Friday, July 2, 2021

अमेरिकेचा अध्यक्ष आजारी पडतो तेव्हा… वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? मरीन वन या हेलिकॅाप्टरवर आरूढ होऊन डोनाल्ड ट्रंप वॅाल्टर रीड हॅास्पिटलमध्ये कोविड19 वरील उपचारासाठी आणि डॅाक्टरांच्या देखरेखीखाली राहण्यासाठी अनिच्छेनेच व तज्ञांच्या अत्याग्रहास्तवच निघाले, तेव्हा ते थकलेले दिसत होते. पण आपली प्रकृती चांगली आहे, अशी त्यांची भूमिका होती. याचवेळी एक सैनिकी अधिकारीही त्यांच्या पाठोपाठच निघाला. त्याच्या हाती एक चामड्याची बऱ्यापैकी मोठी ब्रिफकेस होती. हिला फुटबॅाल असे नाव आहे. हा एक कोडवर्ड आहे. ब्रिफकेसमध्ये रोजचे वापरण्याचे कपडे असावेत, असाच कुणाचाही समज होईल. पण तसे नाही. अण्विक हल्ला करण्याचा आदेश बॅाम्बर्सना, क्षेपणास्त्रे डागणाऱ्या सबमरीन्सना आणि भूमीवरील लांब पल्याच्या क्षेपणास्त्रांना देण्याबातची गुप्त संदेशव्यवस्था यात योजलेली असते. हा अधिकारी या ब्रिफकेससह अध्यक्षांसोबत दवाखान्यात सुद्धा सोबतच राहणार आहे. जर अध्यक्षांची प्रकृती आणखी बिघडली तर? निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात उरली नाही तर? कुणीतरी सक्षम व्यक्ती जबाबदारीच्या पदावर सदैव राहील यासाठी काही तरतूद आहे किंवा कसे? परिस्थिती कशी हाताळायची? अध्यक्ष म्हणजे अमेरिकेचा सरसेनापती असतो. तो आजारी पडला किंवा निर्णय घेण्याचे सामर्थ्य त्याच्यात उरले नाही तर परिस्थिती परिणामकारक रीतीने (इफेक्टिव्हली) व कार्यक्षमतेने (एफिशियंटली) कशी हाताळायची याबाबतच्या स्पष्ट सूचना नमूद करून ठेवलेल्या आहेत. अध्यक्षाची प्रकृती कशीही असो, भविष्यात काहीही वाढून ठेवलेले असो, अध्यक्षपद व्यक्तीपेक्षा मोठेच मानले जाणार. यासाठीच्या व्यक्ती आणि प्रक्रिया तयार असतात. सुसज्ज व्यवस्था अध्यक्षांना ज्या हॅास्पिटलमध्ये हलविले गेले आहे, त्यात सर्वप्रकारच्या सोयीसुविधा आहेत, छोट्याशा पण सुरक्षित अशा अनेक खोल्या त्यात आहेत. आधुनिकतम संपर्कव्यवस्था आहे, मुख्य म्हणजे आदेशकक्ष आहे. असाच आदेशकक्ष एअर फोर्स वन या अध्यक्षांच्या खास विमानातही असतो. आजाराशी सामना करताकरताना अध्यक्षीय जबाबदाऱ्याही पार पाडता याव्यात यासाठी ही अद्ययावत व्यवस्था असते. डॅा सीन कॅानली हे अध्यक्षांसाठीचे खास डॅाक्टर आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी त्यांना ताप नव्हता. त्यांना सध्या ॲाक्सिजन दिला जात नाही.(म्हणजे अगोदर दिला जात होता?) रेमडेसिव्हिअरचा पहिला घुटका (डोज) देऊन झाला आहे. हॅास्पिटलमधून ते नक्की केव्हा मुक्त होतील, हे त्यांनी सांगितलेले नाही. येते आठ दिवस गांभीर्यानेच घ्यायला हवेत, असे मात्र ते म्हणाले आहेत. काळजी करण्यास कारण की, ही काळजी सकारण आहे. एक म्हणजे अध्यक्षांचे वय. ते 74 वर्ष आहे. त्यांचे वजनही नेमून दिलेल्या वजनापेक्षा जास्त (ओव्हरवेट) आहे. कोविड19 रुग्णासाठी हे खूपच धोक्याचे मानले आहे. वाढत्या वया व वजनामुळे मुख्य आजारासोबत अन्य गुंतागुंतही (कॅाम्प्लिकेशन्स) साथीला येते. गेला शुक्रवार तसा बराच काळजीत गेला. आजाराशीच्या सामन्यातले पुढचे 48 तास खूपच काळजीचे असणार आहेत. व्हाईट हाऊसमधली शांतताच इतरांना काळजीची वाटते आहे. याचा प्रचार मोहिमेवर काय परिणाम होणार? या विचारात विरोधक बुडाले आहेत. तर उपचार म्हणून आणखी काही करण्यासारखे होते काय/आहे काय, याची चिंता समर्थक करीत आहेत. नवचैतन्यासाठी आणखी काय करता येईल? हा प्रश्न त्यांना सतावतो आहे. वारसदारांची क्रमवारी लक्षणांची तीव्रता वाढल्यास डोनाल्ड ट्रंप अध्यक्षीय जबाबदारी उपाध्यक्ष माईक पेन्स यांच्याकडे सोपवू शकतील/शकतात, अशी तरतूद करणारी 25 वी घटनादुरुस्ती 10 फेब्रुवारी 1967 साली राज्यांचीही रीतसर संमती मिळून अमलात आली (रॅटिफाईड) आहे. अध्यक्षानंतर उपाध्यक्षाचा, उपाध्यक्षानंतर हाऊसच्या स्पीकरचा, त्याच्यानंतर सिनेटच्या स्पीकरचा, यानंतर क्रम आहे कॅबिनेट सेक्रेटरींचा. 22 नोव्हेंबर 1963 ला केनेडींचा खून झाल्यानंतर ही दुरुस्ती करण्यात आली आहे. अशी ही अध्यक्षानंतरच्या वारसदारांची क्रमवारी आहे. पण अध्यक्ष केवळ आजारीच पडला किंवा जखमीच झाला तर काय? 25 वी घटनादुरुस्तीने याबाबतही पुरेशी स्पष्टता आणली आहे. प्रशासन अध्यक्षांचे अधिकार तात्पुरते उपाध्यक्षांकडे सोपवू शकते. कलम क्रमांक 3 नुसार, शस्त्रक्रिया करावी लागल्यास अध्यक्ष उपाध्यक्षाकडे अधिकार सोपवू शकतो. 1985 साली अशी वेळ आली होती. तेव्हा रेनॅाल्ड रीगन यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली होती. जॅार्ज बुश यांनीही 2002 आणि 2007 साली याच अधिकारांचा वापर केला होता. जर अध्यक्ष स्वत:हून पदापासून दूर होण्यास असमर्थ वा अनुत्सुक (अनेबल ॲार अनविलिंग) असेल तर काय? हे मात्र आजवर घडलेले नाही. कलम 4 नुसार सर्व कॅबिनेट सेक्रेटरी मिळून बहुमताने, अध्यक्ष आपले कर्तव्य पार पाडण्यास असमर्थ आहे असे अगोदर जाहीर करतील. पण मी सक्षम आहे, असा सावधगिरीचा इशारा (ॲलर्ट) अध्यक्ष हाऊसच्या आणि सिनेटच्या नेत्यांना देऊ शकतील व आपले काम सुरूच ठेवू शकतील. पण 48 तासांच्या आत यावर अमेरिकन कॅांग्रेसमध्ये मतदान घेतले जाईल. आजाराची लक्षणे पाहून, अजून तरी अध्यक्षांचे अधिकार सोपविण्याबाबतची घोषणा झालेली नाही. शनिवारी डॅा कॅानली यांच्या उपस्थितीत डोनाल्ड ट्रंप यांनी बरेच काम उरकले असून अजूनही हा क्रम सुरू आहे. राज्यघटना सुस्पष्ट, मोघम भूमिका नको राज्यघटना इतकी सुस्पष्ट असून सुद्धा व्हाईट हाऊसचे अधिकारी आणि ट्रंप यांचे स्वत:चे वैद्यकीय अधिकारी यांच्या माध्यमातून अध्यक्षांच्या कार्यक्षमतेबाबत कानी पडणारे संदेश बुचकळ्यात टाकणारे आहेत. प्रिन्सटन विद्यापीठाचे प्राध्यापक आणि तज्ञ ज्युलियन झेलिझर यांनी तर इशाराच दिला आहे की, असे उलटसुलट संदेश पाठवत जाऊ नका. स्पष्ट बोला. प्रामाणिक व नेमकेपणे सांगा की, अध्यक्ष अल्पकाळासाठी अक्षम झाले आहेत किंवा कसे? वस्तुस्थिती कळल्यानेच अमेरिकन जनता आश्वस्त होईल. सत्य लपवल्यास चिंता आणि असुरक्षाच वाढणार आहे. तसे होऊ देऊ नका. 2017 मध्ये काय घडले होते? ट्रंप यांच्या कारकिर्दीत हे आताच घडते आहे, असे नाही. 2017 मध्येही डोनाल्ड ट्रंप अध्यक्षपदी राहण्याच्या योग्यतेचे नाहीत, अशा वावड्या उठल्या होत्या. खुद्द व्हाईट हाऊसच्याच एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करता न्यूयॅार्क टाईम्समध्ये संपादकीय लिहून कॅबिनेटमध्ये ट्रंप यांच्याबाबत 25 व्या घटनादुरुस्तीचा आधार घेऊन कारवाई करण्याबाबत चर्चा झाल्याचे लिहिले होते. डेप्युटी अटर्नी जनरल यांनी अध्यक्षांची या प्रश्नी भेट घेण्यासंबंधातले वृत्तही समोर आले होते. पण लगेचच अध्यक्षांच्या संपर्कप्रमुख व निदेशक ॲलिसा फराह यांनी, अध्यक्ष सक्षमतेने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडीत आहेत, असे जाहीर करून या प्रकरणावर पडदा टाकला होता. ह्या घटनेची आज पुन्हा एकदा आठवण व्हावी, ही घटना कशाची निदर्शक मानायची? यावेळी तर स्वत: ट्रंप यांनी, अतिगंभीर प्रकरणीच केल्या जाणाऱ्या स्टेराईड थेरपीच्या यशस्वी औषधोपचारानंतर, कॅमेरासमोर बसून व समोर येऊन आम्हा उभयतांची (सौंभाग्यवतींची सुद्धा) प्रकृती ठीक आहे म्हणून आश्वस्त केले आहे. प्रचाराला प्रारंभ करीत कारमधून फेरफटकाही मारला आहे. ट्रंप यांचे अध्यक्षपद अनेकांना खुपते आहे. म्हणून उठत आहेत का या वावड्या? ट्रंप खरेच आजारी पडले होते का, इथपासून तो ते खरेच बरे झाले आहेत का, अशा शंका घेतल्या जात आहेत. अशा खऱ्या/खोट्या वावड्या येतच असतात, यावेळीही येतच राहतील. निदान निवडणूक पार पडेपर्यंत तरी.

No comments:

Post a Comment