Monday, June 26, 2017

हट्ट एका पट्टराणीचा !


हट्ट एका पट्टराणीचा !
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?

कुठल्याही घरी राणीचेच राज्य असते. मग ती राणी घरची असो वा एखाद्या राजाची. त्यातून ती राणी असंख्य राण्यांमधली पट्टराणी असेल तर तिचा महिमा काय वर्णावा? हे वर्णन सुरस अरबी कथांमधले नाही. ते आहे जगाच्या राजकीय सारीपटावर महत्त्वाची भूमिका वठवणाऱ्या अति श्रीमंत, स्वर्गवैभवसंपन्न, अति विस्तीर्ण अशा सौदी अरेबियाच्या राजवंशातील अल बिन सौद या महापराक्रमी राज्याच्या पट्टराणीचे. तिचे पूर्ण नाव होते, हसा बिंट अहमद अल सुदइरी. पण ती सुदइरी या लघुनामानेच ओळखली जाते.
पूर्वेतिहास - अरेबियन द्विपकल्पातील फार मोठ्या भूभागावर जवळजवळ २५० वर्षे अल सौद घराण्याचे नियंत्रण होते. ही घराणेशाही ‘वारस कोण’ या खडकावर दोनदा आपटून कोसळली. पुढे १८९० मध्ये अल रशीदने सौदीने अरेबियावर आपली पकड बसविली. या घराण्यातील, अमीर अब्दुलअझीझ बिन अब्दुल रहमान, या कर्तृत्वशाली पुरुषाने रियाझ हे राजधानीचे शहर जिंकून साम्राज्यावर आपली पकड आणखी पक्की केली. तो अल बिन सौद म्हणून ओळखला जाऊ लागला. अशाप्रकारे अस्थिरतेला विराम मिळून सौदी अरेबियात एक स्थायी साम्राज्य १९३२ मध्ये कायम झाले.
राज्यावरील पकड पक्की करण्याचा अभिनव मार्ग - अल बिन सौदने आपली पकड पक्की करण्यासाठी एक अभिनव मार्ग स्वीकारला. टोळ्यांचा प्रदेश म्हणून सौदी अरेबिया ओळखला जातो. प्रत्येक प्रभावी टोळीतील स्त्री बरोबर तो विवाह करीत असे (साॅरी निकाह लावीत असे). असे असंख्य (२०?) निकाह त्याने लावले. जावईपणामुळे टोळ्यांशी असलेले शत्रुत्व संपले व तो बलवान झाला. त्याला मोजून शंभर मुले होती , त्यात ६० मुलगे व ४० मुली होत्या. असा हा सर्वप्रकारे महापराक्रमी असलेला सम्राट १९३२ ते १९५३ पर्यंत निरंकुशपणे सत्ता, संपत्ती व स्त्रीसुख यांचा आस्वाद घेऊन १९५३ मध्ये अल्लाघरी गेला.
आठ पिढ्यांचे राजवैभव - १९३२ मध्ये स्थापन झालेले हे राजघराणे तब्बल आठ पिढ्या राजवैभवाचा आस्वाद घेत आहे. त्या काळातील (मध्यपूर्वेतील म्हणा किंवा इस्लामी म्हणा) प्रथा, परंपरा पाहता पुत्रपौत्रादींची संख्या व अन्य सर्व घटनाक्रमात आश्चर्य, अयोग्य, वावगे व आक्षेपार्ह वाटावे, असे फारसे काही नाही. नवल आहे ते वेगळेच आहे. पित्यानंतर पुत्राने गादीवर यावे, हा संकेत /नियम या घराण्याने बाजूला सारला. ज्येष्ठताक्रमाने एकानंतर एक असे सात सख्खे भाऊ सत्तेवर आले. राजेपद सामान्यत: पित्याकडून पुत्राकडे, नंतर नातवाकडे जाते/ जावयास हवे असे आपले मत असेल तर सौदी अरेबियात तसे झाले नाही. का? कारण स्त्रीहट्ट!!   तोही पट्टराणीचा.  हट्ट एका पट्टराणीचा, त्यामुळे तो पुरवणे भागच होते.
सुदइरीच्या हट्टाचा अभूतपूर्व परिणाम - १९३२ साली स्थापन झालेला  सौदीतील राजवंश आणखी १३ वर्षांनी एक शतक पूर्ण करील. पण या काळात सत्ता एका भावाकडून दुसऱ्या भावाकडेच गेली, मुलाकडे नाही. सात भाऊ असल्यामुळे असे सातवेळा घडले. याचे कारण सौदीचा संस्थापक महंमद बिन इब्न सौद याने आपल्या पट्टराणीस दिलेले वचन. तिचा पुरविलेला हट्ट. या संस्थापक अबदुल्ला झिझबिन सौद यांचा कुटुंब कबिला फार मोठा होता. आज या कुटुंबातील सदस्य संख्या (२०) वीस हजार आहे, यावरून राण्यांच्या  संख्येचा अंदाज बांधता येईल. पण शेवटी पट्टराणी ती पट्टराणीच, नाहीका? तिचं नाव होतं, हसा बिंट अहमद अल सुदइरी. ही बेगम अबदुल्ला झिझबिन सौद त्यांची अत्यंत आवडती बेगम होती. त्या बेगमेचाही राजे सौद यांच्या वर चांगलाच प्रभाव होता. राजे तिच्या अगदी मुठीत असायचे. त्यामुळे तिने राजाकडून वचन घेतले नसते तरच नवल झाले असते. माझ्या पुत्रसंततीकडेच पुढचे राजेपद जाईल, हे ते वचन.  राजानेही वचन दिले. वचन पट्टराणीला नाही द्यायचे तर द्यायचे कुणाला?
सदइरी सेव्हन - पण या बेगम सुदइरी यांना राजे सौद यांच्यापासून एक नाही दोन नाही तर चांगले सात पुत्र झाले. त्यामुळे हे सातही एकानंतर एक अशा क्रमाने व ओळीने राजे झाले. इतिहास यांना सुदइरी सेव्हन (सात सुदइरी) या नावाने ओळखतो. या सर्वांची नावानिशी नोंद घेणे इतिहासाला भाग असले तरी आपण ते कष्ट का घ्यायचे? या अभिनव घराणेशाहीचा जगाच्या इतिहासाव र परिणाम झाला म्हणून. विद्यमान राजे सलमान बिन अब्दुलअझिझ अल सौद हे यातील शेवटचे बेगम सुदइरीपुत्र. तेव्हा त्यांच्याबरोबर सुदइरीपुत्रांची मालिका संपणार आहे. आता प्रथमच सौदीची सूत्रे पुढील पिढीच्या हाती जातील.  म्हणून सुरवातीला आपणही या सात बांधवांची नोंद घेऊनच पुढे जाऊ.
सप्त राजश्री -
अब्दुलअझीझ- १९३२ ते १९५३  या काळात अब्दुलअझीझने  सौदी अरेबियावर निरंकुश राज्य केले.
अल बिन सौद- १९५३ ते १९६४ अल बिन सौदने राज्य केले. तो सतत तणावात असायचा.त्याला फैजलने त्याच्या भावाने पदच्युत केले.
फैजल- १९६४ ते १९७५ फैजलने अशी ११ वर्षे राज्य केले. याने आर्थक सुधारणा घडवून आणल्या.याने सौदीला आधुनिक बनविण्याचा प्रयत्न केला.
खालिद- १९७५ ते १९८२ या काळात खालिद (दुसरा) याचे सौदीवर राज्य होते. याच्या कारकीर्दीत सौदी अरेबियाचा खूप विकास झाला.
फद- १९८२ ते २००५ याकाळात फद याने राज्य केले. राजा म्हणून याची कारकीर्द फारसे काम केलेले आढळत नाही. पण राजपुत्र म्हणून त्याने पुष्कळ रचनात्मक कामे केली.
अब्दुल्ला- २००५ ते २०१५ याकाळात अब्दुल्ला याने राज्य केले. याने दोन मशिदी बांधल्या.
सलमान- २०१५ हे आजतागायत राज्य करीत आहेत.
पेचप्रसंग - १९३२ ते २०१५ या काळात सौदी अरेबियात अनेक घडामोडी झाल्या. पेचप्रसंग निर्माण झाले. बंड-बंडाळ्या; पेच- डावपेच; कारस्थाने- प्रतिशोध; मैत्री - फाटाफूट असे इतिहासाला परिचित असलेले सर्व प्रकार होत राहिले. पण कुणीही कितीही सनातनी, कर्मठ, कडवा, क्रूर राहतो म्हटले तरी उत्क्रांती आपला प्रभाव, परिणाम घडवतेच घडवते. त्याची नोंद रंजक, बोधप्रद व आशादायी आहे. तेवढीच नोंद आपण घेऊया.
मुलगी वारस म्हणून चालणार नाही - अल बिन सौदला तुर्की नावाचा मुलगा होता, म्हणजे गादीला वारस होता. पण दुर्दैव असे की, तो १९१९ च्या सुमारास न्युमोनियाने मरण पावला. त्याची बायको गर्भार होती पण तिच्या पोटी मुलगाच जन्माला येईल, याचा काय नेम? अशा परिस्थितीत एकतर भाऊ महंमद बिन अब्दुल-रहमान गादीवर येईल किंवा त्याचा दुसरा मुलगा सौद हा तरी गादीवर येईल. अल बिन सौदने हा प्रश्न तसाच अिर्नणित राहू दिला. पण भाऊ महंमद बिन अब्दुल-रहमान स्वस्थ बसणारा नव्हता. त्याचा मुलगा खालिद किंवा सौद यापैकी यापैकी वारस कोण, तो निर्णय करा, असा तगादा त्याने अल बिन सौदच्या मागे लावला. शेवटी अल बिन सौद ने आपला दुसरा मुलगा सौद याला युवराज म्हणून जाहीर केले.
इस्लामी राजवटीतील वादाचे स्वरूप - राज्यावर हक्क कुणाचा? राजाच्या पुत्राचा? की राजाच्या कुटुंब कबिल्यातील ज्येष्ठ नवागताचा? मग तो राजपुत्र असेल किंवा नसेलही? अकरा वर्षे राजा सौद व युवराज ठरलेला बंधू फैजल यामध्ये वाद सुरू होता. सौद नंतर कोण? फैजल की राजाचा (सौदचा) पुत्र? वारसा पद्धत (ॲग्नाटिक सिनीआॅरिटी)) की कुटुंबातील पहिले मूल म्हणून प्राप्त झालेले ज्येष्ठत्व (ॲग्नाटिक प्रायमोजेनिचर) ? सौदने पहिली पद्धत स्वीकारून आपल्या ज्येष्ठ मुलाला वारस नेमले. सर्व राज घराणे या विरुद्ध पेटून उठले. राजपुत्र महमदने बंड करून राजाला पदच्युत केले व खून केला. फैजलने खून होऊन पदच्युत होण्यापूर्वी १९६४ ते १९७५ अशी ११ वर्षे राज्य केले.
घराण्याची विशेषता मोडीत काढणारा अब्दुल्ला - यथावकाश बांधवातील ज्येष्ठताक्रमाने अब्दुल्ला सत्तेवर आला. घोड्यावरून रपेट आणि शिकार हे छंद असलेल्या अब्दुल्लांची अंगकाठी धिप्पाड आणि धष्टपुष्ट होती. खनिज तेलामुळे गडगंज संपत्ती पायाशी लोळण घेत असतांना देखील अब्दुल्ला याला संपत्तीचा मोह नव्हता. २००५ मध्ये अब्दुलालाचे राज्यारोहण झाले. त्यांच्या राजवटीत बुरख्याचा काळा रंग जाऊन रंगीबेरंगी बुरख्यांची चाल 'फॅशन' म्हणून प्रतिष्ठा पावली. संगिताचे सूर देशात प्रथमच टी व्ही व रेडिओ वरून ऐकू येऊ लागले. महिलांना लेखनस्वातंत्र्य मिळाले आणि लेखिकांचा स्वतंत्र वर्ग तयार झाला. शाळा, महाविद्यालयात सहशिक्षण सुरू झाले. या बदलाला होणारा कट्टर धर्ममार्तंडांचा विरोध अब्दुल्लांनी मोडून काढला.
  चतुर अब्दुल्ला - इस्लामी जगतातील ही घडामोड अनेक कारणांमुळे महत्त्वाची आहे. एक असे की, सौदी अरेबिया हा जगातला पहिल्या क्रमांकाचा खनिज तेल निर्यात करणारा देश आहे. दुसरे असे की, या देशात इस्लामचे सर्वात मोठे धार्मिक केंद्र आहे. महत्त्वाची धार्मिक स्थळे या देशात आहेत. या देशाच्या या राजाचे एक वैशिष्ट्य असे होते की, हा सुधारणावादी होता. अर्थात प्रत्येक वेळी तो जपून पाऊल टाकीत असे. कट्टरवादी घटक बिथरू नयेत, याची तो आपल्या परीने काळजी घेत असे. असे असले तरी त्याच्याविरुद्ध कटकारस्थाने बरीच झाली. ही कारस्थाने करणारे लोक दोन प्रकारचे  होते. एक याला पदच्युत करून सत्ता हस्तगत करण्याची इच्छा असणारे आणि दुसरे सध्या जगभर हैदोस घालणारे अतिरेकी. अब्दुल्ला सुन्नी आणि अतिरेकी सुद्धा सुन्नीच. तरीही हे एकाच धर्मातील धर्मयुद्ध का? कारण अब्दुल्ला पाखंडी होता. धर्माविरुद्ध कृती करीत होता. सुन्नी विरुद्ध सुन्नी हा मुद्दा जागतिक अतिरेकी कारवायांना पायबंद घालण्याच्या प्रयत्नात मोठीच भूमिका बजावू शकेल, असे काही अभ्यासकांचे मत आहे. पण या प्रकाराला फारसे महत्व देऊ नये, असेच इतर मानतात.
सुधारणावादी अब्दुल्ला - अब्दुल्लाने विद्यापीठस्तरावर सहशिक्षण सुरू केले होते. याबाबत कट्टर सनातन्यांनी खूप ओरड केली. हे केवळ पापच ( सिन) नाही तर हा दुष्टावा (इव्हिल) आहे, असे म्हणत जगभरातले कट्टर सनातनी संतापले. इस्लामधर्मीय अगोदरच सनातनी, त्यातही सुन्नी संप्रदायाचे अनुयायी आणखी सनातनी! या शिवाय सौदी अरेबिया मधील इस्लामधर्मीय आणखीनच सनातनी!! इस्लामची अति पवित्र धर्मस्थाने सौदी अरेबियात आहेत. तिथे सहशिक्षण देणारे विद्यापीठ स्थापन व्हावे यापेक्षा आणखी मोठा धार्मिक भ्रष्टाचार तो कोणता?
 मिशेल ओबामांनी डोक्यावरून पदर का घेला नाही? - अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशिल हे सौदी अरेबियात दुखवटा व्यक्त करण्यासाठी गेले असतांना मिशेल ओबामा यांनी 'डोक्यावर पदर' घेऊन ते झाकले नाही म्हणून मोठा गहबज झाला होता. यावरून रूढी/परंपरा/कर्मकांड यांचे जोखड झुगारून देणे किती कठीण असते, हे लक्षात यावे. पण परिवर्तन हा युगाचा धर्मच आहे. त्यातून इस्लामही सुटला नाही/ किंवा सुटणार नाही.
सुन्नी विरुद्ध सुन्नी असे का? - सगळे कट्टर दहशतवादी आणि इसीसची सेना इराक जिंकल्यानंतर नंतर सौदी अरेबियाकडे वळणार, हे जाणून/हेरून अब्दुल्लाने या दोन्ही कट्टरपंथीयांविरुद्ध अमेरिकेने सुरू केलेल्या मोहिमेला सक्रीय पाठिंबा दिला होता. हे दोन्ही (इसीस आणि सौदी अरेबिया) घटक सुन्नी पंथीय असूनसुद्धा एकमेकाविरुद्ध का लढत आहेत, ते सहज लक्षात येत नाही, ते यामुळेच. इस्लामच्या पवित्र धर्मग्रंथात जे सांगितले आहे तेच सत्य आहे, तसेच ते अपरिवर्तनीय आहे, असे कट्टर दहशतवादी कितीही म्हणत असले तरी परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. परिवर्तनाची गती कमी करता येईल एकवेळ. पण ती पूर्णपणे थांबवू शकतील असे कट्टरपंथीय अजून जन्माला यायचे आहेत. ते बहुदा कधीच जन्माला येणार नाहीत. पण आजही कट्टर पंथीय जो हैदोस घालीत आहेत, तोही काही कमी नाही.
सलमानही चतुर - अब्दुल्लाच्या निधनानंतर सलमान यांची सत्ता सुरू झाली.. सलमान राजनीतिज्ञ मानले जातात. राजघराण्यात एकी कायम रहावी यासाठी त्यांची धडपड असते. सर्वच्या सर्व म्हणजे २० (वीस) हजार कुटुंबियांना शासन व्यवस्थेत कोणते ना कोणते पद या पूर्वीच दिलेले आहे, असे म्हणतात. इसीसवर हल्ले चढवण्याचे कामी अब्दुल्लाप्रमाणे सलमानही अमेरिकेसोबत सहभागी झाले होते. पण पक्षाघाताने त्यांचा डावा हात कमजोर झाला आहे. त्यांनी पुतण्याला वारसदार म्हणून घोषित केले. अशाप्रकारे सात भावांची कथा सुफळ संपूर्ण झाली. एका पट्टराणीचा हट्ट पूर्णत्वाला पोचला.
पट्टराणीच्या हट्टाची पूर्तता पण राजहट्टाचा प्रारंभ - एक कथा संपली आणि दुसरी सुरू झाली. आजमितीला सलमान हे सौदी अरेबियाचे राजे आहेत. सौदी अरेबियामध्ये इसीस पेक्षाही भयंकर संघटना आता प्रभावी ठरणार अशी चिन्हे आहेत. या कट्टरपंथीय इस्लामी संघटनेचे नाव आहे, हिब्ज- उत- तहरीर ( एच यु टी ). इसीस ही तशी अडदांड संघटना आहे. तर हिब्ज- उत - तहरीर ही संघटना अधिक जहाल असली तरी हुशार आणि चाणाक्ष आहे. ती इसीसप्रमाणे धसमुसळेपणा करीत नाही. ही पाकिस्थान आणि बांग्लादेश यात पसरत आहे. हिचे सदस्य इसीसपेक्षा संख्येने कितीतरी जास्त आहेत, एवढेच नव्हे तर ते रासायनिक आणि जैविक शस्त्रास्त्रे वापरण्यात तरबेज आहेत. भारतासाठी हा धोक्याचा इशारा आहे.
उत्तराधिकारी नेमण्याची प्रथा बदलणार - सौदी अरेबियात राजा आपला उत्तराधिकारी ( क्राऊन प्रिन्स) नियुक्त करतो. सलमान यांचे वय सध्या ८१ वर्षांचे आहे. पूर्वी त्यांनी आपला पुतण्या महम्मद बिन नाईफ याला उत्तराधिकारी म्हणून जाहीर केले होते. पण नाईफ बाबातचा निर्णय बदलून त्यांनी आपला पुत्र महम्मद बिन सलमान याची नियुक्ती केली आहे. (सलमान यांच्या मुलाचे नाव सलमानच आहे). म्हणजे आपल्या मुलालाच त्यांनी उत्तराधिकारी नियुक्त केले आहे. वास्तवीक पुतण्याची योग्यता पुत्रापेक्षा जास्त होती. आतापर्यंत सौदीतील सर्व सत्तांतरे ही भावाभावांमध्येच झाली. यापुढे बापानंतर मुलगा ही पद्धत सुरू होणार.  कुटुंबातील पहिले मूल म्हणून प्राप्त झालेले ज्येष्ठत्व (ॲग्नाटिक प्रायमोजेनिचर) नाही, तर सगोत्र वारसा पद्धती (ॲग्नाटिक सिनीआॅरिटी)) सुरू होणार, असे दिसते. कुणी म्हणेल, होईना का. आपल्यास काय त्याचे? मुलगा की पुतण्या या वादाचे पडसाद त्या त्या कुटुंबाच्या प्रभाव क्षेत्रात दिसतील. परंतु सौदी अरेबियाचे प्रभाव क्षेत्र हे या जगातील फार मोठे प्रभावक्षेत्र आहे. मुख्य म्हणजे जगात उपलब्ध खनिज तेलातील एकतृतीयांशपेक्षा अधिक वाटा हा त्या एकाच देशातून येत असल्याने त्या देशातील या कौटुंबिक उलथापालथीचे परिणाम संपूर्ण जगास सहन करावे लागणार आहेत. म्हणून त्यांची दखल घेणे आपल्यासाठीही आवश्यक ठरते. म्हणून वयोवृद्ध राजे सलमान यांचे त्याच नावाचे चिरंजीव सलमान यांच्या भावी काळातील लीलांकडे भारताला डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावे लागणार आहे, हे नक्की.

Saturday, June 24, 2017

अमेरिकेतील हिंदू

अमेरिकेतील हिंदू
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२  
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०    
E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?
अमेरिकेत हिंदू धार्मिक अल्पसंख्यांक आहेत, हे सांगण्याची आवश्यकता नाही. त्यांची संख्या २०१४ मध्ये ०.७ टक्के इतकीच होती. पण २०१५ मध्ये ती ०.८ टक्के झाली होती. एक वर्षात ०.१ टक्के वाढ ही कमी नाही. याचा अर्थ असा की हिंदूंची अमेरिकेतील संख्या वेगाने वाढली. संख्येच्या भाषेत सांगायचे तर ती एक मियीयनने ( दहा लक्षाने) वाढली आहे.
आले कुठून कुठून? - अमेरिकेतील हिंदू स्थलांतरित आहेत, हेही सांगायला नको. पण ते सगळे भारतातूनच तिथे गेलेले आहेत, अशी जर आपली कल्पना असेल, तर तसे नाही. जवळजवळ बावीस देशातून ते तिथे येऊन स्थायिक झालेले आहेत. अर्थात सर्वात जास्त संख्या भारतातून आलेल्यांचीच असणार, हे स्पष्ट आहे. पण नेपाळ, श्रीलंका, बांग्लादेश, भूतान, मालदीव, अफगाणिस्थान, पाकिस्थान, म्यानमार, इंडोनेशिया यासारख्या आशियन खंडातील देशातून, तसेच आफ्रिकेतूनही हिंदू अमेरिकेत येऊन स्थायिक झाले आहेत.
१९६५ चा हार्ट- सेलर ॲक्ट - एकोणिसाव्या शतकापर्यंत अनेक हिंदू अमेरिकेत कामानिमित्त तेवढ्यापुरते येऊन राहत व परत जात. त्याकाळी स्थायिक हिंदूंचे प्रमाण अमेरिकेत खूपच कमी होते. १९६५ मध्ये अमेरिकेत इमिग्रेशन ॲंड नॅशनल सर्व्हिसेस ॲक्ट ( आयएन एस) पारित झाला आणि हिंदूंच्या अमेरिकेत येऊन स्थायिक होण्याच्या संख्येत वेगाने वाढ होऊ लागली. 
 हा कायदा हार्ट- सेलर ॲक्ट या नावानेही ओळखला जातो. हा कायदा पारित होईपर्यंत अस्तित्त्वात असलेल्या १९२१ च्या इमर्जन्सी कोटा ॲक्टनुसार काही विशिष्ट संख्येतच इतरांना प्रवेश देण्याचे धोरण अमेरिकेत कार्यवाहीत होते पण इमॅल्युअर सेलर व फिलिप हार्ट या अनुक्रमे न्यूयाॅर्क व मिशिगन च्या प्रतिनिधींनी अनुक्रमे सूचित व अनुमोदित केलेले कायद्याचे प्रारूप १९६५ साली कायद्याचे रूप घेते झाले व परिस्थितीत बदल झाला.
कायद्याचा तपशील - या कायद्याने दरवर्षी अमेरिकेत १ लक्ष ७० हजार ही स्थलांतरितांसाठीची संख्या निर्धारित करण्यात आली. देशागणिक किती लोकांना प्रवेश द्यायचा तेही ठरविण्यात आले. स्थलांतरित होऊ इच्छिणाऱ्याचे कौशल्य व अमेरिकेत पूर्वीच येऊन स्थायिक झालेल्यांशी असलेला नातेसंबंध यावर भर असावा, अशीही तरतूद करण्यात आली.
अमेरिकन हिंदूंची विशेषता - आज हिंदू- अमेरिकन इतर सर्व धर्मियात गुणवत्तेत अव्वल आहेत. याचे श्रेय अर्थातच प्रवेश देतांनाच गुणवत्तेला प्राधान्य देण्याच्या धोरणाला आहे, हे उघड आहे. याचा दुसरा एक अर्थ असाही होतो की प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या इतरांमधील गुणवत्ताधारकांच्या तुलनेत हिंदूंमधील गुणवत्ताधारकांची जास्त असते. कदाचित याचाच एक परिणाम असाही असावा की, अनेक हिंदू संकल्पना अमेरिकन जनमानसात परिचित व अनेकदा स्वीकार्य ठरल्या असाव्यात. कर्मसिद्धांत, पुनर्जन्म (रिइनकार्नेशन) व योग या केवळ संकल्पनाच अमेरिकेत परिचित आहेत असे नाही तर हे शब्दसुद्धा अमेरिकेत माहीत आहेत. आजमितीला २४ टक्के अमेरिकन पुनर्जन्म मानू लागले आहेत. पुनर्जन्माची संकल्पना ही हिंदू संकल्पनांमधील एक मध्यवर्ती (कोअर) संकल्पना आहे, हे लक्षात घेतले म्हणजे याचे महत्व लक्षात येईल.
 हिंदूंमध्ये घटस्फोटाचे प्रमाण सर्वात कमी आहे. शिक्षणाचे बाबतीत हिंदू इतरांच्या तुलनेत वरचढ आहेत. अमेरिकन-हिंदूपैकी ४८ टक्के पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत. तेवढ्याच हिंदूंचे वार्षिक उत्पन्न  १ लक्ष डाॅलर किंवा त्यापेक्षा जास्त आहे. ७० टक्के अमेरिकन-हिंदूंचे वार्षिक उत्पन्न ७५ हजार डाॅलरपेक्षा जास्त आहे.
पहिली भारतीय महिला - १८८३ मध्ये पहिल्या हिंदू स्त्रीने शिक्षणासाठी अमेरिकन भूमीवर पदार्पण केले. ती महाराष्ट्रीयन होती. तिचे नाव आहे आनंदी गोपाळ जोशी. वयाच्या १९ व्या वर्षी तिने अमेरिकेतील पेन्सिलव्हॅनिया प्रांतातील विमेन्स मेडिकल काॅलेजमध्ये प्रवेश घेऊन ११ मार्च १८८६ ला एम डीची पदवी संपादन केली होती. १८८६ मध्ये ती भारतात परत आली व कोल्हापूरला वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करू लागली. पण दुर्दैवाने काही महिन्यातच तिचे क्षयरोगाने निधन झाले. 
 १८९३ मध्ये स्वामी विवेकानंद यांचे शिकागो येथे जगविख्यात भाषण झाले. ते दोन वर्षे अमेरिकेत होते. या काळात अमेरिकेत त्यांची ठिकठिकाणी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी भाषणे झाली होती. १९०२ साली स्वामी रामतीर्थांनी अमेरिकेला भेट दिली होती. आपल्या दोन वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी वेदांतावर भाषणे दिली होती. १९२० साली परमहंस योगानंद यांनी इंटरनॅशनल काॅंग्रेस आॅफ रिलीजिअस लिबरल्समध्ये बोस्टनला भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
१९६५ पूर्वी अमेरिकेत हिंदू फारसे जात नसत. त्यांची संख्या जेमतेम ५० हजार असेल तर असेल. हे बहुदा शीख असत. पण ते हिंदू म्हणूनच गणले जात.
अमेरिकेतील हिंदूविरोध - ४ सप्टेंबर १९०७ ला बेलिंगहॅम, वाॅशिंगटन येथे दंगे झाले. सुमारे ५०० गोऱ्यांनी हिंदूंच्या (शिखांच्या) घरांवर हल्ला केला. चिजवस्तू लुटून नेल्या. हे दंगेखार एशियाटिक एक्सक्ल्युजन लीगचे सदस्य होते. हिंदूंना अमेरिकेतून हकलून द्यावे कारण अमेरिका हा गोऱ्यांचा देश आहे, या मताची ही संघटना होती. अधिकाऱ्यांनी याकडे नुसताच कानाडोळा केला नाही तर सर्वांना संरक्षण देण्याच्या मिशाने एका हाॅलमध्ये कोंडून ठेवले. सहा जखमींना दवाखान्यात हलवावे लागले. सुदैवाने कोणीही मृत्युमुखी पडला नाही. एकाही दंगेखोरावर खटला भरण्यात आला नाही. मग शिक्षा होणे तर दूरच राहिले. ४०० हिंदूंना (शीख) बेलिंगहॅम जेलमध्ये संरक्षण करण्याच्या मिशाने डांबण्यात आले. असे दंगे इतर ठिकाणीही झाले.
शंभर वर्षानंतर त्या त्या ठिकाणच्या मेयरांनी २०१७ साली याबद्दल खेद व्यक्त केला व त्यांनी  ४ सप्टेंबर २००७ हा डे आॅफ हीलिंग ॲंड रिकनसिलिएशन घोषित करून दु:ख व पश्चा:ताप व्यक्त करून प्राय:चित्त घेतले.
अमेरिका फक्त गोऱ्यांसाठी-  १९२३ मध्ये युनायटेड स्टेट्स विरुद्ध तिसरा भगतसिंग प्रकरणी ते आणि अन्य आशियायी व्यक्ती स्वतंत्र गोरे लोक नाहीत आणि १७९० च्या कायद्यानुसार फक्त गोरे लोकच अमेरिकेचे नागरिक होऊ शकतात. १९२४ च्या कायद्यानुसार आशियायी, मध्यपूर्व आणि भारतीय यांना अमेरिकेत आश्रय मिळू शकणार नाही. हिंदूंना तर नाहीच नाही. अशा परिस्थितीत सुद्धा काही व्यावसायिक अमेरिकेत राहिलेच व त्यांनी आपला व्यवसायही केला. पण त्या वास्तव्याला कायद्याचे समर्थन नव्हते.  १९६५ साली इमिग्रेशन ॲंड नॅशनल सर्व्हिसेस (आयएनएस) ॲक्ट पारित होईपर्यंत ही स्थिती कायम राहिली. ॲक्ट पारित झाल्यानंतर मात्र हिंदू स्थलांतरित अमेरिकेत आपला कुटुंब कबिला घेऊनही राहू लागले. तेव्हापासूनच हिंदू धर्मगुरू सुद्धा अमेरिकन लोकांना हिंदू धर्माबाबत माहिती देऊ शकले. हिंदू धर्माशी अमेरिकेचा रीतसर परिचय व्हायला या वेळेपासून प्रारंभ झाला असे म्हणता येईल.
हिंदू विचारवंतांचा प्रभाव - पण या अगोदर १९६० च्या आसपास हिंदू विचारवंत आणि अमेरिकन यांच्यात सांस्कृतिक स्तरावर संपर्क होऊ लागला होता.स्वामी प्रभुपद यांच्या इंटरनॅशनल सोसायटी फाॅर कृष्णा काॅन्शसनेस - आयएससीओएन- इस्काॅन- या नावाच्या नव-हिंदू चळवळीने अमेरिकेत मूळ धरले होते. रिचर्ड अलपर्ट, जाॅर्ज हॅरिसन आणि अलेन गिन्सबर्ग यांच्या प्रभावा आणि प्रयत्नामुळे अमेरिकेत हिंदूधर्माचा प्रसार व्हायला सुरवात झाली होती. एवढेच नव्हे तर रिचर्ड अलपर्ट यांनी हाॅवर्ड विद्यापीठात रिचर्ड अलपर्ट नोकरीही केली. पण ते हिंदू धर्माची माहिती देतात हे उघड झाल्यानंतर त्यांची हकालपट्टी करण्यात आली. या सर्व प्रकरणी त्यांना अमेरिकेत भरपूर प्रसिद्धी मिळाली. पुढे हे रिचर्ड अलपर्ट भारतात आले आणि त्यांनी नीम करोली बाबा यांचे मार्गदर्शन घेतले. त्यांनी रामाचा दास या अर्थाचे सूचन करणारे राम दास हे नाव धारण केले व ते अमेरिकेत एक हिंदू शिक्षक या नात्याने परत आले.
हरे कृष्ण -  त्यांचा एक शिष्य जेफ्री कॅगल स्वत:ला हिंदूधर्माच्या प्रचाराला वाहून घेतले अनेक मंत्र, ऋच्या यांच्या सीडीज तयार केल्या व अमेरिकेत यांचा जागर होऊ लागला. अमेरिकेत त्यांना योगाचे राॅक स्टार मानले जाऊ लागले. बीटल्सचा त्या काळी अमेरिकेत बोलबाला होता. बीटलचा एक सदस्य जाॅर्ज हॅरिसन याने स्वामी प्रभुपाद यांचे शिष्यत्व स्वीकारले आणि त्याच्या गायनात हरे कृष्ण हे शब्द येऊ लागले. यामुळे सामान्यजनांना हिंदूधर्माची ओळख होण्यास मदत झाली. विशेषत: अमेरिकन तरुणांमध्ये लोकप्रिय झाला. गाजलेल्या हाऊल या नावाच्या भयपटाचा (हाॅरर फिल्म) लेखक अलेन गिन्सबर्ग हिंदू धर्मामुळे अतिशय प्रभावित झाला तो याच काळात.  
अमेरिकेत ओम्कार - अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को मध्ये गोल्डन गेट पार्क पोलो फिल्ड नावाचे एक स्थळ आहे. या ठिकाणी दी ह्यूमन  बी-इन या नावाचा एक सांस्कृतिक देवाणघेवाण विषयक कार्यक्रम १९६७ मध्ये संपन्न झाला. यात ॲलन गिन्सबर्ग ने ओम्काराचे उच्चारण काही तास  केले. याशिवाय चिन्मय व महर्षी महेश योगी यांची शिष्य मंडळीही अमेरिकेत होती.
दिवाळीनिमित्त दीपप्रज्वलन - २००० मध्ये अमेरिकन संसदेच्या अधिवेशनाचे उद्घाटन  व्यंकटचलापती समुद्राला यांनी सादर केलेल्या संस्कृत प्रार्थनेने झाले. भारताचे त्यावेळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे भेटीचे निमित्ताने हा सन्मान समारंभ आयोजित होता. ओहायओ प्रांताचे काॅंग्रेस सदस्य शेरोड ब्राऊन यांनी पुढाकार घेऊन परमा येथील शिव विष्णू मंदिराचे  पुजाऱ्यांना या निमित्ताने पाचारण केले होते. १२ जुलै२००७ रोजी राजन झेड यांनी नेवाडातील हिंदू धर्मगुरूंना पाचारण केले असता एका ख्रिश्चन दांपत्याने प्रार्थनेत व्यत्यय आणला होता. यावेळी गप्प राहणाऱ्यांवर टीकेची झोड उठविण्यात आली होती. बराक ओबामा यांनी मात्र दिवाळीनिमित्त दीपप्रज्वलन करून प्रकाशाच्या अंधारावरील विजयाचे प्रतीक स्वरूपातील दर्शन व्हाईट हाऊस मध्ये घडविले. भारताशिवाय आजवर ७५ हजार परागंदा भूतानी नागरिकांनी अमेरिकेत आश्रय घेतला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात या लोकांवर  परागंदा होण्याची वेळ का यावी हा स्वतंत्र विषय आहे. पण या सर्वांचा मुख्य धर्म मात्र हिंदू हाच आहे.
न्यूयाॅर्क शहरात कलीमाता
एंपायर स्टेट बिल्डिंग ही अमेरिकेतील १०२ मजली महाकाय इमारत या देशाचे भूषण आहे.  या एंपायर स्टेट बिल्डिंगवर गेल्या वर्षी लुई सायहाेय आणि सहकारी यांनी विजेची रोषनाई करून कालीमातेची प्रतिकृती उभी केली होती. ही प्रतिकृती आश्चर्यचकित करणारी आधुनिक करामतच म्हटली पाहिजे. कालीमाता ही अंधार दूर करणारी व साक्षात कालस्वरूप मानली जाते. भूतलावरून अनेक जीवजाती नष्टप्राय होत चालल्या आहेत. त्याबाबत जनजागृती करण्याच्या हेतूने जी जनजागरण मोहीम सुरू होती तिची सांगता अमेरिकेत एका विशेष प्रकारे झाली. अमेर्केतील एंपायर स्टेट बिल्डिंगचे संपूर्ण भागावर काली मातेचे रूप साकारले होते. संपूर्ण इमारतीवर विद्युत रोषनाई अशाप्रकारे केली होती की, त्यातून काली मातेचे दर्शन होत होते. पर्यावरणाला बाधक आचारविचार, जुन्या चुकीच्या समजुती, चालीरीती, रिवाज, भ्रामक कल्पना, असत्य, अन्याय, शोषण यांचा विनाश करणारी म्हणून कालीमाता  या इमारतीवर प्रगट झाल्याचे दाखवण्याचा या कला काराचा हेतू होता.
आमच्या यॉर्क गावाजवळील मंदीर - सॉरी, मंदीर नाही म्हणायचं, टेंपल म्हणायचं. हे मंदीर/टेंपल कंबरलँड या गावी एका टेकडीवर आहे. आजूबाजूला वृक्षान्चे दाट जंगल आहे. मंदिरासमोर एक बऱ्यापैकी मोठा कार पार्क आहे. समोरच तीन ध्वज आहेत. भारताचा तिरंगा, अमेरिकेचा आणि देवाचा भगवा! या ‘टेंपल’चे नाव हरी टेंपल आहे. हा 'हरी' आपल्या ‘रामकृष्ण हरी’ मधला ‘हरी’ नाही. तर हिंदू अमेरिकन रिलिजीअस इन्स्टिट्यूटमधला ‘हरी’ आहे. ‘हिंदू’ मधला ‘एच’, ‘अमेरिकन’ मधला ‘ए’, ‘रिलिजीअस’ मधला ‘आर’ आणि ‘इन्स्टिट्यूटमधला’ आय, असे एच, ए, आर, आय ही आद्याक्षरे मिळून झालेला ‘हरी’ आहे. असे हे ‘हरी टेंपल’ आहे.
हरी टेंपलची रचना - हरी टेंपल तीन माजली असून खाली बेसमेंटमध्ये प्रसाद वितरण आणि ग्रहण (म्हणजे जेवण ) आणि अतिशय सुसज्ज आणि सर्व सोयीसुविधांनी युक्त स्वच्छतागृह, शॉवर घेता येईल असे स्नानगृह, मधल्या माळ्यासारख्या मजल्यावर पादत्राणे ठेवण्याची स्वतंत्र व्यवस्था असलेली ९’ बाय १३’ क्षेत्रफळाची सर्व भिंतींना खण असलेली खोली, तिला लागून कार्यालय आणि सर्वात वरच्या मजल्यावर १०० फूट बाय ६० फूट क्षेत्रफ़ळाचे मध्ये खांब नसलेले मंदीर/टेंपल आहे. लांबीच्या बाजूत  मधोमध गर्भगृह आहे. गर्भगृहात राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या भव्य मूर्ती आहेत. मन्दिरात इतरही अनेक मूर्ती आहेत. कोणाचा कोणताही देव असू देत, इथे त्याची मूर्ती हमखास मिळेल. रुंदीच्या बाजूत असलेल्या मंचाचा उपयोग स्टेजसारखा करतात. भरतनाट्यम, भाषणे, दिवाळी निमित्तचे कार्यक्रम यासाठी स्टेज वापरतात. उत्तम ध्वनिक्षेपणव्यवस्था, प्रकाशव्यवस्था आहे. याच ठिकाणी अभ्यासवर्गही होतात. यात सर्व भारतीय भाषा शिकवण्यासाठीचे नि:शुल्क वर्ग आयोजित असतात. सौ प्राची पेंडसे आणि ऋजुता कर्वे या दोघी मराठीचे वर्ग घेतात. या दोघी स्वत: नोकरी करतात/ ‘वर्किंग वूमन’ आहेत. आपला व्यवसाय/ नोकरी सांभाळून दर रविवारी त्या हा वर्ग घेत असतात. देवदर्शनासाठी हिंदूंनी किंचितही कांकू न करता रविवार हा दिवस आपल्या ख्रिस्ती बांधवांप्रमाणे स्वीकारला आहे. रविवारी ख्रिश्चन चर्चमध्ये जातात, तर भाविक हिंदू देवदर्शनाला मंदिरात येतात. प्रसाद ग्रहण करून म्हणजे भोजन करूनच घरी जातात. कारण देवदर्शनातच अर्धा रविवार तरी जातोच. ३०/४० मैल अंतर पार करून कुटुंब कार चालवीत आलेले असते.
मंदिरातील अभ्यासवर्ग -- श्री विजय वरदराजन हे आयआयटी मुंबईहून इन्जिनिअरिंगची पदवी आणि पुढील गुणवत्ता अमेरिकेत हस्तगत करून स्थायिक झालेले गृहस्थ स्पर्धा परीक्षासाठींचे वर्ग नि:शुल्क घेत असतात. मंदिराची ‘वर्गणी’ वार्षिक चाळीस डॉलर इतकी आहे. आम्ही मंदिरात गेलो तेव्हा एका मंडलात बसलेले भाविक गीतापठण  आणि गीतेवर चर्चा करीत बसले होते. दाक्षिणात्य आणि हिंदी भाषिक लोक जास्त भाविक वाटले. मंदिराच्या दुसऱ्या मजल्याचा एक हिस्सा बाहेर काढून त्याचे ‘डेक’ केले होते. डेकवर बाक ठेवलेले होते. वर छत नसल्यामुळे सूर्यप्रकाशाचा आनंद लुटता आला.

मंदिरात देवदर्शनाला आलेले वयस्क भाविक पाश्चात्य पोशाखात, वयस्क महिला साडी किंवा सलवार कमीज परिधान करून तर यापेक्षा वयाने लहान असलेली मुलेमुली तऱ्हेतऱ्हेचे कमी अधिक लांबीरुंदीचे आणि रंगीबेरंगी कपडे घालून येतात.

Monday, June 19, 2017

उच्च शिक्षणक्षेत्रात लवकरच धमाका!


उच्च शिक्षणक्षेत्रात लवकरच धमाका!
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?

भारतातील उच्च शिक्षणक्षेत्रातही मोठा धमाका होऊ घातला आहे. युजीसी व एआयसीटीई या आपल्या देशातील उच्च शिक्षणविषयक आवश्यकता पूर्ण करणाऱ्या दोन शिखर संस्था (ॲपेक्स आॅर्गनायझेशन्स) आहेत. यांचे विलिनीकरण होऊ घातले आहे. तसे या निर्णयाचे सूतोवाच यंदाच्या बजेटच्या भाषणादरम्यान अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केले होते. राष्ट्रीय स्तरावर एकच चाचणी यंत्रणा, युजीसीची पुनर्रचना व विद्यापीठांना स्वायत्तता ह्या मुद्यांचा उहापोह अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केला होता. युपीएच्या काळातही असेच काही होत असे. अशाच घोषणा केल्या जात. त्याला आजमितीला ८ वर्षे होतील. हा प्रश्न ऐरणीवर येण्यास त्यावेळी एक तात्कालिक कारण घडले होते. प्रमाद होता ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निलकल एज्यकेशन अर्थात एआयसीटीईचा. इंजिनिअरिंग काॅलेजेसना मान्यता देतांना निकष बाजूला सारून वाटेल तशाप्रकारे निर्णय घेतल्याचा ठपका सर्वोच्च न्यायालयाने ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निलकल एज्यकेशन अर्थात एआयसीटीई वर ठेवला होता. याची दखल घेऊन, बदल करू, विलिनीकरण करू, अशा घोषणांना अनुरूप कृती युपीएच्या काळात होत नव्हती. मोदी शासनाचा एक विशेष हा आहे की, ते संकल्पाला अनुसरून कृती करण्यासाठी बद्धपरिकर असते. ज्या निर्णयावर आज कार्यवाही करण्याबाबतचा निर्णय झाला आहे, त्यासारख्या योजनेचे सूतोवाच अगोदरच्या युपीए शासनाने केले होते, हे मान्य करायला हवे पण हे चांगले कामही मोदी शासनासाठीच त्या शासनाने इतर अशा अनेक कामांप्रमाणे बाकी ठेवलेले दिसते, याचीही नोंद घ्यायला हवी आहे.
तीन आयोगांनी केली होती शिफारस - युनिव्हर्सिटी ग्रॅंट कमिशन अर्थात यूजीसी आणि ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निलकल एज्यकेशन अर्थात एआयसीटीई या दोन्ही संस्थांच्या ऐवजी हाय्यर एज्युकेशन एम्पावरमेंट रेग्युलेशन एजन्सी (एच इ इ आर ए) अर्थात 'हीरा' ही नवी संस्था स्थापन करण्यात येणार आहे.
 युजीसी ही संस्था उच्च शिक्षणाशी संबंधित आहे तर एआयसीटीई ही संस्था तांत्रिक शिक्षणाचे नियंत्रण करणारी संस्था आहे. या दोन वेगवेगळ्या संस्थांमुळे सध्याची गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या दोन्ही संस्था कालबाह्य झाल्या असल्याचा अहवाल युपीए सरकारच्या काळातच शासनाकडे आला होता. यशपाल समिती व नॅशनल नाॅलेज कमीशन या दोन्ही आयोगांनी एकापाठोपाठ एक अशा प्रकारे सारखीच शिफारस केली होती.
हरी गौतम समितीची शिफारस - मोदी शासनाने हरी गौतम यांचे अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीनेही अशाच प्रकारची शिफारस केली होती. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नेमलेल्या डाॅ हरी गौतम समितीने युजीसीची पुनर्रचना करून तिला अधिक शक्तिशाली बनविण्याची आवश्कता आहे, अशी शिफारस केली. ही समिती या निष्कर्षाप्रत पोचली होती की, सक्षम नियामक  बल (रेग्युलेटरी फोर्स) म्हणून काम पार पाडण्यासाठी युजीसीजवळ आवश्यक त्या योग्यतेचे पुरेसे मनुष्यबळ नाही.
तज्ञ मंडळी वारंवार शिफारस करीत होती, पण निर्णय होत नव्हता. शेवटी मार्च महिन्यात पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षते खाली एक बैठक झाली. निर्णय रेंगाळत ठेवणे, हे मोदींच्या स्वभावात नाही. नवीन रचना उभी करण्यास वेळ लागणार असेल तर सध्याच्या नियमात आवश्यक दुरुस्त्या करून सुधारणेच्या कामाला सुरवात मात्र ताबडतोब करावी, असा निर्णय होऊन तुकडा पडला.
एकीकरण करण्याचे काम जटिल व क्लिष्ट -  या दोन्ही संस्था एक करून एकच नियामक संस्था (रेग्युलेटरी एजन्सी) निर्माण करण्याचे काम वाटते तेवढे सोपे नाही. त्यात प्रशासकीय व अन्य स्वरुपाच्याही अडचणी आहेत. नीती आयोगाचे अमिताभ कांत व केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव याबाबतची यंत्रणा व अंमलबजावणीविषयक तपशील तयार करीत आहेत. सुरवातीला एक तात्पुरती व्यवस्था करावी, अशाप्रकारे हालचाली सुरू आहेत. हळूहळू परिपूर्ण रचना निर्माण करावी, असे घाटते आहे. आजवर झालेल्या ज्या चर्चा  समोर येत आहेत, त्या पाहता हीराच्या तीन स्वतंत्र शाखा असतील. पहिली शैक्षणिक शाखा (ॲकॅडेमिक्स), दुसरी मानांकन (ॲक्रेडिटेशन) व तिसरी अनुदान शाखा( ग्रॅंट्स). यात असमाधानकारक इंजिनिअरिंग काॅलेजेस बंद करण्याचे कामच अवघड जाणारे ठरेल, असे वाटते. कारण देशातील २३ विद्यापीठे व २८९ इंजिनिअरिंग काॅलेजेस खोटी (फेक) आहेत, असे मत युजीसी व एआयसीटीइ यांनीच व्यक्त केले आहे. पण  या नियामक संस्थेची स्थापना हेच मोदी राजवटीचे शिक्षणक्षेत्रातील सर्वात मोठे, मूलभूत बदल घडविणारे व महत्वाचे स्वच्छता अभियान ठरेल, यात शंका नाही. या बदलामागचे दुसरेही एक कारण लक्षात घ्यावयास हवे आहे. शिक्षणाचे तांत्रिक (टेक्निकल) व अतांत्रिक (नाॅनटेक्निकल) वर्गीकरणच आता कालबाह्य झाले आहे.
   आपल्या देशात उच्च शिक्षणाचा विचार करणाऱ्या दोन चारच नाहीत, तर मोजून तेरा संस्था आहेत. यापैकी युजीसी, एआयसीटीई व एमसीआय या संस्था या ना त्या कारणाने चर्चेत असतात, म्हणून त्यांची माहिती अनेकांना आहे. तिन्ही संस्थांची कीर्ती फारशी चांगली नाही. सध्या यापैकी पहिल्या दोनच संस्थांचे एकीकरण होणार आहे. त्यामुळे हे योग्य दिशेने टाकलेले पहिलेच लहानसे पाऊल आहे, असे असले तरी महत्वाचे पाऊल ठरते. हे करतांनाच अनेक प्रश्न समोर येत आहेत. यावरून उच्च शिक्षणातील संपूर्ण बजबजपुरी दूर करणे किती अवघड आहे, ते लक्षात येईल. कदाचित एकापेक्षा अधिक पण फार तर दोन तीन संस्था/यंत्रणा उभाराव्या लागणेही, आवश्यक ठरेल. तेरा संस्थांऐवजी दोन/तीन संस्था म्हणजे पुष्कळच आटोपशीर प्रकार म्हणायला हवा. त्याचाही उच्च शिक्षणावर चांगला परिणाम होऊन त्या शिक्षणात निर्माण झालेले प्रश्न व अन्य बाबतीतले गतिरोध दूर होऊ शकतील.
संख्या व व्याप्तीशी संबंधित प्रश्न - उच्च शिक्षणाचे बाबतीत सध्या निर्माण झालेले प्रश्न संख्या व व्याप्तीशी संबंधित आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांची संख्या खूपच कमी होती. त्यामुळे त्यावेळची संस्थांची संख्या वाढविण्याची भूमिका योग्यच म्हणावी लागेल. आर्थिक चणचण तर होतीच. शिवाय अंदाजपत्रात शिक्षणाला गौण स्थान होते. शिक्षणाच्या वाट्याला आलेली तुटपुंजी आर्थिक तरतूदही ऐनवेळी उद्भवलेल्या समस्यांच्या निराकरणासाठी वळवावी लागे. यावर त्याकाळी शिक्षक परिषद व अन्य संस्थांनी आवाज उठवला होता. पण मुळात जगण्याविषयीच प्रश्न निर्माण झाल्यामुळे किंवा झाल्यास शिक्षणासाठीची तरतूद त्या कामाकडे वळवू नये तर काय करावे, अशी भूमिका शासन घेत असे, हे आठवते. जुन्या मध्यप्रदेशात इंजिनिअरिंग व मेडिकल काॅलेज दोन्ही आपल्याच कडे कशी असावीत, यासाठी नागपूर व जबलपूर यात वाद झाला होता. तोडगा म्हणून मेडिकल काॅलेज नागपूरला व इंजिनिअरिंग काॅलेज जबलपूरला देण्यात आले. त्यावेळचे मुख्यमंत्री रविशंकर शुक्ला म्हणाले होते, ‘अरे भाई, झगडो मत।बाट कर खाओ।’. अशाप्रकारे सत्तर सालपर्यंत रडतखडत का होईना पण उच्च शिक्षण  संस्थांच्या निर्मितीवरच भर दिला गेला  व ते धोरण योग्यच होते.
व्याप्तीत वाढ अनिवार्य झाली - एकोणीसशे सत्तरनंतर व्याप्तीवर लक्ष देणे आवश्यक झाले. इंजिनिअरिंग म्हणजे, सिव्हिल, मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल या तीन शाखांपुरता अभ्यासक्रम ही भूमिका  बदलण्याची आवश्कता भासू लागली. नवनवीन शोधांनी  विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात पूरच निर्माण झाला. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात तर क्रांतीच घडून आली. आय टी क्षेत्र हे साधन स्वरूपी असल्यामुळे प्रत्येक क्षेत्राकडून मागणी वाढली व आय टीवाल्यांची चलती निर्माण झाली. संगणकक्षेत्रात प्रणाली निर्माण करणारे, तसेच गणित व संख्याशास्त्र यात विशेष गती असलेल्यांनाही महत्व प्राप्त झाले.
  या बदलाला सामोरे जाण्याच्या बाबतीत गुणवत्ता व अभ्यासक्रमविषयक बदल मात्र मंद गतीने होत होते. एकोणीसशे साठ सालचे अभ्यासक्रम, धोरण व नियम, प्रशासनातील जडता दूर करण्यासाठी आपण पुरेसे सक्षम व सज्ज नव्हतो. ही आव्हाने स्वीकारण्या व हाताळण्यासाठी आपल्या संस्थांमध्ये सर्वस्तरावर यथोचित बदल आवश्यक झाले होते. ही आवश्यकता हीरा (हाय्यर एज्युकेशन एम्पाॅवरमेंट रेग्युलेशन एजन्सी) पूर्ण करील, अशी अपेक्षा आहे.
एकीकरणाचे फायदे - आता नियमांची गर्दी व  अवाजवी बंधने घालणाऱ्या अनेक यंत्रणांऐवजी एकच यंत्रणा निर्माण होईल. नियमन व अनुदानविषयक धोरण यात सुसुत्रता निर्माण होईल. सुस्पष्ट व वस्तुनिष्ठ निकष तयार होऊ शकतील. म्हणूनच मोदी शासनाच्या प्रशासनाला फुटलेला एक आणखी नवीन घुमारा असे याबदलाचे वर्णन केले जाते आहे. गेली आठ वर्षेपर्यंत हा घुमारा फुटण्याच्या/ प्रगट होण्याच्या  प्रतिक्षेत होता. ती प्रतीक्षा आता संपणार आहे. पूर्वीच्या हरियाणा प्रशासनाने तर इंजिनिअरिंग काॅलेजेस खिरापतीसारखी वाटली होती. अशी लक्तरे समोर येताच आमचीच लक्तरे उघडी का पाडता इतर राज्ये आमच्यापेक्षा चांगली होती का, अशी सार्थ व सत्य मुजोरी हरियानाने केली होती. सर्वोच्च न्यायालयाने तर एका पाठोपाठ एक अशा निर्णयांचा सपाटाच  एआयसीटी ई व युजीसी बाबत लावला होता. यांचा अभ्यास करून सुसंगत धोरण ठरविणे हे नीती आयोगाचे एक कामच होऊन बसले होते.
दक्षता आवश्यक - स्वायत्तता निर्माण होईल, इन्सपेक्टर राज पुन्हा निर्माण होणार नाही, हे पाहत असतांना खिरापत वाटण्यासारखा स्वैराचारही निर्माण होणार नाही, याची दक्षता घेणे हे एक जटिल व कठीण काम आहे. एकावर भर द्यावा तर दुसरे डोके वर काढते. समतोल साधणे ही तारेवरची कसरतच ठरणार आहे. पुरेशा सोयीसुविधांचा अभाव, सक्षम शैक्षणिक संसाधन (शिक्षक, प्रयोगशाळा व कार्यशाळा) याबाबतची ओरड, मेधावी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल अशा प्रवेश धोरणांचा अनावलंब, शैक्षणिक अनुशासनाचा अभाव व पारदर्शकतेची आवश्यकता या प्रमुख खडकांवर आपली शैक्षणिक गलबते आजवर आपटून बुडत आली आहेत. त्याबाबत सुस्पष्ट व कठोर धोरणांचा अवलंब करावा लागेल. शिवाय आपल्या देशात काही परकीय सत्तांचीही शिक्षणविषयक कार्ये सुरू आहेत. अभ्यासक्रमही सुरू आहेत. तिथेही या धोरणाशी सुसंगत व्यवहार होईल, हेही पहावे लागेल.  साचेबंदपणा येणार नाही, उपक्रमशीलतेला अडकाठी असणार नाही व स्वायत्ततेला बाधा पोचणार नाही, यासाठी विशेष काळजी घ्यावी लागेल. सध्या काही विद्यापीठात स्वातंत्र्याच्या व स्वायत्ततेच्या अधिकाराचा स्वैराचार असा सोयीस्कर अर्थ लावून वैचारिक धुमाकूळ माजतो आहे, त्यालाही आवर घालावा लागेल. स्वातंत्र्याची सीमारेषा केव्हा ओलांडली जाते व स्वैराचार केव्हा सुरू होतो, हे शोधून त्याला आवर घालणे हे कठीण व कौशल्याचे काम आहे. ते साधावे लागेल. म्हणूनच जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयु) येत्या सत्रात योग तत्त्वज्ञान (योगिक फिलाॅसाॅफी) हा अभ्यासक्रम सुरू करण्याचे घाटते आहे, हे एक स्वागतार्ह व स्वच्छ पाऊल ठरावे, असे आहे. हा अभ्यासक्रम प्रमाणपत्रस्तरावरचा ( सर्टिफिकेट कोर्स)  असेल. अमेरिकेत कोणीही योगाचे धडे देऊ शकत नाही. त्यासाठी मान्यतापात्र संस्थेचे निदान प्रमाणपत्रस्तरावरचे प्रावीण्य आवश्यक मानले आहे.
पहिले काम कोणते? - हे साध्य होण्यासाठी परस्परांच्या अधिकारांना च्छेद देणारी अधिकारक्षेत्रे दूर करणे हे पहिले, पण प्राथमिक स्वरुपाचे काम असेल. पण सुयोग्य प्रशासन व उचित मानांकन (ॲक्रेडिटेशन) व पुरेसे अनदान हे कळीचे मुद्दे असतील. आजच्या मानांकन (ॲक्रेडिटेशन) चमूमध्ये अशा मंडळींचा भरणा असतो की ती मंडळी परस्परांची पाठ खाजवतात, असा आरोप होत असतो. अहो रूपम, अहो ध्वनीं (गर्दभाने कपिलाच्या सौंदर्याची महती गाणे व कपिलाने गर्दभाच्या आवाजाला दाद देणे) बंद झाले पाहिजे. काही सन्माननीय अपवाद आहेत. पण ही महाविद्यालये नसून या शाळाच आहेत, अशी त्यांची हेटाळणी होत असते. (अर्थात शाळाही आता पूर्वीच्या शाळा राहिलेल्या नाहीत, हे त्यांना माहीत नसावे, असे दिसते). उत्तम शिक्षण व मार्गदर्शन, प्रथम दर्जाचे कौशल्य, मोकळा श्वास व मुक्त विचार यासह मुख्य म्हणजे उच्च दर्जाचे संशोधन ही उद्दिष्ट्ये साध्य करणे ही काळाची गरज आहे. ती साध्य होतील, अशी अपेक्षा बाळगू या.

Thursday, June 15, 2017

‘दी विटनेस फाॅर दी प्राॅसिक्युशन’ च्या निमित्ताने अगाथा ख्रिस्तीचा मृत्यूनंतरचा विक्रम

विख्यात ब्रिटिश लेखिका अगाथा ख्रिस्ती हिच्या, ‘दी विटनेस फाॅर प्राॅसिक्युशन, या लघुकथेवरील आणि नाटकावरील त्याच नावाचा चित्रपट  १९५७ साली दाखविण्यास सुरवात झाली. नंतर एकेका विक्रमांची नोंद झालेली आढळते.
    कथेचे दुसऱ्यांदा बारसे -  सुरवातीला फ्लिन्स वीकली या नावाच्या साप्ताहिकात ‘ट्रेटर हॅंड्स’, या नावाने ही कथा १९२५ च्या जानेवारीत प्रसिद्ध झाली होती. नंतर १९३३ साली याच लेखिकेचा ‘दी हाऊंड आॅफ डेथ’ या नावाचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला, त्यात मात्र ‘दी विटनेस फाॅर प्राॅसिक्युशन, या नावाने ही कथा होती. पण ‘दी हाऊंड आॅफ डेथ’ हा कथासंग्रह इंग्लंडच्या सीमा ओलांडून जगात अन्य ठिकाणी फारसा गेलाच नाही. पण १९४८ साली‘दी विटनेस फाॅर प्राॅसिक्युशन ॲंड अदर स्टोरीज’, या नावाने अमेरिकेत एक कथासंग्रह प्रसिद्ध झाला, त्यातही ही कथा होती.
कथासूत्र - लिओनार्ड व्होल नावाच्या विवाहित व्यक्तीला एमिली फ्रेंच या श्रीमंत व वारस नसलेल्या व त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या प्रौढ महिलेच्या हत्त्येच्या आरोपाखाली अटक होते. लिओनार्ड विवाहित आहे, हे माहीत नसल्यामुळे, फसगत होऊन ती मृत्युपत्रात त्याला मुख्य वारस नेमते. त्यामुळे तिचा खून होताच पहिला संशयित लिओनार्ड ठरतो.
केवळ पतीला वाचविण्यासाठी-  लिओनार्डची पत्नी ख्रिस्टीन व्होल (रोमेन) साक्ष देण्याचे ठरवते. पण त्याच्या बाजूने नव्हे तर फिर्यादीपक्षाकडून! तिची ही कृती आपल्या नवऱ्याला सोडविण्यासाठीच्या, एका जटिल कटाचा, प्रमुख भाग असते. ती खटल्याच्या सुरवातीला फिर्यादीपक्षाकडून नवऱ्याच्या विरोधात प्रभावी साक्ष देते. नंतर स्वत:ची साक्ष खोटी ठरवणारा पुरावा निर्माण करते. याचा फायदा आपल्या नवऱ्याला मिळेल व त्याची सुटका होईल, असा तिचा होरा असतो. नवऱ्याच्या बाजूने साक्ष न देता अशाप्रकारे विरोधात साक्ष द्यायची व आपण खोटे सिद्ध होऊ, असा प्रयत्न करण्याचे ती ठरविते. आपल्या बनावट बदफैलीपणाची माहिती मिळेल अशी पत्रे, ती अस्तित्वातच नसलेल्या ‘मॅक्स’ च्या नावे लिहून काढते. ती बचावपक्षाच्या वकिलाला विकण्याचा डाव ती सवत:च वेशांतर करून टाकते. खोटी साक्ष देऊन आपण गुन्हेगार झालो व त्यासाठी आपल्याला थोड्याफार मुदतीच्या कैदेची शिक्षा झाली तरी चालेल पण आपल्या प्रिय नवऱ्याच्या सुटकेची शक्यता वाढेल, या कल्पनेने ती हा बनाव रचते.
  पत्नीने पतीच्या बाजूने दिलेल्या साक्षीला महत्व नाही. - प्रत्यक्षात लिओनार्डने खून केलेला असतो. त्याची कबुलीही त्याने पत्नीजवळ दिलेली असते. व खुनाच्यावेळी आपण घरी होतो, अशी साक्ष तिने द्यावी, अशी गळ तो आपल्या पत्नीला ख्रिस्टीन व्होल (रोमेल ) हिला घालतो. पतीवरच्या प्रेमापायी ती अशी साक्ष देण्यास कबूल होते. पण बचावपक्षाच्या वकिलाच्या दृष्टीने पतीवर निरतिशय प्रेम करणाऱ्या पत्नीने त्याच्या बाजूने दिलेल्या साक्षीला कायद्याच्या दृष्टीने महत्व नसते.
साक्ष उपयोगाची कशी ठरेल? - म्हणून ती पतीच्या विरोधात साक्ष देते, व आपली साक्ष खोटी ठरावी यासाठी फिर्यादीपक्षाच्या वकिलाला मदत करते. ती आपला एक काल्पनिक प्रियकर- मॅक्स-  निर्माण करते. त्याच्याशी आपल्या निळ्या रंगाच्या नेहमी वापरात असलेल्या कागदांवर पत्रे लिहून काल्पनिक प्रेमकथा रचते. शेवटचे पत्र असे असते की, आता तिचा नवरा खुनाचा आरोप सिद्ध होऊन तुरुंगात जाईल व आपले व या काल्पनिक मॅक्सचे मीलन होण्याचा मार्ग मोकळा होईल.
बनाव बनवतो - त्याप्रमाणे लिओनार्ड निर्दोष सुटतो. लिओनार्डची ही हुशार पत्नी मग मात्र उघड करते की, तिचा नवरा खुनी होता. पण पतीप्रेमापायी तिने असा बनाव रचून त्याला सोडविले. पण अशा प्रकारे गुन्हेगाराला शिक्षा न होता तो सुटण्याच्या कथा ॲगाथा ख्रिस्तीने क्वचितच रचल्या आहेत. त्यामुळे तिला हा शेवट रुचेना.
आपल्या कथेत बदल करणारी लेखिका अगाथा ख्रिस्ती - म्हणून चा कथेचे नाट्यरुपांतर करतांना तिने लिओनार्डचे एका महिलेशी लफडे असल्याचे उपकथानक समाविष्ट केले. निर्दोष सुटका होताच लिओनार्ड ख्रिस्टीनचा (रोमेनचा) त्याग करून त्या महिलेसोबत राहणार असतो. खोटी साक्ष दिली म्हणून रोमेनला अटक होणार असते. ती पतीला त्याने असे करू नये म्हणून वारंवर काकुळतीने विनविते. पण तो तिला झिडकारतो, खोटी साक्ष दिल्याबद्दलच्या बचावासाठी भरपूर पैसे देऊन तिच्या साह्याची परतफेड करू इच्छितो. तेव्हा संतापून ख्रिस्टीन (रोमेन) समोर पडलेला चाकू उचलून तो खूपसून त्याला ठार करते.
  विविध साहित्य प्रकारात अनेक नाट्यकर्मींनी साकारलेली कथा - १९५७ साली चित्रित झालेल्या चित्रपटात  लिओनार्ड व्होलची भूमिका टायरन पाॅवरनने ख्रिसटीन व्होलची (रोमेन) भूमिका विख्यात नटी मार्लीन डेट्रिचने; वकील विलफ्रिड राॅबर्टची भूमिकी चार्ल्स लाॅफ्टनने वठविली आहे.
आता पुन्हा आॅगस्ट २०१६ पासून या चित्रपटाचा वेगळी चमू घेऊन रीमेक करण्याचे घाटते आहे.
पण या अगोदर १९४९ मध्ये बीबीसीने व १९५३ मध्ये सीबीएसने आपल्या दूरचित्रवणी माध्यमात हेच कथानक वापरले आहे. प्रत्येकवेळी पटकथालेखक, अभिनय कर्ते, दिग्दर्शक वेगवेगळे आहेत. १९८२ मध्ये हे कथानक अभिनयकर्त्यांची वेगळी चमू घेऊन वेगळ्या कथालेखक, दिग्दर्शक, निर्मात्यांनी हाताळून याच नावाचे दूरचित्रवाणी रुपांतर हाॅलमार्क टेलिव्हिजनने सादर केले यात लिओनार्ड व्होलची भूमिका टायरन पाॅवर ऐवजी बी ब्रिजने ख्रिसटीन व्होलची (रोमेन) भूमिका विख्यात नटी मार्लीन डेट्रिच ऐवजी डायाना रिगने; वकील विलफ्रिड राॅबर्टची भूमिकी चार्ल्स लाॅफ्टन ऐवजी राल्फ रिचर्डसनने वठविली आहे. २०१६ साली बीबीसीने संपूर्ण नवीन चमू निवडून हेच कथानक दोन भागात मालिका स्वरुपात (दोन भागांचीच मालिका) सादर केले. एकाच लेखकाचे कथानक लघुकथा, नाटक, चित्रपट, दोन तीनदा नभोवाणी नाट्य रुपांतर  या स्वरुपात सादर होण्याचा हा कदाचित जागतिक उच्चांक असावा.
  म्हणून या कथानकाची मिळतील तेवढी रुपांतरे पाहण्याचे मी ठरविले. १९५७ सालच्या चित्रपटात वर उल्लेख केल्याप्रमाणे लिओनार्ड व्होलची भूमिका टायरन पाॅवरनने ख्रिसटीन व्होलची (रोमेन) भूमिका विख्यात नटी मार्लीन डेट्रिचने; वकील विलफ्रिड राॅबर्टची भूमिकी चार्ल्स लाॅफ्टनने वठविली आहे.
 बचाव पक्षाचा  बेरका वकील-  यात विलफ्रिड राॅबर्ट (चार्ल्स लाॅफ्टन) हा एक विख्यात आजारी बॅरिस्टर आहे. तो लिओनार्डो व्होलला (टायरन पाॅवर) चे वकीलपत्र सुरवातीला प्रकृती अस्वास्थ्यास्तव नाकारतो. यापुढे मानसिक ताण निर्माण करणाऱी व  गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली प्रकरणे हाताळायची नाहीत. वकिली प्रॅक्टिस सिव्हिल मॅटर्स पुरतीच मर्यादित ठेवायची, असे डाॅक्टरांनी बजावलेले असते.
पाळतीसाठी नर्स- बेरका विल्फ्रिड या सूचनेचे पालन करतो की नाही, औषधे वेळेवर घेतो की नाही, नेहमीप्रमाणे एका पाठोपाठ एक चिरूट ओढत तर नाहीना, काॅफी म्हणून ब्रॅंडी तर ढोसत नाहीना हे पाहण्यासाठी व पाळत ठेवण्यासाठी नर्स मिस प्लिमसोल (एल्सा लॅंकेस्टर) ची योजना केलेली असते. यांची जुगलबंदी हा चित्रपटाचा खुसखुशीतपणा वाढवणारा व दोन्ही पात्रांची व्यक्तिचित्रणे खुलवणारा व व्यक्त करणारा  कथाभाग मूळ कथानकाशी बेमालुमपणे सांधला गेला आहे.
नकाराचा होकार कसा होतो? - वकिलपत्र घेण्यास दिलेला विल्फ्रिडचा नकार लिओनार्डो मान्य करतो.पण रोमेन ( ख्रिस्टीन व्होल्स - मार्लीन डेट्रिच) विल्फ्रिड राॅबर्टला खिजवते व वकीलपत्र घेण्यास भाग पाडते. ती म्हणते, ‘हताशातल्या हताशांना तुमचा आधार वाटतो, असे आम्ही ऐकले होते. पण आमचे प्रकरण त्याही पलीकडचे असावे, असे वाटते’. या उचकवण्याचा योग्य परिणाम होऊन विल्फ्रिड, ही मात्र नक्की शेवटची केस, असे म्हणत नर्स प्लिमसोलचा विरोध गुंडाळून, हे प्रकरण स्वीकारतो.
लिओनार्डची वीक केस -जिच्या खुनाचा आरोप लिओनार्डोवर असतो, तिने आपले जुने मृत्यूपत्र आठवडाभर अगोदरच बदलून मोलकरणीऐवजी आपल्या इस्टेटीचा मोठा वाटा लिओनार्डोच्या नावे केलेला असतो. तो मुख्य लाभार्थी असतो. परिस्थितीजन्य पुरावा व प्रधान लाभार्थी म्हणून लिओनार्ड विरुद्ध भक्कम केस सरकारी पक्षाने उभी केलेली असते. लिओनार्ड निरपराध आहे, असे त्याचे व त्याची बायको ख्रिस्टीन (रोमेन)यांची बाजू ऐकल्यावर वाटत असते.
 ख्रिस्टीनचे अगदी वेगळे व्यक्तिमत्व -  लिओनार्ड व्होलची बायको ख्रिस्तीन (रोमेन) ही मूळची जर्मन दाखविली आहे. मार्लीन डेट्रिचने जर्मन लोकांचा थंडपणा, अलिप्तपणा, कोरडेपणा व ताठरणा व्यवस्थित अभिनित केला आहे. पण ती नवऱ्यासाठी एक चांगली साक्षीदार असू शकेल असे विल्फ्रिड राॅबर्ट्स या निष्णात वकिलाचे मत असते. फक्त नवरा बायकोच्या  नात्यामुळेच तिच्या साक्षीची  विश्वसनीयता कमी ठरणार असते. पण तिचे नाव जेव्हा फिर्यादीपक्षाची साक्षीदार म्हणून पुकारले जाते, तेव्हा तो अक्षरश: हादरतोच. कोणत्यही पत्नीला पतीविरुद्ध साक्ष देण्यासाठी कायद्याने बाध्य करता येत नाही. पण ख्रिस्तीनचे अगोदर एका जर्मन व्यक्तीबरोबर झालेले असते. ते लग्न तसेच कायम असतांना तिने लिओनार्ड बरोबर दुसरे लग्न केलेले असते. त्यामुळे ती लिओनार्डची कायदेशीर बायको नसतेच. युद्धादरम्यान लिओनार्ड रोयल एअर फोर्स मधील नोकरीनिमित्त जर्मनीत असतांना ती दोघे एकत्र आलेली असतात. त्यामुळे ती जेव्हा कोर्टात सांगते की, लिओनार्डने आपण फ्रेंचचा(श्रीमंत महिलेचा) खून केल्याचे सांगितले होते व सद्सदविवेकबुद्धी तिला सत्य सांगायला भाग पाडते आहे, तेव्हा त्या साक्षीला चांगलेच महत्व प्राप्त होते.
  पण विल्फ्रेडला एक अज्ञात महिला फोन करते आणि ख्रिस्टीनने मॅक्स नावाच्या प्रियकराला लिहिलेली पत्रे विकत देते. त्यामुळे ख्रिस्टीनच खोटे बोलते आहे, असे सिद्ध होऊन ज्युरीचे मत एकदम बदलते व ज्युरी लिओनार्ड निर्दोष असल्याचा निर्णय देते.
केस जिंकूनही वकील अस्वस्थच - पण विल्फ्रिड राॅबर्ट्स हा बचाव पक्षाचा वकील अस्वस्थ असतो. आपल्या हाती आलेला पुरावा असा कसा? अगदी व्यवस्थित?, नेमका?, सुनियोजित?, अगदी हवा तेव्हा, हवा तसा? जगात असं होत नसतं. कोर्टरूममध्ये शुकशुकाट असतो. तेवढ्यात ख्रिस्टीन तिथे येते व म्हणते, ‘ तुम्ही खटला जिंकला. पण सर्व श्रेय तुमचं एकट्याचं नाही. तुम्हाला कुणाची तरी मदत झाली ना?’
  ‘तुमचं लक्ष नव्हतं, पण मी तुम्हाला बोलतांना ऐकलं होतं, ‘ज्युरी, बायकोच्या साक्षीवर विश्वास ठेवणार नाही. प्रेमळ व एकनिष्ठ बायको काहीही झालं तरी नवऱ्याचीच बाजू घेणार, असं ज्युरीला वाटणारच’.
म्हणून अगोदर  मी स्वत:हून नवऱ्याच्या विरुद्ध साक्ष दिली  आणि नंतर स्वत:च स्वत:ला खोटं पाडलं. अस्तित्वात नसलेल्या मॅक्सच्या नावानं खोटी प्रेमपत्रं लिहून काढली आणि नंतर स्वत:च वेशांतर करून ती विल्फ्रिडला (बचाव पक्षाच्या वकिलाला) विकली. त्या पत्रांमुळे तिची नवऱ्याच्या विरोधातली साक्ष खोटी ठरली व तो निर्दोष सुटला. ती विल्फ्रिडला हेही सांगते की, तिला माहीत होतं की तिचा नवरा खुनी आहे. पण तिचं तिच्या नवऱ्यावर निरतिशय प्रेम असल्यामुळे, तिनं त्याच्या समर्थनार्थ उभं रहायचं ठरवलं.
बदफैली नवरा - वकिलाशी होत असलेलं हे बायकोचं हे बोलणं लिओनारडच्या कानावर पडतं. तो वकिलाला सांगतो की, त्यानचं तो खून केलेला आहे. फसवणुकीमुळे वकिलाचा संताप होतो. लिओनार्ड ख्रिस्टीनला सरळ सांगतो की, एक तरुणी त्याच्या आयुष्यात आली असून तो तिच्यासाठी ख्रिस्टीनला सोडून देणार आहे. ख्रिस्टीन प्रथम विनवणी करून त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न करते. पण तो दाद देत नाही, त्याच्या हृदयाला पाझर फुटत नाही हे पाहून त्याच्या कृतघ्नपणामुळे संतापूर समोरच पडलेला चाकू उचलून त्याला भोसकून ठार मारते. (हाच धारदार चाकू बचाव पक्षाने पुरावा म्हणून आणलेला असतो).
‘तिनं ठार मारलं नवऱ्याला’, नर्स नाडी पाहून किंचाळते. ‘छे! छे!, तिनं शिक्षा अमलात आणली आहे, आटोपली ती शेवटची केस नाही, ख्रिस्टीनसाठी माझे वकीलपत्र दाखल करा.’

काही अन्य वैशिष्ट्ये
१. एल्सा लॅंकॅस्टर ही नर्सचे काम करणारी अभिनेत्री प्रत्यक्ष जीवनात चार्स लाॅफ्टनची पत्नी होती.
२. हाऊस कीपरचे काम करणारी उना ओ कोनार हिने जवळजवळ सर्व नाट्यप्रकारात तीच भूमिका केली होती.
३. लिओनार्डचे काम करणाऱ्या  टाॅयरोन पाॅवरची ही शेवटची पूर्णत्वाला पोचलेली फिल्म होती. साॅलोमन ॲंड शेबा हा चित्रपटात काम करतांना त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्याऐवजी यूल ब्रायनरला घेण्यात आले.
मानांकने
१. सर्व समीक्षांमध्ये प्रशंसा.
२. आजही १०० टक्के रेटिंग.
३. पाच पैकी ४.५ स्टार्स.
४. आज यू ट्यूब वर १९५७ व १९८२ या दोन्ही आवृत्या उपलब्ध. १९८२ च्या आवृत्तीत राल्फ रिचर्डसन(बचाव पक्षाचा वकील) व डेबोरा केर (लिओनार्डची पत्नी) व दोन्हींची तुलना करणे हा रंजक व बोधप्रद अनुभव.
५. चित्रपटाची तिसरी आवृत्ती लवकरच येणार

Tuesday, June 13, 2017

शांघाय संघटनेची सदस्यता, एक अमोल संधी, तशीच मुत्सद्देगिरीची परीक्षाही
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
भारत व पाकिस्तानला एकाच वेळी सदस्यता देणारी शांघाय कोआॅपरेशन आॅर्गनायझेशन (एस सी ओ) ही, युरेशिया (युरोप व आशिया) यातील देशांची संघटना असून राजकीय, आर्थिक आणि संरक्षण या विषयांशी संबंधित आहे. यात चीन, रशिया, कझख्स्तान, किरगिझस्तान, तजिकिस्तान व उझबेकिस्तान हे संस्थापक देश असून याबाबतची घोषणा १५ जून २००१ रोजी शांघाय येथे करण्यात आली. या संघटनेचे केंद्रिय कार्यालय बेजिंगला असून अधिकृत भाषा रशियन व चिनी आहेत. या दोन्ही बाबी अनेक राजकीय शक्यता, संभाव्यता व भूमिकांकडे अंगुलिनिर्देश करणाऱ्या आहेत.
रशियाला पुन्हा बलशाली करण्यावर पुतिन यांचा भर - सोव्हिएट रशियाचे विघटन गोर्बोचेव्ह यांच्या कारकीर्दीत झल्यानंतर पुतिन हे सत्तेवर आल्या नंतर त्यांनी घड्याळाचे काटे पुन्हा उलट फिरवण्याचा प्रयत्न सुरू करून रशियाला पुन्हा बलशाली करण्याचे ठामपणे ठरविले आहे. प्रथम क्रीमियाला रशियात सामील करून घेतले. युक्रेन हा युरेनियम संपन्न देशही कोणताही विधिनिषेध न पाळता काबीज करण्याचा प्रयत्न जारी ठेवला. अमेरिकादी राष्ट्रांनी या व अशा उदंडतेवर आक्षेप व  गंभीर दखल घेत नाटो व जी ८ मधून रशियाची हकालपट्टी केली पण त्याची परवा रशियाने केली नाही. कझख्स्तान, किरगिझस्तान, तजिकिस्तान, आदी देश एकेकाळी सोव्हिएट रशियाचेच भाग होते. पण त्यांचे ओझेच होत असल्यामुळे म्हणा किंवा अन्य कारणांनी म्हणा त्यांना रशियात परत संमिलित करण्याचा प्रयत्न रशियाने केला नाही. पण त्यांना तसेच वाऱ्यावर सोडणेही बरोबर झाले नसते. अमेरिका त्यांना आपल्याकडे वळवण्यात आज ना उद्या यशस्वी होईल, हा धोकाही होताच. अशावेळी त्यांना एससीओ मध्ये सामील करून जवळ ठेवायचे, म्हणजे ओझे वाहण्याची वेळ येणार नाही व ते संबंधात व काहीसे नियंत्रणातही राहतील, असा विचार रशियाने केला असावा व शांघाय गटाची मुळातली चीनची योजना आपली म्हणून स्वीकारली.
चीनची भूमिका - चीनचेही कधी रशियाशी दोस्ती तर कधी अमेरिकाशी दोस्ती असे तळ्यात मळ्यात करून चालणार नव्हतेच. व्यापारी संबंधांना बाधा येऊ न देता सैधांतिक जवळीकही या निमित्ताने  चीनने साधली. सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतर केवळ अमेरिकेच्या छत्रछायेखालचे एकधृवीय जग चीनलाही नकोच आहे. चीन व रशिया एकत्र असले तर कोण कुणावर कुरघोडी करणार हा मुद्दा चीनसाठी कधीच चिंतेचा असणार नाही. कारण अशा बाबतीत आजवर तरी चीनला कुणीच मात दिलेली नाही. त्यामुळे चीनने योजना मांडणे व सामील होणे अपेक्षितच होते.
   ‘आपल्या’ पाकिस्तानची भूमिका - आपला शेजारी पाकिस्तान भारतद्वेश हा एकमेव अजेंडा घेऊन चालणारा देश आहे. तो केव्हाही कुठेही जाईल फक्त भारताची कुरापत काढण्याची मुभा असावी, ही एकच अट असणार. भारताला या गटात सामील करून घेण्यासाठी चीनपेक्षा रशियाला जास्त इच्छा असणार. अशावेळी भारताला त्रास देण्यासाठी पाकिस्तानला सोबत घेणे चीनला सोयीचे झाले असणार. राजकारण्यांच्या डावपेचांबद्दल आपण पामरांनी असे अंदाज तेवढे बांधायचे.
  उद्देशांवर इतिश्री अवलंबून नसते - पण कुणाकुणाचे कोणकोणते का उद्देश असेनात. भारताला शांघाय गटात (शांघाय कोआॅपरेशन आॅर्गनायझेशन-एस सी ओ) प्रवेश मिळतो आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. पुढे कुणाला किती महत्व मिळावे, हे ज्याच्या त्याच्या कर्मावर, धर्मावर (नीतीवर) व कर्तृत्वावर अवलंबून असेल. स्थापनेच्या वेळचे उद्देश मग कोणतेही असोत.
अशी बहुस्तरीय आहे शांघाय कोआॅपरेशन आॅर्गनायझेशन - पूर्ण सदस्य, संवादी साथीदार, पाहुणे असे तीन प्रकारचे स्तर या काॅरपोरेशन मध्ये आहेत. एकेकाळी अमेरिका व सोव्हिएट रशिया हे दोन धृव होते. काही देश अमेरिकेच्या छत्रछायेखाली तर काही रशियाच्या छत्रछायेखाली अशी स्थिती होती. याच काळात २६ एप्रिल १९९६ मध्ये चीन, रशिया, कझख्स्तान, किरगिझस्तान, तजिकिस्तान या देशांनी (म्हणजे उझबेकिस्तान वगळून) शांघाय फाईव्ह ग्रुपची स्थापना झाली होती. ९ जून २०१७ ला भारत व पाकिस्तान हेही या संघटनेचे पूर्ण सदस्य (फुल मेंबर्स) झाले आहेत. पूर्ण सदस्य असे सांगण्याचे कारण असे की, अफगाणिस्तान, बेलारस, इराण, मंगोलिया, हे चार निरीक्षक देश; आर्मेनिया, अझरबालिजान, कंबोडिया, नेपाळ, श्री लंका, तुर्कस्तान हे  संवादी साथीदार (डायलाॅग पार्टनर्स); तर युएन, ॲशियन, सीआयएस व तुर्कमेनिस्तान हे पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे ( गेस्ट अटेंडन्सेसेस) देश आहेत. शांघाय गटाने सुरक्षा, व्यापार, भांडवली गुंतवणूक, संपर्क (रस्ते,जल व रेल्वे), उर्जा, एससीओ बॅंक, सांस्कृतिक देवाणघेवाण अशा विविध विषयांवर ठराव व करार केले आहेत. पण अंमलबजावणीत समाधानकारक स्थिती नाही. सुसंघटित अवस्थेपर्यंत नेणारी  पुरेशी प्रगती नाही. चीनचा पुढाकार व रशियाची साथ असलेला हा गट भौगोलिक विस्तार, राजकीय एकता, महत्वाचे सामरिक स्थान व आर्थिक संपन्नता यांचा विचार करता जागतिक व्यवहारात महत्वाचे स्थान प्राप्त करील. हिंदी महासागर हा सागर  व युरेशिया हा भूभाग या दोन्हींचे भारतासाठी सारखेच महत्व आहे. बैठकीत मोदींची उपस्थिती - कझकिस्तानमधील अस्ताना येथे शांघाय सहकारी संघटना (शांघाय कोआॅपरेशन आॅर्गनायझेशन - एससीओ) ची १७ वी बैठक उजाडली व भारत व पाकिस्तान हे दोन्ही देश पूर्ण सदस्य झाले. मोदींची उपस्थितीनजरेत भरत होती पण इतर देशांच्या भेटी दरम्यानचा झगमगाट व गाजावाजा यावेळी नव्हता. कारण आपण तसे नवखे होतो. त्यामुळे नवाझ शरीफ किंवा चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांच्या बरोबरच्या भेटींना सुमारच प्रसिद्धी मिळाली.
 मोदींची स्पष्टोक्ती -  पण देशाचे सार्वभौमत्व, व प्रत्येक देशाचा भूभाग, यावर मोदींनी भर देऊन चायना - पाकिस्तान एकाॅनाॅमिक काॅरिडाॅर आणि पाकव्याप्त काश्मीरमधून जाऊ घातलेला रस्ता याचा उल्लेख केलाच आणि तो बोचावा तिथे बोचलाही. पर्यायी विचार म्हणून इराणच्या किनाऱ्यावरील छाबहार बंदर बांधणी प्रकल्पातील भारताचा सहभाग याचाही उल्लेख करायचे त्यांनी सोडले नाही. नाॅर्थ साऊथ ट्रान्सपोर्टेशन काॅर्रिडोर व अश्गाबात करार यांचाही उल्लेख त्यांनी केला. अश्गाबात करार हा रस्ते, रेल्वे व जल वाहतुकीबाबतचा करार असून तो ओमान, इराण, तुर्कमेनिस्तान, उझबेकीस्तान, कझख्सस्तान, या संस्थापक सदस्यातील करार असून त्यात आता नंतर पाकिस्तान आॅक्टोबर २०१६ मध्ये सामील झाले आहे. भारतानेही यात सहभागी होण्याची इच्छा मार्च २०१६ मध्येच विनंती करून व्यक्त केली आहे. या आंतरराष्ट्रीय वाहतुक व्यवस्थेमुळे मध्य आशिया व आखाती देशात व्यापार व उदीम वाढीस लागेल, अशी अपेक्षा आहे. दहशतवाद व मूलतत्त्ववाद यांना रसद व मनुष्यबळ मिळू नये यासाठी सर्वांची भूमिका कडक असावी, असा आग्रह त्यांनी धरला आहे. पाकिस्तानचा स्पष्ट उल्लेख न करता मोदींनी याबाबतच्या  शांघाय गटाच्या भूमिकेची प्रशंसा केली. सदस्यता मिळते ना मिळते तोच मोदींनी आडवळणे न घेता केलेले हे निवेदन आहे.
संयुक्त पत्रकात दडलेला अर्थ - मोदी व चिनी अध्यक्ष जिनपिंग यात सकारात्मक व सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा झाली, असा उल्लेख आहे. याचा अर्थ या दोन देशातील कोणत्याही प्रश्नावर तोडगा निघू शकला नाही, असा होतो. न्यूक्लिअर सामग्री पुरवठा गटातील प्रवेश, जैशे मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करणे हे प्रश्न मोदींनी यावेळपुरते मुद्दामच उचलले नसावेत. आंतरराष्ट्रीय प्रश्नांबाबत सहयोग व संपर्क यावर भर द्यावा, परस्परांच्या खास बाबींचा ( कोअर कन्सर्न्स) आदर करावा व योग्य पद्धतीने हे प्रश्न हाताळावेत, असेही ठरले. म्हणजेच मतभेदांच्या मुद्यांबाबत सबुरी व मतैक्याच्या मुद्यांबाबत प्रगतीसाठी प्रयत्न करावेत, असे उभयपक्षी ठरले. आळीपाळीच्या नियमानुसार चीनकडे २०१८ मध्ये शांघाय संघटनेचे अध्यक्षपद येईल. त्या अगोदरच भारत या संघटनेचा सदस्य झाला आहे.
भारताचा प्रवेश का व कसा? - शांघाय गटात दाखल होण्याचा निर्णय मोदी यांच्या मुत्सद्देगिरीची साक्ष पटवतो. याचे भविष्यकालीन परिणाम महत्वाचे असतील. इच्छा नसतांना चीनला रशियाच्या आग्रहामुळे भारताला प्रवेश द्यावा लागला. बेजिंग परिषदेवर भारताने टाकलेल्या बहिष्काराची सल पुरती विरलीही नसेल. त्यावर आपले बाहुले पाकिस्तान याचाही प्रवेश चीनने करून घेतला आणि भारत व पाकिस्तानमधील समतोल कायम राखला. या निमित्ताने चिनी चतुराईचा पुन्हा एकदा परिचय करून दिला. पण भारताच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा हा आहे, की, रशियाने आपला आग्रह चीनच्या विरोधात जाऊन पूर्ण करून घेतला. यावरून हे स्पष्ट होते की, बहुसंख्य सदस्य चीनच्या नव्हे तर आपल्या मतानुसार चालणारे आहेत, हे रशियाने  चीनला दाखवून दिले. भविष्यात राजकारणात कुणाची पावले केव्हा, कशी पडतील, हे जरी सांगता येत नसले व त्याबद्द्ल भरवसा बाळगता येत नसला, तरी यावेळच्या शांघाय गटातील प्रवेशाचे महत्व कमी होत नाही. मग ती बाब प्रवेशापुरतीच मर्यादित असली तरी. हिंदी महासागर व युरेशियात भारत हेही एक दखल घ्यावी, असे सत्ताकेंद्र आहे तसेच चीन व रशिया यांचे नेहमीच एकमत होते/असते असे नाही, या दोन्ही बाबी या निमित्ताने अधोरेखित होत आहेत.
एकीकडे श्रीनगर, लेह व दुसरीकडे काबूल, ल्हासा व कंदहार यांचे महत्व चोला, मोगल व ब्रिटिश कालखंडापासून सर्वज्ञात आहे. हिंदी महासागरात भारताचा प्रभाव असावा व दुसऱ्या कुणाचा या सागरात दखलपात्र शिरकाव नसावा, यावर भारताचा तेव्हाही भर होता व आताही आहे.
भारत व अफगाणिस्तान - भारताचे अफगाणिस्तानशीही स्नेहाचे पूर्वापार संबंध आहेत. सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतर तर भारताची या भागातील भूमिका आणखीनच महत्वाची झाली. पण पाकिस्तानने जमिनीवरील संपर्कात अडथळे आणले. त्यामुळे चीनचे अफगाणिस्तानमधील महत्व वाढले. आता तर या भागातून रस्ता बांधण्याचा चीनने चंग बांधला आहे.
सदस्यतेचे महत्व - या महत्वाच्या कालखंडात भारताचा शांघाय सहकार संघटनेत प्रवेश झाला आहे. पाकिस्तानशी आता या ना त्या कारणाने भारताची गाठ पडेलच. पाकिस्तानला भारत विरोधातले काही हट्ट सोडावे लागतील. अर्थात स्वत:चे नाक एकवेळ कापले तरी चालेल पण भारताला अपशकून करायची संधी सोडायची नाही, हा त्याचा स्वभाव सहजासहजी जाणार नाही, हेही खरे आहे. पण चीन व रशिया पाकिस्तानला त्याचा अडमुठेपणा चालू ठेवू देणार नाहीत, असे संकेत रशिया भेटी दरम्यान व्लादीमीर पुतिन यांनी मोदींना दिले आहेत. यात भारताची कड घेण्यापेक्षा स्वत:चे व्यापारी संबंध जपण्याचाच त्यांचा हेतू मुख्यत: असेल. पण परिणाम पाकिस्तानचा अडमुठेपणा कमी होण्यात होईल, हे आपल्या दृष्टीने महत्वाचे आहे.
चीन का नरमला? - चीनलाही पाकिस्तानशी संबंध हवे आहेत, ते रस्ता बांधण्यासाठी. यामुळे चीनला व्यापारी फायदा फारसा होणार नाही. कारण पाकिस्तान आजमितीला एक कंगाल देश झाला आहे. त्याच्याशी व्यापार काय करणार, कपाळ? त्यातुलनेत भारत ही एक मोठी आर्थिक सत्ता आहे. तिला डावलून चीनचे चालायचे नाही. म्हणूनच भारताने बेजिंग परिषदेतवर बहिष्कार टाकल्यानंतरचा थयथयाट चीनने जाणीवपूर्वक आटोपता घेतलेला दिसतो.
 भारताचे सर्वसमावेशक धोरण - भारताचे संबंध  फक्त शांघाय गटाशीच असणार नाहीत. अमेरिका, जपान, आॅस्ट्रेलिया व व्हिएटनाम यांच्या बरोबर भारताचे सागरी व व्यापारी संबंध आहेत. यात परस्पर संरक्षक तटबंदीही समाविष्ट आहे. अमेरिकेतील सध्याची राजवट आपले जागतिक संबंध आक्रसते व आवरते घेते आहे. ही पोकळी कोण भरून  काढणार? भारत? चीन? की जपान ? जपान तर आपले चीनशी असलेले परंपरागत वैर विसरायलाही तयार झाला आहे.
दोन बाजूची बेरीज तिसरीपेक्षा मोठी - रशियाला चीन बरोबरचा जोडीदार म्हणून नको आहे. साम्यवादी राजवट असलेले इतर सर्व देश आपल्या प्रभावक्षेत्रात मोडतात, अशी रशियाची भूमिका असते. मध्य आशियातही चीनचा शिरकाव जेवढा कमी होईल, तेवढे रशियाला हवे आहे. त्या तुलनेत भारत व रशियाचे संबंध बरोबरीच्या नात्याचे व परस्परपूरक राहिले आहेत. चीनची वाढत चाललेली सैनिकी व आर्थिक शक्ती पाहता भारत, चीन व रशिया या त्रिकोणात भारत व रशिया मिळून चीनला वेसण घालू शकतील. त्रिकोणातील कोणत्याही दोन बाजूंची बेरीज तिसरीपेक्षा मोठी असते, या न्यायाने युरेशियात रशियाची भूमिका म्हणूनच भारताच्या सोयीची असणार आहे.
शांघाय काॅर्पोरेशनच्या स्थापनेमागचा उद्देश - मुळात शांघाय कोआॅपरेशन आॅर्गनायझेशन स्थापनच का झाले हे पाहणे आवश्यक आहे. या सर्व देशांच्या सीमा एकमेकांबरोबरच चीनशीही लागून आहेत. सीमावाद व सीमेवरील सैन्यदलाच्या हालचालीवर नियंत्रण हे उद्देश आता आॅर्गनायझेशनच्या स्थापनेनंतर साध्य झाले असल्यामुळे तडजोड कुणाच्या व किती फायद्याची ठरली हा मुद्दा सहाजीकच मागे पडतो. हे देश मुळात रशियातील सोव्हिएट्स (प्रांत) होते. उझबेकिस्तान आॅर्गनायझेशनमध्ये सामील झाल्यानंतर तर उरली सुरली सर्वच कसर दूर झाली आहे.
अमेरिकेच्या मध्य आशियातील प्रवेशाला व प्रभावाला आवर घालण्याचा सर्वांनाच मान्य असलेला उद्देशही या देशांसमोर होता. त्यामुळे राजकारण, तंत्रज्ञान, व्यापार, अर्थकारण या सारख्या बाबतीत सूत जुळायला वेळ लागला नाही. पण बरोबरीला शांतता, सुरक्षा व स्थैर्यही आवश्यक असतात. तेही मिळाले आहे. अशा या शांघाय संघटनेचे कार्यलय बेजिंगमध्ये तर रीजनल ॲंटिटेररिस्ट स्ट्रक्चर (रॅट्स) ताश्कंदला आहे.
शांघाय कोआॅपरेटिव्ह आॅर्गनायझेशनने संयुक्त लष्करी कवयती तर आजवर केल्या आहेतच. त्याचबरोबर रशियाच्या नियंत्रणाखालील सेंट्रल सिक्युरिटी ट्रिटी आॅर्गनायझेशन बरोबर सहकार्य व संयुक्त कवायितीही सुरू केल्या आहेत. नाटोला प्रतिस्पर्धी यादृष्टीने पाश्चात्य या प्रकाराकडे पाहतात. पण काय गंमत असते पहा. अमेरिका आत्मकेंद्री होताना दिसताच शांघाय कोआॅपरेटिव्ह आॅर्गनायझेशन व सेंट्रल सिक्युरिटी ट्रिटी आॅर्गनायझेशन यांच्यातील घनिष्टताही पातळ होतांना दिसते आहे. संकट ओसरले निदान पक्षी कमी झाले आहे ना.  ते काहीही असले तरी सोव्हिएट युनियनच्या विघटनानंतर अमेरिका हा एकच सामर्थ्यधृव उरला होता. पण आता पुन्हा रशिया स्वत:ला सावरत असून द्विधृवीय राजकारण जगात पुन्हा उभे राहणार, असे दिसते.
चीनचा मूळ स्वभाव कायम - शांघाय कोआॅपरेटिव्ह आॅर्गनायझेशन हे बहुराष्ट्रीय संघटन असून सुद्धा चीनने द्विपक्षीय करार करण्याचा सपाटा लावला असून गॅसपाईप लाईन्स व रेल्वेचे रूळ टाकून आपला वरचष्मा कसा राहील, या दृष्टीने पण रशिया दुखावला जाणार नाही, याची दक्षता चीनने घेतली आहे. चलाखी, कुरापती व कुरघोडी या चीनच्या रक्तात इतिहास काळापासूनच भिनलेल्या आहेत. मधल्या काळात चीन अफूचे सेवन करीत स्वस्थ होता. आता तो जागा झाला असून पूर्वपदावर येतो आहे. वरचढ होण्याच्या प्रयत्नात तो समविचारी रशियाचीही तमा बाळगत नाही, हे दिसते आहे. चीनचा हा खरा चेहरा आहे.
हे असे घडते याला दुसरेही एक कारण आहे. अमेरिकेने पश्चिम युरोपच्या आर्थिक नाड्या आपल्या हाती कशा राहतील, यादृष्टीने प्रयत्न चालविला आहे. रशियाला अमेरिकेचे हे मनसुबे हाणून पाडायचे आहेत. चीनसमोर हा मुद्दा नाही. त्याला संपूर्ण युरेशिया आपल्या पंजाखाली हवा आहे. चीनकडे शांघाय कोआॅपरेटिव्ह आॅर्गनायझेशनचे अध्यक्षपद २०१८ मध्ये आळीपाळीच्या नियमानुसार येणार आहे. जागतिकीकरणाच्या प्रयत्नात जागतिक नेतृत्व करण्यावर विद्यमान अमेरिकन नेतृत्वाचा - डोनाल्ड ट्रंप यांचा- भर नाही. त्यामुळे मैदान साफ असून जागतिकीकरणाच्या क्षीण स्पर्धेत आपण प्रथम क्रमांकावर कसे राहू, हा चीनचा प्रयत्न असणार आहे.
 दूरवरचा विचार करणारा धूर्त चीन -  चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांनी २०१४ सालीच एशियन सिक्युरिटी सीस्टिमचे सूतोवाच केलेले आहे. शांघाय कोआॅपरेटिव्ह आॅर्गनायझेशनचे अध्यक्षपद त्यांच्याकडे येताच त्यांना आपली विश्वसनीयता व संपर्कक्षमता वाढविण्याची संधी आयतीच मिळेल. कझ्गस्तानने पूर्वी केव्हा तरी काॅन्फरन्स आॅन इंटरॲक्शन ॲंड काॅनफिडन्स बिल्डिंग मेझर्स इन एशिया (सीआयसीए) ची कल्पना मांडली होती. परस्पर व्यवहार व विश्वास निर्माण करण्याचा उद्देश या लांबलचक नावातच अनुस्यूत आहे. यात सहभागी देश म्हणून सार्क मधील सहभागी देश, गल्फ कोआॅपरेशन कंट्रीज (जीसीसी) यांचे सह चीन, रशिया, तुर्कस्तान, व्हिएटनाम, मंगोलिया व इस्रायल (हो, इस्रायल सुद्धा) समाविष्ट असतील. अर्थात ही आवळ्याची मोट आहे. पण यदाकदाचित व जेव्हा केव्हा ही संकल्पना प्रत्यक्षात उतरेल, तेव्हा नेतृत्व कुणाचे असेल? अर्थात चीनचे. चीनची पावले या दिशेने पडत आहेत.
भारताच्या मुत्सद्देगिरीची परीक्षा - शांघाय कोआॅपरेशन आॅर्गनायझेशनमध्ये भारताचा प्रवेश कोणत्या पृष्ठभूमीवर व परिस्थितीत होतो आहे, हे यावरून स्पष्ट होईल. बीआरआय (दी बेल्ट अॅंड रोड इन्शिएटिव्ह) हे युरोपियन व एशियन लोकांना अधिक जवळचे वाटावे असे नाव  चीनने ओबीओआरसाठी (वन रोड वन बेल्ट) योजले आहे. चीनच्या चतुरतेला याबद्दल दाद द्यायलाच हवी. या पृष्ठभूमीवर, बीआरआय म्हणा नाहीतर ओबीओआर म्हणा भारतापाशी अन्य पर्याय आहेत, हे मोदींनी जाणवून दिले हे बरे केले. कोणते आहेत, हे पर्याय? छाबहार हे इराणच्या किनाऱ्यावरील बंदर व इंटर नॅशनल नाॅर्थ- साऊथ ट्रान्सपोर्ट काॅरिडोर हे ते पर्याय आहेत. डोनाल्ड ट्रंप यांची इराणवर होत असलेली खपा मर्जी हा एकच अडसर संभवतो. त्यामुळे डोनाल्ड ट्रंप यांना हाताळण्यातही भारताची मुत्सद्देगिरी कसाला व पणाला लागणारआहे, हे मात्र लक्षात ठेवावयास हवे आहे.
शांघाय कोआॅपरेशन आॅर्गनायझेशनच्या (एससीओ) कझकिस्तानमधील अस्ताना येथील बैठकीत चीनने मोठ्या चतुराईने आपल्या बीआरआयचे बेल्ट ॲंड रोड इन्शिएटिव्हचे घोडे शेवटच्या दिवशी दामटलेच. चीनला युरोप व आफ्रिकेशी जोडणारा  हा महत्वाकांक्षी दळणवळण प्रकल्प आहे. भारतासारख्या नव्यानेच सदस्य झालेल्या देशाला  या मुद्याची चिंता वाटायलाच हवी. कारण हा मार्ग ज्या प्रदेशातून जाणार आहे त्यात गिलगीट व बाल्टीस्तान हा पाकव्याप्त काश्मीर मधील भाग येतो. हा कायद्यानुसार भारताचा भूभाग आहे. युरोप व आशियातील सर्वच संस्था/ सत्ता/संघटना यांना या प्रकल्पाशी जोडून घेण्याचा चीनचा मनसुबा आहे. हा मार्ग शांतता व संपन्नतेचाही वाहक असणार आहे, अशी चीनची मखलाशी आहे. म्हणूनच शांघाय संघटनेची सदस्यता, एक अमोल संधी, तशीच मुत्सद्देगिरीची परीक्षा घेणारीही आहे.

Tuesday, June 6, 2017

कहानीची कहाणी -एक संकलन
वसंत गणेश काणे

मी गेल्या अनेक वर्षापासून चित्रपट (घरी टीव्हीवर वा चित्रपटगृहात)पाहिलेले नाहीत.  दरम्यानच्या काळात चित्रपट निर्मितीचे तंत्र पार बदलले आहे. त्यामुळे कहानी हा चित्रपट मला धड समजला व कळलाच नाही. अगोदरच्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीतील मंडळींना ही अडचण येत नव्हती. म्हणून हा चित्रपट मी तीन/चारदा पाहिला, तरी धड वपूर्ण कळला नाही. म्हणून या चित्रपटाच्या पटकथेपासून, निर्मिती व समीक्षेपर्यंतच्या सर्व बाबींचा अभ्यास करण्याचे ठरविले.
पटकथा(कथानक)
कोलकाता मेट्रोच्या कंपार्टमेंटमध्ये विषारी वायूच्या सहाय्याने प्रवाशांना मारण्याचा कट यशस्वी होतो. दोन वर्षानंतर विद्या व्यंकटेश बाग्ची (विद्या बालन) नावाची व्यवसायाने साॅफ्ट इंजिनिअर असलेली गर्भवती महिला दुर्गा मोहोत्सवाच्या काळात लंडनहून कोलकाताला आपल्या बेपत्ता पतीच्या -अर्णव बाग्चीच्या- शोधात येते. पेललिस स्टेशनस्टेशनवरचा पोलिस आॅफिसर सत्यकी उर्फ राणा सिन्हा (परमव्रत चॅटर्जी) विद्याला मदत करण्याचे ठरवतो. नॅशनल डाटा सेंटरला (एनडीसी) सहाय्य करण्यासाठी अर्णव बाग्ची लंडनहून कोलकाताला आला होता,असे विद्या बाग्चीचे म्हणणे असते. पण पण सुरवातीच्या तपासात अशी कोणतीही व्यक्ती लंडनहून त्या दिवशीच्या विमानाने आलीच नसते, असे उघड होते.
नॅशनल डाटा सेंटरला (एनडीसी) ची मानव संसाधन विभाग प्रमुख अग्नेश डीमेलो (कोलीन बाग्ची) विद्याला सुचविते की, तिच्या नवऱ्यासारखा दिसणारा मिलन दामजी (इंद्रनील सेनगुप्ता) नावाचा एक माजी कर्मचारी असतो. पण त्याची माहिती असलेली फाईल बहुदा आता जुन्याएनडीसी आॅफिसमध्ये असावी. याबाबत काही अधिक माहिती अग्नेशकडून मिळण्याच्या आधीच बाॅब बिस्वास (सास्वत चॅटर्जी) नावाचा विमा एजंटच्या मिशाने नोकरी करणारा पण प्रत्यक्षात गुप्तपणे अतिरेक्यांना मदत  कामकरणारा हस्तक अग्नेश डिमेलोला मारून टाकतो. विद्या व पोलिस इन्सपेक्टर राणा एनडीसीच्या जुन्या आॅफिसमध्ये चोरकिल्लीने कुलूप उघडून प्रवेश करतात, मिलन दामजीची माहिती असलेला कागद फाईलमधून मिळवतात व बाॅब बिस्वासशी गाठ पडण्याआधीच जेमतेम बाहेर पडतात. तो हीच माहिती हस्तगत करण्यासाठी तिथे आलेला असतो. कोणीतरी मिलन दामजीची माहिती हस्तगत करण्याचा प्रयत्न करतो आहे, ही माहिती इंटेलिजन्स ब्युरोच्या (आय बी) दिल्लीच्या कार्यालयातील डेप्युटी खान (नवाझुद्दिन सिद्दिकी) याला व मुख्याधिकारी भास्करन के. (धृतिमन चॅटर्जी) यांना कळते. खान कोलकाताला येतो व मिलन दाजी हा फितूर इंटेलिजन्स ब्युरो (आय  बी) एजंट असून त्यानेच मेट्रोमध्ये विषारी वायू वापरून हत्या केल्या आहेत,असे उघड करून विद्याला त्याचा शोध घेण्याच्या भानगडीत तिने पडू नये, असे तिला बजावतो. पण विद्या शोध चालूच ठेवते. अर्णव बाग्ची व मिलन दामजी यांच्यातील साम्यामुळे तो अडचणीत आला असावा असे तिला वाटते.
मिलन दामजीचा पत्ता हस्तगत केलेल्या कागदावर असतो. विद्या व राणा पत्याच्या शोधात एका मोडकळीस आलेल्या फ्लॅटपर्यंत पोचतात. जवळच्याच चहावाल्याचा नोकर पोल्टू (रिद्धी सेन) एनडीसी चे चीफ टेक्निकल आॅफिसर आर श्रीधर (शांतीलाल मुखर्जी) हा मिलन दामजीला वारंवार भेटायला येत असे, असे सांगतो. बाॅब बिस्वास विद्याला मारण्याचा प्रयत्न करतो, पण असफल होतो, राणा त्याचा पाठलाग करीत असतांनाच बाॅब एका कार खाली येऊन मरतो. बाॅबच्या मोबाईलमध्ये विद्या व राणाला विद्याला मारण्याच्या सूचना देणारा आयपी ॲड्रेस मिळतो. ते एनडीसी चे चीफ टेक्निकल आॅफिसर आर श्रीधर (शांतीलाल मुखर्जी) याच्या आॅफिस कर्मचाऱ्याला - एन डीसीतील कर्मचारी सप्ना हिला (पामेला भुटोरिया)- वश करून शिरतात. व आयपी ॲड्रेसचा शोध घेतात पण ही माहिती इलेक्टाॅनिकली श्रीधरला कळते. झटापटीत श्रीधर विद्याच्या हातून मारला जातो. यामुळे गुन्हेगाराला जिवंत पकडण्याची खानची इच्छा असफल होते व तो चिडतो.
एनडीसी चा चीफ टेक्निकल आॅफिसर आर श्रीधर (शांतीलाल मुखर्जी) याच्या काॅम्प्युटर डेटामध्ये भास्करन के.(धृतिमन चॅटर्जी) चा फोन नंबर मिळतो.विद्या भास्करन ला फोन करून सांगते की, तिच्या हाती काही अतिसंवेदनशील माहिती लागली आहे, तिच्या बदल्यात भास्करने तिला आपला नवरा शोधण्याचे कामी मदत करावी. पण भास्करन तिला स्थानिक पोलिसांची मदत घेण्यास सांगतो. विद्याला एका अज्ञात क्रमांकावरून फोन येतो. तिला आपला नवरा जिवंत हवा असेल तर तिने ती कागदपत्रे फोन करणाऱ्याच्या स्वाधीन करावीत. खानला वाटते की फोन करणारा मिलन दामजीच असावा.
  विद्या मिलन दामजीला भेटायला जाते. तिच्या पाठोपाठ खान व राणाही तिच्या न कळत जातात. मिलन आपला नवरा स्वाधीन करू शकेल का, अशी शंका विद्या व्यक्त करताच मिलनला ती संवेदनशील माहिती देऊ शकेल वाटत नाही व तो परत फिरतो. विद्या त्याला अडवते. झटापटीत मिलन मिलन तिच्यावर पिस्तूल रोखतो. विद्या आपल्या पोटावरची कृत्रिम फुगीर पिशवी काढून ती मारून मिलनला नि:शस्त्र करते. आपण गर्भवती आहोत, हे दाखवण्यासाठी ती ही कृत्रिम पिशवी धारण करूनच कायम वावरत असते. आपली हेअर स्टिक वापरून त्याला जखमी करते व त्याच्याच पिस्तुलाने त्याला ठार मारते. पोलिस पिस्तुलाचे आवाज ऐकून धावत येतात. पण विद्या पळून निसटते व दुर्गा देवीच्या मिरवणुकीत दिसेनाशी होते. जाताजाता राणासाठी थॅंक्यू नोट व श्रीधरच्या काॅंम्प्युटर वरील डेटा असलेली पेन ड्राईव्ह ठेवून जाते. तिच्या आधारे भास्करनला अटक करणे शक्य होते. राणाला कळून चुकते की कुणी विद्या बाग्ची नसते किंवा कुणी अर्णव बाग्चीही नसतो.आपला हेतू साध्य करण्याकरिता विद्या पोलिस व आयबीचा उपयोग करून घेत असते.
   शेवटी आपल्या लक्षात येते की, अरूप बासू (अबीर चॅटर्जी) हा आयबी अधिकारी असतो. मिलन दामजी हा त्याचा सहकारी असतो. अरूप बासू (अबीर चॅटर्जी) मेट्रो विषारी  वायू हल्यात मरतो. विद्या आपल्या नवऱ्याचे -अरूप बासू (अबीर चॅटर्जी)- प्रेत पाहते व बेशुद्ध पडते व तिचा गर्भपात होतो. ती आपला नवरा व जन्माला न आलेला मुलगा यांच्या मृत्यूचा प्रतिशोध घेण्याच्या निश्चयाने कोलकात्याला येते. तिला सेवानिवृत्त आयबी अधिकारी कर्नल प्रताप बाजपेयी (दर्शन जरीवाला) मदत करतो. त्याला संशय असतो की, या प्रकरणी कुणीतरी वरिष्ठ अधिकारी सामील असला पाहिजे. तो आयबीचा मुख्याधिकारी भास्करन के.(धृतिमन चॅटर्जी) हाच असतो.

मध्यवर्ती कल्पना, कोलकाताची पृष्ठभूमी, पात्रे व त्यांची निवड
सुजय घोष यानी कादंबरीकार व स्क्रिप्ट रायटर अद्वैत काला यांना चित्रपटाची मध्यवर्ती कल्पना सांगितली. काला याना कोलकोतामधील अनुभवांनी उत्साहित केले होते. भाषेची अडचण, मोठ्या शहरातील गजबज व दारिद्र्य असले तरी गावातील वातावरण स्नेहयुक्त होते.त्यचे प्रत्यंतर चित्रपटात अनुभवाला येते. दिल्लीतील राॅ सारखी खाती, त्यांचा कारभार माहीत करून घेतला. अन्य माहिती नजरेखालून घालून संहिता तयार केली.
सुजय घोष यांनी अनेक सादरकर्त्यांच्या पायऱ्या झिजवल्या. पण तीन मुद्यांवर घोडे अडले. नायिका चित्रपटभर गर्भारपणी वावरणार, गौणपात्रे बंगाली असणार आणि कोलकाताची पृष्ठभूमी असणार.
प्रसन्नजित चॅटर्जी या बंगाली नटाने कोलकातमध्येच चित्रिकरणाचा आग्रह धरला. कोलकाताची निवड पुढील कारणास्तव झाली
१. निर्देशक कोलकाताशी परिचित होता.
२. शहरात नव्याजुन्याचा संगम होता.
३. कोलकाता मुंबई व दिल्लीपेक्षा स्वस्त होते.
घोष यांचे अगोदरचे दोन चित्रपट अल्लादीन व होम डिलिव्हरी फ्लाॅप गेले होते. कहानी ही शेवटची संधी होती. त्याने मित्राला कथानक वाचायला दिले होते. त्याने सीन्स चुकून मागेपुढे लावून स्क्रिप्ट परत केले. यातूनच कहानीतील ट्विस्ट आकाराला आला आहे.
चित्रपटातील पात्रे
विद्या व्यंकटेश बाग्ची (विद्या बालन)
सत्यकी - राणा सिन्हा (परमव्रत चॅटर्जी)
ए खान(नवाझुद्दिन सिद्दिकी)
मिलन दामजी(इंद्रनील सेनगुप्ता)
भास्करन के.(धृतिमन चॅटर्जी)
बाॅब विस्वास (सास्वत चॅटर्जी)
कर्नल प्रताप बाजपेयी (दर्शन जरीवाला)
अरूप बासू (अबीर चॅटर्जी)
एनडीसी चे चीफ टेक्निकल आॅफिसर आर श्रीधर (शांतीलाल मुखर्जी)
कालीघाट पोलीस स्टेशनचा कनवाळू इन्स्पेक्टर (खराज मुखर्जी)
अग्नेश डीमेलो (कोलीन बाग्ची)
गेस्ट हाऊसचा मालक,  दास (नित्य गांगुली)
गेस्ट हाऊसमधील नोकर विष्णू (ऋतुव्रत मुखर्जी)
एन डीसीतील कर्मचारी सप्ना (पामेला भुटोरिया)
मूर्तिकार कामगार व खबऱ्या परेश पाल- कल्याण चॅटर्जी
पोल्टू चहावाल्याचा कामगार- (रिद्धी सेन)
एन डी सी मधील सिस्टीम सुपरवायझर, रसीक त्यागी (मसूद अख्तर)

विद्या बालनला नायिका म्हणून घोष यांची पहिली पसंती होती. विद्या बालनने रूपरेषा ऐकून सुरवातीला नकार दिला. संपूर्ण कथानक ऐकल्यावर मात्र होकार कळवला.
राणाच्या भूमिकेसाठी चंदन राॅय सन्यालचे नाव होते पण व्यस्तपणामुळे त्याने नकार दिला व परमव्रत चॅटर्जीचे नाव राणाच्या भूमिकेसाठी पक्के करण्यात आले.

ए खानच्या भूमिकेसाठी नवाझुद्दिन सिद्दिकीची निवड झाली. प्रथमच भिकाऱ्याचा रोल करावा लागणार नाही, याचा त्याला आनंद झाला.
बाॅब विस्वासच्या भूमिकेसाठी सास्वत चॅटर्जीची होताच काॅनट्रॅक्ट किलर म्हणून रोल मिळाल्याचा त्यालाही आनंद झाला. हिंदी  चित्रपट सृष्टीत आपल्यापेक्षा चांगलेनट असतील, असे त्याचे मत होते पण घोष यांना त्याचा अभिनय आवडला होता.
विद्याच्या नवऱ्यासाठी बाॅलिवडमधील नट वगळून त्यांनी अबीर चॅटर्जीची निवड केली. बंगाली फिल्म व  टीव्ही कलाकारांची इतर भूमिकांसाठी निवड केली. घोष यांच्या अगोदरच्या दोन फिल्म्स फ्लाॅप गेल्यामुळे बाॅलिवुडचे प्रतिथयश कलाकार भूमिका करण्यास उत्सुक नव्हते.
कहानीची कहाणी -एक संकलन (भाग२)
व्यक्तिचित्रण
विद्या बालन - गर्भवती विद्या बाग्चीची भूमिका साकारण्यासाठी कृत्रिम पिशवी बांधून विद्या बालनने खोटे गर्भारपण धारण करण्याचा सराव केला. महिला डाॅक्टर व गर्भार महिलांच्या भेटी घेऊन तिने गर्भारपणातील जीवनशैली व मळमळ यांची माहिती करून घेतली. त्याचबरोबर गर्भारपणासंबंधीच्या पत्थ्यांची व समजुतींचीही माहिती करून घेतली. काॅलेजमध्ये शिकत असतांना तिने गर्भार बाईची भूमिका वठविली होती, हा अनुभव कामी आला.
बाॅब बिस्वास - सास्वत चॅटर्जीला बाॅब बिस्वासची सरावलेल्या खुन्याची भूमिका वठवायची होती. त्याने सभ्यपणाच्या सर्व सवयी आत्मसात केल्या.नखं घासण्याची सवय त्याने चाळा (मॅनेरिझम) म्हणून स्वीकारली होती. असे केल्याने टक्कल पडत नाही, अशी समजूत आहे. (हे फार उशिरा कळते आहे) ही भूमिका प्रेक्षकांना आवडली. ‘नोमोश्कार, आमी बाॅब बिस्वास...एक मिनीट’, हा संवाद लोकप्रिय झाला.
राणा - परमव्रत चॅटर्जी मूळचा शहरातला आहे. त्याला राणाची ग्रामीण पृष्ठभूमी आहे. त्याने पोलिस स्टेशन्सना भेटी दिल्या.त्यांचे काम, मानसिक घडण आणि आनुषंगिक सवयी समजून घेतल्या.
खान - एक क्रूर/कठोर/ निर्दयी, अहंमन्य/उद्धट, बेदरकार, मग्रूर व अर्थशून्य बडबड करणारा असा हा अधिकारी आहे. आपल्या बोलण्यावागण्याचा इतरांच्या भावनांवर काय परिणाम होईल, समाजावर काय परिणाम होतीय याची त्याला परवा नसते. दिसायला काडी पहिलवान, पण मनोनिग्रह, निष्ठा व देशभक्ती त्याच्या ठायाठायी भरलेली आहे. मात्र एवढ्या मोठ्या पदावरचा अधिकारी गोल्डफ्लेक सारख्या सिगरेटचा मामुली व स्वस्त ब्रॅंडचा शौकीन कसा? पण हाच ब्रॅंड त्याचा प्रारंभापासूनचा आहे. तो चित्रपटातही त्याने कायम ठेवला आहे, असे म्हणतात.
कहानीचे चित्रण
चित्रिकरणात चित्रपटात महिला एकमेकींच्या चेहऱ्यावर कुंकू फासतांना दाखवल्या आहेत. याला सिंदूर खेला असे नाव आहे. दुर्गा पूजेच्या मिरवणुकीत सवाष्ण महिला एकमेकींच्या चेहऱ्याला सिंदूर (कुंकू) फासतात. विद्याला स्वत:ची ओळख पटू नये यासाठीची ही विनासायास मिळालेली सोय होती. या मिरवणुकीत पाठवून दिग्दर्शकाने वेषांतराचा हेतू कोणताही कृत्रिम मार्ग न स्वीकारता साध्य केला आहे. यावेळचे शूटिंग (चित्रिकरण) गनिमी पद्धतीने केले आहे. मिरवणुकीत सहभागी महिलांना याचा पत्ताही नसतो. काही नट/नट्या यात बेमालुमपणे सामील झालेल्या दिसतात. कृत्रिम प्रकाशयोजनेला चित्रपटाच्या चित्रिकरणात फाटा दिलेला आहे. चित्रपटात कृत्रिम प्रकाशयोजना नाहीच, असे म्हटले तरी चालेल.
गेस्टहाऊस १० दिवसांसाठी ४०,००० रुपयांना भाड्याने घेतले होते. चित्रिकरणाचा सुगावा कर्मचाऱ्यांनी कुणालाही लागू दिला नाही. मोनालिसा हाऊस हे एक झिरो स्टार गेस्टहाऊस फाटक्या रजिस्टरसह साकारले आहे.
कथानकाची विशेषता - विद्या बालनची ही चौथी नायिकाप्रधान कथा आहे. पुरुषप्रधान समाजात एक महिला आपला स्वतंत्र प्रभाव निर्माण करते, हे आपण पाहतो. पण तिचे स्त्रित्व कायम आहे. आपल्या मातृत्वाचा (त्याच्या अभावाचा सुद्धा) तिला विसर पडलेला नाही.
  राणा व विद्या यातील संयमित शृंगार(रोमान्स) हे चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. त्याच्या धावत्या हजेरीची पखरण अनेकदा दिसते. पण त्यायोगे रसहानी किंवा औचित्य हानी होत नाही.पुरुष गर्भार स्त्रिच्याही प्रेमात पडू शकतो तर! विद्याचे संगणक नैपुण्य पाहून राणाला वाटणारे आश्चर्य, कौतुक प्रगट करण्यास त्याचे विस्फारलेले डोळेच पुरेसे आहेत.
   पिवळ्या टॅक्स्या व गर्दी कोलकात्याचा विसर पडू देत नाहीत. गर्दीतील नागरिक आस्था विसरत नाहीत. बंगाल म्हटले की, बाॅलिवुड उच्चारणावर विनाकारण जोर, शंखध्वनि, रसगुल्ला (निदान मिस्टी तरी) यांचा अवाजवी वापर असतो. यात तसे नाही.  कोलकाताचे जनजीवन, रस्ते, वाहतुक (मेट्रो, मानवी रिक्षा, प्वळ्या टॅक्सीज, बोळी बोळकंडी) व राहणीमान यांचे यथातथ्य चित्रण पहायला मिळते.
चित्रपटात दुर्गापूजेलाही महत्वाची भूमिका आहे. महिशासुराचा वध करणाऱ्या दुर्गेप्रमाणे  मिलन दामजीला शासन करणारी विद्या  यातील साम्यही जाणवते. एक अवतार कार्य संपताच जलाशयात परत जाते तर दुसरी जनसागरात लुप्त होते.
  अगोदरचे इतर चित्रपट व कहानी यात काही साम्यस्थळेही समीक्षकांच्या नजरेतून सुटलेली नाहीत. रनिंग हाॅट वाॅटर, विद्याच्या गेस्ट हाऊसमधील हालचाली, स्वच्छतेचे निमित्त साधून आपल्या वावराच्या खुणा पुसणे, कुठेही स्वत:ची स्वाक्षरी येऊ न देणे (हाॅटेलमध्ये खोली बुक करतांना व एफ आयआर दाखल करतांना), खोटे गर्भारपण या गोष्टी नव्यानेच व प्रथमच याच चित्रपटात आल्या आहेत, असे नाही. पण दरवेळी विद्यासोबत प्रेक्षकांना आपणही तिच्या सोबत प्रवास करीत असल्याचा अनुभव येईल, याची काळजी दिग्दर्शकाने घेतली आहे.
संगीत व ध्वनिमद्रण
चित्रपटात एकूण सहा गाणी आहेत. ती तीन निरनिराळ्या गीतकारांती आहेत.बंगाली ढंगाने जाणारी गाणी सारखीच वाटतात. उषा उत्थप, विश्वेश कृष्णमूर्ती, जावेद बशीर, श्रेया घोषाल हे काही गायक सांगता येतील. अमिताभ बच्चनने गायलेले एकला चलो रे हे गाणे व विद्याची एकटीची धडपड यातील साम्य जाणवते.  शब्दांच्या अर्थाला भावनिक उभारी मिळावी म्हणून ध्वनीचा आधार घेतला जातो. पण कधीकधी मूळ शब्दच ऐकू येत नाही. तसेच पात्रांचे रडणे व बोलणे एकाचवेळी असू नये असेही वाटते. एकतर बोलून मग ढसाढसा रडावे किंवा रडून झाल्यावर बोलावे, असे मला नेहमीच वाटते.
वितरण व व्यवस्थापन
कहानी ९ मार्च २०१२ ला महिला जागतिक दिनी जनतेच्या भेटीला आली.पोस्टरवरीव विद्याचे गर्भवती रूप नायिकेचे शृंगारिक रूप नसूनही रसिकांना भावले. उशी पोटाशी धारण करून विद्या प्रचार कार्यक्रमात जायची, रात्री अपरात्री सार्वजनिक ठिकाणी फेरफटका मारायची,आपल्या मृत नवऱ्याचा फोटो दाखवून, ‘आपण यांना पाहिलत का?’, म्हणून विचारायची. मध्येच एक नवीनच भानगड समोर आली. विद्याला मेट्रोखाली ढकलण्याच्या दृश्याचे वाईट परिणाम होतील, असा आक्षेप मेट्रोने घेतला. म्हणून ट्रेलरमधून हे दृश्य कापण्यात आले. पण चित्रपटात सहज चालून गेले.
कहानीचा पहिला प्रयोग ‘हाऊस फुल्ल’ झाला नाही. पण तोंडी प्रसिद्धीने (माऊथ पब्लिसिटी) प्रतिसाद वाढत गेला.
पारितोषिके
फिल्म फेअर ॲवाॅर्ड्स ५ अ) बेस्ट ॲक्ट्रेस - विद्या बालन, ब) बेस्ट डायरेक्शन - घोष
अशी अनेक पारितोषिके खेचून आणली.
परिणाम
चित्रपट सृष्टी कोलकाताकडे वळली.
मेट्रो, ट्रॅम्स, मानवाने ओढायच्या रिक्षा,गल्ल्लया व बोळी, रस्त्यावरच्या खाद्यपदार्थांच्या टपऱ्या, टोलेजंग इमारती, मोडकळीला आलेली घरे,गंगा घाट, हावरा ब्रिज, कालिघाट मंदीर, कुमोर्तुली हा शिल्पे तयार करणारा भाग, मोनालिसा गेस्ट हाऊस परिचित झाले
रिमेक्स
कहानीचे तेलगू, तमिळ व इंग्रजी भाषेत रिमेक्स झाले आहेत.
 (हे मुख्यत: संकलन आहे. काही माझ्याही टिप्पण्या आहेत. पण त्या तशा खूप महत्वाच्या नाहीत. हे संकलन वाचणाऱ्यांनी पुन्हा एकदा कहानी पहावा, अशी शिफारस आहे. अधोरेखित करव्यात, अशा इतर आणखी अनेक जागा नक्कीच सापडतील.)


‘फ्राॅम युरोप विथ लव्ह’
वसंत गणेश काणे

‘फ्राॅम रशिया विथ लव्ह’, हा इव्हान फ्लेमिंगच्या कथेवरील जेम्स बाॅंडच्या चाहत्यांचा आवडता चित्रपट आहे. रशियाला भारताचा मित्र समजायचे की शत्रू? याचे उत्तर देणे कठीण आहे. कारण राजकारणात स्थायी मैत्री व शत्रुत्व नसतेच. असतात ते स्थायी हितसंबंध. सर्व राष्ट्रांची धडपड या दिशेनेच असते. रशियाबद्दलच कशाला? संपूर्ण युरोपलाही हेच लागू पडते. जर्मनी, स्पेन, रशिया व फ्रान्स या देशांना मोदींनी नुकतीच भेट दिली आहे. काय फलित आहे या भेटीचे? या दौऱ्याला ‘फ्राॅम युरोप विथ लव्ह’, असे शीर्षक दिले तर ते योग्य होईल का? ते ज्याचे त्याने ठरवावे, हेच बरे.
जर्मनीला मोदींनी भेट दिली त्या अगोदरची स्थिती
 अमेरिका व जर्मनी यातील सध्याचा व्यापार अमेरिकेसाठी तुटीचा ठरत असून नाटो या संरक्षण करारासाठी जर्मनीने वाढीव वाटा उचलला पाहिजे, असे डोनाल्ड ट्रंप यांनी पुन्हा एकदा ट्विट करून म्हटले आहे.
  डोनाल्ड ट्रंप यांची जर्मनीची पहिली वहिली भेट यशस्वी झालेली दिसत नाही, हे यावरून स्पष्ट व्हावे. सौदी अरेबिया, इस्रायल, ब्रुसेल्स, इटाली असा दौरा करून जी७ साठी ते जाऊन आले आहेत. ‘जर्मनी बरोबरच्या व्यापारात तर फार मोठी  तूट आहेच. शिवाय नाटो निमित्तच्या खर्चाचा फारच कमी हिस्सा जर्मनीकडून येत असतो. यात आम्ही बदल केल्याशिवाय राहणार नाही’, असे ते म्हणत आहेत.
जर्मनीच्या चान्सेलर यामुळे विलक्षण संतापल्या असून यापुढे ब्रिटन व अमेरिकेला यापुढे भरवशाचे साथीदार मानता येणार नाही, अशी जळजळीत प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
‘अटालांटिक सागराशी संबंधित राष्ट्रांशी असलेले स्नेहसंबंध आमच्यासाठी सर्वतोपरी असले तरी प्राप्त सद्यपरिस्थितीत आम्ही युरोपियनांनी आपल्या भवितव्याचा विचार आमचा आम्हीच केला पाहिजे. युरोपने स्वबळावर आंतरराष्ट्रीय भिडू बनले पाहिजे’, असे काहीसे नाइलाजाने व विषादाने  ॲंजेला मर्केल म्हणाल्या आहेत.
  जर्मन परराष्ट्र मंत्री सिग्मर गॅब्रियल यांची टिप्पणी तर आणखी परखड होती. ‘अमेरिकन अध्यक्षांना दूरदृष्टीच नाही. संपूर्ण पाश्चात्य जगताला त्यांनी अधू केले असून ते युरोपच्या तर मुळावच उठले आहेत’, असा त्यांचा ट्रंप यांना अहेर आहे.
   जी ७ देशांनी डोनाल्ड ट्रंप यांना २०१५ च्या पॅरिस पर्यावरण कराराला अनुसरण्याचा आग्रह परोपरीने करून पाहिला. पण व्यर्थ! नाटोचे तर एकूण २८ सदस्य देश आहेत. त्यापैकी २३ वर डोनाल्ड ट्रंप चांगलेच बरसले आहेत. ‘या देशांनी आपला खर्चाचा वाटा पुरेशा प्रमाणात आजवर उचललेला नाही. त्यांनी तो उचलला पाहिजे’, असे ट्रंप म्हणतात. या २३ मध्ये त्यांनी जर्मनीचाही समावेश केला आहे.
  सौदी अरेबियाबरोबरच्या चर्चेत अमेरिकन इतिहासातील सर्वात मोठा सैन्यसामग्रीपुरवठा करार केला आहे. जहाजे, रणगाडे व क्षेपणास्त्रे पुरवण्याच्या या करारामुळे अमेरिकेची निदान दहा वर्षांची तरी उत्पन्नाची बेगमी झाली आहे. पण या कराराचा दुसराही एक पैलू असा आहे की, आता निदान दहा वर्षे मध्यपूर्वेतील जखमा भळभळत राहतील. पण ट्रंप यांना त्याचे काय?
  जर्मन परराष्ट्र मंत्री सिग्मर गॅब्रियल यांनी डोनाल्ड ट्रंप यांच्यावर युरोपातील शांततेला बाधा पोचेल, अशी कृती त्यांनी केली आहे, असा आरोप केला आहे. पर्यावरणविषयक पत्थ्ये न पाळणारा, अगोदरच धुमश्चक्रीत भाजल्या जात असलेल्या प्रदेशात शस्त्रास्त्रे ओतणारा व धार्मिक तेढ राजकीय मार्गाने सोडविण्याचा आग्रह न धरणारा हा अमेरिकन अध्यक्ष युरोपातील शांततेला धोका निर्माण करतो आहे,असे परखड मत त्यांनी नोंदविले आहे.
  विद्यमान अमेरिकन प्रशासनाची सध्याची ही वर उधृत केलेली धोरणे ऱ्हस्व दृष्टीची ( शाॅर्ट सायटेड) असून ती युरोपच्या हितसंबंधांना बाधा पोचविणारी आहेत. त्यामुळे पाश्चात्य जग आता आक्रसलेले व अशक्त झाले आहे.
अमेरिका युरोपचा परंपरागत, निकटचा व भरवशाचा साथीदार होता. पण या संबंधात सध्या प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.
  जर्मन चान्सेलर ॲंजेला मर्केल यांनी युरोपला स्वावलंबनाचा नारा दिलेला असला तरी जुन्या साथीदाराला सोडून पूर्वेकडे नवीन मित्र शोधण्याचा आपली भूमिका नाही, असेही जाणवून दिले आहे. परिस्थितीत बदल होईल, अशी आशा त्या बाळगून आहेत.
   जर्मनीतून अमेरिकेला मोटारींची निर्यात होते. यावर डोनाल्ड ट्रंप यांनी रोष व्यक्त केला आहे. ब्रुसेल्स बैठकीत त्यांनी जर्मनीवर चांगलेच तोंडसुख घेतले असून जर्मन लोक वाईट, अतिशय वाईट आहेत, असे ते सर्वासमक्ष व जाहीररीत्या म्हणाले आहेत. पण गरजवंताला आशा सोडून चालत नाही, हेच खरे.
पहिला टप्पा - जर्मनी
 नेमक्या या वेळी मोदींचा युरोपचा दौरा ठरला आहे. युरोपियन युनियनला बरेच धक्के व झटके बसले असल्यामुळे सध्या भारत युरोपात जणू नव्याने प्रवेश करतो आहे, अशी स्थिती आहे. यावेळी युरोपमध्ये फार मोठी उलथापालथ होते आहे. ब्रिटन युरोपातून बाहेर पडते आहे. डोनाल्ड ट्रंप नवनवीन क्लृप्त्या योजून युरोपातील संबंधाची समीकरणे वेगळ्या प्रकारे आखू पाहत आहेत, पूर्वेकडील चीन आक्रमक विस्तारवादी धोरणे आखतो आहे. चीनच्या रडारवर भारत तर आहेच पण त्याची नजर युरोपवरही खिळलेली आहे. त्याच्या बेल्टचा विळखा युरोपच्या दिशेनेही सरकतो आहे.
   शेनगेन व्हिसा - भेटीसाठी मोदींनी शेनगेन व्हिसाचा चातुर्याने उपयोग केला आहे. या व्हिसाच्या आधारे तुम्ही शेनगेन प्रदेशात प्रवास करू शकता. शेनगेन प्रदेशात २६ देश येतात. हा व्हिसा असेल तर हे २६ देश जणू एक देशच मानले जातात व तुम्ही विनासायास कुठेही प्रवास करू शकता. मोदींनी जर्मन चान्सेलर ॲंजेला मर्केल यांची भेट घेताघेताच स्पष्ट केले की, ते एकसंध युरोपचे पुरस्कर्ते आहेत, तसेच जर्मनीतील खंबीर नेतृत्वाचे चाहते आहेत. हाच संदेश देत ते स्पेन व फ्रान्सलाही गेले आहेत. या तीन देशांची विशेषता ही आहे की, ब्रिटन युरोपियन युनियन मधून बाहेर पडल्यानंतर जर्मनी, फ्रान्स व स्पेन या तीन देशांचे अर्थकारणच युरोपातील संमृद्ध अर्थकारण मानले जाते. हे देश व्यापारासाठी नवीन व भरवशाच्या विकसनशील देशांच्या शोधात आहेत. चीनबाबत या देशांची भूमिका दुहेरी (ॲंबिव्हॅलंट) आहे. व्यापारासाठी त्यांना चीन हवासा आहे पण त्याच्या आक्रमक व  विस्तारवादी भूमिकेमुळे त्याच्यापासून दोन हात दूर राहिलेच बरे, असेही त्यांना वाटते आहे. पण तरीही भारताच्या तुलनेत त्यांची चीनला जास्त पसंती आहे. कारण चीनचे अर्थकारण भारतापेक्षा खूप मोठे आहे.
  युरोपकडे पाहण्याची भारताचीही एक वेगळी दृष्टी आहे. २७ देशांच्या अगडबंबब युरोपियन युनियन पेक्षा यापैकी प्रत्येकाशी द्विपक्षीय करार करणेच भारतासाठी अधिक सोयीचे आहे. पण गाजावाजा न करता मोदी शांतपणे एकेकाशी गाठभेट घेऊन द्विपक्षीय करार करीत सुटले आहेत. पण त्याचवेळी आपण संयुक्त युरोपाच्या बाजूचे आहोत, हे सांगायला ते चुकत नाहीत. ‘मोदी टचचे’ आणखी एक उदाहरण म्हणून याकडे पाहता येईल.
  मोदींनी ॲंजेला मर्केल यांची शहाण्या व समर्थ नेत्री या शब्दात तोंड भरून स्तुती केली आहे. त्यांच्या ज्ञानाचा मला फायदा होईल, असेही ते म्हणाले आहेत. मर्केल व फ्रान्सचे नवनिर्वाचित अध्यक्ष मॅक्राॅन ही जोडगोळी या पुढे युरोपीय राजकारणाला आकार देणार आहेत, हे जाणून मोदींच्या डायरीत जर्मनीच्या मर्केल यांच्याप्रमाणेच फ्रान्सच्या नवनिर्वाचित अध्यक्षांचीही- मॅक्राॅन यांचीही-  नोंद केलेली दिसते आहे.
   माजी अमेरिकन अध्यक्ष बराक ओबामा व मोदी यांचे विचार पर्यावरण या विषयाबाबत बरेचसे जुळत होते. डोनाल्ड ट्रंप यांचे तसे नाही. त्यामुळे युरोपियन युनियनशीच मोदींची या प्रश्नाबाबत सहमती असेल. तंत्रज्ञानाबाबतही युरोपियन युनियनशीच जवळीक साधली जाईल व व्यापारविषयक करारही होतील, मग ते डोनाल्ड ट्रंप यांना ते आवडोत किंवा न आवडोत.
    या प्रश्नाला  दुसरीही एक बाजू आहे. चीनच्या संकल्पित अनेक बेल्टपैकी एक रेल्वे मार्ग युरोपच्या दाराशी येऊन ठेपणार आहे. नुसती रेल्वेच येणार नाही तर सोबत एक वेगळी शासनव्यवस्था व मूल्येही सोबत घेऊन येणार आहे. हे घडायला जो काही अवकाश आहे/असेल तेवढ्या कालावधीत भारताने युरोपशी स्थायी व्यापारसंबंध स्थापन केले पाहिजेत. चीनपेक्षा हा नवीन सहकारी बरा व व्यापार करण्याचे दृष्टीने अधिक सोयीचा आहे, असे युरोपियन देशांना वाटले पाहिजे. चीन युरोपियन युनियनवर दडपण आणून व्यापारविषयक करार करू शकतो ही शक्यताही लक्षात घ्यायला हवी. म्हणूनच चीनचा वन बेल्टवन रोड या विषयावर मोदी व मर्केल यांच्यात बराच वेळ चर्चा झाली असावी. दोघांनाही याबाबत वाटणारी चिंता सारखीच म्हटली पाहिजे. पण तरीही भारताच्या तुलनेत चीनच्या  बाजारपेठेचेच आकर्षण त्यांना जास्त आहे, ही आश्चर्य वाटावे अशी बाब आहे.
  आज अमेरिका केव्हा कोणते धोरण स्वीकारेल, याची खात्री नाही. सत्ता समतोलासाठी अमेरिका पूर्वेत (जपान, दक्षिण कोरिया, व्हिएटनाम) जशी धडपडते आहे, तसेच भारताला पाश्चात्यांबाबत करायला हवे आहे. पण हे करतांना युरोप व अमेरिका या कुणाचाही पापड मोडता कामा नये, ही काळजीही घ्यावी लागेल. हे आटोपते न आटोपते तोच रशियाच्या पुतिनशी गाठभेट व्हायची आहे. यानंतर लगेचच मोदींना डोनाल्ड ट्रंपशी चर्चा  करायची आहे. मग लगेच वेळ आहे ब्रिक्स परिषदेची. मुख्य म्हणजे तिथे चीन असणार आहे. भारत बेजिंग बैठकीला आपण आग्रह करूनही आला नव्हता, हे चीन विसरलेला नसेल. चीन तसेही कधीच काहीच विसरत नसतो. नंतरची भेट आहे लगेच सप्टेंबरमध्ये जपानच्या पंतप्रधान शिंझो अबे यांचेशी. यापैकी प्रत्येक देश जसा  वेगळा असणार. तशीच प्रत्येकाची तऱ्हाही वेगळीच असणार. प्रत्येकाचा मुखंडही वेगळा. त्यामुळे या भेटीगाठीत मोदींच्या संयमाबरोबरच त्यांच्या मुत्सद्देगिरीचीही परीक्षाच आहे.
  ॲंजेला मर्केल - या पृष्ठभूमीवर प्रारंभ किंवा बोहोनी म्हणून जर्मनीसोबत झालेले सात की आठ करार समाधानकारक ठरतील. सायबर सुरक्षा, शहरी विकास, व्यवसाय शिक्षण, डिजिटायझेशन, आणि पायाभूत सोयीसुविधा हे सर्व विषय भारतासाठी विशेष जिव्हाळ्याचे आहेत. याबाबतची द्विपक्षीय बोलणी उभयपक्षी समाधानकारक झाली आहेत. लगेच मोदींनी भारत व जर्मनी यांना ‘मेड फाॅर इच अदर’, म्हणून संबोधन करून समाधानाची पावती दिली. तर ॲंजेला मर्केल यांना भारत भरवशाचा साथीदार (रिलायेबल पार्टनर) वाटला. कदाचित म्हणूनच आपण केवळ द्विपक्षीय करार करूनच थांबायचे नाही तर जागतिक व्यवस्थेला योग्य आकार देऊया, असे म्हणून त्यांनी पुढची पायरी गाठली आहे. त्यांच्या या दूरदृष्टीची मोदींनीही आस्थेने दखल घेतली.
   नोंद घ्यायला हवी ती या बाबीची की, याच काळात डोनाल्ड ट्रंप यांनी एकतर्फी व्यापार व नाटोबाबत अपुरा आर्थिक सहभाग या मुद्यांवर टीकेची झोड जर्मनीविरुद्ध उठविली होती. पण  तरीही ॲंजेला मर्केल यांनी प्रत्युत्तर न देता या सर्व करारांना ऐतिहासिक महत्व आहे, एवढेच म्हणून याबाबत जास्त बोलण्याचे नाकारले व आपल्या मुत्सद्देगिरीचा परिचय दिला.
   पॅरिस पर्यावरण परिषदेबाबत मोदी यांनी व्यक्त केलेले मत त्यांच्या मुत्सद्देगिरीची साक्ष पटविणारे आहे. हा करार टिकतो की मोडतो, अशी स्थिती निर्माण झाली आहे. हा करार झाला नसता तरी भारताची स्वच्छ व शुद्ध पर्यावरण निर्मिती व रक्षणासाठी बांधिलकीच राहिली असती व पुढेही राहील, असे सांगून त्यांनी स्पष्ट केले की, भारताची शिकवणच मुळी निसर्गाचे दोहन करण्याची आहे शोषण करण्याची नाही. कोणत्याही राजकारण्याला भावी पिढ्यांचे जीवन दोलायमान होईल, असे काहीही करण्याचा अधिकार नाही, असेही त्यांनी बजावले. उर्जेचा पुनर्वापर करण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू सुद्धा झाली आहे, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत.
  पॅरिस परिषदेतील उद्दिष्टांचे महत्व मोदींनी विशद केले. भारत त्याचे अनुसरण करील, हेही स्पष्ट केले. विकसनशील देशांची बाजू त्यांनी जोरकसपणे मांडली. स्वत: आतापर्यंत पर्यावरणाची ऐशीतैशी करणाऱ्यांनी विकसनशील देशांवर अवाजवी बंधने घालण्याचा प्रयत्न करू नये, असे त्यांनी निक्षून सांगितले.
  भारत व जर्मनी यांनी एकमेकाच्या देशातील कंपन्यांना आपापल्या देशात सारख्याच सोयीसवलती द्याव्यात, ही मोदींची सूचना जर्मनीने मान्य केली.
 भारत व युरोपियन युनियन यांच्या प्रतिनिधींची बैठक जुलैमध्ये होऊ घातली आहे. भांडवल गुंतवणुकीबाबचे आजवरचे ८६ देशांशी केलेले करार भारताने रद्द केले असून आता निरनिराळे देश स्पर्धात्मक भूमिकेत येतील व व्यापारी करार तातडीने पार पाडतील, अशी आशा भारताला आहे.
  जर्मन उद्योजकांनी करार रद्द झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यामुळे लहान उद्योजकांना अडचणींचा सामना करावा लागेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. यावर मोदी म्हणाले की, आमची भूमिका सकारात्मक असेल. तसेही जर्मन कंपन्यांशी व्यवहार करणे आम्हाला आवडतेच.
या अगोदर झालेल्या अनौपचारिक चर्चेत ब्रेक्झिटचा भारत व युरोपियन युनियन या वरील संभाव्य परिणामांवर विचारविनिमय झाला.
स्पेन
पिटर्सबर्गला जाण्यापूर्वी मोदींनी माद्रिद येथे स्पेनच्या शीर्षस्थ नेत्यांशी चर्चा केली. शांतता व सुरक्षेसाठी दहशतवादाशी लढा देण्याबाबत दोन्ही देशांच्या नेत्यात एकमत झाले. नरेंद्र मोदी व मारियानो राजाॅय यांच्या संयुक्त पत्रकात सर्व स्वरुपातील दहशतवादाविरुद्ध लढा देण्याच्या प्रश्नावर एकमत झाल्याचे नमूद करण्यात आले. भारत व स्पेन दरम्यान सायबर सुरक्षा, तांत्रिक सहकार्य यासह एकूण सात करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. आजमितीला स्पेन ही युरोपियन युनियनमधील जर्मनी व फ्रान्स नंतरची तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक शक्ती आहे.  द्विपक्षीय आर्थिक करार म्हणूनच महत्वाचे आहेत. १९८८ नंतर स्पेनला भेट देणारे मोदी पहिलेच पंतप्रधान आहेत.
रशिया
जर्मनी व स्पेननंतर मोदी रशियातील १८ व्या द्विपक्षीय शिखर परिषदेत सहभागी झाले. म्हणजे गेल्या सत्तर वर्षात या दोन देशांचे राष्ट्रप्रमुख एकमेकांना भेटण्याची ही १८ वी वेळ आहे. वास्तवीक पाहता मोदींनी रशियन वृत्तपत्र रोसियास्काया गॅझेटमध्ये व रशियाच्या व्लादिमीर पुतिन यांनी टाईम्स आॅफ इंडियामध्ये लेख लिहून या मैत्रीसंबंधात खूपच गोडवे गाणारे लेख सोदाहरण लिहिले आहेत. मोदी लिहीतात, भारत व रशिया यांची मैत्री काळाच्या कसोटीवर उतरली असून ती उत्तरोत्तर अधिकाधिक बळकट होत आहे. यावर उत्तरादाखल पुतिन लिहितात, आपली  जनता एकमेकांच्या सांस्कृतिक मूल्ये व संस्कृती याबद्दल  सहानुभूती व आदर बाळगून आहे.
 एकेकाळी भारत व रशियातील मैत्रीला एक मानसशास्त्रीय  व तात्त्विक आधार होता. पण तो आज भूतकाळ आहे. दोन्ही नेत्यांच्या लेखात सहकार्याची क्षेत्रे कोणती आहेत, त्यांचा उहापोह आहे. पण त्याला आता फक्त व्यापारी व उपयुक्तताप्रधानता ( युटिलिटेरियन) स्वरूप आले आहे. रशिया याक्षणी भारताचा न मित्र आहे न शत्रू. या दोन देशात फक्त व्यापारी संबंध आहेत. हेही वाईट नाही. पण चांगले वाईट कशाच्या तुलनेत सांगायचे? पूर्वीसारखे खास दोस्तीचे संबंध आता राहिलेले नाहीत, याची उभयपक्षी जाण आहे.
   नवीन त्रिकोण - रशिया - पाकिस्थान व चीन अशी नवीन मित्रता उदयाला येते आहे, हे सत्य आहे. कारण असे की, अमेरिका व नाटोला तोंड द्यायचे असेल तर ही गट्टी भौगोलिक व सामरिक दृष्ट्या आवश्यक आहे, असे रशियाला वाटते. मोदींशी करार करण्यास रशिया उत्सुक आहे पण जर तो फायदेशीर असेल तर, तसेच रशियाच्या ढासळत्या आर्थिक स्थितीला त्यामुळे उभारी येणार असेल तर आणि तरच.
  तसेच पुतिन म्हणजे गोर्बाचेव्ह नाही. गोर्बाचेव्ह यांनी सोव्हिएट रशिया मोडीत काढला. पुतिन रशियन साम्राज्य पुन्हा स्थापन करण्याची महत्वाकांक्षा बाळगून आहेत. ते सर्वच नाही पण उपयोगाचे, महत्वाचे व संपन्न भाग कोणत्याही मार्गाने जोडून घेण्याच्या खटाटोपात आहेत.  या वचनामुळेच ते आज रशियात लोकप्रिय आहेत.
पॅन सिनिका - तर दुसरीकडे चीनच्या विद्यमान अध्यक्षांचे स्वप्न आहे, पॅन सिनिका - जगात शांतता निर्माण करू शकेल इतका शक्तिशाली चीन उभारण्याची. १५०० वर्षांपूर्वी चीनमध्ये असे सामर्थ्य होते, असे चिनी मानतात. या मुद्याच्या आधारे त्यांना आपले चीनमधील अध्यक्षपद टिकवायचे आहे. त्यांना स्वेच्छानिवृत्ती ( म्हणजे त्यांना वाटेल तेव्हाच निवृत्ती) हवी आहे.
   पुतिन यांचे चिनी अध्यक्षांशी खरे तर वावडे आहे. पण चीनचे सध्याचे धोरण त्यांना सोयीचे वाटते आहे, असे जपानी निरीक्षकांचे विश्लेषण आहे. चीनची आजची धोरणे भौगोलिक व आर्थिक दृष्ट्या रशियाला सोयीची आहेत. म्हणून उद्या भारत- पाकिस्थानबाबतचा प्रश्न उपस्थित झाला तर आपल्याला चीन व रशिया या दोघांपैकी कोणाचीही खात्री देता येणार नाही. दोन्ही देश आपल्याला सोयीची असेल तीच भूमिका घेतील.
मोदी, पुतिन व चिनी अध्यक्ष अनुक्रमे ६६, ६४ व ६३ वर्ष वयाचे म्हणजे वयाने बरोबरीचे आहेत. जगातील तीन सामर्थ्यशाली व मोठ्या देशांचे नेतृत्व ते आज करीत आहेत. पण मोदींच्या आकांक्षा भारतीय सीमेपुरत्याच सीमित असल्यामुळे, ते या तिघात सौम्य ठरतील. चिनी अध्यक्ष व पुतिन आपापली महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जातील. म्हणून पुतिन जुन्या संबंधाबाबत लंब्याचौड्या बाता मारतील पण त्यापुढे जाणार नाहीत, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.
  रशियाशी व्यापार वाढवता आला तर ते उत्तमच म्हटले पाहिजे. पण रशिया आता १९९१ पूर्वीचा एकसंध रशिया राहिलेला नाही, त्याचे विघटन झाले आहे, पुतिन सर्व नाही पण महत्वाचे व संपन्न भाग कोणत्याही मार्गाने जोडून घेण्याच्या खटाटोपात आहेत. ही बदलेली परिस्थिती विसरून चालणार नाही. बदललेल्या रशियाची खात्री पटविणारी एकापेक्षा जास्त उदाहरणे देता येतील.
रशियाच्या भूमिकेत झालेला बदल -
१. विघटनानंतर रशियाची सुरवातीला चीन व पाकिस्थानशी जवळीक वाढली, एवढेच होते, तोपर्यंत ठीक होते. पण २०१४ मध्ये पाकिस्थानवरील शस्त्रपुरवठ्यावरची बंदी रशियाने मागे घेऊन एम-३५ ही शस्त्रसज्ज हेलिकाॅप्टर्स पाकिस्थानला देऊ केली. एवढेच नव्हे तर संयुक्त लष्करी सरावही पाकिस्थानी सैन्याबरोबर केला. विशेष म्हणजे उरी हल्यानंतर लगेचच हे घडले.
२. रशियाने भारताच्या समाधानाखातर म्हटले की, हेलिकाॅप्टरांचा पुरवठा ही तशी क्षुल्लक बाब आहे आणि संयुक्त लष्करी कवायतीबद्दल म्हणायचे तर उरीची घटना घडली त्याच्या कितीतरी अगोदर ठरलेला असा हा पूर्वनियोजित कार्यक्रम होता. गोवा येथे २०१६ च्या आॅक्टोबर मध्ये ब्रिक्स  देशांची परिषद भरली असता पुतिन व मोदी यात चर्चा होऊन १६ करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. म्हणजे फिटंफाट झाली का?
   यात ट्रायंफ नावाची जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी मिसाईल्स व २२६ टी जातीच्या २०० हेलिकाॅप्टरांची निर्मिती प्रकल्प उभारणे समाविष्ट आहे. अकुला जातीची सबमरीन लीजवर देण्याचेही रशियाने मान्य केले आहे. एकतर हा समजूत काढण्याचा प्रकार झाला व दुसरे असे की हा व्यापारी देवघेवीचा करार आहे. जुन्या स्नेहसंबंधांची व या करारांची जातकुळी वेगळी आहे. ते असो पण रशियाने भारताची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला, हे मात्र खरे आहे.
३. पण गोवा कराराची शाई वाळते न वाळते तोच रशियाने भारतावर फार मोठा आघात केला. २०१६ च्या आॅक्टोबरमध्येच रशियाने भारताला वगळून, चीन व पाकिस्थान यांची बैठक अफगाणिस्थान व तालिबान यात  शांतता प्रस्थापित करण्याच्या हेतूने विचार करण्यासाठी बोलविली. भारताचे अफगाणिस्थानशी असलेले पूर्वापार संबंध, सध्या भारत अफगाणिस्थानच्या विकासासाठी करीत असलेले प्रयत्न व रशिया आणि भारत यातील ७० वर्षांची मैत्री यांचा विचार करण्याची आवश्यकता रशियाला वाटली नाही व म्हणूनच रशियाने भारताला चर्चेतून वगळले.याची तीव्र प्रतिक्रिया शासकीय पातळीवर आणि जनमानसात उमटली.
४. मात्र २०१७ फेब्रुवारी महिन्यात रशियाला जणू उपरतीच झाली. यावेळी रशियाने तालिबान प्रश्नी विचार करण्यासाठी भारतालाही बोलावले. पण यावेळी रशियाने इराणलाही बोलविले होते. इराणचेही अफगाणिस्थानमध्ये हितसंबंध गुंतले आहेत, त्यामुळे हे योग्यच झाले. या निमित्ताने अफगाणिस्थानबाबत विचार करायचा असेल तर भारताला वगळून चालणार नाही, याची अप्रत्यक्ष कबुलीच या निमित्ताने रशियाने दिली.
५. सर्व सुरळीत सुरू असतांना रशिया, चीन पाकिस्तान एकाॅनाॅमिक कोरिडाॅरमध्ये सहभागी झाला असल्याचे वृत्त झिरपले. हा चीनच्या वन बेल्ट वन रोड या उपक्रमातील एक महत्त्वाचा हिस्सा आहे.
६. या पार्श्वभूमीवर मोदी व पुतिन भेट झाली आहे. यात कोणते करारमदार होतात, हे महत्वाचे असणार होते. त्यामुळे संयुक्त घोषणापत्र महत्वाचे ठरते. ते पाहता अपेक्षेच्या तुलनेत प्रत्यक्षात बरेच काही साध्य झाले आहे.
भेटीची फलश्रुती -  या भेटीच्या निमित्ताने पाकिस्तान आणि इतर देशांसोबतचे संबंध वाढत असताना रशिया आणि भारत यांच्यातील विश्वासावार आधारित असलेल्या मैत्रीच्या नात्यात कधीही बाधा येऊ देणार नाही, असे आश्वासन पुतीन यांनी दिले आहे, ही रशिया दौऱ्याच्या अनेक फलश्रुतींपैकी एक महत्वाची फलश्रुती  आहे.
  पुतीन यांनी भारताशिवाय इतर कोणत्याही देशासोबत रशियाचे इतके घनिष्ठ संबंध नसल्याचे म्हटले आहे. रशियाने भारतासोबत आतापर्यंत सर्वाधिक सहकार्य करार केले असून त्याचा लाभ निश्चितच दोन्ही राष्ट्रांना झाल्याचेही पुतिन म्हणाले.
  पाकिस्तानशी रशियाचे मैत्रीपूर्ण संबंध असले तरी काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून दहशतवाद पसरविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे, हे मान्य करीत ज्यावेळी संकटाची स्थिती असेल त्यावेळी दहशतवादाविरोधातील लढाईसाठी रशिया कायमच भारताच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असे आश्वासनही पुतीन यांनी यावेळी दिले. भारत आणि रशिया या दोन राष्ट्रांमध्ये मैत्रीचे संबंध आहेत. मात्र, याचा अर्थ असा नाही की भारताने इतर राष्ट्रांशी संबंध ठेवू नयेत. भारताने असे करणे हास्यास्पद ठरेल, असेही ते म्हणाले. या निमित्ताने रशियाही असेच धोरण आखू शकतो, असे तर त्यांना सुचवावयाचे नव्हते ना?
   रशियाचे पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारचे घनिष्ट (लष्करी) संबंध नाहीत असे सांगून पुतीन म्हणाले की, पाकिस्तानसोबतच्या आमच्या संबंधांचा भारतासोबतच्या व्यापारावर कोणताही परिणाम होणार नाही. पुतीन यांनी सीरिया, अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, भविष्यातील जागतिक पातळीवरील इतर महाशक्ती अशा विविध विषयांनाही पत्रपरिषदेत स्पर्श केला.
   भारत हा लोकसंख्येने मोठा देश आहे, तर रशियाही मोठा देश आहे. दोन्ही देशांतील संदर्भ आणि परस्पर हितसंबंध जवळीक साधणारे आहेत. त्यामुळेच भारताच्या हितांचा आदर करणे हे आमचे कर्तव्यच असल्याचे पुतिन यावेळी म्हणाले. क्षेपणास्रांबाबत भारतासोबतचे आमचे सहकार्य विश्वासावर आधारित आहे. अशा प्रकारे विश्वासावर आधारित आमची मैत्री इतर कोणत्याही राष्ट्रासोबत नसल्याचे पुतीन यावेळी म्हणाले.
मोदी टच
नरेंद्र मोदी यांनी भेटीच्या कार्यक्रमात योजनापूर्वक वेळ काढून दुसऱ्या महायुद्धात बळी पडलेल्या सैनिकांच्या स्मारकाला भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली. पुतिन यांचा भाऊ व  काही कुटुंबीय सुद्धा या ठिकाणी चिरनिद्रा घेत पहूडले आहेत. या बाबीचा उल्लेख करताच आठवणींना उजाळा मिळून पुतिनही भारावले.  पुतिन यांच्या जन्मगावी (सेंट पीटर्सबर्ग) पंतप्रधान म्हणून भेट देताना आनंद होत असल्याचे मोदी यांनी चर्चा सुरू होण्यापूर्वी सांगितले. रशिया आणि भारत हे ७० वर्षांपासून चांगले मित्र असून या मैत्रीचे प्रतिक म्हणून दिल्लीतील एका रस्त्याला रशियाच्या भारतातील दिवंगत उच्चायुक्तांचे नाव दिले जाईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केले. मोदी टच म्हणून याही बाबींचा उल्लेख केला पाहिजे.
  रशियाच्या सहकार्याने तमिळनाडूतील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पातील अखेरच्या दोन युनिटची निर्मिती करण्यासाठी भारत आणि रशियात करार करण्यात आला. या अणुऊर्जा प्रकल्पात पाच आणि सहा क्रमांकाचे प्रत्येकी एक हजार मेगावॉट क्षमतेचे दोन युनिट उभारले जाणार आहेत. त्यामुळे अणुऊर्जेद्वारे वीजनिर्मितीच्या भारताच्या क्षमतेत मोठी वाढ होणार आहे.
शांघाय सहकार्य संघटनेचे (एससीओ) सदस्यत्व भारताला मिळण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल मोदी यांनी पुतिन यांचे आभार मानले.
  याशिवाय व्यापार, तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाच्या करारांवरही दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी स्वाक्षरी केली. पर्यटनाला चालना देण्यासोबतच दोन्ही देशांमधील जनतेमधील संवाद वाढवण्याची गरज आहे असे मोदी यांनी सांगितले. रशियातून भारतात येणाऱ्या पर्यटकांसाठी व्हिसा प्रक्रिया आणखी सोपी केली जाईल असे त्यांनी म्हटले आहे.
फ्रान्स
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी फ्रान्सचे नवे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी हवामान बदल, दहशतवादाचा मुकाबला यासह विविध आंतरराष्ट्रीय आणि परस्पर हिताच्या प्रश्नांवर व्यापक चर्चा केली.
फ्रान्सच्या अध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या एलिसी पॅलेसमध्ये दोन्ही नेत्यांची भेट झाली. मोदी यांनी मॅक्रॉन यांची भेट घेतली आणि  मैत्रीचा नवा अध्याय गरा जोशीत सुरू झाला. डोनाल्ड ट्रंप यांच्याशी मॅक्राॅन यांचे औपचारिक हस्तांदोलन व मोदींशी गळाभेट या फरकाची नोंद घ्यायला हवी.
  संयुक्त राष्ट्र संघ सुरक्षा परिषदेत  सुधारणा आणि सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व, हवामान बदल, दहशतवाद प्रतिबंध यासह विविध महत्त्वाच्या विषयांवर मोदी व मॅक्राॅन यात चर्चा झाली. फ्रान्स हा भारताचा नववा सर्वात मोठा गुंतवणूकदार भागीदार देश आहे. संरक्षण, अंतराळ, आण्विक व अपांरपरिक ऊर्जा, शहरविकास आणि रेल्वे या क्षेत्रातीलही महत्त्वाचा भागीदार देश आहे