Thursday, July 1, 2021

१५. ०६. २०२१ यालाही जीवन असेच नाव! वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? सायकॅड हा टोळांच्याच जातीचा, फक्त अमेरिकेतच आढळणारा, अनेक उपजाती असलेला, कीटकवंश अमेरिकेच्या ईशान्य भागात या वर्षी तब्बल 17 वर्षांनी प्रगट झाला आहे. पण ही त्यांची 17 वर्षांची तपस्या किंवा समाधी नाही. 2004 ते 2021 या काळात हे कीटक जमिनीच्या आत वृक्षांच्या मुळांमधील रस शोषून जगतच नव्हे तर वाढत आणि विकासही पावत होते. बाहेर जमिनीवर आल्यानंतर काही काळानंतर नरांचे प्रियाराधन सुरू होते. या संगीताचा आवाज डीजे च्या आवाजाच्या कितीतरी जास्त असतो. या आवाजाने आपले कान किटतात. हा आवाज मानवांना सहन होत नाही. सध्या हे जसे जंगलात जमिनीबाहेर पडत आहेत तसेच ते अमेरिकन नागरिकांच्या अंगणातही अवतरत आहेत. न्यूयॅार्क, वॅाशिंगटन, मेरीलॅंड, टेनेसी, सिनसिनाटी, ओहायहो, पेन्सिलव्हॅनिया यासह एकूण 15 राज्यात ठिकठिकाणी लाटांच्या स्वरुपातले त्यांचे आगमन आणि त्या पाठोपाठचे त्यांचे प्रियाराधन अतिकर्कश्य आवाजात गवतकापणीयंत्राच्या आवाजाशी बरोबरी करीत सुरू झालेले आढळले. सायकॅड्सची संख्या आणि आवाजाची तीव्रता इतकी असते की, साऊंड प्रुफ कारमध्येही हे आवाज ऐकू येतात. प्रत्यक्ष मोजणीत एका एकरात 15 लक्ष असा त्यांच्या प्रगटण्याचा उच्चांक ठरला आहे. सध्या अमेरिकेतील वृत्तवाहिन्या यांची माहिती रोज पुरवीत आहेत. अमेरिकेलाच पसंती संपूर्ण पृथ्वीवरचा अमेरिका देशच, मानवाच्याही अगोदर, सायकॅडच्या पसंतीला उतरला आहे. येत्या महिन्याभरात ब्रूड (समूह) - 10 जातीचे लक्षावधी सायकॅड्स प्रगट होत आहेत. 64 डिग्री फॅरेनहाईट किंवा 18 डिग्री सेल्सियस उष्णतामान यांना विशेष पोषक असते. हा काळ एप्रिल ते मे इतका असू शकतो. अगोदर जमीन पावसाने ओली झालेली असणे यांना आवडते. काही खास दूत तर अगोदर जमिनीवर येऊन सर्व अनुकूल असल्याची खात्री पटवून घेतात, म्हणे. जमिनीतून बाहेर उघड्यावर येतांना उधईप्रमाणे मातीचे संरक्षक नलिकाकार सुरुंग तयार करून योग्य जागी आल्यावर, वृक्षांच्या बुंध्यांवर चढतांनाच्या 4 ते 6 आठवड्यानंतर, जंगले आणि आसमंतातील क्षेत्रे, नरांच्या प्रियाराधनाचे निमिताने सुरू होणाऱ्या प्रेमगीतांनी गुंजू लागतात. प्रेमगीतातांचा शेवट नर आणि माद्यांच्या मीलनात होतो. यथावकाश त्या शेकडोंनी अंडी घालण्यास सज्ज होतात. वृक्षांच्या कोवळ्या शाखांची काळजीपूर्वक निवड करून मगच माद्या अंडी घालतात. हे कार्य आटोपले की नरमाद्यांचा जीवनहेतू पूर्ण होतो आणि ते अंडी उबण्याची वाट न पाहता मृत्यूला कवटाळात. यथावकाश ही अंडी उबतात आणि सायकॅडाचा बालरूपातला निंफ जन्माला येतो. गडद लाल रंगाचे, भरपूर अंतर ठेवून असणारे, त्याचे टप्पोरे डोळे आणि काळेकुळकुळीत शरीर पाहून अनेकांना धडकीच भरायला होते. निंफ हे नाव प्राचीन ग्रीक साहित्यातले असून ते देवतेचे बाल्यावस्थेतील सुकुमार रूप आहे. आता वृक्षाची गरज राहिलेली नसते. निंफ वृक्षाच्या कोवळ्या फांदीचा त्याग करून भूमीवर पडतो आणि पडताक्षणीच जमिनीत घुसायला सुरवात करतो आणि वृक्षाचे मूळ शोधतो. हेच त्याचे पुढील 17 वर्षपर्यंतचे निवासस्थान असते. जीवनासाठी आणि विकासासाठी आवश्यक असलेले घटक तो मुळातील रसातून शोषून घेतो. साकॅड्स मानवाला कोणतीही गंभीर स्वरुपाची हानी पोचवत नाहीत. ते नांगी मारत नाहीत की विषारी द्रव्य बाहेर टाकत नाहीत. पीके खाऊन फस्त करणाऱ्या टोळांसारखे यांचे कार्य नसते. पण तरीही काही पिकांचे थोडेफार नुकसान यांच्यामुळे होते,हे मात्र खरे आहे. सतत 17 वर्षे भूपृष्ठाखाली राहून वृक्षांच्या मुळातील रसाचे प्राशन करून विकसित आणि तृप्त झाल्यानंतर सायकॅड्सचे निंफ, दोन सेमी व्यासाचे छिद्र पाडून, जमिनीवर अंधार पडताच, समूहाने प्रवेश करतात. अंधारामुळे त्यांची बाहेर येतानाची चुळबुळ/लगबग भक्षकांच्या एकदम लक्षात येत नाही. पण प्रचंड संख्या हेच त्यांचे भक्षकांविरुद्धचे स्वसंरक्षणाचे एकमेव हत्यार असते. खाऊन खाऊन किती खाल? कितीही खाल तरी आम्ही शिल्लकच राहू, अशी त्यांची भूमिका असते. जीवनकलहातील या तंत्राला भक्षकाचे तुष्टीकरण तंत्र (सॅशिएशन ॲाफ प्रिडेटर) असे शास्त्रीय नाव आहे. भूपृष्ठावरील जीवन आणि विकास भूपृष्ठावर येताच निंफचे थवे दिसेल त्या झाडावर टोक गाठण्यासाठी चढायला तात्काळ सुरवात करतात. 17 वर्षांच्या भूमिगत अवस्थेनंतरची त्यांची या आरोहासाठीची लगबग सहाजीकच म्हणायला हवी. याचवेळी ते विकसित होऊन कात टाकतात, त्यांना दमदार पंखही फुटतात. पण या काळात त्यांची नवीन त्वचा खूपच नाजूक असते. अमेरिकन पाककलेच्या पुस्तकात नाजूक स्थितीतल्या सायकॅडपासून तयार केलेल्या अनेक चविष्ट आणि लोकप्रिय व्यंजनांची माहिती आढळते. याच काळात मुंग्या, पक्षी, कुत्री, मांजरे हे भक्षक सुद्धा त्यांच्यावर - तब्बल 17 वर्षानंतर मिळणाऱ्या मेजवानीवर - तुटून पडतात. पण यांच्या लाटा भक्षकांना पुरून उरतात. हळूहळू त्यांचा नाजुकपणा संपतो. ते हट्टेकट्टे आणि पांढऱ्याचे काळेकुट्ट होतात आणि अतिकर्कश्य आवाजात नरांचे प्रियाराधन सुरू होते. यात आपल्या दृष्टीने नाजुकपणाचा लवलेशही नसला तरी माद्यांना भुरळ पाडण्याची किमया मात्र यात असते. ही नरांनी माद्यांना घातलेली साद असते. हे संगीत 80 ते 100 डेसिबल्सपर्यंत असू शकते. आवाज 80 डेसिबलच्या वर गेल्यास तो आपण कर्कश आणि हानीकारक मानतो. आवाजाची मर्यादा दिवसा 50 ते 65 आणि रात्री 40 ते 55 डेसिबलपर्यंतच असणे गरजेचे आहे, हा मानवांचा नियम यांनी साफ झुगारून दिलेला आहे. या नियमाचे सरळसरळ उल्लंघन होत असूनही अमेरिकेतील कोणत्याही जागरूक न्यायालयाने याची सू मोटो - स्वत:हून - दखल घेतल्याचे ऐकिवात नाही. 2004 च्या ब्रूड -10 च्या या आठवणी आता 2021 मध्ये पुन्हा एकदा जाग्या झाल्याचे सांगणारे अमेरिकेत अनेक आहेत. यांचा आवाजाशिवाय अन्य उपद्रव म्हणजे मीलन आणि फलनानंतर यांच्या माद्या वृक्षांच्या इवल्या इवल्या फांद्यां पोखरून त्यात अंडी घालतात, हा आहे. वृक्षांचे किंवा रोपट्यांचे संरक्षण करण्याचा एकमेव उपाय म्हणजे ते झाकून ठेवणे हाच आहे. ही अंडी यथावकाश उबतात आणि त्यातून निंफ बाहेर पडतो. याचा आकार तांदळाच्या दाण्याइतका असतो. यांना मात्र वृक्षाचा आसरा नकोसा असतो. ते सरळ जमिनीवर उडी मारतात आणि तातडीने जमीन पोखरून जमिनीत वृक्षांची मुळे शोधतात आणि त्यांचे 17 वर्षांचे भूमिगत जीवन सुरू होते. इकडे जमिनीवर त्यांच्या मातापित्यांच्या जीवनाची इतिश्री झालेली असते. त्यांच्या प्रेतांच्या खचाने झाडाखाली गवत झाकले जाते. हळूहळू त्यांची कलेवरे जमिनीत खत रुपात विरून जातात. यावेळी मात्र सर्वत्र दुर्गंध पसरलेला असतो. पण यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. झाडाची मुळे ही पोषक द्रव्ये शोषून घेतात. यातील रसांवरच निंफ 17 वर्षे आपले उदरभरण आणि पोषण साध्य करीत असतो. हा सगळा हिशोब तंतोतंत चुकता केला जातो. कुणीही कपर्दिकही स्वत: साठी राखून ठेवत नाही. सायकॅड्स आणि आपण असे आहे सायकॅडचे जीवनचक्र! दर 17 वर्षांनी नेमाने येणारी ही निसर्गातील एक अतिविचित्र घटना आहे. त्यात उघड घाऊक संभोग आहेत, पण ते मादीच्या संमतीने, ही एका कीटकवंशाने संख्याबलाच्या आधारे विनाशावर केलेली मात आहे आणि यात उत्क्रांतीतील जीवनकलहात टिकून राहण्याच्या बाबतीतले अतिप्राचीन विश्वरूपदर्शनही घडते. अवतरण, बुभुक्षित भक्षकांची क्षुधा पूर्ण करीतही टिकून राहणे, प्रियाराधनोत्त्तर मादीच्या संमतीने मीलन, मीलनोत्तर अंडी घालून होताच तात्काळ मृत्यू, काळजीपूर्वक निवडलेल्या सुरक्षित स्थळी घातलेल्या अंड्यांच्या उबण्याचीही वाट न पाहता केलेला देहत्याग व कलेवरांच्या रूपाने भूमातेच्या कुशीत विसावणे आणि विरणे, लगेच पोषणरुपाने मुळांमध्ये प्रवेश करणे आणि नव्या पिढीचे पुन्हा 17 वर्षांनी भूतली अवतरण ही प्रक्रिया आता अमेरिकेत लवकरच पूर्णत्वाकडे पोचेल. या सगळ्यांचा अनेक अमेरिकनांच्या मनावर उबग आणणारा परिणाम झालेला आढळतो. मनोविकृतितज्ज्ञांनी कीटकवैज्ञानिकांच्या कानावर ही घटना घातली. त्यांचे उत्तर आश्वासक आहे. प्रदूषण आणि प्रतिकूल हवामानबदलाच्या काळातील हा नाट्यपूर्ण जीवनपट असून तो निसर्गाच्या चिवट आणि जिवटपणाची साक्ष पटवणारा आहे. अर्थात या दिलाशाने किती लोकांचे मनोस्वास्थ्य पूर्वपदावर येत असेल, हा अभ्यासाचा विषय आहे. कोविडकाळातील विलगीकरण आपल्याला नकोसे झाले आहे. पण सायकॅडचे विलगीकरण तर 17 वर्षांचे आहे. या काळात यांचे शुद्ध शाकाहारी/रसाहारी भोजनयुक्त जीवनच तेवढे सुरू असते. दरवेळी 17 वर्षांच्या अज्ञातवासातून ते उमेदीने भूतलावर येत असतात. विकास पावत असतांना त्यांचा लाखोंच्या संख्येत फडशा पडत असतो. पण जिद्द कायम ठेवीत कात टाकीत ते पंखही धारण करतात आणि भक्षकांच्या तावडीतून सुटण्यासाठी वृक्षांच्या शेंड्यांवर जाऊनच थांबतात. आता फक्त हनिमून! केवळ शृंगार!! मानवाला कर्कश्य वाटणाऱ्या पण मादीसाठी केवळ सुमधुर असलेल्या पंखनिर्मित ध्वनिसोबत थरथरनृत्य करीत मादीला प्रपोज करण्याचे काम नराचे. हे क्लिक झाले तरच मादी पंख हलवून पसंती दर्शवणार. म्हणजे इथेही स्वयंवर आहे तर! असा हा लोकविलक्षण जीवनोत्सव अनुभवण्याची जिज्ञासा असणाऱ्यांनी, विसर पडू नये म्हणून, 2038 च्या अमेरिकन प्रवासाचे आरक्षण आत्ताच केलेले बरे! नाही का?

No comments:

Post a Comment