Friday, July 2, 2021

मतपेढ्या, हेलकावे आणि निसटते बहुमतच निर्णायक! वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? कोणत्याही लोकशाहीप्रधान देशात, प्रत्येक पक्षाची काही वचनबद्ध (कमिटेड) मते (मतपेढी) असतात. तर इतर काही मतदार (सामान्यत: 5 ते 10 % किंवा जास्तही) कुंपणावर असतात. 2016 मध्ये डोनाल्ड ट्रंप यांच्या वचनबद्ध मतपेढीत, तरूण गोरे पांढरपेशी मतदार (हिप्सॅानिक/लॅटिनो, मेक्सिकन व क्युबन वगळून), सनातनी, अल्पशिक्षित आणि ग्रामीण प्रामुख्याने होते. तर हिलरी क्लिंटन (आता बायडेन) यांच्या मतपेढीत हिस्पॅनिक/लॅटिनो (स्पॅनिक सांस्कृतिक वारसा असणारे), मेक्सिकन व क्युबन प्रकारचे गोरे, उच्चशिक्षित, श्वेतेतर, प्रगत राज्यात निवास करणारे मतदार प्रामुख्याने होते. उरलेले मतदार मात्र ऐनवेळी आपली भूमिका निश्चित करीत असतात. ज्या पक्षाकडे ही मते वळतात, त्याची सरशी होत असते. निवडणुकीच्या प्रचारमोहिमा, भाषणे, आरोप प्रत्यारोप हा सगळा धुडगुस बहुतांशी या मतदारांसाठीच असतो. दुसऱ्या देशाच्या निवडणूकप्रक्रियेत ढवळाढवळ करणाऱ्यांच्या निशाण्यावरही मुख्यत: हेच मतदार असतात/असतील. तसेच अमेरिकेत काही हेलकावे खाणारी राज्येही आहेत. ती कधी डेमोक्रॅट पक्षावर कृपा करतात तर लगेच दुसऱ्यावेळी रिपब्लिकन पक्षाला जवळ करतात. तसेच काही राज्ये अत्यल्प मताधिक्याने एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाने जिंकून घेतलेली असतात. सत्तांतराला 2016 मध्ये कारणीभूत झालेली दहा राज्ये (काहींच्या मते आणखी 3 राज्ये) अशी आहेत. बढत व निसटते बहुमत बढत रिपब्लिकन 1ॲरिझोना (11इलेक्टर्स)- खळाळत वाहणाऱ्या कोलोराडो नदीने एक मैल खोलीची ग्रॅंड कॅनियन ही जगविख्यात दरी ही राज्याची ओळख आहे. पॅाप्युलर व्होट्सच्या 5 % मताधिक्यानेच हे राज्य 2016 साली रिपब्लिकन पक्षाकडे चौथ्यांदा होते. 2 टेक्सास(38) -. कडव्या गोऱ्यांचे मताधिक्य असलेल्या याच राज्यातील डल्लास शहरात 22 नोव्हेंबर 1963 ला जॅान एफ केनडींचा खून झाला होता. हे राज्य 2004 2008, 2012 व 2016 पासून रिपब्लिकन पक्षाकडेच आहे. 2016 मध्ये 9.2 % टक्के मताधिक्याने ते रिपब्लिकन पक्षाकडेच होते व 2020 मध्येही राहील. 3 फ्लोरिडा (29)- उत्तर अमेरिकेच्या दक्षिण टोकाला वॅाल्ट डिस्ने वर्ल्डसाठी विख्यात असलेले व 2008 आणि 2012 मध्ये डेमोक्रॅट पक्षाकडे असलेले हे राज्य 2016 मध्ये मात्र रिपब्लिकन पक्षाने पॅापुलर व्होट्समधील केवळ एक टक्याच्या फरकाने डेमोक्रॅट पक्षाकडून हिसकून घेतले आहे. 4 जॅार्जिया(16)- सिव्हिल राईट्स चळवळीचे उगमस्थान, मार्टिन ल्युथर किंग(ज्युनियर)चे गृहराज्य असलेले हे राज्य पीच आणि गोड कांद्यांसाठीही प्रसिद्ध आहे. 2004 ते 2016 या कालखंडातील चारही निवडणुकीत हे राज्य, 2016 मध्ये मात्र केवळ 5 % पॅाप्युलर व्होट्सच्या मताधिक्याने रिपब्लिकन पक्षाकडे राहिलेले आहे. 5 नॅार्थ कॅरोलिना(15)- पेप्सी पेयाच्या जन्मदात्याचे राज्य म्हणून ओळख असलेले हे राज्य, 2008 चा अपवाद वगळता सतत रिपब्लिकन पक्षाकडेच आहे. पण 2016 मध्ये हे राज्य पॅाप्युलर व्होट्समधील केवळ 3.8 % मताधिक्याने रिपब्लिकन पक्षाने आपल्याकडे राखले आहे. 6 पेन्सिलव्हॅनिया(20)- हे राज्य, अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा, अमेरिकेच्या राज्यघटनेचे लेखन, अब्राहम लिंकनचा गेटिसबर्गचा संदेश यासाठी प्रसिद्ध आहे. 2004, 2008 व 2012 मध्ये डेमोक्रॅट पक्षाकडे असलेले हे राज्य रिपब्लिकन पक्षाने 2016 मध्ये डेमोक्रॅट पक्षाकडून केवळ 1.1 % मताधिक्याने जिंकून घेतले आहे. 7 ओहायहो(18)- राईट बंधूंचा जन्म या राज्यातला आहे. हे राज्य 2016 मध्ये रिपब्लिकन पक्षाने डेमोक्रॅट पक्षाकडून पॅाप्युलर व्होट्स मधील 9 % मताधिक्याने जिंकून घेतले आहे. पण देशातल्यादेशात झालेल्या स्थलांतरितांमुळे या राज्याच्या राजकीय स्वरूपात बदल झाला आहे. 8 मिशिगन(16)- प्रचंड जलाशयांनी दोन खंडात खंडित केलेले हे राज्य फक्त 2016 मध्येच केवळ 0.3% पॅाप्युलर व्होट्समधील मताधिक्याने रिपब्लिकन पक्षाकडे आले आहे. 9 विस्कॅान्सिन(10) - मिशिगन आणि सुपिरियर सरोवरांना लागून असलेले हे राज्य फक्त 2016 मध्येच रिपब्लिकन पक्षाने केवळ 0.7 % च्या मताधिक्याने जिंकले आहे. बढत डेमोक्रॅट 10 मिनेसोटा(10)- कॅनडा आणि लेक सुपिरियरला लागून असलेल्या 10,000 सरोवरांच्या या राज्यात मिसिसिपी नदीचा उगम आहे. 2004 पासून सतत डेमोक्रॅट पक्षाकडे असलेले हे राज्य 2016 मध्येही फक्त 1.4 % मताधिक्यानेच आपल्याकडे राखण्यात डेमोक्रॅट पक्ष यशस्वी झाला आहे. वचनबद्ध 355 यातील इलेक्टर्सची एकूण संख्या 183 होते. उरलेल्या 355 जागी ज्यात्या पक्षाचे वचनबद्ध मतदार असल्यामुळे इलेक्टर्सच्या निवडीत फारसा बदल होईल, असे या अभ्यासकांना वाटत नाही. 355 वचनबद्धांपैकी पैकी 133 वचनबद्ध रिपब्लिकन पक्षाचे तर 222 वचनबद्ध डेमोक्रॅट आहेत, असे मानले जाते. आपल्या पक्षाचे निदान 138 इलेक्टर्स या किंवा अशा दहा राज्यातही निवडून यावेत यासाठी रिपब्लिकन पक्षाचा प्रचाराचा धुमधडाका अमेरिकेत सध्या सुरू आहे. तर गेल्या वेळच्या 232 मध्ये निदान 39 इलेक्टर्सची भर पडावी व 270 हा जादुई आकडा पार व्हावा, यासाठी डेमोक्रॅट पक्षाची धडपड सुरू आहे. याशिवाय काही अभ्यासकांना डेमोक्रॅट पक्षाने जिंकलेल्या आणखी 3 राज्यांचे राजकीय वर्तन सुद्धा विचारात घ्यावे असे वाटते. मेन (4इलेक्टर्स) 3 % फरक; कोलोराडो (9) 2 % चा फरक; नेवाडात (6) 2.4 % चा फरक; तर व्हर्जिनात (13) 5 % अशा फरकाने डेमोक्रॅट पक्ष जिंकला आहे. ही एकूण 32 मते होतात. हे इलेक्टर्स आपल्याकडेच रहावेत हेही डेमोक्रॅट पक्षाला जपायचे आहे. गेल्यावेळच्या अटीतटीच्या संघर्षात 5 % किंवा त्याहीपेक्षा कमी मताधिक्याने जिंकलेली राज्ये यावेळी कुणाकडे झुकतात, हे महत्त्वाचे असून त्यावरच यावेळचा निकाल अवलंबून असेल, असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे. यांचा तपशीलवार विचार म्हणूनच महत्त्वाचा ठरतो. तसेच अमेरिकेत, निरनिराळ्या कारणास्तव, देशातल्यादेशात, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर करणारे मतदारही खूप असतात. त्यामुळे 2016 च्या स्थितीत अशा स्थलांतरामुळे पक्षांच्या पाठिराख्यांच्या संख्येतही बदल होत असतो. हा बदलही 2020 मध्ये निसटत्या बहुमताला कारणीभूत ठरून निकालाचे पारडे पार उलटेपालटे करू शकतो, हेही विसरून चालणार नाही. मते खाणाऱ्यांची भूमिकाही निर्णायक 2016 च्या निवडणुकीत ट्रंप आणि क्लिंटन यांच्याशिवाय आणखीही 5 उमेदवार उभे होते. त्यांनी सरासरीने मिळून 5% मते घेतली आहेत. हे उमेदवार उभे नसते तर 5 % पेक्षा कमी फरक असलेल्या काही राज्यांचा निकाल डोनाल्ड ट्रंप यांच्या विरोधात जाण्याची भरपूर शक्यता होती. कारण यातील बहुसंख्य पक्ष वा/व उमेदवार डोनाल्ड ट्रंप यांचेच कट्टर विरोधक मानले जाता. त्यामुळे या 5 उमेदवारांच्या अनुपस्थितीत त्यांच्या पाठिराख्या मतदारांनी डोनाल्ड ट्रंप यांच्या विरोधातच मतदान करण्याची शक्यता जास्त होती. चुरशीची लढत असेल तर केवळ दोन तीन टक्के मते खाणारे छोटे पक्ष/उमेदवारही निकालाचे पारडे इकडचे तिकडे कसे झुकवू शकतात, ते 2016 मध्ये स्पष्टपणे दिसून आले आहे. तसेच ते 2020मध्येही दिसेल का?

No comments:

Post a Comment