Monday, June 26, 2017

हट्ट एका पट्टराणीचा !


हट्ट एका पट्टराणीचा !
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?

कुठल्याही घरी राणीचेच राज्य असते. मग ती राणी घरची असो वा एखाद्या राजाची. त्यातून ती राणी असंख्य राण्यांमधली पट्टराणी असेल तर तिचा महिमा काय वर्णावा? हे वर्णन सुरस अरबी कथांमधले नाही. ते आहे जगाच्या राजकीय सारीपटावर महत्त्वाची भूमिका वठवणाऱ्या अति श्रीमंत, स्वर्गवैभवसंपन्न, अति विस्तीर्ण अशा सौदी अरेबियाच्या राजवंशातील अल बिन सौद या महापराक्रमी राज्याच्या पट्टराणीचे. तिचे पूर्ण नाव होते, हसा बिंट अहमद अल सुदइरी. पण ती सुदइरी या लघुनामानेच ओळखली जाते.
पूर्वेतिहास - अरेबियन द्विपकल्पातील फार मोठ्या भूभागावर जवळजवळ २५० वर्षे अल सौद घराण्याचे नियंत्रण होते. ही घराणेशाही ‘वारस कोण’ या खडकावर दोनदा आपटून कोसळली. पुढे १८९० मध्ये अल रशीदने सौदीने अरेबियावर आपली पकड बसविली. या घराण्यातील, अमीर अब्दुलअझीझ बिन अब्दुल रहमान, या कर्तृत्वशाली पुरुषाने रियाझ हे राजधानीचे शहर जिंकून साम्राज्यावर आपली पकड आणखी पक्की केली. तो अल बिन सौद म्हणून ओळखला जाऊ लागला. अशाप्रकारे अस्थिरतेला विराम मिळून सौदी अरेबियात एक स्थायी साम्राज्य १९३२ मध्ये कायम झाले.
राज्यावरील पकड पक्की करण्याचा अभिनव मार्ग - अल बिन सौदने आपली पकड पक्की करण्यासाठी एक अभिनव मार्ग स्वीकारला. टोळ्यांचा प्रदेश म्हणून सौदी अरेबिया ओळखला जातो. प्रत्येक प्रभावी टोळीतील स्त्री बरोबर तो विवाह करीत असे (साॅरी निकाह लावीत असे). असे असंख्य (२०?) निकाह त्याने लावले. जावईपणामुळे टोळ्यांशी असलेले शत्रुत्व संपले व तो बलवान झाला. त्याला मोजून शंभर मुले होती , त्यात ६० मुलगे व ४० मुली होत्या. असा हा सर्वप्रकारे महापराक्रमी असलेला सम्राट १९३२ ते १९५३ पर्यंत निरंकुशपणे सत्ता, संपत्ती व स्त्रीसुख यांचा आस्वाद घेऊन १९५३ मध्ये अल्लाघरी गेला.
आठ पिढ्यांचे राजवैभव - १९३२ मध्ये स्थापन झालेले हे राजघराणे तब्बल आठ पिढ्या राजवैभवाचा आस्वाद घेत आहे. त्या काळातील (मध्यपूर्वेतील म्हणा किंवा इस्लामी म्हणा) प्रथा, परंपरा पाहता पुत्रपौत्रादींची संख्या व अन्य सर्व घटनाक्रमात आश्चर्य, अयोग्य, वावगे व आक्षेपार्ह वाटावे, असे फारसे काही नाही. नवल आहे ते वेगळेच आहे. पित्यानंतर पुत्राने गादीवर यावे, हा संकेत /नियम या घराण्याने बाजूला सारला. ज्येष्ठताक्रमाने एकानंतर एक असे सात सख्खे भाऊ सत्तेवर आले. राजेपद सामान्यत: पित्याकडून पुत्राकडे, नंतर नातवाकडे जाते/ जावयास हवे असे आपले मत असेल तर सौदी अरेबियात तसे झाले नाही. का? कारण स्त्रीहट्ट!!   तोही पट्टराणीचा.  हट्ट एका पट्टराणीचा, त्यामुळे तो पुरवणे भागच होते.
सुदइरीच्या हट्टाचा अभूतपूर्व परिणाम - १९३२ साली स्थापन झालेला  सौदीतील राजवंश आणखी १३ वर्षांनी एक शतक पूर्ण करील. पण या काळात सत्ता एका भावाकडून दुसऱ्या भावाकडेच गेली, मुलाकडे नाही. सात भाऊ असल्यामुळे असे सातवेळा घडले. याचे कारण सौदीचा संस्थापक महंमद बिन इब्न सौद याने आपल्या पट्टराणीस दिलेले वचन. तिचा पुरविलेला हट्ट. या संस्थापक अबदुल्ला झिझबिन सौद यांचा कुटुंब कबिला फार मोठा होता. आज या कुटुंबातील सदस्य संख्या (२०) वीस हजार आहे, यावरून राण्यांच्या  संख्येचा अंदाज बांधता येईल. पण शेवटी पट्टराणी ती पट्टराणीच, नाहीका? तिचं नाव होतं, हसा बिंट अहमद अल सुदइरी. ही बेगम अबदुल्ला झिझबिन सौद त्यांची अत्यंत आवडती बेगम होती. त्या बेगमेचाही राजे सौद यांच्या वर चांगलाच प्रभाव होता. राजे तिच्या अगदी मुठीत असायचे. त्यामुळे तिने राजाकडून वचन घेतले नसते तरच नवल झाले असते. माझ्या पुत्रसंततीकडेच पुढचे राजेपद जाईल, हे ते वचन.  राजानेही वचन दिले. वचन पट्टराणीला नाही द्यायचे तर द्यायचे कुणाला?
सदइरी सेव्हन - पण या बेगम सुदइरी यांना राजे सौद यांच्यापासून एक नाही दोन नाही तर चांगले सात पुत्र झाले. त्यामुळे हे सातही एकानंतर एक अशा क्रमाने व ओळीने राजे झाले. इतिहास यांना सुदइरी सेव्हन (सात सुदइरी) या नावाने ओळखतो. या सर्वांची नावानिशी नोंद घेणे इतिहासाला भाग असले तरी आपण ते कष्ट का घ्यायचे? या अभिनव घराणेशाहीचा जगाच्या इतिहासाव र परिणाम झाला म्हणून. विद्यमान राजे सलमान बिन अब्दुलअझिझ अल सौद हे यातील शेवटचे बेगम सुदइरीपुत्र. तेव्हा त्यांच्याबरोबर सुदइरीपुत्रांची मालिका संपणार आहे. आता प्रथमच सौदीची सूत्रे पुढील पिढीच्या हाती जातील.  म्हणून सुरवातीला आपणही या सात बांधवांची नोंद घेऊनच पुढे जाऊ.
सप्त राजश्री -
अब्दुलअझीझ- १९३२ ते १९५३  या काळात अब्दुलअझीझने  सौदी अरेबियावर निरंकुश राज्य केले.
अल बिन सौद- १९५३ ते १९६४ अल बिन सौदने राज्य केले. तो सतत तणावात असायचा.त्याला फैजलने त्याच्या भावाने पदच्युत केले.
फैजल- १९६४ ते १९७५ फैजलने अशी ११ वर्षे राज्य केले. याने आर्थक सुधारणा घडवून आणल्या.याने सौदीला आधुनिक बनविण्याचा प्रयत्न केला.
खालिद- १९७५ ते १९८२ या काळात खालिद (दुसरा) याचे सौदीवर राज्य होते. याच्या कारकीर्दीत सौदी अरेबियाचा खूप विकास झाला.
फद- १९८२ ते २००५ याकाळात फद याने राज्य केले. राजा म्हणून याची कारकीर्द फारसे काम केलेले आढळत नाही. पण राजपुत्र म्हणून त्याने पुष्कळ रचनात्मक कामे केली.
अब्दुल्ला- २००५ ते २०१५ याकाळात अब्दुल्ला याने राज्य केले. याने दोन मशिदी बांधल्या.
सलमान- २०१५ हे आजतागायत राज्य करीत आहेत.
पेचप्रसंग - १९३२ ते २०१५ या काळात सौदी अरेबियात अनेक घडामोडी झाल्या. पेचप्रसंग निर्माण झाले. बंड-बंडाळ्या; पेच- डावपेच; कारस्थाने- प्रतिशोध; मैत्री - फाटाफूट असे इतिहासाला परिचित असलेले सर्व प्रकार होत राहिले. पण कुणीही कितीही सनातनी, कर्मठ, कडवा, क्रूर राहतो म्हटले तरी उत्क्रांती आपला प्रभाव, परिणाम घडवतेच घडवते. त्याची नोंद रंजक, बोधप्रद व आशादायी आहे. तेवढीच नोंद आपण घेऊया.
मुलगी वारस म्हणून चालणार नाही - अल बिन सौदला तुर्की नावाचा मुलगा होता, म्हणजे गादीला वारस होता. पण दुर्दैव असे की, तो १९१९ च्या सुमारास न्युमोनियाने मरण पावला. त्याची बायको गर्भार होती पण तिच्या पोटी मुलगाच जन्माला येईल, याचा काय नेम? अशा परिस्थितीत एकतर भाऊ महंमद बिन अब्दुल-रहमान गादीवर येईल किंवा त्याचा दुसरा मुलगा सौद हा तरी गादीवर येईल. अल बिन सौदने हा प्रश्न तसाच अिर्नणित राहू दिला. पण भाऊ महंमद बिन अब्दुल-रहमान स्वस्थ बसणारा नव्हता. त्याचा मुलगा खालिद किंवा सौद यापैकी यापैकी वारस कोण, तो निर्णय करा, असा तगादा त्याने अल बिन सौदच्या मागे लावला. शेवटी अल बिन सौद ने आपला दुसरा मुलगा सौद याला युवराज म्हणून जाहीर केले.
इस्लामी राजवटीतील वादाचे स्वरूप - राज्यावर हक्क कुणाचा? राजाच्या पुत्राचा? की राजाच्या कुटुंब कबिल्यातील ज्येष्ठ नवागताचा? मग तो राजपुत्र असेल किंवा नसेलही? अकरा वर्षे राजा सौद व युवराज ठरलेला बंधू फैजल यामध्ये वाद सुरू होता. सौद नंतर कोण? फैजल की राजाचा (सौदचा) पुत्र? वारसा पद्धत (ॲग्नाटिक सिनीआॅरिटी)) की कुटुंबातील पहिले मूल म्हणून प्राप्त झालेले ज्येष्ठत्व (ॲग्नाटिक प्रायमोजेनिचर) ? सौदने पहिली पद्धत स्वीकारून आपल्या ज्येष्ठ मुलाला वारस नेमले. सर्व राज घराणे या विरुद्ध पेटून उठले. राजपुत्र महमदने बंड करून राजाला पदच्युत केले व खून केला. फैजलने खून होऊन पदच्युत होण्यापूर्वी १९६४ ते १९७५ अशी ११ वर्षे राज्य केले.
घराण्याची विशेषता मोडीत काढणारा अब्दुल्ला - यथावकाश बांधवातील ज्येष्ठताक्रमाने अब्दुल्ला सत्तेवर आला. घोड्यावरून रपेट आणि शिकार हे छंद असलेल्या अब्दुल्लांची अंगकाठी धिप्पाड आणि धष्टपुष्ट होती. खनिज तेलामुळे गडगंज संपत्ती पायाशी लोळण घेत असतांना देखील अब्दुल्ला याला संपत्तीचा मोह नव्हता. २००५ मध्ये अब्दुलालाचे राज्यारोहण झाले. त्यांच्या राजवटीत बुरख्याचा काळा रंग जाऊन रंगीबेरंगी बुरख्यांची चाल 'फॅशन' म्हणून प्रतिष्ठा पावली. संगिताचे सूर देशात प्रथमच टी व्ही व रेडिओ वरून ऐकू येऊ लागले. महिलांना लेखनस्वातंत्र्य मिळाले आणि लेखिकांचा स्वतंत्र वर्ग तयार झाला. शाळा, महाविद्यालयात सहशिक्षण सुरू झाले. या बदलाला होणारा कट्टर धर्ममार्तंडांचा विरोध अब्दुल्लांनी मोडून काढला.
  चतुर अब्दुल्ला - इस्लामी जगतातील ही घडामोड अनेक कारणांमुळे महत्त्वाची आहे. एक असे की, सौदी अरेबिया हा जगातला पहिल्या क्रमांकाचा खनिज तेल निर्यात करणारा देश आहे. दुसरे असे की, या देशात इस्लामचे सर्वात मोठे धार्मिक केंद्र आहे. महत्त्वाची धार्मिक स्थळे या देशात आहेत. या देशाच्या या राजाचे एक वैशिष्ट्य असे होते की, हा सुधारणावादी होता. अर्थात प्रत्येक वेळी तो जपून पाऊल टाकीत असे. कट्टरवादी घटक बिथरू नयेत, याची तो आपल्या परीने काळजी घेत असे. असे असले तरी त्याच्याविरुद्ध कटकारस्थाने बरीच झाली. ही कारस्थाने करणारे लोक दोन प्रकारचे  होते. एक याला पदच्युत करून सत्ता हस्तगत करण्याची इच्छा असणारे आणि दुसरे सध्या जगभर हैदोस घालणारे अतिरेकी. अब्दुल्ला सुन्नी आणि अतिरेकी सुद्धा सुन्नीच. तरीही हे एकाच धर्मातील धर्मयुद्ध का? कारण अब्दुल्ला पाखंडी होता. धर्माविरुद्ध कृती करीत होता. सुन्नी विरुद्ध सुन्नी हा मुद्दा जागतिक अतिरेकी कारवायांना पायबंद घालण्याच्या प्रयत्नात मोठीच भूमिका बजावू शकेल, असे काही अभ्यासकांचे मत आहे. पण या प्रकाराला फारसे महत्व देऊ नये, असेच इतर मानतात.
सुधारणावादी अब्दुल्ला - अब्दुल्लाने विद्यापीठस्तरावर सहशिक्षण सुरू केले होते. याबाबत कट्टर सनातन्यांनी खूप ओरड केली. हे केवळ पापच ( सिन) नाही तर हा दुष्टावा (इव्हिल) आहे, असे म्हणत जगभरातले कट्टर सनातनी संतापले. इस्लामधर्मीय अगोदरच सनातनी, त्यातही सुन्नी संप्रदायाचे अनुयायी आणखी सनातनी! या शिवाय सौदी अरेबिया मधील इस्लामधर्मीय आणखीनच सनातनी!! इस्लामची अति पवित्र धर्मस्थाने सौदी अरेबियात आहेत. तिथे सहशिक्षण देणारे विद्यापीठ स्थापन व्हावे यापेक्षा आणखी मोठा धार्मिक भ्रष्टाचार तो कोणता?
 मिशेल ओबामांनी डोक्यावरून पदर का घेला नाही? - अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशिल हे सौदी अरेबियात दुखवटा व्यक्त करण्यासाठी गेले असतांना मिशेल ओबामा यांनी 'डोक्यावर पदर' घेऊन ते झाकले नाही म्हणून मोठा गहबज झाला होता. यावरून रूढी/परंपरा/कर्मकांड यांचे जोखड झुगारून देणे किती कठीण असते, हे लक्षात यावे. पण परिवर्तन हा युगाचा धर्मच आहे. त्यातून इस्लामही सुटला नाही/ किंवा सुटणार नाही.
सुन्नी विरुद्ध सुन्नी असे का? - सगळे कट्टर दहशतवादी आणि इसीसची सेना इराक जिंकल्यानंतर नंतर सौदी अरेबियाकडे वळणार, हे जाणून/हेरून अब्दुल्लाने या दोन्ही कट्टरपंथीयांविरुद्ध अमेरिकेने सुरू केलेल्या मोहिमेला सक्रीय पाठिंबा दिला होता. हे दोन्ही (इसीस आणि सौदी अरेबिया) घटक सुन्नी पंथीय असूनसुद्धा एकमेकाविरुद्ध का लढत आहेत, ते सहज लक्षात येत नाही, ते यामुळेच. इस्लामच्या पवित्र धर्मग्रंथात जे सांगितले आहे तेच सत्य आहे, तसेच ते अपरिवर्तनीय आहे, असे कट्टर दहशतवादी कितीही म्हणत असले तरी परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. परिवर्तनाची गती कमी करता येईल एकवेळ. पण ती पूर्णपणे थांबवू शकतील असे कट्टरपंथीय अजून जन्माला यायचे आहेत. ते बहुदा कधीच जन्माला येणार नाहीत. पण आजही कट्टर पंथीय जो हैदोस घालीत आहेत, तोही काही कमी नाही.
सलमानही चतुर - अब्दुल्लाच्या निधनानंतर सलमान यांची सत्ता सुरू झाली.. सलमान राजनीतिज्ञ मानले जातात. राजघराण्यात एकी कायम रहावी यासाठी त्यांची धडपड असते. सर्वच्या सर्व म्हणजे २० (वीस) हजार कुटुंबियांना शासन व्यवस्थेत कोणते ना कोणते पद या पूर्वीच दिलेले आहे, असे म्हणतात. इसीसवर हल्ले चढवण्याचे कामी अब्दुल्लाप्रमाणे सलमानही अमेरिकेसोबत सहभागी झाले होते. पण पक्षाघाताने त्यांचा डावा हात कमजोर झाला आहे. त्यांनी पुतण्याला वारसदार म्हणून घोषित केले. अशाप्रकारे सात भावांची कथा सुफळ संपूर्ण झाली. एका पट्टराणीचा हट्ट पूर्णत्वाला पोचला.
पट्टराणीच्या हट्टाची पूर्तता पण राजहट्टाचा प्रारंभ - एक कथा संपली आणि दुसरी सुरू झाली. आजमितीला सलमान हे सौदी अरेबियाचे राजे आहेत. सौदी अरेबियामध्ये इसीस पेक्षाही भयंकर संघटना आता प्रभावी ठरणार अशी चिन्हे आहेत. या कट्टरपंथीय इस्लामी संघटनेचे नाव आहे, हिब्ज- उत- तहरीर ( एच यु टी ). इसीस ही तशी अडदांड संघटना आहे. तर हिब्ज- उत - तहरीर ही संघटना अधिक जहाल असली तरी हुशार आणि चाणाक्ष आहे. ती इसीसप्रमाणे धसमुसळेपणा करीत नाही. ही पाकिस्थान आणि बांग्लादेश यात पसरत आहे. हिचे सदस्य इसीसपेक्षा संख्येने कितीतरी जास्त आहेत, एवढेच नव्हे तर ते रासायनिक आणि जैविक शस्त्रास्त्रे वापरण्यात तरबेज आहेत. भारतासाठी हा धोक्याचा इशारा आहे.
उत्तराधिकारी नेमण्याची प्रथा बदलणार - सौदी अरेबियात राजा आपला उत्तराधिकारी ( क्राऊन प्रिन्स) नियुक्त करतो. सलमान यांचे वय सध्या ८१ वर्षांचे आहे. पूर्वी त्यांनी आपला पुतण्या महम्मद बिन नाईफ याला उत्तराधिकारी म्हणून जाहीर केले होते. पण नाईफ बाबातचा निर्णय बदलून त्यांनी आपला पुत्र महम्मद बिन सलमान याची नियुक्ती केली आहे. (सलमान यांच्या मुलाचे नाव सलमानच आहे). म्हणजे आपल्या मुलालाच त्यांनी उत्तराधिकारी नियुक्त केले आहे. वास्तवीक पुतण्याची योग्यता पुत्रापेक्षा जास्त होती. आतापर्यंत सौदीतील सर्व सत्तांतरे ही भावाभावांमध्येच झाली. यापुढे बापानंतर मुलगा ही पद्धत सुरू होणार.  कुटुंबातील पहिले मूल म्हणून प्राप्त झालेले ज्येष्ठत्व (ॲग्नाटिक प्रायमोजेनिचर) नाही, तर सगोत्र वारसा पद्धती (ॲग्नाटिक सिनीआॅरिटी)) सुरू होणार, असे दिसते. कुणी म्हणेल, होईना का. आपल्यास काय त्याचे? मुलगा की पुतण्या या वादाचे पडसाद त्या त्या कुटुंबाच्या प्रभाव क्षेत्रात दिसतील. परंतु सौदी अरेबियाचे प्रभाव क्षेत्र हे या जगातील फार मोठे प्रभावक्षेत्र आहे. मुख्य म्हणजे जगात उपलब्ध खनिज तेलातील एकतृतीयांशपेक्षा अधिक वाटा हा त्या एकाच देशातून येत असल्याने त्या देशातील या कौटुंबिक उलथापालथीचे परिणाम संपूर्ण जगास सहन करावे लागणार आहेत. म्हणून त्यांची दखल घेणे आपल्यासाठीही आवश्यक ठरते. म्हणून वयोवृद्ध राजे सलमान यांचे त्याच नावाचे चिरंजीव सलमान यांच्या भावी काळातील लीलांकडे भारताला डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावे लागणार आहे, हे नक्की.

No comments:

Post a Comment