Sunday, May 18, 2014

Indian Elections and NewYork Times


 न्यूयार्क टाईम्सच्या नजरेतून भारतातील निवडणुका  
वसंत गणेश काणे
(एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ नागपूर -४४० ०२२)
ह्ल्ली  मुक्काम - २२१५ लाईव्ह ओक लेन, यॉर्क ,पेनसिल्व्हनिया,अमेरिका        
Blog – kasa mee? (07122221689) 9422804430
‘न्यूयार्क टाईम्स’ हे अमेरिकेतीलच नव्हे तर संपूर्ण जगातील एक अत्यंत प्रतिष्ठाप्राप्त दैनिक आहे. भारतातील निवडणुकीबाबत लिहितांना हे वृत्तपत्र काय लिहिते, हा अर्थातच एक कुतुहलाचा विषय असणार, यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या बहुतेक काळात भारतात काँग्रेस पक्षच सत्तेवर होता. विरोधी पक्ष नेता श्री नरेंद्र मोदी यांच्या कडून निवडणुकीत सपशेल आपटी खाण्याची चिन्हे दिसू लागताच काँग्रेसने पराभव मान्य केला. ही नामुष्की काँग्रेसवर ओढवली याला कारणीभूत ठरली, देशाची ढासळलेली आर्थिक परिस्थिती आणि आर्थिक भ्रष्टाचाराची एकामागून एक उघड होणारी प्रकरणे!
खुद्द राहुल गांधी यांचे मताधिक्य घटले
जवळ जवळ ५५ कोटी लोकांनी या निवडणुकीत मतदान केले. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यातच पराभवाची चाहूल लागली आणि काँग्रेसने आपला पराभव  मान्य केला. भारतातील राजकीय घराण्याचे वारस श्री राहुल गांधी हेच काँग्रेसचे सर्वेसर्वा होते. आपल्या मतदारसंघात ते पूर्वीच्या तुलनेत फारच थोड्या मताधिक्याने निवडून आले. २००९ साली हे मताधिक्य जवळ जवळ तीन लक्ष इतके  होते.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर फलक प्रदर्शित करीत, ‘प्रियांकाला (राहुल गांधीची धाकटी बहीण)  आणा आणि काँग्रेसला वाचवा’, अशा घोषणा दिल्या ही श्री राहुल गांधींसाठी अतिशय नामुष्कीची बाब होती. प्रियांका गांधींचा ‘करिश्मा’ तिच्या ज्येष्ठ भावापेक्षा कितीतरी जास्त आहे, असे मानले जाते.
भाजपच्या विजयाची विशेषता
पराभवाची चिन्हे दिसू लागताच, ‘आम्ही जनतेचा जनादेश विनम्रपणे स्वीकारतो’, असे काँग्रेसने जाहीर केले. पहिल्या काही तासांच्या मतमोजणीनंतरच भारतीय जनता पार्टी हा ‘हिंदू राष्ट्रीय पक्ष’ २७२ पेक्षा म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त जागा जिंकणार हे स्पष्ट झाले. आणि आघाडीचे राजकारण आता संपणार हे स्पष्ट झाले. प्रादेशिक नेतृत्वाच्या सौदेबाजीचा त्रास नवीन सरकारला होणार  नाही, हेही स्पष्ट झाले. श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर त्यांचे चिरंजीव राजीव गांधी यांना जबरदस्त जनादेश (सहानुभूतीच्या लाटेमुळे) मिळाला होता. त्यानंतर प्रथमच एवढा मोठा जनादेश श्री मोदी यांना मिळाला आहे.  मतमोजणी अगोदरच चाहत्यांनी एक लक्ष लाडूंची र्डर          देऊन ठेवली होती. हा जनादेश ‘प्रागतिक आणि स्थिर सरकारच्या बाजूने आहे’, अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने नोंदविली आहे.
भारतीय समाजात फार मोठे स्थित्यंतर घडते आहे
ही निवडणूक अशा काळात आली आहे की, ज्या काळात भारतीय समाजामध्ये फार मोठे स्थित्यंतर घडून येत आहे. शहरीकरण आणि आर्थिक विकास यांचा परिणाम मतदान प्रक्रियेचे स्वरूपावर होत आहे. जुन्या निष्ठा आणि तत्वज्ञान यांचा मतदारांवरचा प्रभाव ओसरत चालला असून नवीन आयाम त्यांची जागा घेत आहेत. म्हणूनच एका सामान्य कुटुंबात जन्मलेला एक एक नेता आपल्या यापूर्वीच्या नेत्यांना आव्हान देऊ शकला.
मोदी हा तसा एक दुसरा प्रादेशिक नेता आहे की ज्याने पंतप्रधानपदावर आपला दावा सांगितला आहे. नोकरशाही आणि राजकीय क्षेत्रावर भरभक्कम पकड सतत तेरा वर्षे  असलेला नेता म्हणून त्यांचा लौकिक आहे. एक कडक आणि शिस्तप्रिय नेता म्हणून असलेली त्याची प्रतिमा मतदारांना अतिशय भावली. हाच नेता भ्रष्टाचाराला  आवर घालू शकेल, डबघाईला आलेल्या अर्थकारणाला सावरू शकेल आणि रोजगार निर्मितीला चालना देऊ शकेल, असे मतदारांना वाटले.
मोदी कसे आहेत?
आता अनेकांना २००२ च्या इतिहासाची पुनरावृत्ती तर होणार नाहीना, अशी भीती वाटते आहे. असे झालेच  तर मोदी कठोर पावले उचलतील. आजवर दिल्लीच्या शासनाभोवती आत्तापर्यंत उदारमतवादी आणि आंतरराष्ट्रीय भूमिकाधाराकांचे वेटोळे होते, यांना एक प्रभावी आणि केंद्रीभूत सत्ता असलेला नेता कसा मानवणार?
मोदी हा नेता अक्षरश: शून्यातून प्रगटला आहे. यामुळे परंपरागत नेतृत्वाला कसेसेच वाटते आहे. खरे तर सामाजिक अभिसरणाच्या दृष्टीने ही एक उपकारक गोष्ट म्हटली पाहिजे. सगळे सामाजिक वातावरण आता ढवळून निघणार आहे, असे अनेक मानतात.
गेल्या वर्षी मोदींची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाली, तेव्हा भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या २७२ जागा मिळतील, असे कोणालाही वाटले नव्हते.
नवीन तरुण मतदारांची मानसिकता
आपल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत काँग्रेस शासनाने जनकल्याणाच्या अनेक योजना अमलात आणल्या होत्या. भारतातील बहुसंख्य जनता आजही गरीब असून ती  खेड्यात राहते. खेडोपाडी प्रचार करण्याचे तंत्र काँग्रेसला चांगलेच अवगत आहे. याउलट भाजप हा शहरी व्यापाऱ्यांचा पक्ष मानला जातो. पण  मोदींना नव्याने नोंद झालेल्या १० कोटी मतदारांपैकी तरूण मतदारांचा भरघोस पाठिंबा मिळाला होता. यामुळे मतदानाचे यापूर्वीचे सगळे उच्चांक मोडले गेले आणि ६६.४ टक्के मतदानाची नोंद झाली.
या नवीन मतदारांवर गुजराथच्या २००२ च्या दंग्यांचा परिणाम नव्हता. अमेरिकेने मोदींना व्हिसा नाकारल्याच्या घटनेचाही त्यांच्यावर परिणाम होत नव्हता. नेहरू- गांधी घराण्याशी त्यांचे भावनिक बंध नव्हते. याउलट काँग्रेसचा हाच मुख्य आधार होता. तसेच या घराण्यातील दोघांच्या (इंदिरा गांधी आणि राजीव गांधी) बलिदानानेही त्यांचे मन हेलावून जात नव्हते. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर हे मतदार जन्माला आले होते. २००२ च्या दंगलींच्या आठवणी यांना अंधुकशाही आठवत नव्हत्या. त्यांना जाणवत होता पाच वर्षांचा कोणत्याही प्रकारच्या प्रशासनाचा अभाव! नोकरीच्या संधी प्रत्येक क्षेत्रात कमी झाल्याचा अनुभव! ज्यांनी ७ टक्क्याचा विकास दर पहिला होता, त्यांच्यासाठी ४.५ टक्क्याचा विकास दर म्हणजे मंदीचाच प्रकार होता. त्यातून आता काँग्रेस शासन सुकाणू विरहित झाले होते.  डॉ. मनमोहन सिंग हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ होते होते, हे खरे. पण त्यांची बोलती बंद होती. अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हाताखाली पंतप्रधान काम करीत असतात, असे भासत असे. सोनिया गांधी यांचे सर्व लक्ष आपला पुत्र राहुल याला पंतप्रधानपदी बसविण्यावर केंद्रित झाले होते. हा प्रकार नवीन मतदार पाहत होते.
उशीराने सुचलेले शहाणपण कामी आले नाही

दिल्लीचे सामूहिक बलात्कार प्रकरण,भ्रष्टाचार आदी बाबी काँग्रेस शासनाने नीट हाताळल्या नव्हत्या. राहुल गांधींच्या प्रचाराचा परिणाम होतांना दिसत नव्हता.त्यामुळे  ऐन वेळी प्रियंका गांधींना प्रचारात उतरवावे लागले. प्रियंका गांधीं यांनी आपले लक्ष अमेठी आणि रायबरेलीपुरते मर्यादित ठेवले. यापेक्षा जास्त प्रचारासाठी त्यांना उतरवणे शक्य नव्हते. तसेच आता खूप उशीरही झाला होता. निवडणुकीतील हा विजय मोदींचा विजय जसा आहे तसाच तो त्यांच्या विरोधकांच्या दुबळेपणाचाही परिणाम आहे.         

No comments:

Post a Comment