Friday, July 2, 2021

अमेरिकन मतदार आणि मतदानपद्धतीचे विशेष वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 3 नोव्हेंबरला अमेरिकेत केवळ अध्यक्षपदाचीच नव्हे तर जवळजवळ सर्वच स्तरावरच्या निवडणुका पार पडणार आहेत. यात जशा काऊंटी (जिल्हे) स्तरावरच्या निवडणुका येतात, तशात राज्यस्तरावरच्या निवडणुकाही येतात. निरनिराळ्या मंडळांची निवडणूक, अशा अगदी झाडून सगळ्या निवडणुका एकाच मतपत्रिकेच्या आधारे पार पडणार आहेत. देशपातळीवर हाऊसच्या 435 प्रतिनिधींच्या निवडणुका, निवृत्त होणाऱ्या 34 सिनेटर्सच्या निवडणुका व अध्यक्षाची निवड करणाऱ्या 538 इलेक्टर्सच्या निवडणुकांसोबत घटना व कायद्यातील दुरुस्तीबाबतचा मतदारांचा कौल, विशिष्ट प्रश्नांबाबतची जनमत चाचणी (जसे गर्भपात, समलिंगींचे प्रश्न आदी), न्यायाधीश, शेरीफ, शासकीय वकील, नोंदणी अधिकारी यांची निवडणूक वा त्यांना मुदतवाढ असे त्या त्या वेळचे सर्वस्तरांवरचे, सर्व विषय एकाच वेळी, एकाच चारपानी अगडबंब मतपत्रिकेद्वारे जाणून घेण्याचा अमेरिकेतला हा प्रकार बहुदा जगातला एकमेव व अद्वितीय असावा. निकाल जाहीर होण्यास उशीर होणार अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल कळायला 3 नोव्हेंबरला मतदान झाल्यानंतरही बरेच दिवस वाट पहावी लागणार आहे. कारण आहे पोस्टल बॅलट - पोस्टाद्वारे होणारे मतदान. कोविड 19 च्या प्रकोपामुळे यावेळी पोस्टल बॅलटची संख्या बरीच जास्त राहणार आहे. त्याचा परिणाम निकाल लवकर न लागण्यात होणार आहे, पोस्टल बॅलटमुळे गडबड/ गैरप्रकार करायला भरपूर वाव असेल, अशी भीतीही विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी व्यक्त केली आहे. उदासीन अमेरिकन मतदार 19 व्या शतकाचे शेवटी 1896 साली मतदानाची टक्केवारी अमेरिकेत 79.3 इतकी भरभक्कम होती. तर विसाव्या शतकातील निचांकी मतदान 1924 साली 48.9% इतके झाले होते. ही टक्केवारी खालीवर होतहोत 2000 साली 51. 21, 2004 साली 56.70 , 2008 साली 58. 23 अशी वाढत गेली. 2012 साली मात्र पुन्हा एकदम घसरून 54. 87 इतकी झाली. पण 2016 साली पुन्हा किंचित वाढून ती 55.67 पर्यंत पोचली. 2016 सालच्या टक्केवारीत 2012 च्या मतदानाच्या टक्केवारीच्या तुलनेत 0.8 % वाढ झालेली दिसत असली तरी हे वाढलेले मतदान समाधानकारक म्हणता येणार नाही. ज्या देशात व्यक्तिस्वातंत्र्याचा सतत उदोउदो होत असतो, जो देश जगातील सर्व शक्तिमान देश मानला जातो, त्या देशात 40 % पेक्षा जास्त मतदार मतदानापासून दूर राहतात, ही जशी अमेरिकेच्या दृष्टीने कमीपणाची, चिंतेची आणि चिंतनाची बाब आहे, तशीच ती जगातील लोकशाही मानणाऱ्या लोकांसाठीही तेवढीच चिंतेची आणि चिंतनाची बाब आहे/असली पाहिजे. कमी मतदान, मतदारांच्या निराशाजन्य उदासीनतेमुळे आणि अपेक्षांच्या अभावातून, तर भरघोस मतदान, अपेक्षाजन्य उत्साहातून आणि उज्ज्वल भविष्याच्या अपेक्षेतून होत असते, असे मानतात. उदासीनता आणि उत्साह यातील हिंदोळे, उमेदवार कोण आहेत, त्यांची विश्वसनीयता किती, यावर अवलंबून असतात. याचा अनुभव भारतात 2014 आणि 2019 मध्ये आपल्याला आला आहे. यावेळी अनुक्रमे 66.54 % आणि 67.40 % मतदान झाले होते. भारतातील 2014 ची मतदानाची टक्केवारी हीच मुळात भारतीय निवडणुकीतील सर्वोच्च टक्केवारी होती. 2019 मध्ये तर आपण तिच्यावरही कडी केली आहे. पण अडचण ही आहे की, मोदींचे विक्रम इतके आहेत की, त्यामुळे सगळे विक्रम लक्षात ठेवणे कठीण होऊन बसले आहे! इकडे अमेरिकेत 2020 मध्ये निवडणुकीत ट्रंप यांचा विजय निश्चित मानला जात असताना मध्येच कोरोना शिंकला आणि अख्खे जनमानस ढवळून निघाले. जोडीनेच आली असलेली आर्थिक घसरगुंडी, मंदी, व्यापारयुद्घ, वर्णसंघर्षाचा विकोप यामुळे काय होणार याची सर्वांनाच (विशेषत: रिपब्लिकांना) चिंता वाटू लागली आहे. मतदानपूर्व मतचाचण्यात डेमोक्रॅट पक्ष मोठी आघाडी घेतांना दिसतो आहे. पण गेल्या दोन आठवड्यात डोनाल्ड ट्रंप यांची स्वीकार्यता एकदम 3 टक्याने वाढून 47 % इतकी झाली आहे. याला खूप महत्त्व नसले तरी सततची घसरण तर थांबलीच पण शिवाय स्वीकार्यतेची चढती कमान सुरू झाली आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. या शिवाय निवडणुकीत इतरही फंडे महत्त्वाचे असतात. अल्पसंख्यांकांची व श्वेतेतरांची मतपेढी तयार केली/झाली असली तरी त्यामुळे श्वेतवर्णी बहुसंख्यांकांच्या मतपेढीला आपोआपच बळ प्राप्त होते आहे, हेही महत्त्वाचे आहे. आता त्यासाठी फारसे प्रयत्न करावे लागत नाहीत, हेही महत्त्वाचे आहे. अमेरिकन मतदानपद्धतीचे विशेष स्थानिक निवडणूक व्यवस्थापनाला आपली अडचण कळवून मतदान दिनांकाच्या अगोदरही अमेरिकेत मतदान करता येते. एका पाहणीनुसार यावेळी 60 % मतदार 3 नोव्हेंबर 2020 या मतदान दिनांकाच्या अगोदरच मतदान करू इच्छितात. डेमोक्रॅट पक्षाच्या 70% मतदारांना मतदान दिनांकाच्या अगोदर मतदान करायची इच्छा आहे. ही टक्केवारी रिपब्लिक मतदारांसाठी मात्र फक्त 48 % आहे. एकूण सर्व मतदारांचा विचार केला तर 52% मतदार मतदान दिनांकाच्या दिवशीच मतदान केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन मतदान करू इच्छितात. आपले मत इकडेतिकडे जाऊ नये, यासाठी हा सर्वात विश्वसनीय मार्ग आहे, असे त्यांना वाटते. दोन्ही पक्षांच्या जवळजवळ 50 % मतदारांना कोरोनाच्या भीतीमुळे गर्दी टाळण्यासाठी अगोदरच मतदान करून मोकळे व्हायची इच्छा आहे. पण अनेकांना पोस्टाने मतदान करावयाचे नाही. पोस्टल बॅलटमध्ये गैरव्यवहार होण्याची त्यांना भीती वाटते. यापेक्षा मतदानासाठी ईमेलचा वापर त्यांना अधिक सोयीचा वाटतो. अनेक मतदार दुसऱ्या कुणाला तरी आपल्या वतीने मतदान करण्याचा अधिकार (प्राॅक्सी व्होट) देऊ इच्छितात. अमेरिकेत असे करता येते. पण याच्या दुरुपयोगाबाबत रिपब्लिकन पक्षाला मात्र शंका व भीती वाटते. यात खुद्द डोनाल्ड ट्रंप स्वत: आहेत. म्हणून स्वत:च अगोदर जाऊन मतदान करू इच्छिणारेही अनेक आहेत. कारण ते मतदान आपल्याच उमेदवाराला मिळेल याची जास्तीतजास्त खात्री या प्रकारात आहे/असते. या सर्व सोयी पूर्वीपासूनच उपलब्ध असल्या तरी यावेळी कोविड19 च्या धास्तीमुळे या सवलतींचा अवलंब करण्याकडे मतदारांना कल वाढतो आहे. पोस्ट बॅलट पद्धतीबाबतही माहितीपर मजकूर व प्रशिक्षणाला प्रारंभ झाला आहे. या विषयाशी संबंधित जाहिराती माध्यमांमध्ये झळकू लागल्या आहे. प्रात्यक्षिके प्रसारित होत आहेत. प्रचाराचा टेंपो वाढवीत वाढवीत शेवटच्या क्षणी भात्यातून बाण काढण्याच्या प्रकाराबाबत मात्र यामुळे अडचणी येणार आहेत. कारण अनेकांचे मतदान मतदान दिनांकाच्या आधीच पार पडलेले असेल. संसर्गाच्या भीतीने अनेक मतदार मतदानाला न जाण्याचीही भीती आहे. 2016 मध्ये मतदानाची टक्केवारी 58 % पेक्षा थोडी कमीच होती. यावेळी काय होणार, ही चिंता दोन्ही पक्षांना सतावते आहे. प्रत्येक पक्षाचे हुकमी मतदान मात्र नक्की होईल. कारण प्रत्येक पक्ष आपले हुकमी मतदान नक्कीच घडवून आणील. पण कुंपणावरचे, उदासीन, कोरोनामुळे धास्तावलेले आणि वृद्ध घरीच बसतील, अशी भीती आहे. मतनोंदणी करतांनाच आपण कोणत्या पक्षाचे मतदार आहोत, हेही मतदार आपल्या नावासमोर नोंदवू शकतात आणि बहुतेक मतदार तशी नोंद करतात सुद्धा. वाहनांवर, घरांवर आय ॲम ए डेमोक्रॅट किंवा आय ॲम ए रिपब्लिकन अशा पाट्या लागायला सुरवात झाली आहे. ट्रंप ट्वेंटी,ट्वेंटी किंवा बायडेन ट्वेंटी टेंट्वी, अशा पाट्या मॅाल्स, दुकाने, उपहारगृहे यातही दिसू लागल्या आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांना आपले मतदार कोण आहेत, किती आहेत, ते कुठे राहतात, हे बहुतांशी माहीत झालेले असते. त्यानुसारही ते निकालाचा अंदाज बांधू शकतात. मुख्य असे की, मतदान दिनांकाच्या दिवशीही मतदार नोंदणी करता येते. मतदार यादीत आपले नाव नाही, हे कळताच अगदी मतदानाच्या दिवशीही नोंदणी करून लगेच मतदान करता येते. त्यामुळे मतदार यादीत नाव नाही म्हणून ऐनवेळी होणारा आक्रोश, संताप अमेरिकेत आढळत नाही. आपल्या पसंतीच्या उमेदवाराचे नाव लिहून मत देता येण्याची तरतूद मतपत्रिकेवरील एकही उमेदवार आपल्याला पसंत नसेल तर, मतदार मतपत्रिकेवर आपल्या पसंतीच्या उमेदवाराचे नाव स्वत:च्या अक्षरात लिहून त्याला आपले मत देऊ शकतो, अशी नियमात तरतूद आहे. मतपत्रिकेवर अधिकृत अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या जोडगोळीनंतर, आपल्या पसंतीच्या जोडीची नोंद करता यावी यासाठी रिकामा रकाना ठेवलेला असतो. या नियमानुसार या अधिकाराचा वापर 7 इलेक्टर्सनी 2016 मध्ये केला होता. त्यातले 5 इलेक्टर्स डेमोक्रॅट पक्षाचे व 2 इलेक्टर्स रिपब्लिकन पक्षाचे होते. त्यापैकी तिघांनी मतपत्रिकेवर आपल्या पसंतीच्या उमेदवाराचे, कॅालिन पॅावेल यांचे, नाव लिहिले होते आणि त्यांच्या नावे आपले मत नोंदविले होते. उरलेल्या चौघांनी त्यांना मिळालेल्या मतपत्रिकेवर एकेक करून जॅान कसिच, बर्नी सॅंडर्स, रॅान पॅाल, श्रीमती फेथ स्पॅाटेड इगल या चौघांपैकी आपल्या पसंतीचे एकेक नाव लिहून त्याला/तिला आपापले मत दिले होते. कोण होते हे भाग्यवंत उमेदवार? अमेरिकेत उमेदवारांची निवड पक्षश्रेष्ठी करीत नाहीत. त्यासाठी पक्षांतर्गत निवडणुका होत असतात. या निवडणुकांमध्ये कोणत्या ना कोणत्या स्तरावर बाद झालेले हे भाग्यवान उमेदवार बहुदा यापैकी असतात. अमेरिकेत डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन असे दोनच प्रमुख पक्ष असले तरी इतर चिल्लर पक्षही आहेत. अनेकदा त्या सगळ्यांना मिळून 5 % मते मिळालीच तर मिळतात. पण मतपत्रिकेवर त्यांचे नाव मात्र असते. पण मतपत्रिकेवर नाव नसतांनाही कॅालिन पॅावेल यांना 3, जॅान कसिच, बर्नी सॅंडर्स, रॅान पॅाल, श्रीमती फेथ स्पॅाटेड इगल, यांना प्रत्येकी 1 मत देण्यात आले होते. असा हा 7 मतांचा हिशोब आहे. यांना (अविश्वसनीय/ दलबदलू) इलेक्टर्स असे म्हणतात.

No comments:

Post a Comment