० मते), ओहायओ (१८ मते), फ्लोरिडा (२९ मते), टेक्सास (३८ मते), उत्तर कॅरोलिना (१५ मते), मिसुरी (१० मते), व्हिस्काॅन्सन (१० मते) या प्रांतात जबरदस्त मुसंडी मारली.
स्वत: सोबत डोनाल्ड ट्रंप यांनी सिनेट व हाऊससाठी उभ्या असलेल्या सदस्यांनाही जबरदस्त टेकू दिला. प्रारंभी ही मंडळी डोनाल्ड ट्रंप यापासून दूर राहणेच पसंत करीत होती, निरनिराळ्या सबबी सांगून एका व्यासपीठावर यायचे टाळत होती. पण हे लोक ट्रंप लाटेत तरले. काळ कधीकधी सूड घेतो तो असा.
Sent from my iPad

Sent from my iPad

No comments:

Post a Comment