Friday, July 2, 2021

किरकोळ संघर्ष की तिसऱ्या महायुद्धाची नांदी? वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? अझरबैजान हा मुस्लिमबहुल देश एकेकाळी सोव्हिएट रशियातील एक सोव्हिएट (आपला जणू प्रांत) प्रजासत्ताक होता. कॅस्पियन समुद्र आणि कॅाकेशस पर्वत रांगा यात वसलेल्या या देशाची लोकसंख्या 1 कोट इतकी आहे आणि या देशात तुर्की भाषी अझेरी सुन्नी मुस्लिम मोठय़ा संख्येने राहतात. आर्मेनिया हा आशियातील पूर्णपणे भूवेष्ठित देशही एकेकाळी एक सोव्हिएट रशियातील एक सोव्हिएट (जणू प्रांतच) होता. आशिया आणि युरोप यांच्या मध्ये असलेल्या कॅाकेशस पर्वतरांगांमध्ये हा देश आहे. या ख्रिश्चनबहुल देशाची एकूण लोकसंख्या 30 लक्ष आहे. तुर्कस्थान - अझरबैजान युती नागोर्नो- काराबाख या ख्रिश्चनबहुल भूभाग आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार अझरबैजानचा हिस्सा आहे. पण त्यावर आज प्रत्यक्ष ताबा मात्र ख्रिश्चनबहुल आर्मेनियाचा आहे. 1980 मध्ये सोव्हिएट रशियाच्या विघटनाला प्रारंभ झाला होता, तेव्हाच आर्मेनियाने विघटनापूर्वीच ख्रिश्चनबहुल (90% ख्रिश्चन) नागोर्नो- काराबाखचा ताबा आपल्याला मिळावा, म्हणून केलेली मागणी सोव्हिएट रशियाने फेटाळून लावली होती. तेव्हापासून आर्मेनियाचे आणि अझरबैजानचे सैनिक यात संघर्ष चालूच राहिला आहे. आतातर सामान्य नागरिकांचाही अपवाद न करणारे हे युद्ध किरकोळ संघर्षासारखे राहलेले नाही. आजच्या काळातील संघर्ष खरेतर सध्याच्या काळात सरळसरळ युद्धे होतांना फारशी दिसत नाहीत. कुरापत काढण्यापलीकडे कुणी फारसे जातांना दिसत नाही. स्थानिकांच्या मदतीने लहानमोठे उत्पात घडविणे, रोज नवनवीन धमक्या देणे, आयातनिर्यात बंद करणे, प्रवेशबंदी लावणे, बराकीतील सैन्य आणि युद्धसामग्री सीमेवर नेऊन ठेवणे, चकमकी घडवून आणणे अशा कुरापतीवरच सध्या भागत असते. पण जिंकून घेतलेल्या नागोर्नो- काराबाखला एक स्वायत्त प्रदेश अर्तसाख म्हणूनच घोषित करून आर्मेनियाने पर्यायी व्यवस्थापनाची आखणीही केली आहे. मग भलेही त्याला स्वतंत्र देश म्हणून जगाची मान्यता मिळो वा ना मिळो. या सर्व घटनांमुळे या प्रकाराची जातकुळी एकदमच वेगळी आहे, हे जाणवते. आत्ताचा संघर्ष आता नव्याने सप्टेंबर 2020 मध्ये एकमेकांवर सर्व प्रकारच्या शस्त्रांसह प्रखर हल्ले सुरू केले आहेत. यावेळचे आणखी विशेष म्हणजे आर्मेनिया आणि अझरबैजान या दोघांनीही मार्शल लॅा घोषित करून लष्करी अंमल सुरू केला आहे. यावेळी संघर्षाला सुरवात अझरबाईजानने केली असून आर्मेनियाने बळकावलेला प्रदेश परत मिळवायचा हा आमचा निकराचा प्रयत्न आहे, गेली 30 वर्षे आमचा जो भूभाग शत्रूने व्यापला आहे, तो मुक्त करण्याचा आमचा निर्धार आहे, असे घोषित केले आहे. त्यामुळे रशियाने घडवून आणलेला शस्त्रसंधी फारकाळ टिकला नाही/टिकणारही नाही. हितसंबंधांचे राजकारण या संघर्षात रशिया आर्मेनियाच्या बाजूने व तुर्कस्थान अझरबैजानच्या बाजून दिसत असले तरी या प्रश्नात इतरांचेही हितसंबंध गुंतलेले आहेत. कॅाकेशस पर्वतरांगांच्या दक्षिणेला रशियन प्रभावाला चाप लावण्याच्या तुर्कस्थानच्या प्रयत्नांना साथ म्हणून त्याच्या मित्रांनी अझरबैजानला प्रत्यक्ष/ अप्रत्यक्षपणे साह्य केले आहे. गोर्बाचेव्ह यांच्या कारकिर्दीत सोव्हिएट रशियाचे विघटन झाले. मात्र पुतिन यांची राजवट सुरू होताच, त्यांनी स्वतंत्र झालेली ही राष्ट्रे अमेरिकेच्या तावडीत जाऊ नयेत निदान आपल्याच वर्चस्वाखाली तरी रहावीत आणि क्रिमिया आणि युक्रेन यांनी तर पुन्हा रशियात सामील व्हावे, यासाठी प्रयत्न केले यापैकी क्रिमियातील प्रयोग यशस्वी झाला कारण प्रजा अनुकूल होती. पण युक्रेनचे तसे नव्हते. त्यामुळे तिथे रशियाची मात्रा लागू पडली नाही आणि रशियाचा जागतिक स्तरावर निषेध व बहिष्कारही झाला. रशियाचे दोन्ही डगरीवर हात रशिया तर दोन्ही डगरींवर हात ठेवून आर्मेनिया आणि अझरबैजान या दोघांनाही शस्त्रे पुरवतो आहे. रशियाची उजळमाथ्याने सांगितली जाणाणारी भूमिका अशी आहे की, आपण उभयपक्षी समतोल साधून आहोत. पण मग रशियाने आर्मेनियाशी जसा लष्करी साह्य करार केला आहे, तसा तो अझरबैजानशी केलेला नाही, हे कसे? आपण तुर्कस्थानच्याही संपर्कात असून सर्वांशीच आपल्याला स्नेहाचे संबंध हवे आहेत, अशीही मानभावीपणाची भूमिका रशियाने घेतली आहे, हेही कसे? सध्यातरी अमेरिका या प्रकरणी फारशी क्रियाशील दिसत नाही. खनीज तेल आणि नैसर्गिक वायू यांच्या वाहतुकीचा मार्ग या प्रदेशातून जातो व या मार्गाने युरोपला यांचा पुरवठा होत असल्यामुळे सगळेच (आर्मेनिया व अझरबैजान वगळता) सावधपणे शांततेचा पुरस्कार करीत वागत आहेत. अशा प्रसंगी प्रत्येक देश आपल्या हितसंबंधांना अनुसरून भूमिका घेत असतो. आंतरराष्ट्रीय राजकारण हे असेच असते. संघर्षाला दुहेरी पार्श्वभूमी नागोर्नो- काराबाख संघर्षाला दुहेरी पार्श्वभूमी आहे. एक वांशिक/धार्मिक आणि दुसरी भूमीस्वामित्वाबाबतची. आर्मेनिया (अर्मेनियन ख्रिश्चन वंश) आणि अझरबैजान (तुर्की मुस्लिम वंश) या दोन देशातला हा संघर्ष आहे. नागोर्नो- काराबाख हा भूप्रदेश आणि भोवतालचे सात जिल्हे यावर अधिकार कुणाचा, हा कळीचा मुद्दा आहे. सध्या मात्र या भूभागावर अर्तसाख नावाच्या स्वयंघोषित प्रजासत्ताकाच्या नावाखाली आर्मेनियाचाच अंमल सुरू आहे. रशिया दोघांनाही शस्त्रपुरवठा करीत समतोल (?) साधतो आहे, तसाच शांतताही प्रस्थापित करू पाहतो आहे. तुर्कस्थान मात्र अझेरबैजानचे समर्थन करतो आहे. इराणची अधिकृत भूमिका तटस्थ आणि मध्यस्थाची आहे. अझरबैजानची भौगोलिक एकतेचा पुरस्कार करणाऱ्या अमेरिकेची धोरणे मात्र आर्मेनियाच्या हटवादीपणाला पाठिंबा देणारी आहेत. फ्रान्स अर्मेनियाच्या पाठीशी उभा आहे. हा पाठिंबा धार्मिक आधारावर आहे. पाकिस्ताननेही अझरबैजानच्या बाजूने धार्मिक आधारावरच वक्तव्य दिले आहे. आता आखाती इस्लामी देश अझरबैजानच्या पाठीशी उभे राहातील, तर दुसरीकडे ख्रिश्चन देश हे अर्मेनियाच्या मागे उभे राहतील. पण इस्रायलने अझरबैजानला पाठिंबा दिला आहे, नवलच म्हटले पाहिजे. इराणने मात्र अर्मेनियाला पाठिंबा दिला आहे. कारण एकतर 1828 पर्यंत आर्मेनिया इराणमध्ये समाविष्ट होते आणि दुसरे महत्त्वाचे असे की, इस्लामी जगताचे नेतृत्व करण्यासाठी इराण आणि सौदी अरेबिया यांच्या स्पर्धेत आता तुर्कस्तानही उतरले आहे. त्यामुळे इराणची भूमिका तुर्कस्थानविरुद्ध आहे. भविष्यवाणी सध्या अन्नपाण्यादी मूलभूत समस्या, आर्थिक घसरण यांच्यावरील लक्ष विचलित करण्यासाठी अतिप्रखर राष्ट्रवाद, धार्मिक वर्चस्ववाद, सार्वभौमत्वाचा जागर, जुन्या वादांना नवीन झळाळी, विस्तारवादी भूमिका, यावर भर दिला जातो आहे. जसे चीनचे तैवान, हाँगकाँग व भारत यांच्याशी उकरून काढलेले वाद, इस्लामिक स्टेटची (इसीस) भारताविरुद्ध नव्याने सुरू झालेली वळवळ, मोझांबिकमधून दंगेखोरांना झालेली आर्थिक मदत ही याची उदाहरणे आहेत. पण अझरबैजान आणि आर्मेनिया यातील संघर्ष या जातकुळीत बसणारा वाटत नाही. अशी भविष्यवाणी होती की, तिसरे महायुद्ध धर्माच्या आधारावर ख्रिश्चन व इस्लाम या धर्मियात लढले जाईल. निर्वासित अल्पसंख्य मुस्लिमांच्या हिंसक कारवायांमुळे युरोपात त्यांच्याविरुद्ध असंतोष वाढतो आहे. हे निर्वासित की छुपे घुसखोर? अल्पसंख्य असतांना गुरगुरणे व बोचकारणे, समतोल असेल तर कुरघोडी करणे आणि बहुसंख्य होताच गिळंकृत करणे, याबाबत कोण कसा, हे सर्व अभ्यासाचे विषय आहेत. अशा दोन तुल्यबळ महाशक्ती जर परस्परविरोधात खरेच उभ्या ठाकल्या असतील, तर तिसरे महायुद्ध सुरू होण्यास कितीसा उशीर?

No comments:

Post a Comment