Thursday, June 15, 2017

‘दी विटनेस फाॅर दी प्राॅसिक्युशन’ च्या निमित्ताने अगाथा ख्रिस्तीचा मृत्यूनंतरचा विक्रम

विख्यात ब्रिटिश लेखिका अगाथा ख्रिस्ती हिच्या, ‘दी विटनेस फाॅर प्राॅसिक्युशन, या लघुकथेवरील आणि नाटकावरील त्याच नावाचा चित्रपट  १९५७ साली दाखविण्यास सुरवात झाली. नंतर एकेका विक्रमांची नोंद झालेली आढळते.
    कथेचे दुसऱ्यांदा बारसे -  सुरवातीला फ्लिन्स वीकली या नावाच्या साप्ताहिकात ‘ट्रेटर हॅंड्स’, या नावाने ही कथा १९२५ च्या जानेवारीत प्रसिद्ध झाली होती. नंतर १९३३ साली याच लेखिकेचा ‘दी हाऊंड आॅफ डेथ’ या नावाचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला, त्यात मात्र ‘दी विटनेस फाॅर प्राॅसिक्युशन, या नावाने ही कथा होती. पण ‘दी हाऊंड आॅफ डेथ’ हा कथासंग्रह इंग्लंडच्या सीमा ओलांडून जगात अन्य ठिकाणी फारसा गेलाच नाही. पण १९४८ साली‘दी विटनेस फाॅर प्राॅसिक्युशन ॲंड अदर स्टोरीज’, या नावाने अमेरिकेत एक कथासंग्रह प्रसिद्ध झाला, त्यातही ही कथा होती.
कथासूत्र - लिओनार्ड व्होल नावाच्या विवाहित व्यक्तीला एमिली फ्रेंच या श्रीमंत व वारस नसलेल्या व त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या प्रौढ महिलेच्या हत्त्येच्या आरोपाखाली अटक होते. लिओनार्ड विवाहित आहे, हे माहीत नसल्यामुळे, फसगत होऊन ती मृत्युपत्रात त्याला मुख्य वारस नेमते. त्यामुळे तिचा खून होताच पहिला संशयित लिओनार्ड ठरतो.
केवळ पतीला वाचविण्यासाठी-  लिओनार्डची पत्नी ख्रिस्टीन व्होल (रोमेन) साक्ष देण्याचे ठरवते. पण त्याच्या बाजूने नव्हे तर फिर्यादीपक्षाकडून! तिची ही कृती आपल्या नवऱ्याला सोडविण्यासाठीच्या, एका जटिल कटाचा, प्रमुख भाग असते. ती खटल्याच्या सुरवातीला फिर्यादीपक्षाकडून नवऱ्याच्या विरोधात प्रभावी साक्ष देते. नंतर स्वत:ची साक्ष खोटी ठरवणारा पुरावा निर्माण करते. याचा फायदा आपल्या नवऱ्याला मिळेल व त्याची सुटका होईल, असा तिचा होरा असतो. नवऱ्याच्या बाजूने साक्ष न देता अशाप्रकारे विरोधात साक्ष द्यायची व आपण खोटे सिद्ध होऊ, असा प्रयत्न करण्याचे ती ठरविते. आपल्या बनावट बदफैलीपणाची माहिती मिळेल अशी पत्रे, ती अस्तित्वातच नसलेल्या ‘मॅक्स’ च्या नावे लिहून काढते. ती बचावपक्षाच्या वकिलाला विकण्याचा डाव ती सवत:च वेशांतर करून टाकते. खोटी साक्ष देऊन आपण गुन्हेगार झालो व त्यासाठी आपल्याला थोड्याफार मुदतीच्या कैदेची शिक्षा झाली तरी चालेल पण आपल्या प्रिय नवऱ्याच्या सुटकेची शक्यता वाढेल, या कल्पनेने ती हा बनाव रचते.
  पत्नीने पतीच्या बाजूने दिलेल्या साक्षीला महत्व नाही. - प्रत्यक्षात लिओनार्डने खून केलेला असतो. त्याची कबुलीही त्याने पत्नीजवळ दिलेली असते. व खुनाच्यावेळी आपण घरी होतो, अशी साक्ष तिने द्यावी, अशी गळ तो आपल्या पत्नीला ख्रिस्टीन व्होल (रोमेल ) हिला घालतो. पतीवरच्या प्रेमापायी ती अशी साक्ष देण्यास कबूल होते. पण बचावपक्षाच्या वकिलाच्या दृष्टीने पतीवर निरतिशय प्रेम करणाऱ्या पत्नीने त्याच्या बाजूने दिलेल्या साक्षीला कायद्याच्या दृष्टीने महत्व नसते.
साक्ष उपयोगाची कशी ठरेल? - म्हणून ती पतीच्या विरोधात साक्ष देते, व आपली साक्ष खोटी ठरावी यासाठी फिर्यादीपक्षाच्या वकिलाला मदत करते. ती आपला एक काल्पनिक प्रियकर- मॅक्स-  निर्माण करते. त्याच्याशी आपल्या निळ्या रंगाच्या नेहमी वापरात असलेल्या कागदांवर पत्रे लिहून काल्पनिक प्रेमकथा रचते. शेवटचे पत्र असे असते की, आता तिचा नवरा खुनाचा आरोप सिद्ध होऊन तुरुंगात जाईल व आपले व या काल्पनिक मॅक्सचे मीलन होण्याचा मार्ग मोकळा होईल.
बनाव बनवतो - त्याप्रमाणे लिओनार्ड निर्दोष सुटतो. लिओनार्डची ही हुशार पत्नी मग मात्र उघड करते की, तिचा नवरा खुनी होता. पण पतीप्रेमापायी तिने असा बनाव रचून त्याला सोडविले. पण अशा प्रकारे गुन्हेगाराला शिक्षा न होता तो सुटण्याच्या कथा ॲगाथा ख्रिस्तीने क्वचितच रचल्या आहेत. त्यामुळे तिला हा शेवट रुचेना.
आपल्या कथेत बदल करणारी लेखिका अगाथा ख्रिस्ती - म्हणून चा कथेचे नाट्यरुपांतर करतांना तिने लिओनार्डचे एका महिलेशी लफडे असल्याचे उपकथानक समाविष्ट केले. निर्दोष सुटका होताच लिओनार्ड ख्रिस्टीनचा (रोमेनचा) त्याग करून त्या महिलेसोबत राहणार असतो. खोटी साक्ष दिली म्हणून रोमेनला अटक होणार असते. ती पतीला त्याने असे करू नये म्हणून वारंवर काकुळतीने विनविते. पण तो तिला झिडकारतो, खोटी साक्ष दिल्याबद्दलच्या बचावासाठी भरपूर पैसे देऊन तिच्या साह्याची परतफेड करू इच्छितो. तेव्हा संतापून ख्रिस्टीन (रोमेन) समोर पडलेला चाकू उचलून तो खूपसून त्याला ठार करते.
  विविध साहित्य प्रकारात अनेक नाट्यकर्मींनी साकारलेली कथा - १९५७ साली चित्रित झालेल्या चित्रपटात  लिओनार्ड व्होलची भूमिका टायरन पाॅवरनने ख्रिसटीन व्होलची (रोमेन) भूमिका विख्यात नटी मार्लीन डेट्रिचने; वकील विलफ्रिड राॅबर्टची भूमिकी चार्ल्स लाॅफ्टनने वठविली आहे.
आता पुन्हा आॅगस्ट २०१६ पासून या चित्रपटाचा वेगळी चमू घेऊन रीमेक करण्याचे घाटते आहे.
पण या अगोदर १९४९ मध्ये बीबीसीने व १९५३ मध्ये सीबीएसने आपल्या दूरचित्रवणी माध्यमात हेच कथानक वापरले आहे. प्रत्येकवेळी पटकथालेखक, अभिनय कर्ते, दिग्दर्शक वेगवेगळे आहेत. १९८२ मध्ये हे कथानक अभिनयकर्त्यांची वेगळी चमू घेऊन वेगळ्या कथालेखक, दिग्दर्शक, निर्मात्यांनी हाताळून याच नावाचे दूरचित्रवाणी रुपांतर हाॅलमार्क टेलिव्हिजनने सादर केले यात लिओनार्ड व्होलची भूमिका टायरन पाॅवर ऐवजी बी ब्रिजने ख्रिसटीन व्होलची (रोमेन) भूमिका विख्यात नटी मार्लीन डेट्रिच ऐवजी डायाना रिगने; वकील विलफ्रिड राॅबर्टची भूमिकी चार्ल्स लाॅफ्टन ऐवजी राल्फ रिचर्डसनने वठविली आहे. २०१६ साली बीबीसीने संपूर्ण नवीन चमू निवडून हेच कथानक दोन भागात मालिका स्वरुपात (दोन भागांचीच मालिका) सादर केले. एकाच लेखकाचे कथानक लघुकथा, नाटक, चित्रपट, दोन तीनदा नभोवाणी नाट्य रुपांतर  या स्वरुपात सादर होण्याचा हा कदाचित जागतिक उच्चांक असावा.
  म्हणून या कथानकाची मिळतील तेवढी रुपांतरे पाहण्याचे मी ठरविले. १९५७ सालच्या चित्रपटात वर उल्लेख केल्याप्रमाणे लिओनार्ड व्होलची भूमिका टायरन पाॅवरनने ख्रिसटीन व्होलची (रोमेन) भूमिका विख्यात नटी मार्लीन डेट्रिचने; वकील विलफ्रिड राॅबर्टची भूमिकी चार्ल्स लाॅफ्टनने वठविली आहे.
 बचाव पक्षाचा  बेरका वकील-  यात विलफ्रिड राॅबर्ट (चार्ल्स लाॅफ्टन) हा एक विख्यात आजारी बॅरिस्टर आहे. तो लिओनार्डो व्होलला (टायरन पाॅवर) चे वकीलपत्र सुरवातीला प्रकृती अस्वास्थ्यास्तव नाकारतो. यापुढे मानसिक ताण निर्माण करणाऱी व  गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली प्रकरणे हाताळायची नाहीत. वकिली प्रॅक्टिस सिव्हिल मॅटर्स पुरतीच मर्यादित ठेवायची, असे डाॅक्टरांनी बजावलेले असते.
पाळतीसाठी नर्स- बेरका विल्फ्रिड या सूचनेचे पालन करतो की नाही, औषधे वेळेवर घेतो की नाही, नेहमीप्रमाणे एका पाठोपाठ एक चिरूट ओढत तर नाहीना, काॅफी म्हणून ब्रॅंडी तर ढोसत नाहीना हे पाहण्यासाठी व पाळत ठेवण्यासाठी नर्स मिस प्लिमसोल (एल्सा लॅंकेस्टर) ची योजना केलेली असते. यांची जुगलबंदी हा चित्रपटाचा खुसखुशीतपणा वाढवणारा व दोन्ही पात्रांची व्यक्तिचित्रणे खुलवणारा व व्यक्त करणारा  कथाभाग मूळ कथानकाशी बेमालुमपणे सांधला गेला आहे.
नकाराचा होकार कसा होतो? - वकिलपत्र घेण्यास दिलेला विल्फ्रिडचा नकार लिओनार्डो मान्य करतो.पण रोमेन ( ख्रिस्टीन व्होल्स - मार्लीन डेट्रिच) विल्फ्रिड राॅबर्टला खिजवते व वकीलपत्र घेण्यास भाग पाडते. ती म्हणते, ‘हताशातल्या हताशांना तुमचा आधार वाटतो, असे आम्ही ऐकले होते. पण आमचे प्रकरण त्याही पलीकडचे असावे, असे वाटते’. या उचकवण्याचा योग्य परिणाम होऊन विल्फ्रिड, ही मात्र नक्की शेवटची केस, असे म्हणत नर्स प्लिमसोलचा विरोध गुंडाळून, हे प्रकरण स्वीकारतो.
लिओनार्डची वीक केस -जिच्या खुनाचा आरोप लिओनार्डोवर असतो, तिने आपले जुने मृत्यूपत्र आठवडाभर अगोदरच बदलून मोलकरणीऐवजी आपल्या इस्टेटीचा मोठा वाटा लिओनार्डोच्या नावे केलेला असतो. तो मुख्य लाभार्थी असतो. परिस्थितीजन्य पुरावा व प्रधान लाभार्थी म्हणून लिओनार्ड विरुद्ध भक्कम केस सरकारी पक्षाने उभी केलेली असते. लिओनार्ड निरपराध आहे, असे त्याचे व त्याची बायको ख्रिस्टीन (रोमेन)यांची बाजू ऐकल्यावर वाटत असते.
 ख्रिस्टीनचे अगदी वेगळे व्यक्तिमत्व -  लिओनार्ड व्होलची बायको ख्रिस्तीन (रोमेन) ही मूळची जर्मन दाखविली आहे. मार्लीन डेट्रिचने जर्मन लोकांचा थंडपणा, अलिप्तपणा, कोरडेपणा व ताठरणा व्यवस्थित अभिनित केला आहे. पण ती नवऱ्यासाठी एक चांगली साक्षीदार असू शकेल असे विल्फ्रिड राॅबर्ट्स या निष्णात वकिलाचे मत असते. फक्त नवरा बायकोच्या  नात्यामुळेच तिच्या साक्षीची  विश्वसनीयता कमी ठरणार असते. पण तिचे नाव जेव्हा फिर्यादीपक्षाची साक्षीदार म्हणून पुकारले जाते, तेव्हा तो अक्षरश: हादरतोच. कोणत्यही पत्नीला पतीविरुद्ध साक्ष देण्यासाठी कायद्याने बाध्य करता येत नाही. पण ख्रिस्तीनचे अगोदर एका जर्मन व्यक्तीबरोबर झालेले असते. ते लग्न तसेच कायम असतांना तिने लिओनार्ड बरोबर दुसरे लग्न केलेले असते. त्यामुळे ती लिओनार्डची कायदेशीर बायको नसतेच. युद्धादरम्यान लिओनार्ड रोयल एअर फोर्स मधील नोकरीनिमित्त जर्मनीत असतांना ती दोघे एकत्र आलेली असतात. त्यामुळे ती जेव्हा कोर्टात सांगते की, लिओनार्डने आपण फ्रेंचचा(श्रीमंत महिलेचा) खून केल्याचे सांगितले होते व सद्सदविवेकबुद्धी तिला सत्य सांगायला भाग पाडते आहे, तेव्हा त्या साक्षीला चांगलेच महत्व प्राप्त होते.
  पण विल्फ्रेडला एक अज्ञात महिला फोन करते आणि ख्रिस्टीनने मॅक्स नावाच्या प्रियकराला लिहिलेली पत्रे विकत देते. त्यामुळे ख्रिस्टीनच खोटे बोलते आहे, असे सिद्ध होऊन ज्युरीचे मत एकदम बदलते व ज्युरी लिओनार्ड निर्दोष असल्याचा निर्णय देते.
केस जिंकूनही वकील अस्वस्थच - पण विल्फ्रिड राॅबर्ट्स हा बचाव पक्षाचा वकील अस्वस्थ असतो. आपल्या हाती आलेला पुरावा असा कसा? अगदी व्यवस्थित?, नेमका?, सुनियोजित?, अगदी हवा तेव्हा, हवा तसा? जगात असं होत नसतं. कोर्टरूममध्ये शुकशुकाट असतो. तेवढ्यात ख्रिस्टीन तिथे येते व म्हणते, ‘ तुम्ही खटला जिंकला. पण सर्व श्रेय तुमचं एकट्याचं नाही. तुम्हाला कुणाची तरी मदत झाली ना?’
  ‘तुमचं लक्ष नव्हतं, पण मी तुम्हाला बोलतांना ऐकलं होतं, ‘ज्युरी, बायकोच्या साक्षीवर विश्वास ठेवणार नाही. प्रेमळ व एकनिष्ठ बायको काहीही झालं तरी नवऱ्याचीच बाजू घेणार, असं ज्युरीला वाटणारच’.
म्हणून अगोदर  मी स्वत:हून नवऱ्याच्या विरुद्ध साक्ष दिली  आणि नंतर स्वत:च स्वत:ला खोटं पाडलं. अस्तित्वात नसलेल्या मॅक्सच्या नावानं खोटी प्रेमपत्रं लिहून काढली आणि नंतर स्वत:च वेशांतर करून ती विल्फ्रिडला (बचाव पक्षाच्या वकिलाला) विकली. त्या पत्रांमुळे तिची नवऱ्याच्या विरोधातली साक्ष खोटी ठरली व तो निर्दोष सुटला. ती विल्फ्रिडला हेही सांगते की, तिला माहीत होतं की तिचा नवरा खुनी आहे. पण तिचं तिच्या नवऱ्यावर निरतिशय प्रेम असल्यामुळे, तिनं त्याच्या समर्थनार्थ उभं रहायचं ठरवलं.
बदफैली नवरा - वकिलाशी होत असलेलं हे बायकोचं हे बोलणं लिओनारडच्या कानावर पडतं. तो वकिलाला सांगतो की, त्यानचं तो खून केलेला आहे. फसवणुकीमुळे वकिलाचा संताप होतो. लिओनार्ड ख्रिस्टीनला सरळ सांगतो की, एक तरुणी त्याच्या आयुष्यात आली असून तो तिच्यासाठी ख्रिस्टीनला सोडून देणार आहे. ख्रिस्टीन प्रथम विनवणी करून त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न करते. पण तो दाद देत नाही, त्याच्या हृदयाला पाझर फुटत नाही हे पाहून त्याच्या कृतघ्नपणामुळे संतापूर समोरच पडलेला चाकू उचलून त्याला भोसकून ठार मारते. (हाच धारदार चाकू बचाव पक्षाने पुरावा म्हणून आणलेला असतो).
‘तिनं ठार मारलं नवऱ्याला’, नर्स नाडी पाहून किंचाळते. ‘छे! छे!, तिनं शिक्षा अमलात आणली आहे, आटोपली ती शेवटची केस नाही, ख्रिस्टीनसाठी माझे वकीलपत्र दाखल करा.’

काही अन्य वैशिष्ट्ये
१. एल्सा लॅंकॅस्टर ही नर्सचे काम करणारी अभिनेत्री प्रत्यक्ष जीवनात चार्स लाॅफ्टनची पत्नी होती.
२. हाऊस कीपरचे काम करणारी उना ओ कोनार हिने जवळजवळ सर्व नाट्यप्रकारात तीच भूमिका केली होती.
३. लिओनार्डचे काम करणाऱ्या  टाॅयरोन पाॅवरची ही शेवटची पूर्णत्वाला पोचलेली फिल्म होती. साॅलोमन ॲंड शेबा हा चित्रपटात काम करतांना त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्याऐवजी यूल ब्रायनरला घेण्यात आले.
मानांकने
१. सर्व समीक्षांमध्ये प्रशंसा.
२. आजही १०० टक्के रेटिंग.
३. पाच पैकी ४.५ स्टार्स.
४. आज यू ट्यूब वर १९५७ व १९८२ या दोन्ही आवृत्या उपलब्ध. १९८२ च्या आवृत्तीत राल्फ रिचर्डसन(बचाव पक्षाचा वकील) व डेबोरा केर (लिओनार्डची पत्नी) व दोन्हींची तुलना करणे हा रंजक व बोधप्रद अनुभव.
५. चित्रपटाची तिसरी आवृत्ती लवकरच येणार

No comments:

Post a Comment